[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। द्वयशीतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वसिष्ठस्य भरतं प्रति राज्ये स्वमभिषेचयितुमादेशो, भरतेन तं आदेशमनुचितं कथयित्वा तस्यानङ्‌गीकरणं, श्रीरामं
निवर्तयितुं वने गमनार्थं व्यवस्थाकरणाय सर्वान् प्रत्यादेशदानं च -
वसिष्ठांनी भरतांना राज्यावर अभिषिक्त होण्यासाठी आदेश देणे, तसेच भरतांनी त्यास अनुचित असे म्हणून अस्वीकार करणे आणि श्रीरामांना परत आणण्यासाठी वनात चलण्याची तयारी करण्यासाठी सर्वांना आदेश देणे -
तामार्यगणसम्पूर्णां भरतः प्रग्रहां सभाम् ।
ददर्श बुद्धिसम्पन्नः पूर्णचन्द्रां निशामिव ॥ १ ॥
बुद्धिमान भरतांनी उत्तम ग्रहनक्षत्रांनी सुशोभित आणि पूर्ण चंद्रमण्डलानी प्रकाशित रात्रीप्रमाणे असलेल्या त्या सभेला पाहिले. ती श्रेष्ठ पुरूष मण्डळींनी परिपूर्ण तसेच वसिष्ठ आदि श्रेष्ठ मुनींच्या उपस्थितीमुळे शोभायमान होती. ॥१॥
आसनानि यथान्यायमार्याणां विशतां तदा ।
वस्त्राङ्‌गरागप्रभया द्योतिता सा सभोत्तमा ॥ २ ॥
त्यासमयी यथायोग्य आसनावर बसलेल्या आर्य पुरूषांच्या वस्त्रांच्या आणि अङ्‌‍गरागांच्या प्रभेने ती उत्तम सभा अधिक दीप्तिमती झाली होती. ॥२॥
सा विद्वज्जनसम्पूर्णा सभा सुरुचिरा तथा ।
अदृश्यत घनापाये पूर्णचन्द्रेव शर्वरी ॥ ३ ॥
ज्याप्रमाणे वर्षाकाल व्यतीत झाल्यावर शरदॠतुच्या पौर्णिमेला पूर्ण चंद्रमण्डलाने अलंकृत रजनी फारच मनोहर दिसत असते, त्याप्रमाणेच विद्वानांच्या समुदायाने भरलेली ती सभा फारच सुंदर दिसत होती. ॥३॥
राज्ञस्तु प्रकृतीः सर्वाः स सम्प्रेक्ष्य च धर्मवित् ।
इदं पुरोहितो वाक्यं भरतं मृदु चाब्रवीत् ॥ ४ ॥
त्यासमयी धर्माचे ज्ञाता पुरोहित वसिष्ठांनी राजाच्या संपूर्ण प्रकृतिंना उपस्थित पाहून भरतास हे मधुर वचन सांगितले- ॥४॥
तात राजा दशरथः स्वर्गतो धर्ममाचरन् ।
धनधान्यवतीं स्फीतां प्रदाय पृथिवीं तव ॥ ५ ॥
’तात ! राजा दशरथ ही धनधान्याने परिपूर्ण समृद्धशालिनी पृथ्वी तुम्हांला देऊन स्वतः धर्माचे आचरण करीत स्वर्गवासी झाले आहेत. ॥५॥
रामस्तथा सत्यवृत्तिः सतां धर्ममनुस्मरन् ।
नाजहात् पितुरादेशं शशी ज्योत्स्नामिवोदितः ॥ ६ ॥
’सत्यपूर्ण आचरण करणार्‍या श्रीरामांनी सत्पुरूषांच्या धर्माचा विचार करून पित्याच्या आज्ञेचे, ज्याप्रमाणे उदित चंद्रमा आपल्या चांदण्याला सोडत नाही त्याप्रमाणे उल्लङ्‌‍घन केले नाही. ॥६॥
पित्रा भ्रात्रा च ते दत्तं राज्यं निहतकण्टकम् ।
तद्‌ भुङ्‌क्ष्व मुदितामात्यः क्षिप्रमेवाभिषेचय ॥ ७ ॥

उदीच्याश्च प्रतीच्याश्च दाक्षिणात्याश्च केवलाः ।
कोट्यापरान्ताः सामुद्रा रत्‍नान्युभिहरन्तु ते ॥ ८ ॥
’याप्रकारे पिता आणि ज्येष्ठ भ्राता या दोघांनीही तुम्हाला हे अकण्टक राज्य प्रदान केले आहे. म्हणून तुम्ही आता मंत्र्यांना प्रसन्न ठेवून याचे पालन करा आणि त्वरितच आपला अभिषेक करून घ्या; ज्यायोगे उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व आणि अपरांत देशातील निवासी राजे तसेच समुद्रात जहाजांच्या द्वारे व्यापार करणारे व्यवसायी तुम्हांला असंख्य रत्‍ने प्रदान करतील.’ ॥७-८॥
तच्छ्रुत्वा भरतो वाक्यं शोकेनाभिपरिप्लुतः ।
जगाम मनसा रामं धर्मज्ञो धर्मकाङ्‌क्षया ॥ ९ ॥
ही गोष्ट ऐकून धर्मज्ञ भरत शोकात बुडून गेले आणि धर्मपालनाच्या इच्छेने ते मनातल्या मनात श्रीरामांना शरण गेले. ॥९॥
स बाष्पकलया वाचा कलहंसस्वरो युवा ।
विललाप सभामध्ये जगर्हे च पुरोहितम् ॥ १० ॥
नवयुवक भरत त्या भरसभेत डोळ्यातून अश्रु ढाळीत गदगद कंठाने कलहंसा समान मधुर स्वराने विलाप करू लागले आणि पुरोहितांना दोष देऊ लागले- ॥१०॥
चरितब्रह्मचर्यस्य विद्यास्नातस्य धीमतः ।
धर्मे प्रयतमानस्य को राज्यं मद्विधो हरेत् ॥ ११ ॥
’गुरूदेव ! ज्यांनी ब्रह्मचर्याचे पालन केले आहे, जे संपूर्ण विद्यांमध्ये निष्णांत झाले तसेच जे धर्मासाठी सदा प्रयत्‍नशील राहातात त्या बुद्धिमान श्रीरामांच्या राज्याचे माझ्या सारखा कुठला मनुष्य अपहरण करू शकेल ? ॥११॥
कथं दशरथाज्जातो भवेद् राज्यापहारकः ।
राज्यं चाहं च रामस्य धर्मं वक्तुमिहार्हसि ॥ १२ ॥
’महाराज दशरथांचा कोठलाही पुत्र मोठ्या भावाच्या राज्याचे अपहरण कसे करू शकेल ? हे राज्य आणि मी दोन्ही श्रीरामांचे आहोत, हे समजून घेऊन आपण या सभेत धर्मसंगत गोष्ट(च) बोलली पाहिजे. (अन्याययुक्त नाही). ॥१२॥
ज्येष्ठः श्रेष्ठश्च धर्मात्मा दिलीपनहुषोपमः ।
लब्धुमर्हति काकुत्स्थो राज्यं दशरथो यथा ॥ १३ ॥
’धर्मात्मा श्रीराम माझ्यापेक्षा वयांनी मोठे आहेत आणि गुणांनीही श्रेष्ठ आहेत. ते दिलीप आणि नहुषाप्रमाणे तेजस्वी आहेत, म्हणून महाराज दशरथांच्या प्रमाणे तेच या राज्याच्या प्राप्तीसाठी योग्य अधिकारी आहेत. ॥१३॥
अनार्यजुष्टमस्वर्ग्यं कुर्यां पापमहं यदि ।
इक्ष्वाकूणामहं लोके भवेयं कुलपांसनः ॥ १४ ॥
’पापाचे आचरण तर नीच पुरूष करतात. ते मनुष्याला निश्चितच नरकात पाडणारे आहे. जर श्रीरामचंद्रांचे राज्य घेऊन मीही पापाचरण करीन तर संसारात इक्ष्वाकु कुलाचा कलंक समजला जाईन. ॥१४॥
यद्धि मात्रा कृतं पापं नाहं तदपि रोचये ।
इहस्थो वनदुर्गस्थं नमस्यामि कृताञ्जलिः ॥ १५ ॥
’माझ्या मातेने जे पाप केले आहे ते मला कधीही पसंत नाही म्हणून येथे राहूनही मी दुर्गम वनात निवास करणार्‍या श्रीरामचंद्रांना हात जोडून प्रणाम करीत आहे. ॥१५॥
राममेवानुगच्छामि स राजा द्विपदां वरः ।
त्रयाणामपि लोकानां राज्यमर्हति राघवः ॥ १६ ॥
’ मी श्रीरामांचेच अनुसरण करीन. मनुष्यांमध्ये श्रेष्ठ राघव या राज्याचे राजा आहेत. ते तीन्ही लोकांचे राजे होण्यास योग्य आहेत’. ॥१६॥
तद्वाक्यं धर्मसंयुक्तं श्रुत्वा सर्वे सभासदः ।
हर्षान्मुमुचुरश्रूणि रामे निहितचेतसः ॥ १७ ॥
भरताचे हे धर्मयुक्त वचन ऐकून सर्व सभासद श्रीरामांमध्ये चित्त लावून हर्षाने अश्रु ढाळू लागले. (आनंदाश्रु ढाळू लागले.) ॥१७॥
यदि त्वार्यं न शक्ष्यामि विनिवर्तयितुं वनात् ।
वने तत्रैव वत्स्यामि यथार्थो लक्ष्मणस्तथा ॥ १८ ॥
भरतांनी परत म्हटले - ’जर मी आर्य श्रीरामांना वनातून परत आणू शकलो नाही तर स्वतः ही नरश्रेष्ठ लक्ष्मणाप्रमाणे तेथेच निवास करीन. ॥१८॥
सर्वोपायं तु वर्तिष्ये विनिवर्तयितुं बलात् ।
समक्षमार्यमिश्राणां साधूनां गुणवर्तिनाम् ॥ १९ ॥
’मी आपणा सर्व सदगुणयुक्त आचरण करणार्‍या पूजनीय श्रेष्ठ सभासदांसमक्ष श्रीरामचंद्रांना बलपूर्वक परत आणण्यासाठी सर्व उपायांनी प्रयत्‍न करीन. ॥१९॥
विष्टिकर्मान्तिकाः सर्वे मार्गशोधकरक्षकाः ।
प्रस्थापिता मया पूर्वं यात्रापि मम रोचते ॥ २० ॥
’मी मार्गशोधनात कुशल सर्व अवैतनिक तसेच वेतनभोगी कार्यकर्त्यांना पूर्वीच येथून पाठवून दिले आहे. म्हणून मला श्रीरामचंद्रांच्या जवळ जाणेच चांगले वाटत आहे. ॥२०॥
एवमुक्त्वा तु धर्मात्मा भरतो भ्रातृवत्सलः ।
समीपस्थमुवाचेदं सुमन्त्रं मन्त्रकोविदम् ॥ २१ ॥
सभासदांना असे सांगून भ्रातृवत्सल धर्मात्मा भरत जवळच बसलेल्या मंत्रवेत्ता सुमंत्रांना याप्रकारे बोलले - ॥२१॥
तूर्णमुत्थाय गच्छ त्वं सुमन्त्र मम शासनात् ।
यात्रामाज्ञापय क्षिप्रं बलं चैव समानय ॥ २२ ॥
’सुमंत्र ! आपण लवकर उठून जावे आणि माझ्या आज्ञेने सर्वांना वनांत चलण्याच्या आदेशाची सूचना द्यावी आणि सेनेला ही त्वरित बोलावून ध्यावे’ ॥२२॥
एवमुक्तः सुमन्त्रस्तु भरतेन महात्मना ।
प्रहृष्ट सोऽदिशत् सर्वं यथासंदिष्टमिष्टवत् ॥ २३ ॥
महात्मा भरतांनी असे म्हटलावर सुमंत्रांनी अत्यंत हर्षाने सर्वांना या कथनानुसार तो प्रिय संदेश ऐकविला. ॥२३॥
ताः प्रहृष्टाः प्रकृतयो बलाध्यक्षा बलस्य च ।
श्रुत्वा यात्रां समाज्ञप्तां राघवस्य निवर्तने ॥ २४ ॥
’राघवांना परत आणण्यासाठी भरत जाणार आहेत आणि त्यांच्या बरोबर जाण्यासाठी सेनेलाही आदेश प्राप्त झाला आहे’ - हा समाचार ऐकून ते सर्व प्रजाजन आणि सेनापतिगणही खूप प्रसन्न झाले. ॥२४॥
ततो योधाङ्‌गनाः सर्वा भर्तॄन् सर्वान् गृहे गृहे ।
यात्रागमनमाज्ञाय त्वरयन्ति स्म हर्षिताः ॥ २५ ॥
त्यानंतर त्या यात्रेचा समाचार ऐकून सैनिकांच्या सर्व स्त्रिया घरा-घरांत हर्षाने प्रफुल्ल झाल्या आणि आपल्या पतींना लवकर तयार होण्यासाठी प्रेरीत करू लागल्या. ॥२५॥
ते हयैर्गोरथैः शीघ्रं स्यन्दनैश्च मनोजवैः ।
सहयोषिद्‌‍बलाध्यक्षा बलं सर्वमचोदयन् ॥ २६ ॥
सेनापतिनी घोडे, बैलगाड्या तसेच मनाप्रमाणे वेगवान रथासहित संपूर्ण सेनेला स्त्रियांसहित यात्रेसाठी लवकर तयार होण्याची आज्ञा दिली. ॥२६॥
सज्जं तु तद् बलं दृष्ट्‍वा भरतो गुरुसन्निधौ ।
रथं मे त्वरयस्वेति सुमन्त्रं पार्श्वतोऽब्रवीत् ॥ २७ ॥
सेना कूच करण्यास तयार झालेली पाहून भरतांनी गुरूंच्या समीपच बाजूला उभे असलेल्या सुमंत्रांना म्हटले- ’आपण माझा रथही त्वरित तयार करुन घेऊन यावा.’ ॥२७॥
भरतस्य तु तस्याज्ञां प्रतिगृह्य च हर्षितः ।
रथं गृहीत्वोपययौ युक्तं परमवाजिभिः ॥ २८ ॥
भरताची ती आज्ञा शिरोधार्य करून सुमंत्र हर्षाने तेथून गेले आणि उत्तम घोडे जुंपलेला रथ घेऊन परत आले. ॥२८॥
स राघवः सत्यधृतिः प्रतापवान्
    ब्रुवन् सुयुक्तं दृढसत्यविक्रमः ।
गुरुं महारण्यगतं यशस्विनं
    प्रसादयिष्यन् भरतोऽब्रवीत् तदा ॥ २९ ॥
तेव्हा सुदृढ आणि सत्यपराक्रमी सत्यपरायण प्रतापी भरत विशाल वनात गेलेल्या आपल्या मोठ्या भावास- यशस्वी श्रीरामास - परत आणण्यासाठी राजी करण्यासाठी यात्रेचा उद्देशाने त्यावेळी याप्रकारे बोलले - ॥२९॥
तूर्णं समुत्थाय सुमन्त्र गच्छ
    बलस्य योगाय बलप्रधानान् ।
आनेतुमिच्छामि हि तं वनस्थं
    प्रसाद्य रामं जगतो हिताय ॥ ३० ॥
’सुमंत्र ! आपण लवकर उठावे आणि सेनापतिंपाशी जाऊन आणि त्यांना सांगून उद्याच सेनेला कूच करण्यासाठी तयार होण्याची व्यवस्था करावी, कारण मी सर्व जगाचे कल्याण करण्यासाठी त्या वनवासी श्रीरामांना प्रसन्न करून येथे घेऊन येऊ इच्छितो. ॥३०॥
स सूतपुत्रो भरतेन सम्य-
    गाज्ञापितः सम्परिपूर्णकामः ।
शशास सर्वान् प्रकृतिप्रधानान्
    बलस्य मुख्यांश्च सुहृज्जनं च ॥ ३१ ॥
भरताची ही उत्तम आज्ञा ऐकून सूतपुत्र सुमंत्रांना आपला मनोरथ सफल झाला असे वाटले आणि त्यांनी प्रजावर्गातील सर्व प्रधान व्यक्ती, सेनापती आणि सुहृदांना भरतांचा आदेश ऐकवला. ॥३१॥
ततः समुत्थाय कुले कुले ते
    राजन्यवैश्या वृषलाश्च विप्राः ।
अयूयुजन्नुष्ट्ररथान् खरांश्च
    नागान् हयांश्चैव कुलप्रसूतान् ॥ ३२ ॥
तेव्हा प्रत्येक घरातील लोक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र उठून उठून उत्तम जातिचे घोडे, हत्ती, ऊंट, गाढवे रथांना जुंपू लागले. ॥३२॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे द्व्यशीतितमः सर्गः ॥ ८२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा ब्याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP