श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ दशाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भ्रातृभिः सहितस्य सदेहस्य श्रीरामस्य स्वीये वैष्णवे तेजसि प्रवेशः, तेन सहागतानां लोकानां संतानकाख्यस्य लोकस्य प्राप्तिः -
भावांसहित श्रीरामांचा विष्णु स्वरूपात प्रवेश तसेच बरोबर आलेल्या लोकांना संतानक लोकाची प्राप्ती -
अध्यर्धयोजनं गत्वा नदीं पश्चान्मुखाश्रिताम् ।
सरयूं पुण्यसलिलां ददर्श रघुनन्दनः ॥ १ ॥
अयोध्येपासून दीड योजन दूर जाऊन रघुनंदन भगवान्‌ श्रीरामांनी पश्चिमाभिमुख होऊन निकट प्राप्त झालेल्या पुण्यसलिला शरयूचे दर्शन घेतले. ॥१॥
तां नदीं आकुलावर्तां सर्वत्रानुसरन् नृपः ।
आगतः सप्रजो रामं तं देशं रघुनन्दनः ॥ २ ॥
शरयू नदीत सर्वत्र भोवरे उठत होते. तेथे सर्वत्र हिंडून फिरून रघुनंदन राजा श्रीराम प्रजाजनांसह एका उत्तम स्थानावर आले. ॥२॥
अथ तस्मिन् मुहूर्ते तु ब्रह्मा लोकपितामहः ।
सर्वैः परिवृतो देवैः ऋषिभिश्च महात्मभिः ॥ ३ ॥

आययौ यत्र काकुत्स्थः स्वर्गाय समुपस्थितः ।
विमानशतकोटीभिः दिव्याभिरभिसंवृतः ॥ ४ ॥
त्याच वेळी लोकपितामह ब्रह्मदेव, संपूर्ण देवता तसेच महात्मा ऋषि मुनिनी घेरलेले असे त्या स्थानी येऊन पोहोचले जेथे काकुत्स्थ श्रीराम परमधाम जाण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या बरोबर कोट्‍यावधि दिव्य विमाने शोभत होती. ॥३-४॥
दिव्यतेजोवृतं व्योम ज्योतिर्भूतमनुत्तमम् ।
स्वयम्प्रभैः स्वतेजोभिः स्वर्गिभिः पुण्यकर्मभिः ॥ ५ ॥
सारे आकाशमण्डल दिव्य तेजाने व्याप्त होऊन अत्यंत उत्तम ज्योतिर्मय होत होते. पुण्यकर्म करणारे स्वर्गवासी स्वयं प्रकाशित होणार्‍या आपल्या तेजाने त्या स्थानास उद्‌भासित करून राहिले होते. ॥५॥
पुण्या वाता ववुश्चैव गन्धवन्तः सुखप्रदाः ।
पपात पुष्पवृष्टिश्च देवैर्मुक्ता महौघवत् ॥ ६ ॥
परम पवित्र, सुगंधित एवं सुखदायी वारा सुखदायी वारा वाहू लागला. देवतां कडून गेलेल्या दिव्य पुष्पांच्या भारी फुलांच्या राशीच्या राशी होऊ लागल्या. ॥६॥
तस्मिंस्तूर्यशतैः कीर्णे गन्धर्वाप्सरसंकुले ।
सरयूसलिलं रामः पद्‌भ्यां समुपचक्रमे ॥ ७ ॥
त्या समयी शेकडो प्रकारची वाद्ये वाजू लागली आणि गंधर्व आणि अप्सरांनी ते स्थान भरून गेले. इतक्यातच श्रीरामांनी शरयूच्या जलात प्रवेश करण्यासाठी दोन्ही पायांनी पुढे येण्यास सुरूवात केली. ॥७॥
ततः पितामहो वाणीं अन्तरिक्षादभाषत ।
आगच्छ विष्णो भद्रं ते दिष्ट्या प्राप्तोऽसि राघव ॥ ८ ॥
तेव्हा ब्रह्मदेव आकाशांतूनच बोलले - श्री विष्णुस्वरूप राघवा, यावे. आपले कल्याण होवो. आमचे फार मोठे सौभाग्य आहे की आपण आपल्या परमधामास येत आहात. ॥८॥
भ्रातृभिः सह देवाभैः प्रविशस्व स्विकां तनुम् ।
यामिच्छसि महाबाहो तां तनुं प्रविश स्विकाम् ॥ ९ ॥
महाबाहो ! आपण देवतुल्य तेजस्वी भावांसह आपल्या स्वरूपभूत लोकात प्रवेश करावा. आपण ज्या स्वरूपात प्रवेश करण्याची इच्छा करीत असाल त्याच स्वरूपात प्रवेश करावा. ॥९॥
वैष्णवीं तां महातेजो यद्वाऽऽकाशं सनातनम् ।
त्वं हि लोकगतिर्देव न त्वां केचित् प्रजानते ॥ १० ॥

ऋते मायां विशालाक्षीं तव पूर्वपरिग्रहाम् ।
त्वामचिन्त्यं महद्‌भूतं अक्षयं चाजरं तथा ।
यामिच्छसि महातेजः तां तनुं प्रविश स्वयम् ॥ ११ ॥
महातेजस्वी परमेश्वरा ! आपली इच्छा असेल तर चतुर्भुज विष्णुरूपांतच प्रवेश करावा अथवा आपल्या सनातन आकाशमय अव्यक्त ब्रह्मरूपातच विराजमान व्हावे. देवा ! आपणच संपूर्ण लोकांचे आश्रय आहात. आपली पुरातन पत्‍नी योगमाया (ह्लादिनी शक्ति) स्वरूपा जी विशाललोचना सीतादेवी आहे तिला सोडून दुसरे कोणी आपल्याला यथार्थ रूपाने जाणत नाही; कारण की आपण अचिंत्य, अविनाशी, तसेच जरा आदि अवस्थारहित परब्रह्म आहात, म्हणून महातेजस्वी राघवेन्द्रा ! आपण ज्यात इच्छा असेल त्या आपल्या स्वरूपात प्रवेश करावा. (प्रतिष्ठित व्हावे.) ॥१०-११॥
पितामहवचः श्रुत्वा विनिश्चित्य महामतिः ।
विवेश वैष्णवं तेजः सशरीरः सहानुजः ॥ १२ ॥
पितामह ब्रह्मदेवांचे हे वचन ऐकून परम बुद्धिमान्‌ श्रीरघुनाथांनी काही निश्चय करून भावांसहित शरीरासहित आपल्या वैष्णव तेजात प्रवेश केला. ॥१२॥
ततो विष्णुमयं देवं पूजयन्ति स्म देवताः ।
साध्या मरुद्‌गणाश्चैव सेन्द्राः साग्निपुरोगमाः ॥ १३ ॥
नंतर इंद्र आणि अग्नि आदि सर्व देवता, साध्य तसेच मरूद्‍गण ही विष्णुस्वरूपा स्थित झालेल्या भगवान्‌ श्रीरामांची पूजा करू लागले. ॥१३॥
ये च दिव्या ऋषिगणा गन्धर्वाप्सरसश्च याः ।
सुपर्णनागयक्षाश्च दैत्यदानवराक्षसाः ॥ १४ ॥
तदनंतर हे दिव्य ऋषि, गंधर्व, अप्सरा, गरूड, नाग, यक्ष, दैत्य, दानव आणि राक्षस होते, ते ही भगवंतांचे गुणगान करू लागले. ॥१४॥
सर्वं पुष्टं प्रमुदितं सुसम्पूर्णमनोरथम् ।
साधु साध्विति तैर्देवैः त्रिदिवं गतकल्मषम् ॥ १५ ॥
ते म्हणाले - प्रभो ! येथे आपण पदार्पण करण्याने देवलोकवासींचा हा सर्व समुदाय सफल मनोरथ झाल्यामुळे हृष्ट-पुष्ट आणि आनंदमग्न झाला आहे. सर्वांची पापे-ताप नष्ट झाली आहेत. प्रभो ! आपल्याला आमचे शतशः साधुवाद आहेत. असे त्या देवतांनी सांगितले. ॥१५॥
अथ विष्णुर्महातेजाः पितामहमुवाच ह ।
एषां लोकं जनौघानां दातुमर्हसि सुव्रत ॥ १६ ॥
त्यानंतर विष्णुरूपात विराजमान्‌ महातेजस्वी श्रीराम ब्रह्मदेवांना म्हणाले - सुव्रत पितामह ! या संपूर्ण जनसमुदायालाही आपण उत्तम लोक प्रदान करा. ॥१६॥
इमे हि सर्वे स्नेहान् मां अनुयाता यशस्विनः ।
भक्ता हि भजितव्याश्च त्यक्तात्मानश्च मत्कृते ॥ १७ ॥
हे सर्व लोक स्नेहवश माझ्या मागे आले आहेत. ते सर्वच्या सर्व यशस्वी आणि माझे भक्त आहेत. यांनी माझ्यासाठी आपल्या लौकिक सुखांचा परित्याग केलेला आहे म्हणून हे सर्वथा माझ्या अनुग्रहास पात्र आहेत. ॥१७॥
तच्छ्रुत्वा विष्णुवचनं ब्रह्मा लोकगुरुः प्रभुः ।
लोकान् संतानिकान् नाम यास्यन्तीमे समागताः ॥ १८ ॥
भगवान्‌ विष्णुंचे हे वचन ऐकून लोकगुरू भगवान्‌ ब्रह्मदेव बोलले - भगवन्‌ ! येथे आलेले हे सर्व लोक संतानक नामक लोकात जातील. ॥१८॥
यच्च तिर्यग्गतं किञ्चित् त्वामेवं अनुचिन्तयत् ।
प्राणांस्त्यक्ष्यति भक्त्या वै तत्सन्ताने निवत्स्यति ॥ १९ ॥

सर्वैर्ब्रह्मगुणैर्युक्ते ब्रह्मलोकादनन्तरे ।
पशु-पक्ष्यांच्या योनिमध्ये पडलेल्या जीवांपैकीही जो कोणी आपलेच भक्तिभावाने चिंतन करीत प्राणांचा परित्याग करील, तो ही संतानक लोकातच निवास करील. हा संतानक लोक ब्रह्मलोकाच्याच निकट आहे. (साकेत धामाचेच अंग आहे) तो ब्रह्माच्या सत्य-संकल्पत्व आदि सर्व उत्तम गुणांनी युक्त आहे. त्यांतच हे आपले भक्तजन निवास करतील. ॥१९ १/२॥
वानराश्च स्विकां योनिं ऋक्षाश्चैव तथा ययुः ॥ २० ॥

येभ्यो विनिःसृताः सर्वे सुरेभ्यः सुरसम्भवाः ।
तेषु प्रविविशे चैव सुग्रीवः सूर्यमण्डलम् ॥ २१ ॥

पश्यतां सर्वदेवानां स्वान् पितॄन् प्रतिपेदिरे ।
ज्या रीस आणि वानरांची देवतांपासून उत्पत्ति झाली होती, ते आपल्या आपल्या योनिमध्ये मिळून गेले आहेत. ज्या ज्या देवतांपासून प्रकट झाले होते, त्यांच्यातच प्रविष्ट झाले आहेत. सुग्रीवांनी सूर्यमंडलात प्रवेश केला. याच प्रकारे अन्य वानर ही सर्व देवतांच्या डोळ्यादेखत आपल्या आपल्या पित्याच्या स्वरूपास प्राप्त झाले. ॥२०-२१ १/२॥
तथोक्तवति देवेशे गोप्रतारमुपागताः ॥ २२ ॥

भेजिरे सरयूं सर्वे हर्षपूर्णाश्रुविक्लवाः ।
देवेश्वर ब्रह्मदेवांनी जेव्हा संतानक लोकाच्या प्राप्तिची घोषणा केली तेव्हा शरयूच्या गोप्रतार घाटावर आलेल्या त्या सर्व लोकांनी आनंदाचे अश्रु ढाळीत शरयूच्या जलांत बुडी मारली. ॥२२ १/२॥
अवगाह्याप्सु यो यो वै प्राणान् त्यक्त्वा प्रहृष्टवत् ॥ २३ ॥

मानुषं देहमुत्सृज्य विमानं सोऽध्यरोहत ।
ज्यांनी ज्यांनी जलात बुडी मारली ते ते मोठ्‍या हर्षाने प्राणांचा आणि मनुष्य शरीराचा त्याग करून विमानावर जाऊन बसले. ॥२३ १/२॥
तिर्यग्योनिगतानां च शतानि सरयूजलम् ॥ २४ ॥

सम्प्राप्य त्रिदिवं जग्मुः प्रभासुरवपूंषि च ।
दिव्या दिव्येन वपुषा देवा दीप्ता इवाभवन् ॥ २५ ॥
पशु-पक्ष्यांच्या योनित पडलेल्या शेकडो प्राण्यांनी शरयूच्या जलात बुडी मारून तेजस्वी शरीर धारण करून ते दिव्यलोकास जाऊन पोहोचले. ते दिव्य शरीर धारण करून दिव्य अवस्थेमध्ये स्थित होऊन देवतांप्रमाणे दीप्तिमान्‌ झाले. ॥२४-२५॥
गत्वा तु सरयूतोयं स्थावराणि चराणि च ।
प्राप्य तत्तोयविक्लेदं देवलोकमुपागमन् ॥ २६ ॥
स्थावर आणि जंगम सर्व प्रकारचे प्राणी शरयूच्या जलात प्रवेश करून त्या जलाने आपले शरीर भिजवून दिव्य लोकास जाऊन पोहोचले. ॥२६॥
तस्मिन्नपि समापन्ना ऋक्षवानरराक्षसाः ।
तेऽपि स्वर्गं प्रविविशुः देहान् निक्षिप्य चाम्भसि ॥ २७ ॥
त्यासमयी जे कोणी रीस, वानर अथवा राक्षस तेथे आले ते सर्व आपल्या शरीरास शरयू जलात टाकून भगवंताच्या परमधामास जाऊन पोहोंचले. ॥२७॥
ततः समागतान् सर्वान् स्थाप्य लोकगुरुर्दिवि ।
हृष्टैः प्रमुदितैः देवैः जगाम त्रिदिवं महत् ॥ २८ ॥
याप्रकारे तेथे आलेल्या सर्व प्राण्यांना संतानक लोकात स्थान देऊन लोकगुरू ब्रह्मदेव हर्ष आणि आनंदाने भरलेल्या देवतांसह आपल्या महान्‌ धामात निघून गेले. ॥२८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे दशाधिकशततमः सर्गः ॥ ११० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा एकशे दहावा सर्व पूरा झाला. ॥११०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP