श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकादशाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मन्दोदर्या विलापो रावणशवस्य दाहश्च -
मंदोदरीचा विलाप तसेच रावणाच्या शवाचा दाहसंस्कार -
तासां विलपमानानां तथा राक्षसयोषिताम् ।
ज्येष्ठा पत्‍नी प्रिया दीना भर्तारं समुदैक्षत ।। १ ।।

दशग्रीवं हतं दृष्ट्‍वा रामेणाचिन्त्यकर्मणा ।
पतिं मन्दोदरी तत्र कृपणा पर्यदेवयत् ।। २ ।।
त्या समयी विलाप करणार्‍या त्या राक्षसींमध्ये जी रावणाची ज्येष्ठ आणि प्रिय पत्‍नी मंदोदरी होती, तिने अचिंत्यकर्मा भगवान्‌ श्रीरामांच्या द्वारे मारले गेलेल्या आपला पति रावण यास पाहिले. पतिला त्या अवस्थेत पाहून तेथे ती अत्यंत दीन आणि दुःखी झाली आणि या प्रकारे विलाप करु लागली - ॥१-२॥
ननु नाम महाभाग तव वैश्रवणानुज ।
क्रुद्धस्य प्रमुखे स्थातुं त्रस्यत्यपि पुरन्दरः ।। ३ ।।
महाराज कुबेरांचे धाकटे बंधु ! महाबाहु राक्षसराज ! जेव्हा आपण क्रोध करीत होता त्यासमयी इंद्रालाही आपल्या समोर उभे राहण्यास भय वाटत असे. ॥३॥
ऋषयश्च महान्तोऽपि गन्धर्वाश्च यशस्विनः ।
ननु नाम तवोद्वेगात् चारणाश्च दिशो गताः ।। ४ ।।
मोठ मोठे ऋषि, यशस्वी गंधर्व आणि चारणही आपल्या भयाने चारी दिशास पळून गेले होते. ॥४॥
स त्वं मानुषमात्रेण रामेण युधि निर्जितः ।
न व्यपत्रपसे राजन् किमिदं राक्षसेश्वर ।। ५ ।।
तेच आपण आज युद्धात एका मानवमात्र रामांकडून परास्त झालात. राजन्‌ ! काय आपल्याला याबद्दल लज्जा वाटत नाही ? बोला तर खरे ही काय गोष्ट आहे ? ॥५॥
कथं त्रैलोक्यमाक्रम्य श्रिया वीर्येण चान्वितम् ।
अविषह्यं जघान त्वां मानुषो वनगोचरः ।। ६ ।।
आपण तीन्ही लोकांना जिंकून आपल्याला संपत्तिशाली आणि पराक्रमी बनविले होते. आपला वेग सहन करणे कुणालाही संभव नव्हते मग आपल्या सारख्या वीराला एका वनवासी मनुष्याने कसे मारून टाकले ? ॥६॥
मानुषाणामविषये चरतः कामरूपिणः ।
विनाशस्तव रामेण संयुगे नोपपद्यते ।। ७ ।।
आपण अशा देशात विचरत होतात की जेथे मनुष्य पोहोचू शकत नव्हता. आपण इच्छेनुसार रूप धारण करण्यास समर्थ होतात तरीही युद्धाच्या समयी रामांच्या हातून आपला विनाश झाला हे संभवनीय अथवा विश्वास ठेवण्यास योग्य वाटत नाही. ॥७॥
न चैतत् कर्म रामस्य श्रद्दधामि चमूमुखे ।
सर्वतः समुपेतस्य तव तेनाभिमर्षणम् ।। ८ ।।
युद्धाच्या तोंडावरच सर्व बाजुस विजय मिळविणार्‍या आपला श्रीरामांच्या द्वारा पराजय झाला. हे काम श्रीरामांचे आहे असा मला विश्वासच वाटत नाही. (कारण की आपण त्यांना केवळ मनुष्यच समजत होता.) ॥८॥
अथवा रामरूपेण कृतान्तः स्वयमागतः ।
मायां तव विनाशाय विधायाप्रतितर्किताम् ॥ ९ ॥
अथवा साक्षात काळच अतर्क्य माया रचून आपल्या विनाशासाठी श्रीरामांच्या रूपाने येथे येऊन पोहोंचला होता. ॥९॥
अथवा वासवेन त्वं धर्षितोऽसि महाबल ।
वासवस्य तु का शक्तिः त्वां द्रष्टुमपि संयुगे ॥ १० ॥

महाबलं महावीर्यं देवशत्रुं महौजसम् ।
महाबली वीरा ! अथवा हेही संभव आहे की साक्षात्‌ इंद्रानेच आपल्यावर आक्रमण केले असावे परंतु इंद्राची काय शक्ति आहे की युद्धात तो आपल्याकडे डोळे उघडून पाहू शकेल, कारण आपण महाबली, महापराक्रमी आणि महातेजस्वी देवशत्रु होतात. ॥१० १/२॥
व्यक्तमेष महायोगी परमात्मा सनातनः ॥ ११ ॥

अनादिमध्यनिधनो महतः परमो महान् ।
तमसः परमो धाता शङ्‌खचक्रगदाधरः ॥ १२ ॥

श्रीवत्सवक्षा नित्यश्रीः अजय्यः शाश्वतो ध्रुवः ।
मानुषं रूपमास्थाय विष्णुः सत्यपराक्रमः ॥ १३ ॥

सर्वैः परिवृतो देवैः वानरत्वमुपागतैः ।
सर्वलोकेश्वरः श्रीमान् लोकानां हितकाम्यया ॥ १४ ॥

स राक्षसपरिवारं देवशत्रुं भयावहम् ।
निश्चितच हे श्रीरामचंद्र महान्‌ योगी तसेच सनातन परमात्मा आहेत, त्यांना आदि, मध्य आणि अंत नाही आहे. हे महानाहून महान्‌ अज्ञानरूपी अंधःकाराच्याहून पर तसेच सर्वांना धारण करणारे परमेश्वर आहेत, जे आपल्या हातात शङ्‌ख, चक्र आणि गदा धारण करतात, ज्यांच्या वक्षःस्थळावर श्रीवत्साचे चिह्न आहे, भगवती लक्ष्मी ज्यांचा साथ कधी सोडत नाही, ज्यांना परास्त करणे सर्वथा असंभव आहे, तसेच जे नित्य स्थिर एवं संपूर्ण लोकांचे अधीश्वर आहेत, त्या सत्यपराक्रमी भगवान्‌ विष्णुंनाच समस्त लोकांचे हित करण्याच्या इच्छेने मनुष्याचे रूप धारण करून वानररूपाने प्रकट झालेल्या संपूर्ण देवतांबरोबर येऊन राक्षसांसहित आपला वध केला आहे, कारण आपण देवतांचे शत्रु आणि समस्त संसारासाठी भयंकर होतात. ॥११-१४ १/२॥
इन्द्रियाणि पुरा जित्वा जितं त्रिभुवनं त्वया ॥ १५ ॥

स्मरद्‌भिरिव तद् वैरं इन्द्रियैरेव निर्जितः ।
नाथ ! प्रथम आपण आपल्या इंद्रियांना जिंकूनच तीन्ही लोकांवर विजय प्राप्त केला होता, ते वैर लक्षात ठेवून जणु इंद्रियांनीच आता आपल्याला परास्त केले आहे. ॥१५ १/२॥
यदैव हि जनस्थाने राक्षसैर्बहुभिर्वृतः ॥ १६ ॥

खरस्तु निहतो भ्राता तदा रामो न मानुषः ।
जेव्हा मी ऐकले की जनस्थानात बर्‍याचशा राक्षसांनी घेरलेले असूनही आपले भाऊ खर यांना श्रीरामांनी मारून टाकले आहे तेव्हाच मला विश्वास वाटला की श्रीराम कोणी साधारण मनुष्य नाही आहेत. ॥१६ १/२॥
यदैव नगरीं लङ्‌कां दुष्प्रवेशां सुरैरपि ॥ १७ ॥

प्रविष्टो हनुमान् वीर्यात् तदैव व्यथिता वयम् ।
ज्या लंकानगरीत देवतांचाही प्रवेश होणे कठीण होते तेथे जेव्हा हनुमान्‌ बलपूर्वक घुसून आले त्याच वेळी भावी अनिष्टाच्या आशंकेने आम्ही व्यथित झालो होतो. ॥१७ १/२॥
क्रियतामविरोधश्च राघवेणेति यन्मया ॥ १८ ॥

उच्यमानो न गृह्णासि तस्येयं व्युष्टिरागता ।
मी वारंवार सांगितले होते -प्राणनाथ ! आपण राघवांशी वैर-विरोध करू नये, परंतु आपण माझे म्हणणे ऐकले नाही. त्याचेच आज हे फळ मिळाले आहे. ॥१८ १/२॥
अकस्माच्चाभिकामोऽसि सीतां राक्षसपुङ्‌गव ॥ १९ ॥

ऐश्वर्यस्य विनाशाय देहस्य स्वजनस्य च ।
राक्षसराज ! आपण आपल्या ऐश्वर्याचा, शरीराचा तसेच स्वजनांचा विनाश करण्यासाठीच अकस्मात्‌ सीतेची कामना केली होती. ॥१९ १/२॥
अरुन्धत्या विशिष्टां तां रोहिण्याश्चापि दुर्मते ।। २० ।।

सीतां धर्षयता मान्यां त्वया ह्यसदृशं कृतम् ।
वसुधायाश्च वसुधां श्रियः श्रीं भर्तृवत्सलाम् ॥ २१ ॥
दुर्मते ! भगवती सीता अरुंधती आणि रोहिणी यांच्याहूनही श्रेष्ठ पतिव्रता आहे. ती वसुधेचीही वसुधा आणि श्रीचीही श्री आहे. आपल्या स्वामींच्या प्रति अनन्य अनुराग ठेवणारी आणि सर्वांना पूजनीय त्या सीतेदेवीचा तिरस्कार करून आपण फार अनुचित कार्य केले होते. ॥२०-२१॥
सीतां सर्वानवद्याङ्‌गीं अरण्ये विजने शुभाम् ।
आनयित्वा तु तां दीनां छद्मनाऽऽत्मस्वदूषणम् ।। २२ ।।

अप्राप्य तं चैव कामं मैथिलीसंगमे कृतम् ।
पतिव्रतायास्तपसा नूनं दग्धोऽसि मे प्रभो ।। २३ ।।
माझ्या प्राणनाथा ! सर्वाङ्‌ग सुंदरी शुभलक्षणा सीता निर्जन वनात निवास करीत होती. आपण छलाने (कपटाने) दुःखात पाडून तिला येथे हरून घेऊन आलात. ही आपल्यासाठी मोठ्‍या कलंकाची गोष्ट झाली. मैथिली बरोबर समागमासाठी जी आपल्या मनात कामना होती, तीही आपण प्राप्त करू शकला नाहीत, उलट त्या पतिव्रता देवीच्या तपस्येने जळून भस्म झालात. अवश्यच असेच घडले आहे. ॥२२-२३॥
तदैव यन्न दग्धस्त्वं धर्षयंस्तनुमध्यमाम् ।
देवा बिभ्यति ते सर्वे सेन्द्राः साग्निपुरोगमाः ।। २४ ।।
तन्वङ्‌गी सीतेचे अपहरण करते समयीच आपण जळून राख झाला नाही - हीच आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्या ज्या महिम्यामुळे इंद्र आणि अग्नि आदि संपूर्ण देवता आपल्याला घाबरत होत्या त्यानेच त्या समयी आपल्याला दग्ध होऊ दिले नाही. ॥२४॥
अवश्यमेव लभते फलं पापस्य कर्मणः ।
घोरं पर्यागते काले कर्ता नास्त्यत्र संशयः ।। २५ ।।
प्राणवल्लभा ! यात काही संदेह नाही की समय आल्यावर कर्त्याला त्याच्या पापकर्माचे फळ अवश्य मिळते. ॥२५॥
शुभकृत् शुभमाप्नोति पापकृत् पापमश्नुते ।
विभीषणः सुखं प्राप्तः त्वं प्राप्तः पापमीदृशम् ।। २६ ।।
शुभकर्म करणारांना उत्तम फळाची प्राप्ति होते आणि पाप्याला पापाचे फळ - दुःख भोगावे लागते. विभीषणाला त्याच्या शुभ कर्मांच्यामुळेच सुख प्राप्त झाले आहे आणि आपल्याला असे दुःख भोगावे लागले आहे. ॥२६॥
सन्त्यन्याः प्रमदास्तुभ्यं रूपेणाभ्यधिकास्ततः ।
अनङ्‌गवशमापन्नः त्वं तु मोहान्न बुध्यसे ।। २७ ।।
आपल्या घरात सीतादेवीहून अधिक सुंदर रूप असलेल्या दुसर्‍या युवती विद्यमान आहेत परंतु आपण कामाच्या वशीभूत होऊन मोहवश या गोष्टीला समजू शकत नव्हता. ॥२७॥
न कुलेन न रूपेण न दाक्षिण्येन मैथिली ।
मयाऽधिका वा तुल्या वा त्वं तु मोहान्न बुध्यसे ।। २८ ।।
मैथिली सीता, कुलात, रूपात आणि दाक्षिण्यादि गुणांमध्येही माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहे, ती माझ्या बरोबरीची नाही, परंतु आपण मोहवश या गोष्टीकडे ध्यानच देत नव्हता. ॥२८॥
सर्वथा सर्वभूतानां नास्ति मृत्युरलक्षणः ।
तव तद्वदयं मृत्युः मैथिलीकृतलक्षणः ।। २९ ।।
संसारात कधी कुठल्याही प्राण्याचा मृत्यु अकारण होत नाही. या नियमाला अनुसरून मैथिली सीता आपल्या मृत्युचे कारण बनली आहे. ॥२९॥
सीतानिमित्तजो मृत्युः त्वया दूरादुपाहृतः ।
मैथिली सह रामेण विशोका विहरिष्यति ।। ३० ।।

अल्पपुण्या त्वहं घोरे पतिता शोकसागरे ।
आपण सीतेच्या कारणाने येणार्‍या मृत्युला स्वतःच दूरून बोलावून आणले होते, मैथिली सीता आता शोकरहित होऊन श्रीरामांसह विहार करील. परंतु पुण्य फारच थोडे होते म्हणून ते लवकरच समाप्त झाले आणि मी शोकाच्या घोर समुद्रात पडले आहे. ॥३० १/२॥
कैलासे मन्दरे मेरौ तथा चैत्ररथे वने ।। ३१ ।।

देवोद्यानेषु सर्वेषु विहृत्य सहिता त्वया ।
विमानेनानुरूपेण या याम्यतुलया श्रिया ।। ३२ ।।

पश्यन्ती विविधान् देशान् तास्तांश्चित्रस्रगम्बरा ।
भ्रंशिता कामभोगेभ्यः सास्मि वीर वधात् तव ।। ३३ ।।
वीरा ! जी मी विचित्र वस्त्रे भूषणे धारण करून अनुपम शोभेने संपन्न होऊन मनास अनुरूप विमानद्वारा आपल्या बरोबर कैलास, मंदराचल, मेरूपर्वत, चैत्ररथ वन तसेच संपूर्ण देवोधानात विहार करत नाना प्रकारच्या देशांना पहात फिरत होते तीच मी आज आपला वध झाल्याने समस्त कामभोगांपासून वञ्चित झाले आहे. ॥३१-३३॥
सैवान्येवास्मि संवृत्ता धिग् राज्ञां चञ्चलां श्रियम् ।
हा राजन् सुकुमारं ते सुभ्रु सुत्वक् समुन्नसम् ।। ३४ ।।

कान्तिश्रीद्युतिभिस्तुल्यं इन्दुपद्मदिवाकरैः ।
किरीटकूटोज्ज्वलितं ताम्रास्यं दीप्तकुण्डलम् ।। ३५ ।।

मदव्याकुललोलाक्षं भूत्वा यत् पानभूमिषु ।
विविधस्रग्धरं चारु वल्गुस्मितकथं शुभम् ।। ३६ ।।

तदेवाद्य तवैवं हि वक्त्रं न भ्राजते प्रभो ।
रामसायकनिर्भिन्नं सिक्तं रुधिरविस्रवैः ।। ३७ ।।

विशीर्णमेदोमस्तिष्कं रूक्षं स्यन्दनरेणुभिः ।
मी तीच राणी मंदोदरी आहे. परंतु आज साधारण स्त्रीच्या समान झाले आहे. राजेलोकांच्या चञ्चल राजलक्ष्मीचा धिक्कार असो. हा राजन्‌ ! आपले जे सुकुमार मुखमण्डल सुंदर भुवया, मनोहर त्वचा आणि उंच नासिकेने युक्त होते, कान्ति, शोभा आणि तेजाच्या द्वारा जे क्रमशः चंद्रमा, सूर्य आणि कमळाला लज्जित करत होते, किरीटांचे समूह ज्याला झगमग बनवत राहात होते, ज्याचे अधर तांब्यासमान लाल होते, ज्याच्यात दीप्तिमान्‌ कुण्डले चमकत राहात होती, पानभूमीमध्ये ज्याचे नेत्र नशेमुळे व्याकुळ आणि चञ्चल दिसून येत होते, जे नाना प्रकारचे गजरे धारण करत होते, मनोहर आणि सुंदर होते तसेच हसून गोड गोड गोष्टी बोलत होते तेच आपले मुखारविंद आज शोभा प्राप्त करत नाही आहे. प्रभो ! ते श्रीरामांच्या सायकांनी विदीर्ण होऊन रक्ताच्या धारेने रंगून गेले आहे. त्याचे मेद आणि मस्तक छिन्न भिन्न झाले आहे. तसेच रथाच्या धुळीमुळे ते रूक्ष बनले आहे. ॥३४-३७ १/२॥
हा पश्चिमा मे सम्प्राप्ता दशा वैधव्यदायिनी ।। ३८ ।

या मयाऽऽसीन्न सम्बुद्धा कदाचिदपि मन्दया ।
हाय ! मी मंदभागिनीने ज्या विषयासंबंधी कधी विचारही केला नव्हता, तेच वैधव्याचे दुःख प्रदान करणारी आंतिम अवस्था (मृत्यु) आपल्याला प्राप्त झाली आहे. ॥३८ १/२॥
पिता दानवराजो मे भर्ता मे राक्षसेश्वरः ।। ३९ ।।

पुत्रो मे शक्रनिर्जेता इत्येवं गर्विता भृशम् ।
दानवराज मय माझे पिता, राक्षसराज रावण माझे पति आणि इंद्रावरही विजय प्राप्त करणारा इंद्रजित्‌ माझा पुत्र आहे - असा विचार करून मी अत्यंत गर्वाने भरलेली राहात होते. ॥३९ १/२॥
दृप्तारिमर्दनाः क्रूराः प्रख्यातबलपौरुषाः ।। ४० ।।

अकुतश्चिद् भया नाथा ममेत्यासीन्मतिर्ध्रुवा ।
माझी ही दृढ धारण बनलेली होती की माझे रक्षक असे लोक आहेत. जे दर्पाने भरलेल्या शत्रूंना मथून टाकण्यास समर्थ, क्रूर, विख्यात बळ आणि पौरूषाने संपन्न तसेच कुणाकडून ही भयभीत न होणारे आहेत. ॥४० १/२॥
तेषामेवंप्रभावानां युष्माकं राक्षसर्षभाः ।। ४१ ।।

कथं भयमसम्बुद्धं मानुषादिदमागतम् ।
राक्षसशिरोमणी ! अशा प्रभावशाली तुम्हा लोकांना हे मनुष्यापासून अज्ञात भय कशा प्रकारे प्राप्त झाले ? ॥४१ १/२॥
स्निग्धेन्द्रनीलनीलं तु प्रांशुशैलोपमं महत् ।। ४२ ।।

केयूराङ्‌गदवैदूर्य मुक्ताहारस्रगुज्ज्वलम् ।
कान्तं विहारेष्वधिकं दीप्तं सङ्‌ग्रामभूमिषु ।। ४३ ।।

भात्याभरणभाभिर्यद् विद्युद्‌भिरिव तोयदः ।
तदेवाद्य शरीरं ते तीक्ष्णैर्नैक शरैश्चितम् ।। ४४ ।।

पुनर्दुर्लभसंस्पर्शं परिष्वक्तुं न शक्यते ।
जे स्निग्ध इंद्रनील मण्याप्रमाणे श्याम, उंच शैल-शिखरासमान विशाल तसेच केयूर, अंगद, नीलम आणि मोत्यांचे हार तसेच फुलांच्या माळांनी सुसज्जित होण्यामुळे अत्यंत प्रकाशमान दिसत असे, विहार-स्थळी अधिक कान्तिमान्‌ तसेच संग्राम भूमिमध्ये अतिशय दीप्तिमान्‌ प्रतीत होत होते आणि आभूषणांच्या प्रभेने ज्याची विद्युन्मालामण्डित मेघासारखी शोभा दिसत होती तेच आपले शरीर आज अनेक तीक्ष्ण बाणांनी भरून गेले आहे. म्हणून जरी आजपासून परत याचा स्पर्श माझ्यासाठी दुर्लभ होणार आहे तथापि या बाणांच्यामुळे मी याचे आलिंगन करू शकत नाही. ॥४२-४४ १/२॥
श्वाविधः शललैर्यद्वद् बाणैर्लग्नैर्निरन्तरम् ।। ४५ ।।

स्वर्पितैर्मर्मसु भृशं सञ्छिन्नस्नायुबन्धनम् ।
क्षितौ निपतितं राजन् श्यामं वै रुधिरच्छवि ।। ४६ ।।

वज्रप्रहाराभिहतो विकीर्ण इव पर्वतः ।
राजन्‌ ! जसे साळिंदरचा देह काट्‍यांनी भरलेला असतो त्याप्रकारे आपल्या शरीरात इतके बाण लागले आहेत की कुठे एक अंगुलभर जागाही शिल्लक राहिलेली नाही. ते सर्व बाण मर्मस्थानात शिरलेले आहेत आणि त्यांनी शरीराचे स्नायुबंधन छिन्न-भिन्न झाले आहे. या अवस्थेत पृथ्वीवर पडलेले आपले हे श्याम शरीर, ज्याच्यावर रक्ताची अरूण छटा पसरली आहे, वज्राच्या प्रहाराने चुराडा होऊन विखुरलेल्या पर्वतासमान वाटत आहे. ॥४५-४६ १/२॥
हा स्वप्नः सत्यमेवेदं त्वं रामेण कथं हतः ।। ४७ ।।

त्वं मृत्योरपि मृत्युः स्याः कथं मृत्युवशं गतः ।
नाथ ! हे स्वप्न आहे कि सत्य ! हाय ! आपण श्रीरामांच्या हातून कसे मारले गेलात ? आपण तर मृत्युचा मृत्यु होतात मग स्वतःच मृत्युच्या अधीन कसे झालात ? ॥४७ १/२॥
त्रैलोक्यवसुभोक्तारं त्रैलोक्योद्वेगदं महत् ।। ४८ ।।

जेतारं लोकपालानां क्षेप्तारं शङ्‌करस्य च ।
दृप्तानां निग्रहीतारं आविष्कृतपराक्रमम् ।। ४९ ।।
आपण त्रैलोक्यातील संपत्तिचा उपभोग घेतला आणि त्रैलोक्यातील प्राण्यांना महान्‌ उद्वेगात पाडलेत. आपण लोकपालांवर ही विजय प्राप्त करून चुकला होतात. आपण कैलास पर्वतासहच भगवान्‌ शकरांनाही उचलले होते तसेच अभिमानी वीरांना युद्धात कैदी बनवून आपला पराक्रम प्रकट केला होतात. ॥४८-४९॥
लोकक्षोभयितारं च साधुभूतविदारणम् ।
ओजसा दृप्तवाक्यानां वक्तारं रिपुसंनिधौ ।। ५० ।।
आपण समस्त संसाराला क्षोभात पाडलेत, साधु पुरुषांची हिंसा केलीत आणि शत्रुंच्या जवळ बलपूर्वक अहंकारपूर्ण गोष्टी बोललात. ॥५०॥
स्वयूथभृत्यगोप्तारं हन्तारं भीमकर्मणाम् ।
हन्तारं दानवेन्द्राणां यक्षाणां च सहस्रशः ।। ५१ ।।
भयानक पराक्रम करणार्‍या विपक्षीयांना मारून आपल्या पक्ष्याच्या लोकांचे आणि सेवकांचे रक्षण केलेत. दानवांचे सरदार आणि हजारो यक्षांना ठार केलेत. ॥५१॥
निवातकवचानां च निग्रहीरारमाहवे ।
नैकयज्ञविलोप्तारं त्रातारं स्वजनस्य च ।। ५२ ।।
आपण समरांगणात निवातकवच नामक दानवांचेही दमन केलेत, बरेचसे यज्ञ नष्ट केलेत तसेच जनांचे सदा रक्षण केलेत. ॥५२॥
धर्मव्यवस्थाभेत्तारं मायास्रष्टारमाहवे ।
देवासुरनृकन्यानां आहर्तारं ततस्ततः ।। ५३ ।।
आपण धर्माच्या व्यवस्थेला तोडणारे, तसेच संग्रामात मायेची सृष्टि करणारे होतात. देवता, असुर आणि मनुष्यांच्या कन्यांना इकडून तिकडून हरण करून आणत होता. ॥५३॥
शत्रुस्त्रीशोकदातारं नेतारं स्वजनस्य च ।
लङ्‌काद्वीपस्य गोप्तारं कर्तारं भीमकर्मणाम् ।। ५४ ।।

अस्माकं कामभोगानां दातारं रथिनां वरम् ।
एवंप्रभावं भर्तारं दृष्ट्‍वा रामेण पातितम् ।। ५५ ।।

स्थिराऽस्मि या देहमिमं धारयामि हतप्रिया ।
आपण शत्रूंच्या स्त्रियांना शोक प्रदान करणारे, स्वजनांचे नेता, लंकापुरीचे रक्षक, भयानक कर्मे करणारे तसेच आम्हा लोकांना कामोपभोगाचे सुख देणारे होता. अशा प्रभावशाली तसेच रथींच्यामध्ये श्रेष्ठ आपल्या प्रियतम पतिला श्रीरामांच्या द्वारे धराशायी केले गेलेले पाहून ही मी जी अजूनपर्यंत शरीर धारण करत आहे, प्रियतम मारला गेल्यावरही जी अजून जगत आहे - हे माझ्या पाषाण हृदयतेचे परिचायक आहे. ॥५४-५५ १/२॥
शयनेषु महार्हेषु शयित्वा राक्षसेश्वर ।। ५६ ।।

इह कस्मात् प्रसुप्तोऽसि धरण्यां रेणुगुण्ठितः ।
राक्षसराज ! आपण तर बहुमूल्य पलंगावर शयन करीत होता मग येथे जमीनीवर धुळीत माखलेले का झोपून राहिला आहात ? ॥५६ १/२॥
यदा मे तनयः शस्तो लक्ष्मणेनेन्द्रजिद् तुधि ।। ५७ ।।

तदाऽस्म्यभिहता तीव्रं अद्य त्वस्मिन् निपातिता ।
जेव्हा लक्ष्मणांनी युद्धात माझा मुलगा इंद्रजित याला मारले होते त्या समयी माझ्यावर जबरदस्त आघात झाला होता आणि आज आपला वध होण्याने मी पुरतीच मारली गेले आहे. ॥५७ १/२॥
नाहं बन्धुजनैर्हीना हीना नाथेन च त्वया ।। ५८ ।।

विहीना कामभोगैश्च शोचिष्ये शाश्वतीः समाः ।
आता मी बंधुजनापासून हीन आपल्या सारख्या स्वामीच्या विरहित तसेच कामभोगापासून वञ्चित होऊन अनंत वर्षे शोकामध्येच बुडून राहीन. ॥५८ १/२॥
प्रपन्नो दीर्घमध्वानं राजन् अद्य सुदुर्गमम् ।। ५९ ।।

नय मामपि दुःखार्तां न वर्तिष्ये त्वया विना ।
राजन्‌ ! आज आपण ज्या अत्यंत दुर्गम तसेच विशाल मार्गावर गेला आहात तेथे मला दुःखितेलाही घेऊन जावे. मी आपल्या शिवाय जिवंत राहू शकणार नाही. ॥५९ १/२॥
कस्मात् त्वं मां विहायेह कृपणां गन्तुमिच्छसि ।। ६० ।।

दीनां विलपितीं मन्दां किं च मां नाभिभाषसे ।
हाय ! मला असहाय सोडून आपण का बरे अन्यत्र निघून जाऊ इच्छिता ? मी दीन अभागिनी होऊन आपल्यासाठी रडत आहे. आपण माझ्याशी बोलत का नाही ? ॥६० १/२॥
दृष्ट्‍वा न खल्वभि क्रुद्धो मामिहानवकुण्ठिताम् ।। ६१ ।।

निर्गतां नगरद्वारात् पद्‌भ्यामेवागतां प्रभो ।
प्रभो ! आज माझ्या तोंडावर अवगुंठन नाही आहे. मी नगरद्वारातून पायीच चालत येथे आली आहे. अशा स्थितिमध्ये मला पाहून आपण क्रोध का करत नाही ? ॥६१ १/२॥
पश्येष्टदार दारांस्ते भ्रष्टलज्जावकुण्ठितान् ।। ६२ ।।

बहिर्निष्पतितान् सर्वान् कथं दृष्ट्‍वा न कुप्यसि ।
आपण आपल्या स्त्रियांवर फार प्रेम करत होता. आज आपल्या सर्व स्त्रिया लाज सोडून पडदा बाजूस सारून बाहेर निघून आल्या आहेत यांना पाहून आपल्याला क्रोध कसा येत नाही ? ॥६२ १/२॥
अयं क्रीडासहायस्ते अनाथो लालप्यते जनः ।। ६३ ।।

न चैनमाश्वासयसि किं वा न बहुमन्यसे ।
नाथ ! आपली क्रीडासहचरी ही मंदोदरी आज अनाथ होऊन विलाप करत आहे. आपण हिला आश्वासन का देत नाही अथवा अधिक आदर का करत नाही ? ॥६३ १/२॥
यास्त्वया विधवा राजन् कृता नैकाः कुलस्त्रियः ।। ६४ ।।

पतिव्रता धर्मपरा गुरुशुश्रूषणे रताः ।
ताभिः शोकाभितप्ताभिः शप्तः परवशं गतः ।। ६५ ।।

त्वया विप्रकृताभिश्च तदा शप्तस्तदागतम् ।
राजन्‌ ! आपण बर्‍याचशा कुलस्त्रियांना ज्या गुरूजनांच्या सेवेत तत्पर राहणार्‍या, धर्मपरायण तसेच पतिव्रता होत्या विधवा बनविले होते आणि त्यांचा अपमान केला होता, म्हणून त्या समयी त्यांनी शोकाने संतप्त होऊन आपल्याला शाप दिले होते, त्यांचेच फळ आहे की आपल्याला शत्रूच्या तसेच मृत्युच्या अधीन व्हावे लागले आहे. ॥६४-६५ १/२॥
प्रवादः सत्यमेवायं त्वां प्रति प्रायशो नृप ।। ६६ ।।

पतिव्रतानां नाकस्मात् पतन्त्यश्रूणि भूतले ।
महाराज ! पतिव्रतेचे अश्रू या पृथ्वीवर व्यर्थ पडत नाहीत ही म्हण आपल्या बाबतीत प्रायः खरी ठरली आहे. ॥६६ १/२॥
कथं च नाम ते राजन् लोकानाक्रम्य तेजसा ।। ६७ ।।

नारीचौर्यमिदं क्षुद्रं कृतं शौण्डीर्यमानिना ।
राजन्‌ ! आपण तर आपल्या तेजाने तीन्ही लोक आक्रान्त करून आपल्याला फार शूरवीर मानत होता. मग तरीही परक्याच्या स्त्रीला चोरून आणण्याचे हे नीच काम आपण कसे केलेत ? ॥६७ १/२॥
अपनीयाश्रमाद् रामं यन्मृगच्छद्मना त्वया ।। ६८ ।।

आनीता रामपत्‍नीक सा अपनीय च लक्ष्मणम् ।
मायामय मृगाच्या बहाण्याने श्रीरामांना आश्रमापासून दूर नेले गेले आणि लक्ष्मणांनाही अलग केलेत. त्यानंतर आपण रामपत्‍नी सीतेला चोरून इकडे घेऊन आला, ही केवढी मोठी कायरता आहे ? ॥६८ १/२॥
कातर्यं च न ते युद्धे कदाचित् संस्मराम्यहम् ।। ६९ ।।

तत्तुभाग्यविपर्यासात् नूनं ते पक्वलक्षणम् ।
युद्धात कधी आपण कायरता दाखविलेला मला आठवत नाही, परंतु भाग्याच्या विपर्यामुळे त्या दिवशी सीतेचे हरण करते समयी निश्चितच आपल्यात कायरता आली होती, जी आपला विनाश निकट आल्याची सूचना देत होती. ॥६९ १/२॥
अतीतान् आगतार्थज्ञो वर्तमानविचक्षणः ।। ७० ।।

मैथिलीमाहृतां दृष्ट्‍वा ध्यात्वा निःश्वस्य चायतम् ।
सत्यवाक् स महाभागो देवरो मे यदब्रवीत् ।। ७१ ।।

सोऽयं राक्षसमुख्यानां विनाशः प्रत्युपस्थितः ।
महाबाहो ! माझे दीर विभीषण सत्यवादी, भूत आणि भविष्याचे ज्ञाते तथा वर्तमानही जाणण्यात कुशल आहेत. त्यांनी हरण करून आणलेल्या सीतेला - मैथिलाला पाहून मनातल्या मनात काही विचार केला आणि शेवटी दीर्घ श्वास सोडून म्हटले - आता मुख्य मुख्य राक्षसांच्या विनाशाचा समय उपस्थित झालेला आहे. त्यांचे हे म्हणणे खरे ठरले. ॥७०-७१ १/२॥
कामक्रोधसमुत्थेन व्यसनेन प्रसंगिना ।। ७२ ।।

निर्वृत्तस्त्वत्कृतेनार्थः सोऽयं मूलहरो महान् ।
त्वया कृतमिदं सर्वं अनाथं राक्षसं कुलम् ।। ७३ ।।
काम आणि क्रोधापासून उत्पन्न आपल्या आसक्तिविषयक दोषामुळे हे सारे ऐश्वर्य नष्ट झाले आणि मूळापासून सर्वांचा नाश करणारा हा महान्‌ अनर्थ प्राप्त झाला. आज आपण समस्त राक्षसकुळाला अनाथ केले आहे. ॥७२-७३॥
न हि त्वं शोचितव्यो मे प्रख्यातबलपौरुषः ।
स्त्रीस्वभावात् तु मे बुद्धिः कारुण्ये परिवर्तते ।। ७४ ।।
आपण आपले बळ आणि पुरुषार्थसाठी विख्यात होतात. म्हणून आपल्यासाठी शोक करणे माझ्यासाठी उचित नाही आहे तथापि स्त्री स्वभावामुळे माझ्या हृदयात दीनता आली आहे. ॥७४॥
सुकृतं दुष्कृतं च त्वं गृहीत्वा स्वां गतिं गतः ।
आत्मानं अनुशोचामि त्वद्विनाशेन दुःखिताम् ।। ७५ ।।
आपण आपले पुण्य आणि पाप बरोबर घेऊन आपल्या वीरोचित गतिला प्राप्त झाला आहात. आपल्या विनाशाने मी महान्‌ दुःखात पडले आहे, म्हणून वारंवार आपल्यासाठीच शोक करत आहे. ॥७५॥
सुहृदां हितकामानां न श्रुतं वचनं त्वया ।
भ्रातॄणां चैव कार्त्स्न्येन हितमुक्तं दशानन ।। ७६ ।।
महाराज दशानन ! (आपले) हित इच्छिणार्‍या सुहृदांनी तसेच बंधुनी ज्या आपल्याला संपूर्ण हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याकडे आपण ऐकून न ऐकल्यासारखे केले. ॥७६॥
हेत्वर्थयुक्तं विधिवत् श्रेयस्करमदारुणम् ।
विभीषणेनाभिहितं न कृतं हेतुमत् त्वया ।। ७७ ।।
विभीषणांचे कथनही युक्ति आणि प्रयोजनाने पूर्ण होते. विधिपूर्वक आपल्या समोर प्रस्तुत केले गेले होते. ते कल्याणकारी तर होतेच, आणि फारच सौम्य भाषेत सांगितले गेले होते. परंतु ती युक्तियुक्त गोष्टही आपण मानली नाही. ॥७७॥
मारीचकुम्भकर्णाभ्यां वाक्यं मम पितुस्तथा ।
न कृतं वीर्यमत्तेन तस्येदं फलमीदृशम् ।। ७८ ।।
आपण आपल्या बळाच्या घमेंडीत मत्त झालेले होता म्हणून मारीच, कुम्भकर्ण, तसेच माझे पिता यांनी सांगितलेली गोष्ट ही आपण मानली नाही. त्याचेच हे असे फळ आपल्याला प्राप्त झाले आहे. ॥७८॥
नीलजीमूतसंकाश पीताम्बर शुभाङ्‌गद ।
स्वगात्राणि विनिक्षिप्य किं शेषे रुधिरावृतः ।। ७९ ।।
प्राणनाथ ! आपला नील मेघासमान श्याम वर्ण आहे. आपण शरीरावर पीत वस्त्र आणि बाहूंवर सुंदर बाजूबंद धारण करणारे आहात, आज रक्ताने माखलेल्या आपल्या शरीरास सर्व बाजूस पसरवून येथे का म्हणून झोपून राहिला आहात ? ॥७९॥
प्रसुप्त इव शोकार्तां किं मां न प्रतिभाषसे ।
मी शोकाने पीडित होत आहे आणि आपण गाढ झोपी गेलेल्या पुरुषाप्रमाणे माझ्या बोलण्याला काही उत्तरच देत नाही. नाथ ! असे का बरे होत आहे ? ॥७९ १/२॥
महावीर्यस्य दक्षस्य संयुगेष्वपलायिनः ।। ८० ।।

यातुधानस्य दौहित्रीं किं मां न प्रतिभाषसे ।
मी महान्‌ पराक्रमी, युद्धकुशल आणि समरभूमीमध्ये मागे न हटण्यार्‍या सुमाली नावाच्या राक्षसाची दौहित्री (नात) आहे. आपण माझ्याशी बोलत का नाही ? ॥८० १/२॥
उत्तिष्ठोत्तिष्ठ किं शेषे नवे परिभवे कृते ।। ८१ ।।

अद्य वै निर्भया लङ्‌कां प्रविष्टाः सूर्यरश्मयः ।
राक्षसराज ! उठावे, उठावे ! श्रीरामांच्या द्वारा आपला नूतन पराभव केला गेला आहे तरी आपण झोपून कसे राहिला आहात ? आजच हे सूर्याचे किरण लंकेत निर्भय होऊन प्रविष्ट झाले आहेत. ॥८१ १/२॥
येन सूदयसे शत्रून् समरे सूर्यवर्चसा ।। ८२ ।।

वज्रो वज्रधरस्येव सोऽयं ते सततार्चितः ।
रणे बहुप्रहरणो हेमजालपरिष्कृतः ।। ८३ ।।

परिघो व्यवकीर्णस्ते बाणैश्छिन्नः सहस्रधा ।
वीरवर ! आपण समरभूमीमध्ये ज्या सूर्यतुल्य तेजस्वी परिघाच्या द्वारे शत्रूंचा संहार करीत होता, वज्रधारी इंद्राच्या वज्राप्रमाणे जो सदा आपल्या द्वारे पूजित होत असे, रणभूमीमध्ये बहुसंख्य शत्रूंचे प्राण घेणारा होता आणि ज्याला सोन्याच्या जाळीने विभूषित केले गेले होते, आपला तोच परिघ श्रीरामांच्या बाणांनी हजारो तुकड्‍यात विभक्त होऊन इकडे तिकडे विखरून पडला आहे. ॥८२-८३ १/२॥
प्रियामिवोपसंगृह्य किं शेषे रणमेदिनीम् ।। ८४ ।।

अप्रियामिव कस्माच्च मां नेच्छस्यभिभाषितुम् ।
प्राणनाथ ! आपण आपल्या प्रिय पत्‍नीप्रमाणे रणभूमीला आलिंगन देत का झोपून राहिला आहात आणि कुठल्या कारणाने मला अप्रियशी समजून माझ्याशी बोलू सुद्धा इच्छित नाही ? ॥८४ १/२॥
धिगस्तु हृदयं यस्या ममेदं न सहस्रधा ।। ८५ ।।

त्वयि पञ्चत्वमापन्ने फलते शोकपीडितम् ।
आपला मृत्यु होऊनही माझ्या शोकपीडित हृदयाचे हजारो तुकडे होऊन जात नाहीत, म्हणून माझा - पाषाण हृदयी नारीचा धिक्कार आहे. ॥८५ १/२॥
इत्येवं विलपन्ती सा बाष्पपर्याकुलेक्षणा ।। ८६ ।।

स्नेहोपस्कन्नहृदया तदा मोहमुपागमत् ।
कश्मलाभिहता सन्ना बभौ सा रावणोरसि ।। ८७ ।।

सन्ध्यानुरक्ते जलदे दीप्ता विद्युदिवोज्ज्वला ।
याप्रकारे विलाप करणार्‍या मंदोदरीच्या डोळ्यात अश्रु दाटून आले होते. तिचे हृदय स्नेहाने द्रवीभूत होत होते. ती रडत रडत एकाएकी मूर्च्छित झाली आणि त्याच अवस्थेत रावणाच्या छातीवर कोसळली. ज्याप्रमाणे संध्येच्या लालीने रंगलेल्या मेघात दीप्तिमती विद्युत्‌ चमकते त्याप्रमाणे रावणाच्या वक्षःस्थळावर मंदोदरी शोभत होती. ॥८६-८७ १/२॥
तथागतां समुत्थाप्य सपत्‍न्यणस्तां भृशातुराः ।। ८८ ।।

पर्यवस्थापयामासू रुदन्त्यो रुदतीं भृशम् ।
तिच्या सवतीही शोकाने अत्यंत व्याकुळ झाल्या होत्या, त्यांनी तिला त्या अवस्थेत पाहून उठवले आणि त्या स्वतःही रडत रडत जोरजोराने विलाप करत मंदोदरीला धीर देऊ लागल्या. ॥८८ १/२॥
किं ते न विदिता देवि लोकानां स्थितिरध्रुवा ।। ८९ ।।

दशाविभागपर्याये राज्ञां चञ्चलाः श्रियः ।
त्या म्हणाल्या - महाराणी ! काय आपण जाणत नाही का की संसाराचे स्वरूप अस्थिर आहे. दशा (परिस्थिति) बदलल्यावर राजांची लक्ष्मी स्थिर राहात नाही. ॥८९ १/२॥
इत्येवमुच्यमाना सा सशब्दं प्ररुरोद ह ।। ९० ।।

स्नपयन्ती तदास्रेण स्तन्नौ वक्तं सुनिर्मलम् ।
त्यांनी असे म्हटल्यावर मंदोदरी स्फुंदून स्फुंदून रडू लागली. त्या समयी तिचे दोन्ही स्तन आणि उज्ज्वळ मुख अश्रूंनी न्हाऊन निघाले होते. ॥९० १/२॥
एतस्मिन्नन्तरे रामो विभीषणमुवाच ह ।। ९१ ।।

संस्कारः क्रियतां भ्रातुः स्त्रीगणः परिसांत्वयाम् ।
याच वेळी श्रीरामचंद्रानी विभीषणास म्हटले - या स्त्रियांना धीर द्या आणि आपल्या भावाचा दाहसंस्कार करा. ॥९१ १/२॥
तमुवाच ततो धीमान् विभीषण इदं वचः ।। ९२ ।।

विमृश्य बुद्ध्या प्रश्रितं धर्मार्थसहितं हितम् ।
हे ऐकून बुद्धिमान्‌ विभीषणाने (श्रीरामांचा अभिप्राय जाणण्याच्या उद्देश्याने) बुद्धिने नीट विचार करून त्यांनाही धर्म आणि अर्थाने युक्त विनयपूर्ण तसेच हितकर गोष्ट सांगितली - ॥९२ १/२॥
त्यक्तधर्मव्रतं क्रूरं नृशंसमनृतं तथा ।। ९३ ।।

नाहमर्होऽस्मि संस्कर्तुं परदाराभिमर्शिनम् ।
भगवन्‌ ! ज्याने धर्म आणि सदाचाराचा त्याग केलेला होता, जो क्रूर, निर्दयी, असत्यवादी तसाच परस्त्रीला स्पर्श करणारा होता, त्याचा दाहसंस्कार करणे मी उचित समजत नाही. ॥९३ १/२॥
भ्रातृरूपो हि मे शत्रुः एष सर्वाहिते रतः ।। ९४ ।।

रावणो नार्हते पूजां पूज्योऽपि गुरुगौरवात् ।
सर्वांच्या अहितात संलग्न राहाणारा हा रावण भावाच्या रूपात माझा शत्रू होता. यद्यपि ज्येष्ठ असल्याने गुरूजनोचित गौरवामुळे तो मला पूज्य होता, तथापि तो माझ्याकडून सत्कार प्राप्त करण्यास योग्य नाही. ॥९४ १/२॥
नृशंस इति मां राम वक्ष्यन्ति मनुजा भुवि ।। ९५ ।।

श्रुत्वा तस्यागुणान् सर्वे वक्ष्यन्ति सुकृतं पुनः ।
श्रीरामा ! माझे हे बोलणे ऐकून संसारातील माणसे मला क्रूर म्हणतील, परंतु जेव्हा ते रावणाचे दुर्गुण ऐकतील तेव्हा सर्व लोकांना माझे विचार उचितच वाटतील. ॥९५ १/२॥
तच्छ्रुत्वा परमप्रीतो रामो धर्मभृतां वरः ।। ९६ ।।

विभीषणमुवाचेदं वाक्यज्ञो वाक्यकोविदः ।
हे ऐकून धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ श्रीराम फार प्रसन्न झाले. ते वाक्यकोविद होते म्हणून वाक्यांचा अभिप्राय जाणणार्‍या विभीषणास याप्रकारे बोलले - ॥९६ १/२॥
तवापि मे प्रियं कार्यं त्वत्प्रभावान् मया जितम् ।। ९७ ।।

अवश्यं तु क्षमं वाच्यो मया त्वं राक्षसेश्वर ।
राक्षसराज ! मला तुमचेही प्रिय करावयाचे आहे कारण की तुमच्याच प्रभावाने मला जय मिळाला आहे. अवश्यच मी तुम्हांला उचित गोष्ट सांगितली पाहिजे म्हणून ऐका - ॥९७ १/२॥
अधर्मानृतसंयुक्तः कामं त्वेष निशाचरः ।। ९८ ।।

तेजस्वी बलवान् शूरः संग्रामेषु च नित्यशः ।
हा निशाचर भलेही अधर्मी आणि असत्यवादी असेल परंतु संग्रामात सदाच तेजस्वी, बलवान्‌ आणि शूरवीर राहिला आहे. ॥९८ १/२॥
शतक्रतुमुखैर्देवैः श्रूयते न पराजितः ।। ९९ ।।

महात्मा बलसम्पन्नो रावणो लोकरावणः ।।
असे ऐकले आहे - इंद्र आदि देवताही याला परास्त करू शकत नव्हत्या. समस्त लोकांना रडविणारा रावण बलपराक्रमाने संपन्न तसेच महामनस्वी होता. ॥९९ १/२॥
मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम् । १०० ।।

क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव ।।
वैर मरणापर्यंतच राहाते. मरणानंतर त्याचा अंत होतो. आता आपले प्रयोजनही सिद्ध होऊन चुकले आहे म्हणून यासमयी जसा हा तुमचा भाऊ आहे तसाच माझाही आहे; म्हणून याचा दाह संस्कार करा. ॥१०० १/२॥
त्वत्सकाशान् महाबाहो संस्कारं विधिपूर्वकम् । १०१ ।।

क्षिप्रमर्हति धर्मेण त्वं यशोभाग् भविष्यसि ।।
महाबाहो ! धर्मास अनुसरून रावण तुमच्याकडून शीघ्रच विधिपूर्वक दाहसंस्कार प्राप्त करण्यास योग्य आहे. असे केल्याने तुम्ही यशाचे भागी व्हाल. ॥१०१ १/२॥
राघवस्य वचः श्रुत्वा त्वरमाणो विभीषणः । १०२ ।।

संस्कारयितुमारेभे भ्रातरं रावणं हतम् ।
राघवांचे हे वचन ऐकून विभीषण युद्धात मारल्या गेलेल्या आपल्या भावाच्या रावणाच्या दाहसंस्काराची शीघ्रतापूर्वक तयारी करू लागले. ॥१०२ १/२॥
स प्रविश्य पुरीं लङ्‌कां राक्षसेन्द्रो विभीषणः ।। १०३ ।।

रावणस्याग्निहोत्रं तु निर्यापयति सत्वरम् ।
राक्षसराज विभीषणाने लंकापुरीत प्रवेश करून रावणाच्या अग्निहोत्राला शीघ्रच विधिपूर्वक समाप्त केले. ॥१०३ १/२॥
शकटान् दारुरूपाणि अग्नीन् वै याजकांस्तथा ॥ १०४ ॥

तथा चन्दनकाष्ठानि काष्ठानि विविधानि च ।

अगरूणि सुगन्धीनि गन्धांश्च सुरभींस्तथा ॥ १०५ ॥

मणिमुक्ताप्रवालानि निर्यापयति राक्षसः ।
यानंतर शकट, लाकडे, अग्निहोत्राचे अग्नि, यज्ञ करणारे पुरोहित, चंदनकाष्ठे, अन्य विविध प्रकारची लाकडे, सुगंधित अगर, अन्यान्य सुंदर गंधयुक्त पदार्थ, मणि, मोती आणि प्रवाळ - यासर्व वस्तु त्यांनी एकत्रित केल्या. ॥१०४-१०५ १/२॥
आजगाम मुहूर्तेन राक्षसैः परिवारितः ॥ १०६ ॥

ततो माल्यवता सार्धं क्रियामेव चकार सः ।
नंतर एकाच मुहूर्तामध्ये राक्षसांनी घेरलेले ते शीघ्र तेथून निघून आले. यानंतर माल्यवाना बरोबर त्यांनी दाह संस्काराच्या सर्व तयारीचे काम पूर्ण केले. ॥१०६ १/२॥
सौवर्णीं शिबिकां दिव्यां आरोप्य क्षौमवाससम् ॥ १०७ ॥

रावणं राक्षसाधीशं अश्रुवर्णमुखा द्विजाः ।
तूर्यघोषैश्च विविधैः स्तुवद्‌भिश्चभिनन्दितम् ॥ १०८ ॥
विविध प्रकारच्या वाद्यघोषांच्या द्वारे स्तुति करणार्‍या मागधांनी ज्याचे अभिनंदन केले होते, राक्षसराज रावणाच्या त्या शवाला रेशमी वस्त्राने झाकून त्याला सोन्याच्या दिव्य विमानात ठेवल्यानंतर राक्षसजातीय ब्राह्मण तेथे नेत्रातून अश्रु ढाळीत उभे राहिले. ॥१०७-१०८॥
पताकाभिश्च चित्राभिः सुमनोभिश्च चित्रिताम् ।
उत्क्षिप्य शिबिकां तां तु विभीषणपुरोगमाः ॥ १०९ ॥

दक्षिणाभिमुखाः सर्वे गृह्यकाष्ठानि भेजिरे ।
त्या शिबिकेला विचित्र पताकांनी तसेच फुलांनी सजविले गेले होते. ज्यामुळे ती विचित्र शोभा धारण करीत होती. विभीषण आदि राक्षस तिला खांद्यावर उचलून धरून तसेच अन्य सर्व लोक हातात वाळलेली लाकडे घेऊन दक्षिण दिशेला स्मशानभूमिकडे चालू लागले. ॥१०९ १/२॥
अग्नयो दीप्यमानास्ते तदाध्वर्युसमीरिताः ॥ ११० ॥

शरणाभिगताः सर्वे पुरस्तात् तस्य ये ययुः ।
यजुर्वेदीय याजकांच्या द्वारा वाहून नेले जाणारे तीन्ही अग्नि प्रज्वलित झाले. ते सर्व कुण्डात ठेवलेले होते आणि पुरोहितगण त्यांना घेऊन शवाच्या पुढे पुढे चालत होते. ॥११० १/२॥
अन्तःपुराणि सर्वाणि रुदमानानि सत्वरम् ॥ १११ ॥

पृष्ठतोऽनुययुस्तानि प्लवमानानि सर्वतः ।
अंतःपुरातील सर्व स्त्रिया रडत रडत तात्काळ शवाच्या पाठोपाठ चालू लागल्या. त्या सर्व बाजूस अडखळत अडखळत चालत होत्या. ॥१११ १/२॥
रावणं प्रयते देशे स्थाप्य ते भृशुदुःखिताः ॥ ११२ ॥

चितां चन्दनकाश्ठैश्च पद्मकोशीरचंदनैः ।
ब्राह्म्या संवर्तयामासू राङ्‌कवास्तरणावृताम् ।। ११३ ।।
पुढे जाऊन रावणाचे विमान एका पवित्र स्थानी ठेवून अत्यंत दुःखी झालेल्या विभीषण आदि राक्षसांनी मलयचंदनकाष्ठ, पद्मक, शीर (खस) तसेच अन्य प्रकारच्या चंदनांच्या द्वारा वेदोक्त विधीने चिता बनविली आणि तिच्यावर रङ्‌कु नामक मृगाचे चर्म पसरले. ॥११२-११३॥
प्रचक्रू राक्षसेन्द्रस्य पितृमेधमनुत्तमम् ।
वेदिं च दक्षिणाणप्राचीं यथास्थानं च पावकम् ॥ ११४ ॥

पृषदाज्येन सम्पूर्णं स्रुवं सर्वे प्रचिक्षिपुः ।
पादयोः शकटं प्रापुः उर्वोश्चोलूखलं तदा ॥ ११५ ॥
त्याच्यावर राक्षसराजाच्या शवास झोपवून त्यांनी उत्तम विधीने त्याचा पितृमेध (दाहसंस्कार) केला. त्यांनी चितेच्या दक्षिण - पूर्वेला वेदी बनवून तिच्यावर यथास्थान अग्निला स्थापित केले. नंतर दधिमिश्रित तुपाने भरलेली स्त्रुवा रावणाच्या खाद्यांवर ठेवली. यानंतर पायांवर शकट आणि जांघावर उलूखल ठेवले. ॥११४-११५॥
दारुपात्राणि सर्वाणि अरणिं चोत्तरारणिम् ।
दत्त्वा तु मुसलं चान्यं यथा स्थानं विचक्रमुः ।। ११६ ।।
तसेच काष्ठाची सर्व पात्रे, अरणि, उत्तरारणि आणि मुसळ आदिंनाही यथास्थान ठेवले. ॥११६॥
शास्त्रदृष्टेन विधिना महर्षिविहितेन च ।
तत्र मेध्यं पशुं हत्वा राक्षसेन्द्रस्य राक्षसाः ।। ११७ ।।

परिस्तरणिकां राज्ञो घृताक्तां समवेशयन् ।
गन्धैर्माल्यैरलंकृत्य रावणं दीनमानसाः ॥ ११८ ॥
वेदोक्त विधि आणि महर्षिंच्या द्वारा रचित कल्पसूत्रात सांगितल्या गेलेल्या प्रणालीने तेथे सारे कार्य झाले. राक्षसांनी (राक्षसांच्या रीतिप्रमाणे) मेघ्य पशुचे हनन करून राजा रावणाच्या चितेवर पसरलेल्या मृगचर्माला तूपांनी भिजवून टाकले, नंतर रावणाच्या शवाला चंदन आणि फुलांनी अलंकृत करून ते राक्षस मनातल्या मनात दुःखाचा अनुभव करू लागले. ॥११७-११८॥
विभीषणसहायास्ते वस्त्रैश्च विविधैरपि ।
लाजैरवकिरन्ति स्म बाष्पपूर्णमुखास्तथा ।। ११९ ।।
नंतर विभीषणाबरोबर अन्य राक्षसांनीही चितेवर नाना प्रकारची वस्त्रे आणि लाह्या पसरल्या. त्या समयी त्यांच्या मुखांवरून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या. ॥११९॥
स ददौ पावकं तस्य विधियुक्तं विभीषणः ।
स्नात्वा चैवार्द्रवस्त्रेण तिलान् दर्भविमिश्रितान् ॥ १२० ॥

उदकेन च संमिश्रान् प्रदाय विधिपूर्वकम् ।
ताः स्त्रियोऽनुनयामास सान्त्वयित्वा पुनःपुनः ।। १२१ ।।
त्यानंतर विभीषणाने चितेमध्ये विधिला अनुसरून आग लावली. त्यानंतर स्नान करून ओली वस्त्रे नेसूनच त्यांनी तिळ, कुश आणि जलाच्या द्वारे विधिवत्‌ रावणाला जलाञ्जलि दिली. तत्पश्चात्‌ रावणाच्या स्त्रियांचे वारंवार सान्त्वन करून त्यांना घरी चलण्यासाठी अनुनय विनय केला. ॥१२०-१२१॥
गम्यतामिति ताः सर्वा विविशुर्नगरं ततः ।
प्रविष्टासु पुरीं स्त्रीषु सर्वासु राक्षसेन्द्रो विभीषणः ।
रामपार्श्वमुपागम्य तदाऽतिष्ठद् विनीतवत् ।। १२२ ।।
महालांत चला हा विभीषणाचा आदेश ऐकून त्या सार्‍या स्त्रिया नगरात निघून गेल्या. स्त्रियांनी पुरीमध्ये प्रवेश केल्यावर राक्षसराज विभीषण श्रीरामचंद्रांच्या जवळ येऊन विनीतभावाने उभे राहिले. ॥१२२॥
रामोऽपि सह सैन्येन समुग्रीवः सलक्ष्मणः ।
हर्षं लेभे रिपुं हत्वा वृत्रं वज्रधरो यथा ।। १२३ ।।
श्रीरामही लक्ष्मण, सुग्रीव तथा समस्त सेनेसह शत्रुचा वध करून फार प्रसन्न झालेले होते, ज्याप्रमाणे वज्रधारी इंद्र वृत्रासुराला मारल्यावर प्रसन्नतेचा अनुभव करू लागले होते, अगदी त्याप्रमाणेच. ॥१२३॥
ततो विमुक्त्वा सशरं शरासनं
महेन्द्रदत्तं कवचं स तन्महत्
विमुच्य रोषं रिपुनिग्रहात् ततो
रामः स सौम्यत्वमुपागतोऽरिहा ॥ १२४ ॥
त्यानंतर इंद्रांनी दिलेले धनुष्य, बाण आणि विशाल कवच्याचा त्याग करून तसेच शत्रुचे दमन केल्यामुळे रोषाचाही त्याग करून शत्रुसूदन श्रीरामांनी शान्तभाव धारण केला. ॥१२४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकादशाधिकशततमः सर्गः ।। १११ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशे अकरावा सर्ग पूरा झाला. ॥१११॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP