॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ युद्धकाण्ड ॥

॥ द्वादशः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



बिभीषणाचा राज्याभिषेक आणि सीतेची अग्निपरीक्षा


श्रीमहादेव उवाच
रामो विभीषणं दृष्ट्वा हनूमन्तं तथाङ्‌गदम् ।
लक्ष्मणं कपिराजं च जाम्बवन्तं तथा परान् ॥ १ ॥
परितुष्टेन मनसा सर्वानेवाब्रवीद्वचः ।
भवतां बाहुवीर्येण निहतो रावणो मया ॥ २ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, बिभीषण, हनुमंत तसेच अंगद, लक्ष्मण, कपिराज सुग्रीव, जांबवान तसेच इतरही वानरवीर यांचेकडे पाहून, संतुष्ट मनाने राम त्या सर्वांना म्हणाले, "तुमच्या बाहूंच्या सामर्थ्यामुळे माझ्याकडून रावण मारला गेला आहे. (१-२)

कीर्तीः स्थास्यति वः पुण्या यावच्चन्द्रदिवाकरो
कीर्तयिष्यन्ति भवतां कथां त्रैलोक्यपावनीम् ॥ ३ ॥
मयोपेतां कलिहरां यास्यन्ति परमां गतिम् ।
एतस्मिन्नन्तरे दृष्ट्वा रावणं पतितं भुवि ॥ ४ ॥
मन्दोदरीमुखाः सर्वाः स्त्रियो रावणपालिताः ।
पतिता रावणस्याग्रे शोचन्त्यः पर्यदेवयन् ॥ ५ ॥
जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत तुमची पुण्यपावन कीर्ती जगात टिकून राहील. जे कोणी माझ्यासहित त्रैलोक्याला पावन करणार्‍या आणि कलीतील दोषांचे हरण करणाऱ्या तुमच्या कथेचे कीर्तन करतील, ते परम गतीला जातील." दरम्यानच्या काळात रावण जमिनीवर मृत होऊन पडलेला आहे असे पाहून, रावणाने ज्यांचे पालन केले होते अशा मंदोदरी इत्यादी रावणाच्या सर्व स्त्रिया रावणाच्या पुढे पडून शोक करू लागल्या. (३-५)

विभीषणः शुशोचार्तः शोकेन महतावृतः ।
पतितो रावणस्याग्रे बहुधा पर्यदेवयत् ॥ ६ ॥
त्या वेळी बिभीषणसुद्धा अतिशय दुःखाने व्याकूळ होऊन रावणाच्या पुढे पडून नाना प्रकारांनी विलाप करू लागला. (६)

रामस्तु लक्ष्मणं प्राह बोधयस्व विभीषणम् ।
करोतु भ्रातृसंस्कारं किं विलम्बेन मानद ॥ ७ ॥
तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणाले, "हे लक्ष्मणा, बिभीषणाला सांग की आता त्याने भावाचे और्ध्वदेहिक संस्कार करावेत. कारण आता विलंब का ? (७)

स्त्रियो मन्दोदरीमुख्याः पतिता विलपन्ति च ।
निवारयतु ताः सर्वा राक्षसी रावणप्रियाः ॥ ८ ॥
रावणाच्या मंदोदरी इत्यादी स्त्रिया रावणापुढे पडून विलाप करीत आहेत. त्यांचे तू निवारण कर." (८)

एवमुक्तोऽथ रामेण लक्ष्मणोऽगाद् विभीषणम् ।
उवाच मृतकोपान्ते पतितं मृतकोपमम् ॥ ९ ॥
रामांनी असे सांगितल्यावर लक्ष्मण बिभीषणाकडे गेला आणि मृत रावणाजवळ मृतवत पडलेल्या बिभीषणाला सांगू लागला. (९)

शोकेन महताविष्टं सौमित्रिरिदमब्रवीत् ।
यं शोचसि त्वं दुःखेन कोऽयं तव विभीषण ॥ १० ॥
अतिशय शोकमग्न झालेल्या बिभीषणाला लक्ष्मण म्हणाला, "अरे बिभीषणा, ज्याच्यासाठी तू दुःखाने शोक करीत आहेस, तो तुझा कोण आहे ? (१०)

त्वं वास्य कतमः सृष्टेः पुरेदानीमतः परम् ।
यद्वत् तोयौघपतिताः सिकता यान्ति तद्वशाः ॥ ११ ॥
संयुज्यन्ते वियुज्यन्ते तथा कालेन देहिनः ।
यथा धानासु वै धाना भवन्ति न भवन्ति च ॥ १२ ॥
एवं भूतेषु भूतानि प्रेरितानीशमायया ।
त्वं चेमे वयमन्ये च तुल्याः कालवशोद्‌भवाः ॥ १३ ॥
जन्म होण्यापूर्वी तू याचा कोण होतास ? आत्ता कोण आहेस ? आणि यानंतरही तू याचा कोण असणार ? ज्या प्रमाणे पाण्याच्या प्रवाहात पडलेले वाळूचे कण हे त्या पाण्याबरोबर एकत्र येतात व पुन्हा वेगळे होतात, त्या प्रमाणे काळाच्या ओघात देहधारी प्राणी एकत्र येतात आणि वियुक्त होतात. ज्या प्रमाणे धान्याच्या बीजापासून धान्याची अन्य बीजे उत्पन्न होतात आणि नष्ट होऊन जातात, त्या प्रमाणे ईश्वराच्या मायेने प्रेरित झालेले प्राणी अन्य प्राण्यांपासून निर्माण होतात आणि नष्ट होऊन जातात. तू ? हे, आम्ही आणि इतर लोकसुद्धा समानपणे काळाला वश होऊन उत्पन्न होत असतात. (११-१३)

जन्ममृत्यु यदा यस्मात् तदा तस्माद्‌भविष्यतः ।
ईश्वरः सर्वभूतानि भूतैः सृजति हन्त्यजः ॥ १४ ॥
आत्मसृष्टैः अस्वतन्‍त्रैः निरपेक्षोऽपि बालवत् ।
देहेन देहिनो जीवा देहाद्देहोऽभिजायते ॥ १५ ॥
बीजादेव यथा बीजं देहान्य एव शाश्वतः ।
देहिदेहविभागोऽयं अविवेककृतः पुरा ॥ १६ ॥
जेव्हा आणि ज्यापासून हे जन्म आणि मृत्यू होणार असतात तेव्हा आणि त्यापासूनच ते होत राहातात. जन्मरहित असा ईश्वर हा मात्र कशाचीही इच्छा नसतानासुद्धा, एखाद्या बालकाप्रमाणे कोणतीही अपेक्षा न धरता स्वतः च निर्माण केलेल्या व स्वतंत्र नसणाऱ्या अशा प्राण्यांचेकडून सर्व प्राणी उत्पन्न करतो. तसेच नष्टही करतो. देहाच्या योगानेच जीव हे देहधारी होतात. ज्या प्रमाणे बीजापासून दुसरे बीज निर्माण होते, त्या प्रमाणे माता-पित्यांच्या देहापासून देह हा उत्पन्न होत असतो. या उलट जीव हा देहापेक्षा वेगळा असून तो नित्य-शाश्वत आहे. खरे सांगायचे तर देहधारी जीव आणि देह असा विभागसुद्धा जोपर्यंत अज्ञानाचा नाश होत नाही, तोपर्यंत अविवेकाने केला गेला आहे. (१४-१६)

नानात्वं जन्म नाशश्च क्षयो वृद्धिः क्रिया फलम् ।
द्रष्टुराभान्त्यतद्धर्मा यथाग्नेर्दारुविक्रियाः ॥ १७ ॥
ज्या प्रमाणे लाकडाचे (लांबी, रुंदी, इत्यादी) गुणधर्म हे मुळात अग्नीचे नसतानाही ते अग्नीमध्ये पाहाणाऱ्या माणसाला अग्नीच्या ठिकाणी भासू लागतात, त्या प्रमाणे देहाचे वेगळेपण, जन्म, नाश, क्षय, वृद्धी, कर्म आणि कर्माचे फळ हे गुणधर्म मुळात जीवाचे नसतानाही ते द्रष्ट्या जीवाचे आहेत, असे भासू लागते. १७

ते इमे देहसंयोगात् आत्मना भान्‍त्यसद्‍ग्रहात् ।
यथा यथा तथा चान्यत् ध्यायतोऽसत्सदाग्रहात् ॥ १८ ॥
ज्या प्रमाणे देहाशी जीवात्म्याचा संयोग झाला असताना, ते देहाचे गुणधर्म चुकीच्या समजुतीमुळे जीवाचे आहेत असे भासू लागते, त्या प्रमाणे सत्य अशा आत्म्याचे ज्ञान झाल्यावर, त्याचे ध्यान करीत राहणाऱ्या माणसाला हे कळून येते की ते देहाचे गुण असत् आहेत. (म्हणजे ते जीवाचे गुण नाहीत, ते जीवापेक्षा वेगळे आहेत.) (१८)

प्रसुप्तस्यानहम्भावात् तदा भाति न संसृति ।
जीवतोऽपि तथा तद्वद् विमुक्तस्यानहङ्‍कृतेः ॥ १९ ॥
झोपेत अहंकाराचा अभाव होत असल्यामुळे झोपलेल्या माणसाला तेव्हा संसार भासत नाही; त्या प्रमाणे अहंकारहित मुक्त पुरुष हा जरी जिवंत असला तरी त्याला प्रपंचाचे भान होत नाही. (१९)

तस्मान्मायामनोधर्मं जह्यहं ममताभ्रमम् ।
रामभद्रे भगवति मनो धेह्यात्मनीश्वरे ॥ २० ॥
सर्वभूतात्मनि परे मायामानुषरूपिणि ।
बाह्येन्द्रियार्थसंबन्धात् त्याजयित्वा मनः शनैः ॥ २१ ॥
म्हणून, हे बिभीषणा, तू अहंता आणि ममता या स्वरूपाचा भ्रम आणि मायेमुळे निर्माण होणारे मनाचे गुणधर्म टाकून दे. बाह्य पदार्थ आणि बाह्य इंद्रिये यांच्याशी असणारा मनाचा संबंध तू हळू हळू सोडून दे आणि स्वतःचा आत्मा सर्वांतर्यामी असे जे परमेश्वर म्हणजेच मायेने मनुष्यरूप धारण केलेले भगवान रामभद्र आहेत, त्यांच्या ठिकाणी तू तुझे मन हळू हळू स्थिर कर. (२०-२१)

तत्र दोषान्दर्शयित्वा रामानन्दे नियोजय ।
देहबुद्ध्या भवेद्‌भ्राता पिता माता सुहृत्प्रियः ॥ २२ ॥
बाह्य विषयांत दोष आहेत, हे मनाला दाखवून देऊन, ते मन तू रामांच्या स्वरूपभूत अशा आनंदात मग्न कर. मी म्हणजे आत्मा हा देह आहे या बुद्धीमुळेच माणसाच्या बाबतीत भाऊ, बाप, आई, मित्र किंवा प्रिय माणूस अशी ही नाती निर्माण होतात. (२२)

विलक्षणं यदा देहात् जानात्यात्मानमात्मना ।
तदा कः कस्य वा बन्धुः भ्राता माता पिता सुहृत् ॥ २३ ॥
देहापेक्षा आत्मा वेगळा आहे, असे जेव्हा एखादा मनुष्य मनाने जाणतो, तेव्हा कोण कुणाचा भाऊ, आई, बाप अथवा मित्र असू शकेल ? (२३)

मिथ्याज्ञानवशाज्जाता दारागारादयः सदा ।
शब्दादयश्च विषया विविधाश्चैव सम्पदः ॥ २४ ॥
मिथ्या ज्ञानामुळे माणसाच्या बाबतीत पत्नी, घर, शब्द इत्यादी विषय आणि नानाप्रकारची वैभवे ही सदा उत्पन्न होतात. (२४)

बलं कोशो भृत्यवर्गो राज्यं भूमिः सुतादयः ।
अज्ञानजत्वात् सर्वे ते क्षणसङ्‌गमभङ्‌गुराः ॥ २५ ॥
सैन्य, खजिना, सेवकवर्ग, राज्य, भूमी, पुत्र इत्यादी हे सर्व अज्ञानापासूनच उत्पन्न होत असल्याने, त्यांच्याशी होणारा संयोग हा क्षणभर टिकणारा असतो आणि ते सर्व नाशवंत आहेत. (२५)

अथोत्तिष्ठ हृदा रामं भावयन् भक्तिभावितम् ।
अनुवर्तस्व राज्यादि भुञ्जन् प्रारब्धमन्वहम् ॥ २६ ॥
म्हणून आता तू ऊठ. भक्तीने मनात चिंतन केलेल्या रामांचे ध्यान करीत आणि नेहमी प्रारब्धाचा भोग घेत, राज्य इत्यादींचे पालन कर. (२६)

भूतं भविष्यदभजन् वर्तमानमथाचरन् ।
विहरस्व यथान्यायन् भवदोषैर्न लिप्यसे ॥ २७ ॥
भूत आणि भविष्य यांची चिंता न करता, केवळ वर्तमानकाळाचा विचार करून वाग. असे केल्याने तू संसारातील दोषांनी लिप्त होणार नाहीस. (२७)

आज्ञापयति रामस्त्वां यद्‌भ्रातुः साम्परायिकम् ।
तत्कुरुष्व यथाशास्त्रं रुदतीश्चापि योषितः ॥ २८ ॥
निवारय महाबुद्धे लङ्‌कां गच्छन्तु मा चिरम् ।
श्रुत्वा यथावद्वचनं लक्ष्मणस्य विभीषणः ॥ २९ ॥
त्यक्‍त्वा शोकं च मोहं च रामपार्श्वमुपागमत् ।
विमृश्य बुद्ध्या धर्मज्ञो धर्मार्थसहितं वचः ॥ ३० ॥
रामस्यैवानुवृत्त्यर्थं उत्तरं पर्यभाषत ।
नृशंसं अनृतं क्रूरं त्यक्तधर्मव्रतं प्रभो ॥ ३१ ॥
नार्होऽस्मि देव संस्कर्तुं परदाराभिमर्शिनम् ।
श्रुत्वा तद्वचनं प्रीतो रामो वचनमब्रवीत् ॥ ३२ ॥
श्रीराम तुला आज्ञा करीत आहेत की भावाचे जे काही और्ध्वदेहिक कार्य करावयाचे आहे, ते तू यथाशास्त्र कर. अतिशय विलाप करणाऱ्या (राक्षस) स्त्रियांचे सांत्वन कर. हे महाबुद्धिमंता, त्यांना लंकेत परत जाऊ दे. उशीर करू नको." लक्ष्मणाचे हे यथार्थ वचन ऐकल्यावर बिभीषणाने शोक आणि मोह टाकून दिले आणि तो रामांजवळ गेला. धर्म जाणणाऱ्या बिभीषणाने धर्म आणि अर्थ यांनी युक्त असणाऱ्या रामांच्या वचनाचा स्वतःच्या बुद्धीने नीट विचार केला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यासाठी त्याने धर्म व अर्थ यांनी युक्त असे उत्तर दिले, "हे प्रभो, दुष्ट, खोटारडा, क्रूर, धर्माचरणाचा त्याग करणारा आणि परस्त्रीचे ठिकाणी आसक्त असणारा असा रावण होता. हे देवा, मी त्याचे और्ध्वदेहिक संस्कार करणे हे योग्य नाही." त्याचे वचन ऐकल्यावर, प्रसन्न राम असे म्हणाले. (२८-३२)

मरणान्तानि वैराणि निवृतं नः प्रयोजनम् ।
क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव ॥ ३३ ॥
'वैर हे मरणापर्यंतच असते. आपले प्रयोजन तर आता पुरे झाले आहे. जसा हा रावण तुझा होता, तसाच तो माझाही होता. तेव्हा याचा और्ध्वदेहिकसंस्कार तू कर." (३३)

रामाज्ञां शिरसा धृत्वा शीघ्रमेव विभीषणः ।
सान्त्ववाक्यैर्महाबुद्धिं राज्ञीं मन्दोदरीं तदा ॥ ३४ ॥
सान्त्वयामास धर्मात्मा धर्मबुद्धिर्विभीषणः ।
त्वरयामास धर्मज्ञः संस्कारार्थं स्वबान्धवान् ॥ ३५ ॥
रामांची आज्ञा शिरोधार्य माजून, बिभीषणाने ताबडतोब त्या वेळी महाबुद्धिमान् अशा राणी मंदोदरीचे सांत्वन केले. नंतर धर्मात्मा, धर्मबुद्धी आणि धर्मज्ञ अशा बिभीषणाने रावणाचे और्ध्वदेहिक संस्कार करण्यासाठी आपल्या बांधवांना त्वरा करण्यास सांगितले. (३४-३५)

चित्यां निवेश्य विधिवत् पितृमेधविधानतः ।
अहिताग्नेर्यथा कार्यं रावणस्य विभीषणः ॥ ३६ ॥
तथैव सर्वमकरोत् बन्धुभिः सह मंत्रिभिः ।
ददौ च पावकं तस्य विधियुक्तं विभीषणः ॥ ३७ ॥
पितृयज्ञाच्या विधीला अनुसरून विधिपूर्वक रावणाचे प्रेत चितेवर ठेवून आहिताग्नी-पुरुषाप्रमाणेच रावणाचे सर्व संस्कार बिभीषणाने आपले नातेवाईक व मंत्री यांच्यासह पार पाडले. त्यानंतर बिभीषणाने विधिवत रावणाच्या शवाला अग्नी दिला. (३६-३७)

स्नात्वा चैवार्द्रवस्त्रेण तिलान्दर्भाभिमिश्रितान् ।
उदकेन च सम्मिश्रान् प्रदाय विधिपूर्वकम् ॥ ३८ ॥
नंतर स्नान करून, ओल्या वस्त्राने, बिभीषणाने दर्भमिश्रित तिळ पाण्यात मिसळून ते विधिपूर्वक रावणाला दिले. (३८)

प्रदाय चोदकं तस्मै मुर्ध्ना चैनं प्रणम्य च ।
ताः स्त्रियोऽनुनयामास सान्त्वं उक्‍त्वा पुनः पुनः ॥ ३९ ॥
आणि त्याला नमस्कार केला. त्यानंतर पुनः पुनः सांत्वनपर शब्दांनी स्त्रियांचे समाधान केले. (३९)

गम्यतामिति ताः सर्वा विविशुर्नगरं तदा ।
प्रविष्टासु च सर्वासु राक्षसीषु विभीषणः ॥ ४० ॥
रामपार्श्वमुपागत्य तदातिष्ठत् विनीतवत् ।
रामोऽपि सह सैन्येन ससुग्रीवः सलक्ष्मणः ॥ ४१ ॥
हर्षं लेभे रिपून्हत्वा यथा वृत्रं शतक्रतुः ।
मातलिश्च तदा रामं परिक्रम्य आभिवन्द्य च ॥ ४२ ॥
अनुज्ञातश्च रामेण ययौ स्वर्गं विहायसा ।
ततो हृष्टमना रामो लक्ष्मणं चेदमब्रवीत् ॥ ४३ ॥
तो म्हणाला, "आता तुम्ही जा." तेव्हा त्या सर्व स्त्रिया लंकेत गेल्या. नंतर बिभीषण रामांजवळ येऊन नम्रपणाने उभा राहिला. वृत्रासुराचा वध केल्यावर इंद्राला ज्या प्रमाणे आनंद झाला होता, त्या प्रमाणे शत्रूंचा वध केल्यावर वानर सैन्य, सुग्रीव आणि लक्ष्मण यांच्यासह रामांनासुद्धा हर्ष झाला. त्यानंतर प्रदक्षिणा व त्यांना अभिवादन करून आणि त्यांची अनुज्ञा घेऊन, मातली आकाशमार्गाने स्वर्गाला परत गेला. नंतर आनंदित मनाने राम लक्ष्मणाला म्हणाले. (४०-४३)

विभीषणाय मे लङ्‍का-राज्यं दत्तं पुरैव हि ।
इदानीमपि गत्वा त्वं लङ्‍कामध्ये विभीषणम् ॥ ४४ ॥
अभिषेचय विप्रैश्च मन्‍त्रवद् विधिपूर्वकम् ।
इत्युक्तो लक्ष्मणस्तूर्णं जगाम सह वानरैः ॥ ४५ ॥
लङ्‌कां सुवर्णकलशैः समुद्रजलसंयुतैः ।
अभिषेकं शुभं चक्रे राक्षसेन्द्रस्य धीमतः ॥ ४६ ॥
"मी अगोदरच लंकेचे राज्य बिभीषणाला दिले आहे, तरी आता तू लंकेमध्ये जाऊन, ब्राह्मणांचे द्वारा मंत्रपूर्वक विधिवत बिभीषणावर अभिषेक करवून घे." रामांनी असे म्हटल्यावर, लक्ष्मण लगेच वानरासह लंकापुरीत गेला आणि समुद्राच्या पाण्यांनी भरलेल्या सुवर्ण कलशांनी त्याने बुद्धिमान राक्षसश्रेष्ठ अशा बिभीषणाला मंगलमय अभिषेक केला. (४४-४६)

ततः पौरजनैः सार्धं नानोपायनपाणिभिः ।
विभीषणः ससौमित्रिः उपायनपुरस्कृतः ॥ ४७ ॥
दण्डप्रणामं अकरोद् रामस्याक्लिष्टकर्मणः ।
रामो विभीषणं दृष्ट्वा प्राप्तराज्यं मुदान्वितः ॥ ४८ ॥
कृतकृत्यमिवात्मानं अमन्यत सहानुजः ।
सुग्रीवं च समालिङ्‌ग्य रामो वाक्यमथाब्रवीत् ॥ ४९ ॥
त्यानंतर नाना प्रकारचे नजराणे घेतलेल्या नगरवासी लोकांसह, अनेक भेटवस्तू घेऊन, लक्ष्मणासह बिभीषण रामांजवळ आला आणि त्याने विनासायास कर्म करणाऱ्या रामांना दंडवत प्रणाम केला. बिभीषणाला राज्य प्राप्त झाले हे पाहून राम आनंदित झाले आणि लक्ष्मणासह ते स्वतःला कृतकृत्य मानू लागले. त्यानंतर सुग्रीवाला आलिंगन देऊन राम त्याला म्हणाले. (४७-४९)

सहायेन त्वया वीर जितो मे रावणो महान् ।
विभीषणोऽपि लङ्‌कायां अभिषिक्तो मयानघ ॥ ५० ॥
"हे वीरा, तुझ्या साहाय्याने मी महान रावणाला जिंकले आहे, आणि हे निष्पापा, मी बिभीषणालासुद्धा लंकेच्या राज्यावर अभिषिक्त केले आहे." (५०)

ततः प्राह हनूमन्तं पार्श्वस्थं विनयान्वितम् ।
विभीषणस्यानुमतेः गच्छ त्वं रावणालयम् ॥ ५१ ॥
त्यानंतर विनयपूर्वक जवळच उभ्या असणाऱ्या हनुमंताला राम म्हणाले, 'बिभीषणाची अनुमती घेऊन तू आता रावणाच्या प्रासादात जा. (५१)

जानक्यै सर्वमाख्याहि रावणस्य वधादिकम् ।
जानक्याः प्रतिवाक्यं मे शीघ्रमेव निवेदय ॥ ५२ ॥
आणि रावणाचा वध झाला इत्यादी सर्व वृत्तांत जानकीला निवेदन कर. मग जानकी जे प्रत्युतर देईल ते तू लौकरच परत येऊन मला सांग." (५२)

एवमाज्ञापितो धीमान् रामेण पवनात्मजः ।
प्रविवेश पुरीं लङ्‌कां पूज्यमानो निशाचरैः ॥ ५३ ॥
अशा प्रकारे रामांकडून आज्ञा मिळाल्यावर बुद्धिमान हनुमान राक्षसांकडून सन्मानित होत लंकापुरीत प्रविष्ट झाला. (५३)

प्रविश्य रावणगृहं शिंशपा-मूलमाश्रिताम् ।
ददर्श जानकीं तत्र कृशां दीनां अनिन्दिताम् ॥ ५४ ॥
राक्षसीभिः परिवृतां ध्यायन्तीं राममेव हि ।
विनयावनतो भूत्वा प्रणम्य पवनात्मजः ॥ ५५ ॥
कृताञ्जलिपुटो भूत्वा प्रह्वो भक्त्याग्रतःस्थितः ।
तं दृष्ट्वा जानकी तूष्णीं स्थित्वा पूर्वस्मृतिं ययौ ॥ ५६ ॥
मग रावणाच्या प्रासादात प्रवेश केल्यावर, अशोक वृक्षाच्या मुळाचा आश्रय घेतलेली, कृश, दीन, स्तुत्य, राक्षस स्त्रियांनी वेढलेली आणि रामाचेच ध्यान करीत असणारी जानकी त्याला दिसली. विनयाने नम्र होऊन, पवनसुताने तिला प्रणाम केला. नम्र होऊन व भक्तीने हात जोडून तो तिच्यापुढे उभा राहिला. त्याला पाहिल्यावर, जानकी काही काळ गप्प बसली आणि नंतर तिला पूर्वीची आठवण झाली. (५४-५६)

ज्ञात्वा तं रामदूतं सा हर्षात्सौम्यमुखी बभौ ।
स तां सौम्यमुखीं दृष्ट्वा तस्यै पवननन्दनः ।
रामस्य भाषितं सर्वं आख्यातुमुपचक्रमे ॥ ५७ ॥
तो रामांचा दूत आहे हे लक्षात आल्यावर, ती आनंदाने प्रसन्नमुखाने शोभू लागली. तिचे मुख प्रसन्न झाले आहे हे पाहून, पवनसुत रामाचा निरोप तिला सांगू लागला. (५७)

देवि रामः ससुग्रीवो विभीषणसहायवान् ।
कुशली वानराणां च सैन्यैश्च सहलक्ष्मणः ॥ ५८ ॥
मारुती म्हणाला- "हे देवी, सुग्रीव, बिभीषण आणि लक्ष्मण यांच्या आणि वानरांच्या सैन्यासह श्रीराम कुशल आहेत. (५८)

रावणं ससुतं हत्वा सबलं सह मंत्रिभिः ।
त्वामाह कुशलं रामो राज्ये कृत्वा विभीषणम् ॥ ५९ ॥
पुत्र, सेना आणि मंत्री यांच्यासह रावणाचा वध करून आणि बिभीषणाला लंकेच्या राज्यावर बसवून, रामांनी तुला आता आपली खुशाली सांगितली आहे." (५९)

श्रुत्वा भर्तुः प्रियं वाक्यं हर्षगद्‍गदया गिरी ।
किं ते प्रियं करोम्यद्य न पश्यामि जगत्‍त्रये ॥ ६० ॥
समं ते प्रियवाक्यस्य रत्‍नानि आभरणानि च ।
एवमुक्तस्तु वैदेह्या प्रत्युवाच प्लवङ्‌गमः ॥ ६१ ॥
आपल्या पतीचा हा प्रिय निरोप ऐकल्यावर, आनंदाने सद्‌गदित झालेल्या वाणीने सीता म्हणाली, "अरे वत्सा, मी तुझे कोणते प्रिय करू ? तुझ्या गोड शब्दांच्या सारखी या तिन्ही लोकांत कोणतीही रत्ने, आभूषणे मला आज दिसत नाहीत." असे वैदेहीने म्हटल्यावर हनुमान तिला म्हणाला. (६०-६१)

रत्‍नौघाद्विविधाद्वापि देवराज्याद्विशिष्यते ।
हतशत्रुं विजयिनं रामं पश्यामि सुस्थिरम् ॥ ६२ ॥
"माते, विजयाने प्रसन्न झालेल्या श्रीरामांना पाहणे, हे मला नाना प्रकारच्या रत्नराशींपेक्षा आणि देवांच्या राज्यापेक्षा महत्त्वाचे वाटते." (६२)

तस्य तद्वचनं श्रुत्वा मैथिली प्राह मारुतिम् ।
सर्वे सौम्या गुणाः सौम्य त्वय्येव परिनिष्ठिताः ॥ ६३ ॥
त्याचे ते वचन ऐकल्यावर मैथिली मारुतीला म्हणाली, "हे वत्सा, सर्व उत्तम गुण तुझ्याच ठिकाणी एकवटून राहिले आहेत. (६३)

रामं द्रक्ष्यामि शीघ्रं मामाज्ञापयतु राघवः ।
तथेति तां नमस्कृत्य ययौ द्रष्टुं रघूत्तमम् ॥ ६४ ॥
आता मला रामांना लवकर पाहावयाचे आहे. रामांनी मला तत्काळ तशी आज्ञा द्यावी." "ठीक आहे", असे म्हणून व तिला नमस्कार करून मारुती हा रघूत्तमांना भेटण्यास परत गेला. (६४)

जानक्या भाषितं सर्वं रामस्याग्रे न्यवेदयत् ।
यन्निमित्तोऽयमारम्भः कर्मणां च फलोदयः ॥ ६५ ॥
तां देवीं शोकसन्तप्तां द्रष्टुमर्हसि मैथिलीम् ।
एवमुक्तो हनुमता रामो ज्ञानवतां वरः ॥ ६६ ॥
मायासीतां परित्यक्तुं जानकीं अनले स्थिताम् ।
आदातुं मनसा ध्यात्वा रामः प्राह विभीषणम् ॥ ६७ ॥
जानकीचे सर्व भाषण त्याने रामांपुढे निवेदन केले. तो म्हणाला, "हे भगवन्, जिच्यासाठी युद्ध इत्यादीचा आटापिटा केला होता आणि जी या सर्व कर्माची फलस्वरूप आहे, त्या शोकसंतप्त देवी मैथिलीला आता तुम्ही भेटणे योग्य होईल." हनुमानाने असे म्हटल्यावर, मायासीतेचा त्याग करण्याचा आणि अग्नीत स्थित असणाऱ्या खऱ्या जानकीचा स्वीकार करण्याचा, ज्ञानी श्रेष्ठ अशा रामांनी मनात विचार केला आणि मग ते बिभीषणाला म्हणाले. (६५-६७)

गच्छ राजन् जनकजां आनयाशु ममान्तिकम् ।
स्नातां विरजवस्त्राढ्यां सर्वाभरणभूषिताम् ॥ ६८ ॥
"हे राजा बिभीषणा, तू आता जा, आणि स्नान घालून, निर्मल वस्त्रे परिधान केलेल्या आणि सर्व अलंकारांनी विभूषित केलेल्या अशा जानकीला त्वरित माझ्याजवळ घेऊन ये." (६८)

विभीषणोऽपि तच्छ्रुत्वा जगाम सहमारुतिः ।
राक्षसीभिः सुवृद्धाभिः स्नापयित्वा तु मैथिलीम् ॥ ६९ ॥
सर्वाभरणसम्पन्नां आरोप्य शिबिकोत्तमे ।
याष्टीकैः बहुभिर्गुप्तां कञ्चुकोष्णीषिभिः शुभाम् ॥ ७० ॥
ते रामांचे वचन ऐकल्यावर, बिभीषण मारुतीसह गेला. मग वृद्ध अशा राक्षस स्त्रियांकडून मैथिलीला स्नान घालून आणि तिला वस्त्रालंकारांनी विभूषित करून, एका उत्तम पालखीत बसविण्यात आले. अंगरखे आणि मंदिल घातलेले पुष्कळ चोपदार, भालदार त्या पवित्र सीतेचे रक्षण करीत होते. (६९-७०)

तां द्रष्टुमागताः सर्वे वानरा जनकात्मजाम् ।
तान्वारयन्तो बहवः सर्वतो वेत्रपाणयः ॥ ७१ ॥
कोलाहलं प्रकुर्वन्तो रामपार्श्वमुपाययुः ।
दृष्ट्वा तां शिबिकारूढां दूरादथ रघूत्तमः ॥ ७२ ॥
विभीषण किमर्थं ते वानरान् वारयन्ति हि ।
पश्यन्तु वानराः सर्वे मैथिलीं मातरं यथा ॥ ७३ ॥
त्या वेळी जनककन्येला पाहाण्यास सर्व वानर एकत्र जमले. त्यांना सर्व बाजूंनी रोखत आणि 'बाजूला व्हा, बाजूला व्हा' असा कोलाहल करीत ते अनेक वेत्रधारी भालदार रामा जवळ आले. मग पालखीत बसलेल्या सीतेला दूरूनच पाहून रघूत्तम बिभीषणाला म्हणाले, "बिभीषणा, हे वेत्रधारी भालदार वानरांना का बरे बाजूला करीत आहेत ? आईप्रमाणे असणाऱ्या मैथिलीला सर्व वानरांना पाहू दे. (७१-७३)

पादचारेण सायातु जानकी मम सन्निधिम् ।
श्रुत्वा तद्‍रामवचनं शिबिकाद् अवरुह्य सा ॥ ७४ ॥
पादचारेण शनकैः आगता रामसन्निधिम् ।
रामोऽपि दृष्ट्वा तां माया-सीतां कार्यार्थिनिर्मिताम् ॥ ७५ ॥
अवाच्यवादन्बहुशः प्राह तां रघुनन्दनः ।
अमृष्यमाणा सा सीता वचनं राघवोदितम् ॥ ७६ ॥
लक्ष्मणं प्राह मे शीघ्रं प्रज्वालय हुताशनम् ।
विश्वासार्थं हि रामस्य लोकानां प्रत्यवाय च ॥ ७७ ॥
आणि जानकी पायी चालत माझ्याजवळ येऊ दे." ते रामांचे वचन ऐकल्यावर, ती पालखीतून खाली उतरून सावकाशपणे पायी चालत रामांजवळ आली. मग विशिष्ट कार्यासाठी निर्मिलेल्या त्या मायासीतेला पाहून, तिच्याविषयी बोलू नयेत असे अनेक शब्द रघुनंदन बोलू लागले. राघवांनी उच्चारले े शब्द सहन न होऊन, सीता लक्ष्मणाला म्हणाली, " रामांचा विश्वास बसावा आणि लोकांची खात्री पटावी यासाठी तू माझ्याकरिता अग्नी प्रज्वलित कर (म्हणजे मी अग्निदिव्य करून माझे पावित्र्य सिद्ध करीन.)" (७४-७७)

राघवस्य मतं ज्ञात्वा लक्ष्मणोऽपि तदैव हि ।
महाकाष्ठचयं कृत्वा ज्वालयित्वा हुताशनम् ॥ ७८ ॥
रामपार्श्वं उपागम्य तस्थौ तूष्णीमरिन्दमः ।
ततः सीता परिक्रम्य राघवं भक्तिसंयुता ॥ ७९ ॥
पश्यतां सर्वलोकानां देवराक्षसयोषिताम् ।
प्रणम्य देवताभ्यश्च ब्राह्मणेभ्यश्च मैथिली ॥ ८० ॥
बद्धाञ्जलिपुटा चेदं उवाचाग्निसमीपगा ।
यथा मे हृदयं नित्यं नापसर्पति राघवात् ॥ ८१ ॥
तथा लोकस्य साक्षी मां सर्वतः पातु पावकः ।
एवमुक्‍त्वा तदा सीता परिक्रम्य हुताशनम् ॥ ८२ ॥
विवेश ज्वलनं दीप्तं निर्भयेन हृदा सती ॥ ८३ ॥
सीतेच्या या बोलण्याला राघवांची संमती आहे हे पाहून शत्रूचे दमन करणाऱ्या लक्ष्मणाने तत्काळ लाकडांची मोठी रास रचली आणि तेथे अग्नी प्रज्वलित करून, तो रामांजवळ जाऊन उभा राहिला. तेव्हा भक्तीने युक्त असणाऱ्या सीतेने राघवांना प्रदक्षिणा घातल्या. नंतर सर्व लोक, देव, आणि राक्षस स्त्रिया पाहात असतानाच देवतांना आणि ब्राह्मणांना नमस्कार करून, सीता अग्नीजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली, "जर माझे मन राघवांना सोडून कधीही अन्यत्र कुठे गेले नसेल तर लोकांचा साक्षी असणारा अग्नी माझे सर्वप्रकारे रक्षण करो." असे बोलून सीतेने अग्नीला प्रदक्षिणा घातली आणि निर्भय चित्ताने पतिव्रता सीतेने त्या प्रज्वलित अग्नीमध्ये प्रवेश केला. (७८-८३)

दृष्ट्वा ततो भूतगणाः ससिद्धाः
    सीतां महावह्निगतां भृशार्ताः ।
परस्परं प्राहुरहो स सीतां
    रामं श्रियं स्वां कथमत्यजज्ज्ञः ॥ ८४ ॥
त्या पेटलेल्या प्रचंड अग्नीत सीता प्रविष्ट झाली आहे, हे पाहून सिद्धांसह भूतगण दुःखाने अतिशय व्याकूळ झाले. ते एकमेकांना म्हणू लागले, "अहो, राम इतके ज्ञानी असूनही स्वतःची लक्ष्मी असलेल्या सीतेचा त्याग त्यांनी का बरे केला असेल ? " (८४)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
युद्धकाण्डे द्वादशः सर्गः ॥ १२ ॥
इति श्रीमद्‌अध्याल्परामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे द्वादशः सर्गः ॥ १२ ॥


GO TOP