॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय बारावा ॥
सीता - हनुमंत यांचा संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीता मारूतीला पूर्ववृत्तांत कथन करण्याची सूचना करिते :

एकाएकीं अशोकवनां आंत । आला देखोनि हनुमंत ।
त्यासी समूळ वृत्तांत । पुसे साद्यंत जानकी ॥ १ ॥
मज वनवासीं असतां । तैं तूं नव्हतासी हनुमंता ।
कैंचा आलासी तूं आतां । निजवृत्तांता सांगावें ॥ २ ॥
कैसेनि राम देखिला दृष्टीं । तुज रामासीं कैसेनि भेटीं ।
कैशा कैशा केलिया गोष्टी । जेणें पोटीं अति प्रीति ॥ ३ ॥
कैसा बाणला तो वचनार्थ । साधावया श्रीरामाकार्यार्थ ।
हनुमान प्राणेंसीं साह्यभूत । तो गुह्यार्थ मज सांगें ॥ ४ ॥
श्रीराम भेटलिया कैसें सुख । श्रीरामवचनीं कैसें पीयूख ।
श्रीरामसंगें कैसा हरिख । योगपरिपाक मज सांगें ॥ ५ ॥
श्रीरामांचें ठाणमाण । रूपरेखागुणलक्षण ।
कैसा आहे लक्ष्मण । जीवींची खूण मज सांगें ॥ ६ ॥
ऐकतां श्रीरामाची कथा । दुःख शोक नाठवे चित्ता ।
निमे संसारभयव्यथा । कथा ऐकता आनंद ॥ ७ ॥
याचलागीं तुजप्रतीं । कथा पुसें मी पुढतपुढतीं ।
कथेमाजी निजविश्रांती । जाण मारूती निश्चित ॥ ८ ॥

रामकथाश्रवणाचे फळ :

केलिया कथेचें श्रवण । नाहीं मनन निदिध्यासन ।
ते कथा जाय वाळोन । जीवनेंविण जेंवी धान्य ॥ ९ ॥
श्रद्धें श्रीरामकथाश्रवण । ऐकती त्यांचें निजमहिमान ।
मननें मन होय उन्मन । अहं विरोन होय सोहम् ॥ १० ॥
चित्त तें होय चैतन्य । बुद्धि समसाम्य समाधान ।
कर्मचि होय ब्रह्म पूर्ण । इंद्रियाचरण चिन्मात्र ॥ ११ ॥
ऐसी श्रीरामस्वरूपावस्था । सादरें पुसतां पैं सीता ।
ठक पडियेलें हनुमंता । कथावार्ता विसरला ॥ १२ ॥
धन्य धन्य हनुमंताचें ज्ञान । करितां श्रीरामाचें कीर्तन ।
आठवविसरातें गिळोन । सावधान स्वयें जाहला ॥ १३ ॥

हनुमंताचे कथन :

सीता पुसे श्रीरामकथा । तेचि श्रीरामस्वरूपसंस्था ।
हनुमंत होय सांगता । यथार्थता स्वरूप ॥ १४ ॥
लक्ष्मणाचे निजलक्षण । ठाणमाण गुणलावण्य ।
समूळ सांग आपण । सावधान अवधारा ॥ १५ ॥
सांगावया श्रीरामकथा । उल्लास हनुमंताच्या चित्ता ।
देखोनि सीतेची सादरता । होय सांगता स्वानंदें ॥ १६ ॥

श्रीरामवर्णन :

श्रीराम रूपें अति सुरूप । रूपें जिंकिला कंदर्प ।
परी तों रूपेंचि अरूप । चित्स्वरूप श्रीराम ॥ १७ ॥
श्रीराम राजीवलोचन । जगाचे नयनाचें नयन ।
परी तो देखणा डोळेवीण । देखणेंपण हें जानकी ॥ १८ ॥
दृश्य देखणें हें तंव गौण । श्रवणान्त देखणें नयन ।
देखण्यास देखणेपण । श्रीराम पूर्ण देखतसे ॥ १९ ॥
कुंडलें वर्णिती साकार । एक म्हणती मकराकार ।
श्रवणें मावळती विकार । निर्विकार निजलेणें ॥ २० ॥
श्रीरामाचें श्रवणें । श्रवणा होती निजभूषणें ।
श्रवण श्रवणाचें लेणें । श्रवणें देखणें परब्रह्म ॥ २१ ॥
परमार्थाचें निजबीक । निरपेक्ष तें नासिक ।
तेणेंवीण तें निर्नासिक । कैचें सुख साक्षेपें ॥ २२ ॥
श्रीरामाची नासिकास्थिती । प्राणिप्राणां नित्यविश्रांती ।
श्रीरामप्राणें प्राण्यां गती । त्यासी विश्रांति श्रीराम ॥ २३ ॥
श्रीरामाचा मुखशशांक । नित्यानंद निष्कलंक ।
ब्रह्मादि देवां सुखदायक । जीवशिवां सुख श्रीराम ॥ २४ ॥
जीवशिव दोन्ही अधर । श्रीराम अधरीं जाहले सधर ।
मिळणीं मिळती एकाकार । शिवसुखसार श्रीराम ॥ २५ ॥
श्रीराममुखींची दंतपंक्ती । जेंवी ओंकारमाजी श्रुती ।
श्रुतीची ही विश्रांती । श्रीराममूर्तिमुखचंद्र ॥ २६ ॥
श्रीरामाचें निजनिढळीं । सच्चिदानंद हेचि त्रिवळी ।
त्याचे ललाटभाग्यमेळीं । लोकीं सकळीं नांदिजे ॥ २७ ॥
प्रेमकेशरसमेळा । टिळक रेखिला पिंवळा ।
निर्धारू अक्षता निढळा । राम प्रेमळां पढियंता ॥ २८ ॥
अहंमृग विंदिला निर्लोभेंसीं । सोहं काढोनि मृगनाभीसीं ।
तेही अर्पिली श्रीरामासी । निजांगासी चर्चोनी ॥ २९ ॥
जन विजन विवंचून । काढिला निजधैर्यचंदन ।
त्याचेंही सुगंध काढून । उद्वर्तन श्रीरामा ॥ ३० ॥
त्यजूनि स्वधर्मकर्मफळा । तेचि मुक्ताफळमाळा ।
शोभे श्रीरामाच्या गळां । राम प्रेमळा पढियंता ॥ ३१ ॥
ओंकार तोचि कंबुकंठ । तेथोनि वेदांसी वाहती वाट ।
गर्जती विधिवादें उद्‌भट । होती प्रकट त्रिकांडीं ॥ ३२ ॥
त्वंपदतत्पदातीत । ह्रदयीं पदक सदोदित ।
साधु चिद्रत्‍नजडित । लखलखित निजतेजें ॥ ३३ ॥
म्हणती कांसे कशिला पीतांबर । श्रीरामकासे चिदंबर ।
झांकी शून्यत्वाचें छिद्र । कांसे अछिद्र श्रीराम ॥ ३४ ॥
श्रीरामकांसेसी दृढ भारी । एकपत्‍नीव्रतधारी ।
कांसे लागलियातें तारी । भवसागरीं तारक ॥ ३५ ॥
श्रीराम आकळे सगळा । भक्तिभावार्थ कटीं मेखळा ।
क्षुद्रघंटिकाज्वाळमाळा । जाहल्या सकळा ऋद्धिसिद्धि ॥ ३६ ॥
सूक्ष्ममध्याची रचना । अभिमान होता पंचानना ।
श्रीराममध्य देखोनि नयना । लाजोनि राना तो गेला ॥ ३७ ॥

श्रीरामदर्शनाचे फळ :

पाहतां श्रीराममध्यासीं । सिंहाडे जडले मेखळेसी ।
सर्वस्वें लोभले श्रीरामासीं । जावों रानासी विसरले ॥ ३८ ॥
श्रीरामचरणींची स्थिती । श्रीराम गतीची निजगती ।
श्रीराम गतीसी विश्रांती । जाण निश्चितीं जानकिये ॥ ३९ ॥
श्रीरामचरणांचें निजभूषण । वांकीनें वेदां आणिलें उणे ।
ते तंव धरोनि ठेले मौन । रामकीर्तन हें गर्जे ॥ ४० ॥
चहूं वाचां परात्पर । चरणीं गर्जे तोडर ।
श्रीरामपद चिन्मात्र । श्रीरामचंद्र परब्रह्म ॥ ४१ ॥
लक्षितां श्रीरामाचे ठाण । त्यासी ठेंगणें गगन ।
पाहतां श्रीरामाचें मन । पडिलें मौन श्रुतिशास्त्रां ॥ ४२ ॥
पाहतां श्रीरामाचे गुण । सगुण दिसताहे अगुण ।
श्रीरामें हरिले त्रिगुण । निजनिर्गुण श्रीराम ॥ ४३ ॥
लक्षितां श्रीरामलक्ष्मण । जो लक्षी तो विचक्षण ।
लक्ष्यालक्षविलक्षण । लक्षणालक्षण त्या नाहीं ॥ ४४ ॥
श्रीराममुखींची अक्षरें । अमृतापरीस अति मधुरें ।
सभाग्य सेविती श्रवणद्वारें । आनंदरस भरे सर्वांगीं ॥ ४५ ॥
देखितां श्रीरामाचें मुख । फिकें होय समाधिसुख ।
स्वप्नीहीं न देखे दुःख । हरिखें हरिख कोंदाटे ॥ ४६ ॥
कोंदाटलें परब्रह्म । ब्रह्मरूप क्रियाकर्म ।
हरपले धर्माधर्म । जाहला उपरम वेदवादा ॥ ४७ ॥

लक्ष्मणाचे वर्णन :

ऐसा श्रीराम नेटका । तैसाचि सौमित्र निजसखा ।
दोघां अभिन्नत्व देखा । भिन्न आवांका दिसताहे ॥ ४८ ॥
घालोनियां लोटांगण । तुज कुशल कल्याण ।
स्वयें पुसें लक्ष्मण । पुसे कल्याण श्रीराम ॥ ४९ ॥

ते ऐकून त्याचा सीतेवर परिणाम :

ऐसें हनुमंतें सांगतां । तटस्थ ठेली श्रीरामकांता ।
आपाआपणा विसरे सीता । हनुमंताचेनि बोलें ॥ ५० ॥
हनुमंतें बोलाआंत । अवघाचि आणिला श्रीरघुनाथ ।
तेणें सीतेचा मनोरथ । सदोदित स्वानंदें ॥ ५१ ॥
हर्ष न माये पोटीं । संतोषाचिया कोटी ।
तेणें सुखें सीता गोरटी । घातली मिठी हनुमंता ॥ ५२ ॥
वानर वदे मनुष्यवाणी । श्रीरामकथा त्याचे वदनीं ।
जिये कथेच्या श्रवणीं । भवबंधनीं निर्मुक्त ॥ ५३ ॥
ऐकतां वानराच्या गोष्टी । सत्य श्रीरामासी जाहली भेटी ।
निरसोनियां दुःखकोटी । ओतिली सृष्टी सुखरूपें ॥ ५४ ॥
हर्षाचिया लवलाह्या । स्वानंदें पसरोनि बाह्या ।
आलिंगिलें कपिराया । जिंवी कां माया प्रियपुत्रा ॥ ५५ ॥
सीतेसी सुख जाहलें गाढें । पुत्रसुख तें तृण यापुढें ।
हनुमंत वाडेंकोडें । प्रेमपडिपाडें पढियंत ॥ ५६ ॥

रामलक्ष्मणांचे क्षेमकुल ऐकून सीतेला झालेला आनंद :

श्रीराम भर्ता लक्ष्मण दीर । दोघे सुखसंपन्न वीर ।
हें ऐकतांचि उत्तर । सुख अपार मज जाहलें ॥ ५७ ॥
श्रीरामस्वरूपाची कथा । जे वदलासि गा हनुमंता ।
तेणें सुखें ब्रह्मसायुज्यता । न ये तुकितां तुकासी ॥ ५८ ॥

सीता हनुमंताची स्तुती करतें :

श्रीरामकथा अनुवादोन । तुवां मज केले सुखसंपन्न ।
तुज मी वदेन वरदान । सावधान अवधारीं ॥ ५९ ॥
हनुमंता होई चिरंजीवी । तें ही जीवित्व ज्ञानानुभवी ।
नित्य नवे सुखसंभवीं । श्रीरामपदवीवैभवें ॥ ६० ॥
तुज कळिकाळ कांपे चळीं । ऐसा होसी आतुर्बळी ।
यश पावसी भूमंडळीं । नामसमेळीं श्रीरामें ॥ ६१ ॥
निरसोनियां विज्ञाना । श्रीरामभजनें प्रबुद्ध प्रज्ञा ।
ज्ञेय मुकलें ज्ञेयपणा । श्रीरामस्मरणाचेनि बळें ॥ ६२ ॥
श्रीरामाचिया स्मरणीं । अपयश निमे तत्क्षणीं ।
यश न माये त्रिभुवनीं । नामस्मरणीं प्रताप ॥ ६३ ॥
चिरंजीव सुखानुभवी । बळ प्रज्ञा आणि यशस्वी ।
याहून तुझी अधिक पदवी । देवीं दानवीं देखिजे ॥ ६४ ॥
शतयोजन सिंधु अगाध । तुवां लंघिला जैसें गोष्पद ।
त्यापुढें कायसें माझे वरद । प्रज्ञाप्रबुद्ध हनुमंत ॥ ६५ ॥
तुज म्हणों नये वानर । सुरासुरां दुर्धर ।
धांडाळोनि लंकापुर । निशाचरें गांजिलीं ॥ ६६ ॥
एकला एक हनुमंत । रावणाचे सभेआंत ।
राक्षसां करोनि आकांत । लंकानाथ गांजिला ॥ ६७ ॥
लंकेमाजी कडोविकडीं । गांजिल्या राक्षसांच्या कोडी ।
रावणाची सभा उघडी । केली रोकडी तुवां एकें ॥ ६८ ॥
देखतांही दशानन । सभेमाजी घालोनि खाण ।
तुवां नागविले राक्षसजन । शेखीं रावण गांजिला ॥ ६९ ॥
एवढा करितां आकांत । येथें आला हनुमंत ।
नाहीं कळलें लंकेआंत । ऐसा समर्थ तूं एक ॥ ७० ॥
ऐसा प्रतापिशिरोमणी । पावलासी अशोकवनीं ।
तूंचि जनक तूंचि जननी । राम घेवोनी शीघ्र यावें ॥ ७१ ॥
तुझी होवोनियां दासी । तुझे चरण झाडीन केशीं ।
शीघ्र आणावें श्रीरामासी । म्हणोनि पायांसी लागली ॥ ७२ ॥

मारूतीराया सीतेजवळ खूण मागतात :

आलें हनुमंतासी स्फुरण । व्यर्थ कशाला करिसी रूदन ।
वेगें देई आपुली खूण । श्रीरघुनंदन आणावया ॥ ७३ ॥
तुज मीं आणिली खूण मुद्रा । तेणें तूं ओळखसी वानरा ।
खूण देई श्रीरामचंद्रा । सत्य कपीन्द्रा मानावया ॥ ७४ ॥
काय करिसी देवोनि खूण । न लगे भाक न लगे आण ।
मज आठवली युक्ति आन । सावधान अवधारीं ॥ ७५ ॥

किंवा पाठीवर बसून येण्याचे सांगतात :

पृष्ठीं बैसल्या सीता । तेच क्षणीं श्रीरघुनाथा ।
तुज भेटवीन आतां । विलंब वृथा करूं नको ॥ ७६ ॥
शुद्धि सांगावया श्रीरघुनाथा । तुज येथें सांडोनि जातां ।
राक्षसीं केलिया तुझ्या घाता । शुद्धि वृथा होईल ॥ ७७ ॥
येथें मजचि देखतां । रावण वधूं आला होता ।
दैवें चुकविलें अनर्था । सांडोनि जातां मज नये ॥ ७८ ॥
शूर्पणखा केली नकटी । तुझा राग तिचे पोटीं ।
तुज मारील उठाउठीं । महा खोटी राक्षसी ॥ ७९ ॥
सांडोनि जाणें न घडे गोष्टी । वेगीं बैसें माझें पृष्ठीं ।
करीन श्रीरामासी भेटी । विकल्प पोटीं धरूं नको ॥ ८० ॥
लंका त्रिकूट कनकगिरी । उपडोनि आपुलें बळेंकरी ।
एकें उड्डाणे समुद्रीं । नेईन पैलतीरीं जानकीये ॥ ८१ ॥
करोनि एकचि उड्डाण । भेटवीन रामलक्ष्मण ।
वाहतों श्रीरामाची आण । करीं आरोहण पृष्ठ भागीं ॥ ८२ ॥
तुज म्यां नेतां अति त्वरेसीं । राक्षसमहावीरशूरांसी ।
वेगें न येववेल मजपासीं । त्या मशकांसी काय ठावें ॥ ८३ ॥
आलिया इंद्रजित कुंभकर्ण । त्यांसी रणीं विभांडून ।
रावणातेंही गांजोन । भेटवीन श्रीरामा ॥ ८४ ॥

मार्गात अडथळे किंवा अपघात होण्याची भीती सीता व्यक्त करते :

सीता म्हणे गा अवधारीं । बैसतां तुझे पाठीवरी ।
तुझिया वेगें उड्डानकरीं । पडेन सागरीं हिसळोनी ॥ ८५ ॥
पडतां समुद्राप्रतीं । मत्स्य मगर मग भक्षिती ।
तेव्हां तूं पडसी आवर्ती । केंवी मारूती म्यां यावें ॥ ८६ ॥
कां धांवणें आलिया मागें वेगीं । तूं परतसील युद्धालागीं ।
समरांगणीं युद्धभागीं । मी रणरंगी पडेन ॥ ८७ ॥
मज पडतांचि क्षितीं । क्षोभोनि राक्षस मज मारिती ।
हेही न घडे गा युक्ती । केंवी मारूती म्यां यावें ॥ ८८ ॥
मज मारिलियापाठीं । जरी त्वां मारिल्या राक्षसकोटी ।
सुख नव्हे श्रीरामाचे पोटीं । बुद्धि खोटी हे हनुमंता ॥ ८९ ॥

मारूतीचे उत्तर व सीतेची शंका :

सीते ऐक सावध गोष्टी । मज न लगे आटाआटी ।
माझें पुच्छ कोपलियापाठीं । मारील कोटी राक्षस ॥ ९० ॥
तुज मी राखीन राहीं स्वस्थ । माझें पुच्छ प्रतापवंत ।
करील राक्षसांचा घात । अर्बुदांत जरी आले ॥ ९१ ॥
सीता म्हणे तूं अल्प मारूती । पुच्छ तंव तुझें किती ।
केंवी राक्षसां लावील ख्याती । सत्यत्व चित्तीं मानेना ॥ ९२ ॥

मारूतीचे शेपटीच्या प्रभावाचे वर्णन व तिला अभिवचन :

सीते म्हणसी वानर किती । काय पुच्छाची शक्ती ।
पाहें माझी स्वरूपस्थिती । म्हणोनि मारूती वाढला ॥ ९३ ॥
विंध्याद्रि मेरू मांदार । त्यांहूनि वाढला वानर ।
जैसा प्रळयकाळीं रूद्र । तैसा दुर्धर जाहला ॥ ९४ ॥
सीते नेणसी माझे सत्व । पाहें माझें स्वरूप प्रभाव ।
देव दानव आणि मानव । राक्षस सर्व गांजीन मी ॥ ९५ ॥
माझें पुच्छ पाहे प्रतापवंत । राक्षस मारोनियां समस्त ।
सगळी लंका तुजसमवेत । निमेषार्धांत नेईन ॥ ९६ ॥
विकल्प सांडोनियां पोटीं । सीते बैसें माझें पृष्ठीं ।
करीन श्रीरामासीं भेटीं । सुखसंतुष्टी स्वानंदें ॥ ९७ ॥
तुज न्यावया श्रीरामाप्रती । पाहें माझी दुर्धर शक्ती ।
विकल्प सोडोनियां चित्तीं । बैस मारूतीपृष्ठभागी ॥ ९८ ॥
दुर्धर देखोनि मारूती । देव दानव चळीं कांपती ।
निधडी निःशंक सीता सती । अनुवादती स्वधर्म ॥ ९९ ॥

श्रीरामांशिवाय अन्य पुरूषाचा स्पर्श वर्ज :

मज भेटावया श्रीरघुपती । निधडी शक्ती तुज मारूती ।
तुझी देखोनि अचलस्थिती । मज निश्चितीं मानलें ॥ १०० ॥
एका रामावांचोनि जाण । परपुरूषीं आरोहण ।
तेंचि पतिव्रतेसीं दूषण । वेदपुराणसंमत ॥ १०१ ॥
सांडोनि राम उत्तम पुरूष । नरवानरीं गात्रस्पर्श ।
तो पातिव्रत्या महादोष । हा इतिहास हरिहरां ॥ १०२ ॥
अंगोअंगीं प्रवेशून । करितां गुरूपत्‍नीरक्षण ।
तेंचि विधूसीं दूषण । जाहला संपूर्ण प्रायश्चित्ती ॥ १०३ ॥
तैसेंचि मज खांदीं वाहतां । दोषी होसील हनुमंता ।
मी तंव नयें गा सर्वथा । दोहींचे माथां महादोष ॥ १०४ ॥
परपुरूषीं अनुसरोन । एकाकी सहगमन ।
करितां दोघांही दूषण । सत्य जाण हनुमंता ॥ १०५ ॥

मारूती सीतेला आपली व श्रीरामांची जनळीक सांगतात :

ऐसें जानकी बोलतां । हांसों आलें हनुमंता ।
मज श्रीरामाची अति आप्तता । समूळ कथा अवधारीं ॥ १०६ ॥
म्यां अंजनीस पुसिली गोष्टी । माझा स्वामी कोणता सृष्टीं ।
तें म्हणे सगर्भ कांसोटी । देखे जो दृष्टीं तो स्वामी ॥ १०७ ॥
श्रीराम निजला तरूतळवटीं । मज बैसतां वृक्षसंपुटीं ।
सगर्भ ब्रह्मचर्यकांसोटी । देखे दृष्टी श्रीराम ॥ १०८ ॥
राम सांगे सौमित्रासी । गर्भी ब्रह्मचर्य वानरासी ।
सगर्भकौपिन पाहें यासीं । आश्चर्यासीं सांगत ॥ १०९ ॥
ऐकोनि श्रीरामांचे वचन । माझें ठायीं हे लक्षण ।
दोघे मनुष्य हीन दीन । स्वामी तयांतें केवीं मानूं ॥ ११० ॥
सेवक सबळ स्वामी निर्बळ । तो स्वामीच सकळ विकळ ।
पहावया श्रीरामांचे बळ । रणकल्लोळ म्यां केला ॥ १११ ॥
वृक्ष सांडिले शतानुशत । निर्वाणीं सोडिले पंच पर्वत ।
निद्रा न सांडोनि श्रीरघुनाथ । वृक्ष पर्वत छेदिले ॥ ११२ ॥
श्रीराम कृपाळु पैं पुरा । बाणीं न मारोनि वानरा ।
बाणपिसारीं सोडिला वारा । मज अंबरा उडविलें ॥ ११३ ॥
बाणपिच्छाचें झडाडें । हात पाय जाहले देव्हडे ।
दांत विचकिले म्यां माकडें । उगवीं वेढे निजपुच्छा ॥ ११४ ॥
ऐसी पडतां मुरकुंडी । पिता पवन लवडसवडीं ।
येवोनियां अति तांतडीं । बुद्धि गाढी सांगितली ॥ ११५ ॥
श्रीराम परमात्मा परिपूर्ण । त्याची पाहतां आंगवण ।
तुझा तत्काळ जाईल प्राण । श्रीरामार्पण देह करीं ॥ ११६ ॥
रामाज्ञें विकावें जीवित्व । श्रीरामसेवेसीं देह विक्रीत ।
श्रीरामासवें नित्य तृप्त । द्वंद्वनिर्मुक्त तूं होसी ॥ ११७ ॥
ऐकोनि पितयाचे वचन । काया वाचा मनें अनन्य शरण ।
मस्तकीं वंदोनि श्रीरामचरण । श्रीरामार्पण देह केला ॥ ११८ ॥
राम ध्यानीं राम मनीं । श्रीराम नित्य निदिध्यासनीं ।
राम कानीं राम नयनीं । वस्ती वदनीं श्रीरामनामा ॥ ११९ ॥
श्रीराम आसनीं शयनीं । श्रीराम नित्य गमनागमनीं ।
श्रीराम सुस्वादुभोजनीं । जागृतिस्वप्नीं श्रीराम ॥ १२० ॥
ऐसा मी अनन्य श्रीरामभक्तीं । तुझा विकल्प परपुरूषार्थी ।
सावध ऐक तेही अर्थी । अतिगुह्योक्ती सांगेन ॥ १२१ ॥

आणि स्वतः चे गुप्त रहस्य सीतेला सांगतात :

गर्भी ब्रह्मचर्यकौपीन । अंजनी माता न देखे नग्न ।
माझ्या लिंगाचें दर्शन । स्त्रष्टा आपण पावेना ॥ १२२ ॥
ऐसी देखोनि माझी स्थिती । मुद्रिका देवोनि माझे हातीं ।
मज धाडिलें वो तुजप्रती । तुझ्या चित्तीं विकल्प ॥ १२३ ॥
श्रीरामें सांगितली खूण । करविलीं वल्कलें परिधान ।
तुज नेसतां न ये जाण । श्रीराम आपण नेसविलीं ॥ १२४ ॥

सीता विचारते की श्रीरामांची आज्ञा काय आहे ?
शोध घ्यावा की सीतेला आणावी ?

खूण सांगतां हनुमंता । चित्तीं चमत्कारली सीता ।
विकल्प सांडोनि तत्वतां । गुज एकांता अनुवादे ॥ १२५ ॥
श्रीरामाज्ञा वंद्द आम्हांसी । श्रीरामें काय सांगितलें तुजपासीं ।
तुवां आणावें सीताशुद्धीसी । किंवा सीतेसी आणावें ॥ १२६ ॥
जरी आणविले सीतेसी । तरी मी येईन तुजसरसीं ।
आणविलें असेल शुद्धीसी । तरी वेगेंसी त्वां जावे ॥ १२७ ॥

हनुमंताचे उत्तर व सीतेचा त्याला निरोप :

ऐसें तिणें पुसतां । गहिंवर आला हनुमंता ।
धन्य धन्य सती सीता । निर्लोभता सज्ञान ॥ १२८ ॥
सावध अवधारीं वो माते । असत्य न बोलें मी येथें ।
रामें आणविलें शुद्धीतें । हेंचि निश्चितें श्रीरामाज्ञा ॥ १२९ ॥
सीता म्हणे हनुमंता । विलंबू न करावा सर्वथा ।
शीघ्र जावोनियां जातां । शुद्धि रघुनाथा सांगावी ॥ १३० ॥
माझी कृपा आहे हनुमंता । तरी जाऊन शीघ्रता ।
शुद्धि सांगावी श्रीरघुनाथा । चरणीं माथा ठेवोनी ॥ १३१ ॥
सीतानेत्रीं अश्रू मुखीं दीन । करितां हनुमंता गमन ।
वानरें अंगुष्ठ दांतीं धरून । लोटांगण सीतेसी ॥ १३२ ॥
ऐकोनि सीताकरूणावचन । तेणें हनुमंता आलें स्फुरण ।
शीघ्र देईं आपली खूण । आतांचि गमन मी करितों ॥ १३३ ॥
मुद्रिका देवोनि जाण । निरोपें सांगितली खूण ।
तेंवीच त्वां देखोनि भूषण । मुखें वचन मज सांगें ॥ १३४ ॥
तुवां निज वस्त्रां भूषणांसी । सांडिलें किष्किंधें वानरांपासी ।
तेंचि दावितां श्रीरामासी । उकसाबुकशीं स्फुंदत ॥ १३५ ॥
ऐसी तुझी वो अवस्था । अतिशयेंसीं श्रीरघुनाथा ।
नित्य स्मरणीं सीता सीता । प्रियकांता पढियंती ॥ १३६ ॥
सत्य मानी लंकागमन । तैसें देईं निजभूषण ।
तैसेंचि सांगे मुखें वचन । श्रीराम पूर्ण सुखावे ॥ १३७ ॥

सीता मारूतीला खुणेचा मणी देते व लक्ष्मणाला क्षमा करण्यास कळवितें :

ऐसें हनुमंतें सांगतां । सुखें सुखावोनि सीता ।
वेणिये मणी माथां होता । धाडी रघुनाथा खुणेंसीं ॥ १३८ ॥
श्रीरामसुखें सुखसमेळा । मनशिळेचा युक्त टिळा ।
निजहस्तें लावी कपाळा । हेही गोळांगूळा खूण सांगें ॥ १३९ ॥
माझें ऐकतांचि उत्तर । कागावरी सोडी ब्रह्मास्त्र ।
ही गुह्य गोष्टी सांगतां गंभीर । श्रीराम साचार मानील ॥ १४० ॥
काग हिंडतां तिहीं लोकां । कोणाही नव्हे आवांका ।
शरण आला रघुकुळटिळका । मग दर्भशिखा निवारिली ॥ १४१ ॥
वामनेत्र घेवोनि जाण । कागाचा वांचविला प्राण ।
हे सांगतां निजखूण । श्रीरघुनंदन सुखावे ॥ १४२ ॥
ऐसीं शस्त्रास्त्रें तुजपासीं । तरी कां धांवण्या न धांवसी ।
मृगापाठीं धाडिलासी । तेणें रूसलासी श्रीरामा ॥ १४३ ॥
तो अपराध करोनि क्षमा । धांवण्या येवोनि श्रीरामा ।
बंधमोचन करीं आम्हां । पुरूषोत्तम कृपाळुवा ॥ १४४ ॥
लक्ष्मणासीं लोटांगण । तुझें म्यां व्यर्थ केलें छळण ।
त्या पापाचें फळ हें जाण । मज रावण गांजितो ॥ १४५ ॥
छळणपाप अति अद्‌भुत । सीता आणि श्रीरामाआंत ।
आडवे आले सिंधुपर्वत । दूरी दूरस्थ निर्बंध ॥ १४६ ॥
छळणपापाची हे ख्याती । पापिष्ठ रावणाचिये हातीं ।
बंदीं पडली सीता सती । श्रीरघुपति क्षोभला ॥ १४७ ॥
छळणपाप अति दारूण । ना श्रीराम ना लक्ष्मण ।
राक्षसांचें नित्य छळण । मज म्यां पूर्ण छळियेलें ॥ १४८ ॥
लक्ष्मणासी लोटांगण आतां । अनन्य शरण श्रीरघुनाथा ।
शुद्धि सांगतां हनुमंता । अति शीघ्रता पावावें ॥ १४९ ॥
एकाजनार्दना शरण । पुढें गोड निरूपण ।
वानर वनविध्वंसन । करील निर्दळण राक्षसां ॥ १५० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
सीताहनुमत्संवादो नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
॥ ओव्यां १५० ॥ श्लोक २४ ॥ एवं संख्या १७४ ॥



GO TOP