[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। षट्‌त्रिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण सह सैन्यं कोषं च प्रेषयितुं राज्ञो दशरथस्यादेशः कैकेयीकर्तृकस्तस्य विरोधः सिद्धार्थेन कैकेय्याः प्रबोधनं राज्ञा स्वयमपि श्रीरामेण सह वनं गन्तुमिच्छायाः प्रकटनम् - राजा दशरथांचा श्रीरामाबरोबर सेना आणि खजिना धाडण्याच्या आदेश, कैकेयी द्वारा याचा विरोध, सिद्धार्थाने कैकेयीला समजाविणे तथा राजांनी श्रीरामा बरोबर जाण्याची इच्छा प्रकट करणे -
ततः सुमन्त्रमैक्ष्वाकः पीडितोऽत्र प्रतिज्ञया ।
स बाष्पमतिनिःश्वस्य जगादेदं पुनर्वचः ॥ १ ॥
तेव्हा इक्ष्वाकुकुलंदन राजा दशरथ तेथे आपल्या प्रतिज्ञेने पीडित होऊन अश्रू ढाळीत दीर्घ श्वास घेत सुमंत्रांना याप्रकारे बोलले- ॥१॥
सूत रत्‍नसुसम्पूर्णा चतुर्विधबला चमूः ।
राघवस्यानुयात्रार्थं क्षिप्रं प्रतिविधीयताम् ॥ २ ॥
'सूत ! तुम्ही तात्काळ रत्‍नांनी परिपूर्ण चतुरंगिणी सेनेला राघवाच्या पाठोपाठ जाण्याची आज्ञा द्या. ॥२॥
रूपाजीवाश्च वादिन्यो वणिजश्च महाधनाः ।
शोभयन्तु कुमारस्य वाहिनीः सुप्रसारिताः ॥ ३ ॥
'रूपाने आजीविका चालविणार्‍या सरस वचन बोलणार्‍या स्त्रिया महाधनी आणि विक्रययोग्य द्रव्यांचे प्रसारण करण्यात कुशल वैश्य राजकुमार रामाच्या सेनांना सुशोभित करोत. ॥३॥
ये चैनमुपजीवन्ति रमते यैश्च वीर्यतः ।
तेषां बहुविधं दत्त्वा तान्यप्यत्र नियोजय ॥ ४ ॥
'जे रामाजवळ राहून जीवन निर्वाह करतात तथा ज्या मल्लांचा पराक्रम पाहून हे प्रसन्न राहात असत त्या सर्वांना अनेक प्रकारचे धन देऊन त्यांनाही यांच्या बरोबर जाण्याची आज्ञा द्या. ॥४॥
आयुधानि च मुख्यानि नागराः शकटानि च ।
अनुगच्छन्तु काकुत्स्थं व्याधाश्चारण्यकोविदाः ॥ ५ ॥
'मुख्य मुख्य आयुधे, नगराचे निवासी, छकडे तसेच वनातील रहस्य जाणणारे व्याधही काकुत्स्थ रामाच्या पाठोपाठ जाऊ देत. ॥५॥
निघ्नन् मृगान् कुञ्जरांश्च पिबंश्चारण्यकं मधु ।
नदीश्च विविधाः पश्यन् न राज्यं संस्मरिष्यति ॥ ६ ॥
'ते रस्त्यांत येणार्‍या मृगांना आणि हत्तीना परतवून लावतील आणि जंगली मधुचे पान करीत आणि नाना प्रकारच्या नद्यांना पहात असतां त्यांना आपल्या राज्याचे स्मरण होणार नाही. (ते स्मरण करणार नाहीत.) ॥६॥
धान्यकोशश्च यः कश्चित् धनकोशश्च मामकः ।
तौ राममनुगच्छेतां वसन्तं निर्जने वने ॥ ७ ॥
श्रीराम निर्जन वनात निवास करण्यासाठी जात आहेत म्हणून माझा खजिना आणि अन्न भाण्डार- ह्या दोन्ही वस्तु त्यांच्या बरोबर जातील. ॥७॥
यजन् पुण्येषु देशेषु विसृजंश्चाप्तदक्षिणाः ।
ऋषिभिश्चापि संगम्य प्रवत्स्यति सुखं वने ॥ ८ ॥
हे वनातील पावन प्रदेशात यज्ञ करतील, त्यात आचार्य आदिंना पर्याप्त दक्षिणा देतील तथा ऋषिंना भेटून सुखपूर्वक वनात राहातील. ॥८॥
भरतश्च महाबाहुरयोध्यां पालयिष्यति ।
सर्वकामैः सह पुनः श्रीमान् रामः संसाध्यतामिति ॥ ९ ॥
'महाबाहु भरत अयोध्येचे पालन करतील. श्रीमान रामांना संपूर्ण मनोवाञ्छित भोगांनी संपन्न करून येथून धाडले जावे.' ॥९॥
एवं ब्रुवति काकुत्स्थे कैकेय्या भयमागतम् ।
मुखं चाप्यगमच्छोषं स्वरश्चापि व्यरुध्यत ॥ १० ॥
ज्यावेळी महाराज दशरथ अशा गोष्टी बोलू लागले, तेव्हा कैकेयीला फार भय वाटले. तिचे तोंड सुकून गेले आणि तिचा स्वरही रूद्ध झाला. ॥१०॥
सा विषण्णा च संत्रस्ता मुखेन परिशुष्यता ।
राजानमेवाभिमुखी कैकेयी वाक्यमब्रवीत् ॥ ११ ॥
कैकेयी विषादग्रस्त आणि त्रस्त होऊन सुकलेल्या मुखाने राजाकडे मुख करून म्हणाली - ॥११॥
राज्यं गतधनं साधो पीतमण्डां सुरामिव ।
निरास्वाद्यतमं शून्यं भरतो नाभिपत्स्यते ॥ १२ ॥
'श्रेष्ठ महाराज ! ज्याचा सारभाग पहिल्यानेच प्राशन केला गेला असेल अशा आस्वादरहित सुरेला जसे तिचे सेवन करणारे लोक ग्रहण करीत नाहीत त्याप्रमाणेच या धनहीन आणि शून्य राज्याला, जे कदापि सेवन करण्यायोग्य राहाणार नाही, भरत कदापि ग्रहण करणार नाही.' ॥१२॥
कैकेय्यां मुक्तलज्जायां वदन्त्यामतिदारुणम् ।
राजा दशरथो वाक्यमुवाचायतलोचनाम् ॥ १३ ॥
कैकेयी जेव्हा लाज सोडून हे अत्यंत दारूण वचन बोलू लागली तेव्हा राजा दशरथांनी त्या विशाललोचना कैकेयीला याप्रकारे म्हटले- ॥१३॥
वहन्तं किं तुदसि मां नियुज्य धुरि माहिते ।
अनार्ये कृत्यमारब्धं किं न पूर्वमुपारुधः ॥ १४ ॥
'अनार्ये ! अहितकारिणी ! तू मला रामाला वनवास देण्याच्या दुर्वह भार वहाण्यास मला लावून ज्यावेळी मी तो भार ओढत आहे, अशा अवस्थेत का मला आपल्या वचनांचा चाबूक मारून पीडा देत आहेस ? यावेळी जे कार्य तू आरंभ केले आहेस, अर्थात रामाबरोबर सेना आणि सामग्री धाडण्यात जो प्रतिबंध ( अडथळा) आणत आहेस यासाठी तू प्रथमच कां प्रार्थना केली नाहीस ? ( अर्थात पहिल्यानेच तू का सांगितले नाहीस की रामांना एकटेच वनात जावे लागेल, त्यांच्या बरोबर सेना आदि सामग्री जाऊ शकत नाही.) ॥१४॥
तस्यैतत् क्रोधसंयुक्तमुक्तं श्रुत्वा वराङ्‌गना ।
कैकेयी द्विगुणं क्रुद्धा राजानमिदमब्रवीत् ॥ १५ ॥
राजांचे हे क्रोधयुक्त वचन ऐकून सुंदरी कैकेयी त्यांच्या पेक्षाही दुप्पट क्रोध करून त्यांना याप्रकारे म्हणाली- ॥१५॥
तवैव वंशे सगरो ज्येष्ठपुत्रमुपारुधत् ।
असमञ्ज इति ख्यातं तथायं गन्तुमर्हति ॥ १६ ॥
'महाराज ! आपल्याच वंशात प्रथम राजा सगर होऊन गेले आहेत ज्यांनी आपला ज्येष्ठ असमञ्ज यास हाकलून लावून त्याच्यासाठी राज्याचा दरवाजा कायमचा बंद केला होता. याच प्रकारे यांनीही येथून निघून गेले पाहिजे.' ॥१६॥
एवमुक्तो धिगित्येव राजा दशरथोऽब्रवीत् ।
व्रीडितश्च जनः सर्वः सा च तन्नावबुध्यत ॥ १७ ॥
तिने असे म्हटल्यावर राजा दशरथांनी म्हटले - धिक्कार आहे ! तेथे जितके लोक बसलेले होते ते सर्व लाजेने (मेल्यासारखे) चूर झाले, परंतु कैकेयी आपल्या कथनाचे अनौचित्य अथवा राजा द्वारा केल्या गेलेल्या धिक्काराचे औचित्य समजू शकली नाही. ॥१७॥
तत्र वृद्धो महामात्रः सिद्धार्थो नाम नामतः ।
शुचिर्बहुमतो राज्ञः कैकेयीमिदमब्रवीत् ॥ १८ ॥
त्यावेळी तेथे राजाचे प्रधान आणि वयोवृद्ध मंत्री सिद्धार्थ बसलेले होते. ते अत्यंत शुद्ध स्वभावाचे आणि राजाचे विशेष आदरणीय होते. त्यांनी कैकेयीला या प्रकारे म्हटले- ॥१८॥
असमञ्जो गृहीत्वा तु क्रीडतः पथि दारकान् ।
सरय्वां प्रक्षिपन्नप्सु रमते तेन दुर्मतिः ॥ १९ ॥
'देवी ! असमञ्ज अत्यंत दुष्ट बुद्धिचा राजकुमार होता. तो मार्गावर खेळणार्‍या बालकांना पकडून शरयूच्या जलात फेकून देत असे आणि अशाच कार्यानी आपले (स्वतःचे) मनोरञ्जन करीत असे. ॥१९॥
तं दृष्ट्‍वा नागराः सर्वे क्रुद्धा राजानमब्रुवन् ।
असमञ्जं वृणीष्वैकमस्मान् वा राष्ट्रवर्द्धन ॥ २० ॥
त्याची ही करणी पाहून सर्व नगरनिवासी कुपित होऊन राजाजवळ जाऊन म्हणाले- 'राष्ट्राची वृद्धि करणारे महाराज ! एक तर आपण एकटे असमञ्जला घेऊन राहा अथवा याला घालवून आम्हाला या नगरात राहू द्या.' ॥२०॥
तानुवाच ततो राजा किन्निमित्तमिदं भयम् ।
ताश्चापि राज्ञा सम्पृष्टा वाक्यं प्रकृतयोऽब्रुवन् ॥ २१ ॥
तेव्हा राजांनी विचारले कि 'तुम्हाला असमञ्ज पासून कुठल्या कारणाने भय वाटत आहे ? राजांनी विचारल्यावर प्रजाजनांनी ही गोष्ट सांगितली- ॥२१॥
क्रीडतस्त्वेष नः पुत्रान् बालानुद्‌भ्रान्तचेतसः ।
सरय्वां प्रक्षिपन्मौर्ख्यादतुलां प्रीतिमश्नुते ॥ २२ ॥
'महाराज ! हा आमच्या खेळत असलेल्या लहान मुलांना पकडतो आणि जेव्हा ती मुले अतिशय भयभित होतात तेव्हा त्यांना शरयूमध्ये फेकून देतो. मूर्खतावश असे करण्याने यांना अनुपम आनंद प्राप्त होतो आहे'. ॥२२॥
स तासां वचनं श्रुत्वा प्रकृतीनां नराधिपः ।
तं तत्याजाहितं पुत्रं तासां प्रियचिकीर्षया ॥ २३ ॥
'त्या प्रजाजनांचे हे म्हणणे ऐकून राजा सगराने त्यांचे प्रिय करण्याच्या इच्छेने आपल्या त्या अहितकारक दुष्ट पुत्राचा त्याग केला. ॥२३॥
तं यानं शीघ्रमारोप्य सभार्यं सपरिच्छदम् ।
यावज्जीवं विवास्योऽयमिति तानन्वशात् पिता ॥ २४ ॥
'पित्याने आपल्या त्या पुत्राला पत्‍नी आणि आवश्यक सामग्रीसहित शीघ्र रथावर बसवून आपल्या सेवकांना आज्ञा दिली - 'याला जीवनभरासाठी (कायमचा) राज्याच्या बाहेर घालवून द्या.' ॥२४॥
स फालपिटकं गृह्य गिरिदुर्गाण्यलोकयत् ।
दिशः सर्वास्त्वनुचरन् स यथा पापकर्मकृत् ॥ २५ ॥

इत्येनमत्यजद् राजा सगरो वै सुधार्मिकः ।
रामः किमकरोत् पापं येनैवमुपरुध्यते ॥ २६ ॥
असमञ्जाने फाळ आणि पेटारा घेऊन पर्वतांच्या दुर्गम गुहांनाच आपल्या निवासासाठी योग्य पाहिले आणि कंद आदिसाठी तो संपूर्ण दिशांमध्ये विचरण करू लागला. तो, जसे त्याच्या संबंधी सांगितले जाते, पापाचारी होता म्हणून परम धार्मिक राजा सगराने त्याचा त्याग केला होता. रामांनी असा कुठला अपराध केला आहे की ज्या कारणाने त्यांना या प्रकारे राज्य प्राप्त होण्यापासून अडविले गेले आहे ? ॥२५-२६॥
न हि कञ्चन पश्यामो राघवस्यागुणं वयम् ।
दुर्लभो ह्यस्य निरयः शशाङ्‌कस्येव कल्मषम् ॥ २७ ॥
'आम्हा लोकांना तर राघवाच्या ठिकाणी कुठलाही अवगुण दिसत नाही. ज्याप्रमाणे शुक्लपक्षांतील द्वितीयेच्या चंद्रम्याच्या ठिकाणी मलिनतेचे दर्शन दुर्लभ आहे त्याच प्रकारे यांच्या ठिकाणी कुठलेही पाप अथवा अपराध शोधूनही सापडू शकत नाही. ॥२७॥
अथवा देवि त्वं कञ्चिद् दोषं पश्यसि राघवे ।
तमद्य ब्रूहि तत्त्वेन ततो रामो विवास्यते ॥ २८ ॥
'अथवा देवी ! जर तुला राघवाच्या ठिकाणी काही दोष दिसून येत असेल तर आज तो स्पष्टपणे सांग. तशा स्थितित राघवाला घालवून दिले जाऊ शकते. ॥२८॥
अदुष्टस्य हि संत्यागः सत्पथे निरतस्य च ।
निर्दहेदपि शक्रस्य द्युतिं धर्मविरोधवान् ॥ २९ ॥
ज्याच्या ठिकाणी कुठलीही दुष्टता नाही, जो सदा सन्मार्गातच स्थित आहे अशा पुरुषाचा त्याग धर्माच्या विरुद्ध मानला गेला आहे. असे धर्मविरोधी कार्य तर इंद्राच्या तेजालाही दग्ध करून टाकील. ॥२९॥
तदलं देवि रामस्य श्रिया विहतया त्वया ।
लोकतोऽपि हि ते रक्ष्यः परिवादः शुभानने ॥ ३० ॥
'म्हणून देवी ! रामाच्या राज्याभिषेकात विघ्न आणून तुलाही लाभ होणार नाही. शुभानने ! तू लोकनिंदेपासून वाचण्याचाही प्रयत्‍न करावयास हवास.' ॥३०॥
श्रुत्वा तु सिद्धार्थवचो राजा श्रांततरस्वरः ।
शोकोपहतया वाचा कैकेयीमिदमब्रवीत् ॥ ३१ ॥
सिद्धार्थांचे म्हणणे ऐकून राजा दशरथ अत्यंत थकलेल्या स्वराने शोकाकुल वाणीने कैकेयीला याप्रकारे बोलले - ॥३१॥
एतद्वचो नेच्छसि पापरूपे
     हितं न जानासि ममात्मनोऽथवा ।
आस्थाय मार्गं कृपणं कुचेष्टा
     चेष्टा हि ते साधुपथादपेता ॥ ३२ ॥
'पापिणी ! काय तुला ही गोष्टही रुचली नाही ? तुला माझ्या आणि आपल्या स्वतःच्या हिताचे बिल्कुल कसे ज्ञान नाही ? तू दुःखद मार्गाचा आश्रय घेऊन अशी कुचेष्टा करीत आहेस. तुझे हे सारे प्रयत्‍न साधुपुरुषांच्या मार्गाच्या विपरीत आहेत. ॥३२॥
अनुव्रजिष्याम्यहमद्य रामं
     राज्यं परित्यज्य सुखं धनं च ।
सर्वे च राज्ञा भरतेन च त्वं
     यथासुखं भुङ्‌क्ष्व चिराय राज्यम् ॥ ३३ ॥
'आता मीही हे राज्य, धन आणि सुख सोडून रामाच्या पाठोपाठ निघून जाईन. हे सर्व लोकही त्यांच्याच बरोबर जातील. तू एकटी राजा भरतासह चिरकालपर्यत सुखपूर्वक राज्य भोगीत रहा.' ॥३३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षट्‌त्रिंशः सर्गः ॥ ३६ ॥
या प्रकारे वाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा छ्त्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP