॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ उत्तरकाण्ड ॥

॥ प्रथमः सर्गः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]भगवान रामांकडे अगस्ती इत्यादी मुनीश्वर येतात आणि रावण राक्षसांचे पूर्वचरित्र ऐकतात


श्रीमहादेव उवाच
जयति रघुवंशतिलकः कौसल्याहृदयनन्दनो रामः ।
दशवदननिधनकारी दाशरथिः पुण्डरिकाक्षः ॥ १ ॥
कौसल्येच्या हृदयाला आनंद देणारे, रावणाचा वध करणारे, कमळाप्रमाणे डोळे असणारे, रघुवंशाचे तिलक असणारे दशरथपुत्र श्रीराम यांचा विजय असो. (१)

पार्वत्युवाच
अथ रामः किमकरोत् कौसल्यानन्दवर्धनः ।
हत्वा मृधे रावणादीन् रक्षसान् भीमविक्रमः ॥ २ ॥
अभिषिक्तस्त्वयोध्यायां सीतया सह राघवः ।
मायामानुषतां प्राप्य कति वर्षाणि भूतले ॥ ३ ॥
स्थितवान् लीलया देवः परमात्मा सनातनः ।
अत्यजन्मानुषं लोकं कथमन्ते रघूद्‍वहः ॥ ४ ॥
पार्वती म्हणाली- कौसल्येचा आनंद वाढविणाऱ्या, महापराक्रमी श्रीरामांनी युद्धामध्ये रावण इत्यादी राक्षसांचा वध केला; नंतर सीतेसह रामांवर अयोध्या नगरीत राज्याभिषेक झाला. त्यानंतर त्यांनी कोणते कार्य केले ? सनातन परमात्मा देव श्रीराम लीलेने मायेचे द्वारा मनुष्य-रूप धारण करून किती वर्षे या भूतलावर राहिले ? तसेच शेवटी त्या रघूत्तमांनीं मनुष्य- लोक कोणत्या प्रकारे सोडला ? (२-४)

एतदाख्याहि भगवन् श्रद्दधत्या मम प्रभो ।
कथापीयुषमास्वाद्य तृष्णा मेऽतीव वर्धते ।
रामचन्द्रस्य भगवान् ब्रूहि विस्तरशः कथाम् ॥ ५ ॥
हे प्रभो, श्रद्धायुक्त असणाऱ्या मला तुम्ही हे सर्व सांगा. हे भगवन, श्रीरामांच्या कथामृताचा आस्वाद घेतल्यामुळे ती कथा पुढे ऐकण्याची माझी इच्छा अतिशय वाढत आहे. म्हणून ती कथा तुम्ही मला विस्ताराने कथन करा. (५)

श्रीमहादेव उवाच
राक्षसानां वधं कृत्वा राज्ये राम उपस्थिते ।
आययुर्मुनयः सर्वे श्रीरां अमभिवन्दितुम् ॥ ६ ॥
श्रीमहादेव म्हणाले- राक्षसांचा वध केल्यानंतर, श्रीराम हे राज्यावर विराजमान झाले तेव्हा, सर्व मुनी श्रीरामांना अभिवादन करण्यास तेथे आले. (६)

विश्वामित्रोऽसितः कण्वो दुर्वासा भृगुरङ्‌गिराः ।
कश्यपो वामदेवऽत्रिः तथा सप्तर्षयोऽमलाः ॥ ७ ॥
अगस्त्यः सह शिष्यैश्च मुनिभिः सहितोऽभ्यगात् ।
द्वारमासाद्य रामस्य द्वारपालमथाब्रवीत् ॥ ८ ॥
विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगू अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री तसेच निर्मळ स्वभावाचे सप्तर्षी, आणि आपले शिष्य व इतर मुनी यांच्यासह अगस्त्य मुनी तेथे आले. राजवाड्याच्या द्वाराजवळ आल्यावर अगस्त्य, रामांच्या द्वारपालाला म्हणाले. (७-८)

ब्रूहि रामाय मुनयः समागत्य बहिःस्थिताः ।
अगस्त्यप्रमुखाः सर्वे आशीर्भिः अभिनन्दितुम् ॥ १० ॥
"अगस्त्य इत्यादी सर्व मुनी हे आशीर्वाद देऊन श्रीरामांचे अभिनंदन करण्यासाठी आले असून, ते बाहेर उभे आहेत, असे तू त्यांना सांग. " (९)

प्रतिहारस्ततो रामं अगस्त्यवचनाद् द्रुतम् ।
नमस्कृत्याब्रवीद्वाक्यं विनयावनतः प्रभुम् ॥ १० ॥
तेव्हा अगस्त्यांचे वचन ऐकून द्वारपाल ताबडतोब रामांकडे गेला आणि त्यांना नमस्कार करून व नम्र होऊन म्हणाला. (१०)

कृताञ्जलिरुवाचेदं अगस्त्यो मुनिभिः सह ।
देव त्वद्दर्शनार्थाय प्राप्तो बहिरुपस्थितः ॥ ११ ॥
"महाराज, तुमचे दर्शन घेण्यासाठी अनेक मुनींसह अगस्त्य ऋषी आले आहेत व ते बाहेर उभे आहेत. " (११)

तमुवाच द्वारपालं प्रवेशय यथासुखम् ।
पूजिता विविशुर्वेश्म नानारत्‍नविभूषितम् ॥ १२ ॥
तेव्हा राम त्या द्वारपालाला म्हणाले, "त्यांना सन्मानाने आत घेऊन ये. " नंतर सन्मानित झालेले ते मुनी नाना रत्नांनी विभूषित असणाऱ्या श्रीरामांच्या महालात प्रविष्ट झाले. (१२)

दृष्ट्वा रामो मुनीन् शीघ्रं प्रत्युत्थाय कृताञ्जलिः ।
पाद्यार्घ्यादिभिरापूज्य गां निवेद्य यथाविधि ॥ १३ ॥
मुनींना पाहाताच राम हात जोडून चट्‌दिशी उठून उभे राहिले आणि पाद्य, अर्घ्य इत्यादींनी पूजा-सत्कार करून, त्यांनी यथाशास्त्र प्रत्येकाला एकेक गाय दान दिली. (१३)

नत्वा तेभ्यो ददौ दिव्यानि आसनानि यथार्हतः ।
उपविष्टा प्रहृष्टाश्च मुनयो रामपूजिताः ॥ १४ ॥
तसेच त्यांनी नमस्कार करून, मुनींच्या योग्यतेप्रमाणे त्यांना दिव्य आसने दिली. श्रीरामांकडून सत्कार झाल्यावर ते मोठ्या आनंदाने त्या आसनांवर बसले. (१४)

सम्पृष्टाकुशलाः सर्वे रामं कुशलमब्रुवन् ।
कुशलं ते महाबाहो सर्वत्र रघुनन्दन ॥ १५ ॥
श्रीरामांनी विचारल्यावर त्या सर्वांनी आपापले कुशल सांगितले. नंतर ते श्रीरामांना म्हणाले, "हे महाबाहो रघुनंदना, सर्वत्र तुमचे कुशल आहे ना ? (१५)

दिष्ट्येदानीं प्रपश्यामो हतशत्रुमरिन्दम ।
न हि भारः स ते राम रावणो राक्षसेश्वरः ॥ १६ ॥
हे शत्रुदमना, ही आनंदाची व भाग्याची गोष्ट आहे की तुम्हांला शत्रुरहित झालेले आम्ही पाहात आहोत. खरे सांगायचे झाले तर हे रामा, राक्षसराज रावण तुम्हांला फार भारी होता, असे मुळीच नव्हते. (१६)

सधनुस्त्वं हि लोकान् त्रीन् विजेतं शक्त एव हि ।
दिष्ट्या त्वया हताः सर्वे राक्षसा रावणादयः ॥ १७ ॥
कारण धनुष्य धारण करणारे तुम्ही तिन्ही लोक जिंकण्यास समर्थ आहातच. रावण इत्यादी सर्व राक्षसांचा तुमच्याकडून वध झाला, ही आनंदाची गोष्ट आहे. (१७)

सह्यमेतन्महाबाहो रावणस्य निबर्हणम् ।
असह्यमेतत्सम्प्राप्तं रावणेर्यन्निषूदनम् ॥ १८ ॥
हे महाबाहो, रावणाचा वध करणे ही गोष्ट तुलनेने तुम्हांला फार सोपी होती. परंतु रावणपुत्र मेघनादाचा वध करणे ही गोष्ट फारच कठीण होती. (१८)

अन्तकप्रतिमाः सर्वे कुम्भकर्णादयो मृधे ।
अन्तकप्रतिमैर्बाणैः हतास्ते रघुसत्तम ॥ १९ ॥
कुंभकर्ण इत्यादी सर्व राक्षस युद्धामध्ये प्रत्यक्ष मृत्यूप्रमाणेच होते. हे रघुश्रेष्ठा, तुमच्या मृत्युतुल्य बाणांनी ते ठार मारले गेले. (१९)

दत्त्वा चेयं त्वयास्माकं पुरा ह्यभयदक्षिणा ।
हत्वा रक्षोगणान् सङ्‍ख्ये कृतकृत्योऽद्य जीवसि ॥ २० ॥
तुम्ही आम्हांला अगोदरच ही अभयरूपी दक्षिणा दिलेली होती. शिवाय युद्धामध्ये राक्षसांच्या समुदायांना ठार मारून तुम्ही कृतकृत्य झाला आहात." (२०)

श्रुत्वा तु भषितं तेषां मुनिनां भावितात्मनाम् ।
विस्मयं परमं गत्वा रामः प्राञ्जलिरब्रवीत् ॥ २१ ॥
शुद्धचित्त अशा त्या मुनींचे ते भाषण ऐकल्यावर, राम अतिशय आश्चर्यचकित झाले आणि हात जोडून ते त्यांना म्हणाले. (२१)

रावणादीनतिक्रम्य कुम्भकर्णादिराक्षसान् ।
त्रिलोकजयिनो हित्वा किं प्रशंसथ रावणिम् ॥ २२ ॥
"त्रैलोक्याला जिंकणाऱ्या रावण इत्यादींना सोडून तसेच कुंभकर्ण इत्यादी राक्षसांना सोडून, तुम्ही रावण-पुत्र मेघनादाची प्रशंसा का बरे करीत आहात ?" (२२)

ततस्तद्वचनं श्रुत्वा राघवस्य महात्मनः ।
कुम्भयोनिर्महातेजा रामं प्रीत्या वचोऽब्रवीत् ॥ २३ ॥
महात्म्या राघवांचे ते वचन ऐकल्यानंतर, महातेजस्वी अगस्त्य प्रेमपूर्वक रामांना म्हणाले. (२३)

शृणु राम यथा वृत्तं रावणे रावणस्य च ।
जन्म कर्म वरादानं सङ्‍क्षेपात् वदतो मम ॥ २४ ॥
"रामा, रावण आणि रावणपुत्र मेघनाद यांचा जन्म, कर्म तसेच त्यांना झालेली वराची प्राप्ती ही सर्व हकीगत मी तुम्हांला संक्षेपाने सांगतो, ऐका. (२४)

पुरा कृतयुगे राम पुलस्त्यो ब्रह्मणः सुतः ।
तपस्तप्तुं गतो विद्वान् मेरोः पार्श्वं महामतिः ॥ २५ ॥
हे रामा, पूर्वी कृतयुगात ब्र ह्मदेवाचा पुत्र, महाबुद्धिमान विद्वान पुलस्त्य हा तपश्चर्या करण्यासाठी मेरू पर्वताच्या आसमंतात गेला. (२५)

तृणबिन्दोराश्रमेऽसौ न्यवसन् मुनिपुङ्‍गवः ।
तपस्तेपे महातेजाः स्वाध्यायनिरतः सदा ॥ २६ ॥
तेथे तो मुनिश्रेष्ठ तृणबिंदूंच्या आश्रमात राहू लागला. आणि तो महातेजस्वी नेहमी स्वाध्यायात रत होऊन तप करू लागला. (२६)

तत्राश्रमे महारम्ये देवगन्धर्वकन्यकाः ।
गायन्त्यो ननृतुस्तत्र हसन्त्यो वादयन्ति च ॥ २७ ॥
तेथे त्या अतिशय रम्य आश्रमात देव आणि गंधर्व यांच्या कन्या एकदा गात, हसत व वाद्य वाजवीत नृत्य करू लागल्या. (२७)

पुलस्त्यस्य तपोविघ्नं चक्रुः सर्वा अनिन्दिताः ।
ततः क्रुद्धो महातेजा व्याजहार वचो महत् ॥ २८ ॥
त्या सर्व सुंदर कन्यांनी पुलस्त्यांच्या तपात विघ्न निर्माण केले. तेव्हा तो महातेजस्वी पुलस्त्य रागावला आणि तो अतिशय कठोरपणे म्हणाला. (२८)

या मे दृष्टिपथं गच्छेत् सा गर्भं धारयिष्यति ।
ताः सर्वाः शापसंविग्ना न तं देशं प्रचक्रमुः ॥ २९ ॥
"जी कोणी कन्या माझ्या दृष्टिपथात येईल ती गर्भवती होईल. " तेव्हा शापाने भ्यालेल्या त्या सर्व जणी त्या प्रदेशात पुन्हा आल्या नाहीत. (२९)

तृणबिन्दोस्तु राजर्षेः कन्या तन्नाशृणोद्वचः ।
विचचार मुनेरग्रे निर्भया तं प्रपश्यती ॥ ३० ॥
परंतु राजर्षी तृणबिंदूच्या कन्येने पुलस्त्याचे वचन ऐकले नव्हते. म्हणून ती एकदा निर्भयपणे त्यांच्याकडे पाहात त्याच्या समोरून फिरत होती. (३०)

बभूव पाण्डुरतनुः व्यञ्जितान्तः शरीरजा ।
दृष्ट्वा सा देहवैवर्ण्यं भीता पितरमन्वगात् ॥ ३१ ॥
तोच तिच्या शरीरात गर्भ राहिल्याची चिन्हे प्रकट होऊन तिच्या शरीरावर पांढरेपणा आला. आपल्या शरीराचा पांढरेपणा पाहून ती भीत भीत आपल्या पित्याकडे गेली. (३१)

तृणबिन्दुश्च तां दृष्ट्वा राजर्षिरमितद्युतिः ।
ध्यात्वा मुनिकृतं सर्वं अवैद्विज्ञानचक्षुषा ॥ ३२ ॥
तिला पाहून महातेजस्वी अशा राजर्षी तृणबिंदूने ध्यान केले आणि मग त्याला आपल्या ज्ञानदृष्टीने मुनींचे सर्व कृत्य कळून आले. (३२)

तां कन्यां मुनिवर्याय पुलस्त्याय ददौ पिता ।
तां प्रगृह्याब्रवीत्कन्यां बाढमित्येव स द्विजः ॥ ३३ ॥
तेव्हा राजर्षींनी ती कन्या मुनिश्रेष्ठ पुलस्त्याला दिली. तेव्हा 'ठीक आहे' असे म्हणून त्या पुलस्त्य ब्राह्मणाने त्या कन्येचा स्वीकार केला. (३३)

शुश्रूषणपरां दृष्ट्वा मुनिः प्रीतोऽब्रवीद्वचः ।
दास्यामि पुत्रमेकं ते उभयोर्वंशवर्धनम् ॥ ३४ ॥
आपली सेवा करण्यात ती तत्पर आहे हे पाहून प्रसन्न झालेला मुनी तिला म्हणाला, "आईकडील आणि पित्याकडील अशा दोन्ही वंशाची वृद्धी करणारा एक पुत्र मी तुला देईन." (३४)

ततः प्रासूत सा पुत्रं पुलस्त्यात् लोकविश्रुतम् ।
विश्रवा इति विख्यातः पौलस्त्यो ब्रह्मविन्मुनिः ॥ ३५ ॥
त्यानंतर तिने पुलस्त्याचे द्वारा त्रिलोकविख्यात पुत्राला जन्म दिला. तो पौलस्त्य ब्रह्मवेत्ता आणि मुनी असून तो विश्रवा या नावाने विख्यात झाला. (३५)

तस्य शीलादिकं दृष्ट्वा भरद्वाजो महामुनिः ।
भार्यार्थं स्वां दुहितरं ददौ विश्रवसे मुदा ॥ ३६ ॥
त्या विश्रव्याचे शील, स्वभाव इत्यादी पाहून महामुनी भरद्वाजांनी आनंदपूर्वक आपली मुलगी त्याला दिली. (३६)

तस्यां तु पुत्रः सञ्जज्ञे पौलस्त्याल्लोकसम्मतः ।
पितृतुल्यो वैश्रवणो ब्रह्मणा चानुमोदितः ॥ ३७ ॥
ददौ तत्तपसा तुष्टो ब्रह्मा तस्मै वरं शुभम् ।
मनोऽभिलषितं तस्य धनेशत्वमखण्डितम् ॥ ३८ ॥
पुलस्त्यपुत्र विश्रव्यापासून तिला लोकप्रसिद्ध असा एक पुत्र उत्पन्न झाला. तो वैश्रवण- विश्रव्याचा पुत्र- हा आपल्या पित्यासमान होता, ब्रह्मदेवांनाही तो प्रिय होता. त्याच्या तपाने संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवांनी त्याला एक उत्तम मनोवांछित वर दिला. त्यामुळे त्याला अखंड धनेश्वरत्व प्राप्त झाले. (३७-३८)

ततो लब्धवरः सोऽपि पितरं द्रष्टुमागतः ।
पुष्पकेण धनाध्यक्षो ब्रह्मदत्तेन भास्वता ॥ ३९ ॥
ब्रह्मदेवांकडून वर मिळालेला तो कुबेर धनाध्यक्ष झाला आणि ब्रह्मदेवांनीच दिलेल्या तेजस्वी अशा पुष्पक नावाच्या विमानात बसून तो आपल्या पित्याला भेटण्यास आला. (३९)

नमस्कृत्याथ पितरं निवेद्य तपसः फलम् ।
प्राह मे भगवान् ब्रह्मा दत्त्वा वरमनिन्दितम् ॥ ४० ॥
पित्याला नमस्कार करून आणि त्यांना आपल्या तपाचे फळ अर्पण करून तो म्हणाला, "तात, भगवान ब्रह्मदेवांनी मला अतिशय उत्तम वर दिलेला आहे. (४०)

निवासाय न मे स्थानं दत्तवान् परमेश्वरः ।
ब्रूहि मे नियतं स्थानं हिंसा यत्र न कस्यचित् ॥ ४१ ॥
परंतु त्यांनी मला राहाण्यासाठी कोणतेही स्थान दिलेले नाही. तेव्हा तुम्ही मला एखादे निश्चित स्थान सांगा की जेथे राहिल्यामुळे कुणाचीही हिंसा होणार नाही." (४१)

विश्रवा अपि तं प्राह लङ्‍कानाम पुरी शुभा ।
राक्षसानां निवासाय निर्मिता विश्वकर्मणा ॥ ४२ ॥
तेव्हा विश्रवा त्याला म्हणाला, "विश्वकर्म्याने राक्षसांना सहाण्यासाठी लंका नावाची सुंदर नगरी निर्माण केलेली आहे. (४२)

त्यक्‍त्वा विष्णुभयाद्दैत्या विविशुस्ते रसातलम् ।
सा पुरी दुष्प्रधर्षान्यैः मध्येसागरमास्थिता ॥ ४३ ॥
परंतु विष्णूच्या भीतीमुळे राक्षस ती नगरी सोडून रसातळात गेले आहेत. ती नगरी सागराच्या मध्ये वसलेली असल्यामुळे ती कुणाकडूनही आक्रांत केली जाणे फार कठीण आहे. (४३)

तत्र वासाय गच्छ त्वं नान्यैः साधिष्ठिता पुरा ।
पित्रादिष्टस्त्वसौ गत्वा तां पुरीं धनदोऽविशत् ॥ ४४ ॥
तू तेथे राहाण्यासाठी जा. या पूर्वी त्या नगरीवर कुणाचाही अधिकार नव्हता." पित्याने आज्ञा केल्यावर धनद कुबेर तेथे गेला आणि त्याने त्या नगरीत प्रवेश केला. (४४)

स तत्र सुचिरं कालं उवास पितृसम्मतः ।
कस्यचित्त्वथ कालस्य सुमाली नाम राक्षसः ॥ ४५ ॥
रसातलान् मर्त्यलोकं चचार पिशिताशनः ।
गृहित्वा तनयां कन्यां साक्षात् देवीमिव श्रियम् ॥ ४६ ॥
आपल्या पित्याच्या संमतीने तो तेथे बराच काळ राहिला. नंतर काही काळ गेल्यावर मांसभक्षक सुमाली नावाचा राक्षस साक्षात लक्ष्मी देवीप्रमाणे सुंदर असणाऱ्या आपल्या मुलीला घेऊन रसातळातून वर येऊन, मर्त्य लोकात संचार करू लागला. (४५-४६)

अपश्यत् धनदं देवं चरन्तं पुष्पकेण सः ।
हिताय चिन्तयामास राक्षसानां महामनाः ॥ ४७ ॥
कुबेर हा पुष्पक विमानातून फिरत आहे असे त्या सुमालीने एकदा पाहिले. तेव्हा त्या बुद्धिमान सुमालीने राक्षसांच्या हितासाठी विचार केला. (४७)

उवाच तनयां तत्र कैकसीं नाम नामतः ।
वत्से विवाहकालस्ते यौवनं चातिवर्तते ॥ ४८ ॥
प्रत्याख्यानाच्च भीतैस्त्वं न वारैर्गृह्यसे शुभे ।
सा त्वं वरय भद्रं ते मुनिं ब्रह्मकुलोद्‌भवम् ॥ ४९ ॥
तो आपल्या कैकसी नावाच्या कन्येला म्हणाला, "मुली, तुझ्या विवाहाचा काळ आणि तारुण्याचा काळ व्यतीत होत आहे. हे कल्याणी, तू नकार देशील, यामुळे भ्यालेले वर तुला मागणी घालीत नाहीत. तेव्हा तू स्वतःच ब्रह्मदेवाच्या कुळात जन्मलेल्या विश्रवा मुनींना निवड. तुझे कल्याण होवो. (४८-४९)

स्वयमेव ततः पुत्रा भविष्यन्ति महाबलाः ।
ईदृशाः सर्वशोभाढ्या धनदेन समाः शुभे ॥ ५० ॥
तथेति साश्रमं गत्वा मुनेरग्रे व्यवस्थिता ।
लिखन्ती भुवमग्रेण पादेनाधोमुखी स्थिता ॥ ५१ ॥
हे शुभ लक्षणी मुली, त्यामुळे तुला अनायासेच महाबलवान् पुत्र होतील. ते पुत्र कुबेरासमान, सर्व शोभेने संपन्न असतील." "ठीक आहे" असे म्हणून विश्रवा मुनींच्या आश्रमात जाऊन, मुनींच्या पुढे उभी राहिली. त्यावेळी पायाच्या नखाग्राने जमिनीवर रेघा काढीत ती खाली तोंड करून उभी राहिली. (५०-५१)

तां अपृच्छन्मुनिः का त्वं कन्यासि वरवर्णिनि ।
साब्रवीत् प्राञ्जलिर्ब्रह्मन् ध्यानेन ज्ञातुमर्हसि ॥ ५२ ॥
मुनींनी तिला विचारले, "हे सुंदरी, तू कोण आहेस आणि तू अविवाहित आहेस का ?" तेव्हा ती हात जोडून म्हणाली, "हे ब्रह्मन, आपण आपल्या ध्यानाच्या योगानेच माझ्याबद्दल जाणू शकाल." (५२)

ततो ध्यात्वा मुनिः सर्वं ज्ञात्वा तं प्रत्यभाषत ।
ज्ञातं तवाभिलषितं मत्तः पुत्रानभीप्ससि ॥ ५३ ॥
तेव्हा ध्यान करून सर्व काही जाणून घेतल्यावर, त्या मुनींनी तिला प्रत्युत्तर दिले की, "तुझी अभिलाषा मला कळली आहे. माझ्याकडून तुला पुत्र व्हावेत, अशी तुझी इच्छा आहे. (५३)

दारुणायां तु वेलायां आगतासि सुमध्यमे ।
अतस्ते दारुणौ पुत्रौ राक्षसौ संभविष्यतः ॥ ५४ ॥
परंतु हे सुंदरी, तू अगदी कुवेळी माझ्याकडे आली आहेस. म्हणून तुला क्रूर असे दोन राक्षसपुत्र होतील." (५४)

साब्रवीत् मुनिशार्दूल त्वत्तोऽप्येवंविधौ सुतौ ।
तामाह पश्चिमो यस्ते भविष्यति महामतिः ॥ ५५ ॥
महाभागवतः श्रीमान् रामभक्त्येकतत्परः ।
इत्युक्ता सा तथा काले सुषुवे दशकन्धरम् ॥ ५६ ॥
रावणं विंशतिभुजं दशशीर्षं सुदारुणम् ।
तद् रक्षोजातमात्रेण चचाल च वसुंधरा ॥ ५७ ॥
बभूवुर्नाशहेतूनि निमित्तान्यखिलान्यपि ।
कुम्भकर्णस्ततो जातो महापर्वतसन्निभः ॥ ५८ ॥
तेव्हा ती म्हणाली, "अहो मुनिश्रेष्ठ, तुमच्यापासून होणारे पुत्रसुद्धा क्रूर असतील काय ?" त्यावर मुनी तिला म्हणाले, "त्या दोघांच्या नंतर जो पुत्र तुला होईल तो मात्र महाबुद्धिमान, परम भगवद्‌भक्त, ऐश्वर्य संपन्न आणि फक्त रामाची भक्ती करण्यात तत्पर असेल." मुनींनी तिला असे सांगितल्यावर तिने योग्यवेळी दहा शिरे असणाऱ्या रावणाला जन्म दिला. त्याला वीस बाहू होते, दहा मस्तके होती, तो अतिशय भयंकर होता. तो जन्माला येताच पृथ्वी चळचळा कापली, आणि सर्वप्रकारचे नाश सुचविणारे अपशकुनसुद्धा त्या वेळी झाले. त्यानंतर प्रचंड पर्वताप्रमाणे असणारा कुंभकर्ण जन्माला आला. (५५-५८)

ततः शूर्पणखा नाम जाता रावणसोदरी ।
ततो विभीषणो जातः शान्तात्मा सौम्यदर्शनः ॥ ५९ ॥
स्वाध्यायी नियताहारो नित्यकर्मपरायणः ।
कुम्भकर्णस्तु दुष्टात्मा द्विजान् सन्तुष्टचेतसः ॥ ६० ॥
भक्षयन् ऋषिसङ्‍घाश्च विचचारातिदारुणः ।
रावणोऽपि महासत्त्वो लोकानां भयदायकः ।
ववृधे लोकनाशाय ह्यामयो देहिनामिव ॥ ६१ ॥
त्यानंतर शूर्पणखा नावाची रावणाची सख्खी बहीण जन्मली. पुढे विभीषण जन्माला आला. तो शांतचित्त असणारा, सौम्य दर्शनाचा, स्वाध्याय करणारा, नियत आहार घेणारा आणि नित्य कर्मांमध्ये तत्पर असा होता. दुष्ट मनाचा आणि अतिशय भयंकर असा कुंभकर्ण संतुष्ट चित्त असणाऱ्या ब्राह्मणांना आणि ऋषिसमूहांना खाऊन टाकीत पृथ्वीवर फिरत असे. तर लोकांना भयभीत करणारा महापराक्रमी रावण देहधारी प्राण्यांचा नाश करणाऱ्या रोगाप्रमाणे लोकांच्या नाशासाठी वाढू लागला. (५९-६१)

राम त्वं सकलान्तरस्थमभितो
    जानासि विज्ञानदृक्
साक्षी सर्वहृदि स्थितो हि परमो
    नित्योदितो निर्मलः ।
त्वं लीलामनुजाकृतिः स्वमहिमन्
    मायागुणैर्नाज्यसे
लीलार्थं प्रतिचोदितोऽद्य भवता
    वक्ष्यामि रक्षोद्‌भवम् ॥ ६२ ॥
हे रामा, तुम्ही सर्व लोकांच्या अंतः करणात स्थित आहात. सर्वांच्या हृदयात असणारे तुम्ही साक्षीरूपाने आपल्या ज्ञानदृष्टीद्वारा सर्वांच्या हृदयातील सर्व काही जाणत असता. आपल्या महिम्यामध्ये स्थित असणाऱ्या हे परमेश्वरा, तुम्ही लीलेनेच हे मनुष्य रूप धारण केले आहे. तुम्ही मायेच्या गुणांनी लिप्त होत नाही. तुम्ही लीलेनेच मला प्रश्न केला म्हणून मी तुम्हांला राक्षसांच्या जन्माचा वृत्तांत सांगणार आहे. (६२)

जानामि केवलमनन्त्यमचिन्त्यशक्तिं
    चिन्मात्रमक्षरमजं विदितात्मतत्त्वम् ।
त्वां राम गूढनिजरूपमनुप्रवृत्तो
    मूढोऽप्यहं भवदनुग्रहतश्चरामि ॥ ६३ ॥
हे रामा, तुम्ही केवळ एक मात्र, अनंत आहात. तुमची शक्ती कल्पनातीत आहे. तुम्ही केवळ चैतन्यरूप, अक्षर, अजन्मा आणि आत्मतत्त्व जाणणारे आहात, हे मला माहीत आहे. मायेच्याद्वारा जरी तुम्ही आपले रूप गूढ ठेवले आहे आणि जरी मी मूर्ख असलो तरीसुद्धा तुमच्या भजनाच्या मार्गाचे अनुसरण करून, तुमच्या कृपानुग्रहामुळे मी या जगात संचार करीत आहे." (६३)

एवं वदन्तमिनवंशपवित्रकीर्तिः
    कुम्भोद्‌भवं रघुपतिः प्रहसन् बभाषे ।
मायाश्रियं सकलमेतदनन्यकत्वान्
    मत्कीर्तनं जगति पापहारं निबोध ॥ ६४ ॥
अशा प्रकारे बोलणाऱ्या अगस्त्यांना, सूर्यवंशात पवित्र कीर्ती असणारे रघुपती हसत म्हणाले, "हे सर्व जग मायेच्या आश्रयाने असते. कारण ते माझ्याहून वेगळे नाहीच. माझ्या गुणांचे कीर्तन या जगात सर्व पापे हरण करणारे आहे, असे तुम्ही समजा." (६४)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
उत्तरकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥


GO TOP