श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ त्रयोविंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामेण लक्ष्मणं प्रति विनाशसूचकानां लक्षणानां वर्णनं; लंकां प्रत्याक्रमणं च - श्रीरामांनी लक्ष्मणास उत्पातसूचक लक्षणांचे वर्णन करून सांगणे आणि लंकेवर आक्रमण करणे -
निमित्तानि निमित्तज्ञो दृष्ट्‍वा लक्ष्मणपूर्वजः ।
सौमित्रिं संपरिष्वज्य इदं वचनमब्रवीत् ॥ १ ॥
उत्पातसूचक लक्षणांचे जाणकार (ज्ञाते) तसेच लक्ष्मणांचे मोठे भाऊ श्रीरामांनी बरेचसे अपशकुन पाहून सौमित्र लक्ष्मणास हृदयाशी धरले आणि याप्रकारे म्हटले- ॥१॥
परिगृह्योदकं शीतं वनानि फलवन्ति च ।
बलौघं संविभज्येमं व्यूह्य तिष्ठेम लक्ष्मण ॥ २ ॥
लक्ष्मणा ! जेथे शीतल जलाची सुविधा असेल आणि फळांनी भरलेले जंगल असेल, त्या स्थानांचा आश्रय घेऊन आपण आपल्या सेनासमूहाला काही भागात वाटू या आणि याला व्यूहबद्ध करून याच्या रक्षणासाठी सदा सावधान राहू या. ॥२॥
लोकक्षयकरं भीमं भयं पश्याम्युपस्थितम् ।
प्रबर्हणं प्रवीराणां ऋक्षवानररक्षसाम् ॥ ३ ॥
मी पहात आहे, समस्त लोकांचा संहार करणारे भीषण भय उपस्थित झाले आहे, जे अस्वले, वानर आणि राक्षसांच्या प्रमुख वीरांच्या विनाशाचे सूचक आहे. ॥३॥
वाताश्च कलुषा वान्ति कंपते च वसुंधरा ।
पर्वताग्राणि वेपन्ते पतन्ति च महीरुहाः ॥ ४ ॥
धुळीने भरलेला प्रचंड वारा वहात आहे. धरती कापत आहे. पर्वतांची शिखरे हलत आहेत आणि झाडे पडत आहेत. ॥४॥
मेघाः क्रव्यादसंकाशाः परुषाः परुषस्वनाः ।
क्रूराः क्रूरं प्रवर्षन्ति मिश्रं शोणितबिन्दुभिः ॥ ५ ॥
मेघांचे समुदाय एकत्र होत आहेत जे मांसभक्षी राक्षसांप्रमाणे दिसून येत आहेत. ते मेघ दिसण्यात तर क्रूर आहेतच त्यांची गर्जनाही फार कठोर आहे. हे क्रूरतापूर्वक रक्ताच्या थेंबाने मिश्रित जलाची वृष्टि करत आहेत. ॥५॥
रक्तचंदनसंकाशा संध्या परमदारुणा ।
ज्वलतः प्रपतत्येतद् आदित्यादग्निमण्डलम् ॥ ६ ॥
ही संध्या लाल चंदनासमान कांती धारण करून फार भयंकर दिसून येत आहे. प्रज्वलित सूर्यापासून ह्या आगीच्या ज्वाळा तुटून तुटून खाली पडत आहेत. ॥६॥
दीना दीनस्वराः क्रूराः सर्वतो मृगपक्षिणः ।
प्रत्यादित्यं विनर्दन्ति जनयन्तो महद्‌भयम् ॥ ७ ॥
क्रूर पशु आणि पक्षी दीन आकार धारण करून सूर्याकडे तोंड करून दीनतापूर्ण स्वरात चीत्कार करत महान्‌ भय उत्पन्न करीत आहेत. ॥७॥
रजन्यामप्रकाशस्तु संतापयति चंद्रमाः ।
कृष्णरक्तांशुपर्यन्तो लोकक्षय इवोदितः ॥ ८ ॥
रात्री सुद्धा चंद्रमा पूर्ण प्रकाशित होत नाही आहे आणि आपल्या स्वभावाच्या विपरित ताप देत आहे. तो काळ्या आणि लाल किरणांनी व्याप्त होऊन याप्रकारे उदित झाला आहे जणु जगताच्या प्रलयाचा काळ येऊन ठेपला आहे. ॥८॥
ह्रस्वो रूक्षोऽप्रशस्तश्च परिवेषस्तु लोहितः ।
आदित्ये विमले नीलं लक्ष्म लक्ष्मण दृश्यते ॥ ९ ॥
लक्ष्मणा ! निर्मल सूर्यमंडलात नीळे चिन्ह दिसून येत आहे. सूर्याच्या चारी बाजूला असे मंडल पडले आहे जे लहान, रूक्ष, अशुभ तसेच लाल आहे. ॥९॥
रजसा महता चापि नक्षत्राणि हतानि च ।
युगान्तमिव लोकानां पश्य शंसन्ति लक्ष्मण ॥ १० ॥
सौमित्रा ! पहा बरे, हे तारे फार मोठ्‍या धूळीच्या राशीने आच्छादित होऊन ह्तप्रभ झाले आहेत आणि जगताच्या भावी संहाराची सूचना देत आहेत. ॥१०॥
काकाः श्येनास्तथा नीचा गृध्राः परिपतन्ति च ।
शिवाश्चाप्यशुभान् नादान् नदन्ति सुमहाभयान् ॥ ११ ॥
कावळे, ससाणे तसेच अधम्‌ गिधाडे चारी बाजूस उडत आहेत आणि कोल्हीणी अशुभसूचक महाभयंकर बोली बोलत आहेत. ॥११॥
शैलैः शूलैश्च खड्गैश्च विसृष्टैः कपिराक्षसैः ।
भविष्यत्यावृता भूमिः मांसशोणितकर्दमा ॥ १२ ॥
असे कळून येत आहे की वानर आणि राक्षस यांनी फेकलेल्या शिलाखंडांनी, शूलांनी आणि तलवारीनी ही सारी भूमी भरून जाईल तसेच येथे रक्तमांसांचा चिखल जमेल. ॥१२॥
क्षिप्रमद्यैव दुर्धर्षां पुरीं रावणपालिताम् ।
अभियाम जवेनैव सर्वैर्हरिभिरावृता ॥ १३ ॥
आपण आजच जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर या रावणपालित दुर्जय नगरी लंकेवर समस्त वानरांसह वेगपूर्वक आक्रमण करावे. ॥१३॥
इत्येवमुक्त्वा धन्वी स रामः संग्रामधर्षणः ।
प्रतस्थे पुरतो रामो लंकामभिमुखो विभुः ॥ १४ ॥
असे बोलून संग्राम विजयी भगवान्‌ श्रीराम हातात धनुष्य घेऊन सर्वांच्या पुढे लंकापुरीकडे प्रस्थित झाले. ॥१४॥
सविभीषणसुग्रीवाः सर्वे ते वानरर्षभाः ।
प्रतस्थिरे विनर्दन्तो निश्चिता द्विषतां वधे ॥ १५ ॥
नंतर विभीषण आणि सुग्रीवा बरोबर ते सर्वश्रेष्ठ वानर गर्जना करत युद्धाचा निश्चय केलेल्या शत्रूंचा वध करण्यासाठी पुढे निघाले. ॥१५॥
राघवस्य प्रियार्थं तु सुतनां वीर्यशालिनाम् ।
हरीणां कर्मचेष्टाभिः तुतोष रघुनंदनः ॥ १६ ॥
ते सर्वच्या सर्व राघवाचे प्रिय करू इच्छित होते. त्या बलशाली वानरांची कर्मे आणि त्यांच्या चेष्टा यांनी रघुनंदन श्रीरामांना फार संतोष झाला. ॥१६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे त्रयोविंशः सर्गः ॥ २३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा तेवीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥२३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP