[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। द्वादशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राजो दशरथस्य चिन्ता विलापश्च तेन कैकेय्या भर्त्सनं सान्त्वनं तादृशवरयाञ्चातो विनिवर्तितुमनुरोधकरणं च - महाराज दशरथांची चिंता, विलाप, कैकेयीला फटकारणे, समजावणे आणि तिला तसा वर न मागण्याविषयी अनुरोध करणे -
ततः श्रुत्वा महाराजः कैकेय्या दारुणं वचः ।
चिन्तामभिसमापेदे मुहूर्तं प्रतताप च ॥ १ ॥
कैकेयीचे हे कठोर वचन ऐकून महाराज दशरथांना मोठी चिंता पडली. ते एक मुहूर्तपर्यंत अत्यंत संताप करीत राहिले होते. ॥१॥
किं नु मेऽयं दिवास्वप्नश्चित्तमोहोऽपि वा मम ।
अनुभूतोपसर्गो वा मनसो वाप्युपद्रवः ॥ २ ॥
त्यांनी विचार केला- 'काय दिवसाच मला हे स्वप्न दिसून येत आहे की काय ? अथवा हा माझ्या चित्ताचा मोह आहे ? अथवा कुणा भूता, ग्रहा आदिच्या आवेशामुळे चित्ताला विकलता आलेली आहे ? अथवा आधि-व्याधिच्या कारणाने हा काही मनाचा उपद्रव आहे ? ॥२॥
इति संचिन्त्य तद् राजा नाभ्यगच्छत् तदासुखम् ।
प्रतिलभ्य चिरात् संज्ञां कैकेयीवाक्यतापितः ॥ ३ ॥
असा विचार करूनही त्यांना आपल्या भ्रमाच्या कारणाचा पत्ता लागला नाही. त्या समयी राजांना मूर्छित करणारे महान दुःख प्राप्त झाले. तत्पश्चात शुद्धीवर आल्यावर कैकेयीचे बोलणे आठवून त्यांना परत संताप होऊ लागला. ॥३॥
व्यथितो विक्लवश्चैव व्याघ्रीं दृष्ट्‍वा यथा मृगः ।
असंवृतायामासीनो जगत्यां दीर्घमुच्छ्वसन् ॥ ४ ॥

मण्डले पन्नगो रुद्धो मंत्रैरिव महाविषः ।
ज्या प्रमाणे एखाद्या वाघिणीला पाहून मृग व्यथित होऊन जातात, त्या प्रकारे ते नरेश कैकेयीला पाहून पीडित आणि व्याकुळ झाले. अंथरूणा शिवाय खाली जमिनीवर बसलेले महाराज दशरथ दीर्घ श्वास घेऊ लागले. जणु काही महा विषारी सर्प एखाद्या मण्डलात मंत्रांच्या द्वारे अवरूद्ध झालेला आहे की काय. ॥४ १/२॥
अहो धिगिति सामर्षो वाचमुक्त्वा नराधिपः ॥ ५ ॥

मोहमापेदिवान् भूयः शोकोपहतचेतनः ।
राजा दशरथ रोषाने भरून 'अहो ! धिक्कार असो' असे म्हणून पुन्हा मूर्छित झाले. शोकाच्या कारणामुळे त्यांची चेतना लुप्त झाल्या सारखी झाली. ॥५ १/२॥
चिरेण तु नृपः संज्ञां प्रतिलभ्य सुदुःखितः ॥ ६ ॥

कैकेयीमब्रवीत् क्रुद्धः निर्दहहन्निव तेजसा ।
बर्‍याच वेळाने जेव्हा ते परत शुद्धीवर आले तेव्हा ते नरेश अत्यंत दुःखी होऊन आपल्या तेजाने कैकेयीला जणु दग्ध करीत क्रोधपूर्वक तिला म्हणाले- ॥६ १/२॥
नृशंसे दुष्टचारित्रे कुलस्यास्य विनाशिनि ॥ ७ ॥

किं कृतं तव रामेण पापे पापं मयापि वा ।
'दयाहीन दुराचारिणी कैकेयी ! तू या कुलाचा विनाश करणारी डाकीण आहेस. पापिणी ! सांग बरे रामाने अथवा मीही तुझे काय बिघडविले आहे ?' ॥७ १/२॥
सदा ते जननीतुल्यां वृत्तिं वहति राघवः ॥ ८ ॥

तस्यैवं त्वमनर्थाय किन्निमित्तमिहोद्यता ।
'राघव तर सदा तुझ्या बरोबर सख्खी आई असल्यासारखे वर्तन करीत आले आहेत आणि तरी तू कशासाठी त्यांचे या प्रकारे अनिष्ट करण्यासाठी उद्यत झाली आहेस ?' ॥८ १/२॥
त्वं मयाऽऽत्मविनाशाय भवनं स्वं प्रवेशिता ॥ ९ ॥

अविज्ञानान्नृपसुता व्याला तीक्ष्णविषा यथा ।
'यावरून असे कळून येत आहे की मी स्वतःच्या विनाशासाठीच तुला आपल्या घरात आणून ठेवलेले होते. तू राजकन्येच्या रूपात तीक्ष्ण विषधर नागीण आहेस हे मी जाणत नव्हतो. ॥९ १/२॥
जीवलोको यथा सर्वो रामस्याह गुणस्तवम् ॥ १० ॥

अपराधं कमुद्दिश्य त्यक्ष्यामीष्टमहं सुतम् ।
ज्यावेळी सर्व जीव-जगत रामाच्या गुणांची प्रशंसा करीत आहे तेव्हां मी कुठल्या अपराधासाठी आपल्या त्या प्रिय पुत्राचा त्याग करू ? ॥१० १/२॥
कौसल्यां च सुमित्रां वा त्यजेयमपि वाश्रियम् ॥ ११ ॥

जीवितं चात्मनो रामं न त्वेव पितृवत्सलम् ।
मी कौसल्या आणि सुमित्रेलाही सोडू शकतो, राजलक्ष्मीचाही परित्याग करू शकतो, परंतु आपल्या प्राणस्वरूप पितृभक्त रामाला सोडू शकत नाही. ॥११ १/२॥
परा भवति मे प्रीतिर्दृष्ट्‍वा तनयमग्रजम् ॥ १२ ॥

अपश्यतस्तु मे रामं नष्टं भवति चेतनम् ।
आपल्या ज्येष्ठ पुत्र रामाला पहाताच माझ्या हृदयात परम प्रेम उसळून येते परंतु ज्यावेळी मी रामाला पाहू शकत नाही त्यावेळी माझी चेतना नष्ट होऊ लागते. ॥१२ १/२॥
तिष्ठेल्लोको विना सूर्यं सस्यं वा सलिलं विना ॥ १३ ॥

न तु रामं विना देहे तिष्ठेत्तु मम जीवितम् ।
सूर्याशिवाय हा संसार टिकू शकेल अथवा पाण्याशिवाय शेती पिकू शकेल हेही कदाचित संभव होईल परंतु रामाशिवाय माझ्या शरीरात प्राण राहू शकत नाहीत. ॥१३ १/२॥
तदलं त्यज्यतामेष निश्चयः पापनिश्चये ॥ १४ ॥

अपि ते चरणौ मूर्ध्ना स्पृशाम्येष प्रसीद मे ।
किमिदं चिन्तितं पापे त्वया परमदारुणम् ॥ १५ ॥
म्हणून असा वर मागण्यात काही लाभ नाही. पापपूर्ण निश्चय करणार्‍या कैकेयी ! तू हा निश्चय अथवा दुराग्रह सोडून दे. हे घे, मी तुझ्या पायांवर आपले मस्तक ठेवतो, माझ्यावर प्रसन्न हो. पापिणी ! तू अशी क्रूरतापूर्ण गोष्ट कशासाठी विचारात घेतलीस ?'. ॥१४-१५॥
अथ जिज्ञाससे मां त्वं भरतस्य प्रियाप्रिये ।
अस्तु यत्तत्त्वया पूर्वं व्याहृतं राघवं प्रति ॥ १६ ॥
जर तू हे जाणू इच्छित असशील की भरत मला प्रिय आहे की अप्रिय तर राघव भरताच्या संबंधी तू प्रथम जे काही सांगून चुकली आहेस ते पूर्ण होईल अर्थात तुझ्या प्रथम वरास अनुसरून मी भरताचा राज्याभिषेक स्वीकार करीत आहे. ॥१६॥
स मे ज्येष्ठसुतः श्रीमान् धर्मज्येष्ठ इतीव मे ।
तत् त्वया प्रियवादिन्या सेवार्थं कथितं भवेत् ॥ १७ ॥
तू प्रथम सांगत होतीस की, श्रीमान राम माझे ज्येष्ठ पुत्र आहेत कारण ते धर्माचरणातही सर्वात मोठे आहेत' परंतु आता कळून आले की तू वर वर गोड गोड बोलत होतीस आणि ती गोष्टही तू रामाकडून आपली सेवा करून घेण्यासाठी बोलत होतीस. ॥१७॥
तच्छ्रुत्वा शोकसन्तप्ता सन्तापयसि मां भृशम् ।
आविष्टासि गृहे शून्ये सा त्वं परवशं गता ॥ १८ ॥
आज रामाच्या राज्याभिषेकाची गोष्ट ऐकून तू शोकाने संतप्त झाली आहेस आणि मलाही बराच संताप देत आहेस, या वरून कळून येत आहे की या शून्य घरात तुझ्यावर भूत आदिचा आवेश झाला आहे म्हणून तू परवश होऊन अशा गोष्टी बोलत आहेस. ॥१८॥
इक्ष्वाकूणां कुले देवि सम्प्राप्तः सुमहानयम् ।
अनयो नयसम्पन्ने यत्र ते विकृता मतिः ॥ १९ ॥
देवि ! न्यायशील इक्ष्वाकुवंशात हा फार मोठा अन्याय उपस्थित झाला आहे, जेथे तुझी बुद्धी या प्रकारे विकृत होऊन गेली आहे. ॥१९॥
न हि किञ्चिदयुक्तं वा विप्रियं वा पुरा मम ।
अकरोस्त्वं विशालाक्षि तेन न श्रद्दधामि ते ॥ २० ॥
'विशाल लोचने ! आजच्या आधी तू कधी काहीही असे आचरण केले नव्हतेस, की जे अनुचित अथवा माझ्यासाठी अप्रिय होते म्हणून तुझ्या आजच्या बोलण्यावरही माझा विश्वास बसत नाही. ॥२०॥
ननु ते राघवस्तुल्यो भरतेन महात्मना ।
बहुशो हि स्म बाले त्वं कथाः कथयसे मम ॥ २१ ॥
तुझ्यासाठी तर राघवही महात्मा भरताच्या तुल्यच आहे. बाले ! तू अनेक वेळा गप्पागोष्टीच्या प्रसंगी स्वतःच ही गोष्ट मला सांगत आहेस. ॥२१॥
तस्य धर्मात्मनो देवि वने वासं यशस्विनः ।
कथं रोचयसे भीरु नव वर्षाणि पञ्च च ॥ २२ ॥
भीरू स्वभावाच्या देवी ! त्याच धर्मात्मा आणि यशस्वी रामाचा चौदा वर्षासाठीचा वनवास तुला कसा रुचतो आहे ? ॥२२॥
अत्यन्तसुकुमारस्य तस्य धर्मे कृतात्मनः ।
कथं रोचयसे वासमरण्ये भृशदारुणे ॥ २३ ॥
जो अत्यंत सुकुमार आणि धर्माच्या ठिकाणी दृढतापूर्वक मन लावणारा आहे, त्या रामाला वनवास देणे तुला कसे रुचकर वाटत आहे ? अहो ! तुझे हृदय फारच कठोर आहे. ॥२३॥
रोचयस्यभिरामस्य रामस्य शुभलोचने ।
तव शुश्रूषमाणस्य किमर्थं विप्रवासनम् ॥ २४ ॥
हे शुभलोचने ! जे सदा तुझ्या सेवेत-सुश्रूषेत लागलेले असत, त्या नयनाभिरामांना देशातून हाकलून लावण्याची इच्छा तुला कशासाठी होत आहे ? ॥२४॥
रामो हि भरताद् भूयस्तव शुश्रूषते सदा ।
विशेषं त्वयि तस्मात् तु भरतस्य न लक्षये ॥ २५ ॥
मी पहात आहे की भरतापेक्षा रामच सदा तुझी सेवा करीत असतात. भरत त्यांच्यापेक्षा तुझ्या सेवेत अधिक राहिलेले आहेत असे मी कधीही पाहिलेले नाही. ॥२५॥
शुश्रूषां गौरवं चैव प्रमाणं वचनक्रियाम् ।
कस्ते भूयस्तरं कुर्यादन्यत्र पुरुषर्षभात् ॥ २६ ॥
नरश्रेष्ठ रामांच्याहून अधिक असा दुसरा कोण आहे, जो गुरुजनांची सेवा करणे, त्यांना गौरव देणे, त्यांच्या म्हणण्यास मान्यता देणे आणि त्यांची आज्ञा ताबडतोब पालन करण्यांत तत्परता दाखवीत असतो ? ॥२६॥
बहूनां स्त्रीसहस्राणां बहूनां चोपजीविनाम् ।
परिवादोऽपवादो वा राघवे नोपपद्यते ॥ २७ ॥
माझ्या येथे कित्येक हजार स्त्रिया आहेत आणि बरेचसे उपजीवी भृत्यजन आहेत. परंतु कुणाच्याही मुखाने रामासंबंधी खरी अथवा खोटी कुठल्याही प्रकारची तक्रार कधी ऐकू आलेली नाही. ॥२७॥
सान्त्वयन् सर्वभूतानि रामः शुद्धेन चेतसा ।
गृह्णाति मनुजव्याघ्रः प्रियैर्विषयवासिनः ॥ २८ ॥
पुरूषसिंह राम समस्त प्राण्यांना शुद्ध हृदयाने सांत्वना देत असता प्रिय आचरणांच्या द्वारा राज्याच्या समस्त प्रजांना आपल्या वश करून घेत होते. ॥२८॥
सत्येन लोकाञ्जयति दीनान् दानेन राघवः ।
गुरूञ्छुश्रूषया वीरो धनुषा युधि शात्रवान् ॥ २९ ॥
वीर राघव आपल्या सात्विक भावाने समस्त लोकांना, दानांच्या द्वारे द्विजांना, सेवेने गुरूजनांना आणि धनुष्य-बाणांच्या द्वारे युद्धस्थळीं शत्रु सैनिकांना जिंकून आपल्या अधीन करून घेत असतात. ॥२९॥
सत्यं दानं तपस्त्यागो मित्रता शौचमार्जवम् ।
विद्या च गुरुशुश्रूषा ध्रुवाण्येतानि राघवे ॥ ३० ॥
'सत्य, दान, तप, त्याग, मित्रता, पवित्रता, सरलता, विद्या आणि गुरू शुश्रूषा- हे सर्व सदगुण राघवाच्या ठिकाणी स्थिररूपाने राहातात. ॥३०॥
तस्मिन्नार्जवसम्पन्ने देवि देवोपमे कथम् ।
पापमाशंससे रामे महर्षिसमतेजसि ॥ ३१ ॥
देवी ! महर्षिंच्या प्रमाणे तेजस्वी, त्या साध्या सरळ देवतुल्य रामाचे तू का अनिष्ट करू इच्छितेस ? ॥३१॥
न स्मराम्यप्रियं वाक्यं लोकस्य प्रियवादिनः ।
स कथं त्वत्कृते रामं वक्ष्यामि प्रियमप्रियम् ॥ ३२ ॥
राम सर्व लोकाशी प्रिय बोलतात. त्यांनी कधी कुणालाही अप्रिय वचन बोलले आहे असे माझ्य आठवणीत नाही. अशा सर्वप्रिय रामासाठी मी तुझ्यासाठी अप्रिय गोष्ट कशी सांगू ? ॥३२॥
क्षमा यस्मिंस्तपस्त्यागः सत्यं धर्मः कृतज्ञता ।
अप्यहिंसा च भूतानां तमृते का गतिर्मम ॥ ३३ ॥
ज्यांच्या ठिकाणी क्षमा, तप, त्याग, सत्य,धर्म, कृतज्ञता आणि समस्त जीवांच्या प्रति दया भरलेली आहे, त्या रामांशिवाय माझी काय गति होईल ? ॥३३॥
मम वृद्धस्य कैकेयि गतान्तस्य तपस्विनः ।
दीनं लालप्यमानस्य कारुण्यं कर्तुमर्हसि ॥ ३४ ॥
'कैकेयी ! मी वृद्ध झालो आहे. मृत्युच्या किनार्‍याजवळ बसलेला आहे. माझी अवस्था शोचनीय होत आहे आणि मी दीनभावाने तुझ्या समोर गयावया करीत आहे. तू माझ्यावर दया केली पाहिजेस. ॥३४॥
पृथिव्यां सागरान्तायां यत् किञ्चिदधिगम्यते ।
तत्सर्वं तव दास्यामि मा च त्वां मन्युमाविश ॥ ३५ ॥
समुद्रापर्यंत पृथ्वीवर जे काही मिळू शकते ते सर्व मी तुला देईन परंतु तू अशा दुराग्रहात पडू नको, जो मला मृत्युच्या मुखांत ढकळणारा आहे. ॥३५॥
अञ्जलिं कुर्मि कैकेयि पादौ चापि स्पृशामि ते ।
शरणं भव रामस्य माधर्मो मामिह स्पृशेत् ॥ ३६ ॥
कैकेयी ! मी हात जोडतो आणि तुझ्या पाया पडतो. तू रामाला शरण दे. ज्यायोगे येथे मला पाप लागणार नाही. ॥३६॥
इति दुःखाभिसन्तप्तं विलपन्तमचेतनम् ।
घूर्णमानं महाराजं शोकेन समभिप्लुतम् ॥ ३७ ॥

पारं शोकार्णवस्याशु प्रार्थयन्तं पुनः पुनः ।
प्रत्युवाचाथ कैकेयी रौद्रा रौद्रतरं वचः ॥ ३८ ॥
महाराज दशरथ याप्रकारे दुःखाने संतप्त होऊन विलाप करत होते. त्यांची चेतना वारंवार लुप्त होत होती. त्यांच्या मस्तकात चक्कर येत होती आणि ते शोकमग्न होऊन त्या शोकसागरातून शीघ्र पार जाण्यासाठी वारंवार अनुनय-विनय करत होते; तरीही कैकेयीचे हृदय विरघळले नाही. ती अधिकच भीषण रूप धारण करून अत्यंत कठोर वाणीने त्यांना या प्रकारे उत्तर देऊ लागली- ॥३७-३८॥
यदि दत्त्वा वरौ राजन् पुनः प्रत्यनुतप्यसे ।
धार्मिकत्वं कथं वीर पृथिव्यां कथयिष्यसि ॥ ३९ ॥
'राजन ! जर दोन वरदाने देऊन आपण नंतर त्यांच्यासाठी पश्चात्ताप करत आहात तर वीर नरेश्वर ! या भूमण्डलावर आपण आपल्या धार्मिकतेचा गाजा-वाजा कसा करू शकाल ? ॥३९॥
यदा समेता बहवस्त्वया राजर्षयः सह ।
कथयिष्यन्ति धर्मज्ञः तत्र किं प्रतिवक्ष्यसि ॥ ४० ॥
धर्माचे ज्ञाता महाराज ! ज्यावेळी बरेचसे राजर्षि एकत्र जमून आपल्या बरोबर मला दिलेल्या वरदानासंबंधी गोष्टी करू लागतील, त्या समयी तेथे त्यांना आपण काय उत्तर द्याल ? ॥४०॥
यस्याः प्रसादे जीवामि या च मामभ्यपालयत् ।
तस्याः कृतं मया मिथ्या कैकेय्या इति वक्ष्यसि ॥ ४१ ॥
हेच सांगाल ना की जीच्या प्रसादाने मी जीवित आहे, जिने (फार मोठ्या संकटापासून) माझे रक्षण केले त्या कैकेयीला वर देण्यासाठी केली गेलेली प्रतिज्ञा मी खोटी (ठरवली) केली. ॥४१॥
किल्बिषं त्वं नरेन्द्राणां करिष्यसि नराधिप ।
यो दत्त्वा वरमद्यैव पुनरन्यानि भाषसे ॥ ४२ ॥
'महाराज ! आजच वरदान देऊन जर आपण नंतर त्याच्या विपरीत गोष्टी बोलू लागाल तर आपल्या कुळांतील राजांच्या माथी कलंकाचा टिळा लावाल. ॥४२॥
शैब्यः श्येनकपोतीये स्वमांसं पक्षिणे ददौ ।
अलर्कश्चक्षुषी दत्त्वा जगाम गतिमुत्तमाम् ॥ ४३ ॥
'राजा शैब्याने ससाणा आणि कबूतर यांच्या झगड्यात (कबूतराचे प्राण वाचविण्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी) ससाणा या पक्षाला आपल्या शरीराचे मांस कापून दिले होते. त्याच प्रकारे राजा अलर्काने (एका अंध ब्राह्मणाला) आपल्या दोन्ही नेत्रांचे दान करून परम उत्तम गति प्राप्त केली होती. ॥४३॥
सागरः समयं कृत्वा न वेलामतिवर्तते ।
समयं मानृतं कार्षीः पूर्ववृत्तमनुस्मरन् ॥ ४४ ॥
'समुद्राने (देवतांच्या समक्ष ) आपली नियत सीमा न ओलाडण्याची प्रतिज्ञा केली होती, म्हणुन आजपर्यत तो तिचे उल्लंघन करीत नाही. आपणही पूर्ववर्ती महापुरुषांच्या आचरणाचे सदा स्मरण करून आपली प्रतिज्ञा खोटी करू नये. ॥४४॥
स त्वं धर्मं परित्यज्य रामं राज्येऽभिषिच्य च ।
सह कौसल्यया नित्यं रन्तुमिच्छसि दुर्मते ॥ ४५ ॥
'(परंतु आपण माझी गोष्ट कशाला ऐकाल ?) दुर्बुद्धी नरेश ! आपण तर धर्माला तिलाञ्जली देऊन रामाला राज्यावर अभिषिक्त करून राणी कौसल्ये सह सदा मौजमजा करू इच्छितां. ॥४५॥
भवत्वधर्मो धर्मो वा सत्यं वा यदि वानृतम् ।
यत्त्वया संश्रुतं मह्यं तस्य नास्ति व्यतिक्रमः ॥ ४६ ॥
'आता धर्म होवो अथवा अधर्म, खोटी होवो अथवा खरी होवो, ज्या गोष्टीसाठी आपण माझ्या समोर प्रतिज्ञा केली आहे, त्यांत काही परिवर्तन होऊ शकत नाही. ॥४६॥
अहं हि विषमद्यैव पीत्वा बहु तवाग्रतः ।
पश्यतस्ते मरिष्यामि रामो यद्यभिषिच्यते ॥ ४७ ॥
जर रामाला राज्याभिषेक होईल तर मी आपल्या समोर आपण पहात असतांनाच आजच बरेचसे विष पिऊन मरून जाईन. ॥४७॥
एकाहमपि पश्येयं यद्यहं राममातरम् ।
अञ्जलिं प्रतिगृह्णन्तीं श्रेयो ननु मृतिर्मम ॥ ४८ ॥
जर मी एक दिवसही राममाता कौसल्येला राजमाता होण्याच्या नात्याने दुसर्‍या लोकांना आपल्याला हात जोडून घेतांना पाहिले तर त्याच समयी मी स्वतः साठी मरून जाणेच उत्तम असे समजेन. ॥४८॥
भरतेनात्मना चाहं शपे ते मनुजाधिप ।
यथा नान्येन तुष्येयमृते रामविवासनात् ॥ ४९ ॥
'नरेश्वर ! मी आपल्या समोर आपली आणि भरताची शपथ घेऊन सांगत आहे की रामाला या देशातून घालवून देण्याशिवाय दुसर्‍या कुठल्याही वराने मला संतोष होणार नाही'. ॥४९॥
एतावदुक्त्वा वचनं कैकेयी विरराम ह ।
विलपन्तं च राजानं न प्रतिव्याजहार सा ॥ ५० ॥
इतके म्हणून कैकेयी गप्प बसली. राजे बरेच रडले, त्यांनी गयावया केल्या परंतु तिने त्यांच्या कुठल्याही बोलण्यास उत्तर दिले नाही. ॥५०॥
श्रुत्वा च राजा कैकेय्या वाक्यं परमशोभनम् ।
रामस्य च वने वासमैश्वर्यं भरतस्य च ॥ ५१ ॥

नाभ्यभाषत कैकेयीं मुहूर्तं व्याकुलेन्द्रियः ।
प्रैक्षतानिमिषो देवीं प्रियामप्रियवादिनीम् ॥ ५२ ॥
'श्रीरामास वनवास व्हावा आणि भरतास राज्याभिषेक' कैकेयीच्या मुखांतून निघालेले हे परम अमंगलकारी वचन ऐकून राजांची सारी इंद्रिये व्याकुळ झाली. ते एक मुहूर्तपर्यत कैकेयीला काहीही बोलले नाहीत. ते अप्रिय वचन बोलणार्‍या प्रिय राणीकडे केवळ एकटक दृष्टिने पहात राहिले. ॥५१-५२॥
तां हि वज्रसमां वाचमाकर्ण्य हृदयाप्रियाम् ।
दुःखशोकमयीं श्रुत्वा राजा न सुखितोऽभवत् ॥ ५३ ॥
मनाला अप्रिय वाटणारी कैकेयीची ती वज्राप्रमाणे कठोर तथा दुःखशोकमयी वाणी ऐकून राजांना फार दुःख झाले. त्यांचे सुख-शांति हिरावून घेतली. ॥५३॥
स देव्या व्यवसायं च घोरं च शपथं कृतम् ।
ध्यात्वा रामेति निःश्वस्य च्छिन्नस्तरुरिवापतत् ॥ ५४ ॥
देवी कैकेयीच्या त्या घोर निश्चयाकडे आणि केलेल्या शपथेकडे लक्ष जाताच ते 'हा राम !' असे म्हणून दीर्घ श्वास घेऊन तोडून टाकलेल्या वृक्षाप्रमाणे खाली कोसळले. ॥५४॥
नष्टचित्तो यथोन्मत्तो विपरीतो यथातुरः ।
हृततेजा यथा सर्पो बभूव जगतीपतिः ॥ ५५ ॥
त्यांची चेतना लुप्त झाल्यासारखी झाली. ते उन्मादग्रस्त झाल्या प्रमाणे दिसू लागले. त्यांची प्रकृती विपरीतशी झाली. ते रोगी असल्या प्रमाणे दिसत होते. या प्रमाणे मंत्राने ज्याचे तेज हरण केले गेले आहे अशा सर्पाप्रमाणे भूपाल दशरथ निश्चेष्ट होऊन गेले. ॥५५॥
दीनयाऽऽतुरया वाचा इति होवाच कैकयीम् ।
अनर्थमिममर्थाभं केन त्वमुपदर्शिता ॥ ५६ ॥
तदनंतर त्यांनी दीन आणि आतुर वाणीने कैकेयीला या प्रमाणे म्हटले- 'अग, तुला अनर्थच अर्थाप्रमाणे प्रतीत होत आहे, तुला कुणी याचा उपदेश केला आहे ? ॥५६॥
भूतोपहतचित्तेव ब्रुवन्ती मां न लज्जसे ।
शीलव्यसनमेतत् ते नाभिजानाम्यहं पुरा ॥ ५७ ॥
असे कळून येत आहे की तुझे चित्त कुणा भूताच्या आवेशाने दूषित झालेले आहे. पिशाच्चग्रस्त स्त्री प्रमाणे माझ्या समोर अशा गोष्टी बोलत असता तू लज्जित कशी होत नाहीस ? मला प्रथम हे माहीत नव्हते की तुझे कुलांगनोचित शील या प्रकारे नष्ट झालेले आहे. ॥५७॥
बालायास्तत् त्विदानीं ते लक्षये विपरीतवत् ।
कुतो वा ते भयं जातं या त्वमेवंविधं वरम् ॥ ५८ ॥

राष्ट्रे भरतमासीनं वृणीषे राघवं वने ।
विरमैतेन भावेन त्वमेतेनानृतेन वा ॥ ५९ ॥
बाल्यावस्थेत तुझे जे शील होते ते या समयी मी विपरीतसे पहात आहे. तुला कुठल्या गोष्टीचे भय उत्पन्न झले आहे की ज्यायोगे तू या प्रकारचा वर मागत आहेस ? भरत राज्यसिंहासनावर बसावा आणि राघवांनी वनात राहावे- हेच तू मागत आहेस. हा फार असत्य (खोटा) आणि संकुचित विचार आहे. अजूनही तू या विचारापासून विरत होऊन जा. ॥५८-५९॥
यदि भर्तुः प्रियं कार्यं लोकस्य भरतस्य च ।
नृशंसे पापसङ्‌‍कल्पे क्षुद्रे दुष्कृतकारिणि ॥ ६० ॥
क्रूर स्वभावाच्या आणि पापपूर्ण विचाराच्या नीच दुराचारीणी ! जर आपल्या पतिचे, सर्व जगताचे आणि भरताचेही प्रिय करू इच्छित असशील तर या दूषित संकल्पाचा त्याग कर. ॥६०॥
किं नु दुःखमलीकं वा मयि रामे च पश्यसि ।
न कथञ्चिदृते रामाद् भरतो राज्यमावसेत् ॥ ६१ ॥
तू माझ्या ठिकाणी अथवा रामाच्या ठिकाणी कोणते दुःखदायक अथवा अप्रिय आचरण पहात आहेस ? (की असे नीच कर्म करण्यास उद्यत-तत्पर झाली आहेस ?) रामाशिवाय भरत कुठल्याही प्रकारे राज्य घेणेस तयार होणार नाही. (राज्याचा स्वीकार करणार नाही.) ॥६१॥
रामादपि हि तं मन्ये धर्मतो बलवत्तरम् ।
कथं द्रक्ष्यामि रामस्य वनं गच्छेति भाषिते ॥ ६२ ॥

मुखवर्णं विवर्णं तं यथैवेन्दुमुपप्लुतम् ।
कारण की माझ्या समजुतीप्रमाणे धर्मपालनाच्या दृष्टीने भरत हे रामापेक्षांही बलवत्तर (सरस) आहेत. रामास तू वनात जा असे सांगितल्यावर जेव्हा त्याच्या मुखाची कांती राहुग्रस्त चंद्रम्या प्रमाणे फिकी पडेल तेव्हा त्या समयी मी त्याच्या उदास मुखाकडे कसा पाहू शकेन ? ॥६२ १/२॥
तां तु मे सुकृतां बुद्धिं सुहृद्‌भिः सह निश्चिताम् ॥ ६३ ॥

कथं द्रक्ष्याम्यपावृत्तां परैरिव हतां चमूम् ।
मी रामाच्या अभिषेकाचा निश्चय सुहृदांसह विचार करूनच केलेला आहे, माझीही बुद्धि शुभ कर्मात प्रवृत्त झालेली आहे, आता हिला मी शत्रूंच्या द्वारा पराजित झालेल्या सेनेप्रमाणे माघारी वळलेली कशी पाहू ? ॥६३ १/२॥
किं मां वक्ष्यन्ति राजानो नानादिग्भ्यः समागताः ॥ ६४ ॥

बालो बतायमैक्ष्वाकश्चिरं राज्यमकारयत् ।
नाना दिशांतून आलेले राजे लोक मला लक्ष्य करून खेदपूर्वक म्हणू लागतील की या मूढ इक्ष्वाकुवंशी राजाने कसे दीर्घकाळपर्यंत या राज्याचे पालन केले आहे ?" ॥६४ १/२॥
यदा तु बहवो वृद्धा गुणवन्तो बहुश्रुताः ॥ ६५ ॥

परिप्रक्ष्यन्ति काकुत्स्थं वक्ष्यामीह कथं तदा ।
कैकेय्या क्लिश्यमानेन पुत्रः प्रव्राजितो मया ॥ ६६ ॥
ज्यावेळी बरेचसे बहुश्रुत, गुणवान आणि वृद्ध पुरुष येऊन मला विचारतील की श्रीराम कोठे आहे ? तेव्हा मी त्यांना कसे हे सांगू की कैकेयीच्या दडपणामुळे मी आपल्या पुत्राला घरातून बाहेर काढले आहे ? ॥६५-६६॥
यदि सत्यं ब्रवीम्येतत् तदसत्यं भविष्यति ।
किं मां वक्ष्यति कौसल्या राघवे वनमास्थिते ॥ ६७ ॥

किं चैनां प्रतिवक्ष्यामि कृत्वा विप्रियमीदृशम् ।
जर मी म्हणेन की राघवाला वनवास देऊन मी सत्याचे पालन केले आहे तर यापूर्वी जी त्याला राज्य देण्याची गोष्ट मी बोलून चुकलो आहे ती असत्य होऊन जाईल. जर राम वनात निघून गेले तर कौसल्या मला काय म्हणेल ? तिचा असा महान अपकार करून मी तिला काय उत्तर देऊं ? ॥६७ १/२॥
यदा यदा हि कौसल्या दासीव च सखीव च ॥ ६८ ॥

भार्यावद् भगिनीवच्च मातृवच्चोपतिष्ठति ।
सततं प्रियकामा मे प्रियपुत्रा प्रियंवदा ॥ ६९ ॥

न मया सत्कृता देवी सत्कारार्हा कृते तव ।
'हाय ! जीचा पुत्र मला सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहे, त्या प्रिय वचन बोलण्यार्‍या कौसल्येने, जेव्हा जेव्हा दासी, सखी, पत्‍नी, बहीण आणि मातेप्रमाणे माझे प्रिय करण्याच्या इच्छेने माझ्या सेवेत उपस्थित होत होती, तेव्हा तेव्हा त्या सत्कार प्राप्त करण्यास योग्य देवीचाही मी तुझ्या कारणाने कधीही सत्कार केला नाही. ॥६८- ६९ १/२॥
इदानीं तत्तपति मां यन्मया सुकृतं त्वयि ॥ ७० ॥

अपथ्यव्यञ्जनोपेतं भुक्तमन्नमिवातुरम् ।
तुझ्याशी मी जे इतके उत्तम आचरण केले होते त्याचे स्मरण होऊन यावेळी मला ते, अपथ्य (हानिकारक) व्यञ्जनांनी युक्त खाल्लेले अन्न जसे एखाद्या रोग्याला कष्ट देते त्या प्रमाणे मला कष्ट देत आहे. ॥७० १/२॥
विप्रकारं च रामस्य सम्प्रयाणं वनस्य च ॥ ७१ ॥

सुमित्रा प्रेक्ष्य वै भीता कथं मे विश्वसिष्यति ।
रामांच्या अभिषेकाचे निवारण आणि त्यांचे वनाकडे प्रस्थान पाहून निश्चितच सुमित्रा भयभीत होईल, मग ती माझ्यावर विश्वास कसा करेल ? ॥७१ १/२॥
कृपणं बत वैदेही श्रोष्यति द्वयमप्रियम् ॥ ७२ ॥

मां च पञ्चत्वमापन्नं रामं च वनमाश्रितम् ।
'हाय ! बिचार्‍या सीतेला एकदमच दोन दुःखद आणि अप्रिय समाचार ऐकावे लागतील- रामाचा वनवास आणि माझा मृत्यु. ॥७२ १/२॥
वैदेही बत मे प्राणाञ्शोचन्ती क्षपयिष्यति ॥ ७३ ॥

हीना हिमवतः पार्श्वे किन्नरेणेव किन्नरी ।
ज्यावेळी ती रामासाठी शोक करू लागेल त्यावेळी ती माझ्या प्राणांचा नाश करून टाकील - तिचा शोक पाहून माझे प्राण या शरीरात राहू शकणार नाहीत. तिची दशा हिमालयाच्या पार्श्वभागी आपला स्वामी किन्नर याच्याशी वियोग झालेल्या किन्नरी प्रमाणे होऊन जाईल. ॥७३ १/२॥
न हि राममहं दृष्ट्‍वा प्रवसन्तं महावने ॥ ७४ ॥

चिरं जीवितुमाशंसे रुदन्तीं चापि मैथिलीम् ।
सा नूनं विधवा राज्यं सपुत्रा कारयिष्यसि ॥ ७५ ॥
मी श्रीरामाला विशाल वनात निवास करतांना आणि मैथिली सीतेला रडतांना पाहून अधिक काळपर्यत जीवित राहू इच्छित नाही. अशा स्थितित तू निश्चितच विधवा होऊन पुत्राबरोबर अयोध्येचे राज्य कर. ॥७४-७५॥
सतीं त्वामहमत्यन्तं व्यवस्याम्यसतीं सतीम्
रूपिणीं विषसंयुक्तां पीत्वेव मदिरां नरः ॥ ७६ ॥
'ओह ! मी तुला अत्यंत सती- साध्वी समजत होतो, परंतु तू तर अत्यंत दुष्ट निघालीस. ज्या प्रमाणे एखादा मनुष्य दिसण्यात सुंदर मदिरा पिऊन नंतर तिच्या द्वारा केल्या गेलेल्या विकाराने असे समजतो की हिच्यात विष मिसळलेले होते, (त्या प्रमाणे गोष्ट घडली आहे.) ॥७६॥
अनृतैर्बत मां सान्त्वैः सान्त्वयन्ती स्म भाषसे ।
गीतशब्देन संरुद्ध्य लुब्धो मृगमिवावधीः ॥ ७७ ॥
'आत्तापर्यंत जी तू मला सांत्वनापूर्ण गोड वचन बोलून मला आश्वासन देत गोष्टी करीत होतीस, त्या तू सांगितलेल्या सर्व गोष्टी खोट्या होत्या. ज्या प्रमाणे व्याध हरणाला मधुर संगीताने आकृष्ट करून त्याला ठार मारतो त्याच प्रकारे तूही प्रथम मला लोभ दाखवून आता माझे प्राण घेत आहेस. ॥७७॥
अनार्य इति मामार्याः पुत्रविक्रायकं ध्रुवम् ।
विकरिष्यन्ति रथ्यासु सुरापं ब्राह्मणं यथा ॥ ७८ ॥
"श्रेष्ठ पुरुष निश्चितच मला नीच आणि एका स्त्रीच्या मोहात पडून पुत्राला विकणारा असे म्हणून मद्यपी ब्राह्मणाप्रमाणे रस्त्या रस्त्यांतून, गल्ली-बोळातून माझी निंदा करतील. ॥७८॥
अहो दुःखमहो कृच्छ्रं यत्र वाचः क्षमे तव ।
दुःखमेवंविधं प्राप्तं पुरा कृतमिवाशुभम् ॥ ७९ ॥
'अहो ! किती दुःख आहे ! किती कष्ट आहेत ! जेथे मला तुझ्या या सार्‍या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. जणु हे माझ्या पूर्व जन्मात केलेल्या पापाचेच अशुभ फळ आहे, ज्याच्यायोगे माझ्यावर हे महान दुःख कोसळले आहे. ॥७९॥
चिरं खलु मया पापे त्वं पापेनाभिरक्षिता ।
अज्ञानादुपसम्पन्ना रज्जुरुद्‍बन्धिनी यथा ॥ ८० ॥
'पापिणी ! मी पाप्याने तुझे बरेच दिवस रक्षण केले आणि अज्ञानवश तुला हृदयाशी धरले; परंतु आज तू माझ्या गळ्यात पडलेली फाशीची दोरी बनली आहेस'. ॥८०॥
रममाणस्त्वया सार्द्धं मृत्युं त्वां नाभिलक्षये ।
बालो रहसि हस्तेन कृष्णसर्पमिवास्पृशम् ॥ ८१ ॥
ज्याप्रमाणे एखादे बालक एकांतात खेळता खेळता काळ्या नागाला आपल्या हातात पकडते, त्या प्रकारेच मी एकांतात तुझ्याशी क्रीडा करतांना तुला आलिंगन दिले आहे, परंतु त्या समयी मला हे कधी सुचले नाही की तूंच एक दिवस माझ्या मृत्युचे कारण बनशील. ॥८१॥
तं तु मां जीवलोकोऽयं नूनमाक्रोष्टुमर्हति ।
मया ह्यपितृकः पुत्रः स महात्मा दुरात्मना ॥ ८२ ॥
'हाय ! मी दुरात्म्याने जिंवत असताच आपल्या महात्मा पुत्राला पितृहीन बनविले आहे. माझा हा सर्व संसार निश्चितच धिक्कार करील- शिव्या देईल, जे उचितच होईल.' ॥८२॥
बालिशो बत कामात्मा राजा दशरथो भृशम् ।
स्त्रीकृते यः प्रियं पुत्रं वनं प्रस्थापयिष्यति ॥ ८३ ॥
'लोक माझी निंदा करतांना म्हणतील कि राजा दशरथ अत्यंतच मूर्ख आणि कामी आहे, जो एका स्त्रीला संतुष्ट करण्यासाठी आपल्या प्रिय पुत्राला वनात धाडीत आहे. ॥८३॥
व्रतैश्च ब्रह्मचर्यैश्च गुरुभिश्चोपकर्शितः ।
भोगकाले महत्कृच्छ्रं पुनरेव प्रपत्स्यते ॥ ८४ ॥
'हाय ! आत्तापर्यंत तर राम वेदांचे अध्ययन करणे, ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणे तथा अनेकानेक गुरुजनांची सेवा करण्यात संलग्न राहिल्याने दुबळे होत राहिले आहेत. आता जेव्हा त्यांच्यासाठी सुखोपभोगाचा समय आला आहे, तेव्हां हे वनात जाऊन महान कष्टात पडणार आहेत. ॥८४॥
नालं द्वितीयं वचनं पुत्रो मां प्रतिभाषितुम् ।
स वनं प्रव्रजेत्युक्तो बाढमित्येव वक्ष्यति ॥ ८५ ॥
'आपला पुत्र राम यास जर मी सांगेन की तू वनात निघून जा ( चालता हो) तर ते तात्काळ, 'फार चांगले' असे म्हणून माझ्या आज्ञेचा स्वीकार करतील. माझे पुत्र राम कुठलीही दुसरी गोष्ट सांगून मला प्रतिकूल उत्तर देऊ शकत नाहीत. ॥८५॥
यदि मे राघवः कुर्याद् वनं गच्छेति चोदितः ।
प्रतिकूलं प्रियं मे स्यान्न तु वत्सः करिष्यति ॥ ८६ ॥
'जर माझी वनात जाण्याची आज्ञा दिली गेल्यावरही राघव त्याच्या विपरीत करीत वनात गेले नाहीत तर तेच माझ्यासाठी अधिक प्रिय कार्य होईल; परंतु माझा मुलगा असे करूच शकत नाही. ॥८६॥
राघवे हि वनं प्राप्ते सर्वलोकस्य धिक्कृतम् ।
मृत्युरक्षमणीयं मां नयिष्यति यमक्षयम् ॥ ८७ ॥
जर राघव वनांत निघून गेले तर सर्व लोकांचे धिक्कारपात्र बनलेल्या मला, अक्षम्य अपराध्याला मृत्यु अवश्य यमलोकात पोहोचवील. ॥८७॥
मृते मयि गते रामे वनं मनुजपुङ्‌‍गवे ।
इष्टे मम जने शेषे किं पापं प्रतिपत्स्यसे ॥ ८८ ॥
जर नरश्रेष्ठ राम वनात निघून गेल्यावर माझा मृत्यु झाला तर माझे प्रियजन (कौसल्या आदि) येथे राहातील, त्यांच्यावर तू कुठला अत्याचार करशील ? ॥८८॥
कौसल्यां मां च रामं च पुत्रौ च यदि हास्यति ।
दुःखानि असहती देवी मामेवानुगमिष्यति ॥ ८९ ॥
देवी कौसल्येचा तर माझ्यापासून, रामापासून तथा शेष दोन्ही पुत्रांपासून वियोग होईल तर ती इतके मोठे दुःख सहन करू शकणार नाही, म्हणून माझ्या पाठोपाठ तीही परलोकी गमन करील. (सुमित्रेचीही हीच स्थिति होईल.) ॥८९॥
कौसल्यां च सुमित्रां च मां च पुत्रैस्त्रिभिः सह ।
प्रक्षिप्य नरके सा त्वं कैकेयि सुखिता भव ॥ ९० ॥
'कैकेयी ! या प्रकारे कौसल्येला, सुमित्रेला आणि तीन्ही पुत्रांच्या सह मलाही नरकतुल्य महान शोकात घालून तू स्वतः सुखी हो. ॥९०॥
मया रामेण च त्यक्तं शाश्वतं सत्कृतं गुणैः ।
इक्ष्वाकुकुलमक्षोभ्यमाकुलं पालयिष्यसि ॥ ९१ ॥
अनेकानेक गुणांनी सत्कृत, शाश्वत तथा शोभारहित हे इक्ष्वाकुकुल, जेव्हा माझ्याकडून आणि रामाकडून परित्यक्त होऊन शोकाने व्याकुळ होईल, तेव्हा त्या अवस्थेत तू याचे पालन करशील. ॥९१॥
प्रियं चेद् भारतस्यैतद् रामप्रवाजनं भवेत् ।
मा स्म मे भरतः कार्षीत् प्रेतकृत्यं गतायुषः ॥ ९२ ॥
जर भरतालाही रामाचे हे वनात धाडणे प्रिय वाटत असेल तर माझ्या मृत्युनंतर त्याने माझ्या शरीराचा दाह-संस्कार करू नये. ॥९२॥
मृते मयि गते रामे वनं पुरुषपुङ्‌‍गवे ।
सेदानीं विधवा राज्यं सपुत्रा कारयिष्यसि ॥ ९३ ॥
पुरुषश्रेष्ठ रामाच्या वन-गमनानंतर माझा मृत्यु झाल्यावर आता तू विधवा होऊन मुलासह अयोध्येचे राज्य करशील. ॥९३॥
त्वं राजपुत्री दैवेन न्यवसो मम वेश्मनि ।
अकीर्त्तिश्चातुला लोके ध्रुवः परिभवश्च मे ।
सर्वभूतेषु चावज्ञा यथा पापकृतस्तथा ॥ ९४ ॥
'राजकुमारी ! तू माझ्या दुर्भाग्याने माझ्या घरात येऊन राहिली आहेस. तुझ्यामुळेच मला या संसारात पापाचारी माणसाप्रमाणे निश्चितच अनुपम अपयश, तिरस्कार आणि समस्त प्राण्यांपासून अवहेलना प्राप्त होईल. ॥९४॥
कथं रथैर्विभुर्यात्वा गजाश्वैश्च मुहुर्मुहुः ।
पद्‍भ्यां रामो महारण्ये वत्सो मे विचरिष्यति ॥ ९५ ॥
माझा पुत्र सामर्थ्यशाली राम वारंवार रथातून, हत्तीवरून अथवा घोड्यांवरून यात्रा (प्रवास) करीत असे. तेच आता त्या विशाल वनात पायी कसे चालतील ? '॥९५॥
यस्य चाहारसमये सूदाः कुण्डलधारिणः ।
अहंपूर्वाः पचन्ति स्म प्रसन्ना पानभोजनम् ॥ ९६ ॥

स कथं नु कषायाणि तिक्तानि कटुकानि च ।
भक्षयन् वन्यमाहारं सुतो मे वर्तयिष्यति ॥ ९७ ॥
भोजनाच्या समयी ज्यांच्यासाठी कुण्डलधारी आचारी प्रसन्न होऊन 'प्रथम मी (भोजन) बनवीन' असे म्हणत म्हणत खाण्यापिण्याच्या वस्तु तयार करीत असत, तेच माझे पुत्र राम वनात कडवट, तिखट, तुरट फळांचा आहार करीत कशा प्रकारे निर्वाह करतील ? . ॥९६-९७॥
महार्हवस्त्रसम्बद्धो भूत्वा चिरसुखोचितः ।
काषायपरिधानस्तु कथं रामो भविष्यति ॥ ९८ ॥
जे सदा बहुमूल्य वस्त्रे धारण करीत होते आणि ज्यांचा दीर्घकाळपर्यंत सुखातच समय गेलेला आहे तेच राम वनात काषाय वस्त्र परिधान करून कसे राहू शकतील ? ॥९८॥
कस्येदं द्दारुणं वाक्यमेवंविधमपीरितम् ।
रामस्यारण्यगमनं भरतस्याभिषेचनम् ॥ ९९ ॥
रामाचे वनगमन आणि भरताचा अभिषेक- असे कठोर वाक्य तू कोणाच्या प्रेरणेने आपल्या मुखातून काढले आहेस. ॥९९॥
धिगस्तु योषितो नाम शठाः स्वार्थपरायणाः ।
न ब्रवीमि स्त्रियः सर्वा भरतस्यैव मातरम् ॥ १०० ॥
'स्त्रियांचा धिक्कार असो, कारण की त्या शठ आणि स्वार्थ परायण असतात; परंतु मी सर्व स्त्रियांसाठी असे म्हणू शकत नाही; केवळ भरताच्या मातेचीच निंदा करीत आहे. ॥१००॥
अनर्थभावेऽर्थपरे नृशंसे
     ममानुतापाय निवेशितासि ।
किमप्रियं पश्यसि मन्निमित्तं
     हितानुकारिण्यथवापि रामे ॥ १०१ ॥
अनर्थातच अर्थबुद्धी ठेवणार्‍या क्रूर कैकेयी ! तू मला संताप देण्यासाठीच या घरांत आणली गेली आहेस, अग ! माझ्या मुळे तू आपले कोणते अप्रिय होत असलेले पहात आहेस ? अथवा सर्वांचे निरंतर हित करणार्‍या रामामध्येंही तुला कुठला वाईटपणा दिसून येत आहे ? ॥१०१॥
परित्यजेयुः पितरो हि पुत्रान्
     भार्याः पतींश्चापि कृतानुरागाः ।
कृत्स्नं हि सर्वं कुपितं जगत् स्याद्
     दृष्ट्‍वैव रामं व्यसने निमग्नम् ॥ १०२ ॥
रामांना संकटाच्या समुद्रात बुडलेले पाहून तर पिता आपल्या पुत्रांचा त्याग करील. अनुरागिणी स्त्रियाही आपल्या पतींचा त्याग करतील. या प्रकारे हे सर्व जगच कुपित- विपरीत व्यवहार करणारे होऊन जाईल. ॥१०२॥
अहं पुनर्देवकुमाररूप-
     मलङ्‌‍कृतं तं सुतमाव्रजन्तम् ।
नन्दामि पश्यन्नपि दर्शनेन
     भवामि दृष्ट्‍वा च पुनर्युवेव ॥ १०३ ॥
देवकुमाराप्रमाणे कमनीय रूप असणार्‍या आपला पुत्र रामाला जेव्हा वस्त्र आणि आभूषणांनी विभूषित होऊन समोर येतांना मी पाहातो तेव्हा नेत्रांनी त्यांची शोभा न्यहाळून पहातांना मी तृप्त (संतुष्ट) होऊन जातो. त्यांना पाहून असे वाटते की जणु मी परत तरूण झालो आहे. ॥१०३॥
विना हि सूर्येण भवेत् प्रवृत्ति-
     रवर्षता वज्रधरेण वापि ।
रामं तु गच्छन्तमितः समीक्ष्य
     जीवेन्न कश्चित्त्विति चेतना मे ॥ १०४ ॥
कदाचित सूर्याशिवायही संसाराचे काम चालू शकेल, वज्रधारी इंद्राने वृष्टी केली नाही तरी प्राण्यांचे जीवन (कदाचित) सुरक्षित राहू शकेल, परंतु रामाला येथून वनाकडे जातांना पाहून कुणीही जीवित राहू शकणार नाही, माझी अशीच धारणा आहे. ॥१०४॥
विनाशकामामहिताममित्रा-
     मावासयं मृत्युमिवात्मनस्त्वाम् ।
चिरं बताङ्‌‍केन धृतासि सर्पी
     महाविषा तेन हतोऽस्मि मोहात् ॥ १०५ ॥
'अग ! तू माझा विनाश इच्छिणारी, अहित करणारी आणि शत्रूरूप आहेस: जसे कुणी आपल्याच मृत्युला घरात स्थान द्यावे त्याप्रकारे मी तुला घरात ठेवून घेतलेली आहे. खेदाची गोष्टही आहे की मी मोहवश तुझ्यासारख्या महाविषारी नागीणीला दीर्घकाळपर्यंत आपल्या अङ्‌‍गावर धारण करून ठेवले होते म्हणून मी आज मारला गेलो आहे. ॥१०५॥
मया च रामेण च लक्ष्मणेन
     प्रशास्तु हीनो भरतस्त्वया सह ।
पुरं च राष्ट्रं च निहत्य बान्धवान्
     ममाहितानां च भवाभिहर्षिणी ॥ १०६ ॥
माझ्याशिवाय, राम आणि लक्ष्मणाशिवायही होऊन भरत समस्त बांधवांचा विनाश करून तुझ्या सह या नगर तथा राष्ट्राचे शासन करो तथा तू माझ्या शत्रूंचा हर्ष वाढविणारी हो. ॥१०६॥
नृशंसवृत्ते व्यसनप्रहारिणि
     प्रसह्य वाक्यं यदिहाद्य भाषसे ।
न नाम ते तेन मुखात् पतन्त्यधो
     विशीर्यमाणा दशनाः सहस्रधा ॥ १०७ ॥
क्रूरतापूर्ण वर्तन करणार्‍या कैकेयी ! तू संकटात पडलेल्यावरच प्रहार करीत आहेस. अग ! जर तू दुराग्रहपूर्वक अशी कठोर गोष्ट तोंडातून काढत आहेस तर त्या समयी तुझ्या दांताचे हजारो तुकडे होऊन तोंडातून खाली कां नाही पडले ? ॥१०७॥
न किञ्चिदाहाहितमप्रियं वचो
     न वेत्ति रामः परुषाणि भाषितुम् ।
कथं नु रामे ह्यभिरामवादिनि
     ब्रवीषि दोषान् गुणनित्यसम्मते ॥ १०८ ॥
श्रीराम कधी कुणाशीही अहितकारक अथवा अप्रिय वचन बोलत नाहीत. ते कटुवचन बोलणे जाणतच नाहीत. त्यांचा आपल्या गुणांच्याकारणाने सदा सर्वदा सन्मानच होत असतो. त्या मनोहर वचन बोलणार्‍या रामांमध्ये तू दोष कसे काय सांगत आहेस ? कारण की ज्याचे बरेचसे दोष सिद्ध होऊन चुकले असतील अशालाच वनवास दिला जातो. ॥१०८॥
प्रताम्य वा प्रज्वल वा प्रणश्य वा
     सहस्रशो वा स्फुटिता महीं व्रज ।
न ते करिष्यामि वचः सुदारुणं
     ममाहितं केकयराजपांसने ॥ १०९ ॥
अगे केकयराजाच्या कुळातील जीती- जागती कलंकिनी ! तू वाटल्यास ग्लानित बुडून जा अथवा आगीत जळून खाक होऊन जा अथवा विष खाऊन प्राण देऊन टाक अथवा पृथ्वीमध्ये हजारो भेगा पाडून त्यांत सामावून जा, परंतु माझे अहित करणारी तुझीही अत्यंत कठोर वाणी मी कदापी मान्य करणार नाही. ॥१०९॥
क्षुरोपमां नित्यमसत्प्रियंवदां
     प्रदुष्टभावां स्वकुलोपघातिनीम् ।
न जीवितुं त्वां विषहेऽमनोरमां
     दिधक्षमाणां हृदयं सबन्धनम् ॥ ११० ॥
तू सुर्‍याप्रमाणे घात करणारी आहेस. गोष्टी तर अगदी गोड गोड करत असतेस परंतु त्या सदा खोट्या आणि सदभावना रहित असतात, तुझ्या हृदयाचा भाव अत्यंत दूषित आहे. तसेच तू आपल्या कुळाचाही नाश करणारी आहेस. इतकेच नव्हे तर तू प्राणांसहित माझ्या हृदयालाही भस्म करू इच्छित आहेस. म्हणून माझ्या मनाला तू आवडत नाहीस. तुझे पापिणीचे जिवंत राहाणे मी सहन करू शकत नाही. ॥११०॥
न जीवितं मेऽस्ति कुतः पुनः सुखं
     विनात्मजेनात्मवतां कुतो रतिः ।
ममाहितं देवि न कर्तुमर्हसि
     स्पृशामि पादावपि ते प्रसीद मे ॥ १११ ॥
'देवी ! आपला पुत्र श्रीराम याच्याशिवाय मी जिवंतही राहू शकत नाही मग सुख कोठून मिळू शकेल ? आत्मज्ञ पुरुषांनाही आपल्या पुत्राचा वियोग झाल्यावर चैन कसे पडू शकेल ? म्हणून तू माझे अहित करू नको मी तुझ्या चरणांना स्पर्श करतो आहे, तू माझ्यावर प्रसन्न हो. ॥१११॥
स भूमिपलो विलपन्ननाथवत्
     स्त्रिया गृहीतो हृदयेऽतिमात्रया ।
पपात देव्याश्चरणौ प्रसारिता-
     वुभावसम्प्राप्य यथाऽऽतुरस्तथा ॥ ११२ ॥
या प्रकारे महाराज दशरथ मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या त्या हट्टी (दुराग्रही) स्त्रीच्या अधीन होऊन अनाथाप्रमाणे विलाप करीत होते. ते देवी कैकेयीच्या पसरलेल्या दोन्ही चरणांना स्पर्श करू इच्छित होते, परंतु ते न जमल्याने दोन्ही पायांच्या मध्येच मूर्छित होऊन पडले. बरोबर अशा प्रकारे की कोणी रोगी एखाद्या वस्तुला स्पर्श करू इच्छितो परंतु दुर्बलतेमुळे तेथपर्यंत पोहोचू न शकता मध्येच अचेत होऊन पडतो. ॥११२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे द्वादशः सर्गः ॥ १२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मिकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा बारावा सर्ग पूरा झाला. ॥१२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP