॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ प्रथमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]विराध वध -


श्रीमहादेव उवाच
अथ तत्र दिनं स्थित्वा प्रभाते रघुनन्दनः ।
स्नात्वा मुनिं समामंत्र्य प्रयाणायोपचक्रमे ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, नंतर त्या दिवशी तेथे अत्रींच्या आश्रमात राहून दुसरे दिवशी प्रातःकाळी स्नान करून व मुनींचा निरोप घेऊन रामांनी प्रयाण करण्याची तयारी केली. (१)

मुने गच्छामहे सर्वे मुनिमण्डलमण्डितम् ।
विपिनं दण्डकं यत्र त्वमाज्ञातुमिहार्हसि ॥ २ ॥
(राम म्हणाले) " अहो मुनी, मुनिमंडळींनी सुशोभित अशा दंडकारण्यात आम्ही सर्व जण जाणार आहोत. तुम्ही आम्हांला अनुज्ञा द्यावी. (२)

मार्गप्रदर्शनार्थाय शिष्यानाज्ञप्तुमर्हसि ।
श्रुत्वा रामस्य वचनं प्रहस्यात्रिर्महायशाः ।
प्राह तत्र रघुश्रेष्ठं राम राम सुराश्रय ॥ ३ ॥
सर्वस्य मार्गद्रष्टा त्वं तव को मार्गदर्शकः ।
तथापि दर्शयिष्यन्ति तव लोकानुसारिणः ॥ ४ ॥
तसेच दंडकारण्याचा मार्ग दाखविण्यासाठी आपण शिष्यांना आज्ञा द्यावी." रामाचे वचन ऐकल्यावर महायशस्वी मुनी मोठ्यांदा हसून रघुश्रेष्ठ रामांना म्हणाले, "अहो रामा, देवांचा आश्रय असणार्‍या अहो रामा, तुम्ही सर्वाना मार्ग दाखविणारे आहात. तुम्हांला मार्ग दाखवणारा कोण असेल बरे ? तथापि या वेळी लोकव्यवहाराप्रमाणे वागणार्‍या तुम्हांला माझे शिष्य मार्ग दाखवतील. " (३-४)

इति शिष्यान्समादिश्य स्वयं किञ्चित्तमन्वगात् ।
रामेण वारितः प्रीत्या अत्रिः स्वभवनं ययौ ॥ ५ ॥
असे सांगून आणि शिष्यांना आज्ञा करून, मुनिवर अत्री स्वतःच काही अंतर रामांबरोबर गेले. मग रामांनी त्यांना मोढ्या प्रेमाने परत जाण्यास सांगितल्यावर अत्री स्वतःव्या आश्रमाकडे परत गेले. (५)

क्रोशमात्रं ततो गत्वा ददर्श महतीं नदीं ।
अत्रेः शिष्यानुवाचेदं रामो राजीवलोचनः ॥ ६ ॥
फक्त एक कोस अंतर गेल्यावर रामांना एक फार मोठी नदी दिसली. तेव्हा कमलनयन राम अत्रींच्या शिष्यांना म्हणाले. (६)

नद्याः सन्तरणे कश्चिदुपायो विद्यते न वा ।
ऊचुस्ते विद्यते नौका सुदृढा रघुनन्दन ॥ ७ ॥
"हे बटूंनो, ही नदी पार करून जाण्यास काही उपाय आहे की नाही ?" तेव्हा ते शिष्य म्हणाले, "अहो रघुनंदना, येथे एक फार बळकट नौका आहे. (७)

तारयिष्यामहे युष्मान्वयमेव क्षणादिह ।
ततो नावि समारोप्य सीतां राघवलक्ष्मणौ ॥ ८ ॥
क्षणात्सन्तारयामासुर्नदीं मुनिकुमारकाः ।
रामाभिनन्दिताः सर्वे जग्मुरत्रेरथाश्रमम् ॥ ९ ॥
येथे आम्हीच तुम्हा सर्वांना तिच्यामध्ये बसवून क्षणात नदीच्या पलीकडील तीराला नेऊ." त्यानंतर सीता, राम व लक्ष्मण यांना नौकेत चढवून मुनिकुमारांनी एका क्षणात त्या सर्वांना नदीच्या पैलतीराला पोचविले. मग रामांनी त्यांची प्रशंसा केल्यावर ते सर्व मुनिकुमार नंतर अत्रींच्या आश्रमाकडे परत गेले. (८-९)

तावेत्य विपिनं घोरं झिल्लीझङ्‌कारनादितम् ।
नानामृगगणाकीर्णं सिंहव्याघ्रादिभीषणम् ॥ १० ॥
राक्षसैर्घोररूपैश्च सेवितं रोमहर्षणम् ।
प्रविश्य विपिनं घोरं रामो लक्ष्मणमब्रवीत् ॥ ११ ॥
त्यानंतर ते दोघे एका भयानक अरण्याजवळ आले. रातकिड्यांच्या झंकाराच्या नादाने निनादित झालेल्या, नानाप्रकारच्या वन्यपशूंच्या समूहांनी भरलेल्या, सिंह, वाघ इत्यादी हिंस्त्र पशूंमुळे भयंकर वाटणार्‍या, भयंकर रूप असणारे राक्षस राहात असलेल्या, आणि रोमांचकारक, अशा त्या भयंकर वनात शिरल्यावर श्रीरामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले. (१०-११)

इतः परं प्रयत्‍नेन गन्तव्यं सहितेन मे ।
धनुर्गुणेन संयोज्य शरानपि करे दधत् ॥ १२ ॥
अग्रे यास्याम्यहं पश्चात्त्वमन्वेहि धनुर्धर ।
आवयोर्मध्यगा सीता मायेवात्मपरात्मनोः ॥ १३ ॥
"आता यापुढे आपण दोघांनी सावधपणे जावयास हवे. धनुष्याला प्रत्यंचा जोडून आणि हातात बाण घेऊन मी पुढे चालत राहातो, आणि माझ्या मागे तू धनुष्य धारण करून ये. ज्याप्रमाणे जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये माया असते, त्या प्रमाणे आपणा दोघांच्यामध्ये सीताअसू दे. (१२-१३)

चक्षुश्चारय सर्वत्र दृष्टं रक्षोभयं महत् ।
विद्यते दण्डकारण्ये श्रुतपूर्वमरिन्दम ॥ १४ ॥
हे अरिदमना लक्ष्मणा, तू सावधपणे सगळीकडे दृष्टी फिरवत राहा. आपण पूर्वी ऐकल्याप्रमाणे या दंडकारण्यात राक्षसांचे फार मोठे भय दिसून येत आहे." (१४)

इत्येवं भाषमाणौ तौ जग्मतुः सार्धयोजनम् ।
तत्रैका पुष्करिण्यास्ते कह्लारकुमुदोत्पलैः ॥ १५ ॥
अशा प्रकारे परस्परांशी बोलत ते दोघे दीड योजन (सहा कोस) अंतर चालून गेले. त्या ठिकाणी कल्हार, कुमुदे, आणि कमळे यांनी भरलेली एक पुष्करिणी होती. (१५)

अम्बुजैः शीतलोदेन शोभमाना व्यदृश्यत ।
तत्समीपमथो गत्वा पीत्वा तत्सलिलं शुभम् ॥ १६ ॥
ऊषुस्ते सलिलाभ्याशे क्षणं छायामुपाश्रिताः ।
ततो ददृशुरायान्तं महासत्त्वं भयानकम् ॥ १७ ॥
कमळे व शीतल पाणी यांनी शोभणारी ती दिसत होती. नंतर जवळ जाऊन आणि तिचे स्वच्छ व शीतल पाणी पिऊन जवळच्या एका वृक्षाच्या छायेखाली ते तिघे क्षणभर विसावले. त्यावेळी त्यांना दिसले की एक भयानक महासामर्थ्यशाली राक्षस येत आहे. (१६-१७)

करालदंष्ट्रवदनं भीषयन्तं स्वगर्जितैः ।
वामांसे न्यस्तशूलाग्रग्रथितानेकमानुषम् ॥ १८ ॥
त्याच्या मुखात तीक्ष्ण दाढा होत्या. आपल्या गर्जनांनी तो इतरांना भिववीत होता. आणि त्याच्या डाव्या खांद्यावर ठेवलेल्या शूलाच्या टोकावर विद्ध केलेली अनेक माणसे लोंबत होती. (१८)

भक्षयन्तं गजव्याघ्रमहिषं वनगोचरम् ।
ज्यारोपितं धनुर्धृत्वा रामो लक्ष्मणमब्रवीत् ॥ १९ ॥
आणि तो वनात राहाणारे अनेक हत्ती, वाघ आणि रेडे यांना खात येत होता. त्याला पाहिल्यावर प्रत्यंचा जोडलेले धनुष्य हातात घेऊन श्रीरामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले. (१९)

पश्य भ्रातर्महाकायो राक्षसोऽयमुपागतः ।
आयात्यभिमुखं नोऽग्रे भीरूणां भयमावहन् ॥ २० ॥
"अरे बंधो, बघ. प्रचंड शरीर असणारा हा राक्षस जवळ येत आहे. भित्र्या माणसाच्या ठिकाणी भय निर्माण करणारा हा राक्षस समोरून आपल्याकडे तोंड करून येत आहे. (२०)

सज्जीकृतधनुस्तिष्ठ मा भैर्जनकनन्दिनि ।
इत्युक्त्वा बाणमादाय स्थितो राम इवाचलः ॥ २१ ॥
हे लक्ष्मणा, धनुष्य सज्ज करून तू तयारीत उभा राहा. हे जनकनंदिनी, तू भिऊ नकोस." असे सांगून व धनुष्यावर बाण चढवून श्रीराम एखाद्या पर्वताप्रमाणे निश्चल उभे राहिले. (२१)

स तु दृष्ट्‍वा रमानाथं लक्ष्मणं जानकीं तदा ।
अट्टहासं ततः कृत्वा भीषयनिदमब्रवीत् ॥ २२ ॥
त्या वेळी श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी यांना पाहिल्यावर मोठ्याने हसून हाः हाः करीत भीती दाखवीत तो राक्षस म्हणाला. (२२)

कौ युवां बाणतूणीरजटावल्कलधारिणौ ।
मुनिवेषधरौ बालौ स्त्रीसहायौ सुदुर्मदौ ॥ २३ ॥
"अरे पोरांनो, तुम्ही मुनीचा वेष आणि बाण, भाते, जटा आणि वल्कले धारण केली आहेत. तुमच्या बरोबर एक स्त्री आहे. तुम्ही मला फार मदोन्मत दिसता. तुम्ही दोघे कोण आहात ? (२३)

सुन्दरौ बत मे वक्त्रप्रविष्टकवलोपमौ ।
किमर्थं आगतौ घोरं वनं व्यालनिषेवितम् ॥ २४ ॥
खरोखर तुम्ही सुंदर असे दोघे माझ्या तोंडात जाणार्‍या घासाप्रमाणे आहात. हिंस्त्र प्राण्यांनी भरलेल्या या घोर वनात तुम्ही कशासाठी आला आहात ?" (२४)

श्रुत्वा रक्षोवचो रामः स्मयमान उवाच तम् ।
अहं रामस्त्वयं भ्राता लक्ष्मणो मम सम्मतः ॥ २५ ॥
राक्षसाचे वचन ऐकल्यावर हसत हसत श्रीराम त्याला म्हणाले, "मी राम आहे. आणि हा माझा धाकटा लाडका भाऊ लक्ष्मण आहे. (२५)

एषा सीता मम प्राणवल्लभा वयमागताः ।
पितृवाक्यं पुरस्कृत्य शिक्षणार्थं भवादृशाम् ॥ २६ ॥
तसेच मला प्राणाप्रमाणे प्रिय असणारी ही सीता माझी भार्या आहे. पित्याचे वचन शिरोधार्थ मानून, तुमच्या सारख्यांना शिक्षा करण्यासाठी आम्ही वनात आलो आहोत." (२६)

शृत्वा तद्‍रामवचनमट्टहासमथाकरोत् ।
व्यादाय वक्त्रं बाहुभ्यां शूलमादाय सत्वरः ॥ २७ ॥
श्रीरामांचे वचन ऐकल्यावर त्याने प्रचंड हास्य केले. आणि तोंडाचा आ वासून झट्‌कन त्याने आपला शूल हाती घेतला. (२७)

मां न जानासि राम त्वं विराधं लोकविश्रुतम् ।
मद्‌भयान्मुनयः सर्वे त्यक्त्वा वनमितो गताः ॥ २८ ॥
तो म्हणाला, "अरे रामा, जगामध्ये प्रसिद्ध असणार्‍या मज विराधाला तू जाणत नाहीस काय ? माझ्या भयामुळेच हे वन सोडून सर्व मुनी येधून पळून गेले आहेत. (२८)

यदि जीवितुमिच्छास्ति त्यक्त्वा सीतां निरायुधौ ।
पलायतं न चेच्छीघ्रं भक्षयामि युवामहम् ॥ २९ ॥
तेव्हा आता जर तुम्हाला जिवंत राहाण्याची इच्छा असेल तर येथेच सीतेला सोडून देऊन, शस्त्रे फेकून देऊन, तुम्ही दोघे येथून पळून जा. नाहीतर मी तुम्हा दोघांना पटकन खाऊन टाकीन." (२९)

इत्युक्त्वा राक्षसः सीतामादातुमभिदुद्रुवे ।
रामश्चिच्छेद तद्‌बाहू शरेण प्रहसन्निव ॥ ३० ॥
असे बोलून सीतेला पकडण्यासाठी तो धावत येऊ लागला. तेव्हा मोठ्याने हसत हसत श्रीरामांनी एका बाणाने त्याचे दोन्ही बाहू तोडून टाकले. (३०)

ततः क्रोधपरीतात्मा व्यादाय विकटं मुखम् ।
राममभ्यद्रवद्‍रामश्चिच्छेद परिधावतः ॥ ३१ ॥
पदद्वयं विराधस्य तदद्‌भुतमिवाभवत् ॥ ३२ ॥
तेव्हा क्रोधाने तो आपले विक्राळ मुख उघडून श्रीरामचंद्रांकडे धावत सुटला. त्या वेळी आपल्याकडे धावत येणार्‍या त्या विराधाचे दोन्ही पाय श्रीरामांनी तोडून टाकले. हे कृत्य म्हणजे एक अद्‌भुत कार्य होते. (३१-३२)

ततः सर्प इवास्येन ग्रसितुं राममापतत् ।
ततोऽर्धचन्द्राकारेण बाणेनास्य महच्छिरः ॥ ३३ ॥
चिच्छेद रुधिरौघेण पपात धरणीतले ।
ततः सीता समालिङ्‌ग्य प्रशशंस रघूत्तमम् ॥ ३४ ॥
त्यानंतर आपल्या मुखाने श्रीरामांना गिळण्यास तो विराध एखाद्या सापाप्रमाणे पुढे येऊ लागला. तेव्हा भगवान श्रीरामांनी एका अर्धचंद्राकार बाणाने त्याचे प्रचंड मस्तक तोडून टाकले. तेव्हा रक्ताने माखलेला तो जमिनीवर पडला. त्या वेळी रघूत्तमांना आलिंगन देऊन सीतेने त्यांची मोठी प्रशंसा केली. (३३-३४)

ततो दुन्दुभयो नेदुर्दिवि देवगणेरिताः ।
ननृतुश्चाप्सरा हृष्टा जगुर्गन्धर्वकिन्नराः ॥ ३५ ॥
त्या वेळी देवसमूहाच्या प्रेरणेने आकाशात दुंदुभींचा नाद घुमू लागला. आनंदित झालेल्या अप्सरा नाचू लागल्या. आणि हृष्ट झालेले गंधर्व आणि किन्नर गाऊ लागले. (३५)

विराधकायादतिसुन्दराकृति-
     र्विभ्राजमानो विमलाम्बरावृतः ।
प्रतप्तचामीकरचारुभूषणो
     व्यदृश्यताग्रे गगने रविर्यथा ॥ ३६ ॥
इकडे विराधाच्या मृत देहातून, अतिशय सुंदर आकार असणारा, स्वच्छ वस्त्रे परिधान केलेला, तापलेल्या सोन्याप्रमाणे असणार्‍या सुंदर अलंकारांनी सुशोभित असणारा आणि आकाशातील सूर्याप्रमाणे प्रकाशमान असा एक पुरुष समोरच प्रकट झाला. (३६)

प्रणम्य रामं प्रणतार्तिहारिणं
     भवप्रवाहोपरमं घृणाकरम् ।
प्रणम्य भूयः प्रणनाम दण्डवत्
     प्रपन्नसर्वार्तिहरं प्रसन्नधीः ॥ ३७ ॥
त्या पुरुषाने प्रभू श्रीरामांना प्रणाम केला आणि प्रसन्न चित्ताने स्तुती करीत म्हणाला, "हे रामचंद्रा, तुम्ही साक्षात कृपा-मूर्ती आहात. प्रणाम करणार्‍या जीवांचे दुःख तुम्ही हरण करता व त्यांच्या जन्म-मरणाचा फेरा नष्ट करता." असे म्हणत वारंवार दंडवत करीत प्रभू रामांचा शरणागत होऊन तो म्हणू लागला, (३७)

विराध उवाच
श्रीराम राजीवदलायताक्ष
     विद्याधरोऽहं विमलप्रकाशः ।
दुर्वाससाकारणकोपमूर्तिना
     शप्तः पुरा सोऽद्य विमोचितस्त्वया ॥ ३८ ॥
विराध म्हणाला- " कमलपत्राप्रमाणे नयन असणार्‍या हे रामा, विमल तेज असणारा मी एक विद्याधर आहे. विनाकारण रागावणार्‍या श्रीदुर्वासाने मला पूर्वी शाप दिला होता. आज मला तुम्ही शापातून मुक्त केले आहे. (३८)

इतः परं त्वच्चरणारविन्दयोः
     स्मृतिः सदा मेऽस्तु भवोपशान्तये ।
त्वन्नामसङ्‌कीर्तनमेव वाणी
     करोतु मे कर्णपुटं त्वदीयम् ॥ ३९ ॥
कथामृतं पातु करद्वयं ते
     पादारविन्दार्चनमेव कुर्यात् ।
शिरश्च ते पादयुगप्रणामं
     करोतु नित्यं भवदीयमेवम् ॥ ४० ॥
आता तुम्ही माझ्यावर अशी दया करा की यापुढे संसाराच्या नाशाला कारण होणारे तुमच्या पदकमलांचे स्मरण मला सदा असू दे. माझी वाणी सतत तुमच्या नामाचे संकर्तिन करो, माझे कान तुमच्या कथामृताचे प्राशन करोत, माझे दोन्ही हात तुमच्या चरणकमळांची पूजा करोत, आणि माझे मस्तक हे नेहमी तुमच्या पदयुगलाला प्रणाम करीत राहो. (३९-४०)

नमस्तुभ्यं भगवते विशुद्धज्ञानमूर्तये ।
आत्मारामाय रामाय सीतारामाय वेधसे ॥ ४१ ॥
तुम्ही भगवान आहात. विशुद्ध ज्ञान हे तुमचे स्वरूप आहे. तुम्ही तुमच्या स्वरूपातच रममाण होता. तुम्ही आपल्या भक्तांना रमविणारे आहात. तुम्ही सीतारूपी मायेने युक्त आहात. सृष्टी रचणारे ब्रह्मदेव तुम्हीच आहात. तुम्हांला माझा नमस्कार असो. (४१)

प्रपन्नं पाहि मां राम यास्यामि त्वदनुज्ञया ।
देवलोकं रघुश्रेष्ठ माया मां मावृणोतु ते ॥ ४२ ॥
हे रामा, तुम्हांला मी शरण आलो आहे. माझे तुम्ही रक्षण करा. हे रघुश्रेष्ठा, तुमच्या अनुज्ञेने मी देवलोकी जात आहे. तुमची माया मला आच्छादित न करो." (४२)

इति विज्ञापितस्तेन प्रसन्नो रघुनन्दनः ।
ददौ वरं तदा प्रीतो विराधाय महामतिः ॥ ४३ ॥
तेव्हा विराधाने अशी प्रार्थना केल्यावर रघुनंदन प्रसन्न झाले आणि महाबुद्धिमान अशा रामांनी आनंदाने विराधाला वर दिला. (४३)

गच्छ विद्याधराशेषमायादोषगुणा जिताः ।
त्वया मद्दर्शनात्सद्यो मुक्तो ज्ञानवतां वरः ॥ ४४ ॥
" हे विद्याधरा, आता तू जा. मायेचे सर्व गुण आणि दोष तू जिंकून घेतले आहेस. ज्ञानी लोकांत तू श्रेष्ठ आहेस. माझे दर्शन झाल्यामुळे तू ताबडतोब मुक्त झाला आहेस. (४४)

मद्‌भक्तिदुर्लभा लोके जाता चेन्मुक्तिदा यतः ।
अतस्त्वं भक्तिसम्पन्नः परं याहि ममाज्ञया ॥ ४५ ॥
रामेण रक्षोनिधनं सुघोरं
     शापाद्विमुक्तिर्वरदानमेवम् ।
विद्याधरत्वं पुनरेव लब्धं
     रामं गृणन्नेति नरोऽखिलार्थान् ॥ ४६ ॥
या लोकात माझी भक्ती दुर्लभ आहे. कारण ती निर्माण झाली की लगेच मुक्ती देणारी आहे. तू माझ्या भक्तीने संपन्न आहेस, म्हणून माझ्या आज्ञेने तू परमधामाप्रत जा." अ शा प्रकारे श्रीरामांनी अतिशय भयंकर राक्षसाचा वध केला, त्याला शापातून मुक्तीचे वरदान दिले आणि त्याला पुनः विद्याधराचे रूप देऊन टाकले. अशा प्रकारे लीला करणार्‍या रामांची स्तुती करणारा माणूस सर्व इष्ट पदार्थ प्राप्त करून घेतो. (४५-४६)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
अरण्यकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥
अरण्यकांडातील पहिला सर्गः समाप्त ॥ १ ॥


GO TOP