[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ चतुश्चत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण मारीचस्य वधस्तत्कर्तृकं सीतालक्ष्मणाह्वानशब्दं श्रुत्वा श्रीरामस्य चिन्ता -
श्रीरामांच्या द्वारा मारीचाचा वध आणि त्याच्या द्वारा सीता आणि लक्ष्मण यांना हाका मारल्याचा शब्द ऐकून श्रीरामांना चिंता -
तथा तु तं समादिश्य भ्रातरं रघुनन्दनः ।
बबन्धासिं महातेजा जाम्बूनदमयत्सरुम् ॥ १ ॥
लक्ष्मणाला या प्रकारे आदेश देऊन रघुनंदन महातेजस्वी श्रीरामांनी सोन्याची मूठ असणारी तलवार कमरेला बांधली. ॥१॥
ततस्त्रिविनतं चापमादायात्मविभूषणम् ।
आबध्य च कलापौ द्वौ जगामोदग्रविक्रमः ॥ २ ॥
त्यानंतर महापराक्रमी रघुनाथांनी तीन ठिकाणी वाकलेले आपले आभूषणरूप धनुष्य हाती घेऊन पाठीवर दोन भाते बांधले आणि ते तेथून निघाले. ॥२॥
तं वन्यराजो राजेन्द्रमापतन्तं निरीक्ष्य वै ।
बभूवान्तर्हितस्त्रासात् पुनः सन्दर्शनेऽभवत् ॥ ३ ॥
राजाधिराज श्रीरामांना येतांना पाहून तो वन्य मृगांचा राजा कांचनमृग भयाने लपला परंतु नंतर लगेचच तो त्यांच्या दृष्टिपथात आला. ॥३॥
बद्धासिर्धनुरादाय प्रदुद्राव यतो मृगः ।
तं स्म पश्यति रूपेण द्योतमानमिवाग्रतः ॥ ४ ॥

अवेक्ष्यावेक्ष्य धावन्तं धनुष्पाणिर्महावने ।
अतिवृत्तमिवोत्पाताल्लोभयानं कदाचन ॥ ५ ॥

शङ्‌कितं तु समुद्‌भ्रान्तमुत्पतन्तमिवाम्बरम् ।
दृश्यमानमदृश्यं च वनोद्देशेषु केषुचित् ॥ ६ ॥

छिन्नभ्रैरिव संवीतं शारदं चन्द्रमण्डलम् ।
मुहर्तादेव ददृशे मुहुर्दूरात् प्रकाशते ॥ ७ ॥
तेव्हा तलवार बांधलेले आणि धनुष्य घेतलेले राम ज्या बाजूस तो मृग होता त्या बाजूस धावले. धनुर्धर रामांनी पाहिले की तो आपल्या रूपाने समोरच्या दिशेला जणु प्रकाशित करीत होता. त्या महान वनात तो मागे वळून पहात पहात पुढे धावत होता. कधी उडी मारून खूप दूर निघून जात होता आणि कधी इतक्या जवळ दिसून येत होता की हाताने पकडण्याचा मोह उत्पन्न करीत होता. कधी घाबरलेला तर कधी भयभीत झालेला आणि कधी आकाशांत उडी मारत असलेला दिसून येत होता. कधी वनाच्या एखाद्या भागात लपून अदृश्य होऊन जणु शरदऋतुतील चंद्रमण्डल मेघखण्डाने आवृत्त व्हावे तसा भासत होता. एक मुहूर्तभरातच तो जवळ दिसून येई तर पुन्हा खूप दूरच्या स्थानी चमकून उठे. ॥४-७॥
दर्शनादर्शनेनैव सोऽपाकर्षत राघवम् ।
सुदूरमाश्रमस्यास्य मारीचो मृगतां गतः ॥ ८ ॥
या प्रकारे कधी प्रकटत तर कधी लपत त्या मृगरूप धारी मारीचाने राघवांना त्यांच्या आश्रमापासून खूप दूर अंतरावर ओढून नेले. ॥८॥
आसीत् क्रुद्धस्तु काकुत्स्थो विवशस्तेन मोहितः ।
अथावतस्थे सुश्रान्तश्छायामाश्रित्य शाद्‌वले ॥ ९ ॥
त्या समयी त्याच्या मुळे मोहित आणि विवश होऊन काकुत्स्थ राम काहीसे कुपित झाले आणि थकून एका जागी छायेचा आश्रय घेऊन हिरव्यागार भूमीवर उभे राहिले. ॥९॥
स तमुन्मादयामास मृगरूपो निशाचरः ।
मृगैः परिवृतोऽथान्यैरदूरात् प्रत्यदृश्यत ॥ १० ॥
या मृगरूपधारी निशाचराने त्यांना जणु उन्मत्तसे बनविले होते. थोड्‍याच वेळाने तो दुसर्‍या मृगांनी घेरलेला असा जवळच दिसून आला. ॥१०॥
ग्रहीतुकामं दृष्ट्‍वा तं पुनरेवाभ्यधावत ।
तत्क्षणादेव सन्त्रासात् पुनरन्तर्हितोऽभवत् ॥ ११ ॥
श्रीराम मला पकडू इच्छित आहेत हे पाहून तो परत पळाला आणि भयामुळे पुन्हा तात्काळ अदृश्य झाला. ॥११॥
पुनरेव ततो दूराद् वृक्षखण्डाद् विनिःसृतः ।
दृष्ट्‍वा रामो महातेजास्तं हन्तुं कृतनिश्चयः ॥ १२ ॥
त्यानंतर तो पुन्हा दूरवर्ती वृक्ष समूहातून बाहेर पडला. त्याला पाहिल्यानंतर महातेजस्वी श्रीरामांनी त्यास ठार मारून टाकण्याचा निश्चय केला. ॥१२॥
भूयस्तु शरमुद्धृत्य कुपितस्तत्र राघवः ।
सूर्यरश्मिप्रतीकाशं ज्वलन्तमरिमर्दनम् ॥ १३ ॥

सन्धाय सुदृढे चापे विकृष्य बलवद्‌बली ।
तमेव मृगमुद्दिश्य श्वसन्तमिव पन्नगम् ॥ १४ ॥

मुमोच ज्वलितं दीप्तमस्त्रं ब्रह्मविनिर्मितम् ।
तेव्हां तेथे क्रोधाविष्ट झालेल्या बलवान राघवेन्द्रांनी भात्यातून सूर्यकिरणांप्रमाणे तेजस्वी एक प्रज्वलित आणि शत्रु-संहारक बाण काढून तो आपल्या सुदृढ धनुष्यावर ठेवला आणि त्या धनुष्यास जोराने खेचून त्या मृगालाच लक्ष्य बनवून फुसकारणार्‍या सर्पासमान सणसणणारा तो प्रज्वलित आणि तेजस्वी बाण, जो ब्रह्मदेवांनी दिलेला होता, सोडला. ॥१३-१४ १/२॥
शरीरं मृगरूपस्य विनिर्भिद्य शरोत्तमः ॥ १५ ॥
वज्रासमान तेजस्वी त्या उत्तम बाणाने मृगरूपधारी मारीचाचे शरीर चिरून टाकून त्याच्या हृदयासही विदीर्ण केले. ॥१५॥
मारीचस्यैव हृदयं बिभेदाशनिसंनिभः ।
तालमात्रमथोत्प्लुत्य न्यपतत् स भृशातुरः ॥ १६ ॥
त्याच्या आघाताने अत्यंत आतुर होऊन तो राक्षस ताडाप्रमाणे उसळी मारून पृथ्वीवर कोसळून पडला. त्याचे जीवन समाप्त होऊ लागले. पृथ्वीवर पडल्या पडल्या तो भयंकर गर्जना करू लागला. ॥१६॥
व्यनदद् भैरवं नादं धरण्यामल्पजीवितः ।
म्रियमाणस्तु मारीचो जहौ तां कृत्रिमां तनुम् ॥ १७ ॥

स्मृत्वा तद्वचनं रक्षो दध्यौ केन तु लक्ष्मणम् ।
इह प्रस्थापयेत् सीता तां शून्ये रावणो हरेत् ॥ १८ ॥
मरते समयी मारीचाने आपल्या कृत्रिम शरीराचा त्याग केला. नंतर रावणाच्या वचनाचे स्मरण करून त्या राक्षसाने विचार केला की कुठल्या उपायाने सीता लक्ष्मणास येथे धाडून देईल आणि शून्य आश्रमांतून रावण तिचे हरण करून तिला घेऊन जाईल. ॥१७-१८॥
स प्राप्तकालमाज्ञाय चकार च ततः स्वनम् ।
सदृशं राघवस्यैव हा सीते लक्ष्मणेति च ॥ १९ ॥
रावणाने सांगितलेला उपाय करण्याची वेळ आलेली आहे- हे समजून त्याने राघवासारख्या स्वरात ’हा सीते ! हा लक्ष्मणा !’ अशा हाका मारल्या. ॥१९॥
तेन मर्मणि निर्विद्धं शरेणानुपमेन हि ।
मृगरूपं तु तत् त्यक्त्वा राक्षसं रूपमास्थितः ॥ २० ॥
श्रीरामांच्या अनुपम बाणाने त्याचे मर्म विदीर्ण झालेलेच होते म्हणून त्या मृगरूपाचा त्याग करून त्याने राक्षसरूप धारण केले. ॥२०॥
चक्रे स सुमहाकायं मारीचो जीवितं त्यजन् ।
तं दृष्ट्‍वा पतितं भूमौ राक्षसं भीमदर्शनम् ॥ २१ ॥

रामो रुधिरसिक्ताङ्‌गं वेष्टमानं महीतले ।
जगाम मनसा सीतां लक्ष्मणस्य वचः स्मरन् ॥ २२ ॥
प्राणत्याग करते समयी मारीचाने आपले शरीर खूपच विशाल बनविले. भयंकर दिसणार्‍या त्या राक्षसाला रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडून तळमळत असलेला पाहून श्रीरामांना लक्ष्मणांचे बोलणे आठवले आणि ते मनातल्या मनात सीतेची चिंता करू लागले. ॥२१-२२॥
मारीचस्य तु मायैषा पूर्वोक्तं लक्ष्णेन तु ।
तत् तथा ह्यभवच्चाद्य मारीचोऽयं मया हतः ॥ २३ ॥
ते विचार करू लागले - अहो ! जसे प्रथम लक्ष्मणाने म्हटले होते त्यास अनुसरून ही वास्तविक मारीचाची मायाच होती. लक्ष्मणाचे म्हणणे खरे ठरले. आज माझ्याकडून हा मारीचच मारला गेला आहे. ॥२३॥
हा सीते लक्ष्मणेत्येवमाक्रुश्य तु महास्वनम् ।
ममार राक्षसः सोऽयं श्रुत्वा सीता कथं भवेत् ॥ २४ ॥

लक्ष्मणश्च महाबाहुः कामवस्थां गमिष्यति ।
परंतु हा राक्षस उच्चस्वराने ’हा सीते ! हा लक्ष्मणा !’ असे ओरडून मेला आहे. त्याचा तो शब्द ऐकून सीतेची काय अवस्था होऊन जाईल आणि महाबाहु लक्ष्मणाचीही काय दशा होईल ? ॥२४ १/२॥
इति संचिन्त्य धर्मात्मा रामो हृष्टतनूरुहः ॥ २५ ॥

तत्र रामं भयं तीव्रमाविवेश विषादजम् ।
राक्षसं मृगरूपं तं हत्वा श्रुत्वा च तत्स्वनम् ॥ २६ ॥
असा विचार करून धर्मात्मा श्रीरामांच्या अंगावर काटा आला. त्या समयी तेथे त्या मृगरूपधारी राक्षसाला मारून आणि त्याचा तो शब्द ऐकून श्रीरामांच्या मनात विषादजनित तीव्र भय उत्पन्न झाले. ॥२५-२६॥
निहत्य पृषतं चान्यं मांसमादाय राघवः ।
त्वरमाणो जनस्थानं ससाराभिमुखं तदा ॥ २७ ॥
त्या लोक विलक्षण मृगाचा वध करून तपस्व्यांनी उपयोगात आणण्यास योग्य फळे-मुळे घेऊन श्रीराम तात्काळच जनस्थानाच्या निकटवर्ती पंचवटीत स्थित असलेल्या आपल्या आश्रमाकडे मोठ्‍या घाईगर्दीने निघाले. ॥२७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे चतुश्चत्वारिंशः सर्गः ॥ ४४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा चव्वेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP