श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ त्र्यधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीमपार्श्वे कालस्यागमनं समयं कृत्वा तेन सह तस्य वार्तालापायोद्यमः -
श्रीरामांचा येथे काळाचे आगमन आणि एका कठोर अटीसह त्यांचे संभाषण करण्यासाठी उद्यत होणे -
कस्यचित्त्वथ कालस्य रामे धर्मपरे स्थिते ।
कालस्तापसरूपेण राजद्वारं उपागमत् ॥ १ ॥
त्यानंतर काही समय आणखी निघून गेल्यावर जेव्हा भगवान्‌ श्रीराम धर्मपूर्वक अयोध्येच्या राज्याचे पालन करत होते तेव्हा साक्षात्‌ काळ तपस्व्याच्या रूपात राजभवनाच्या द्वारावर आला. ॥१॥
सोऽब्रवील्लक्ष्मणं वाक्यं धृतिमन्तं यशश्विनम् ।
मां निवेदय रामाय सम्प्राप्तं कार्यगौरवात् ॥ २ ॥
त्याने द्वारावर उभे असलेल्या धैर्यवान्‌ आणि यशस्वी लक्ष्मणांना म्हटले - मी एका महत्त्वाच्या कार्यासाठी आलो आहे. तू श्रीरामांना माझ्या आगमनाची सूचना दे. ॥२॥
दूतो ह्यतिबलस्याहं महर्षेरमितौजसः ।
रामं दिदृक्षुरायातः कार्येण हि महाबल ॥ ३ ॥
महाबली लक्ष्मणा ! मी अमित तेजस्वी महर्षि अतिबळाचा दूत आहे आणि एका आवश्यक कार्यवश श्रीरामांना भेटण्यासाठी आलो आहे. ॥३॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा सौमित्रिस्त्वरयाऽन्वितः ।
न्यवेदयत रामाय तापसं तं समागतम् ॥ ४ ॥
त्याचे ते वचन ऐकून सौमित्र लक्ष्मणाने अत्यंत घाईगर्दीने आंत जाऊन श्रीरामांना त्या तापसाच्या आगमनाची सूचना दिली - ॥४॥
जयस्व राजधर्मेण उभौ लोकौ महाद्युते ।
दूतस्त्वां द्रष्टुमायातः तपसा भास्करप्रभः ॥ ५ ॥
महातेजस्वी महाराज ! आपण आपल्या राजधर्माच्या प्रभावाने इहलोक आणि परलोकावरही विजयी झाला आहात. एक महर्षि दूताच्या रूपात आपल्याला भेटायला आले आहेत. ते तपस्याजनित तेजाने सूर्यासमान प्रकाशित होत आहेत. ॥५॥
तद्वाक्यं लक्ष्मणेनोक्तं श्रुत्वा राम उवाच ह ।
प्रवेश्यतां मुनिस्तात महौजास्तस्य वाक्यधृक् ॥ ६ ॥
लक्ष्मणांचे वाक्य ऐकून श्रीरामांनी म्हटले - तात ! त्या महातेजस्वी मुनिंना आत घेऊन ये, जे आपल्या स्वामींचा संदेश घेऊन आले आहेत. ॥६॥
सौमित्रिस्तु तथेत्युक्त्वा प्रावेशयत तं मुनिम् ।
ज्वलन्तमेव तेजोभिः प्रदहन्तमिवांशुभिः ॥ ७ ॥
तेव्हा जशी आज्ञा असे म्हणून सौमित्र त्या मुनिना आत घेऊन आले. ते तेजाने प्रज्वलित झाले होते आणि आपल्या प्रखर किरणांनी जणु दग्ध करीत असल्यासारखे भासत होते. ॥७॥
सोऽभिगम्य रघुश्रेष्ठं दीप्यपानं स्वतेजसा ।
ऋषिर्मधुरया वाचा वर्धस्वेत्याह राघवम् ॥ ८ ॥
आपल्या तेजाने दीप्तिमान्‌ रघुश्रेष्ठ श्रीरामांजवळ पोहोचून ऋषिनी त्यांना मधुर वाणीने म्हटले - रघुनंदना ! आपला अभ्युदय होवो. ॥८॥
तस्मै रामो महातेजाः पूजामर्घ्यपुरोगमाम् ।
ददौ कुशलमव्यग्रं प्रष्टुं चैवोपचक्रमे ॥ ९ ॥
महातेजस्वी रामांनी त्यांना पाद्य-अर्घ्य आदि पूजनोपचार समर्पित केले आणि शान्तभावाने त्यांचा कुशल समाचार विचारण्यास आरंभ केला. ॥९॥
पृष्टश्च कुशलं तेन रामेण वदतां वरः ।
आसने काञ्चने दिव्ये निषसाद महायशाः ॥ १० ॥
श्रीरामांनी विचारल्यावर वक्त्यांमध्ये श्रेष्ठ महायशस्वी मुनिनी कुशल समाचार सांगून दिव्य सुवर्णमय आसनावर ते विराजमान झाले. ॥१०॥
तमुवाच ततो रामः स्वागतं ते महामुने ।
प्रापयास्य च वाक्यानि यतो दूतस्त्वमागतः ॥ ११ ॥
त्यानंतर श्रीरामांनी असे म्हटले - महामते ! आपले स्वागत आहे. आपण ज्यांचे दूत होऊन येथे आलेले आहात, त्यांचा संदेश ऐकवा. ॥११॥
चोदितो राजसिंहेन मुनिर्वाक्यमभाषत ।
द्वन्द्वे ह्येतद् प्रवक्तव्यं हितं वै यद्यवेक्षसे ॥ १२ ॥
राजसिंह श्रीरामांच्या द्वारा याप्रकारे प्रेरित झाल्यावर मुनि म्हणाले - जर आपण आमच्या हितावर दृष्टि ठेवलीत तर जेथे आम्ही आणि आपण दोघेच असू, तेथेच ही गोष्ट सांगणे उचित आहे. ॥१२॥
यः शृणोति निरीक्षेद् वा स वध्यो भविता तव ।
भवेद् वै मुनिमुख्यस्य वचनं यद्यवेक्षसे ॥ १३ ॥
जर आपण मुनिश्रेष्ठ अतिबलांच्या वचनावर ध्यान दिलेत तर आपल्याला हे घोषित करावे लागेल की जो कोणी मनुष्य आपले दोघांचे संभाषण ऐकेल अथवा आपल्याला बोलताना पाहील तो आपला (श्रीरामांसाठी) वध्य होईल. ॥१३॥
स तथेति प्रतिज्ञाय रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
द्वारि तिष्ठ महाबाहो प्रतिहारं विसर्जय ॥ १४ ॥
श्रीरामांनी तथास्तु म्हणून त्या गोष्टी संबंधी प्रतिज्ञा केली आणि लक्ष्मणास म्हटले - महाबाहो ! द्वारपालाला निरोप दे आणि तू स्वयं देवडीवर उभा राहून पहारा दे. ॥१४॥
स मे वध्यः खलु भवेत् वाचं द्वन्द्वसमीरितम् ।
ऋषेर्मम च सौमित्रे पश्येद् वा शृणुयाच्च यः ॥ १५ ॥
सौमित्रा ! जो कोणी ऋषि आणि मी बोलत असताना आमच्यातील संवाद ऐकेल अथवा गोष्टी करत असता आम्हांला पाहील, तो माझ्या द्वारा मारला जाईल. ॥१५॥
ततो निक्षिप्य काकुत्स्थो लक्ष्मणं द्वारि संग्रहम् ।
तमुवाच मुने वाक्यं कथयस्वेति राघवः ॥ १६ ॥

यत्ते मनीषितं वाक्यं येन वाऽसि समाहितः ।
कथयस्वाविशङ्‌कस्त्वं ममापि हृदि वर्तते ॥ १७ ॥
याप्रकारे आपले बोलणे ग्रहण करणार्‍या लक्ष्मणास दरवाजावर तैनात करून (नेमून) राघवांनी समागत महर्षिंना म्हटले - मुने ! आता आपण निःशंक होऊन ती गोष्ट सांगावी, जी सांगणे आपणाला अभीष्ट आहे अथवा जी सांगण्यासाठीच आपणास येथे धाडण्यात आले आहे. माझ्या हृदयातही ती ऐकण्यासाठी उत्कण्ठा आहे. ॥१६-१७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्र्युत्तरशततमः सर्गः ॥ १०३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा एकशेतिसरा सर्ग पूरा झाला. ॥१०३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP