॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीरामविजय ॥

॥ अध्याय सत्ताविसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
आळसी कदा उदीम न करी ॥ नवजाय मंदिराबाहेरी ॥
तो जगन्निवास साहाकारी ॥ घरींच निर्धारी भाग्यें आला ॥१॥
मृत्तिका खणावया जात ॥ तों मांदुस सांपडे अकस्मात ॥
तैसें आम्हांसी जाहले यथार्थ ॥ सद्‌गुरुनाथप्रसादें ॥२॥
अभ्यास न करितां बहुवस ॥ सांपडली रामविजयमांदुस ॥
मग गगनीं न माय हर्ष ॥ उपरति जाहली ॥३॥
मांदुस उघडोनि जो न्याहाळी ॥ तों आंत होती सात कोळळी ॥
तीं हीं सप्तकांडें रसाळी ॥ एकाहूनि एक विशेष ॥४॥
कोहळीं न्याहाळून जंव पाहत ॥ तंव दिव्य नाणीं दीप्तियुक्त ॥
भक्ति ज्ञान वैराग्ययुक्त ॥ घवघवीत विराजती ॥५॥
चतुर श्रोते ज्ञानसंपन्न ॥ ते बंधु आले जवळी धांवोन ॥
म्हणती आम्हांस वांटा दे समान ॥ मांडलें भांडण प्रेमभरें ॥६॥
म्हणती हीं वाल्मीकाचीं कोहळी ॥ तुज पूर्वभाग्यें लाधली ॥
तरी वाटा आम्हास ये वेळी ॥ देईं सर्वांसी सारिखा ॥७॥
मग चतुर संतजन ॥ श्रवणपंक्तीं बैसले समान ॥
कोळीं त्यापुढें नेऊन ॥ एकसरे रिचविली ॥८॥
मग त्यांही कर्णद्वारें उघडोन ॥ हृदयभांडारीं सांठविलें धन ॥
श्रोते वक्ते सावधान ॥ निजसुख पूर्ण पावले ॥९॥
पांच कोहळीं दाविली फोडून ॥ सहावें युद्धकांड विशाळ गहन ॥
असो गताध्यायीं कथा निरूपण ॥ राघवें रावण निर्भर्त्सिला ॥१०॥
छत्र मुकुट टाकिले छेदून ॥ अपमान पावला रावण ॥
मग लंकेत परतोन ॥ चिंतार्णवी बुडाला ॥११॥
जैसा राहुग्रस्त निशाकर ॥ कीं काळवंड दग्ध कांतार ॥
कपाळशूळें महाव्याघ्र ॥ तैसा दशकंठ उतरला ॥१२॥
नावडे छत्र सिंहासन ॥ जें जें पाहूं जाय रावण ॥
तें तें रामरूप दिसे पूर्ण ॥ नाठवे आन पदार्थ ॥१३॥
सभेसी बैसला रावण ॥ अत्यंत दिसे कळाहीन ॥
महोदराप्रति वचन ॥ बोलता जाहला ते वेळां ॥१४॥
म्हणे कैसा विपरीत काळ ॥ मक्षिकेनें हालविला भूगोळ ॥
चित्रींच्या सर्पे खगपाळ ॥ गिळिला नवल वाटतें ॥१५॥
खद्योततेजेंकरून ॥ आहाळोनि गेला चंडकिरण ॥
तैसा मी आजि रावण ॥ युद्धीं पावलों पराजय ॥१६॥
मग बोलती प्रधान ॥ आतां उठवावा कुंभकर्ण ॥
तो रामसौमित्रांसहित सैन्य ॥ गिळील क्षण न लागतां ॥१७॥
ती रावणासी मानली मात ॥ म्हणे घटश्रोत्रासी उठवा त्वरित ॥
मग विरूपाक्ष महोदार निघत ॥ दहा सहस्र राक्षस घेऊनियां ॥१८॥
मद्यखाला चारी सहस्र ॥ कुंजरीं घातल्या सत्वर ॥
तैसेच पशू घेतले अपार ॥ अन्नाचे पर्वत घेऊनियां ॥१९॥
वाद्यें वाजविती भयासुर ॥ गजरेंसी पावले सत्वर ॥
देखोनि भयानक शरीर ॥ कंप सुटला राक्षसां ॥२०॥
वनगज म्हैसे तरस ॥ नासिकांत गुंतले बहुवस ॥
टाकितां श्वासोच्छ्वास ॥ निर्गम नव्हे तयांसी ॥२१॥
सवा लक्ष गांवे खोल ॥ सरितापतीचें तुंबळ जळ ॥
तें नाभिप्रमाण केवळ ॥ कुंभकर्णासी होय पैं ॥२२॥
असो राक्षस सर्व मिळती ॥ द्वारीं एकदांचि हांका फोडिती ॥
सकळ वापी कूप आटती ॥ महागजरेंकरूनियां ॥२३॥
स्वर्गापर्यंत ऐको जाती ॥ ऐशा कर्णीं भेरी त्राहाटिती ॥
उरावरी गज चालविती ॥ परी जागा नोहे सर्वथा ॥२४॥
एक गगनचुंबित वंश घेऊन ॥ नासिकीं चढविती पूर्ण ॥
एक नाकपुडी अवरोधून ॥ श्वासोच्छ्वास कोंडिती ॥२५॥
एक वृक्ष पाषाण घेती ॥ वर्मस्थळीं बळें ताडिती ॥
कडू तीक्ष्ण औषधें ओतिती ॥ नासिकापुटीं नेऊनियां ॥२६॥
उपाय केले बहुत पूर्ण ॥ परी जागा नोहेच कुंभकर्ण ॥
मग विरूपाक्षें किन्नरी आणून ॥ कर्णांमाजी बैसविल्या ॥२७॥
त्यांचे परम सुस्वर गायन ॥ ऐकतां शेष येईल धांवोन ॥
मग जागा होऊन कंभकर्ण ॥ सावधान बैसला ॥२८॥
जांभई दिधली भयानक ॥ मद्य प्राशिलें सकळिक ॥
दाढेखालीं पशू देख ॥ अपार घालून रगडिले ॥२९॥
अन्नमांसाचे पर्वत ॥ गिळिले राक्षसें तेव्हां बहुत ॥
मग नेत्र पुसोन पहात ॥ प्रधानांकडे ते काळीं ॥३०॥
तंव ते प्रणिपात करून ॥ सांगते झाले सर्व वर्तमान ॥
सीता आणिली हिरून ॥ तेथून सर्व कथियेलें ॥३१॥
हनुमंत लंका जाळून ॥ रामसौमित्रां आला घेऊन ॥
कालचे युद्धीं रावण ॥ पराजय पावला ॥३२॥
रावण परम चिंताक्रांत ॥ यालागीं तुम्हां उठविलें त्वरित ॥
मांडला बहुत कल्पांत ॥ आटले समस्त राक्षस ॥३३॥
उभा ठाकला कुंभकर्ण ॥ म्हणे ऐसाचि रणा जाईन ॥
मग विनवीती प्रधान ॥ राजदर्शन घेइंजे ॥३४॥
सभेसी चालिला कुंभकर्ण ॥ लंकादुर्ग त्यासी गुल्फप्रमाण ॥
वाटे आकाशासी लाविले टेंकण ॥ विमानें सुरगण पळविती ॥३५॥
लंकावेष्टित जे वानर ॥ ते तेथून पळाले समग्र ॥
देखोनि कुंभकर्णाचें शरीर ॥ कपी मूर्च्छित पडियेले ॥३६॥
रामासी म्हणे बिभीषण ॥ स्वामी हा उठविला कुंभकर्ण ॥
आश्चर्य करी रघुनंदन ॥ शरीर देखोन तयाचें ॥३७॥
बिभीषण म्हणे ते काळीं ॥ रामा याचिया जन्मकाळीं ॥
प्रळय वर्तला भूमंडळी ॥ हांक वाजली चहूंकडे ॥३८॥
मातेचिया उदरांतून ॥ भूमीसी पडला कुभकर्ण ॥
तीस सहस्र स्त्रिया जाण ॥ वदन पसरून गिळियेल्या ॥३९॥
इंद्राचा ऐरावत धरूनि ॥ येणें आपटिला धरणीं ॥
ऐरावतीचे दांत मोडूनि ॥ इंद्रासी येणें ताडिले ॥४०॥
शक्रें वज्र उचलोनि घातलें ॥ याचें रोम नाहीं वक्र जाहलें ॥
यासी निद्राआवरण पडलें ॥ म्हणोनि लोक वांचले हे ॥४१॥
असो कुंभकर्ण दृष्टीं देखोन ॥ हिमज्वरें व्यापले वानरगण ॥
एक मुरकुंडी वळून ॥ दांतखिळिया बैसल्या ॥४२॥
भोंवतें पाहे चापपाणी ॥ तों भयभीत वानरवाहिनी ॥
सर्वांचें अंतर जाणोनी ॥ मारुतीकडे पाहिलें ॥४३॥
तो निमिषांत हनुमंत ॥ अकस्मात गेला लंकेत ॥
कुंभकर्ण सभेसी जात ॥ तंव अद्‌भुत केलें वायुसुतें ॥४४॥
कुंभकर्ण तये वेळां ॥ कटीपर्यंत उचलिला ॥
राम आणि कपि डोळां ॥ तटस्थ होऊन पाहाती ॥४५॥
मद्यपानें कुंभकर्ण ॥ अत्यंत गेलासे भुलून ॥
आपणास उचलितो कोण ॥ हेंही त्यासी नेणवे ॥४६॥
मग तों सीताशोकहरण ॥ पुढती उचलून कुंभकर्ण ॥
भुजाबळें भोवंडून ॥ टाकीत होता सुवेळेसी ॥४७॥
मागुती केले अनुमान ॥ म्हणे गगनीं देऊं भिरकावून ॥
कीं लंकेवरी आपटून ॥ चूर्ण करूं सकळही ॥४८॥
मग म्हणे नव्हे हा विचार ॥ लंका चूर्ण होईल समग्र ॥
मग तो बिभीषण नृपवर ॥ नांदेल कैसा ये स्थळीं ॥४९॥
सुवेळेसी द्यावा टाकून ॥ तरी वानर होतील चूर्ण ॥
भूमंडळीं आपटूं धरून ॥ तरी धरा जाईल पाताळा ॥५०॥
ऊर्ध्वपंथेंचि ठेवून ॥ भुजाबळें भोवंडून ॥
वृक्षावरी घातला नेऊन ॥ राघवापासी परतला ॥५१॥
भय आणि शाहारे पूर्ण ॥ गेले कपीचें निघोन ॥
जैसा उगवतां सहस्रकिरण ॥ तम जाय निरसोनि ॥५२॥
कीं हनुमंतें बळ दावून ॥ वानरांसी दिधलें रसायन ॥
हिमज्वरभय दारुण ॥ निघोन गेलें सर्वही ॥५३॥
असो श्रीरामचरणीं भाळ ॥ ठेवी अंजनीचा बाळ ॥
मग सुग्रीवादि कपी सकळ ॥ धांवोन भेटती हनुमंता ॥५४॥
शब्दसुमनें स्तुतिमाळा ॥ कपी घालिती मारुतीच्या गळां ॥
म्हणती कुंभकर्ण कवेंत सांपडला ॥ तरी कां सोडिला कळेना ॥५५॥
मारुतीचा अंतरार्थ ॥ कपीतें सांगे रघुनाथ ॥
त्यास माझे हातीं मृत्य ॥ हें हनुमंत जाणतसे ॥५६॥
सिंहावलोकने निश्चिती ॥ मागील कथा परिसावी श्रोतीं ॥
कुंभकर्ण जात सभेप्रती ॥ रावणासी भेटावया ॥५७॥
बंधु सन्मुख देखोन ॥ हरुषें कोंदला दशानन ॥
कुंभकर्ण प्रणिपात करून ॥ निजस्थानीं बैसला ॥५८॥
जेंवी मेघ करी गर्जन ॥ तेवी बोले कुंभकर्ण ॥
काय संकट पडिले येऊन ॥ म्हणोनि मज जागविलें ॥५९॥
महाप्रलय मांडला ॥ की उर्वी जात होती रसातळा ॥क
िंवा कृतांत चालून आला ॥ म्हणोनि मज जागविलें ॥६०॥
सांगे रावण वर्तमान ॥ जानकी आणिली हिरून ॥
यालागीं वानरदळ घेऊन ॥ सुवेळेसी राम आला ॥६१॥
धूम्राक्ष आणि वज्रदंष्ट्री ॥ प्रहस्त प्रधान पडला समरीं ॥
मग मी युद्धा गेलो झडकरी ॥ परी पावलो पराजय ॥६२॥
मज परम संकट पडलें ॥ म्हणोनि बंधु तुज जागविलें ॥
मज चिंताव्याधीनें पीडिलें ॥ त्यासी औषध देईं तूं ॥६३॥
संकटीं बंधु पावे साचार ॥ दरिद्रकाळीं जाणिजे मित्र ॥
संशय निरसावया समग्र ॥ सद्‌गुरुचरण धरावे ॥६४॥
तम दाटले जरी घोर ॥ तरी दीपिका पाजळाव्या सत्वर ॥
येतां वैरियाचें शस्त्र ॥ वोडण पुढें करावें ॥६५॥
दुष्काळ पडतां अत्यंत ॥ दात्यापासी जावें त्वरित ॥
संकट आम्हां पडलें बहुत ॥ म्हणोनि तुज जागविलें ॥६६॥
यावरी बोले कुंभकर्ण ॥ बुद्धि कर्मानुसारिणी पूर्ण ॥
जानकी व्यर्थ आणून ॥ कुळक्षय आरंभिला ॥६७॥
राम हा वैकुंठवासी नारायण ॥ सुरांचे अवतार वानर पूर्ण ॥
हें नारदें वर्तमान ॥ पूर्वींच मज सांगितलें ॥६८॥
असो जें शुभाशुभ कर्म होत ॥ तें भोगल्याविण न चुकत ॥
पुढील होणार भविष्यार्थ ॥ तो न चुके कदाही ॥६९॥
करूं नये तें त्वां राया केलें ॥ शेवटीं सीतेस तरी भोगिलें ॥
येरू म्हणे बहुत यत्‍न केले ॥ परी ते वश न होय ॥७०॥
ती रामावेगळी तत्वतां ॥ आणिकां वश नव्हे सर्वथा ॥
कुंभकर्ण म्हणे लंकानाथा ॥ राघवरूप धरीं तूं ॥७१॥
जपोनियां कापट्य़मंत्र ॥ होईं सुंदर रघुवीर ॥
सीता होईल वश साचार ॥ क्षणमात्रें न लागतां ॥७२॥
मग बोले लंकेश्वर ॥ मी जैं निजांगें होईन रघुवीर ॥
तेव्हां दुर्वासना समग्र ॥ मावळेल माझी समूळी ॥७३॥
घरासी येतां वासरमणी ॥ तम न उरे ते क्षणीं ॥
कीं गरुड येतां सर्पश्रेणी ॥ पळती उठोनि जीवभयें ॥७४॥
तैसा मी राम होतांचि जाण ॥ वाटे परनारी मातेसमान ॥
एकवचन एकबाण ॥ एकपत्‍नीव्रती होतों ॥७५॥
याचिलागीं बंधु जाण ॥ रामसौमित्र वानरगण ॥
यांसी संहारिल्यावांचून ॥ वश नव्हे जानकी ॥७६॥
यावरी बोले कुंभकर्ण ॥ आतां गिळीन सकळ सैन्य ॥
क्षणांत रामलक्ष्मण ॥ धरून आणीन पुरुषार्थ ॥७७॥
अपार सैन्यसमुद्र ॥ सवें देत दशकंधर ॥
रावणासी नेमून सत्वर ॥ कुंभकर्ण निघाला ॥७८॥
रणां येता कुभकर्ण ॥ तेथें होते वानरगण ॥
ते अवघे गेले पळोन ॥ रामचंद्रासी सांगावया ॥७९॥
कुंभकर्ण विचारी अंतरीं ॥ मी काय लोटूं वानरांवरी ॥
जंबुकावरी जैसा केसरी ॥ धांवतां पुरुषार्थ दिसेना ॥८०॥
पिपीलिकांवरी धांवे गज ॥ कीं अळिकेवरी द्विजराज ॥
मूढसभेंत तेजःपुंज ॥ पंडित शोभा न पावे ॥८१॥
आरंभीं राक्षसदळ तुंबळ ॥ वानरांवरी धांवले चपळ ॥
कपी उठावले सकळ ॥ शिळा वृक्ष घेऊनियां ॥८२॥
युद्ध झालें अपार ॥ लोटले अशुद्धाचे पूर ॥
परी ते न मानी घटश्रोत्र ॥ म्हणे हे युद्ध कायसें ॥८३॥
मूढ अपार बोलती ॥ परी तें न भरे पंडिताचें चित्ती ॥
जैसे वृषभ परस्परें भांडती ॥ महाव्याघ्रासी न माने तें ॥८४॥
असो तेव्हां मुद्रर घेऊन ॥ रामावरी लोटला कुंभकर्ण ॥
अठरा पद्में वानरगण ॥ पर्वत पाषाण भिरकाविती ॥८५॥
पर्वतावरी पर्जन्य पडत ॥ परी तो व्यर्थ न मानी किंचित ॥
कीं कूर्मपृष्ठीवरी बहुत ॥ सुमनें वर्षतां न ढळेंचि ॥८६॥
तों शतशृंगमंडित पर्वत ॥ घेऊन भिरकावी हनुमंत ॥
तो मुष्टिघातें त्वरित ॥ फोडून टाकी कुंभकर्ण ॥८७॥
म्हणे रे मर्कटा धरी धीर ॥ तुवां जाळिलें माझें नगर ॥
म्हणोनि धांवे घटश्रोत्र ॥ हनुमंतावरी तेधवां ॥८८॥
बळें शूळ भोवंडोनि ॥ मारुतीवरी घाली उचलूनि ॥
ते वेळे वायुसुत धरणीं ॥ मूर्च्छा येऊन पडियेला ॥८९॥
ते देखोनि वाहिनीपती ॥ नीळ धांवे समीरगती ॥
कुंभकर्णाची युद्धगति ॥ देव पहाती विमानीं ॥९०॥
नीळें पर्वत वरी टाकिला ॥ तो मुष्टिघातें चूर्ण केला ॥
नीळासीं मुष्टिघात दीधला ॥ मूर्च्छित पाडिला धरणिये ॥९१॥
तों धावलें चौघे वानर ॥ जे काळासही शिक्षा करणार ॥
ऋषभ शरभ गवाक्ष वीर ॥ गंधमादन चवथा तो ॥९२॥
चौघांजणीं चार पर्वत ॥ टाकिले पैं अकस्मात ॥
ते मुष्टिघातें पिष्टवत ॥ करूनियां टाकिले ॥९३॥
शरभ गवाक्ष धरणीवरी ॥ कुंभकर्णे आपटिले स्वकरीं ॥
दोघे भिरकाविले अंबरी ॥ जगतीवरी पडियेले ॥९४॥
मग अट्टहासें गर्जे कुंभकर्ण ॥ वाटे ब्रह्मांड जाय उलोन ॥
मग वानरांतें देखोन ॥ ग्रासावया धांवला ॥९५॥
कव घालोनि अकस्मात ॥ एकदांच वानर धरी बहुत ॥
मुखीं घालूनि चावित ॥ गिळिले गणित ऐका तें ॥९६॥
ऐशीं सहस्र द्रुमपाणि ॥ असुरें गिळिले मुख पसरोनि ॥
कित्येक कर्णरंध्रांतून निघोनि ॥ पळते जाहले एकसरें ॥९७॥
उरले वानर ते वेळे ॥ रण सांडोनि पळाले ॥
गिरिकंदरीं दडाले ॥ जीवभयेंकरूनियां ॥९८॥
कित्येक तेव्हां वानरगण ॥ सूर्यसुतासी गेले शरण ॥
ते वेळीं पर्वत घेऊन ॥ सुग्रीववीर धांविन्नला ॥९९॥
विशाळ पर्वत टाकिला ॥ येरे मुद्ररें चूर्ण केला ॥
सुग्रीव म्हणे अमंगळा ॥ वृथा पुष्ट राक्षसा ॥१००॥
तुझें नासिक आणि कर्ण ॥ क्षण न लागतां छेदीन ॥
विमानीं वृंदारकगण ॥ जेणेंकरून तोषती ॥१॥
तुझा अग्रज दशकंधर ॥ पंचवटीस येऊनि तस्कर ॥
जानकी चिद्रत्‍न सुंदर ॥ घेऊनि आला चोरूनियां ॥२॥
तरी तस्करातें दंड हाचि पूर्ण ॥ छेदावें नासिक आणि कर्ण ॥
तूं रावणानुज कुंभकर्ण ॥ शिक्षा लावीन तुज आतां ॥३॥
कुंभकर्ण म्हणे सुग्रीवासी ॥ मशक आगळें बहुत बोलसी ॥
जैसा पतंग वडवानळासी ॥ विझवावया धांवत ॥४॥
मशक जाहलें क्रोधायमान ॥ म्हणे सगळा पर्वत गिळिन ॥
वृश्चिक स्वपुच्छेंकरून ॥ ताडीन म्हणे खदिरांगारा ॥५॥
ऊर्णनाळाींचा उदरतंतु ॥ तेणें केवीं बांधिजे ऐरावतु ॥
सूर्यमंडळ धगधगितु ॥ खद्योत केवी गिळिल पां ॥६॥
तैसा तूं बळहीन वानर ॥ रागें आलासी मजसामोर ॥
मत्कुणप्राय शरीर ॥ चूर्ण करीन तुझें आतां ॥७॥
ऐसें बोलतां रावणानुज ॥ पर्वत घेऊनि धांवे अर्कज ॥
कुंभकर्णाचे हृदयीं सहज ॥ येऊनियां आदळला ॥८॥
पर्वत गेला चूर्ण होऊन ॥ क्रोधें धांवे कुंभकर्ण ॥
सुग्रावासी चरणीं धरून ॥ भोवंडिला गरगरां ॥९॥
पृथ्वीवरी आपटूं पाहत ॥ तों प्रतापी सूर्यसुत ॥
पिळूनि कुंभकर्णाचा हात ॥ ऊर्ध्वपंथे उडाला ॥११०॥
ग्रहमंडळपर्यंत ॥ उडोन गेला कपिनाथ ॥
त्याहून कुंभकर्णाचा हात ॥ उंचावला तेकाळीं ॥११॥
मागुती वानेश्वर धरिला ॥ बळेंच कक्षेंत दाटिला ॥
कक्षेमाजी गुंडाळला ॥ कंटाळला दुर्गंधीनें ॥१२॥
म्हणे वाळीनें रावण ॥ कक्षेंत घालोनि केलें स्नान ॥
तो सूड आजि घेतला जाण ॥ टाकीन रगडोनि मर्कटा ॥१३॥
जयवाद्यांचा गजर ॥ होता जाहला पैं अपार ॥
रणीं आजि साधिला वानेश्वर ॥ मग घटश्रोत्र परतला ॥१४॥
संसारजाळें परम थोर ॥ त्यांत गुंतला साधक नर ॥
तो पळावया पाहे बाहेर ॥ तेवीं वानरेश्वर निघों इच्छी ॥१५॥
दुर्गंधींत पडिलें मुक्ताफळ ॥ कीं पंकगर्तेत मराळ ॥
कीं ब्राह्मणश्रोत्री निर्मळ ॥ हिंसकगृहीं कोंडिला ॥१६॥
असो मस्त जाहला कुंभकर्ण ॥ नसे तया देहस्मरण ॥
तों कक्षेंतून सूर्यनंदन ॥ न लागतां क्षण निसटला ॥१७॥
नेत्रपातें जंव हेलावत ॥ इतुक्यांत साधिलें कृत्य ॥
कुंभकर्णस्कंधी उभा ठाकत ॥ तारानाथ तेधवां ॥१८॥
दोनी विशाळ कर्ण ते वेळे ॥ दोनी करी दृढ धरिले ॥
दंतसंधीत सांपडविलें ॥ नासिक कुंभकर्णाचें ॥१९॥
कर्ण नासिक उपडोनि ॥ सुग्रीव उडाला गगनीं ॥
रामचरणांवरी येऊनि ॥ मस्तक ठेवी सप्रेम ॥१२०॥
एकचि जाहला जयजयकार ॥ देव वर्षती सुमनसंभार ॥
यशस्वी जाहला सूर्यकुमर ॥ आलिंगी रघुवीर तयातें ॥२१॥
घ्राण कर्ण नेले सूर्यसुतें ॥ परी शुद्धि नाहीं कुंभकर्णातें ॥
वर्तमान कळलें रावणातें ॥ घटश्रोत्रातें विटंबिलें ॥२२॥
परम चिंताक्रांत रावण ॥ नापिक दीधला पाठवून ॥
गगनचुंबित वंश घेऊन ॥ तयासी दर्पण बांधिला ॥२३॥
सप्तखणी महाद्वार देख ॥ त्यावरी उभा ठाके नापिक ॥
कुंभकर्णाचें सन्मुख ॥ आदर्श तेव्हां दाखविला ॥२४॥
छेदोनि नेले नासिक कर्ण ॥ दर्पणीं देखे कुंभकर्ण ॥
सुग्रीव गेला कक्षेंतून ॥ झाले स्मरण ते काळीं ॥२५॥
जैसा किंशुकीं फुलला पर्वत ॥ तैसा कुंभकर्ण दिसे आरक्त ॥
परम विटला मनांत ॥ स्वरूप आपुलें देखतां ॥२६॥
मनांत म्हणे कुंभकर्ण ॥ आतां व्यर्थ काय वांचून ॥
दशग्रीवास परतोन ॥ काय हें वदन दाखवूं ॥२७॥
कपींसहित रामलक्ष्मण ॥ गिळीन रणीं न लागतां क्षण ॥
पृथ्वी पालथी घालीन ॥ निर्दाळीन देव सर्व ॥२८॥
कुंभकर्ण परतला दळीं ॥ दांते रगडी अधपाळीं ॥
कृतांतवत हांक दीधली ॥ डळमळली उर्वी तेव्हां ॥२९॥
परतला देखोनि कुंभकर्ण ॥ पळों लागले वानरगण ॥
आले रघुपतीस शरण ॥ रक्षीं रक्षीं म्हणूनियां ॥१३०॥
दृष्टीं लक्षूनि राघव ॥ कुंभकर्णे घेतली धांव ॥
तंव तो सौमित्र बलार्णव ॥ पाचारीत तयातें ॥३१॥
म्हणे उभा राहें एक क्षण ॥ पाहें माझें शरसंधान ॥
परी तो न मानी कुंभकर्ण ॥ रामाकडे धांविन्नला ॥३२॥
परम कोपें सुमित्राकुमर ॥ कुंभकर्णावरी टाकी सप्त शर ॥
ते सपक्ष बुडाले समग्र ॥ मध्येंच गुप्त जाहले ॥३३॥
सौमित्रें टाकिले बहुत बाण ॥ परी ते न मानी कुंभकर्ण ॥
जेवीं पर्वतावरी पुष्पें येऊन ॥ पडतां आसन न चळेचि ॥३४॥
पंडितवचनें रसाळीं ॥ पाखांडी न मानी कदाकाळी ॥
तैसा कुंभकर्ण ते वेळीं ॥ न गणी शर सौमित्रांचे ॥३५॥
तों गदा घेऊनि बिभीषण ॥ बंधूवरी आला धांवोन ॥
म्हणे निर्नासिका एक क्षण ॥ मजसीं आतां युद्ध करी ॥३६॥
म्या पूर्वी बोधिला दशवक्र ॥ परी त्यासी झोंबला कामविखार ॥
तेणें भुलला तो समग्र ॥ शुद्धि अणुमात्र नसेचि ॥३७॥
गोड वचनें कडू वाटती ॥ कडू तें गोड वाटे चित्तीं ॥
एश्वर्यमद झेंडू निश्चितीं ॥ कंठी दाटला तयाचे ॥३८॥
रावणदुष्कृतवल्लीचीं फळें ॥ तुम्हांस प्राप्त जाहली शीघ्रकाळें ॥
त्याचे प्रत्युत्तर ते वेळे ॥ कुंभकर्ण ते देतसे ॥३९॥
म्हणे बिभीषणा शतमूर्खा ॥ हांससी माझ्या कर्णनासिका ॥
मी कोण हें तुज देखा ॥ नाही कळलें अद्यापि ॥१४०॥
कुळक्षयास कारण ॥ तूं मिळालास इकडे येऊन ॥
मजपुढें दावूं नको वदन ॥ क्षणें प्राण घेईन तुझा ॥४१॥
राक्षससिंहांमाजी देख ॥ तूं एक जन्मलासी जंबुक ॥
कपटिया न दाखवीं मुख ॥ कुळवना पावक तूं ॥४२॥
तुझीं शतखंडें करितों ये वेळीं ॥ परी आम्हासी द्यावया तिळांजळी ॥
तुज रक्षिलें ये काळीं ॥ कुलोत्पत्तीकारणें ॥४३॥
होई माघारा वेगेंसी ॥ निघे रामाचे पाठीसी ॥
आजि कपिसेना निश्चयेसी ॥ मी ग्रासीन क्षणार्धें ॥४४॥
ऐकूनि बंधूचें वचन ॥ माघारला बिभीषण ॥
पुढें रामावरी कुंभकर्ण ॥ मुद्रर घेऊनि धांविन्नला ॥४५॥
श्रीराम म्हणे कुंभकर्णा ॥ आजि तूं पात्र जाहलासी माझिया बाणा ॥
तुम्ही पीडिलें त्रिभुवना ॥ जाणोनि ऐसें अवतरलो ॥४६॥
तुवां जे गिळिले वानरगण ॥ ते पोट फोडोनि बाहेर काढीन ॥
तुझें जवळीं आले मरण ॥ पाहें सावधान मजकडे ॥४७॥
ऐसें बोलोनि दिनकर कुळदीप ॥ क्षण न लागतां चढवी चाप ॥
जो आदिपुरुष त्याचा प्रताप ॥ न वर्णवेचि वेदशास्त्रां ॥४८॥
रणरंगधीर रघुवीर ॥ उभा राहिला कुंभकर्णासमोर ॥
कीं निशा संपतां दिनकर ॥ उदयाचळीं विराजे ॥४९॥
म्हणे मृत्युपुरीस राहें जाऊन ॥ सवेंच पाठवितों रावण ॥
लंकेस स्थापिला बिभीषण ॥ चंद्रार्क भ्रमती गगनीं जों ॥१५०॥
यावरी बोले कुंभकर्ण ॥ तूं जन्मांतरीचा शत्रु पूर्ण ॥
हें आम्हांसी आहे ज्ञान॥ मूळची खूण सर्वही ॥५१॥
आपुलें सामर्थ्य वार्णिलें ॥ परी मजपुढें कदा न चाले ॥
कपिदळ गिळीन सगळें ॥ दांतांसी दांत न लावितां ॥५२॥
तुवां वधिले खर त्रिशिरा दूषण ॥ वाळी मारिला कपटेंकरून ॥
परी मजपुढें तो अभिमान ॥ न चले कदां मानवीया ॥५३॥
अरे निद्रार्णवीं जाहलों निमग्न ॥ नातरी नुरते त्रिभुवन ॥
तुज वीर म्हणतां जाण ॥ हांसे मज येतसे ॥५४॥
वनचरांसी पीडी कुंजर ॥ परी मृगेंद्रापुढें जर्जर ॥
कीं मेघापुढें वणवा अपार ॥ विझोनि जाय क्षणार्धें ॥५५॥
तैसें तुज येथे करीन ॥ सोडी तुझे निर्वाण बाण ॥
हें ऐकोनि रघुनंदन ॥ ओढी आकर्ण शर तेव्हां ॥५६॥
जैशा प्रळयविजा अनिवार ॥ तैसे राघवाचे येती शर ॥
असुरें मुख पसरिलें थोर ॥ गिळी अपार बाणांते ॥५७॥
भयभीत वानर तेथें ॥ विलोकिती कुंभकर्णाचे सामथ्यातें ॥
बाण गिळिले असंख्यातें ॥ नव्हे गणित तयांचे ॥५८॥
सागरीं मिळती गंगापूर ॥ तैसे मुखीं सांठवी शर ॥
मग हातीं घेऊन मुद्रर ॥ रामावरी धांविन्नला ॥५९॥
हांक फोडिली प्रचंड ॥ तेणें डळमळलें ब्रह्मांड ॥
जळचर वनचर उदंड ॥ गतप्राण जाहले ॥१६०॥
मुद्रर भोवंडी चक्राकार ॥ रामावरी घालूं पाहे असुर ॥
मग तो रणरंगधीर ॥ दिव्य शर काढीत ॥६१॥
मंत्राच्या आवृत्ति करूनी ॥ बाणाग्नीं स्थापिला प्रळयाग्नी ॥
आकर्ण ओढी ओढूनी ॥ बाण सोडी राघव ॥६२॥
मुद्ररासहित हस्त ॥ बाणें तोडिला अकस्मात ॥
भेदीत गेला गगनपंथ ॥ सपक्ष उरग जयापरी ॥६३॥
रामबाण हाचि सुपर्ण ॥ गेला हस्तसर्प घेऊन ॥
सवेंच सूर्यबीज जपोन ॥ रघुनंदन शर सोडी ॥६४॥
तेणें खंडिला दुजा हस्त ॥ गेला गगनीं अकस्मात ॥
दोन्ही भुजा भूमीवरी पडत ॥ विंध्याचळाचिया परी ॥६५॥
परी भुजा होऊनि जित ॥ जाती कपींचे भार रगडीत ॥
वानर उचलोनि पर्वत ॥ हस्त ठेंचिती असुराचे ॥६६॥
सांडूनि संग्रामाची भूमी ॥ वानर पळती गिरिवृक्षगुल्मी ॥
परी अचळ ठाण संग्रामीं ॥ रघुत्तमाचें चळेना ॥६७॥
मग काढिले दोन शर ॥ गुणीं योजोनियां सोडी सत्वर ॥
त्यांही दोन्ही चरण समग्र ॥ कटीपासूनि खंडिले ॥६८॥
चरण गडबडाट थोर ॥ खालीं पाषाण होती चूर ॥
महावृक्ष घेऊनि वानर ॥ ताडिती बळें ठायीं ठायीं ॥६९॥
असो मुख पसरोनि ते काळीं ॥ राक्षस धांवे पोटचालीं ॥
विमानीं सुरवर ते वेळीं ॥ आश्चर्य करिती तयाचें ॥१७०॥
नासिकीं लोचनी वदनीं ॥ ज्वाळा सोडी क्रोधेकरूनी ॥
इकडे भीमकाळास्त्र बाणीं ॥ अयोध्यानाथें स्थापिलें ॥७१॥
करी वायूचें खंडण ॥ ऐसा राघवाचा दिव्य बाण ॥
आकर्ण ओढी ओढून ॥ न लागतां क्षण सोडिला ॥७२॥
वजे्रं तुटे शैलशिखर ॥ तैसें बाणें उडविलें शिर ॥
भेदीत गेलें अंबर ॥ करीत प्रळयगर्जना ॥७३॥
विमानें घेऊनि पळती सुरवर ॥ भयभीत शशीदिनकर ॥
तों शिर उतरोनि सत्वर ॥ लंकेवरी पडियेले ॥७४॥
बहुत सदनें मोडून ॥ कित्येक असुर पावले मरण ॥
ते वेळीं वृंदारकगण ॥ पुष्पें वर्षती श्रीरामावरी ॥७५॥
जाहला एकचि जयजायकार ॥ विजयी जाहला रघुवीर ॥
दुंदुभि वाजवी सुरेश्वर ॥ आनंद अंबरीं न समाये ॥७६॥
धांवती सकळ वानरगण ॥ वंदिती रघुपतीचे चरण ॥
कुंभकरर्णाचें उरलें सैन्य ॥ लंकेमाजी प्रवेशले ॥७७॥
सभेसी येऊनि घायाळ ॥ वर्तमान सांगती सकळ ॥
ऐकतां रावण पडला विकळ ॥ सिंहासनावरूनि ॥७८॥
म्हणे गेलें कुंभकर्णनिधान ॥ बंधूविणें दिशा शून्य ॥
ऐसा शोकसमुद्रीं पडतां रावण ॥ आला धांवूनि इंद्रजित ॥७९॥
रावणासी सांवरून ॥ म्हणे राया पाहे विचारून ॥
या मृत्युलोकासी येऊन ॥ चिरंजीव कोण राहिला ॥१८०॥
यावरी आमुचा विपरीत काळ ॥ वानर मारिती राक्षसदळ ॥
खद्योते गिळिलें सूर्यमंडळ ॥ मशक भूगोळा हालवी ॥८१॥
पतंगपक्षेवातेंकरूनी ॥ कैसा विझाला प्रळयाग्नी ॥
भूतांनी काळ नेउनी ॥ कुटके करून भक्षिला ॥८२॥
कुंभकर्ण वीरकेसरी ॥ रणीं मारिला नरवानरीं ॥
विपरीत काळाची परी ॥ ऐसीच असे विचारा ॥८३॥
रावणाचें विंशति नेत्र ॥ पाझरती दुःखें नीर ॥
त्या काळी सहा जण वीर ॥ उभे ठाकले संग्रामा ॥८४॥
रामविजयग्रंथ विशेष ॥ युद्धकांड माजला वीररस ॥
तो श्रवण करा सावकाश ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥८५॥
रणरंगधीर रघुवीर ॥ भक्तवत्सल परम उदार ॥
अभंग अक्षय श्रीधरवर ॥ विजयी साचार सर्वदा ॥८६॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ सप्तविंशतितमोऽध्याय गोड हा ॥१८७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥




GO TOP