श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। एकोनषष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्वामित्रेण त्रिशङ्कुमाश्वास्य तदीयं यज्ञं कारयितुमृषीणामामन्त्रणं स्ववाक्यमनङ्‌गीकृतवतां समहोदयानां मुनिपुत्राणां शापद्वारा विनाशनं च - विश्वामित्रांचे त्रिशङ्कुला आश्वासित करून त्यांच्या यज्ञासाठी सर्वच ऋषि-मुनिंना आमंत्रित करणे, तथा त्यांच्या यज्ञाची अवहेलना करणार्‍या ऋषि महोदय व वसिष्ठपुत्रांना शाप देणे -
उक्तवाक्यं तु राजानं कृपया कुशिकात्मजः ।
अब्रवीन्मधुरं वाक्यं साक्षाच्चण्डालतां गतम् ॥ १ ॥
[शतानन्द म्हणत आहेत] श्रीराम ! साक्षात चाण्डाळाच्या स्वरुपास प्राप्त झालेल्या राजा त्रिशङ्‍कुचे पूर्वोक्त वचन ऐकून विश्वामित्र दयेने द्रवित होऊन मधुर वाणीने म्हणाले - ॥ १ ॥
इक्ष्वाको स्वागतं वत्स जानामि त्वां सुधार्मिकम् ।
शरणं ते प्रदास्यामि मा भैषीर्नृपपुङ्‍गव ॥ २ ॥
'वत्स ! इक्ष्वाकुकुल नन्दन ! तुमचे स्वागत असो. मी जाणतो की तू मोठा धर्मात्मा आहेस. नृपवर ! घाबरू नका. मी तुला शरण देईन. ॥ २ ॥
अहमामन्त्रये सर्वान् महर्षीन् पुण्यकर्मणः ।
यज्ञसाह्यकरान् राजंस्ततो यक्ष्यसि निर्वृतः ॥ ३ ॥
राजन् ! तुझ्या यज्ञात सहाय्यता करणार्‍या पुण्यकर्मा महर्षिंना मी आमंत्रित करतो. नंतर तू आनन्दपूर्वक यज्ञ कर. ॥ ३ ॥
गुरुशापकृतं रूपं यदिदं त्वयि वर्तते ।
अनेन सह रूपेण सशरीरो गमिष्यसि ॥ ४ ॥

हस्तप्राप्तमहं मन्ये स्वर्गं तव नराधिप ।
यस्त्वं कौशिकमागम्य शरण्यं शरणागतः ॥ ५ ॥
गुरुच्या शापाने तुला हे जे नविन रूप प्राप्त झाले आहे, याच्यासहच तू सदेह स्वर्गलोकी जाशील. नरेश्वर ! तू जो शरणागतवत्सल विश्वामित्रांना शरण आला आहेस, त्यावरून मी असे समजतो की स्वर्गलोक तुझ्या हातात आला आहे.' ॥ ४-५ ॥
एवमुक्त्वा महातेजाः पुत्रान् परमधार्मिकान् ।
व्यादिदेश महाप्राज्ञान् यज्ञसम्भारकारणात् ॥ ६ ॥
असे म्हणून महातेजस्वी विश्वामित्रांनी आपल्या परम धर्मपरायण महाज्ञानी पुत्रांना यज्ञाची सामग्री जुळविण्याची आज्ञा दिली. ॥ ६ ॥
सर्वाञ्शिष्यान् समाहूय वाक्यमेतदुवाच ह ।
सर्वानृषिन् सवासिष्ठानानयध्वं ममाज्ञया ॥ ७ ॥

सशिष्यान् सुहृदश्चैव सर्त्विजः सबहुश्रुतान् ।
तत्पश्चात समस्त शिष्यांना बोलावून त्यांना सांगितले - 'तुम्ही लोक माझ्या आज्ञेने अनेक विषयांचे ज्ञाते समस्त ऋषि-मुनिंना, ज्यांत वसिष्ठाचे पुत्रही सम्मिलीत आहेत, त्यांच्या शिष्यांसह, सुहृदांसह तथा ऋत्विजांसहित बोलावून घ्या. ॥ ७ १/२ ॥
यदन्यो वचनं ब्रूयान्मद्वाक्यबलचोदितः ॥ ८ ॥

तत्सर्वमखिलेनोक्तं ममाख्येयमनादृतम् ।
ज्याला माझा संदेश देऊन बोलावले गेले असेल तो अथवा दुसरा कोणी जर या यज्ञाच्या विषयात कोणी अवहेलनापूर्वक काही बोलले तर तुम्ही ते सर्व तंतोतंत मला येऊन सांगा.' ॥ ८ १/२ ॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा दिशो जग्मुस्तदाज्ञया ॥ ९ ॥

आजग्मुरथ देशेभ्यः सर्वेभ्यो ब्रह्मवादिनः ।
ते च शिष्याः समागम्य मुनिं ज्वलिततेजसम् ॥ १० ॥

ऊचुश्च वचनं सर्वं सर्वेषां ब्रह्मवादिनाम् ।
त्यांची आज्ञा मानून सर्व शिष्य चारी दिशांना निघून गेले. नंतर तर सर्व देशांतून ब्रह्मवादी मुनि येऊ लागले. विश्वामित्रांचे शिष्य सर्व प्रज्वलित तेजस्वी महर्षिंच्याकडून प्रथम परत आले आणि समस्त ब्रह्मवादी मुनिंनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या सर्व विश्वामित्रांना ऐकविल्या. ॥ ९-१० १/२ ॥
श्रुत्वा ते वचनं सर्वे समायान्ति द्विजातयः ॥ ११ ॥

सर्वदेशेषु चागच्छन् वर्जयित्वा महोदयम् ।
गुरुदेव आपला आदेश अथवा संदेश ऐकून प्रायः सर्व देशात राहणारे सर्वच ब्राह्मण येत आहेत. केवळ महोदय नामक ऋषि तथा वसिष्ठ पुत्रांना सोडून सर्व महर्षि येथे येण्यासाठी प्रस्थान करून चुकले आहेत. ॥ ११ १/२ ॥
वासिष्ठं यच्छतं सर्वं क्रोधपर्याकुलाक्षरम् ॥ १२ ॥

यथाह वचनं सर्वं शृणु त्वं मुनिपुङ्‍गव ।
'मुनिश्रेष्ठ ! वसिष्ठांचे जे शंभर पुत्र आहेत, त्या सर्वांनी रागाने वाणीने जे काही सांगितले ते सर्व आपण ऐकावे. ॥ १२ १/२ ॥
क्षत्रियो याजको यस्य चण्डालस्य विशेषतः ॥ १३ ॥

कथं सदसि भोक्तारो हविस्तस्य सुरर्षयः ।
ब्राह्मणा वा महात्मानो भुक्त्वा चण्डालभोजनम् ॥ १४ ॥

कथं स्वर्गं गमिष्यन्ति विश्वामित्रेण पालिताः ।
'ते म्हणत आहेत - जो विशेषतः चाण्डाळ आहे आणि ज्याचा यज्ञ करणारा आचार्य क्षत्रिय आहे, त्याच्या यज्ञात देवर्षि अथवा महात्मा ब्राह्मण हविष्याचे भोजन कसे ग्रहण करू शकतात ? अथवा चाण्डाळाचे अन्न खाऊन विश्वामित्राद्वारा पालित झालेले ब्राह्मण स्वर्गात कसे जाऊ शकतील ? ॥ १३-१४ १/२ ॥
एतद्‌ वचननैष्ठुर्यमूचुः संरक्तलोचनाः ॥ १५ ॥

वासिष्ठा मुनिशार्दूल सर्वे सहमहोदयाः ।
'मुनिप्रवर ! महोदयाबरोबर वसिष्ठांच्या सर्व पुत्रांनी क्रोधाने डोळे लाल करून उपर्युक्त निष्ठुरतापूर्वक गोष्टी सांगितल्या होत्या. ॥ १५ १/२ ॥
तेषां तद् वचनं श्रुत्वा सर्वेषां मुनिपुङ्‍गवः ॥ १६ ॥

क्रोधसंरक्तनयनः सरोषमिदमब्रवीत् ।
त्या सर्वांचे हे म्हणणे ऐकून मुनिवर विश्वामित्रांचे दोन्ही डोळे क्रोधाने लाल झाले आणि ते रोषपूर्वक या प्रकारे बोलले - ॥ १६ १/२ ॥
यद् दूषयन्त्यदुष्टं मां तप उग्रं समास्थितम् ॥ १७ ॥

भस्मीभूता दुरात्मानो भविष्यन्ति न संशयः ।
'मी उग्र तपस्या करीत आहे आणि दोष आणि दुर्वासनेच्या रहित आहे तरी जे माझ्यावर दोषारोपण करीत आहेत ते दुरात्मे भस्मीभूत होऊन जातील यात संशय नाही. ॥ १७ १/२ ॥
अद्य ते कालपाशेन नीता वैवस्वतक्षयम् ॥ १८ ॥

सप्तजातिशतान्येव मृतपाः सम्भवन्तु ते ।
श्वमांसनियताहारा मुष्टिका नाम निर्घृणाः ॥ १९ ॥
आज कालपाशात बांधले जाऊन ते यमलोकात पोहोचविले गेले आहेत. आता ते सातशे जन्मापर्यंत प्रेतांचे रखवालदार, निश्चितरूपाने कुत्र्याचे मांस खाणार्‍या मुष्टिक नामक प्रसिद्ध निर्दय चाण्डाळ जातीत जन्म ग्रहण करोत. ॥ १८-१९ ॥
विकृताश्च विरूपाश्च लोकान् अनुचरन्त्विमान् ।
महोदयश्च दुर्बुद्धिर्मामदूष्यं ह्यदूषयत् ॥ २० ॥

दूषितः सर्वलोकेषु निषादत्वं गमिष्यति ।
प्राणातिपातनिरतो निरनुक्रोशतां गतः ॥ २१ ॥

दीर्घकालं मम क्रोधाद् दुर्गतिं वर्तयिष्यति ।
ते लोक विकृत एवं विरूप होऊन या लोकात विचरोत. त्याबरोबरच दुर्बुद्धी महोदयही, ज्याने दोषहीनालाही दूषित केले आहे, माझ्या क्रोधाने दीर्घकाल पर्यंत सर्व लोकात निंदित, दुसर्‍या प्राण्यांच्या हिंसेमध्ये तत्पर आणि दयाशून्य निषाद योनिला प्राप्त होऊन दुर्गति भोगेल. ॥ २०-२१ १/२ ॥
एतावदुक्त्वा वचनं विश्वामित्रो महातपाः ।
विरराम महातेजा ऋषिमध्ये महामुनिः ॥ २२ ॥
ऋषिंच्या उपस्थितीत असे बोलून महातपस्वी, महातेजस्वी एवं महामुनि विश्वामित्र गप्प झाले. ॥ २२ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकोनषष्टितमः सर्गः ॥ ५९ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा एकोणसाठावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५९ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP