श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। अष्टाविंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्वामित्रेण श्रीरामायास्त्राणां संहारविधेरुपदेशोऽस्त्रान्तरणामुपदेशश्च श्रीरामस्य मुनिं प्रति प्रश्नः - विश्वामित्रांनी श्रीरामास अस्त्रांचा संहार विधि सांगणे तथा त्यांना अन्यान्य अस्त्रांचा उपदेश करणे, श्रीरामांचा एक आश्रम आणि यज्ञस्थानाविषयी मुनिंना प्रश्न -
प्रतिगृह्य ततोऽस्त्राणि प्रहृष्टवदनः शुचिः ।
गच्छन्नेव च काकुत्स्थो विश्वामित्रमथाब्रवीत् ॥ १ ॥
त्या सर्व अस्त्रांना ग्रहण करून परम पवित्र श्रीरामाचे मुख प्रसन्नतेने प्रफुल्लित झाले. चालता चालताच ते विश्वामित्रांना म्हणाले - ॥ १ ॥
गृहीतास्त्रोऽस्मि भगवन् दुराधर्षः सुरैरपिः ।
अस्त्राणां त्वहमिच्छामि संहारान् मुनिपुङ्‍गव ॥ २ ॥
'भगवन् ! आपल्या कृपेने या अस्त्रांना ग्रहण करून मी देवतांनाही दुर्जय झालो आहे. मुनिश्रेष्ठ ! आता मी अस्त्रांचा संहार विधि जाणण्याची इच्छा करीत आहे." ॥ २ ॥
एवं ब्रुवति काकुत्स्थे विश्वामित्रो महातपाः ।
संहारान् व्याजहाराथ धृतिमान् सुव्रतः शुचिः ॥ ३ ॥
काकुत्स्थकुलतिलक श्रीरामांनी असे म्हटल्यावर महातपस्वी, धैर्यवान, उत्तम व्रतधारी आणि पवित्र विश्वामित्र मुनिंनी त्यांना अस्त्रांच्या संहार विधिचा उपदेश दिला. ॥ ३ ॥
सत्यवन्तं सत्यकीर्तिं धृष्टं रभसमेव च ।
प्रतिहारतरं नाम पराङ्‍मुखमवाङ्‍मुखम् ॥ ४ ॥

लक्षालक्ष्याविमौ चैव दृढनाभसुनाभकौ ।
दशाक्षशतवक्त्रौ च दशशीर्षशतोदरौ ॥ ५ ॥

पद्मनाभमहानाभौ दुन्दुनाभस्वनाभकौ ।
ज्योतिषं शकुनं चैव नैरास्यविमलावुभौ ॥ ६ ॥

यौगंधरहरिद्रौ च दैत्यप्रमथनौ तथा ।
शुचिबाहुर्महाबाहुर्निष्कलिर्विरुचस्तथा ।
सार्चिमाली धृतिमाली वृत्तिमान् रुचिरस्तथा ॥ ७ ॥

पित्र्यः सौमनसश्चैव विधूतमकरावुभौ ।
परवीरं रतिं चैव धनधान्यौ च राघव ॥ ८ ॥

कामरूपं कामरुचिं मोहमावरणं तथा ।
जृंभकं सर्पनाथं च पन्थानवरणौ तथा ॥ ९ ॥

कृशाश्वतनयान् राम भास्वरान् कामरूपिणः ।
प्रतीच्छ मम भद्रं ते पात्रभूतोऽसि राघव ॥ १० ॥
त्यानंतर ते म्हणाले, "रघुकुलनंदन राम ! तुमचे कल्याण असो ! तुम्ही अस्त्रविद्येस सुयोग्य आहात म्हणून या अस्त्रांनाही ग्रहण करा - सत्यवान्, सत्यकीर्ति, धृष्ट, रभस, प्रतिहारतर, दशशीर्ष, शतोदर, पद्मनाभ, महानाभ, दुन्दुनाभ, स्वनाभ, ज्योतिष, शकुन, नैरास्य, विमल, दैत्यनाशाक, यौगंधर आणि विनिद्र, शुचिबाहु, महाबाहु, निष्कलि, विरुच, सार्चिमाली, धृतिमाली, वृत्तिमान्, रुचिर, पित्र्य, सौमनस, विधूत, मकर, परवीर, रति, धन, धान्य, कामरूप, कामरुचि, मोह, आवरण, जृम्भक, सर्पनाथ, पंथान आणि वरुण - हे सर्व प्रजापति कृशाश्वाचे पुत्र आहेत. हे इच्छेनुसार रूप धारण करणारे आणि परम तेजस्वी आहेत. तू यांना ग्रहण कर." ॥ ४-१० ॥
बाढमित्येव काकुत्स्थः प्रहृष्टेनान्तरात्मना ।
दिव्यभास्वरदेहाश्च मूर्तिमन्तः सुखप्रदाः ॥ ११ ॥
तेव्हां 'अति उत्तम' असे म्हणून श्रीरामचंद्रांनी प्रसन्न मनाने त्या अस्त्रांना ग्रहण केले. त्या मूर्तिमान् अस्त्रांचे शरीर दिव्य तेजाने उद्‌भासित होत होते. ती अस्त्रे जगताला सुख देणारी होती. ॥ ११ ॥
केचिदङ्‍गारसदृशाः केचिद् धूमोपमास्तथा ।
चंद्रार्कसदृशाः केचित् प्रह्वाञ्जलिपुटास्तथा ॥ १२ ॥
त्यातील कित्येक निखार्‍याप्रमाणे तेजस्वी होती. कित्येक धूमासमान काळी प्रतीत होत होती. आणि काही अस्त्रे सूर्यासमान आणि चंद्रासमान प्रकाशमान होती. ती सर्वच्या सर्व हात जोडून श्रीरामासमोर उभी राहिली. ॥ १२ ॥
रामं प्राञ्जलयो भूत्वाब्रुवन् मधुरभाषिणः ।
इमे स्म नरशार्दूल शाधि किं करवाम ते ॥ १३ ॥
ते सर्व अंजलि जोडून मधुरवाणीने श्रीरामास म्हणाले - "पुरुषसिंह ! आम्ही सर्व आपले दास आहोत. आज्ञा करावी. आम्ही आपली काय सेवा करूं ?" ॥ १३ ॥
गम्यतामिति तानाह यथेष्टं रघुनन्दनः ।
मानसाः कार्यकालेषु साहाय्यं मे करिष्यथ ॥ १४ ॥
तेव्हा रघुनंदन श्रीरामांनी त्यांना सांगितले, "आता या समयी तर आपण आपल्या अभीष्ट स्थानास जावे. परंतु आवश्यक वाटेल त्यावेळी माझ्या मनात स्थित राहून सदा माझी सहायता करीत राहावे." ॥ १४ ॥
अथ ते राममामन्त्र्य कृत्वा चापि प्रदक्षिणम् ।
एवमस्त्विति काकुत्स्थमुक्त्वा जग्मुर्यथागतम् ॥ १५ ॥
तत्पश्चात त्यांनी श्रीरामाची परिक्रमा केली आणि त्यांचा निरोप घेऊन त्यांच्या आज्ञेस अनुसरून कार्य करण्याची प्रतिज्ञा करून जशी आली होती तशी निघून गेली. ॥ १५ ॥
स च तान् राघवो ज्ञात्वा विश्वामित्रं महामुनिम् ।
गच्छन्नेवाथ मधुरं श्लक्ष्णं वचनमब्रवीत् ॥ १६ ॥

किमेतन्मेघसङ्‍काशं पर्वतस्याविदूरतः ।
वृक्षखण्डमितो भाति परं कौतूहलं हि मे ॥ १७ ॥
या प्रकारे त्या अस्त्रांचे ज्ञान प्राप्त करून श्रीरघुनाथांनी चालता चालताच महामुनि विश्वामित्रांना मधुर वाणीने विचारले, "भगवन् ! समोरच्या पर्वताजवळच हे जे मेघांच्या घटासमान सघन वृक्षांनी भरलेले स्थान दिसून येत आहे ते काय आहे ? त्यासंबंधी जाणून घेण्याची माझ्या मनात फारच उत्कंठा उत्पन्न होत आहे. ॥ १६-१७ ॥
दर्शनीयं मृगाकीर्णं मनोहरमतीव च ।
नानाप्रकारैः शकुनैर्वल्गुभाषैरलङ्‍कृतम् ॥ १८ ॥
'हे दर्शनीय स्थान मृगांच्या झुंडीच्या झुंडीने भरलेले असल्याने अत्यंत मनोहर भासत आहे. नाना प्रकारचे पक्षी आपल्या मधुर शब्दावलीने या स्थानाची शोभा वाढवीत आहेत. ॥ १८ ॥
निःसृताःस्मो मुनिश्रेष्ठ कान्ताराद् रोमहर्षणात् ।
अनया त्ववगच्छामि देशस्य सुखवत्तया ॥ १९ ॥
'मुनिश्रेष्ठ ! या प्रदेशाच्या सुखमय स्थितीवरून, आता आपण रोमांचकारी दुर्गम ताटकावनांतून बाहेर निघून आलो आहोत असे जाणवत आहे. ॥ १९ ॥
सर्वं मे शंस भगवन् कस्याश्रमपदं त्विदम् ।
सम्प्राप्ता यत्र ते पापा ब्रह्मघ्ना दुष्टचारिणः ॥ २० ॥

तव यज्ञस्य विघ्नाय दुरात्मानो महामुने ।
भगवंस्तस्य को देशः सा यत्र तव याज्ञिकी ॥ २१ ॥

रक्षितव्या क्रिया ब्रह्मन् मया वध्याश्च राक्षसाः ।
एतत्सर्वं मुनिश्रेष्ठ श्रोतुमिच्छाम्यहं प्रभो ॥ २२ ॥
'भगवन् ! मला सर्व काही सांगा. हा कुणाचा आश्रम आहे. भगवन् ! महामुने ! जेथे आपली यज्ञक्रिया चालू आहे, जेथे ते पापी, दुराचारी, ब्रह्महत्यारे, दुरात्मे राक्षस आपल्या यज्ञात विघ्न करण्यासाठी येत असतात आणि जेथे मला यज्ञाचे रक्षण आणि राक्षसांचा वध हे कार्य करावयाचे आहे, तो आपला आश्रम कुठल्या देशात आहे ? ब्रह्मन् ! मुनिश्रेष्ठ ! प्रभो ! हे सर्व मी जाणू इच्छितो." ॥ २०-२२ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे अष्टाविंशः सर्गः ॥ २८ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा अठ्ठाविसावा सर्ग समाप्त झाला. ॥ २८ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP