श्रीमद् वाल्मीकि रामायणे

श्रीमद् वाल्मिकीय रामायण माहात्म्यम्

| द्वितीयोध्यायः |

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
नारद-सनत्कुमार संवादः सुदासापरनाम्नः सोमदत्तस्य ब्राह्मणस्य राक्षसत्वप्राप्ती, रामायणकथाश्रवणेन तस्योद्धारश्च -
नारद-सनत्कुमार संवाद, सुदास अथवा सोमदत्त नामक ब्राह्मणास राक्षस योनिची प्राप्ति आणि रामायण कथेच्या श्रवणद्वारा त्याचा उद्धार -
ऋषयः ऊचुः -
कथं सनत्कुमाराय देवर्षिर्नारदो मुनिः ।
प्रोक्तवान् सकलान् धर्मान् कथं तौ मिलितावुभौ ॥ १

कस्मिन् क्षेत्रे स्थितौ तात तावुभौ ब्रह्मवादिनौ ।
यदुक्तं नारदेनास्मै तत् त्वं ब्रूहि महामुने ॥ २

ऋषिंनी विचारले - 'महामुनि ! देवर्षि नारदमुनिंनी सनत्कुमारांना रामायण संबंधी संपूर्ण धर्मांचे कुठल्या प्रकारे वर्णन केले होते ? त्या दोन ब्रह्मवादी महात्म्यांची भेट कुठल्या क्षेत्रात झाली ? तात ! ते दोघेही कोठे थांबले होते ? नारदांनी त्यांना जे काही सांगितले ते सर्व आपण आम्हाला सांगावे. ॥ १-२ ॥
सूत उवाच -
सनकाद्या महात्मानो ब्रह्मणस्तनयाः स्मृताः ।
निर्ममा निरहंकारा सर्वे ते ह्यूर्ध्वरेतसः ॥ ३

सूत म्हणाले - 'मुनिवरांनो ! सनकादि महात्मा भगवान् ब्रह्मदेवांचे पुत्र मानले गेले आहेत. त्यांच्या ठिकाणी ममता आणि अहंकाराचे तर नावही नाही. ते सर्वच्या सर्व ऊर्ध्वरेता (नैष्ठिक ब्रह्मचारी) आहेत. ॥ ३ ॥
तेषां नामानि वक्ष्यामि सनकश्च सनन्दनः ।
सनत्कुमारश्च तथा सनातन इति स्मृतः ॥ ४

मी तुम्हाला त्यांची नावे सांगतो. ऐका - सनक, सनंदन, सनत्कुमार आणि सनातन - या चौघांनाही सनकादि असे मानले जाते. ॥ ४ ॥
विष्णुभक्ता महात्मानो ब्रह्मध्यानपरायणाः ।
सहस्रसूर्यसंकाशाः सत्यवन्तो मुमुक्षवः ॥ ५

ते भगवान् विष्णूंचे भक्त आहेत, महात्मा आहेत. सदा ब्रह्मचिंतनात मग्न असतात. अत्यंत सत्यवादी आहेत. सहस्र सूर्यांच्या प्रमाणे तेजस्वी आणि मोक्षाचे अभिलाषी आहेत. ॥ ५ ॥
एकदा ब्रह्मणः पुत्राः सनकाद्या महौजसः ।
मेरुश्रृङ्‍गे समाजग्मुः वीक्षितुं ब्रह्मणः सभाम् ॥ ६

एकदा ते महातेजस्वी सनकादि ब्रह्मपुत्र ब्रह्मदेवांची सभा पाहण्यासाठी मेरु पर्वताच्या शिखरावर गेले. ॥ ६ ॥
तत्र गङ्‍गां महापुण्यां विष्णुपादोद्‌भवां नदीम् ।
निरीक्ष्य स्नातुमुद्युक्ताः सीताख्यां प्रथितौजसः ॥ ७

तेथे भगवान् विष्णुंच्या चरणांपासून प्रकट झालेली परम पुण्यमय गंगानदी, जिला सीताही म्हणतात, वाहात होती. तिचे दर्शन करून ते तेजस्वी महात्मा लोक तिच्या जलात स्नान करण्यासाठी उद्यत झाले. ॥ ७ ॥
एतस्मिन् अंतरे विप्रा देवर्षिनारदो मुनिः ।
अजगामोच्चरन् नाम हरेर्नारायणादिकम् ॥ ८

'ब्राह्मणांनो ! इतक्यातच देवर्षि नारदमुनि भगवंताच्या नारायणादि नामांचे उच्चारण करीत तेथे येऊन पोहोचले. ॥ ८ ॥
नारायणाचुतानन्त वासुदेव जनार्दन ।
यज्ञेश जज्ञ्पुरुष राम विष्णो नमोऽस्तु ते ॥ ९

इत्युच्चरन् हरेर्नाम पावयन् अखिलं जगत् ।
आजगाम स्तुवन् गङ्गां मुनिर्लोकैकपावनीम् ॥ १०

'ते 'नारायण ! अच्युत ! अनंत ! वासुदेव ! जनार्दन ! यज्ञेश ! यज्ञपुरुष ! राम ! विष्णो ! आपल्याला नमस्कार असो' यप्रकारे भगवन्नामाचे उच्चारण करीत सर्व जगाला पवित्र करीत आणि एकमात्र लोकपावनी गंगेची स्तुति करीत तेथे आले. ॥ ९-१० ॥
अथयान्तं समुद्‌वीक्ष्य सनकाद्या महौजसः ।
यथार्हमर्हणं चक्रुः ववन्दे सोऽपि तान् मुनीन् ॥ ११

त्यांना येताना पाहून महातेजस्वी सनकादि मुनिंनी त्यांची यथोचित पूजा केली आणि नारदांनीही त्या मुनिंप्रति मस्तक नमविले. ॥ ११ ॥
अथ तत्र सभामध्ये नारायणपरायणम् ।
सनत्कुमारः प्रोवाच नारदं मुनिपुङ्गवम् ॥ १२

त्या नंतर त्या मुनिंच्या सभेत सनत्कुमारांनी भगवान् नारायणाचे परम भक्त मुनिवर नारद यांना या प्रकारे म्हटले - ॥ १२ ॥
सनत्कुमार उवाच -
सर्वज्ञोऽसि महाप्राज्ञ मुनीशानां च नारद ।
हरिभक्तिपरो यस्मात् त्वत्तो नास्त्यपरोऽधिकः ॥ १३

सनत्कुमार म्हणाले -
"महाप्राज्ञ नारदमुनि ! आपण समस्त मुनिश्वरांमध्ये सर्वज्ञ आहात. अपण सदा श्रीहरिच्या भक्तिमध्ये तत्पर असता, म्हणून आपल्याहून श्रेष्ठ दुसरा कोणी नाही. ॥ १३ ॥
येनेदं अखिलं जातं जगत् स्थावरजङ्गमम् ।
गङ्गा पादोद्‌भवा यस्य कथं स ज्ञायते हरिः ॥ १४

अनुग्रह्योऽस्मि यदि ते तत्त्वतो वक्तुमर्हसि ।

म्हणून मी विचारतो की, ज्यांच्यापासून चराचर जगताची उत्पत्ति झाली, तसेच ही गंगा ज्यांच्या चरणापासून प्रकट झाली, त्या श्रीहरिच्या स्वरूपाचे ज्ञान कसे होते ? जर आपली आमच्यावर कृपा असेल तर आमच्या या प्रश्नाचे यथार्थरूपाने आपण विवेचन करावे. ॥ १४ १/२ ॥
नारद उवाच -
नमः पराय देवाय परात्परतराय च ॥ १५
परात्परनिवासाय सगुणायागुणाय च ।

नारद म्हणाले -
" जे पराहूनही परतर आहेत, त्या परमदेव श्रीरामास नमस्कार असो. ज्यांचे निवासस्थान (परमधाम) उत्कृष्टाहूनही उत्कृष्ट आहे,आणि जे सगुण आणि निर्गुणरूपही आहेत, त्या श्रीरामास माझा नमस्कार असो. ॥ १५ १/२ ॥
ज्ञानाज्ञानस्वरूपाय धर्माधर्मस्वरूपिणे ॥ १६
विद्या अविद्या स्वरूपाय स्वरूपाय ते नमः ।

'ज्ञान-अज्ञान, धर्म-अधर्म, विद्या आणि अविद्या ही सर्व ज्याचे स्वतःचेच स्वरूप आहे आणि जो सर्वांचा आत्मरूप आहे त्या परमेश्वरास नमस्कार असो. ॥ १६ १/२ ॥
योदैत्यहन्ता नरकन्तकश्च
भुजाग्रमात्रेण च धर्मगोप्ता ॥ १७

भूभारसन्घात विनोदकामं
नमामि देवं रघुवंशदीपम्

'जे दैत्यांचा विनाश आणि नरकाचा अंत करणारे आहेत, जे आपल्या हाताच्या केवळ संकेताने अथवा आपल्या भुजांच्या बळावर धर्माचे रक्षण करतात, पृथ्वीच्या भाराचा विनाश करणे ज्यांचे केवळ मनोरंजनमात्र आहे, आणि जे मनोरंजनाची सदा अभिलाषा बाळगतात, त्या रघुकुलदीपक श्रीरामदेवास मी नमस्कार करतो. ॥ १७ १/२ ॥
आविर्भूतश्चतुर्द्धा यः कपिभिः परिवारितः ॥ १८
हतवान् राक्षसानीकं रामं दाशरथिं भजे ।

'जे एक असूनही चार रूपामध्ये अवतीर्ण होतात, ज्यांनी वानरांना बरोबर घेऊन राक्षस सैन्याचा संहार केला आहे, त्या दशरथनंदन श्रीरामांचे मी भजन करतो. ॥ १८ १/२ ॥
एवमादीन्यनेकानि चरितानि महात्मनः ॥ १९
तेषां नामानि संख्यातुं शक्यन्ते नाब्दकोटिभिः ।

'भगवान् श्रीरामांची अशी अनेकानेक चरित्रे आहेत. त्यांची नावे कोट्यावधी वर्षातही गणली जाऊ शकणार नाहीत. ॥ १९ १/२
महिमानं तु यन्नाम्नः पारं गन्तुं न शक्यते ॥ २०
मनुभिश्च मुनीन्द्रैश्च कथं तं क्षुल्लको भजेत्

ज्यांच्या नामाच्या महिम्याचा पार मनु आणि मुनीश्वर यांनाली लागत नाही, तेथे माझ्या सारख्या क्षुद्र जीवाचा निभाव कसा लागू शकेल ? ॥ २० १/२ ॥
यन्नाम्नः स्मरणेनापि महापातकिनोऽपि ये ॥ २१
पावनत्वं प्रपद्यन्ते कथं स्तोष्यामि क्षुल्लधीः ।

'ज्यांचे नामाच्या केवळ स्मरणाने मोठमोठे पातकीही पावन बनून जातात, त्या परमात्म्याचे स्तवन माझ्या सारख्या तुच्छ बुद्धी असलेला प्राणी कसे करू शकेल ? ॥ २१ १/२ ॥
रामायणपरा ये तु घोरे कलियुगे द्विजाः ॥ २२
त एव कृतकृत्याश्च तेषां नित्यं नमोऽस्तु ते ।

जे द्विज घोर कलियुगात रामायण-कथेचा आश्रय घेतात, तेच कृतकृत्य आहेत. त्यांच्याप्रति तुम्ही सदा नमस्कार केला पाहिजे. ॥ २२ १/२ ॥
ऊर्जे मासि सिते पक्षे चैत्रे माघे तथैव च ॥ २३
नवाह्ना किल श्रोतव्यं रामाण कथामृतमम् ।

'सनत्कुमारांनो ! भगवंताचा महिमा जाणण्यासाठी कार्तिक, माघ आणि चैत्र शुक्ल पक्षात रामायणाच्या अमृतमय कथेचे नवाह्न श्रवण केले पाहिजे. ॥ २३ १/२ ॥
गौतमशापतः प्राप्तः सुदासो राक्षसीं तनुम् ॥ २४
रामायणप्रभावेण विमुक्तिं प्राप्तवानसौ ।

'ब्राह्मण सुदास गौतमाच्या शापाने राक्षस शरीरास प्राप्त झाला होता. परंतु रामायणाच्या प्रभावानेच त्याला त्या शापांतून मुक्त होता आले." ॥ २४ १/२ ॥
सनत्कुमार उवाच
रामायणं केन प्रोक्तं सर्वधर्मफलप्रदम् ॥ २५

प्राप्तः कथं गौतमेन सौदासो मुनिसत्तम ।
रामायणप्रभावेण कथं भूयो विमोक्षितः ॥ २६

सनत्कुमार म्हणाले - सनत्कुमारंनी विचारले - "मुनिश्रेष्ठ, संपूर्ण धर्मांचे फल देणार्‍या रामकथेचे कोणी वर्णन केले आहे ? सौदासाला गौतमद्वारा शाप कसा प्राप्त झाला ? नंतर ते रामायणाच्या प्रभावाने कशा प्रकारे शापमुक्त झाले होते ? ॥ २५-२६ ॥
अनुग्रह्योऽस्मि यति ते तत्त्वतो वक्तुमर्हसि ।
सर्वं एतत् अशेषेण मुने नो वक्तुमर्हसि ॥ २७

श्रृण्वतां वदतां चैव कथा पापविनाशिनी ।

'हे मुने ! जर आपला आमच्यावर अनुग्रह असेल तर सर्व काही विस्तारपूर्वक सांगा. या सर्व गोष्टी आम्हांस नीट अवगत करून द्या. कारण भगवंताची कथा वक्ता आणि श्रोता दोघांच्याही पापांचा नाश करणारी आहे." ॥ २७ १/२ ॥
नारद उवाच
श्रृणु रामायणं विप्र यद वाल्मीकिमुखोद्‌गतम् ॥ २८
नवाह्ना खलु श्रोतव्यं रामायण कथामृतम् ।

नारद म्हणाले - '"ब्रह्मन् ! रामायणाचा प्रादुर्भाव महर्षि वाल्मीकिंच्या मुखाने झाला आहे. तुम्ही त्या कथेचेच श्रवण करा ! रामायणाच्या अमृतमयी कथेचे श्रवण नऊ दिवसात केले पाहिजे. ॥ २८ १/२ ॥
आस्ते कृतयुगे विप्रो धर्मकर्मविशारदः ॥ २९
सोमदत्त इति ख्यातो नाम्ना धर्मपरायणः ।

सत्ययुगात एक ब्राह्मण होता. त्याला धर्म कर्माचे विशेष ज्ञान होते. त्याचे नाव सोमदत्त होते. तो सदा धर्माच्या पालनातच तत्पर राहात असे. ॥ २९ १/२ ॥
विप्रस्तु गौतमाख्येन मुनिना ब्रह्मवदिना ॥ ३०

श्रावितः सर्वधर्मांश्च गङ्गातीरे मनोरमे ।
पुराणशास्त्र कथनैः तेनासौ बोधितोऽपि च ॥ ३१

(तो ब्राह्मण सौदास नावानेही विख्यात होता) ब्राह्मणाने ब्रह्मवादी गौतम मुनिंच्याकडून गंगेच्या मनोरम तटावर संपूर्ण धर्माचा उपदेश ऐकला होता. गौतमांनी पुराणे आणि शास्त्रे यातील कथांच्या द्वारे त्यास तत्त्वाचे ज्ञान करविले होते. सौदासाने गौतमांकडून त्यांनी सांगितलेल्या संपूर्ण धर्माचे श्रवण केले होते. ॥ ३०-३१ ॥
श्रुतवान् सर्वधर्मान् वै तेनोक्तान् अखिलानपि ।
कदाचित् परमेशस्य परिचर्यापरोऽभवत् ॥ ३२

उपस्थितायापि तस्मै प्रणामं न चकार सः ।

एका दिवसाची गोष्ट आहे. सौदास परमेश्वर शिवाच्या आराधनेत मग्न झालेला होता. त्यावेळी तेथे त्याचे गुरू गौतम येऊन पोहोचले परंतु सौदासाने आपल्या जवळ आलेल्या गुरूंना उठून प्रणाम केला नाही. ॥ ३२ १/२ ॥
स तु शान्तो महाबुद्धिः गौतमस्तेजसां निधिः ॥ ३३
शास्त्रोदितानि कर्माणि करोति स मुदं ययौ ।

परम बुद्धिमान गौतम तेजाचे निधिच होते. ते शिष्याच्या वर्तनाने रुष्ट न होता शांतच राहिले. त्यांना हे जाणून प्रसन्नता वाटली की माझा शिष्य सौदास शास्त्रोक्त कर्मांचे अनुष्ठान करीत असतो. ॥ ३३ १/२ ॥
यस्त्वर्चितो महादेवः शिवः सर्वजगद्‌गुरुः ॥ ३४

गुर्ववज्ञाकृतं पापं राक्षसत्वे नियुक्तवान् ।
उवाच प्राञ्जलिर्भूत्वा विनयेषु च कोविदः ॥
३५
परंतु सौदासाने ज्यांची आराधना केली होती ते संपूर्ण जगताचे गुरू महादेव शिव, गुरूंच्या अवहेलनाने होणारे पाप सहन करू शकले नाहीत. त्यांनी सौदासाला राक्षस योनित जाण्याचा शाप दिला. तेव्हां विनयकलाकोविद ब्राह्मणाने हात जोडून गौतमांना म्हटले - ॥ ३४-३५ ॥
विप्र उवाच -
भगवन् सर्वधर्मज्ञ सर्वदर्शिन् सुरेश्वरः ।
क्षमस्व भगवन् सर्वं अपराधः कृतो मया ॥
३६
विप्र म्हणाला - 'आपण धर्माचे ज्ञाता, सर्वदर्शी, सुरेश्वर, भगवन् ! मी जो अपराध केला आहे तो सर्व आपण क्षमा करावा. ॥ ३६ ॥
गौतम उवाच -
ऊर्जे मासे सिते पक्षे रामायण कथामृतम् ।
नवाह्ना चैव श्रोतव्यं भक्तिभावेन सादरम् ॥ ३७

नात्यन्तिकं भवेद् एतद् द्वादशाब्दं भविष्यति ।

गौतम म्हणाले - "वत्स ! कार्तिक मासातील शुक्लपक्षात तू रामायणाच्या अमृतमयी कथेचे आदरपूर्वक श्रवण कर. ती कथा नऊ दिवसात ऐकली पाहिजे. असे करण्याने हा शाप अधिक काळपर्यंत टिकू शकणार नाही. केवळ बारा वर्षेपर्यंतच राहू शकेल." ॥ ३७ १/२ ॥
विप्र उवाच -
केन रामायणं प्रोक्तं चरितानि तु कस्य वै ॥ ३८

एतत् सर्वं महाप्राज्ञ संक्षेपाद् वक्तुमर्हसि ।
मनसा प्रीतिमापन्नो ववन्दे चरणौ गुरोः ॥ ३९

विप्र म्हणाला - "रामायणाची कथा कुणी सांगितली आहे ? तथा त्यामध्ये कोणाच्या चरित्राचे वर्णन केले गेले आहे ? महामते ! हे सर्व संक्षेपाने सांगण्याची कृपा करावी." असे म्हणुन मनांतल्या मनांत प्रसन्न होऊन सौदासाने गुरूच्या चरणी प्रणाम केला. ॥ ३८-३९ ॥
गौतम उवाच -
श्रृणु रामायणं विप्र वाल्मीकिमुनिना कृतम् ।
येन रामावतारेण राक्षसा रावणादयः ॥ ४०

हतास्तु देवकार्यं हि चरितं तस्य तच्छृणु ।
कार्त्तिके च सिते पक्षे कथा रामायणस्य तु ॥
४१ नवमेऽहनि श्रोतव्या सर्वपापप्रणाशिनी ।
गौतम म्हणाले - "ब्रह्मन् ! ऐका. रामायण काव्याची निर्मिति वाल्मीकि मुनिने केली आहे. ज्या भगवान् श्रीरामांनी अवतार ग्रहण करून रावण आदि राक्षसांचा संहार केला आणि देवतांचे कार्य केले, त्यांचेच चरित्र रामायण काव्यात वर्णिले आहे. तू त्याचेच श्रवण कर. कार्तिक मासातील शुक्लपक्षात नऊ दिवस अर्थात् प्रतिपदेपासून नवमीपर्यंत रामायणाची कथा ऐकली पाहिजे. ती समस्त पापांचा नाश करणारी आहे." ॥ ४०-४१ १/२ ॥
इत्युक्त्वा चार्थसम्पन्नो गौतमः स्वाश्रमं ययौ ॥ ४२
विप्रोऽपि दुःखमापन्नो राक्षसीं तनुमाश्रितः ।

असे म्हणून पूर्णकाम गौतम ऋषि आपल्या आश्रमास निघून गेले. इकडे सोमदत्त अथवा सुदास नामक ब्राह्मणाने दुःखमग्न होऊन राक्षस शरीराचा आश्रय घेतला. ॥ ४२ १/२ ॥
क्षुत्पीडितः पिपासार्त्तो नित्यं क्रोधपरायणः ॥ ४३
कृष्णक्षपाद्युतिर्भीमो बभ्राम विजने वने ।

तो सदा भूक आणि तहानेने पीडित आणि क्रोधाच्या वशीभूत राहात होता. त्याच्या शरीराचा रंग कृष्ण पक्षातील रात्रीप्रमाणे काळा होता. तो भयानक राक्षस होऊन निर्जन वनात भ्रमण करू लागला. ॥ ४३ १/२ ॥
मृगांश्च विविधांस्तत्र मनुष्यांश्च सरीसुपान् ॥ ४४
विहगान् प्लवगांश्चैव प्रसभात्तनभक्षयत् ।

तेथे तो नाना प्रकारचे पशु, मनुष्य, साप, विंचू आदि जंतु, पक्षी आणि वानरे यांना बलपूर्वक पकडून खाऊन टाकत असे. ॥ ४४ १/२ ॥
अस्थिभिर्बहुभिर्विप्राः पीतरक्त कलेवरैः ॥ ४५
रक्तादप्रेतकैश्चैव तेनासीद् भूर्भयंकरी ।

'ब्रह्मर्षिंनो ! त्या राक्षसाद्वारा पृथ्वी विपुल हाडे आणि लाल पिवळ्या शरीराच्या रक्तमयी प्रेतांनी आच्छादित होऊन अत्यंत भयंकर दिसू लागली. ॥ ४५ १/२ ॥
ऋतुत्रये स पृथिवीं शतयोजन विस्तराम् ॥ ४६
कृत्वादिदुःखितां पश्चाद् वनान्तरमगात् पुनः ।

सहा महिन्यातच शतयोजन विस्तृत भूभागाला अत्यंत दुःखित करून तो राक्षस पुन्हा दुसर्‍या कुठल्या वनात निघून गेला. ॥ ४६ १/२ ॥
तत्रापि कृतवान् नित्यं नरमांसाशनं तदा ॥ ४७
जगाम नर्मदातीरे सर्वलोकभयंकरः ।

तेथेही प्रतिदिन नरमांसाचे भोजन करीत राहिला. संपूर्ण लोकांच्या मनांत भय उत्पन्न करणारा तो राक्षस हिंडत फिरत नर्मदेच्या तटावर जाऊन पोहोंचला. ॥ ४७ १/२ ॥
एतस्मिन् अंतरे प्राप्तः कश्चित् विप्रोऽतिधार्मिकः ॥ ४८
कलिङ्गदेशसंभूतो नाम्ना गर्ग इति स्मृतः ।

त्याच वेळी कोणी अत्यंत धर्मात्मा ब्राह्मण तेथे येऊन पोहोचला. त्याचा जन्म कलिंगदेशात झालेला होता. लोकात तो गर्ग्य नावाने विख्यात होता. ॥ ४८ १/२ ॥
वहन् गङ्गाजलं स्कंधे स्तुवन् विश्वेश्वरं प्रभुम् ॥ ४९
गायन् नामानि रामस्य समायातोऽतिहर्षितः ।

खांद्यावर गंगाजल घेऊन भगवान् विश्वनाथाची स्तुति तथा श्रीरामांचे नामांचे गायन करीत करीत तो ब्राह्मण मोठ्या हर्षाने आणि उत्साहाने त्या पुण्य प्रदेशात आला होता. ॥ ४९ १/२ ॥
तं आयान्तं मुनिं दृष्ट्वा सुदासो नाम राक्षसः ॥ ५०

प्राप्तो न पारणेत्युक्त्वा भुजौ उद्यम्य तं ययौ ।
तेन कीर्तितनामानि श्रुत्वा दूरे व्यवस्थितः ॥ ५१

अशक्तस्तं द्विजं हन्तुं इदं ऊचे स राक्षसः ।

गर्ग मुनिला येताना पाहून राक्षस सुदास म्हणाला, 'आम्हाला भोजन प्राप्त झाले आहे.' असे म्हणून आपले दोन्ही हात वर उचलून तो त्या मुनिकडे निघाला, परंतु त्याच्याद्वारा उच्चारित भगवन्नामाला ऐकून तो दूरच उभा राहिला. त्या ब्रह्मर्षिला मारण्यास असमर्थ झाला, आणि तो राक्षस गर्ग मुनिस म्हणाला - ॥ ५०-५१ १/२ ॥
राक्षस उवाच -
अहो भद्र महाभाग नमस्तुभ्यं महात्मने ॥ ५२

नामस्मरणमात्रेण राक्षसा अपि दूरगाः ।
मया प्रभक्षिताः पूर्वं विप्राः कोटिसहस्रशः ॥ ५३

राक्षस म्हणाला - "ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हे भद्र ! हे महाभागा ! हे महात्म्या ! आपल्याला नमस्कार असो. आपण जे भगवन्नामांचे उच्चारण करीत आहात तेवढ्याने राक्षसही दूर पळून जातात. मी पूर्वी कोटी सहस्र ब्राह्मणांना भक्षण केले आहे. ॥ ५२-५३ ॥
नामप्रावरणं विप्र रक्षति त्वां महाभयात् ।
नामस्मरणमात्रेण राक्षसा अपि भो वयम् ॥ ५४

परां शान्तिं समापन्ना महिमा कोऽच्युतस्य हि ।

'ब्रह्मन् ! आपल्याजवळ जे नामरूपी कवच आहे, तेच राक्षसांच्या महान भयापासून आपले रक्षण करीत आहे. आपल्या द्वारा केल्या गेलेल्या नामस्मरणमात्राने आम्हा राक्षसांनाही परम शांति प्राप्त झाली आहे. हा भगवन् अच्युताचा कसा महिमा आहे. ॥ ५४ १/२ ॥
सर्वथा त्वं महाभाग रागादिरहितो द्विज ॥ ५५
रामकथाप्रभावेण पाह्यस्मात् पातकाधमात् ।

हे भाग्यशाली ब्राह्मणा ! आपण श्रीराम कथेच्या प्रभावाने सर्वथा राग आदि दोषरहित झाला आहात. म्हणून मला या अधम पातकापासून वाचवा. ॥ ५५ १/२ ॥
गुर्ववज्ञा मया पूर्वं कृता च मुनिसत्तम ॥ ५६
कृतश्चानुग्रहः पश्चाद् गुरुणोक्तं इदं वचः ।

मुनिश्रेष्ठ ! मी पूर्वकाली आपल्या गुरूंची अवहेलना केली होती. नंतर गुरूंनी माझ्यावर अनुग्रह केला आणि ही गोष्ट सांगितली. ॥ ५६ १/२ ॥
वाल्मीकिमुनिना पूर्वं कथा रामायणस्य च ॥ ५७

ऊर्जे मासे सिते पक्षे श्रोतव्या च प्रयत्‍नतः ।

'पूर्वकालात वाल्मीकि मुनिंनी जी रामायणाची कथा सांगितली आहे. तिचे कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षात प्रयत्‍नपूर्वक श्रवण केली पाहिजे. ॥ ५७ १/२ ॥
गुरुणापि पुनः प्रोक्तं रम्यं तु शुभदं वचः ॥ ५८
नवाह्ना खलु श्रोतव्यं रामायण कथामृतमम् ।

इतके बोलून पुन्हा गुरुदेवांनी हे सुंदर आणि शुभदायक वचन सांगितले, 'रामायणाची अमृतमयी कथा नऊ दिवसात श्रवण केली पाहिजे."॥ ५८ १/२ ॥
तस्माद् ब्रह्मन् महाभाग सर्वशास्त्रार्थकोविद ॥ ५९
कथाश्रवण मात्रेण पाह्यस्मात् पापकर्मणः ।

म्हणून संपूर्ण शास्त्रांच्या तत्त्वाला जाणणार्‍या महा भाग्यशाली ब्राह्मणा ! आपण मला रामायण कथा ऐकवून या पापकर्मापासून माझे रक्षण करा. ॥ ५९ १/२ ॥
नारद उवाच -
ततो रामायणं ख्यातं राममाहात्म्यमुत्तमम् ॥ ६०

निशम्य विस्मयाविष्टो बभूव द्विजसतमः ।
ततो विप्रः कृपाविष्टो रामनामपरायणः ॥ ६१

सुदासराक्षसं नाम चेदं वाक्यमथाब्रवीत् ।

नारद म्हणाले - "त्यावेळी तेथे रामायणाचा परिचय आणि श्रीरामांचे उत्तम महात्म्याचे वर्णन ऐकून द्विजश्रेष्ठ गर्ग आश्चरचकित झाले. श्रीरामाचे नामच त्यांच्या जीवनाचे अवलंबन होते. त्या ब्राह्मण देवतेस त्या राक्षसाप्रति दया उत्पन्न होऊन त्यांचे अंतःकरण द्रवित झाले आणि ते सुदासाला या प्रकारे बोलले." ॥ ६०-६१ १/२ ॥
विप्र उवाच -
राक्षसेन्द्र महाभाग मतिस्ते विमलाभवत् ॥ ६२

अस्मिन् ऊर्जे सिते पक्षे रामायणकथां श्रृणु ।
श्रृणु त्वं राममाहात्म्यं रामभक्तिपरायण ॥ ६३

विप्र म्हणाले - महाभाग ! राक्षसराज ! तुमची बुद्धि निर्मल झाली आहे. या समयी कार्तिक मासाचा शुक्लपक्ष चालू आहे. यात रामायणाची कथा ऐक. रामभक्तिपरायण राक्षसा ! तू श्रीरामचंद्रांचे माहात्म्य श्रवण कर." ॥ ६२-६३ ॥
रामध्यानपराणां च कः समर्थः प्रबाधितुम् ।
रामभक्तिपरो यत्र तत्र ब्रह्मा हरिः शिवः ॥ ६४

तत्र देवाश्च सिद्धाश्च रामायणपरा नराः ।

श्रीरामचंद्रांच्या ध्यानात तत्पर राहणार्‍या मनुष्यांना बाधा पोहोंचविण्यास कोण समर्थ होऊ शकतो ? जेथे श्रीरामाचा भक्त आहे तेथे ब्रह्मा, विष्णु आणि शिव विराजमान आहेत. तेथेच देवता, सिद्ध आणि रामायणाचा आश्रय घेणारी माणसे आहेत. ॥ ६४ १/२ ॥
तस्मात् ऊर्जे सिते पक्षे रामायणकथां श्रृणु ॥ ६५
नवाह्ना खलु श्रोतव्यं सावधानः सदा भव ।

म्हणून या कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षात तू रामायणाची कथा ऐक. नऊ दिवसपर्यंत या कथेच्या श्रवणाचे विधान आहे.म्हणून तू सदा सावधान राहा. ॥ ६५ १/२ ॥
इत्युक्त्वा कथयामास रामायणकथां मुनिः ॥ ६६

कथाश्रवणमात्रेण राक्षसत्वं अपाकृतम् ।
विसृज्य राक्षसं भावं अभवत् देवतोपमः ॥ ६७

कोटिसूर्यप्रतीकाशो नारायण समप्रभः ।
शङ्‍खचक्र गदापाणि हरेः सद्म जगाम सः ॥ ६८

स्तुवन् तं ब्राह्मणं सम्यग् उअगाम हरिमंदिरम् ॥ ६९

असे म्हणून गर्ग मुनिंनी त्याला रामायणाची कथा ऐकविली. कथा ऐकतांच त्याचे राक्षसत्व नष्ट झाले. राक्षस भावाचा परित्याग करून तो देवतांप्रमाणे सुंदर, कोटी सूर्यांप्रमाणे तेजस्वी आणि भगवान् नारायणासमान कांतिमान झाला. आपल्या चार भुजांमध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करून तो श्रीहरिच्या वैकुण्ठधामास चालता झाला. ब्राह्मण गर्गाची वारंवार खूप खूप प्रशंसा करीत तो भगवंताच्या उत्तम धामात जाऊन पोहोंचला. ६६-६९ ॥
नारद उवाच -
तस्मात् श्रूणुध्वं विप्रेन्द्रा रामायण कथामृतम् ।
स तस्य महिमा तत्र ऊर्जे मासि च कीर्त्यते ॥ ७०

नारद म्हणाले - "विप्रवर हो ! म्हणूनही रामायणाची अमृतमयी कथा ऐका. याच्या श्रवणाचा सदाच महिमा आहे. परंतु कार्तिक मासात विशेष महिमा सांगितला गेला आहे. ॥ ७० ॥
यन्नामस्मरणादेव महापातक कोटिभिः ।
विमुक्तः सर्वपापेभ्यो नरो याति परां पगिम् ॥ ७१

रामायणाच्या नामाचे स्मरण करूनही मनुष्य कोटी महापातकांपासून आणि समस्त पापांपासून मुक्त होऊन परमगतिला प्राप्त होतो. ॥ ७१ ॥
रामायणेति यन्नम सकृदप्युच्यते यदा ।
तदैव पापनिर्मुक्तो विष्णुर्लोकं स गच्छति ॥ ७२

मनुष्य 'रामायण' या नामाचे जेव्हां एकवेळही उच्चारण करतो, तेव्हांच तो समस्त पापांपासून मुक्त होऊन जातो आणि अंती भगवान् विष्णुंच्या लोकास जातो. ॥ ७२ ॥
ये पठंति सदाऽऽख्यानं भक्त्या श्रृण्वन्ति ये नराः ।
गङ्‍गास्नानच्छतगुणं तेषां संजायते फलम् ॥ ७३

'जी माणसे सदा भक्तिभावाने रामायण कथा वाचतात आणि ऐकतात त्यांना गंगास्नानापेक्षा शंभरपट पुण्यफल प्राप्त होते.' ॥ ७३ ॥
इति श्रीस्कंदपुराणे उत्तरखण्डे नारद-सनत्कुमार संवादे रामायणमाहात्म्ये राक्षमोक्षणं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ १ ॥
या प्रकारे श्रीस्कंदपुराणाच्या उत्तरखण्डातील नारद-सनत्कुमार संवादाच्या अंतर्गत वाल्मीकीय रामायण माहात्म्याच्या प्रसंगातील राक्षसाचा उद्धार नामक दुसरा अध्याय समाप्त झाला. ॥ २ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥