श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ एकोनविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पलायमानैर्वनरैः सह वार्तालापं कृत्वा साङ्‌गदायाताराया वालिनः समीपं आगमनं, तस्य दुरवस्थां आलोक्य तस्या रोदनं च - अंगदसहित तारेचे पळून जाणार्‍या वानरांशी बोलून वालीच्या जवळ जाणे आणि त्याची दुर्दशा पाहून रडणे -
स वानरमहाराजः शयानः शरविक्षतः ।
प्रुत्युक्तो हेतुमद्वाक्यैर्नोत्तरं प्रत्यपद्यत ॥ १ ॥
वानरांचा महाराजा वाली बाणाने पीडित होऊन भूमीवर पडलेला होता. श्रीरामांच्या युक्तीयुक्त वचनांच्या द्वारा आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यावर त्याला काही उत्तर सुचले नाही. ॥१॥
अश्मभिः प्रविभिन्नाङ्‌गःन पादपैराहतो भृशम् ।
रामबाणेन च क्रांतो जीवितांते मुमोह सः ॥ २ ॥
दगडांचा मार लागून त्याचे अंग तुटून फुटून गेले होते. वृक्षांच्या आघातांनी तो फार घायाळ झाला होता आणि रामबाणाने आक्रांत होऊन तो जीवनाच्या अंताजवळ पोहोचला होता. त्या समयी तो मूर्छित झाला. ॥२॥
तं भार्या बाणमोक्षेण रामदत्तेन संयुगे ।
हतं प्लवगशार्दूलं तारा शुश्राव वालिनम् ॥ ३ ॥
त्याची पत्‍नी तारा हिने ऐकले की युद्धस्थळावर वानरश्रेष्ठ वाली रामांनी चालविलेल्या बाणानी मारले गेले आहेत. ॥३॥
सा सपुत्रा ऽप्रियं श्रुत्वा वधं भर्तुः सुदारुणम् ।
निष्पपात भृशं त्रस्ता विविधाद्गि्रिगह्वरात् ॥ ४ ॥
आपल्या स्वामीच्या वधाचा अत्यंत भयंकर आणि अप्रिय समाचार ऐकून ती फार उद्विग्न झाली आणि आपला पुत्र अंगद यास बरोबर घेऊन त्या पर्वताच्या कंदरेतून बाहेर निघाली. ॥४॥
ये त्वंगदपरीवारा वानरा भीमविक्रमाः ।
ते सकार्मुकमालोक्य रामं त्रस्ताः प्रदुद्रुवुः ॥ ५ ॥
अंगदाला चारी बाजूनी घेरून त्याचे रक्षण करणारे जे महाबलाढ्य वानर होते ते श्रीरामांना धनुष्य घेऊन असलेले पाहून भयभीत होऊन पळून गेले. ॥५॥
सा ददर्श ततस्त्रस्तान् हरीनापततो भृशम् ।
यूथादिव परिभ्रष्टान् मृगान्निहतयूथपान् ॥ ६ ॥
ताराने वेगाने पळत येणार्‍या त्या भयभीत वानरांना पाहिले. ते, ज्यांचे यूथपति मारले गेले आहेत त्या यूथभ्रष्ट मृगांप्रमाणे भासत होते. ॥६॥
तानुवाच समासाद्य दुःखितान् दुःखिता सती ।
रामवित्रासितांत्सर्वाननुबद्धानिवेषुभिः ॥ ७ ॥
ते सर्व वानर रामांना पाहून इतके घाबरले होते की जणु त्यांचे बाण यांच्या मागे येत होते. त्या दुःखी वानरांच्या जवळ पोहोचून सती साध्वी तारा आणखीच दुःखी झाली आणि त्यांना या प्रकारे बोलली- ॥७॥
वानरा राजसिंहस्य यस्य यूयं पुरःसराः ।
तं विहाय सुसंत्रस्ताः कस्माद् द्रवथ दुर्गतः ॥ ८ ॥
’वानरांनो ! तुम्ही तर राजसिंह वालीच्या पुढे पुढे जाणारे होतात. आता त्यांना सोडून अत्यंत भयभीत होऊन दुर्गतित पडून का पळून जात आहात ?’ ॥८॥
राज्यहेतोः स चेद् भ्राता भ्रात्रा रौद्रेण पातितः ।
रामेण प्रहितै रौद्रैर्मार्गणैर्दूरपातिभिः ॥ ९ ॥
’जर राज्याच्या लोभाने त्या सुग्रीवाने श्रीरामांना प्रेरित करून त्यांच्या द्वारा दुरून सोडण्यात येणार्‍या आणि दूरपर्यंत जाणार्‍या बाणांच्या द्वारे आपल्या भावाला मारविले असेल तर तुम्ही लोक का पळून जात आहात ?’ ॥९॥
कपिपत्‍न्याव वचः श्रुत्वा कपयः कामरूपिणः ।
प्राप्तकालमविक्लिष्टमूचुर्वचनमङ्‌ग्नाम् ॥ १० ॥
वालीच्या पत्‍नीचे हे वचन ऐकून इच्छेनुसार रूप धारण करणार्‍या त्या वानरांनी कल्याणमयी तारादेवीला संबोधित करून सर्वसंमतीने स्पष्ट शब्दांत ही समयोचित गोष्ट सांगितली - ॥१०॥
जीवपुत्रे निवर्तस्व पुत्रं रक्षस्व चाङ्‌गादम् ।
अंतको रामरूपेण हत्वा नयति वालिनम् ॥ ११ ॥
’देवी ! अजून तुमचा पुत्र जिवंत आहे. तुम्ही परत चलावे आणि आपला पुत्र अंगद याचे रक्षण करावे. श्रीरामांचे रूप धारण करून स्वतः यमराज येऊन पोहोचले आहेत; जे वालीला मारून आपल्या बरोबर घेऊन चालले आहेत. ॥११॥
क्षिप्तान् वृक्षान् समाविध्य विपुलाश्च शिलास्तथा ।
वाली वज्रसमैर्बाणै रामेण विनिपातितः ॥ १२ ॥
वालीने फेकलेल्या वृक्षांना आणि मोठमोठ्या शिळांना आपल्या वज्रतुल्य बाणांनी विदिर्ण करून श्रीरामांनी वालीला मारून टाकले आहे. जणू वज्रधारी इंद्राने आपल्या वज्राच्या द्वारा एखाद्या महान् पर्वतालाच धराशायी केले असावे. ॥१२॥
अभिद्रुतमिदं सर्वं विद्रुतं प्रसृतं बलम् ।
अस्मिन् प्लवगशार्दूले हते शक्रसमप्रभे ॥ १३ ॥
’इंद्रासमान तेजस्वी हा वानरश्रेष्ठ वाली मारला गेल्यावर ही सारी वानरसेना श्रीरामांकडून जणु पराजित होऊन पळून येऊन येथे उभी आहे. ॥१३॥
रक्ष्यतां नगरद्वारमङ्‌ग दश्चाभिषिच्यताम् ।
पदस्थं वालिनः पुत्रं भजिष्यंति प्लवंगमाः ॥ १४ ॥
’तुम्ही शूरवीरांच्या द्वारा या नगरीचे रक्षण करा. कुमार अंगदाचा किष्किंधेच्या राज्यावर अभिषेक करावा. राजसिंहासनावर बसलेल्या वालीकुमार अंगदाची सर्व वानर सेवा करतील. ॥१४॥
अथवा ऽरुचितं स्थानमिह ते रुचिरानने ।
आविशंति हि दुर्गाणि क्षिप्रमन्यानि वानराः ॥ १५ ॥

अभार्याश्च सभार्याश्च संत्यत्र वनचारिणः ।
लुब्धेभ्यो विप्रलब्धेभ्यः तेभ्यो नः सुमहद् भयम् ॥ १६ ॥
’अथवा ! सुमुखि ! आता या नगरात तुमचे राहाणे आम्हाला चांगले वाटत नाही, कारण किष्किंधेच्या दुर्गम स्थानात सर्व सुग्रीवपक्षीय वानर शीघ्र प्रवेश करतील. येथे बरेचसे असे वनचारी वानर आहेत; ज्यांच्यातील काही तर आपल्या स्त्रियांसह आहेत आणि काही स्त्रियांपासून वियोग झालेले आहेत. त्यांच्यात राज्यविषयक लोभ उत्पन्न झाला आहे आणि पूर्वी आम्हा लोकांकडून ते राज्यसुखापासून वञ्चित केले गेलेले आहेत. म्हणून या समयी त्या सर्वांपासून आम्हा लोकांना महान् भय प्राप्त होऊ शकते.’ ॥१५-१६॥
अल्पांतरगतानां तु श्रुत्वा वचनमङ्‌ग्ना ।
आत्मनः प्रतिरूपं सा बभाषे चारुहासिनी ॥ १७ ॥
आता थोडेसेच दूरपर्यंत आलेल्या त्या वानरांचे हे बोलणे ऐकून चारूहासिनी कल्याणी तारेने त्यांना आपल्या अनुरूप उत्तर दिले- ॥१७॥
पुत्रेण मम किं कार्यं किं राज्येन किमात्मना ।
कपिसिंहे महाभागे तस्मिन् भर्तरि नश्यति ॥ १८ ॥
’वानरांनो ! जर माझे महाभाग पतिदेव कपिसिंह वाली नष्ट होत आहेत तर मला पुत्राशी, राज्याशी तसेच आपल्या या जीवनाशीही काय प्रयोजन आहे ? ॥१८॥
पादमूलं गमिष्यामि तस्यैवाहं महात्मनः ।
यो ऽसौ रामप्रयुक्तेन शरेण विनिपातितः ॥ १९ ॥
’मी तर ज्यांना श्रीरामांनी सोडलेल्या बाणांनी ठार मारले आहे, त्या वालीच्या चरणांजवळच जाईन.’ ॥१९॥
एवमुक्त्वा प्रदुद्राव रुदंती शोककर्शिता ।
शिरश्चोरश्च बाहुभ्यां दुःखेन समभिघ्नती ॥ २० ॥
असे म्हणून शोकाने व्याकुळ झालेली तारा रडत आणि आपल्या दोन्ही हातांनी दुःखपूर्वक शिर आणि छाती पीटत मोठ्या वेगाने धावली. ॥२०॥
आव्रजंती ददर्शाथ पतिं निपतितं भुवि ।
हंतारं दानवेंद्राणां समरेष्वनिवर्तिनाम् ॥ २१ ॥
पुढे जाणार्‍या तारेने पाहिले की जे युद्धात कधीही पाठ न दाखविणार्‍या दानवराजांचाही वध करण्यास समर्थ होते, ते माझे पति वानरराज वाली पृथ्वीवर पडलेले आहेत. ॥२१॥
क्षेप्तारं पर्वतेंद्राणां वज्राणामिव वासवम् ।
महावातसमाविष्टं महामेघौघनिःस्वनम् ॥ २२ ॥

शक्रतुल्यपराक्रांतं वृष्ट्‍वेवोपरतं घनम् ।
नर्दंतं नर्दतां भीमं शूरं शूरेण पातितम् ।
शार्दूलेनामिषस्यार्थे मृगराजमिवाहतम् ॥ २३ ॥
वज्र चालविणार्‍या इंद्राप्रमाणे जे रणभूमीमध्ये मोठमोठ्या पर्वतांना फेकत होते, ज्यांच्या वेगांत प्रचण्ड वादळाचा समावेश होता, ज्यांचा सिंहनाद महान् मेघाच्या गंभीर गर्जनेलाही तिरस्कृत करून टाकत होता; तसेच जे इंद्रतुल्य पराक्रमी होते, तेच या समयी, वृष्टि करून शांत झालेल्या ढगाप्रमाणे हालचालीपासून विरत झाले होते. जे स्वतः गर्जना करून गर्जना करणार्‍या वीरांच्या मनात भय उत्पन्न करीत असत, ते शूरवीर वाली एका दुसर्‍या शूरवीराच्या द्वारे मारून पाडले गेले आहेत. जसे मांसासाठी एका सिंहाने दुसर्‍या सिंहाला मारून टाकले असावे त्याच प्रकारे राज्यासाठी आपुल्या भावाच्या द्वारेच यांचा वध केला गेला आहे. ॥२२-२३॥
अर्चितं सर्वलोकस्य सपताकं सवेदिकम् ।
नागहेतोः सुपर्णेन चैत्यमुन्मथितं यथा ॥ २४ ॥
जो सर्व लोकांच्या द्वारा पूजित आहे, जेथे पताका फडकत राहिली असेल तसेच ज्याच्या जवळ देवतेची वेदी शोभत असते त्या चैत्य वृक्ष अथवा देवालयास तेथे लपलेल्या एखाद्या नागाला पकडण्यासाठी जर गरूडाने मथून टाकले असेल- नष्ट- भ्रष्ट करून टाकले असेल तर त्याची जशी दुरवस्था दिसून येते, तशीच दशा आज वालीची होत आहे. (हे सर्व तारेने पाहिले.) ॥२४॥
अवष्टभ्य च तिष्ठंतं ददर्श धनुरुत्तमम् ।
रामं रामानुजं चैव भर्तुश्चैव तथानुजम् ॥ २५ ॥
पुढे गेल्यावर तिने पाहिले, आपल्या तेजस्वी धनुष्यास जमिनीवर टेकवून त्याच्या आधारे राम उभे आहेत. त्यांच्या बरोबरच त्यांचे लहान भाऊ लक्ष्मण आहेत आणि तेथेच पतिचे लहान भाऊ सुग्रीवही विद्यमान आहेत. ॥२५॥
तानतीत्य समासाद्य भर्तारं निहतं रणे ।
समीक्ष्य व्यथिता भूमौ संभ्रांता निपपात ह ॥ २६ ॥
त्या सर्वांना ओलांडून ती रणभूमीमध्ये घायाळ होऊन पडलेल्या आपल्या पतिजवळ जाऊन पोहोचली. त्यांना पाहून तिच्या मनामध्ये फार व्यथा झाली. आणि ती अत्यंत व्याकुळ होऊन पृथ्वीवर कोसळली. ॥२६॥
सुप्त्वैव पुनरुत्थाय आर्यपुत्रेति क्रोशती ।
रुरोद सा पतिं दृष्ट्‍वा संदितं मृत्युदामभिः ॥ २७ ॥
नंतर जणु झोपेतूनच उठल्याप्रमाणे ’हा आर्यपुत्र !’ म्हणून मृत्युपाशात बद्ध झालेल्या पतिकडे पाहून रडू लागली. ॥२७॥
तामवेक्ष्य तु सुग्रीवः क्रोशंतीं कुररीमिव ।
विषादमगमत्कष्टं दष्ट्‍वा चाङ्‌गंदमागतम् ॥ २८ ॥
त्यासमयी टिटवीप्रमाणे करूण क्रंदन करणार्‍या तारेस आणि तिच्या बरोबरच आलेल्या अंगदास पाहून सुग्रीवास फार कष्ट झाले. ते विषादात बुडून गेले. ॥२८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकोनविंशः सर्गः ॥ १९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा एकोणीसावा सर्ग पूरा झाला. ॥१९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP