[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ अष्टाविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
खरेण सह श्रीरामस्य घोरं युद्धम् -
खराबरोबर श्रीरामांचे घोर युद्ध -
निहतं दूषणं दृष्ट्‍वा रणे त्रिशिरसा सह ।
खरस्याप्यभवत् त्रासो दृष्ट्‍वा रामस्य विक्रमम् ॥ १ ॥
त्रिशिरासहित दूषण रणभूमीवर मारला गेलेला पाहून श्रीरामांच्या पराक्रमावर दृष्टिपात करून खरालाही मोठे भय उत्पन्न झाले. ॥१॥
स दृष्ट्‍वा राक्षसं सैन्यमविषह्यं महाबलम् ।
हतमेकेन रामेण दूषणस्त्रिशिरा अपि ॥ २ ॥

तद्‌बलं हतभूयिष्ठं विमनाः प्रेक्ष्य राक्षसः ।
आससाद खरो रामं नमुचिर्वासवं यथा ॥ ३ ॥
एकमात्र श्रीरामांनी महान बलशाली आणि असह्य राक्षससेनेचा वध करून टाकला. दूषण आणि त्रिशिरा यांनाही मारून टाकले आणि माझ्या सेनेच्या अधिकांश (चौदा हजार) प्रमुख वीरांनाही काळाच्या हवाली केले. हे सर्व पाहून आणि विचार करून राक्षस खर उदास झाला. नमुचिने इंद्रावर आक्रमण केले होते त्या प्रमाणे त्याने श्रीरामांवर आक्रमण केले. ॥२-३॥
विकृष्य बलवच्चापं नाराचान् रक्तभोजनान् ।
खरश्चिक्षेप रामाय क्रुद्धानाशीविषानिव ॥ ४ ॥
खराने एक प्रबळ धनुष्य घेऊन त्यावरून श्रीरामांवर बरेचसे नाराच सोडले, जे रक्त पिणारे होते. ते सर्व नाराच क्रोधविष्ट झालेल्या विषधर सर्पाप्रमाणे प्रतीत होत होते. ॥४॥
ज्यां विधून्वन् सुबहुशः शिक्षयास्त्राणि दर्शयन् ।
चचार समरे मार्गाञ्शरै रथगतः खरः ॥ ५ ॥
धनुर्विद्येच्या अभ्यासाने प्रत्यंचेला हलवीत आणि नाना प्रकारच्या अस्त्रांचे प्रदर्शन करीत खर समराङ्‌गणात युद्धाचे अनेक पवित्रे दाखवित विचरण करू लागला. ॥५॥
स सर्वाश्च दिशो बाणैः प्रदिशश्च महारथः ।
पूरयामास तं दृष्ट्‍वा रामोऽपि सुमहद् धनुः ॥ ६ ॥
त्या महारथी वीराने आपल्या बाणांनी समस्त दिशा आणि विदिशांना झांकून टाकले. त्याला असे करताना पाहून श्रीरामांनीही आपले विशाल धनुष्य उचलले आणि समस्त दिशांना बाणांनी आच्छादित करून टाकले. ॥६॥
स सायकैर्दुर्विषहैर्विस्फुलिङ्‌गैरिवाग्निभिः ।
नभश्चकाराविवरं पर्जन्य इव वृष्टिभिः ॥ ७ ॥
ज्या प्रमाणे मेघ जलाच्या वृष्टीने आकाशाला झाकून टाकतो त्याच प्रकारे रामांनीही आगीच्या ठिणग्यांप्रमाणे दुःसह सायकांची वृष्टी करून आकाशाला ठसाठस भरून टाकले. तेथे थोडीही जागा मोकळी सोडली नाही. ॥७॥
तद्‌ बभूव शितैर्बाणैः खररामविसर्जितैः ।
पर्याकाशमनाकाशं सर्वतः शरसंकुलम् ॥ ८ ॥
खर आणि श्रीराम यांच्या द्वारा सोडलेल्या टोंकदार बाणांनी व्याप्त होऊन सर्वत्र पसरलेले आकाश चारी बाजूने बाणांच्या द्वारे भरून गेल्यामुळे अवकाशरहित झाले. ॥८॥
शरजालावृतः सूर्यो न तदा स्म प्रकाशते ।
अन्योन्यवधसंरम्भादुभयोः सम्प्रयुध्यतोः ॥ ९ ॥
एकामेकाच्या वधासाठी रोषपूर्वक झुंजणार्‍या त्या दोन वीरांच्या बाणांच्या जाळ्यांनी आच्छादित होऊन सूर्यदेव प्रकाशित होत नव्हते. ॥९॥
ततो नालीकनाराचैस्तीक्ष्णाग्रैश्च विकर्णिभिः ।
आजघान खरो रामं तोत्रैरिव महाद्विपम् ॥ १० ॥
तदनंतर खराने रणभूमीवर श्रीरामांवर नालीक, नाराच आणि तीक्ष्ण अग्रभाग असणारे विकर्णि नावांच्या बाणांच्या द्वारे प्रहार केला. जणु एखाद्या महान गजराजाला अंकुशाच्या द्वारे मारले गेले असावे. ॥१०॥
तं रथस्थं धनुष्पाणिं राक्षसं पर्यवस्थितम् ।
ददृशुः सर्वभूतानि पाशहस्तमिवान्तकम् ॥ ११ ॥
त्या समयी हातात धनुष्य घेऊन रथात स्थिरपणे बसलेल्या राक्षस खराला समस्त प्राण्यांनी पाशधारी यमराजाप्रमाणे पाहिले. ॥११॥
हन्तारं सर्वसैन्यस्य पौरुषे पर्यवस्थितम् ।
परिश्रान्तं महासत्त्वं मेने रामं खरस्तदा ॥ १२ ॥
त्यावेळी समस्त सेनांचा वध करणार्‍या आणि पुरुषार्थावर अढळ राहाणार्‍या महान बलशाली श्रीरामांना खराने थकलेले मानले. ॥१२॥
तं सिंहमिव विक्रान्तं सिंहविक्रान्तगामिनम् ।
दृष्टवा नोद्विजते रामः सिंहः क्षुद्रमृगं यथा ॥ १३ ॥
जरी तो सिंहासारखाच चालत होता आणि सिंहाप्रमाणेच पराक्रम प्रकट करीत होता तरीही खराला पाहून श्रीराम, छोट्‍याशा मृगाला पाहून सिंह जसा भयभीत होत नाही त्याप्रमाणे जराही उद्विग्न होत नव्हते. ॥१३॥
ततः सूर्यनिकाशेन रथेन महता खरः ।
आससादाथ तं रणे रामं पतङ्‌ग इव पावकम् ॥ १४ ॥
तत्पश्चात जसे पतंग आगीजवळ धावतात त्याप्रकारे खर आपल्या सूर्यतुल्य तेजस्वी विशाल रथाद्वारे श्रीरामाचंद्रांच्या जवळ गेला. ॥१४॥
ततोऽस्य सशरं चापं मुष्टिदेशे महात्मनः ।
खरश्चिच्छेद रामस्य दर्शयन् हस्तलाघवम् ॥ १५ ॥
तेथे जाऊन त्या राक्षस खराने आपल्या हाताची चलाखी दाखवीत महात्मा श्रीरामांच्या बाणासहित धनुष्यास मूठ पकडण्याच्या जागी तोडून टाकले. ॥१५॥
स पुनस्त्वपरान् सप्त शरानादाय मर्मणि ।
निजघान खरः क्रुद्धः शक्राशनिसमप्रभान् ॥ १६ ॥
नंतर इंद्राच्या वज्राप्रमाणे प्रकाशित होणारे दुसरे सात बाण घेऊन रणभूमीत कुपित झालेल्या खराने त्यांच्या द्वारे श्रीरामांच्या मर्मस्थळावर आघात केला. ॥१६॥
ततः शरसहस्रेण राममप्रितमौजसम् ।
अर्दयित्वा महानादं ननाद समरे खरः ॥ १७ ॥
तदनंतर अप्रतिम बलशाली श्रीरामांना हजारो बाणांनी पीडित करून निशाचर खर त्या रणभूमीमध्ये जोरजोराने गर्जना करू लागला. ॥१७॥
ततस्तत्प्रहतं बाणैः खरमुक्तैः सुपर्वभिः ।
पपात कवचं भूमौ रामस्यादित्यवर्चसम् ॥ १८ ॥
खरांनी सोडलेल्या उत्तम गांठ असलेल्या बाणांच्या द्वारा तुटून श्रीरामांचे सूर्यतुल्य तेजस्वी कवच पृथ्वीवर पडले. ॥१८॥
स शरैरर्पितः क्रुद्धः सर्वगात्रेषु राघवः ।
रराज समरे रामो विधूमोऽग्निरिव ज्वलन् ॥ १९ ॥
त्यांच्या सर्व अंगात खराचे बाण घुसले होते. त्या समयी कुपित होऊन समरभूमित उभे असलेले राघव धूमरहित प्रज्वलित अग्निप्रमाणे शोभत होते. ॥१९॥
ततो गंभीरनिर्ह्रादं रामः शत्रुनिबर्हणः ।
चकारान्ताय स रिपोः सज्यमन्यन्महद्धनुः ॥ २० ॥
तेव्हां शत्रुंचा नाश करणार्‍या भगवान श्रीरामांनी आपल्या विपक्षीचा विनाश करण्यासाठी एका दुसर्‍या विशाल धनुष्यावर, ज्याचा ध्वनि फारच गंभीर होता, प्रत्यंचा चढविली. ॥२०॥
सुमहद् वैष्णवं यत् तदतिसृष्टं महर्षिणा ।
वरं तद् धनुरुद्यम्य खरं समभिधावत ॥ २१ ॥
महर्षि अगस्त्यांनी जे महान आणि उत्तम वैष्णव धनुष्य प्रदान केले होते ते घेऊनच त्यांनी खरावर आक्रमण केले. ॥२१॥
ततः कनकपुङ्‌खैस्तु शरैः सन्नतपर्वभिः ।
चिच्छेद रामः संक्रुद्धः खरस्य समरे ध्वजम् ॥ २२ ॥
त्या समयी अत्यंत क्रोधाने भरून श्रीरामांनी सोन्याचे पंख आणि गांठी असलेले बाण घेऊन त्यांच्या द्वारा समरांगणात खराची ध्वजा तोडून टाकली. ॥२२॥
स दर्शनीयो बहुधा विच्छिन्नः काञ्चनो ध्वजः ।
जगाम धरणीं सूर्यो देवतानामिवाज्ञया ॥ २३ ॥
तो दर्शनीय सुवर्णमय ध्वज अनेक तुकडे होऊन धरतीवर पडला. जणुं देवतांच्या आज्ञेने सूर्यदेवच भूमीवर उतरून आले होते. ॥२३॥
तं चतुर्भिः खरः क्रद्धो रामं गात्रेषु मार्गणैः ।
विव्याध हृदि मर्मज्ञो मातङ्‌गमिव तोमरैः ॥ २४ ॥
क्रोधाविष्ट खराला मर्मस्थानांचे ज्ञान होते. त्याने श्रीरामांच्या अंगात विशेषतः त्यांच्या छातीत चार बाण मारले, जणु एखाद्या महावताने गजराजावर तोमरांनी प्रहार केला असावा. ॥२४॥
स रामो बहुभिर्बाणैः खरकार्मुकनिःसृतैः ।
विद्धो रुधिरसिक्ताङ्‌गो बभूव रुषितो भृशम् ॥ २५ ॥
खराच्या धनुष्यांतून सुटलेल्या बहुसंख्य बाणांनी घायाळ होऊन श्रीरामांचे सारे शरीर रक्तबंबाळ झाले होते. त्यामुळे त्यांना फार राग आला. ॥२५॥
स धनुर्धन्विनां श्रेष्ठः प्रगृह्य परमाहवे ।
मुमोच परमेष्वासः षट् शरानभिलक्षितान् ॥ २६ ॥
धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ महाधनुर्धर श्रीरामांनी युद्धस्थळावर पूर्वोक्त श्रेष्ठ धनुष्य हातामध्ये घेऊन लक्ष्य निश्चित करून खराला सहा बाण मारले. ॥२६॥
शिरस्येकेन बाणेन द्वाभ्यां बाह्वोरथार्पयत् ।
त्रिभिश्चन्द्रार्धवक्त्रैश्च वक्ष्यस्यभिजघान ह ॥ २७ ॥
त्यांनी एक बाण त्याच्या मस्तकात, दोन त्याच्या भुजामध्ये आणि तीन अर्धचंद्राकार बाणांनी त्याच्या छातीमध्ये खोल जखम केली. ॥२७॥
ततः पश्चान्महातेजा नाराचान् भास्करोपमान् ।
जघान राक्षसं क्रुद्धस्त्रयोदश शिलाशितान् ॥ २८ ॥
तत्पश्चात महातेजस्वी श्रीरामचंद्रांनी कुपित होऊन त्या राक्षसाला सहाणेवर तेज केलेले आणि सूर्यासमान चमकणारे तेरा बाण मारले. ॥२८॥
रथस्य युगमेकेन चतुर्भिः शबलान् हयान् ।
षष्ठेन तु शिरः सङ्‌ख्ये चिच्छेद खरसारथेः ॥ २९ ॥
एका बाणाने तर रथाचे जोखड तोडून टाकले, चार बाणांनी चार चितकबर्‍या घोड्‍यांना मारून टाकले आणि सहाव्या बाणाने युद्धस्थळावर खराच्या सारथ्याचे मस्तक छाटून टाकले. ॥२९॥
त्रिभिस्त्रिवेणून् बलवान् द्वाभ्यामक्षं महाबलः ।
द्वादशेन तु बाणेन खरस्य सशरं धनुः ॥ ३० ॥

छित्त्वा वज्रनिकाशेन राघवः प्रहसन्निव ।
त्रयोदशेनेन्द्रसमो बिभेद समरे खरम् ॥ ३१ ॥
तत्पश्चात तीन बाणांनी त्रिवेणु (जोखडाचा आधारदण्ड) आणि दोनांनी रथाच्या धुर्‍याला खण्डित करून महान शक्तिशाली आणि बलवान श्रीरामांनी बाराव्या बाणाने खराच्या बाणासहित धनुष्याचे दोन तुकडे करून टाकले. त्यानंतर इंद्रासमान तेजस्वी श्रीराघवेन्द्रांनी हसत हसत वज्रतुल्य तेराव्या बाणाच्या द्वारे समरांगणात खराला घायाळ करून टाकले. ॥३०-३१॥
प्रभग्नधन्वा विरथो हताश्वो हतसारथिः ।
गदापाणिरवप्लुत्य तस्थौ भूमौ खरस्तदा ॥ ३२ ॥
धनुष्य खण्डित झाल्याने, रथ तुटून गेल्याने, घोडे मारले गेल्याने आणि सारथीही नष्ट झाल्याने खर त्या समयी हातात गदा घेऊन रथांतून उडी मारून जमिनीवर उभा राहिला. ॥३२॥
तत्कर्म रामस्य महारथस्य
समेत्य देवाश्च महर्षयश्च ।
अपूजयन् प्राञ्जलयः प्रहृष्टाः
तदा विमानाग्रगताः समेताः ॥ ३३ ॥
त्या समयी विमानात बसलेल्या देवता आणि महर्षि हर्षाने प्रफुल्लित होऊन परस्पर मिळून हात जोडून महारथी श्रीरामांच्या त्या कर्माची भूरि-भूरि प्रशंसा करू लागले. ॥३३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे अष्टाविंशः सर्गः ॥ २८ ॥
या प्रकारे श्रीवल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा अठ्ठाविसावा सर्ग पूरा झाला. ॥२८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP