॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय बावन्नावा ॥
हनुमंत नंदिग्रामास गेला

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


प्रभाते उठोनि सौमित्र । समवेत सुमंत सारथी ।
रथासहित अयोध्येप्रती । दीन वदन होवोनि आले ॥१॥
भद्रासनीं जनकजामात । प्रधानलोक परिवेष्टित ।
कैसी सभा दिसे तेथ । हृष्ट पुष्ट जनेंसीं ॥२॥

दुःखित लक्ष्मणाने घडलेला वृत्तांत रामांना निवेदन केला :

सौमित्र होवोनि परम दीन । मुख कोमाइलें कळाहीन ।
श्रीरामसमीप येवोन । साष्टांग नमन पैं केलें ॥३॥
नेत्रीं अश्रूंचिया धारा । अंग कांपतसे थराथरां ।
अधोमुख होवोनि श्रीरामचंद्रा । सर्व वृत्तांत जाणविला ॥४॥
स्वामीची आज्ञा घेऊन । प्रवेशलों तिघे जण ।
गंगातीरीं जानकी विसर्जून । पुढील कथन अवधारा ॥५॥
गंगेच्या पैलतीरीं । दुःखित सीता सांडोनी दुरी ।
आम्ही उतरलों ऐलतीरीं । मग तेथोनि काय देखिलें ॥६॥
जानकी पतिव्रता सुंदरी । रुदन करितां पैलतीरीं ।
तिचिया शोकाची नवलपरी । सांगता नये श्रीरामा ॥७॥
तदनंतरें मुनिपुत्र । तेथें येवोनि समस्त ।
घेवोनि जानकीचा वृत्तांत । वाल्मीकासी जाणविलें ॥८॥
वाल्मीकें आश्रमा नेली । बरवेपरी तेथें ठेविली ।
ऐसी श्रीराम कथा वर्तली । काय सांगूं राजेंद्रा ॥९॥
श्रीरामा तुम्हीं लोकलज्जेभेण । केलें जानकीचें उपेक्षण ।
परी ते परम पतिव्रता दारुण । शोक बहुत वनीं केला ॥१०॥
तिचें देखोनि रुदन । माझा निघो पाहे प्राण ।
परी तुझी कृपा होती म्हणोन । तरीच हे चरण देखिले ॥११॥
सीतेचा शोक ऐकोन । वनींचे पक्षी श्वापदें चारा सांडून ।
तीहीं झालीं अति दीन । दुःख दारुण पैं तिचें ॥१२॥
ऐसी दुःखित ते सीता । वनीं सांडून श्रीरघुनाथा ।
मी अयोध्येसी आलो तत्वतां । चरण तुझे पहावया ॥१३॥
तुझिया चरणांचेनि दर्शनें । उठे संसाराचें धरणें ।
अहंममतेचें खत फाटणें वेगीं पावणें परब्रह्म ॥१४॥

लक्ष्मणाचे वैराग्यपर विचार :

ऐसिया जी रघुनाथा । जानकीची न करावी चिंता ।
जें लिहून गेला विधाता । तें सर्वथा न चुकेचि ॥१५॥
भूत भविष्य वर्तमान । तिहींचा तूं साक्षी पूर्ण ।
ध्येय ध्याता आणि ध्यान । याहूनि भिन्न तूं श्रीरामा ॥१६॥
गृह स्त्री पुत्र धन । यांची आसक्ति ज्ञानियासी नाहीं जाण ।
भोग भोगून अभोक्तता पूर्ण । वैराग्यीं मन दृढ ज्याचें ॥१७॥
उडणी चढे भिंतीसीं । चढणेंचि होय पतन तिसी ।
संयोग तोचि वियोगासी । कारण जाण श्रीरामा ॥१८॥
जो प्राणी जन्म आला । तो गर्भीच जाण मेला ।
याकारणें साधुमेळा । निःसंग होऊनी रहातसे ॥१९॥
भलतेनें आपुलें करावें हित । न करावें तें वृथा जीवित ।
आयुष्य जाऊं न द्यावें व्यर्थ । सावचित्त होवोनि ॥२०॥
तस्मात् श्रीरघुपती । जानकीची न करावी खंती ।
दयाळुवा दयामूर्ती । भक्तपति कृपाळुवा ॥२१॥

लक्ष्मणाची रामांकडून प्रशंसा :

ऐकोनि लक्ष्मणाचें वचन । अति संतोषला श्रीरघुनंदन ।
पुढती काय आपण । बोलता झाला सौमित्रासी ॥२२॥
अगा ये महाबाहो लक्ष्मणा । पुरुषांमाजि पंचानना ।
ज्ञानियांमध्यें ज्ञाननिधाना । पराक्रमगहना विवेकियां ॥२३॥
तूं वदलासी जें वचन । तें सत्यचि असे प्रमाण ।
परी माझिया कार्यालागोनि जाण । प्रवर्तलासी ये समयीं ॥२४॥
माझी आज्ञा नुल्लंघितां । वना गेलासि घेवोनि सीता ।
तेथें सांडून तूं मागुता । अयोध्येसी आलासी ॥२५॥
तुजसारिखा नाहीं आप्त । तुवां केलें माझें हित ।
चुकविला थोर अनर्थ । लोकापवादाएवढा ॥२६॥
तुझिया भुजांसी कल्याण । चिरकाल होईल जाण ।
जनापवादभयापासून । मज तुवां गा सोडविलें ॥२७॥
माझिये मनासारिखा । तूं रहाटलासी महापुरुषा ।
त्रैलोक्यीं थोर जोडिलें यशा । जनापवादा चुकवोनी ॥२८॥
एका जनार्दना शरण । पुढें नृगभूपतीचें कथन ।
समूळ सांगेल रघुनंदन । इतिहास पुरातन जुनाट ।
ते कथा रसाळ गाढी । श्रोतीं द्यावी तेथें बुडी ।
तरी पाविजे परपारथडी । श्रद्धा दृढ धरोनी ॥३०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीरामलक्ष्मणदर्शनसंवादो नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥५२॥ ओंव्या ॥३०॥

GO TOP