॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

किष्किंधाकांड

॥ अध्याय सहावा ॥
वालीचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम हनुमंत सौमित्र । सुग्रीवसमवेत वानर ।
पावोनि किष्किंधेचें द्वार । केला भुभुःकार सुग्रीवें ॥१॥

अथ तस्य निनादं तं सुग्रीवस्य महात्मनः ।
शुश्रावांतःपुरगतो वाली भ्रातुरमर्षणः ॥१॥

सुग्रीवाचेनि गिरागजरें । नादें दुमदुमिलें अंबर ।
कोसळों पाहे गिरिकंदर । वाळीचें मंदिर दणाणलें ॥२॥

सुग्रीवाची गर्जना ऐकून वालीचा संताप :

ऐकोनि सुग्रीवाची आरोळी । कोपें खवळलासे वीर वाळी ।
आरक्त जाला क्रोधानळीं । जेंवी कुलाचळीं बालसूर्य ॥३॥
वाळी विचारी हृदयांत । आतांच युद्धीं जर्जरीभूत ।
म्यां पाडिला होता मूर्च्छित । सवेंचि गर्जत केंवी आला ॥४॥
माझ्या घायें मासानुमास । कुंथत पडे वर्षानुवर्ष ।
सवेंचि आला युद्धास । अति उल्लासें गर्जत ॥५॥
आतां असो हा विचार । बंधु वैरी सत्य साचार ।
रणीं पाचारितां महाशूर । निघावें सत्वर युद्धासीं ॥६॥

सुग्रीवाला रामांचे साहाय्य आहे तरी हे शत्रुत्व संपवावे असा तारेचा उपदेश :

युद्धा निघतां वाळीसीं । तारा लागली पायांसी ।
स्वहित सांगेन तुम्हांसी । विवेकेंसी अवधारिजे ॥७॥
तुझे लागल्या घाये । सुग्रीव कुंथत पडीला राहे ।
तो सवेंचि येवोनियां बाहे । गर्जत आहे युद्धार्थी ॥८॥
हे तंव नव्हे सुग्रीवशक्ती । तेणें साह्य केला श्रीरघुपती ।
त्याचेनि बळें युद्धप्रती । आला मागुती गर्जत ॥९॥
तुझा करावया घात । सुग्रीवा साह्य श्रीरघुनाथ ।
हा तुज न कळे अर्थ । बळोन्मत्त धांवसी ॥१०॥
तुवां जिंतिलें सुरनरांसी । मर्दिलें दैत्यदानवांसी ।
काखे सूदिलें रावणासी । श्रीरामापासीं ते न चाले ॥११॥
श्रीराम प्रतापें तेजोराशी । पूर्णावतार सुर्यवंशीं ।
ऐक त्याचिया प्रतापासी । मी तुजपासीं सांगेन ॥१२॥
जे कां अटक तिहीं लोकां । श्रीरामें वधिली ते ताटका ।
छेदोनि सुबाहूच्या मस्तका । मारीच देखा उडविला ॥१३॥
चवदा सहस्र निशाचर । सहित त्रिशिरा दुषण खर ।
श्रीरामें मारिले समग्र । बाणीं दुर्धर विंधोनी ॥१४॥
विंधोनियां एक बाण । विरोधाचा घेतला प्राण ।
काळ कबंध मारिला जाण । प्रतापी पूर्ण श्रीरामा ॥१५॥
ज्या धनुष्यें गांजिला रावण । तें चाप श्रीरामें भंगोन ।
केलें जानकीवरण । जामदग्य जिंकिला ॥१६॥
श्रीरामाच्या बाणाभेण । भिकारी झाला पैं रावण ।
चोरोनि केलें जानकीहरण । देवोनि बलिदान मारीचाचें ।
धावण्या आलिया श्रीरघुनंदन । एकेंचि घाये होईल प्राण ।
येणें भयें तो रावण । गेला पळोन लंकेसी ॥१८॥
विंधोनियां एक बाण । श्रीराम तुझा घेईल प्राण ।
हें तंव माझें सत्य भाषण । युद्धा आपण नव जावें ॥२०॥
श्रीरामीं न करावा विरोध । त्यांसी करावया सख्यसंबंध ।
माझा ऐकोनि अनुवाद । युद्धक्रोध सोडावा ॥२१॥

वालीचे तारेला उत्तर, रामांशी विरोध नाही :

एकोनि तारेचें उत्तर । वाळी म्हणे सत्य साचार ।
मज श्रीरामासीं नाहीं वैर । अणुमात्र मानसीं ॥२२॥
जे जे रामीं करिती विरोध । त्यांचा श्रीराम करील वध ।
हा मज कळला शुद्धबोध । कथानुवाद अवधारीं ॥२३॥
ताटका सकळ लोकांतें बाधी । यालागीं नीराम तीतें वधीं ।
सुबाहु यज्ञातें अवरोधी । रामें त्रिशुद्धि मारिला ॥२४॥
विरोधे केलें सीताहरण । श्रीरामें वधिला विंधोनि बाण ।
कबंधे धरिले दोघे जण । बाहु छेदोन मारिला ॥२५॥
करोनि शूर्पणखेचा कैवार । हिरूं आले सीता सुंदर ।
श्रीरामें वधिले त्रिशिरा खर । तैसें वैर मजसीं नाहीं ॥२६॥
मारीच मारिला कपटी पूर्ण । सीताहरणें वैरी रावण ।
तैसें विरोधलक्षण । मजसीं जाण असेना ॥२७॥
मी तंव केवळ निरपराध । कैसेनि श्रीराम करील वध ।
करितां सुग्रीवासीं रणविरोध । वैरसंबंध कां श्रीरामीं ॥२८॥

तारेचे पुनः सांगणे की सुग्रीव श्रीरामांचा शरणागत आहे रामांचा विरोध :

तारा स्वयें सांगें संपूर्ण । सुग्रीव श्रीरामा झाला शरण ।
श्रीराम शरणागता शरण्य । संरक्षण सर्वार्थी ॥२९॥
शरणागता जो विरोधी । तो श्रीरामाचा मुख्य द्वंद्वी ।
त्यासी श्रीराम स्वयें वधी । जाण त्रिशुद्धि कपिराया ॥३०॥
शरणागताचिये घाता । श्रीराम करों नेदी सर्वथा ।
हेचि श्रीरामेंसीं वैरता । आत्मघाता निजमूळ ॥३१॥
तुटे सुग्रीवेंसीं विरोध । श्रीरामासीं होय तैं सुहृदसंबंध ।
तैसा साधीं निजबोध । माझा शब्द जरा करिसी ॥३२॥

श्रूयता क्रियतां चैव तव वक्ष्यामि यद्धितम् ।
रायौवराज्येन सुग्रीवं तूर्णं साध्वभिषेचय ॥२॥
विग्रहं मा कृथा वीर भ्रात्रा राजन्यवीयसा ।
अहं हि क्षमं मन्ये तेन रामेण सौहृदम् ॥३॥

श्रीरामांशी सख्य केले तरच शांती व समाधान लाभेल :

वाळी ऐकें सावधान । तुझे निजस्वहित सांगेन ।
सखा केलिया रघुनंदन । होसी पावन तिहीं लोकीं ॥३३॥
श्रीरामीं सख्य घडे कशानें । ऐसा विकल्प मानिसीं मनें ।
तेंही निमेषार्धे साधीन । माझें वचन जरी करिसी ॥३४॥
जेणें आप्त होय श्रीरघुनाथ । तारे सांगे मनोगत ।
येरी सांगत उल्लासत । पूर्ण हितार्थ देखोनी ॥३५॥
विरोध तुटे बंधुबंधूंसी । पुर्ण सख्य होय श्रीरामासीं ।
यौवराज्य द्यावें सुग्रीवासीं । निजहितासी लक्षोनी ॥३६॥
सुग्रीवा यौवराज्य देतां । परम सुख श्रीरघुनाथा ।
तिघा होईल ऐक्यता । एकात्मता अति प्रीती ॥३७॥
जैसा तुज प्रिय अंगदु । तैसा सुग्रीव कनिष्ठ बंधु ।
त्यांसी सांडितां विरोधु । सख्यसंबंधु श्रीरामीं ॥३८॥
ऐसें बोलोनियां पाहें । तारेनें धरिले दोनी पाये ।
श्रीरामीं सख्ये सुख आहे । करीं लवलाहें कपिराजा ॥३९॥
रत्‍नाभरणीं धनवस्रांसीं । अंगद धाडीं श्रीरामापासीं ।
शरण रिघोनियां त्यासी । आपणासी वांचवीं ॥४०॥
श्रीरामा रिघतां शरण । तुझें चुकेल जन्ममरण ।
दोघे बंधु पावोन बूझावण । कृतकल्याण पावसी ॥४१॥
जरी धरोनि गर्वबळ । श्रीरामेंसी करिसी छळ ।
तरी किष्किंधा सांडोनियां पळ । श्रीराम सबळ युद्धार्थीं ॥४२॥
व्हावया श्रीरामासमोर । धीर न धरिती सुरासुर ।
तेथें तूं केवळ वानर । पालेखाइर केंवी राहसी ॥४३॥
श्रीरामीं सख्य करीं निर्मळ । अथवा उठोनियां पळ ।
त्यासीं करितां युद्ध प्रबळ । तूं तत्काळ मरसील ॥४४॥
लागतां श्रीरामाचा बाण । मेरुमांदारां होय विदारण ।
तेथें तुझा केवा कोण । बळें प्राण देऊं नको ॥४५॥
माझें नायकतां भाषण । तूं बैससी मरणा धरण ।
श्रीराम विरोधिल्या जाण । जीवें प्राणें तो नुरे ॥४६॥

वालीचा प्रकोप :

ऐकोनि तारेचें वचन । वाळी जाला कोपायमान ।
भ्याडप्रकृति तुम्ही स्रिया जाण । कंपायमान परदर्पे ॥४७॥
सुग्रीवासी यौवराज्य देतां । मी न देवोदीं सर्वथा ।
साह्य जालिया श्रीरघुनाथा । राज्य सर्वथा न देणें ॥४८॥
देखोनि श्रीरामाचें बळ । वानर हा निर्बळ ।
किष्किंधा सांडोनियां पळ । भयें प्रबळ जल्पसीं ॥४९॥
तारे ऐक माझी शक्ती । अल्प सांगेन तुजप्रती ।
युद्धा आलिया श्रीरघुपती । शंका चित्तीं मज नाहीं ॥५०॥

उत्पाट्यतु रामो वा बाहुभ्यां विंध्यपर्वतम् ।
इमां सर्वां समुद्रांतां संचालयतु वा महीम् ॥४॥
सचंद्रतारानक्षत्रं पतेदत्र ससागरम् ।
न विव्यथेऽहं समरे सुग्रीवं प्रति सहृतः ॥५॥

वालीचा सामर्थ्याची पौढी :

बाहुबळें श्रीरघुनाथ । उत्पाटू विंध्यपर्वत ।
पृथ्वी समुद्रवलांकित । करो भस्मांत बाणे एके ॥५१॥
सचंद्र तारा गगन गंभीर । सहित सप्तही सागर ।
बाणें शोषो श्रीरामचंद्र । तरी मी वानर न शंके ॥५२॥
ऐसा पुरुषार्थ श्रीरघुनाथा । प्रत्यक्ष डोळ्यांदेखतां ।
मज बांधीना भयव्यथा । उल्लासतां संग्रामीं ॥५३॥
रणीं मरणें भयभीत । त्यासी यश ना पुरुषार्त ।
तैसा मी वाळी नव्हें एथ । रणीं रघुनाथ सुखी करीन ॥५४॥
सुग्रीव बापुडें किंकर । श्रीराम योद्धा रणवीर ।
त्यासीं मी भिडेन वानर । युद्ध दुर्धर पाहें माझें ॥५५॥
माझी पुरे आंगवण । ऐसा योद्धा आहे कोण ।
करावया श्रीरामासीं रण । आलें स्फुरण बाहूंसी ॥५६॥
श्रीराम आलिया संमुख । प्रतिज्ञेची देवोनि हाक ।
युद्ध करीन अपराङ्मुख । वाळी युद्धासीं पैं आला ॥५७॥

स वाली बलद्दप्तात्मा मुष्टिमुद्यम्य वीर्यवान् ।
सुग्रीवमेवाभिमुखो ययौ योद्धं कृतक्षणः ॥६॥
सुग्रीवोऽपि समुद्दिश्य वालिनं हेममालिनम् ।
श्र्लिष्टं मुष्टिं समुद्यम्य संरब्धतरमागतः ॥७॥
सुग्रीवेण तु निःशंकं सालमुत्पाट्य तेजसा ।
गात्रेष्वभिहतो वाली व्यपतत्स महीतले ॥८॥

पुनः वाली-सुग्रीव युद्ध :

वालिसुग्रीवां दृष्टिभेटीं । होतां वळोनि निजवज्रमुष्टी ।
युद्धक्रोधा महाहठी । उठाउठीं मिसळले ॥५८॥
उरीं शिरीं गुडघेमुष्टी । धांवानि हाणिती पुसाटी ।
तडवा हाणोनि पाडिती सृष्टीं । दोघे हट्टी महावीर ॥५९॥
हेममुकुट हेममाळा । शोभती वाळीचिया गळां ।
सुग्रीवा शोभे कमळमाळा । रणसोहळा वीरांचा ॥६०॥
मुष्टिघात चपटेघात । निष्ठुर हाणिती आघात ।
दोघांची सुधिर प्रवाहत । जेंवी पर्वत गैरिकां ॥६१॥
किंशुक फुलले वसंतांत । तैसें दोघे वीर अति आरक्त ।
रणामाजी विचरत । बलोन्मत्त युद्धक्रोधें ॥६२॥
सुग्रीव लक्षोनियां दृष्टीं । वाली हाणी वज्रमुष्टीं ।
मूर्च्छपन्न पडतां सृष्टीं । धैर्यें जगजेठी ऊठिला ॥६३॥
सुग्रीव क्षोभोनि ते वेळीं । शालवृक्षें ठोकिला वाळी ।
घाये मूर्च्छित महीतळीं । महाबळी लोळविला ॥६४॥
वाळी पाडिला महावीर । वानर करिती हाहाकार ।
ऐकोनि वीरांचा गजर । वाळी सत्वर ऊसळला ॥६५॥
बाहु आफळोनि वाळी । रणीं गर्जत क्रोधानळीं ।
कोपें सुग्रीव चालिला बळी । रणीं रवंदळी करावया ॥६६॥
सम तळपणें सम किराणा । गति विगति सम उड्डाणा ।
क्षणें भूमीं क्षणें गगना । युद्धविंदान दोहींचें ॥६७॥
दोघे बळें अति समर्थ । येरयेरां नाटोपत ।
दोघां लाभेना विजयार्थ । अति सामर्थ्येकरोनियां ॥६८॥
वाळी बळी वरदमाळा । श्रीराममाळा सुग्रीवगळां ।
पाहतां त्यांचा रणसोहळा । समबळ समान ॥६९॥
युद्धकंदनें खेदक्षीण । श्रमस्वेदें दोघे क्षीण ।
ऐसें देखोनि श्रीरघुनंदन । धनुष्य बाण सज्जिला ॥७०॥

सुग्रीवाला भूमीवर पाडला त्याच वेळी रामांनी वालीवर बाण सोडला :

सुग्रीव तळवटीं आणिला । ऐसें श्रीरामें देखिलें डोळां ।
आतां न मारितां वाळीला । गोष्टी होईल पहिल्याऐसी ॥७१॥

ततः संधाय रामेणा शरमाशीविषोपमम् ।
वेगेनाभिकहतो वाली निपपात महीतले ॥९॥

आक्रमें मारावया सुग्रीवासी । वाळी उडतां आकाशीं ।
श्रीरामें विंधितां वेगेंसीं । शरू सपिच्छीं खडतरला ॥७२॥
जेंवी सर्प रिघे वारुळीं । तैसा बाण हृदयकमळीं ।
प्रवेशोनि अंतकाळीं । पाडिला वाळी मूर्च्छित ॥७३॥
जैसा ईश्वर राहोनि गुप्त । निमिषमात्रें करी निःपात ।
तैसा अतर्क्य श्रीरघुनाथ । करी वाळीचा घात बाणाग्रें ॥७४॥
अतर्क्य सद्‌गुरुवचन । श्रवणेंचि शिष्या समाधान ।
तैसा श्रीरामाचा बाण । सुखसंपन्न वाळीसी ॥७५॥
जैसा धडधडीत वन्ही । सुखरूप सतीलागोनी ।
तैसें श्रीरामाचें बाणीं । वाळीलागोनी सुखरुप ॥७६॥
जेंवी कां सुख शुद्ध सात्विली । अग्रीं कठिण गोड परिपाकीं ।
श्रीरामबाण तदनुलक्षीं । उभयपक्षीं सुखरुप ॥७७॥
सुग्रीवासी सुख लौकिक । वाळीस सुख त्याहूनि अधिक ।
बाण विंधोनियां एक । दिधलें सुख दोहोंसी ॥७८॥
श्रीराम बाणाचा प्रताप । सुग्रीव भ्रमतां भयकंप ।
परी एक सुखरुप । श्रीराम चिद्रूप कृपाळु ॥७९॥
श्रीरामबाणाग्रीं भासे दुःख । तेंचि परिपाकीं परम सुख ।
वदेल वाळीचें निजसुख । श्रोतीं सकळिक निजबाणीं ॥८०॥

वालीला मूर्च्छा, सावध होऊन त्याने रामाचा अधिक्षेप केला :

श्रीरामच्या निजबाणीं । वाळी मूर्च्छित पडिला धरणीं ।
बोले श्रीरामा अनुलक्षोनी । अधर्मकरणी तुवां केली ॥८१॥

पराङ्मुखवधं कृत्वा को नु प्राप्तस्त्वया गुणः ।
यदहं युद्धसंरब्धस्त्वत्कूते निधनं गतः ॥१०॥
शोचामि नात्मानमहं न तारां नापि बांधवान् ।
त्वत्कृतेन ह्यधर्मेण यथा शोचामि राघव ॥११॥

मी आणिकासीं युद्धासक्त । श्रीरामा तूं अति गुप्त ।
पराङ्मुखीं केला घात । कोण पुरुषार्थ श्रीरामा ॥८२॥
न पाचारितां एकाएक । अतर्क्यरूपें निजघातक ।
तुझा हा अधर्म देखोनि देख । परम दुःख माझे मनीं ॥८३॥
नाहीं राज्यहरणाची व्यथा । तारावियोग न बाधी चित्ता ।
तुझी देखोनि अधर्मता । दुःख रघुनाथा मज भारी ॥८४॥
नव्हे सुहृददुःख बाधक । बाधेना अंगदाचा शोक ।
तुझा अधर्म देखतां देख । परम दुःख मज रामा ॥८५॥
वध करों नयें निद्रिस्था । वधूं नये स्रियेसीं रमतां ।
वधूं नये न पाचारितां । पुरुष दुश्चित नयें वधूं ॥८६॥
तूं सर्वज्ञ श्रीरघुनाथा । ऐसिया जाणोनि शास्रार्था ।
अधर्में करोनि माझे घाता । अपेश माथा घेतलें ॥८७॥
तूं चंद्राहूनिं अति चोख । श्रीरामकीर्ति नित्य निर्दोख ।
अधर्मघाताचा कळंक । त्यावरी देख बैसविला ॥८८॥
सुग्रीव बापुडें तें किती । काय साह्य होईल सीताशुद्ध्यर्थीं ।
ते मज सांगतासी श्रीरघुपती । करितों ख्याती ते ऐक ॥८९॥

सुग्रीवप्रियकामेन यदहं घातितस्त्वया ।
गले बध्वा प्रदद्यां ते निहतं रावण रणे ॥१२॥
न्यस्तां सागरतोये वा पाताले वापि मैथिलीम् ।
आनयेऽहं तवादेशाद्‌गरुडेमृतं यथा ॥१३॥

रावणाकरिता अधर्म का केला :

रावण माझा काखवळ । गळां बांधोनि तत्काळ ।
आणितों न लगतां पळ । तूं माझें बळ नेणसी ॥९०॥
समुद्रजळीं सप्तपाताळीं । शोधोनि लोकालोकाषळीं ।
आणितों मी जनकबाळीं । तुजजवळी निमेषार्धें ॥९१॥
चतुःसमुद्रीं प्रातःस्नान । करितां मजला न लगे क्षण ।
बळे मजुपुढें तुच्छ रावण । सीता आणोन मी देतों ॥९२॥
मज हा सांगतासी विचार । सीतासती रावण सहपरिवार ।
लंका उपडोनि समग्र । येथें सत्वर आणितों ॥९३॥
सुग्रीवाच्या पक्षपाता । अधर्मेंकरितां माझ्या घाता ।
अपेश आले श्रीरघुनाथा । कीर्तींचे माथां अपकीर्ती ॥९४॥
पुढें साचार श्रीरघुपती । जरी करिसी कोटिकीर्ती ।
तरी अधर्मघाताची अपकीर्तीं । तिळभरी परती ढळेना ॥९५॥
नाहीं रडत राज्यहरणासी । नाहीं मी रडत निजमरणासी ।
अधर्म जडला श्रीरामचरणांसी । तेणें मानसीं अति दुःखी ॥९६॥
सेवकें कीर्ती करावी ऐसी । जगत्रय वंदी स्वामिसेवकांसी ।
सुग्रीवें गौरविलें श्रीरामासी । कीर्तिवंतासी अपकीर्तीं ॥९७॥
सुग्रीवें काय केला उपकार । म्यां तुज काय केला अपकार ।
ऐसा न करितां विचार । मज सत्वर कां वधिलें ॥९८॥
संग्रामीं वधितासी सन्मुख । त्या मरणाचा मज हरिख ।
कीर्ती वर्णितें तिन्ही लोक । तें आवश्यक चुकलासी ॥९९॥
अधर्में वधितां वाळीसी । श्रीरामहस्तें उद्धार त्यासी ।
मज यश तूं अपेशी । कीर्ती अति विशेषी त्वां केली ॥१००॥

श्रीरामांचे वालीला समर्पक उत्तर, त्यामुळे त्याचे परिवर्तन :

श्रीरामहस्तें मज मरण । तेणें मी त्रैलोक्यीं पावन ।
तुज तुवां लाविलें दूषण । अधर्मे बाण विंधोनी ॥१०१॥
ऐकोनि वालिनिंदावचन । दुःख न मानीच रघुनंदन ।
काय बोलिला धर्मवचन । गुह्यज्ञान हितकारी ॥१०२॥
पुढिल्या स्वधर्म शिकविती । स्वयें अधर्म आचरती ।
तयां मूर्खांची वाचावंदती । सत्य मानी तोचि महामूर्ख ॥१०३॥

अद्य धर्ममधर्मं च जानासि त्वं कपीश्वर ।
कृतं कर्म न जानासि भ्रातृभार्यावमर्शनम् ॥१४॥

माझा बाण भेदल्यासाठीं । सांगतोसी या स्वधर्म गोष्टी ।
आपल्या अधर्माची रहाटी । निजात्मदृष्टीं न्याहाळिसी ना ॥१०४॥
कन्या भगिनी भातृपत्‍नी । कन्येसमान या तिन्ही ।
ते बंधुभार्या त्वां हिरोनी अनुदिनीं भोगिसी ॥१०५॥
तारेसारखी पतिव्रता । तुज असतां सुंदर कांता ।
कां बंधुभार्या अधर्मता । तूं का भोगिता जालासी ॥१०६॥
आपली नाठवे अधर्मता । अधर्म ठेविसी माझे माथां ।
अधर्माची संसर्गता । भासे अशुद्धता शुद्धत्वीं ॥१०७॥
जेंवी का स्फटिक नित्य निर्मळ । त्यासी भेटतांचि काजळ ।
शुद्धता लोपनि तत्काळ । भासे सकळ काळिमा ॥१०८॥
स्फटिक काजळें दिसतो काळा । परी तो काळिमेवेगळा ।
तेंवी पापपुण्या निराळा । राम चित्कळा चिन्मूर्ति ॥१०९॥
नभीं नीळिमा नाहीं अळुमाळ । निळें डोळ्याचें निजबुबुळ ।
तेणें नभ देखती सुनीळ । डोळ्यांचे मळ नभीं दिसती ॥११०॥
तेंवी मी राम नित्य शुद्धात्मा । तूं मज म्हणसी अधर्मकर्मा ।
तुझे छेदावया पापभ्रमा । अगाध महिमा बाणाचा ॥१११॥
तुझे अंगी पाप सदोष । तुजला मी केंवी भेटेन सन्मुख ।
छे्दावया तुझे महादोष । बाण अतर्क्य विंधिला ॥११२॥
मी विश्वात्मा विश्वतोमुख । साधुसंतां नित्य सन्मुख ।
पापात्मा नित्य विमुख । बाणें निर्दोष केलें तुज ॥११३॥
बाण विंधोनि अतर्क्यता । तुझी छेदोनि पापात्मता ।
कृपेंनें भेटलो मी आतां । तुज तत्वतां तारावया ॥११४॥
तुज मारावया हेंचि कारण । माझ्या सुग्रीवाचा वंधु पूर्ण ।
तुझा चुकवावया नरक दारुण । पापनिर्दळण बाणें केलें ॥११५॥
शरणागताचा निजबंन्धु । त्यासी जालिया नरकबाधु ।
हा मज न साहे शब्दु । बाणें अति शुद्ध केलासे ॥११६॥
सांडोनियां विकल्पवृत्ती । जो जो लागेल मद्‌भक्त संगतीं ।
तो तो उद्धरीं मी रघुपती । वाळी निश्चिती तूं जाण ॥११७॥
तुझे अंगीं पाप दारूण । तेणें यम दंडिता तुज पूर्ण ।
तें चुकवावया विंधिला बाण । परश्चरण महापापा ॥११८॥
श्रीरामकृपेचा प्रताप । वाळीचें सरे निजपाप ।
तेणें पावोनि अनुताप । निर्विकल्प विनवित ॥११९॥

एवमुक्तस्तु रामेण वाली प्रव्यथितो भृशम् ।
प्रत्युवाच ततो रामं प्रांजलिर्वानरेश्वरः ॥१५॥

स्वतःबद्दल वालीला पश्चात्ताप :

राज्यमदें अति घूर्ण । पाप आचरलों संपूर्ण ।
तुवां कूपेनें सोडोनि बाण । केलें निर्दळण अकल्पित ॥१२०॥
तुवां कृपेनें विंधोनि बाण । छेदिला त्रिविध अभिमान ।
कुळाभिमान कर्माभिमान । गर्वाभिमान शौर्याचा ॥१२१॥
श्रीरामबाणाचा प्रताप । छेदी संकल्प विकल्प ।
छेदोनियां पुण्य पाप । नित्य निष्पाप केलें मज ॥१२२॥
वाढिवेचा गर्व परम । सन्मुख न करीच संग्राम ।
दुश्चिता मारणें अकर्म । मानीं अधर्म श्रीरामीं ॥१२३॥
पूर्ण पापी मी परम । श्रीरामीं मानीं अधर्म ।
श्रीराम परमात्मा परब्रह्म । हें मी वर्म नेणेंचि ॥१२४॥
प्रवृत्तिज्ञानें मी उन्मत्त । रामा मानीं अधर्मरत ।
श्रीराम स्वधर्मकर्मरहित । हा मुख्यार्थ श्रीरामीं ॥१२५॥
तुझेनि बाणें हृदयांत । केलें हृदय शुद्ध समस्त ।
आतां अनुभवासींहि येत । श्रीरघुनाथ परब्रह्म ॥१२६॥
लटकें सीतेचें धांवणें । लटका तुवां शोक करणें ।
दीन उद्धरावयाकारणें । विचरत वनीं वनवासीं ॥१२७॥
वना येवोनि श्रीरघुनंदन । उद्धरिले तृणपाषाण ।
पावन केले दीन जन । जगदुद्धरण श्रीराम ॥१२८॥

राम राम महाभाग जाने त्वां परमेश्वरम् ।
अजानता मया किंचिदुक्तं तत्क्षंतुमर्हसि ॥१६॥
अनुजानीहि मां यांतं त्वत्पदमुत्तमम् ।  
मम तुल्यबलें बालें अंगदे त्वं दयां कुरु ॥१७॥

रामांची स्तुती करुन वाली क्षमा मागतो :

मायानियंता ईश्वर । त्याहूनि तूं परात्पर ।
तुझ्या स्वरूपाचा पार । अगोचर श्रुतिशास्रां ॥१२९॥
ऐसिया तुज श्रीरघुनाथा । कर्मज्ञानाची योग्यता ।
निषेधिलासी अधर्मता । तें मज आतां क्षमा करीं ॥१३०॥
जळापासव लवण होय । तें जळींचें जळीं विरोनि जाय ।
मोतीं जाले तें तंव कठिण पाहें । जळीं न जाय विरोनि ॥१३१॥
मुक्तपणें मोला चढलें । ते वनिताधरीं फासां पडिलें ।
मुक्तचि परी नासा आलें । कठिण केलें आभिमानें ॥१३२॥
जळो हा कर्मधर्माभिमान । जळो हा सज्ञाना ज्ञानाभिमान ।
तेणे अभिमानें बंधन जाण । म्यां तुज पूर्ण निंदिलें ॥१३३॥

वालीची क्षमायाचना :

कर्मज्ञानाच्या व्युत्पत्तीं । निर्भर्स्तिलासी दुष्ट दुरुक्तीं ।
त मज क्षमा करीं श्रीरघुपती । कृपामूर्ति कृपाळुवा ॥१३४॥
ऐसें बोलोनि आपण । वाळी घाली लोटांगण ।
मस्तकीं धरोनि श्रीरामचरण । म्हणे आपण क्षमा कीजे ॥१३५॥
आणिक एक माझे चित्तीं । जें जें वर्तत आहे श्रीरघुपती ।
तें मी सांगेन तुजप्रती । अंगदार्थी अवधारीं ॥१३६॥
मजसमान बळिया दृढ । अंगद माझें लळिवाड ।
त्यांसी करावा रणसुरवाड । पुरवीं कोड युद्धाचें ॥१३७॥
अंगद माझा कनकांगदी । सबळ साह्य होईल युद्धीं ।
म्हणोनि लाविला श्रीरामपदीं । कृपानिधि कृपा करीं ॥१३८॥
अंगदा निरवोनिया जाण । वाळी जाला सावधान ।
पाहोनी श्रीरामाचें वदन । उल्लासोन बोलत ॥१३९॥

श्रीरामांचे आश्वासन :

तुझें निजपद सनातन । जे कां सच्चिदानंदघन ।
तें पावावया त्यजितों प्राण । लाविले नयन वाळीनें ॥१४०॥
देखोनि वाळीचें प्रेम पूर्ण । कृपें कळवळला श्रीरघुनंदन ।
स्वयें बोले मेघश्याम । सावधान अवधारा ॥१४१॥

वालीच्या पश्वात्तापामुळे रामाचा कळवळा :

वाळी नको रे त्यजूं प्राण । तुझा उपडोनियां बाण ।
सामर्थे वांचवीन जाण । सुख संपूर्ण भोगावया ॥१४२॥
सीताशुद्धी साह्य देख । तूं मज होसी आवश्यक ।
भोगीं ताराअंगदा राज्यसुख । मरणोन्मुख होऊं नको ॥१४३॥
गळां बांधोनि रावण । सीता आणीन मी आपण ।
तें तूं सत्य करीं वचन । साह्य संपूर्ण मज होईं ॥१४४॥

वालीचा देहत्यागाचा आग्रह :

ऐकोनि श्रीरामाचें वचन । वाळी जाला हास्यवदन ।
पूर्वील माझा बळाभिमान । गेला पळोन तुजपुढें ॥१४५॥
सुर्यापुढें जेंवी खद्योत । तेंवी देखोनियां श्रीरघुनाथ ।
सबळ बळ विरालें समस्त । तेज अद्‌भुत श्रीरामीं ॥१४६॥
तुझिया निजप्रतापापुढें । रावण दहा तोंडांचे किडें ।
मी मशक साह्य कोणीकडे । सामर्थ्य गाढें श्रीरामीं ॥१४७॥
तुझा सुटलिया बाण । बापुडें रावण तें कोण ।
होय त्रैलोक्यनिर्दळण । बळ संपूर्ण श्रीरामीं ॥१४८॥
भोगावया स्रीपुत्रसुख । आजि वांचावें आवश्यक ।
स्रीभोग परम दुःख । निजनिष्टंक म्यां मानिलें ॥१४९॥
तुझी विक्षेपभृकुटी । रणी आटील सकळ सृष्टी ।
तेथें कायसी वानरसाह्यगोष्टी । रावण कपटी केंवी उरे ॥१५०॥
स्रीसुखभोगाचा अनुवाद । सख्या बंधूसीं पाडी विरोध ।
स्वार्थघातक दुर्धर क्रोध । नित्य निरोध तो विषय  ॥१५१॥
श्रीरामां तूं निजविवेकी । विषय भोगितां उभय लोकीं ।
कोणी तरी जाला सुखी । निजदुःखी तो विषयो ॥१५२॥

त्यजाम्यसून्महायोगिन्दुर्लभं तव दर्शनम् ।
यन्नामविवशो गृहवान्द्रियमाणः परं पदम् ॥१८॥

न करितां योगयागसाधन । तुझे दृष्टीपुढें देह त्यागून ।
मी होईन कृतकल्याण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥१५३॥
अंतकाळी अवचटें जाण । केल्या रामनामस्मरण ।
परमपदप्राप्ति पूर्ण । जन्ममरण मग कैचें ॥१५४॥
आजेचे ऐसें रघुनाथा । पुढें मरण न ये हाता ।
तेंही ऐक सावधता । माझ्या निजहिता लक्षोनी ॥१५५॥

विशल्यं कुरु में राम हृदयं पाणिना स्पृशन् ।
हृतयाद्वाणमुद्धृत्य रामः पस्पर्श पाणिना ॥१९॥
त्यक्त्वा तद्वानरं देह स यातः परमां गतिम् ॥२०॥

रामनामाच्या कडकडाटीं । दोष जळती अकल्प सृष्टी ।
परम पद पावे शेवटीं । नित्य नेहटी श्रीरामनामें ॥१५६॥
एवढी ज्याची नामख्याती । तो तूं स्वयें रघुपती ।
कृपेंनें भेटलासी अंती । जिणें पुढतीं मज नको ॥१५७॥
आतां नको विषयाचरण । आतां नको जन्ममरण ।
भावें धरोनि श्रीरामचरण । वाळी आपण विनवित ॥१५८॥
तुझे हातींचा लागता बाण । मी जालों अति पावन ।
तुझा लागतां पद्महस्त पूर्ण । वाछित मरण सुखार्थी ॥१५९॥
तुझा लागतां पद्महस्त । मी झालों नित्यमुक्त ।
सच्चिदानंदपद पूर्ण प्राप्त । मज निश्चित तुझेनि ॥१६०॥

वालीच्या देहात रुतलेला बाण श्रीरामांनी काढला, त्याचे प्राणोत्क्रमण :

ऐकोनि वाळींचे वचन । हृदयीं भेदला जो बाण ।
तो श्रीरामें उपडोनि आपण । केलें स्पर्शन अमृतहस्तें ॥१६१॥
लागतां श्रीरामाचा हस्त । वाळी देहीं देहातीत ।
बंधा मोक्षा अतीत । केला निश्चित श्रीरामें ॥१६२॥
श्रीरामहस्त मस्तकसांटीं । वाळीस सुखरूप जाहली सृष्टी ।
परमनंदी पडली मिठी । कृपादृष्टी श्रीरामें ॥१६३॥
म्यां सुग्रीवासी केला विरोधु । परी सुग्रीव सत्य परम सखा बंधु ।
त्याचेनि पावलों परमनंदु । सुखावबोधु श्रीराम ॥१६४॥
यापरी वाळीनें आपण । वानरदेह त्यागोनि जाण ।
श्रीरामकृपेस्तव संपूर्ण । निजपदीं पूर्ण विनटला ॥१६५॥
विरोधरुपें श्रीरामें आपण । केलें वाळीचें उद्धरण ।
एकाजनार्दना शरण । कृपा पूर्ण श्रीरामाची ॥१६६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
वाळिवधोनाम षष्ठोऽध्यायः ॥६॥
॥ ओंव्या १६६ ॥ श्लोक २० ॥ एवं १८६ ॥



GO TOP