॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ बालकाण्ड ॥

॥ प्रथमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



रामहृदयम्
रामहृदय


यः पृथिवीभरवारणाय दिविजैः
     संप्रार्थितश्चिन्मयः
संजातः पृथिवीतले रविकुले
     मायामनुष्योऽव्ययः ।
निश्चक्रं हतराक्षसः पुनरगाद्
     ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां
कीर्तिं पापहरां विधाय जगतां
     तं जानकीशं भजे ॥ १ ॥
देवतांच्या प्रार्थनेनुसार पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी, ज्या चिन्मय अविनाशी प्रभूंनी पृथ्वीतलावर सूर्यवंशामध्ये माया-मानव-रूपाने अवतार घेतला आणि ज्यांनी सर्व राक्षसांना मारून जगातील पापे नाहीशी करणारी व सुस्थिर अशी आपली कीर्ती प्रस्थापित केली, आणि मग जे आपल्या आद्य ब्रह्मस्वरूपात लीन होऊन गेले, त्या श्रीजानकीनाथांचे मी भजन करतो. (१)

विश्वोद्‌भवस्थितिलयादिषु हेतुमेकं
     मायाश्रियं विगतमायमचिन्त्यमूर्तिम् ।
आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं
     सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि ॥ २ ॥
विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय इत्यादींचे जे एकमात्र कारण आहेत, ते मायापती आहेत, म्हणून माया त्यांच्या आश्रयाला आहे. जे स्वतः मायातीत आहेत, अचिंत्य-स्वरूप आहेत, आनंदघन आहेत, जे निर्मळ आहेत, जे रागादी दोषांनी रहित आहेत, तसेच जे स्वतः ज्ञानस्वरूप आहेत, त्या तत्त्व जाणणार्‍या सीतापती श्रीरामांना मी नमस्कार करतो. (२)

पठन्ति ये नित्यमनन्यचेतसः
     शृण्वन्ति चाध्यात्मिकसंज्ञितं शुभम् ।
रामायणं सर्वपुराणसंमतं
     निर्धूतपापा हरिमेव यान्ति ते ॥ ३ ॥
सर्व पुराणांना मान्य, पवित्र आणि अध्यात्म हे नाव असणार्‍या रामायणाचे म्हणजे अध्यात्मरामायणाचे नित्य पठण जे कोणी एकाग्र मनाने करतात किंवा त्याचे श्रवण करतात, ते लोक पाप-रहित होऊन श्रीहरीलाच प्राप्त होतात. (३)

अध्यात्मरामायणमेव नित्यं
     पठेद्‌यदीच्छेद्‌भवबन्धमुक्तिम् ।
गवां सहस्रायुतकोटिदानात्
     फलं लभेद्यः शृणुयात्स नित्यम् ॥ ४ ॥
जर कुणाला संसाराच्या बंधनातून सुटून जाण्याची इच्छा असेल तर त्याने अध्यात्म-रामायणाचेच पठन नित्य करावे. जो कुणी मनुष्य या अध्यात्मरामायणाचे नित्य श्रवण करतो, त्याला लक्षावधी गाई दान केल्याचे फळ प्राप्त होते. (४)

पुरारिगिरिसंभूता श्रीरामार्णवसङ्‌गता ।
अध्यात्मरामगङ्‌गेयं पुनाति भुवनत्रयम् ॥ ५ ॥
श्रीशंकररूपी पर्वतात उगम पावलेली, श्रीरामरूप समुद्राला मिळणारी ही अध्यात्म-रामायणरूपी गंगा तिन्ही लोकांना पवित्र करणारी आहे. (५)

कैलासाग्रे कदाचिद्‍रविशतविमले
     मन्दिरे रत्‍नपीठे
संविष्टं ध्याननिष्ठं त्रिनयनमभयं
     सेवितं सिद्धसंघैः ।
देवी वामाङ्‌कसंस्था गिरिवरतनया
     पार्वती भक्तिनम्रा
प्राहेदं देवमीशं सकलमलहरं
     वाक्यमानन्दकन्दम् ॥ ६ ॥
एकदा कैलास पर्वताच्या शिखरावरील, शेकडो सूर्याप्रमाणे प्रकाशमान व शुभ्र अशा मंदिरात, रत्‍नाच्या सिंहासनावर ध्याननिष्ठ होऊन बसलेल्या, सिद्धांच्या समूहाने सेविलेल्या, निर्भय, सर्व पापांचे हरण करणार्‍या, आनंदकंद असणार्‍या अशा जगन्नियंत्या देवाधिदेव भगवान त्रिनयन शंकरांना, त्यांच्याच डाव्या मांडीवर विराजमान असणारी गिरिजाकुमारी श्रीपार्वती भक्तिभावाने नम्रतापूर्वक असे म्हणाली. (६)

पार्वत्युवाच
नमोऽस्तु ते देव जगन्निवास
    सर्वात्मदृक् त्वं परमेश्वरोऽसि ।
पृच्छामि तत्त्वं पुरुषोत्तमस्य
    सनातनं त्वं च सनातनोऽसि ॥ ७ ॥
श्रीपार्वती म्हणाली- हे देवा, हे जगतन्निवासा, तुम्हांला नमस्कार असो. सर्व अंतःकरणांचे साक्षी आणि परमेश्वर तुम्ही आहात. श्रीपुरुषोत्तम भगवंतांचे सनातन तत्त्व मी तुम्हांला विचारू इच्छिते; कारण तुम्हीसुद्धा सनातन आहात. (७)

गोप्यं यदत्यन्तमनन्यवाच्यं
    वदन्ति भक्तेषु महानुभावाः ।
तदप्यहोऽहं तव देव भक्ता
    प्रियोऽसि मे त्वं वद यत्तु पृष्टम् ॥ ८ ॥
जो विषय अत्यंत गोपनीय असतो आणि जो विषय अन्य कुणालाही सांगण्यास योग्य नसतो, असा विषयसुद्धा महानुभाव लोक आपल्या भक्तांना सांगतात. हे देवा, मीसुद्धा तुमची भक्त आहे, आणि तुम्हीसुद्धा मला अत्यंत प्रिय आहात. म्हणून मी जे काही तुम्हांला विचारलेले आहे ते तुम्ही मला वर्णन करून सांगा. (८)

ज्ञानं सविज्ञानमथानुभक्ति-
    वैराग्ययुक्तं च मितं विभास्वत् ।
जानाम्यहं योषिदपि त्वदुक्तं
    यथा तथा ब्रूहि तरन्ति येन ॥ ९ ॥
पृच्छामि चान्यच्च परं रहस्यं
    तदेव चाग्रे वद वारिजाक्ष ।
ज्या ज्ञानाने या जगातील मनुष्य संसारसागरातून तरून जातात, ते भक्ती आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेले प्रकाशमय विज्ञानासहित आत्मज्ञान तुम्ही मला अशा रीतीने थोडक्यात सांगा की त्यामुळे मी स्त्री असले तरी मला ते सहज कळेल. (९)

श्रीरामचन्द्रेऽखिललोकसारे
    भक्तिर्दृढा नौर्भवति प्रसिद्धा ॥ १० ॥
हे कमलनयना, आणखी एक परम रहस्य मी तुम्हांला विचारत आहे. तुम्ही ते मला आधी सांगावे. सर्व लोकांचे सारभूत असणार्‍या अशा श्रीरामचंद्रांच्या ठायी दृढ भक्ती ही संसार-सागर तरून जाण्यासाठी प्रसिद्ध बळकट नौका आहे. (१०)

भक्तिः प्रसिद्धा भवमोक्षणाय
    नान्यत्ततः साधनमस्ति किञ्चित् ।
तथापि हृत्संशयबन्धनं मे
    विभेत्तुमर्हस्यमलोक्तिभिस्त्वम् ॥ ११ ॥
संसारातून सुटण्यासाठी भक्ती ही प्रसिद्ध असा उपाय आहे. तिच्यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही साधन नाही. तरीसुद्धा माझ्या हृदयातील संशयाची गाठ आपण आपल्या विशुद्ध वचनांनी तोडून टाकावी. (११)

वदन्ति रामं परमेकमाद्यं
    निरस्तमायागुणसंप्रवाहम् ।
भजन्ति चाहर्निशमप्रमत्ताः
    परं पदं यान्ति तथैव सिद्धाः ॥ १२ ॥
श्रीरामचंद्र हे परम, अद्वितीय, सर्वांचे आद्य कारण आणि मायेच्या गुणांच्या प्रवाहाच्या पलीकडे आहेत, असे भक्तीमध्ये दक्ष असणारे सिद्धगण सांगतात. तसेच त्यांचे अहर्निश भजन करून ते परम पदसुद्धा प्राप्त करून घेतात. (१२)

वदन्ति केचित्परमोऽपि रामः
    स्वाविद्यया संवृतमात्मसंज्ञम् ।
जानाति नात्मानमतः परेण
    सम्बोधितो वेद परात्मतत्त्वम् ॥ १३ ॥
तथापि काही लोक असे म्हणतात की जरी राम परमपुरुष असले तरीसुद्धा ते स्वतःव्या मायेने झाकले गेल्यामुळे आत्मस्वरूप जाणत नव्हते. म्हणून वसिष्ठ इत्यादी दुसर्‍यांच्या उपदेशामुळे त्यांना श्रेष्ठ असे आत्मतत्त्व कळले. (१३)

यदि स्म जानाति कुतो विलापः
    सीताकृतेऽनेन कृतः परेण ।
जानाति नैवं यदि केन सेव्यः
    समो हि सर्वैरपि जीवजातैः ॥ १४ ॥
अत्रोत्तरं किं विदितं भवद्‌भि-
    स्तद्‌ब्रूत मे संशयभेदि वाक्यम् ॥ १५ ॥
आता माझा प्रश्न असा की जर राम आत्मतत्त्व जाणत होते, तर त्या परमात्म्यांनी सीतेसाठी इतका विलाप का बरे केला ? याउलट जर त्यांना आत्मज्ञान नव्हते असे समजावे तर ते इतर सर्व सामान्य जीवाप्रमाणेच झाले. अशा स्थितीत कुणी कशासाठी त्यांचे भजन करावे ? या विषयी तुमचे काय म्हणणे आहे ? माझा संशय दूर होईल, अशा रीतीने ते आपण मला सांगा. (१४-१५)

श्रीमहादेव उवाच
धन्यासि भक्तासि परात्मनस्त्वं
    यज्ज्ञातुमिच्छा तव रामतत्त्वम् ।
पुरा न केनाप्यभिचोदितोऽहं
    वक्तुं रहस्यं परमं निगूढम् ॥ १६ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे देवी, तू धन्य आहेस. तू परमात्म्याची भक्त आहेस. म्हणूनच तुला रामांचे तत्त्व जाणून घेण्याची इच्छा झाली आहे. ते परम निगूढ रहस्य यापूर्वी मला कुणीही विचारले नव्हते. (१६)

त्वयाद्य भक्त्या परिनोदितोऽहं
    वक्ष्ये नमस्कृत्य रघूत्तमं ते ।
रामः परात्मा प्रकृतेरनादि-
    रानन्द एकः पुरुषोत्तमो हि ॥ १७ ॥
आज भक्तिपूर्वक तू मला प्रश्न केला आहेस. म्हणून रघूत्तमांना वंदन करून मी तुला ते रहस्य सांगतो. श्रीरामचंद्र हे निःसंदेहपणे प्रकृतीच्या पलीकडील परमात्मा, अनादी, आनंदघन, अद्वितीय असे पुरुषोत्तम आहेत. (१७)

स्वमायया कृत्स्नमिदं हि सृष्‍ट‍्वा
    नभोवदन्तर्बहिरास्थितो यः ।
सर्वान्तरस्थोऽपि निगूढ आत्मा
    स्वमायया सृष्टमिदं विचष्टे ॥ १८ ॥
कारण ते स्वतःच्या मायेनेच हे संपूर्ण जग निर्माण करून, आकाशाप्रमाणे त्या जगाच्या आत व बाहेर व्याप्त आहेत, तसेच तेच आत्मरूपाने सर्वांच्या अंतःकरणात गुप्तरूपाने राहातात, त्यांनी स्वतःच्या मायेने निर्माण केलेले हे जग चालविलेले आहे. (१८)

जगन्ति नित्यं परितो भ्रमन्ति
    यत्सन्निधौ चुम्बकलोहवद्धि ।
एतन्न जानन्ति विमूढचित्ताः
    स्वाविद्यया संवृतमानसा ये ॥ १९ ॥
चुंबक जवळ असताना ज्याप्रमाणे जड लोखंडात गती उत्पन्न होते, त्याचप्रमाणे त्यांच्या केवळ सांनिध्याने सगळीकडे हे सर्व विश्व सदा भ्रमण करीत राहते. रयत च्या अज्ञानामुळे ज्यांचे मन झाकले गेले आहे आणि ज्यांचे चित्त मूढ झाले आहे असे लोक ही गोष्ट जाणू शकत नाहीत. (१९)

स्वाज्ञानमप्यात्मनि शुद्धबुद्धे
    स्वारोपयन्तीह निरस्तमाये ।
संसारमेवानुसरन्ति ते वै
    पुत्रादिसक्ताः पुरुकर्मयुक्ताः ॥ २० ॥
या जगात त्या मायातीत, शुद्ध, बुद्ध अशा परमात्म्यावरसुद्धा आपल्या अज्ञानाचा आरोप जे कोणी करतात म्हणजे परमात्म्यालासुद्धा आपल्याप्रमाणे अज्ञानी मानतात, ते अज्ञानी जीव नेहमी पुत्र इत्यादींच्या ठिकाणी आसक्त राहून आणि अनेक कर्मांत गढून जाऊन संसार- चक्रातच अडकून राहतात. (२०)

जानन्ति नैवं हृदये स्थितं वै
    चामीकरं कण्ठगतं यथाऽज्ञाः ।
यथाऽप्रकाशो न तु विद्यते रवौ
    ज्योतिःस्वभावे परमेश्वरे तथा ।
विशुद्धविज्ञानघने रघूत्तमे-
    ऽविद्या कथं स्यात्परतः परात्मनि ॥ २१ ॥
ज्या प्रमाणे अज्ञानी लोक आपल्या गळ्यातच असणारा कंठा जाणत नाहीत, त्या प्रमाणे ते अज्ञ जन आपल्याच हृदयात असणार्‍या परमात्म्या रामांना जाणत नाहीत (म्हणूनच ते त्यांच्यावर अज्ञान इत्यादींचा आरोप करतात). वास्तविक पाहता ज्याप्रमाणे ज्योति स्वरूप सूर्याचे ठिकाणी अंधार कधीही असत नाही, त्याप्रमाणे प्रकृती इत्यादींच्या पलीकडे असणार्‍या, विशुद्ध विज्ञानघन, ज्योतिःस्वरूप परमेश्वर असणार्‍या अशा परमात्म्या श्रीरामांचे ठायी अविद्या कशी बरे राहू शकेल ? (२१)

यथा हि चाक्ष्णा भ्रमता गृहादिकं
    विनष्टदृष्टेर्भ्रमतीव दृश्यते ।
तथैव देहेन्द्रियकर्तुरात्मनः
    कृते परेऽध्यस्य जनो विमुह्यति ॥ २२ ॥
ज्या प्रमाणे डोळे गरगर फिरवले असता दृष्टिदोषामुळे घर वगैरे फिरल्यासारखे वाटते, त्याप्रमाणे देह-इंद्रियांच्या द्वा रा अंतःकरणाने केलेल्या कर्मांचा परमात्म्यावर आरोप करून लोक मोहित होतात. (स्वतःच्या भावनांचा आरोप लोक परमात्म्यावर करतात.) (२२)

नाहो न रात्रिः सवितुर्यथा भवेत्
    प्रकाशरूपाव्यभिचारतः क्वचित् ।
ज्ञानं तथाऽज्ञानमिदं द्वयं हरौ
    रामे कथं स्थास्यति शुद्धचिद्‍घने ॥ २३ ॥
सूर्या च्या प्रकाशरूपाचा नाश कधी होत नसल्याने, ज्या प्रमाणे सूर्याच्या बाबतीत दिवस आणि रात्र असा भेद होत नाही, त्याप्रमाणे शुद्ध, चेतनघन अशा हरिरूप रामांच्या ठिकाणी ज्ञान किंवा अज्ञान या दोन गोष्टी कशा बरे राहू शकतील ? (२३)

तस्मात्परानन्दमये रघूत्तमे
    विज्ञानरूपे हि न विद्यते तमः ।
अज्ञानसाक्षिण्यरविन्दलोचने
    मायाश्रयत्वान्न हि मोहकारणम् ॥ २४ ॥
म्हणून परानंदस्वरूप, विज्ञानरूप व अज्ञानाचा साक्षी असणार्‍या अशा कमलनयन भगवान रामांच्या ठायी अज्ञानाचा लेशसुद्धा असत नाही. कारण ते मायेचे अधिष्ठान आहेत; म्हणून ती माया श्रीरामांना मोहित करू शकत नाही. (२४)

अत्र ते कथयिष्यामि रहस्यमपि दुर्लभम् ।
सीताराममरुत्सूनु संवादं मोक्षसाधनम् ॥ २५ ॥
हे पार्वती, या बाबतीत मी तुला सीता, राम आणि पवनपुत्र हनुमान यांचा मोक्षाचे साधन-स्वरूप असणारा संवाद अत्यंत गोपनीय आणि परम दुर्लभ असला तरी सांगतो. (२५)

पुरा रामायणे रामे रावणं देवकण्टकम् ।
हत्वा रणे रणश्लाघी सपुत्रबलवाहनम् ॥ २६ ॥
सीतया सह सुग्रीवलक्ष्मणाभ्यां समन्वितः ।
अयोध्यां अगमद्‍रामो हनूमत्प्रमुखैर्वृतः ॥ २७ ॥
पूर्वी रामावताराच्या वेळी, देवांचा शत्रू असणार्‍या रावणाला त्याची संताने, सैन्ये आणि वाहने यांच्यासह युद्धकुशल श्रीरामांनी युद्धात मारले आणि सीता, सुग्रीव तसेच लक्ष्मण यांच्यासह व हनुमान इत्यादी मुख्य वानरांसह श्रीराम अयोध्या नगरीत परत आले. (२६-२७)

अभिषिक्तः परिवृतो वसिष्ठाद्यैर्महात्मभिः ।
सिंहासने समासीनः कोटिसूर्यसमप्रभः ॥ २८ ॥
तेथे त्यांच्यावर राज्याभिषेक झाला. नंतर वसिष्ठ इत्यादी महात्म्यांसमवेत कोट्यवधी सूर्यांची प्रभा असणारे श्रीराम सिंहासनावर विराजमान झाले. (२८)

दृष्ट्‍वा तदा हनूमन्तं प्राञ्जलिं पुरतः स्थितम् ।
कृतकार्यं निराकाङ्‌क्षं ज्ञानापेक्षं महामतिम् ॥ २९ ॥
रामः सीतामुवाचेदं ब्रूहि तत्त्वं हनूमते ।
निष्कल्मषोऽयं ज्ञानस्य पात्रं नौ नित्यभक्तिमान् ॥ ३० ॥
त्या वेळी कृतकृत्य झाल्यामुळे निरपेक्ष असलेल्या व केवळ ज्ञानाची अपेक्षा करणार्‍या महाबुद्धिवान हनुमंताला हात जोडून पुढे उभा असलेला पाहून, श्रीरामचंद्रांनी सीतेला म्हटले, "सीते, या हनुमानाची आपणा दोघांवर अढळ भक्ती आहे आणि तो पापरहित आहे आणि म्हणूनच तो ज्ञानाचा स्वीकार करण्यास पात्र आहे, म्हणून तू या हनुमानाला माझ्या खर्‍या स्वरूपाचा उपदेश कर. " (२९-३०)

तथेति जानकी प्राह तत्त्वं रामस्य निश्चितम् ।
हनूमते प्रपन्नाय सीता लोकविमोहिनी ॥ ३१ ॥
तेव्हा लोकांना मोहित करणारी जनककन्या सीता "ठीक आहे," असे म्हणाली. नंतर ती शरणागत हनुमंताला भगवान श्रीरामांचे निश्चित तत्त्व सांगू लागली. (३१)

श्री सीता उवाच
रामं विद्धि परं ब्रह्म सच्चिदानन्दमद्वयम् ।
सर्वोपाधिविनिर्मुक्तं सत्तामात्रमगोचरम् ॥ ३२ ॥
आनन्दं निर्मलं शान्तं निर्विकारं निरञ्जनम् ।
सर्वव्यापिनमात्मानं स्वप्रकाशमकल्मषम् ॥ ३३ ॥
श्रीसीता म्हणाली-"वत्स हनुमाना, राम हे साक्षात अद्वितीय सच्चिदानंदघन परब्रह्म आहेत, असे तू समज. ते सर्व उपाधींनी रहित, केवळ सत्ता हे स्वरूप असणारे, मन व इंद्रिये यांचा विषय नसणारे, आनंदघन, निर्मळ, शांत व विकाररहित, निरंजन, सर्वव्यापक, स्वयंप्रकाशी आणि रागादी दोषरहित परमात्मा आहेत. (३२-३३)

मां विद्धि मूलप्रकृतिं सर्गस्थित्यन्तकारिणीम् ।
तस्य सन्निधिमात्रेण सृजामीदमतन्द्रिता ॥ ३४ ॥
आणि विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि अंत करणारी मूल प्रकृती मी आहे हे तू समजून घे आणि त्या श्रीरामांच्या केवळ सान्निध्यामुळे मी निरलसपणे हे विश्व उत्पन्न करते. (३४)

तत्सान्निध्यान्मया सृष्टं तस्मिन्नारोप्यतेऽबुधैः ।
अयोध्यानगरे जन्म रघुवंशेऽतिनिर्मले ॥ ३५ ॥
विश्वामित्रसहायत्वं मखसंरक्षणं ततः ।
अहल्याशापशमनं चापभङ्‌गो महेशितुः ॥ ३६ ॥
मत्पाणिग्रहणं पश्चाद्‌भार्गवस्य मदक्षयः ।
अयोध्यानगरे वासो मया द्वादशवार्षिकः ॥ ३७ ॥
दण्डकारण्यगमनं विराधवध एव च ।
मायामारीचमरणं मायासीताहृतिस्तथा ॥ ३८ ॥
जटायुषो मोक्षलाभः कबन्धस्य तथैव च ।
शबर्याः पूजनं पश्चात्सुग्रीवेण समागमः ॥ ३९ ॥
वालिनश्च वधः पश्चात् सीतान्वेषणमेव च ।
सेतुबन्धश्च जलधौ लङ्‌कायाश्च निरोधनम् ॥ ४० ॥
रावणस्य वधो युद्धे सपुत्रस्य दुरात्मनः ।
विभीषणे राज्यदानं पुष्पकेण मया सह ॥ ४१ ॥
अयोध्यागमनं पश्चाद्‌राज्ये रामाभिषेचनम् ।
एवं आदीनि कर्माणि मयैवाचरितान्यपि
आरोपयन्ति रामेऽस्मिन्निर्विकारेऽखिलात्मनि ॥ ४२ ॥
तथापि रामांच्या सान्निध्याने मी निर्माण केलेले हे विश्व अज्ञानी लोक त्या रामांवर आरोपित करतात. अयोध्या नगरीमध्ये अतिशय पवित्र रघुकुळात रामांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी विश्वामित्रांना साहाय्य करणे, त्या विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करणे, अहल्येला शापातून मुक्त करणे, श्रीमहादेवांचे धनुष्य भंग करणे, नंतर माझे पाणिग्रहण करणे, भार्गव परशुरामांचा गर्व खंडन करणे, माझ्यासह बारा वर्षेपर्यंत अयोध्यानगरीत राहणे, मग दंडकारण्यात जाणे, विराधाचा वध करणे, माया-मृग रूपातील मारीचाचे मरण, मायासीतेचे अपहरण होणे, जटायू तसेच कबंध यांना मोक्षाचा लाभ होणे, शबरीने केलेले रामाचे पूजन, नंतर सुग्रीवाशी मैत्री, वालीचा वध, सीतेचा शोध, समुद्रावर सेतू बांधणे, लंकेला वेढा घालणे, पुत्रांसह दुरात्म्या रावणाचा युद्धामध्ये वध करणे, बिभीषणाला लंकेचे राज्य देणे, पुष्पक विमानातून माझ्याबरोबर अयोध्येला परत येणे, त्यानंतर राज्यावर रामांचा राज्याभिषेक होणे-अशा प्रकारची ही सर्व कर्मे जरी मीच केलेली आहेत, तरीही अज्ञानी लोक ती कर्मे निर्विकार, सर्वांचा आत्मा असे जे राम त्यांच्यावर आरोपित करतात. (३५-४२)

रामो न गच्छति न तिष्ठति नानुशोच-
त्याकाङ्‌क्षते त्यजति नो न करोति किञ्चित् ।
आनन्दमूर्तिरचलः परिणामहीनो
मायागुणाननुगतो हि तथा विभाति ॥ ४३ ॥
तत्त्वतःश्रीराम सर्वव्यापी असल्याने कुठेही जात नाहीत, कुठेही राहात नाहीत, शोक करीत नाहीत, इच्छा करीत नाहीत, त्याग करीत नाहीत, तसेच अन्य कोणतीही क्रिया ते करीत नाहीत. ते आनंदस्वरूप, अविचल, आणि विकार-रहित आहेत; तथापि मायेच्या गुणांशी संबंध आल्यामुळे ते तसे भासतात." (४३)

ततो रामः स्वयं प्राह हनूमन्तमुपस्थितम् ।
शृणु तत्त्वं प्रवक्ष्यामि ह्यात्मानात्मपरात्मनाम् ॥ ४४ ॥
श्रीमहादेव म्हणाले- त्यानंतर समुख उपस्थित असणार्‍या हनुमंताला राम स्वतः म्हणाले, " आत्मा, अनात्मा आणि परमात्मा यांचे तत्त्व मी तुला सांगतो. ते तू लक्षपूर्वक ऐक. (४४)

आकाशस्य यथा भेदस्त्रिविधो दृश्यते महान् ।
जलाशये महाकाशस्तदवच्छिन्न एव हि ।
प्रतिबिंबाख्यमपरं दृश्यते त्रिविधं नभः ॥ ४५ ॥
ज्या प्रमाणे आकाशाचे तीन प्रकारचे मोठे भेद स्पष्टपणे दिसून येतात. एक महाकाश दुसरे जलाशयाने मर्यादित झालेले आकाश आणि तिसरे प्रतिबिंब हे नाव असणारे आकाश. अशा प्रकारे तीन प्रकारचे आकाश दिसून येते. (४५)

बुद्ध्यवच्छिन्नचैतन्यमेकं पूर्णमथापरम् ।
आभासस्त्वपरं बिम्बभूतमेवं त्रिधा चितिः ॥ ४६ ॥
त्याप्रमाणेच चैतन्य हेसुद्धा तीन प्रकारचे आहे- एक बुद्धीची मर्यादा असणारे चैतन्य (ते बुद्धीमध्ये व्याप्त असते). दुसरे परिपूर्ण असणारे चैतन्य आणि तिसरे जे बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेले असते या तिसर्‍या चैतन्याला आभास चैतन्य असे म्हणतात. (४६)

साभासबुद्धेः कर्तृत्वमविच्छिन्नेऽविकारिणि ।
साक्षिण्यारोप्यते भ्रान्त्या जीवत्वं च तथा बुधैः ॥४७ ॥
यांतील केवळ आभास चैतन्याने युक्त अशा बुद्धीमध्येच कर्तेपण असते म्हणजे चिदाभासराहित असणारी बुद्धी हीच सर्व कार्ये करते; परंतु अज्ञ जन भ्रांतीमुळे अखंड, निर्विकार, साक्षी अशा आत्म्यावर कर्तृत्व आणि जीवत्व यांचा आरोप करतात. म्हणजे ते अज्ञानी लोक त्या आत्म्यालाच कर्ता आणि भोक्ता समजतात. (४७)

आभासस्तु मृषा बुद्धिरविद्याकार्यमुच्यते ।
अविच्छिन्नं तु तद्‌ब्रह्म विच्छेदस्तु विकल्पतः ॥ ४८ ॥
(ज्याला आम्ही जीव म्हटले आहे) ते आभास चैतन्य हे मिथ्या आहे (कारण सर्वच आभास हे मिथ्याच असतात). बुद्धी ही अविद्येचे कार्य आहे. तथापि तो परब्रह्म परमात्मा हा वास्तविक अखंड आहे; म्हणून त्याचा भाग मानणे ही केवळ कल्पना आहे. (४८)

अविच्छिन्नस्य पूर्णेन एकत्वं प्रतिपाद्यते ।
तत्त्वमस्यादिवाक्यैश्च साभासस्याहमस्तथा ॥ ४९ ॥
अहं (मी) च्या रूपाने प्रत्ययाला येणारे, मर्यादित, साभास (वासनायुक्त) चैतन्य म्हणजेच जीव. 'तत्त्वमसि' (तेच तू आहेस) इत्यादी वाक्यांनी त्याचे पूर्ण चैतन्य परब्रह्माशी एकत्व प्रतिपादन केले जाते. (४९)

ऐक्यज्ञानं यदोत्पन्नं महावाक्येन चात्मनोः ।
तदाऽविद्या स्वकार्यैश्च नश्यत्येव न संशयः ॥ ५० ॥
जेव्हा (गुरूपदिष्ट, तत्त्वमस्यादी) महावाक्यांचे द्वारा जीवात्मा व परमात्मा यांच्या एकतेचे ज्ञान उत्पन्न होते, तेव्हा आपल्या बुद्ध्यादी कार्यासह अविद्या ही नष्टच होऊन जाते, यात काहीही संदेह नाही. (५०)

एतद्विज्ञाय मद्‌भक्तो मद्‌भावायोपपद्यते ।
मद्‌भक्तिविमुखानां हि शास्त्रगर्तेषु मुह्यताम् ।
न ज्ञानं न च मोक्षः स्यात्तेषां जन्मशतैरपि ॥ ५१ ॥
याचा अनुभव येताच माझा भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. परंतु जे लोक माझी भक्ती सोडून देऊन, शास्त्ररूपी खड्यामध्ये पडून भटकत राहतात, त्यांना शेकडो जन्मांपर्यंतसुद्धा ज्ञानही होत नाही आणि मोक्षही प्राप्त होत नाही. (५१)

इदं रहस्यं हृदयं ममात्मनो
    मयैव साक्षात्कथितं तवानघ ।
मद्‌भक्तिहीनाय शठाय न त्वया
    दातव्यमैन्द्रादपि राज्यतोऽधिकम् ॥ ५२ ॥
हे निष्पाप हनुमंता, हे परम रहस्य आत्मस्वरूप अशा माझे हृदय आहे आणि प्रत्यक्ष मीच ते तुला सांगितले आहे. जरी तुला इंद्रलोकातील राज्यापेक्षा अधिक संपत्ती मिळाली, तरीसुद्धा तू हे रहस्य माझी भक्ती न करणार्‍या कोणत्याही दुष्ट पुरुषाला सांगू नकोस." (५२)

श्रीमहादेव उवाच
एतत्तेऽभिहितं देवि श्रीरामहृदयं मया ।
अतिगुह्यतमं हृद्यं पवित्रं पापशोधनम् ॥ ५३ ॥
श्रीमहादेव म्हणाले- " हे देवी, हे अत्यंत गोपनीय, मनोहर, परम पवित्र आणि पापनाशक श्रीरामहृदय मी तुला सांगितले आहे. (५३)

साक्षाद्‍रामेण कथितं सर्ववेदान्तसंग्रहम् ।
यः पठेत्सततं भक्त्या स मुक्तो नात्र संशयः ॥ ५४ ॥
सर्व वेदांतांचे सार साक्षात श्रीरामचंद्रांनी सांगितले आहे. भक्तिपूर्वक जो कोणी याचे सतत पठन करतो, तो निःसंशयपणाने मुक्त होऊन जातो. (५४)

ब्रह्महत्यादि पापानि बहुजन्मार्जितान्यपि ।
नश्यन्त्येव न सन्देहो रामस्य वचनं यथा ॥ ५५ ॥
याच्या पठनाने अनेक जन्मांत संचित झालेली ब्रह्महत्या इत्यादी सर्व पापेसुद्धा निःसंदेहपणे नष्ट होऊन जातात असे श्रीरामांचेच वचन आहे. (५५)

योऽतिभ्रष्टोऽतिपापी परधनपर-
     दारेषु नित्योद्यतो वा
स्तेयी ब्रह्मघ्नमातापितृवधनिरतो
     योगिवृन्दापकारी
यः संपूज्याभिरामं पठति च हृदयं
     रामचन्द्रस्य भक्त्या
योगीन्द्रैरप्यलभ्यं पदमिह लभते
     सर्वदेवैः स पूज्यम् ॥ ५६ ॥
जो कुणी अतिशय भ्रष्ट असेल, अतिशय पापी असेल, परधन आणि परस्त्री यांच्या ठिकाणी नित्य प्रवृत्त होणारा असेल, जो चोर असेल, ब्रह्महत्या करणारा असेल, जो मातापित्याचा वध करण्यात गुंतलेला असेल आणि जो योगिजनांच्या समूहाचे अहित करणारा मनुष्य असेल, तोसुद्धा जर श्रीरामचंद्रांचे पूजन करून आणि सुंदर अशा रामहृदयाचे भक्तिपूर्वक पठन करील तर तो पूर्वसंचित पापांतून मुक्त होऊन सर्व देवांना पूज्य आणि श्रेष्ठ योग्यांनासुद्धा परम दुर्लभ असे परम पद प्राप्त करून घेईल. " (५६)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
बालकाण्डे श्रीरामहृदयं नाम प्रथमः सर्गः ॥ १ ॥
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे बालकाण्ड श्रीरामहृदयं नाम प्रथमः सर्गः ॥ १ ॥


GO TOP