श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। विंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राज्ञोऽनङ्गीकरणं श्रुवा विश्वामित्रस्य कोपः - राजा दशरथांनी विश्वामित्रास आपला पुत्र देण्यास नाकारणे आणि विश्वामित्रांचे कुपित होणे -
तच्छ्रुत्वा राजशार्दूलो विश्वामित्रस्य भाषितम् ।
मुहूर्तमिव निःसंज्ञः संज्ञावानिदमब्रवीत् ॥ १ ॥
विश्वामित्रांचे वचन ऐकून नृपश्रेष्ठ दशरथ दोन घटिकासाठी संज्ञाशून्य झाले. नंतर सावध होऊन या प्रकारे बोलले - ॥ १ ॥
ऊनषोडशवर्षो मे रामो राजीवलोचनः ।
न युद्धयोग्यतामस्य पश्यामि सह राक्षसैः ॥ २ ॥
"महर्षि ! माझा कमलनयन राम आद्याप पूर्ण सोळा वर्षाचाही झालेला नाही. मी त्याच्या ठिकाणी राक्षसांशी युद्ध करण्याची क्षमता समजू शकत नाही. ॥ २ ॥
इयमक्षौहिणी सेना यस्याहं पतिरीश्वरः ।
अनया सहितो गत्वा योद्धाहं तैर्निशाचरैः ॥ ३ ॥
'ही माझी अक्षौहिणी सेना आहे जिचा मी पालक आणि स्वामीही आहे. या सेनेसह मी स्वतःच येऊन त्या निशाचरांशी युद्ध करीन. ॥ ३ ॥
इमे शूराश्च विक्रान्ता भृत्या मेऽस्त्रविशारदाः ।
योग्या रक्षोगणैर्योद्धुं न रामं नेतुमर्हसि ॥ ४ ॥
'हे माझे शूर वीर सैनिक, जे अस्त्र विद्येतही कुशल आहेत, राक्षसांच्या बरोबर लढण्याची योग्यता बाळगून आहेत. म्हणून यांनाच घेऊन जा. रामाला घेऊन जाणे उचित होणार नाही. ॥ ४ ॥
अहमेव धनुष्पाणिर्गोप्ता समरमूर्धनि ।
यावत्प्राणान् धरिष्यामि तावद् योत्स्ये निशाचरैः ॥ ५ ॥
'मी स्वतःच हातात धनुष्य घेऊन युद्धाच्या अग्रभागी उभा राहून यज्ञाचे रक्षण करीन आणि जो पर्यंत या शरीरात प्राण राहतील तोपर्यं॥ ॥त निशाचरांशी लढत राहीन. ॥ ५ ॥
निर्विघ्ना व्रतचर्या सा भविष्यति सुरक्षिता ।
अहं तत्र गमिष्यामि न रामं नेतुमर्हसि ॥ ६ ॥
'माझ्याद्वारा सुरक्षित होऊन आपले नियमानुष्ठान कुठलेही विघ्न न येता पूर्ण होईल. म्हणून मीच तेथे आपल्याबरोबर येईन. आपण रामाला घेऊन जाऊ नये. ॥ ६ ॥
बालो ह्यकृतविद्यश्च न च वेत्ति बलाबलम् ।
न चास्त्रबलसंयुक्तो न च युद्धविशारदः ॥ ७ ॥
'माझा राम अद्याप बालक आहे. त्याने अद्याप युद्धाची कला आत्मसात केलेली नाही. तो दुसर्‍याचे बलाबल जाणत नाही. शिवाय तो अस्त्रबलानेही संपन्न नाही आणि युद्ध कलेतही निपुण नाही. ॥ ७ ॥
न चासौ रक्षसां योग्यः कूटयुद्धा हि राक्षसाः ।
विप्रयुक्तो हि रामेण मुहूर्तमपि नोत्सहे ॥ ८ ॥

जीवितुं मुनिशार्दूल न रामं नेतुमर्हसि ।
यदि वा राघवं ब्रह्मन् नेतुमिच्छसि सुव्रत ॥ ९ ॥

चतुरङ्‍गसमायुक्तं मया सह च तं नय ।
'म्हणून तो राक्षसांशी युद्ध करण्यास योग्य नाही. कारण राक्षस मायेने, छल-कपटाने युद्ध करतात. या शिवाय रामाचा वियोग झाला तर मी दोन घटिकाही जिवंत राहू शकत नाही. मुनिश्रेष्ठा ! म्हणून आपण माझ्या रामाला घेऊन जाऊ नका. अथवा ब्रह्मन् ! जर आपली इच्छा रामालाच घेऊन जाण्याची असेल तर चतुरंगिणी सेनेसह मीही बरोबर येतो. माझ्यासह त्याला घेऊन चला. ॥ ८-९ १/२ ॥
षष्टिर्वर्षसहस्राणि जातस्य मम कौशिक ॥ १० ॥

कृच्छ्रेणोत्पादितश्चायं न रामं नेतुमर्हसि ।
'कुशिकनंदन ! माझी अवस्था पहा. माझे आयुष्य साठ हजार वर्षाचे झाले आहे. या वृद्धापकाळात मला फार कष्टाने पुत्राची प्राप्ती झाली आहे. म्हणून आपण रामाला घेऊन जाऊ नका. ॥ १० १/२ ॥
चतुर्णामात्मजानां हि प्रीतिः परमिका मम ॥ ११ ॥
'धर्मप्रधान राम माझ्या चारी पुत्रात श्रेष्ठ आहे, म्हणून माझे त्याच्यावर सर्वांपेक्षा अधिक प्रेम आहे. म्हणून आपण रामाला नेऊ नये. ॥ ११ ॥
ज्येष्ठे धर्मप्रधाने च न रामं नेतुमर्हसि ।
किं वीर्या राक्षसास्ते च कस्य पुत्राश्च के च ते ॥ १२ ॥

कथं प्रमाणाः के चैतान् रक्षन्ति मुनिपुङ्‍गव ।
कथं च प्रतिकर्तव्यं तेषां रामेण रक्षसाम् ॥ १३ ॥
'ते राक्षस कसे पराक्रमी आहेत ? मुनीश्वर ! त्यांचे कोण रक्षण करतो ? राम त्या राक्षसांचा सामना कसा करू शकेल ? ॥ १२-१३ ॥
मामकैर्वा बलैर्ब्रह्मन् मया वा कूटयोधिनाम् ।
सर्वं मे शंस भगवन् कथं तेषां मया रणे ॥ १४ ॥

स्थातव्यं दुष्टभावानां वीर्योत्सिक्ता हि राक्षसाः ।
'ब्रह्मन् ! माझ्या सैनिकांनी अथवा मी स्वतःही त्या महायोध्या राक्षसांचा प्रतिकार कशा प्रकारे केला पाहिजे ? भगवन् ! या सर्व गोष्टी आपण मला सांगा. त्या दुष्टांच्या बरोबर युद्धांत मला कशा प्रकारे उभे राहिले पाहिजे ? कारण राक्षस फार बलाभिमानी असतात." ॥ १४ १/२ ॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा विश्वामित्रोऽभ्यभाषत ॥ १५ ॥

पौलस्त्यवंशप्रभवो रावणो नाम राक्षसः ।
स ब्रह्मणा दत्तवरस्त्रैलोक्यं बाधते भृशम् ॥ १६ ॥

महाबलो महावीर्यो राक्षसैर्बहुभिर्वृतः ।
श्रूयते हि महाराज रावणो राक्षसाधिपः ॥ १७ ॥

साक्षाद्‌वैश्रवणभ्राता पुत्रो विश्रवसो मुनेः ।
राजा दशरथाचे हे बोलणे ऐकून विश्वामित्र म्हणाले, "महाराज ! रावण नामक एक प्रसिद्ध राक्षस आहे जो महर्षि पुलस्त्यांच्या कुळात उत्पन्न झालेला आहे. त्याला ब्रह्मदेवाकडून त्याने जे मागितले तसे वरदान प्राप्त झाले आहे. त्या वरदानामुळे तो महान् बलशाली आणि महापराक्रमी होऊन बहुसंख्य राक्षसांनी घेरलेला तो निशाचर तिन्ही लोकातील निवासीयांना अत्यंत कष्ट देत आहे. असे ऐकले जाते की राक्षसराज रावण विश्रवा मुनिंचा औरस पुत्र आणि साक्षात् कुबेराचा भाऊ आहे. ॥ १५-१७ १/२ ॥
यदा न खलु यज्ञस्य विघ्नकर्ता महाबलः ॥ १८ ॥

तेन सञ्चोदितौ तौ तु राक्षसौ च महाबलौ ।
मारीचश्च सुबाहुश्च यज्ञविघ्नं करिष्यतः ॥ १९ ॥
'तो महाबली निशाचर इच्छा झाली तरी स्वतः येऊन यज्ञात विघ्न उत्पन्न करीत नाही. स्वतःसाठी तो हे तुच्छ कार्य समजतो. म्हणून त्याच्या प्रेरणेने दोन महान् बलवान् राक्षस, मारीच आणि सुबाहू, यज्ञात विघ्न उत्पन्न करीत असतात." ॥ १८-१९ ॥
इत्युक्तो मुनिना तेन राजोवाच मुनिं तदा ।
न हि शक्तोऽस्मि सङ्‍ग्रामे स्थातुं तस्य दुरात्मनः ॥ २० ॥
विश्वामित्र मुनींनी असे सांगितल्यावर राजा दशरथ त्यांना म्हणाले - "मुनिवर ! मी त्या दुरात्मा रावणाबरोबर युद्धात टिकू शकत नाही. ॥ २० ॥
स त्वं प्रसादं धर्मज्ञ कुरुष्व मम पुत्रके ।
मम चैवाल्पभाग्यस्य दैवतं हि भवान् गुरुः । २१ ॥
धर्मज्ञ महर्षि ! आपण माझ्या पुत्रावर आणि मन्दभागी या दशरथावर कृपा करावी. आपण माझी देवता तथा गुरु आहात. ॥ २१ ॥
देवदानवगन्धर्वा यक्षाः पतगपन्नगाः ।
न शक्ता रावणं सोढुं किं पुनर्मानवा युधि ॥ २२ ॥
युद्धात रावणाचा वेग तर देवता, दानव, गंधर्व , यक्ष, गरुड आणि नागही सहन करू शकत नाहीत तर मनुष्यांचे काय सांगावे ? ॥ २२ ॥
स तु वीर्यवतां वीर्यं आदत्ते युधि रावणः ।
तेन चाहं न शक्तोऽस्मि संयोद्धुं तस्य वा बलैः ॥ २३ ॥

सबलो वा मुनिश्रेष्ठ सहितो वा ममात्मजैः ।
'मुनिश्रेष्ठ ! तो रावण युद्धामध्ये सामर्थ्यवानांच्या वीर्याचे (बलाचे) ही अपहरण करतो, म्हणून मी आपली सेना आणि पुत्रांसहितही त्याच्याशी आणि त्याच्या सैनिकांशी युद्ध करण्यास समर्थ नाही. ॥ २३ १/२ ॥
कथमप्यमरप्रख्यं सङ्‍ग्रामाणामकोविदम् ॥ २४ ॥
बालं मे तनयं ब्रह्मन् नैव दास्यामि पुत्रकम् ।
'ब्रह्मन् ! हा माझा देवोपम पुत्र युद्धाच्या कलेविषयी सर्वथा अनभिज्ञ आहे. याचे वयही अजून फार कमी आहे. म्हणून मी याला कुठल्याही प्रकारे देणार नाही. ॥ २४ १/२ ॥
अथ कालोपमौ युद्धे सुतौ सुन्दोपसुन्दयोः ॥ २५ ॥

यज्ञविघ्नकरौ तौ ते नैव दास्यामि पुत्रकम् ।
मारीचश्च सुबाहुश्च वीर्यवन्तौ सुशिक्षितौ ॥ २६ ॥
'मारीच आणि सुबाहु सुप्रसिद्ध दैत्य सुंद आणि उपसुंदाचे पुत्र आहेत. ते दोघेही युद्धात यमराजासमान आहेत. जर तेच आपल्या यज्ञात विघ्न आणणारे असतील तर त्यांचा सामना करण्यासाठी मी आपल्या पुत्राला देणार नाही. कारण ते दोघे प्रबल पराक्रमी असून युद्धविषयक उत्तम शिक्षणाने संपन्न आहेत. ॥ २५-२६ ॥
तयोरन्यतरं योद्धुं यास्यामि ससुहृद्‍गणः ।
अन्यथा त्वनुनेष्यामि भवन्तं सहबान्धवः ॥ २७ ॥
'मी त्या दोघांपैकी कुणा एकाबरोबर युद्ध करण्यासाठी आपल्या सुहृदांसह येईन. अन्यथा जर आपणांस मला घेऊन जाण्याची इच्छा नसेल तर मी बंधु-बांधवांसह आपला अनुनय करीन की आपण रामाला नेऊ नये." ॥ २७ ॥
इति नरपतिजल्पनाद् द्विजेन्द्रं
     कुशिकसुतं सुमहान् विवेश मन्युः ।
सुहुत इव मखेऽग्निराज्यसिक्तः
     समभवदुज्ज्वलितो महर्षिवह्निः ॥ २८ ॥
राजा दशरथाचे असे वचन ऐकून विप्रवर कुशिकनंदन विश्वामित्रांना अत्यंत क्रोधाचा आवेश आला, जसे यज्ञशाळेत अग्निला उत्तम प्रकारे आहुति देऊन तुपाच्या धारेने अभिषिक्त केले आणि तो प्रज्वलित व्हावा त्याप्रमाणे, अग्नितुल्य तेजस्वी विश्वामित्रही क्रोधाने भडकून उठले. ॥ २८ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे विंशः सर्गः ॥ २० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा विसावा सर्ग समाप्त झाला. ॥ २० ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP