श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ चतुर्थः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राक्षसवंशवर्णनं हेतिविद्युत्केशसुकेशानामुत्पत्तिः -
राक्षसवंशाचे वर्णन - हेति, विद्युत्केश आणि सुकेशाची उत्पत्ति -
श्रुत्वागस्त्येरितं वाक्यं रामो विस्मयमागतः ।
कथमासीत्तु लङ्‌कायां सम्भवो रक्षसां पुरा ॥ १ ॥
अगस्त्यांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून श्रीरामचंद्रांना फार विस्मय वाटला. त्यांनी मनांतल्या मनांत विचार केला की राक्षसकुळाची उत्पत्ति तर मुनिवर विश्रवांपासूनच मानली जाते. जर त्यांच्याही पूर्वी लंकापुरीत राक्षस राहात होते तर त्यांची उत्पत्ति कशा प्रकारे झाली होती. ॥१॥
ततः शिरः कम्पयित्वा त्रेताग्निसमविग्रहम् ।
तमगस्त्यं मुहुर्दृष्ट्‍वा स्मयमानोऽभ्यभाषत ॥ २ ॥
याप्रकारे आश्चर्य वाटल्यानंतर मस्तक हलवून श्रीरामांनी त्रिविध अग्निप्रमाणे तेजस्वी शरीराच्या अगस्त्यांकडे वारंवार पाहिले आणि हसून त्यांना विचारले- ॥२॥
भगवन् पूर्वमप्येषा लङ्‌कासीत् पिशिताशिनाम् ।
श्रुत्वेदं भगवद्वाक्यं जातो मे विस्मयः परः ॥ ३ ॥
भगवन्‌ ! कुबेर आणि रावणाच्या पूर्वीही ही लंकापुरी मांसभक्षी राक्षसांच्या अधिकारात होती हे आपल्या मुखाने ऐकून मला फार विस्मय वाटत आहे. ॥३॥
पुलस्त्यवंशाद् उद्‌भूता राक्षसा इति नः श्रुतम् ।
इदानीं अन्यतश्चापि सम्भवः कीर्तितस्त्वया ॥ ४ ॥
आम्ही तर असे ऐकून होतो की राक्षसांची उत्पत्ति पुलस्त्यांच्या कुळापासून झाली आहे; परंतु या समयी आपण कुठल्या दुसर्‍या कुळापासून राक्षसांच्या प्रादुर्भावाची गोष्ट सांगितली आहे. ॥४॥
रावणात् कुम्भकर्णाच्च प्रहस्ताद्विकटादपि ।
रावणस्य च पुत्रेभ्यः किं नु ते बलवत्तराः ॥ ५ ॥
काय ते पूर्वीचे राक्षस रावण, कुम्भकर्ण, प्रहस्त, विकट तसेच रावण पुत्र यांच्यापेक्षाही अधिक बलवान्‌ होते ? ॥५॥
क एषां पूर्वको ब्रह्मन् किन्नामा च बलोत्कटः ।
अपराधं च कं प्राप्य विष्णुना द्राविताः कथम् ॥ ६ ॥
ब्रह्मन ! त्यांचा पूर्वज कोण होता आणि त्या उत्कट बलशाली पुरुषाचे नाव काय होते ? भगवान्‌ विष्णुनी त्या राक्षसांना कुठल्या अपराधासाठी त्यांना कुठल्या प्रकारे लंकेतून मारून पिटाळून लावले ? ॥६॥
एतद् विस्तरतः सर्वं कथयस्व ममानघ ।
कुतूहलमिदं मह्यं नुद भानुर्यथा तमः ॥ ७ ॥
निष्पाप महर्षे ! या सर्व गोष्टी आपण मला विस्ताराने सांगाव्या. यासाठी माझ्या मनांत मोठे कौतूहल आहे. जसे सूर्यदेव अंधाराला दूर करतात त्याच प्रकारे आपण माझ्या या कौतूहलाचे निवारण करावे. ॥७॥
राघवस्य वचः श्रुत्वा संस्कारालङ्‌कृतं शुभम् ।
ईषद्विस्मयमानस्तं अगस्त्यः प्राह राघवम् ॥ ८ ॥
राघवांची ही सुंदर वाणी पदसंस्कार आणि अर्थसंस्कारांनी अलंकृत होती. ती ऐकून अगस्त्यांनी असा विचार करून की हे सर्वज्ञ असूनही मला अज्ञान्याप्रमाणे विचारत आहेत. त्यानंतर त्यांनी राघवांना म्हटले - ॥८॥
प्रजापतिः पुरा सृष्ट्‍वा अपः सलिलसम्भवः ।
तासां गोपायने सत्त्वान् असृजत् पद्मसम्भवः ॥ ९ ॥
रघुनंदना ! जलात प्रकट झालेल्या कमळापासून उत्पन्न प्रजापति ब्रह्मदेवांनी पूर्वकाळी समुद्रात जलाची सृष्टि करून त्याच्या रक्षणासाठी अनेक प्रकारच्या जलजंतूना उत्पन्न केले. ॥९॥
ते सत्त्वाः सत्त्वकर्तारं विनीतवद् उपस्थिताः ।
किं कुर्म इति भाषन्तः क्षुत्पिपासाभयार्दिताः ॥ १० ॥
ते जंतू भूक-तहान यांच्या भयाने पीडित होऊन आता आम्ही काय करावे अशा प्रकारे चर्चा करत आपले जन्मदाता ब्रह्मदेवांकडे विनीत भावाने गेले. ॥१०॥
प्रजापतिस्तु तान् सर्वान् प्रत्याह प्रहसन्निव ।
आभाष्य वाचा यत्‍नेन रक्षध्वमिति मानद ॥ ११ ॥
मानद रघुवीरा ! त्या सर्वांना आलेले पाहून प्रजापतिंनी वाणीद्वारा त्यांना संबोधित करून हसत म्हटले - जल जंतूंनो ! तुम्ही यत्‍नपूर्वक या जलाचे रक्षण करा. ॥११॥
रक्षाम इति च तत्रान्यैः यक्षाम इति चापरैः ।
भुक्षिताभुङ्‌क्षितैः उक्तः ततस्तानाह भूतकृत् ॥ १२ ॥
ते सर्व जंतु भुकेले तहानलेले होते. त्यांच्यापैकी काहींनी म्हटले - आम्ही या जलाचे रक्षण करूं आणि दुसर्‍यांनी म्हटले - आम्ही याचे यक्षण (पूजन) करूं तेव्हा भूतांची सृष्टि करणार्‍या प्रजापतिंनी त्यांना म्हटले - ॥१२॥
रक्षाम इति यैरुक्तं राक्षसास्ते भवन्तु वः ।
यक्षाम इति यैरुक्तं यक्षा एव भवन्तु वः ॥ १३ ॥
तुमच्यापैकी ज्या लोकांनी रक्षण करण्याची गोष्ट सांगितली ते राक्षस नामाने प्रसिद्ध होतील आणि ज्यांनी यक्षण (पूजन) करणे स्वीकार केले आहे ते लोक यक्ष नावाने विख्यात होवोत. (याप्रकारे ते जीव राक्षस आणि यक्ष - या दोन जातिमध्ये विभक्त झाले.) ॥१३॥
तत्र हेतिः प्रहेतिश्च भ्रातरौ राक्षसाधिपौ ।
मधुकैटभसंकाशौ बभूवतुररिन्दमौ ॥ १४ ॥
त्या राक्षसांमध्ये हेति आणि प्रहेति नावाचे दोन भाऊ होते, जे समस्त राक्षसांचे अधिपति होते. शत्रुंचे दमन करण्यास समर्थ ते दोन्ही वीर मधु आणि कैटभासमान शक्तिशाली होते. ॥१४॥
प्रहेतिर्धार्मिकस्तत्र तपोवनगतस्तदा ।
हेतिर्दारक्रियार्थे तु परं यत्‍नमथाकरोत् ॥ १५ ॥
त्यात प्रहेति धर्मात्मा होता, तो तात्काळ तपोवनात जाऊन तपस्या करू लागला. परंतु हेतिने विवाहासाठी फार प्रयत्‍न केला. ॥१५॥
स कालभगिनीं कन्यां भयां नाम भयाभयाम् ।
उदावहदमेयात्मा स्वयमेव महामतिः ॥ १६ ॥
तो अमेय आत्मबलाने संपन्न आणि फार बुद्धिमान्‌ होता. त्याने स्वतःच याचना करून काळाची कुमारी भगिनी भया हिच्याशी विवाह केला. भया फार भयानक होती. ॥१६॥
स तस्यां जनयामास हेती राक्षसपुङ्‌गवः ।
पुत्रं पुत्रवतां श्रेष्ठो विद्युत्केश इति श्रुतम् ॥ १७ ॥
राक्षसराज हेतिने भयाच्या गर्भापासून एक पुत्र उत्पन्न केला जो विद्युत्केश नावाने प्रसिद्ध होता. त्याला जन्म देऊन हेति पुत्रवानांमध्ये श्रेष्ठ समजला जाऊ लागला. ॥१७॥
विद्युत्केशो हेतिपुत्रः स दीप्तार्कसमप्रभः ।
व्यवर्धत महातेजाः तोयमध्य इवाम्बुजम् ॥ १८ ॥
हेतिपुत्र विद्युत्केश दीप्तिमान्‌ सूर्यासमान प्रकाशित होत होता. ते महातेजस्वी बालक जलांत कमळ वाढावे तसा दिवसेंदिवस वाढू लागला. ॥१८॥
स यदा यौवनं भद्रं अनुप्राप्तो निशाचरः ।
ततो दारक्रियां तस्य कर्तुं व्यवसितः पिता ॥ १९ ॥
निशाचर विद्युत्केश जेव्हा वाढून उत्तम युवावस्थेला प्राप्त झाला, तेव्हा त्याचा पिता राक्षसराज हेतिने आपल्या पुत्राचा विवाह करून देण्याचा निश्चय केला. ॥१९॥
सन्ध्यादुहितरं सोऽथ सन्ध्यातुल्यां प्रभावतः ।
वरयामास पुत्रार्थं हेती राक्षसपुङ्‌गवः ॥ २० ॥
राक्षसराजशिरोमणी हेतिने आपल्या पुत्राच्या विवाहासाठी संध्येची पुत्री जी आपली माता संध्ये समानच होती, तिचे वरण केले. ॥२०॥
अवश्यमेव दातव्या परस्मै सेति संध्यया ।
चिन्तयित्वा सुता दत्ता विद्युत्केशाय राघव ॥ २१ ॥
राघवा ! संध्येने विचार केला - कन्येचा कुणा दुसर्‍याशी विवाह तर अवश्य करावाच लागेल, म्हणून याच्याबरोबर का करून देऊ नये ? हा विचार करून तिने आपली पुत्री विद्युत्केशाला विवाहात दिली. ॥२१॥
सन्ध्यायास्तनयां लब्ध्वा विद्युत्केशो निशाचरः ।
रमते स्म तया सार्धं पौलोम्या मघवानिव ॥ २२ ॥
जसे देवराज इंद्र पुलोमपुत्री शची हिच्याबरोबर विहार करतात त्याप्रमाणे संध्येच्या त्या पुत्रीला प्राप्त करून विद्युत्केश तिच्या बरोबर रमण करू लागला. ॥२२॥
केनचित्त्वथ कालेन राम सालकटङ्‌कटा ।
विद्युत्केशाद् गर्भमाप घनराजिरिवार्णवात् ॥ २३ ॥
रामा ! संध्येच्या त्या मुलीचे नाव सालकटङ्‌कटा होते. काही काळानंतर तिने मेघांच्या पंक्ति समुद्रापासून जल ग्रहण करतात तशाच प्रकारे विद्युत्केशापासून गर्भ धारण केला. ॥२३॥
ततः सा राक्षसी गर्भं घनगर्भसमप्रभम् ।
प्रसूता मन्दरं गत्वा गङ्‌गा गर्भमिवाग्निजम् ।
समुत्सृज्य तु सा गर्भं विद्युत्केशरतार्थिनी ॥ २४ ॥
त्यानंतर त्या राक्षसीने मंदराचलावर जाऊन विद्युत्‌समान कांतिमान्‌ बालकाला जन्म दिला, जणु गंगेने अग्निने सोडलेल्या भगवान्‌ शिवाच्या तेज स्वरूप गर्भाला (कुमार कार्तिकेयाला) उत्पन्न केले असावे. त्या नवजात शिशुला तेथेच सोडून ती विद्युत्केशाबरोबर रतिबरोबर रतिक्रीडा करण्यासाठी निघून गेली. ॥२४॥
रेमे तु सार्धं पतिना विस्मृत्य सुतमात्मजम् ।
उत्सृष्टस्तु तदा गर्भो घनशब्दसमस्वनः ॥ २५ ॥
आपल्या मुलाला विसरून सालकटङ्‌कटा पतिबरोबर रमण करू लागली. तिकडे तिने सोडलेला तो गर्भ मेघाच्या गंभीर गर्जनेप्रमाणे शब्द करू लागला. ॥२५॥
तयोत्सृष्टः स तु शिशुः शरदर्कसमद्युतिः ।
निधायास्ये स्वयं मुष्टिं रुरोद शनकैस्तदा ॥ २६ ॥
त्याच्या शरीराची कांति शरत्कालच्या सूर्याप्रमाणे उद्‌भासित होत होती. मातेने सोडलेला तो शिशु स्वतःच आपली मूठ तोंडात घालून हळू हळू रडू लागला. ॥२६॥
ततो वृषभमास्थाय पार्वत्या सहितः शिवः ।
वायुमार्गेण गच्छन् वै शुश्राव रुदितस्वनम् ॥ २७ ॥
त्यासमयी भगवान्‌ शंकर पार्वतीसह वृषभावर आरूढ होऊन वायुमार्गाने (आकाशातून) जात होते. त्यांनी त्या बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकला. ॥२७॥
अपश्यद् उमया सार्धं रुदन्तं राक्षसात्मजम् ।
कारुण्यभावात् पार्वत्या भवस्त्रिपुरसूदनः ॥ २८ ॥

तं राक्षसात्मजं चक्रे मातुरेव वयःसमम् ।
ऐकून पार्वतीसहित शिवाने त्या रडणार्‍या राक्षसकुमारास पाहिले. त्याच्या दयनीय अवस्थेवर दृष्टिपात करून माता पार्वतीच्या हृदयात करूणेचा स्त्रोत उचंबळून आला आणि तिच्या प्रेरणेने त्रिपुरसूदन भगवान्‌ शिवांनी त्या राक्षस-बालकास त्याच्या माते समान अवस्थेचे नवतरूण बनविले. ॥२८ १/२॥
अमरं चैव तं कृत्वा महादेवोऽक्षरोऽव्ययः ॥ २९ ॥

पुरमाकाशगं प्रादाद् पार्वत्याः प्रियकाम्यया ।
इतकेच नव्हे तर पार्वतीचे प्रिय करण्याच्या इच्छेने अविनाशी आणि निर्विकार भगवान्‌ महादेवांनी त्या बालकाला अमर बनवून त्याला राहाण्यासाठी एक आकाशचारी नगराकार विमानही दिले. ॥२९ १/२॥
उमयापि वरो दत्तो राक्षसानां नृपात्मज ॥ ३० ॥

सद्योपलब्धिर्गर्भस्य प्रसूतिः सद्य एव च ।
सद्य एव वयःप्राप्तिः मातुरेव वयःसमम् ॥ ३१ ॥
राजकुमारा ! त्यानंतर पार्वतीनेही हे वरदान दिले की आजपासून राक्षसी लवकरच गर्भधारण करतील, नंतर शीघ्रच त्या प्रसूत होतील आणि त्यांनी उत्पन्न केलेले बालक तात्काळ वाढून आपल्या मातेच्या समान अवस्थेचे होऊन जाईल. ॥३०-३१॥
ततः सुकेशो वरदानगर्वितः
श्रियं प्रभोः प्राप्य हरस्य पार्श्वतः ।
चचार सर्वत्र महान् महामतिः खगं पुरं प्राप्य पुरन्दरो यथा ॥ ३२ ॥
विद्युत्केशाचा हा पुत्र सुकेश नावाने प्रसिद्ध झाला. तो फार बुद्धिमान्‌ होता. भगवान्‌ शंकराचे वरदान मिळाल्याने त्याला फार गर्व झाला आणि तो त्या परमेश्वराकडून अद्‍भुत संपत्ति तसेच आकाशचारी विमान मिळून देवराज इंद्राप्रमाणे सर्वत्र अबाधित गतिने विचरण करू लागला. ॥३२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा चौथा सर्ग पूरा झाला. ॥४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP