श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ द्वादशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
शूर्पणखाया विवाहो, रावणादीनां च परिणयो, मेघनादस्य जन्मच -
शूर्पणखा तसेच रावण आदि तीन्ही भावांचे विवाह आणि मेघनादाचा जन्म -
राक्षसेन्द्रोऽभिषिक्तस्तु भ्रातृभ्यां सहितस्तदा ।
ततः प्रदानं राक्षस्या भगिन्याः समचिन्तयत् ॥ १ ॥
(अगस्त्य म्हणतात - श्रीरामा !) आपला अभिषेक झाल्यावर जेव्हा राक्षसराज रावण भावांसहित लंकापुरीत राहू लागला तेव्हा त्याला आपली बहिण राक्षसी शूर्पणखा हिच्या विवाहाची चिंता वाटू लागली. ॥१॥
स्वसारं कालकेयाय दानवेन्द्राय राक्षसीम् ।
ददौ शूर्पणखां नाम विद्युज्जिह्वाय राक्षसः ॥ २ ॥
त्या राक्षसाने दानवराज विद्युतज्जिव्हाला, जो कालकाचा पुत्र होता आपली बहिण शूर्पणखा विवाह करून दिली. ॥२॥
अथ दत्त्वा स्वयं रक्षो मृगयां अटते स्म तत् ।
तत्रापश्यत् ततो राम मयं नाम दितेः सुतम् ॥ ३ ॥

कन्यासहायं तं दृष्ट्‍वा दशग्रीवो निशाचरः ।
अपृच्छत्को भवानेको निर्मनुष्यमृगे वने ॥ ४ ॥

अनया मृगशावाक्ष्या किमर्थं सह तिष्ठसि ।
श्रीरामा ! बहिणीचा विवाह करून राक्षस रावण एक दिवस स्वतः शिकार खेळण्यासाठी वनात हिंडत होता. तेथे त्याने दिति पुत्र मयाला पाहिले. त्याच्या बरोबर एक सुंदर कन्याही होती. तिला पाहून निशाचर दशग्रीवाने विचारले -आपण कोण आहात ? जे मनुष्य आणि पशुरहित या शून्य वनात एकटेच फिरत आहात ? या मृगनयनी कन्येसह आपण येथे कुठल्या उद्देश्याने निवास करत आहात ? ॥३-४ १/२॥
मयस्तथाब्रवीद् राम पृच्छन्तं तं निशाचरम् ॥ ५ ॥

श्रूयतां सर्वमाख्यास्ये यथावृत्तमिदं तव ।
श्रीरामा ! असे विचारणार्‍या त्या निशाचराला मय म्हणाला - ऐका, मी आपला सारा वृत्तांत तुम्हांला यथार्थरूपाने सांगतो. ॥५ १/२॥
हेमा नामाप्सरास्तात श्रुतपूर्वा यदि त्वया ॥ ६ ॥

दैवतैर्मम सा दत्ता पौलोमीव शतक्रतोः ।
तस्यां सक्तमना ह्यासं दशवर्षशतान्यहम् ॥ ७ ॥

सा च दैवतकार्येण गता वर्षाचतुर्दश ।
तया कृते च हेमायाः सर्वं हेममयं पुरम् ॥ ८ ॥

वज्रवैदूर्यचित्रं च मायया निर्मितं मया ।
तत्राहमवसं दीनः तया हीनः सुदुःखितः ॥ ९ ॥
तात ! तुम्ही पूर्वी कधी ऐकले असेल, स्वर्गात हेमा नावाने प्रसिद्ध एक अप्सरा राहात होती. ज्याप्रमाणे पुलोम दानवाची कन्या शची देवराज इंद्राला दिली गेली होती त्याप्रमाणे देवतांनी त्या हेमाला मला अर्पित केले होते. मी तिच्यात आसक्त होऊन एक सहस्त्र वर्षेपर्यंत तिच्याबरोबर राहिलो होतो. एक दिवस ती देवतांच्या कार्यासाठी स्वर्गलोकात निघून गेली. त्यानंतर चौदा वर्षे निघून गेली. मी त्या हेमासाठी मायेने एक नगर निर्माण केले होते. जे संपूर्ण सोन्याचे बनविलेले होते. हिरे आणि नीलम रत्‍नांच्या संयोगाने ते विचित्र शोभा प्राप्त करत आहे. त्यांतच मी आत्तापर्यंत तिच्या वियोगाने अत्यंत दुःखी आणि दीन होऊन राहात होतो. ॥६-९॥
तस्मात् पुरात् दुहितरं गृहीत्वा वनमागतः ।
इयं ममात्मजा राजन् तस्याः कुक्षौ विवर्धिता ॥ १० ॥
त्याच नगरांतून मी या कन्येला बरोबर घेऊन वनात आलो आहे. राजन्‌ ! ही माझी मुलगी आहे, जी हेमाच्या गर्भात वाढली आहे आणि तिच्यापासून उत्पन्न होऊन माझ्या द्वारा पालन केली जाऊन मोठी झाली आहे. ॥१०॥
भर्तारमनया सार्धं अस्याः प्राप्तोऽस्मि मार्गितुम् ।
कन्यापितृत्वं दुःखं हि सर्वेषां मानकाङ्‌क्षिणाम् ॥ ११ ॥

कन्या हि द्वे कुले नित्यं संशये स्थाप्य तिष्ठति ।
हिच्या बरोबर मी हिच्या योग्य पतिचा शोध करण्यासाठी आलो आहे. मानाची अभिलाषा बाळगणार्‍या प्रायः सर्व लोकांसाठी कन्येचा पिता होणे कष्टकारक होत असते. (कारण की यासाठी कन्येच्या पित्याला दुसर्‍यांसमोर नतमस्तक व्हावे लागते.) कन्या नेहमीच दोन्ही कुळांना संशयात पाडत राहात असते. ॥११ १/२॥
पुत्रद्वयं ममाप्यस्यां भार्यायां सम्बभूव ह ॥ १२ ॥

मायावी प्रथमस्तात दुन्दुभिस्तदनन्तरः ।
तात ! माझ्या या भार्या हेमाच्या गर्भापासून दोन पुत्रही झाले, ज्यात प्रथम पुत्राचे नाव मायावी आणि दुसर्‍याचे दुंदुभि आहे. ॥१२ १/२॥
एवं ते सर्वमाख्यातं याथातथ्येन पृच्छतः ॥ १३ ॥

त्वामिदानीं कथं तात जानीयां को भवानिति ।
तात ! तू विचारले होतेस म्हणून मी या प्रकारे आपली सर्व माहिती तुला यथार्थरूपाने सांगितली आहे. आता मी हे जाणू इच्छितो की तू कोण आहेस ? हे मला कशाप्रकारे ज्ञात होऊ शकेल ? ॥१३ १/२॥
एवमुक्तस्तु तद् रक्षो विनीतमिदमब्रवीत् ॥ १४ ॥

अहं पौलस्त्यतनयो दशग्रीवश्च नामतः ।
मुनेर्विश्रवसो यस्तु तृतीयो ब्रह्मणोऽभवत् ॥ १५ ॥
मयासुराने या प्रकारे म्हटल्यावर राक्षस रावण विनीतभावाने असे म्हणाला - मी पुलस्त्यांचे पुत्र विश्रवा यांचा मुलगा आहे. माझे नाव दशग्रीव आहे. मी ज्या विश्रवा मुनिंपासून उत्पन्न झालो आहे, ते ब्रह्मदेवांपासून तिसर्‍या पिढीत उत्पन्न झाले आहेत. ॥१४-१५॥
एवमुक्तस्तदा राम राक्षसेन्द्रेण दानवः ।
महर्षेस्तनयं ज्ञात्वा मयो हर्षमुपागतः ॥ १६ ॥

दातुं दुहितरं तस्मै रोचयामास यत्र वै ।
श्रीरामा ! राक्षसराजांनी असे सांगितल्यावर दानव मय, महर्षि विश्रवा यांच्या ह्या पुत्राचा परिचय झाल्याने फार प्रसन्न झाला आणि त्याने त्याच्याशी आपल्या मुलीचा विवाह करून देण्याची इच्छा केली. ॥१६ १/२॥
करेण तु करं तस्या ग्राहयित्वा मयस्तदा ॥ १७ ॥

प्रहसन् प्राह दैत्येन्द्रो राक्षसेन्द्रमिदं वचः ।
यानंतर दैत्यराज मय आपल्या मुलीचा हात रावणाच्या हातात देऊन हसत हसत त्या राक्षसास या प्रमाणे म्हणाला - ॥१७ १/२॥
इयं ममात्मजा राजन् हेमयाऽप्सरसा धृता ॥ १८ ॥

कन्या मन्दोदरी नाम पत्‍न्यार्थं प्रतिगृह्यताम् ।
राजन्‌ ! ही माझी मुलगी आहे जिला हेमा अप्सरेने आपल्या गर्भात धारण केले होते. हिचे नाव मंदोदरी आहे. हिचा तू आपल्या पत्‍नीच्या रूपाने स्वीकार कर. ॥१८ १/२॥
बाढमित्येव तं राम दशग्रीवोऽभ्यभाषत ॥ १९ ॥

प्रज्चाल्य तत्र चैवाग्निं अकरोत् पाणिसंग्रहम् ।
श्रीरामा ! तेव्हा दशग्रीवाने फार चांगले असे म्हणून मयासुराचे म्हणणे मान्य केले. नंतर त्याने अग्नि प्रज्वलित करून मंदोदरीचे पाणिग्रहण केले. ॥१९ १/२॥
स हि तस्य मयो राम शापाभिज्ञस्तपोधनात् ॥ २० ॥

विदित्वा तेन सा दत्ता तस्य पैतामहं कुलम् ।
श्रीरामा ! जरी तपोधन विश्रवापासून रावणाला क्रूरप्रकृति होण्याचा शाप मिळाला होता हे मयासुर जाणत होता तथापि रावणाला ब्रह्मदेवांच्या कुळांतील जाणून त्याने त्याला आपली कन्या दिली. ॥२० १/२॥
अमोघां तस्य शक्तिं च प्रददौ परमाद्‌भुताम् ॥ २१ ॥

परेण तपसा लब्धां जघ्निवाँल्लक्ष्मणं यया ।
त्याच बरोबर उत्कृष्ट तपस्येने प्राप्त झालेली एक परम अद्‍भुत अमोघ शक्ति ही प्रदान केली; जिच्या द्वारे रावणाने लक्ष्मणास घायाळ केले होते. ॥२१ १/२॥
एवं स कृत्वा दारान् वै लङ्‌काया ईश्वरः प्रभुः ॥ २२ ॥

गत्वा तु नगरीं भार्ये भ्रातृभ्यां समुपाहरत् ।
याप्रकारे दारपरिग्रह (विवाह) करून प्रभावशाली लंकेश्वर रावण लंकापुरीत गेला आणि आपल्या दोन्ही भावांसाठीही दोन भार्या त्यांचा विवाह करवून देऊन घेऊन आला. ॥२२ १/२॥
वैरोचनस्य दौहित्रीं वज्रज्वालेति नामतः ॥ २३ ॥

तां भार्यां कुम्भकर्णस्य रावणः समकल्पयत् ।
विरोचनकुमार बलिची नात (मुलीची मुलगी) जिचे नाव वज्रज्वाला होते तिला रावणाने कुंभकर्णाची पत्‍नी बनविले. ॥२३ १/२॥
गन्धर्वराजस्य सुतां शैलूषस्य महात्मनः ॥ २४ ॥

सरमां नाम धर्मज्ञां लेभे भार्यां विभीषणः ।
गंधर्वराज महात्मा शैलूष याची कन्या सरमा हिला, जी धर्माच्या तत्वास जाणणारी होती, विभीषणाने आपल्या पत्‍नीच्या रूपाने प्राप्त केले. ॥२४ १/२॥
तीरे तु सरसो वै तु संजज्ञे मानसस्य हि ॥ २५ ॥

सरस्तदा मानसं तु ववृधे जलदागमे ।
मात्रा तु तस्याः कन्यायाः स्नेहेनाक्रन्दितं वचः ॥ २६ ॥

सरो मा वर्धयस्वेति ततः सा सरमाऽभवत् ।
ती मानससरोवराच्या तटावर उत्पन्न झाली होती. जेव्हा तिचा जन्म झाला त्यासमयी वर्षा ऋतुचे आगमन झाल्याने मानसरोवर वाढू लागले. तेव्हा त्या कन्येच्या मातेने पुत्रीच्या स्नेहामुळे करूण क्रंदन करीत त्या सरोवराला म्हटले - - सरो मा वर्धयस्व । (हे सरोवरा ! तू आपले जल वाढू देऊ नको.) तिने घाबरून सरःमा असे म्हटले होते, म्हणून त्या कन्येचे नाव सरमा झाले. ॥२५-२६ १/२॥
एवं ते कृतदारा वै रेमिरे तत्र राक्षसाः ॥ २७ ॥

स्वां स्वां भार्यामुपादायम्य गन्धर्वा इव नन्दने ।
याप्रकारे ते तीन राक्षस विवाहित होऊन आपापल्या स्त्रियांना बरोबर घेऊन नंदन वनात विहार करणार्‍या गंधर्वांप्रमाणे लंकेत सुखपूर्वक रमण करु लागले. ॥२७ १/२॥
ततो मन्दोदरी पुत्रं मेघनादमजीजनत् ॥ २८ ॥

स एष इन्द्रजिन्नाम युष्माभिरभिधीयते ।
त्यानंतर काही काळानंतर मंदोदरीने आपला पुत्र मेघनाद याला जन्म दिला, ज्याला आपण इंद्रजित नावाने संबोधत होता. ॥२८ १/२॥
जातमात्रेण हि पुरा तेन रावणसूनुना ॥ २९ ॥

रुदता सुमहान् मुक्तो नादो जलधरोपमः ।

पूर्वकाळी त्या रावणपुत्राने जन्म होतांच रडत रडत मेघासमान गंभीर नाद केला होता. ॥२९ १/२॥
जडीकृता च सा लङ्‌का तस्य नादेन राघव ॥ ३० ॥

पिता तस्याकरोन्नाम मेघनाद इति स्वयम् ।
राघवा ! त्या मेघतुल्य नादाने सारी लंका जडवत्‌ स्तब्ध राहिली होती म्हणून पिता रावणानेच स्वतः त्याचे मेघनाद नांव ठेवले. ॥३० १/२॥
सोऽवर्धत तदा राम रावणान्तःपुरे शुभे ॥ ३१ ॥

रक्ष्यमाणो वरस्त्रीभिः श्छन्नः काष्ठैरिवानलः ।
मातापित्रोर्महाहर्षं जनयन् रावणात्मजः ॥ ३२ ॥
श्रीरामा ! त्यासमयी तो रावणकुमार रावणाच्या सुंदर अंतःपुरात मातापित्यांना महान्‌ हर्ष प्रदान करत श्रेष्ठ नारींनी सुरक्षित होऊन काष्ठांनी आच्छादित झालेल्या अग्निसमान वाढू लागला. ॥३१-३२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे द्वादशः सर्गः ॥ १२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा बारावा सर्ग पूरा झाला. ॥१२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP