[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ द्वाविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
रावणेन तस्याः कृते मासद्वयावधेः प्रदानं सीताकर्तृकं तस्य भर्त्सनं रावणस्य तां निर्भर्त्स्य राक्षसीनां नियन्त्रणे संस्थाप स्त्रिभिः सह स्वभवने गमनम् -
रावणाने सीतेला दोन महिन्याची अवधि देणे, सीतेने त्याला फटकारणे, परत रावणाने तिला धमकावून राक्षसीणींच्या नियन्त्रणात ठेवून, आपल्या स्त्रियांसह महालात परत जाणे -
सीताया वचनं श्रुत्वा परुषं राक्षसेश्वरः ।
प्रत्युवाच ततः सीतां विप्रियं प्रियदर्शनाम् ॥ १ ॥
सीतेचे ते कठोर वचन ऐकून राक्षसराज रावण त्या प्रियदर्शिनी सीतेस याप्रमाणे अप्रिय वचन बोलू लागला- ॥१॥
यथा यथा सान्त्वयिता वश्यः स्त्रीणां तथा तथा ।
यथा यथा प्रियं वक्ता परिभूतस्तथा तथा ॥ २ ॥
जगात पुरुष जस-जसा स्त्रियांचा अनुनय-विनय करतो, तस-तसा तो त्यांना प्रिय होतो. परन्तु मी तुझ्याशी जसजसा प्रिय वचन बोलत आहे तसा तसा तू माझा तिरस्कारच करीत आहेस. ॥२॥
संनियच्छति मे क्रोधं त्वयि कामः समुत्थितः ।
द्रवतो मार्गमासाद्य हयानिव सुसारथिः ॥ ३ ॥
परन्तु उत्तम सारथी ज्याप्रमाणे वाईट मार्गाने जाणार्‍या घोड्यांना रोखून धरतो त्याप्रमाणे तुझ्यासंबन्धी मनात जो काम उत्पन्न झाला आहे, तो माझ्या क्रोधाला रोखून धरीत आहे. ॥३॥
वामः कामो मनुष्याणां यस्मिन् किल निबध्यते ।
जनेतस्मिन् त्वनुक्रोशः स्नेहश्च किल जायते ॥ ४ ॥
मनुष्यांमध्ये हा काम फारच वक्र आहे. तो ज्या व्यक्तिंच्या विषयी बद्ध होतो त्या व्यक्ती संबन्धी करूणा आणि स्नेहच खरोखर उत्पन्न होतात. ॥४॥
एतस्मात् कारणान्न त्वां घातयामि वरानने ।
वधार्हामवमानार्हां मिथ्या प्रव्रजने रताम् ॥ ५ ॥
आणि या कारणांमुळेच हे सुमुखी ! खोट्या वैराग्यात तत्पर आणि वध व तिरस्कारास योग्य असूनही मी तुझा वध करीत नाही आहे. ॥५॥
परुषाणि हि वाक्यानि यानि यानि ब्रवीषि माम् ।
तेषु तेषु वधो युक्तस्तव मैथिलि दारुणः ॥ ६ ॥
हे मैथिली ! तू माझ्याशी जसे जसे कठोर भाषण करीत आहेत, त्याच्या बदल्यात तुला कठोर प्राणदण्ड देणेच खरोखर उचित आहे. ॥६॥
एवमुक्त्वा तु वैदेहीं रावणो राक्षसाधिपः ।
क्रोधसंरम्भसंयुक्तः सीतामुत्तरमब्रवीत् ॥ ७ ॥
विदेह राजकुमारी सीतेस याप्रकारे बोलून क्रोधाविष्ट झालेला राक्षसराज रावण परत तिला याप्रमाणे उत्तर देऊ लागला- ॥७॥
द्वौ मासौ रक्षितव्यौ मे योऽवधिस्ते मया कृतः ।
ततः शयनमारोह मम त्वं वरवर्णिनि ॥ ८ ॥
हे सुन्दरी ! माझ्या विचारास संमती देण्याबद्दल वाट पहाण्याची जी कालमर्यादा मी तुला सांगितली आहे, ती पूर्ण होण्यासाठी मला सुमारे दोन महिने आणखी वाट पाहिली पाहिजे या दोन महिन्यानन्तर तुला माझ्या शय्येवर आरोहण करावे लागेल. ॥८॥
द्वाभ्यामूर्ध्वं तु मासाभ्यां भर्तारं मामनिच्छतीम् ।
मम त्वां प्रातराशार्थे सूदाश्छेत्स्यन्ति खण्डशः ॥ ९ ॥
म्हणून लक्षात ठेव की जर दोन महिन्यानन्तरही तू भर्ता म्हणून माझा स्वीकार केला नाहीस तर माझ्या न्याहारीकरिता आचारी तुझे तुकडे तुकडे करून टाकतील. ॥९॥
तां भर्त्स्यमानां सम्प्रेक्ष्य राक्षसेन्द्रेण जानकीम् ।
देवगन्धर्वकन्यास्ता विषेदुर्विकृतेक्षणाः ॥ १० ॥
याप्रकारे राक्षसराज रावण जनकनन्दिनी सीतेची निर्भत्सना करून तिला धमकावू लागलेला पाहून देवकन्या आणि गन्धर्वकन्या यांना अत्यन्त विषाद वाटला. त्यांचे डोळे पाणावले. ॥१०॥
ओष्ठप्रकारैरपरा नेत्रैर्वक्त्रैस्तथापराः ।
सीतामाश्वासयामासुस्तर्जितां तेन रक्षसा ॥ ११ ॥
त्यांच्यापैकी काहींनी ओठांनी, तर काहीनी नेत्रद्वारे तर काहीनी मुखाने संकेत करून, खुणा करून सीतेला आश्वासन दिले, धीर दिला. ॥११॥
ताभिराश्वासिता सीता रावणं राक्षसाधिपम् ।
उवाचात्महितं वाक्यं वृत्तशौटीर्यगर्वितम् ॥ १२ ॥
त्यांचा आधार मिळाल्यावर, आपले पातिव्रत्य आणि पतिचे शौर्य यांचा अभिमान बाळगणार्‍या सीतेने राक्षसाधिपति रावणाला हितकर असे भाषण त्याच्याशी केले. ॥१२॥
नूनं न ते जनः कश्चिदस्मिन्निःश्रेयसि स्थितः ।
निवारयति यो न त्वां कर्मणोऽस्माद् विगर्हितात् ॥ १३ ॥
ती म्हणाली की निश्चितच या नगरामध्ये तुझे हित करण्याविषयी दक्ष असणारा कुणीही पुरुष नाही, कारण या निन्द्य कर्मापासून कोणीच कसे तुला अडवीत नाही ? ॥१३॥
मां हि धर्मात्मनः पत्‍नीं सचीमिव शचीपतेः ।
त्वदन्यस्त्रिषु लोकेषु प्रार्थयेन्मनसापि कः ॥ १४ ॥
ज्याप्रमाणे शची ही इन्द्राची धर्मपत्‍नी आहे त्याप्रमाणे मीही धर्मात्मा भगवान श्रीराम यांची धर्मपत्‍नी आहे. या त्रैलोक्यात तुझ्या खेरीज दुसरा कोणी तरी सापडेल काय की जो मनानेही मला प्राप्त करण्याची इच्छा करील ? ॥१४॥
राक्षसाधम रामस्य भार्याममिततेजसः ।
उक्तवानपि यत् पापं क्व गतस्तस्य मोक्ष्यसे ॥ १५ ॥
हे राक्षसधमा ! तू अमित तेजस्वी श्रीरामाच्या भार्येला उद्देशून जी पापयुक्त वचने उच्चारली आहेस, त्याच्या फलस्वरूप प्राप्त होणार्‍या दंडापासून तू कोठेही गेलास तरी तुझी कशी बरे सुटका होईल ? ॥१५॥
यथा दृप्तश्च मातङ्‌गः शशश्च सहितौ वने ।
तथा द्विरदवद् रामस्त्वं नीच शशवत् स्मृतः ॥ १६ ॥
ज्याप्रमाणे वनात दैवयोगाने मत्तहत्ती आणि ससा यांची प्रतिपक्षी या नात्याने गांठ पडावी तसा प्रकार सांप्रत घडलेला आहे. श्रीराम हे मत्त गजराजाप्रमाणे आहेत आणि तू क्षुद्र सशाप्रमाणे आहेस. ॥१६॥
स त्वमिक्ष्वाकुनाथं वै क्षिपन्निह न लज्जसे ।
चक्षुषो विषये तस्य न यावदुपगच्छसि ॥ १७ ॥
अरे ! इक्ष्वाकुनाथ श्रीरामाचा तिरस्कार करण्यास तुला लाज वाटत नाही का ? जोवर तू त्यांच्या दृष्टीच्या टप्प्यात येत नाहीस, तो पर्यन्त तुला जशी इच्छा होईल तसे बोलून घे. ॥१७॥
इमे ते नयने क्रूरे विकृते कृष्णपिंगले ।
क्षितौ न पतिते कस्मान्मामनार्य निरीक्षतः ॥ १८ ॥
हे अनार्या ! माझ्याकडे वाईट नजरेने निरखून पहातांना तुझे क्रूर, विकृत आणि काळे-पिवळे डोळे पृथ्वीवर गळून कसे पडले नाहीत ? ॥१८॥
तस्य धर्मात्मनः पत्‍नी स्नुषा दशरथस्य च ।
कथं व्याहरतो मां ते न जिह्वा पाप शीर्यति ॥ १९ ॥
मी धर्मात्मा श्रीरामाची धर्मपत्‍नी आणि महाराज दशरथांची स्नुषा असून हे पाप्या ! माझ्याशी असे असभ्य भाषण करीत असता तुझी जीभ गळून कशी पडली नाही ? ॥१९॥
असन्देशात् तु रामस्य तपसश्चानुपालनात् ।
न त्वां कुर्मि दशग्रीव भस्म भस्मार्हतेजसा ॥ २० ॥
दशमुख रावणा ! माझे तेज तुला भस्म करून टाकण्यास पर्याप्त आहे पण केवळ श्रीरामाची आज्ञा नसल्याने आणि मला माझ्या तपाचे परिपालन करावयाचे आहे या विचारानेच मी तुला भस्म करून टाकीत नाही. ॥२०॥
नापहर्तुमहं शक्या तस्य रामाय धीमतः ।
विधिस्तव वधार्थाय विहितो नात्र संशयः ॥ २१ ॥
मी बुद्धिमान श्रीरामाची भार्या आहे, मला हरण करून घेऊन येण्याची शक्ती तुझ्या ठिकाणी नाही. निःसन्देह तुझ्या वधासाठीच विधात्याने हे विधान रचले आहे. ॥२१॥
शूरेण धनदभ्रात्रा बलैः समुदितेन च ।
अपोह्य रामं कस्माच्चिद् दारचौर्यं त्वया कृतम् ॥ २२ ॥
तू तर मोठा शूरवीर म्हणवितोस, कुबेराचा बन्धु आहेस आणि तुझ्या जवळ मोठे सैन्यही आहे, तरीही कपटाने श्रीरामास दूर जावयास लावून, तू त्यांच्या स्त्रीची चोरी का केलीस ? ॥२२॥
सीताया वचनं श्रुत्वा रावणो राक्षसाधिपः ।
विवृत्य नयने क्रूरे जानकीमन्ववैक्षत ॥ २३ ॥
सीतेचे ही वचने ऐकून राक्षसराज रावण डोळे वटारून त्या जनक कन्येकडे पाहू लागला. त्याच्या दृष्टीतून क्रूरता टपकत होती. ॥२३॥
नीलजीमूतसंकाशो महाभुजशिरोधरः ।
सिंहसत्त्वगतिः श्रीमान् दीप्तजिह्वोग्रलोचनः ॥ २४ ॥
तो नील मेघाप्रमाणे काळा आणि विशाल शरीराचा होता. त्याच्या भुजा आणि त्याची मान मोठी होती. तो गति आणि पराक्रमात सिंहासारखा होता आणि तेजस्वीही दिसत होता. त्याची जिव्हा अग्निच्या ज्वाळे प्रमाणे लवलव करीत होती आणि नेत्र फारच भयंकर दिसत होते. ॥२४॥
चलाग्रमुकुटप्रांशुर्चित्रमाल्यानुलेपनः ।
रक्तमाल्याम्बरधरस्तप्ताङ्‌गदविभूषणः ॥ २५ ॥

श्रोणीसूत्रेण महता मेचकेन सुसंवृतः ।
अमृतोत्पादने नद्धो भुजङ्‌गेनेव मन्दरः ॥ २६ ॥
क्रोधामुळे त्याच्या मुकुटाचा अग्रभाग हलत होता व त्यामुळे तो अधिकच उंच भासत होता. त्याने विविध प्रकारचे हार आणि उट्या धारण केल्या होत्या. त्याने रक्तवर्णाची पुष्पे आणि वस्त्रे धारण केली होती आणि उत्कृष्ट सुवर्णाची बाहुभूषणे धारण केली होती. त्याच्या कमरेच्या चारी बाजूस काळ्या रंगाचे लांब कटिसूत्र बान्धलेले होते आणि त्यामुळे तो अमृत मन्थनाच्या वेळी वासुकीने वेढलेला जणु काही मन्दार पर्वतच की काय, असा दिसत होता. ॥२५-२६॥
ताभ्यां स परिपूर्णाभ्यां भुजाभ्यां राक्षसेश्वरः ।
शुशुभेऽचलसंकाशः शृंगाभ्यामिव मन्दराः ॥ २७ ॥
शक्तिसंपन्न आपल्या परिपुष्ट भुजांच्या योगे तो पर्वतासमान विशाल शरीराचा राक्षसराज रावण, दोन शिखरांनी सुशोभित मन्दराचलाप्रमाणे शोभत होता. ॥२७॥
तरुणादित्यवर्णाभ्यां कुण्डलाभ्यां विभूषितः ।
रक्तपल्लवपुष्पाभ्यामशोकाभ्यामिवाचलः ॥ २८ ॥
बालसूर्याप्रमाणे तेजस्वी अशा अरूण पीत कान्तिचा दोन कुंडलांनी त्याच्या कानांची शोभा वाढली होती, जणू लाल पल्लव आणि फुलांनी युक्त दोन अशोक वृक्षच एखाद्या पर्वतास सुशोभित करीत आहेत असे वाटत होते. ॥२८॥
स कल्पवृक्षप्रतिमो वसन्त इव मूर्तिमान् ।
श्मशानचैत्यप्रतिमो भूषितोऽपि भयंकरः ॥ २९ ॥
तो अभिनव शोभेने संपन्न होऊन कल्पवृक्ष एवं मूर्तीमान वसन्ताप्रमाणे भासत होता. आभूषणांनी भूषित होऊनही तो स्मशानातील देवायलाप्रमाणे (स्मशानचैत्य) भयंकर वाटत होता. ॥२९॥
अवेक्षमाणो वैदेहीं कोपसंरक्तलोचनः ।
उवाच रावणः सीतां भुजंग इव निःश्वसन् ॥ ३० ॥
रावणाने क्रोधाने लाल भडक झालेल्या डोळ्यांनी विदेहराजकुमारी सीतेकडे पाहिले आणि सर्पासमान दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला- ॥३०॥
अनयेनाभिसम्पन्नमर्थहीनमनुव्रते ।
नाशयाम्यहमद्य त्वां सूर्यः सन्ध्यामिवौजसा ॥ ३१ ॥
मर्यादा सोडून वागणार्‍या आणि निर्धन अशा रामाचे अनुसरण करणार्‍या स्त्रिये ! सूर्य ज्याप्रमाणे आपल्या तेजाने प्रातःकालीन सन्ध्येच्या अन्धःकाराचा नाश करतो त्याप्रमाणे आज मी तुझा आपल्या सामर्थ्याने नाश करून टाकीन. ॥३१॥
इत्युक्त्वा मैथिलीं राजा रावणः शत्रुरावणः ।
सन्ददर्श ततः सर्वा राक्षसीर्घोरदर्शनाः ॥ ३२ ॥
मैथिलीस याप्रमाणे सांगून शत्रूंना रडविणार्‍या राजा रावणाने भयंकर दिसणार्‍या सर्व राक्षसीणींकडे पाहिले. ॥३२॥
एकाक्षीमेककर्णां च कर्णप्रावरणां तथा ।
गोकर्णीं हस्तिकर्णीं च लंबकर्णीमकर्णिकाम् ॥ ३३ ॥

हस्तिपद्यश्वपद्यौ च गोपदीं पादचूलिकाम् ।
एकाक्षीमेकपादीं च पृथुपादीमपादिकाम् ॥ ३४ ॥

अत्मात्रशिरोग्रीवां अतिमात्रकुचोदरीम् ।
अतिमात्रास्यनेत्रां च दीर्घजिह्वानखामपि ॥ ३५ ॥

अनासिकां सिंहमुखीं गोमुखीं सुकरीमुखीम् ।
यथा मद्वशगा सीता क्षिप्रं भवति जानकी ॥ ३६ ॥

तथा कुरुत राक्षस्य सर्वाः क्षिप्रं समेत्य वा ।
प्रतिलोमानुलोमैश्च सामदानादिभेदनैः ॥ ३७ ॥

आवर्जयत वैदेहीं दण्दस्योद्यमनेन च ।
त्याने एकाक्षी (एकच डोळा असणारी), एककर्णा (एकच कान असलेली). कर्णप्रावरणा (लांब कानांनी आपल्या शरीरास झाकून घेणारी), गोकर्णी (गायी सारखे कान असणारी), हस्तिकर्णी (हत्तीप्रमाणे कान असलेली), लंबकर्णी (लांब कान असलेली), आणि अकर्णिका (कानच नसलेली), हस्तिपदी (हत्तीसारखे पाय असलेली), अश्वपदी (घोड्यासारखे पाय असलेली), गोपदी (गाईसारखे पाय असलेली), पादचूलिका (केसयुक्त पाय असलेली). एकाक्षी, एकापादी, पृथुपादी (मोठे पाय असणारी), अपादिका (जिला पायच नाहीत), अतिमात्र शिरोग्रीवा (विशाल शिर आणि मान असणारी), अतिमात्र कुचोदरी (खूप मोठे स्तन आणि पोट असणारी), अतिमात्रास्य नेत्रा (विशाल मुख आणि नेत्र असलेली), दीर्घ जिव्हानखा (लांब जीभ आणि नखे असलेली), अनासिका (नाक नसलेली), सिंहमुखी (सिंहासारखे मुख असलेली), गोमुखी (गायीसारखे मुख असलेली), तथा सुकरीमुखी (डुकरीसारखे मुख असलेली) - या प्रमाणे सर्व राक्षसीणींना म्हटले की - निशाचरीनो ! तुम्ही सर्वजणी मिळून अथवा वेगळे वेगळे तात्काल असे प्रयत्‍न करा की ज्यायोगे जनककिशोरी सीता अत्यन्त लवकर मला वश होईल. अनुकूल प्रतिकूल उपायांनी, साम, दाम आणि भेदनीतिने तसेच दण्डाचेही भय दाखवून वैदेही सीतेला वश करण्याचे प्रयत्‍न करा. ॥३३-३७ १/२॥
इति प्रतिसमादिश्य राक्षसेन्द्रः पुनः पुनः ॥ ३८ ॥

काममन्युपरीतात्मा जानकीं प्रति गर्जत ।
राक्षसीणींना याप्रमाणे वारंवार आज्ञा देऊन काम आणि क्रोध यांनी व्याकुळ होऊन राक्षसराज रावण, जानकीकडे पाहून मोठमोठ्याने गर्जना करू लागला. ॥३८ १/२॥
उपगम्य ततः क्षिप्रं राक्षसी धान्यमालिनी ॥ ३९ ॥

परिष्वज्य दशग्रीवमिदं वचनमब्रवित् ।
तेव्हा धान्यमालिनी नावाची राक्षसी तात्काळ त्याच्याजवळ गेली आणि त्यास आलिंगन देऊन म्हणाली- ॥३९ १/२॥
मया क्रीड महाराज सीतया किं तवानया ॥ ४० ॥

विवर्णया कृपणया मानुष्या राक्षसेश्वर ।
हे महाराजा ! तू माझ्यासह क्रीडा कर. हे राक्षसाधिपते, या कान्तिहीन आणि दीन मानव कन्या सीतेशी आपल्याला काय प्रयोजन आहे ? ॥४० १/२॥
नूनमस्यां महाराज न देवा भोगसत्तमान् ॥ ४१ ॥

विदधत्यमरश्रेष्ठास्तव बाहुबलार्जितान् ।
महाराज ! आपल्या बाहुबळाने तू जे दिव्य आणि उत्तम भोग्यपदार्थ संपादन केले आहेस त्यांचा भोग घेणे देव श्रेष्ठ ब्रह्मदेवाने हिच्या भाग्यात लिहिलेले नाही. ॥४१ १/२॥
अकामां कामयानस्य शरीरमुपतप्यते ॥ ४२ ॥

इच्छतीं कामयानस्य प्रीतिर्भवति शोभना ।
प्राणनाथ ! जी स्त्री आपल्यावर प्रेम करीत नाही तिची कामना करणार्‍या पुरुषाचे शरीरात केवळ तापच उत्पन्न होत असतो आणि आपल्यावर अनुराग-प्रेम करणार्‍या स्त्रीची कामना करणार्‍या पुरुषास उत्तम प्रसन्नता प्राप्त होते. ॥४२ १/२॥
एवमुक्तस्तु राक्षस्या समुत्क्षिप्तस्ततो बली ।
प्रहसन् मेघसंकाशो राक्षसः स न्यवर्तत ॥ ४३ ॥
जेव्हा त्या राक्षसीने असे म्हटले आणि ती त्याला दुसरीकडे घेऊन गेली, तेव्हा मेघासमान काळा आणि बलवान राक्षसराज रावण मोठमोठ्याने हसत आपल्या महालाकडे परत फिरला. ॥४३॥
प्रस्थितः स दशग्रीवः कम्पयन्निव मेदिनीम् ।
ज्वलद्‌भास्करसंकाशं प्रविवेश निवेशनम् ॥ ४४ ॥
आपल्या चालण्यामुळे जणु पृथ्वी कंपित करत तो रावण तेथून परत फिरला आणि उज्ज्वल सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा आपल्या प्रासादात त्याने प्रवेश केला. ॥४४॥
देवगन्धर्वकन्याश्च नागकन्याश्च तास्ततः ।
परिवार्य दशग्रीवं प्रविशुस्ता गृहोत्तमम् ॥ ४५ ॥
त्यानन्तर देवता, गन्धर्व आणि नागांच्या कन्यांनीही रावणास सर्व बाजूनी घेरून त्याच्या बरोबरच त्या उत्तम राजमहालात प्रवेश केला. ॥४५॥
स मैथिलीं धर्मपरामवस्थितां
प्रवेपमानां परिभर्त्स्य रावणः ।
विहाय सीतां मदनेन मोहितः
स्वमेव वेश्म प्रविवेश रावणः ॥ ४६ ॥
या प्रकारे आपल्या धर्माविषयी तत्पर, स्थिरचित्त आणि भयाने लटलट कापत असलेल्या त्या मिथिलेशकुमारी सीतेला धमकावून तिला तेथेच सोडून काममोहित रावण आपल्या महालात निघून गेला. ॥४६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे द्वाविंशः सर्गः ॥ २२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा बावीसावा सर्ग पूरा झाला. ॥२२॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP