॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ सुन्दरकाण्ड ॥

॥ द्वितीयः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



हनुमानाचे अशोकवनांत गमन आणि रावणाने सीतेला भीती दाखवणे


श्रीमहादेव उवाच
ततो जगाम हनुमान् लङ्‌कां परमशोभनाम् ।
रात्रौ सूक्ष्मतनुर्भूत्वा बभ्राम परितः पुरीम् ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले - हे पार्वती, त्यानंतर अतिशय शोभिवंत असणाऱ्या लंकेत हनुमान शिरला आणि सूक्ष्म शरीर धारण करून तो रात्रीच्या वेळी लंका नगरीत सर्वत्र फिरू लागला. (१)

सीतान्वेषणकार्यार्थी प्रविवेश नृपालयम् ।
तत्र सर्वप्रदेशेषु विविच्य हनुमान्कपि ॥ २ ॥
नापश्यज्जानकीं स्मृत्वा ततो लङ्‌काभिभाषितम् ।
जगाम हनुमान् शीघ्रं अशोकवनिकां शुभाम् ॥ ३ ॥
सीतेचा शोध घेण्याचे कार्य करण्याची इच्छा असल्याने त्याने राजवाड्यात प्रवेश केला. तेथे सर्व ठिकाणी शोध केल्यावरसुद्धा जेव्हा हनुमानाला सीता दिसली नाही, तेव्हा त्याला लंकेचे शब्द आठवले आणि मग तो त्वरेने मनोहर अशा अशोकवाटिकेत गेला. (२-३)

सुरपादपसम्बाधां रत्‍नसोपानवापिकाम् ।
नानापक्षिमृगाकीर्णां स्वर्णप्रासादशोभिताम् ॥ ४ ॥
फलैरानम्रशाखाग्र पादपै परिवारिताम् ।
विचिन्वन् जानकीं तत्र प्रतिवृक्षं मरुत्सुतः ॥ ५ ॥
ती अशोक वाटिका कल्पवृक्षांनी भरलेली होती. तेथे रत्नांच्या पायऱ्या असणाऱ्या विहिरी होत्या. नाना प्रकारचे पक्षी आणि पशू तेथे फिरत होते. ती एका सुवर्ण-प्रासादाने शोभिवंत झाली होती. फळांच्या भारामुळे ज्यांच्या शाखांची टोके खाली लवलेली होती अशा वृक्षांनी ती वेढलेली होती. तेथे प्रत्येक वृक्षाच्या खाली जानकी आहे का, असा शोध वायुसुताने घेतला. (४-५)

ददर्शाभ्रंलिहं तत्र चैत्यप्रासादमुत्तमम् ।
दृष्ट्वा विस्मयमापन्नो मणिस्तम्भशतान्वितम् ॥ ६ ॥
तेथे त्याला एक उत्तम देव मंदिर दिसले; त्याचे शिखर आकाशाला भिडलेले होते आणि त्याला रत्नजडित शेकडो खांब होते. ते पाहून हनुमान आश्चर्यचकित झाला. (६)

समतीत्य पुनर्गत्वा किञ्चित् दूरं स मारुतिः ।
ददर्श शिंशपावृक्षं अत्यन्तनिबिडच्छदम् ॥ ७ ॥
अदृष्टातपमाकीर्णं स्वर्णवर्णविहङ्‌गमम् ।
तन्मूले राक्षसीमध्ये स्थितां जनकनन्दिनीम् ॥ ८ ॥
ददर्श हनुमान् वीरो देवतामिव भूतले ।
एकवेणीं कृशां दीनां मलिनाम्बरधारिणीम् ॥ ९ ॥
भुमौ शयानां शोचन्तीं रामरामेति भाषिणीम् ।
त्रातारं नाधिगच्छन्तीं उपवासकृशां शुभाम् ॥ १० ॥
ते मंदिर ओलांडून पुनः पुढे काहीसे दूर गेल्यावर, मारुतीला एक अशोक वृक्ष दिसला; त्या वृक्षाची पाने अतिशय घनदाट होती; त्याच्या खाली सूर्याचे ऊन येत नव्हते; आणि वृक्ष सोनेरी पक्ष्यांनी भरलेला होता. त्या वृक्षाच्या मुळाशी जनक-कन्या सीता वीर हनुमानाला दिसली; ती राक्षसींच्या वेढ्यात असली तरी पृथ्वीवरील देवतेप्रमाणे दिसत होती; तिने एक वेणी घातली होती आणि मळके वस्त्र परिधान केले होते; कृश आणि दीन अशी ती जमिनीवर पडून, 'राम राम' म्हणत शोक करीत होती; कोणी आपले रक्षण करील असे तिला वाटत नव्हते; ती उपवासाने कृश झाली असली तरीही सुंदर होती. (७-१०)

शाखान्तच्छदमध्यस्थो ददर्श कपिकुञ्जरः ।
कृतार्थोऽहं कृतार्थोऽहं दृष्ट्वा जनकनन्दिनीम् ॥ ११ ॥
वृक्षाच्या फांदीच्या पानामध्ये दडलेल्या कपिश्रेष्ठाने जनक नंदिनीला पाहिले. "आज आपण कृतार्थ झालो, परमात्म्या श्रीरामांचे कार्य माझ्याकडूनच घडले," असे त्याला वाटले. त्याच वेळी रावणाच्या अंतःपुरातून हलकल्लोळ येऊ लागला. (११-१२)

मयैव साधितं कार्यं रामस्य परमात्मनः ।
ततः किलकिलाशब्दो बभूवान्तःपुराद्‌बहिः ॥ १२ ॥
किमेतदिति सँल्लीनो वृक्षपत्रेषु मारुतिः ।
आयान्तं रावणं तत्र स्त्रीजनैः परिवारितम् ॥ १३ ॥
हे काय असेल बरे ? असा विचार करीत मारुती झाडाच्या पानाआड दडून राहिला. तेव्हा तेथे स्त्रियांसमवेत बाहेर येणारा रावण त्याला दिसला. (१३)

दशास्यं विंशतिभुजं नीलाञ्जनचयोपमम् ।
दृष्ट्वा विस्मयमापन्नः पत्रखण्डेष्वलीयत ॥ १४ ॥
त्या रावणाला दहा तोंडे व वीस भुजा होत्या. काजळाच्या राशीप्रमाणे त्याचे शरीर काळे होते. त्याला पाहून मारुती विस्मित झाला आणि त्या दुष्टाचे तोंडही पाहणे टाळण्यासाठी तो पानांच्या आड लपून बसला. (१४)

रावणो राघवेणाशु मरणं मे कथं भवेत् ।
सीतार्थमपि नायाति रामः किं कारणं भवेत् ॥ १५ ॥
इत्येवं चिन्तयन्नित्यं राममेव सदा हृदि ।
तस्मिन् दिनेऽपररात्रौ रावणो राक्षसाधिपः ॥ १६ ॥
स्वप्ने रामेण सन्दिष्टः कश्चिदागत्य वानरः ।
कामरूपधरः सूक्ष्मो वृक्षग्रस्थोऽनुपश्यति ॥ १७ ॥
श्रीराघवांच्या हातून मला लवकर मरण कसे बरे येईल ? सीतेसाठीसुद्धा श्रीराम अद्यापि येथे आले नाहीत, याचे काय कारण असेल बरे ? असे सदा श्रीरामांचेच मनात चिंतन करणाऱ्या राक्षसराज रावणाने त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर एक स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नांत श्रीरामांचा संदेश घेऊन कोणी एक वानर आला होता, आणि इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा तो सूक्ष्म शरीराने झाडाच्या शेंड्यावर बसून सर्व काही पाहात होता, असे त्याला दिसले होते. (१५-१७)

इति दृष्ट्वा अद्‌भूतं स्वप्नं स्वात्मन्येवानुचिन्त्य सः ।
स्वप्नः कदाचित्सत्यः स्यात् एवं तत्र करोम्यहम् ॥ १८ ॥
जानकीं वाक् शरैर्विद्‍ध्वा दुःखितां नितरामहम् ।
करोमि दृष्ट्वा रामाय निवेदयतु वानरः ॥ १९ ॥
असे अद्‌भुत स्वप्न पाहिल्यावर त्याने मनात विचार केला की कदाचित हे स्वप्न सत्य होईल. तेव्हा त्या बाबतीत मी आता असे करतो की, (अशोक वनात जाऊन) जानकीला माझ्या वाग्बाणांनी विद्ध करून अतिशय दुःखी करतो, मग ते पाहून तो वानर श्रीरामांना निवेदन करील. (१८-१९)

इत्येवं चिन्तयन्सीता समीपं अगमत् ‍द्रुतम् ।
नूपुराणां किङ्‌किणीनां शृत्वा शिञ्जितमङ्‌गना ॥ २० ॥
सीता भीता लीयमाना स्वात्मन्येव सुमध्यमा ।
अधोमुख्यश्रुनयना स्थिता रामार्पितान्तरा ॥ २१ ॥
असा विचार करीत तो त्वरित सीतेच्याजवळ गेला. त्या वेळी (रावणाबरोबर असणाऱ्या राक्षसींच्या) नूपुरांचा आणि किंकिणींचा आवाज ऐकल्यावर, सुंदर कटी असणारी सीता भ्याली आणि स्वतःला सावरून घेऊन ती अधोमुख बसली. त्या वेळी तिच्या डोळ्यांत अश्रू आले होते आणि तिचे मन श्रीरामांच्या ठिकाणी लागले होते. (२०-२१)

रावणोऽपि तदा सीतां आलोक्याह सुमध्यमे ।
मां दृष्ट्वा किं वृथा सुभ्रु स्वात्मन्येव विलीयसे ॥ २२ ॥
त्या वेळी रावणानेसुद्धा सीतेला पाहून म्हटले, "हे सुंदरी, मला पाहून तू उगीचच अंग सावरून बसली आहेस. (२२)

रामो वनचराणां हि मध्ये तिष्ठति सानुजः ।
कदाचित् ‍दृश्यते कैश्चित् कदाचित् नैव दृश्यते ॥ २३ ॥
आपल्या लहान भावासह राम वनचरांच्यामध्ये राहात आहे. कधी तो काही लोकांना दिसतो तर कधी तो दिसत नाही. (२३)

मया तु बहुधा लोकाः प्रेषितास्तस्य दर्शने ।
न पश्यन्ति प्रयत्‍नेन वीक्षमाणाः समन्ततः ॥ २४ ॥
त्याला पाहण्यासाठी मी अनेक जणांना पाठविले होते. परंतु पुष्कळ प्रयत्न करूनही, सगळीकडे शोधूनसुद्धा तो त्यांना दिसला नाही. (२४)

किं करिष्यसि रामेण निःस्पृहणे सदा त्वयि ।
त्वया सदालिङ्‌गितोऽपि समीपस्थोऽपि सर्वदा ॥ २५ ॥
हृदयेऽस्य न च स्नेहः त्वयि रामस्य जायते ।
त्वत्कृतान् सर्वभोगांश्च त्वद्‍गुणानपि राघवः ॥ २६ ॥
भुञ्जानोऽपि न जानाति कृतघ्नो निर्गुणोऽधमः ।
त्वं आनीता मया साध्वी दुःखशोकसमाकुला ॥ २७ ॥
इदानीमपि नायाति भक्तिहीनः कथं व्रजेत् ।
निःसत्त्व निर्ममो मानी मुढः पण्डितमानवान् ॥ २८ ॥
जो तुझ्या बाबतीत सदा उदासीन आहे, तो तुझ्या काय कामाचा ? जरी तो नेहमी तुझ्याजवळ होता आणि तू त्याला सदा आलिंगन देत होतीस, तरी त्याच्या हृदयात तुझ्याविषयी प्रेम निर्माण झाले नाही. तुझ्याकडून प्राप्त झालेले सर्व भोग आणि तुझे गुण या सर्वांचा जरी तो उपभोग घेत होता, तरी त्या कृतघ्न गुणरहित आणि अधम रामाला त्यांची जाणीव नाही. तुला मी पळवून आणले. तू साध्वी स्त्री दुःखमग्न आणि शोकमग्र झालीस तरीसुद्धा तो अद्यापि इकडे येत नाही. तुझ्याविषयी त्याला प्रीती नसल्यामुळे तो कसा बरे इकडे येईल ? तो संपूर्णपणे शक्तिहीन, ममताशून्य, अभिमानी, मूर्ख आणि स्वतःला पंडित समजणारा आहे. (२५-२८)

नराधमं त्वद्विमुखं किं करिष्यसि भामिनि ।
त्वय्यतीव समासक्तं मां भजस्व आसुरोत्तमम् ॥ २९ ॥
हे सुंदरी, तुझ्याशी विन्मुख झालेल्या त्या नराधमाशी तुला काय करायचे आहे ? याउलट मी असुरश्रेष्ठ तुझ्या ठिकाणी अतिशय आसक्त आहे. तू माझा अंगीकार कर. (२९)

देवगन्धर्वनागानां यक्षकिन्नरयोषिताम् ।
भविष्यसि नियोक्‍त्री त्वं यदि मां प्रतिपद्यसे ॥ ३० ॥
जर तू माझा स्वीकार करशील तर तू देव, गंधर्व नाग, यक्ष आणि किन्नर यांच्या स्त्रियांवर अधिकार गाजवशील." (३०)

रावणस्य वचः श्रुत्वा सीतामर्षसमन्विता ।
उवाचाधोमुखी भूत्वा निधाय तृणमन्तरे ॥ ३१ ॥
रावणाचे वचन ऐकल्यावर सीतेला अतिशय क्रोध आला. अधोमुख होऊन आणि मध्ये तृण ठेवून ती म्हणाली. (३१)

राघवाद्‌बिभ्यता नूनं भिक्षुरूपं त्वया धृतम् ।
रहिते राघवाभ्यां त्वं शुनीव हविरध्वरे ॥ ३२ ॥
हतवानसि मां नीच तत्फलं प्राप्स्यसेऽचिरात् ।
यदा रामशराघात विदारितवपुर्भवान् ॥ ३३ ॥
ज्ञास्यसेऽमानुषं रामं गमिष्यसि यमान्तिकम् ।
समुद्रं शोषयित्वा वा शरैर्बद्‍ध्वाथ वारिधिम् ॥ ३४ ॥
हन्तुं त्वां समरे रामो लक्ष्मणेन समन्वितः ।
आगमिष्यति असन्देहो द्रक्ष्यसे राक्षसाधम ॥ ३५ ॥
"अरे नीचा, निःसंशय श्रीराघवांना भ्याल्यामुळे तू खरोखर भिक्षूचे रूप धारण केलेस आणि एखादी कुत्री ज्या प्रमाणे यज्ञातून हवी घेऊन जाते, त्याप्रमाणे श्रीराम व लक्ष्मण हे दोघेही उपस्थित नसताना, तू माझे अपहरण केलेस. लौकरच त्याचे फळ तुला भोगावे लागेल. ज्या वेळी रामांच्या बाणाच्या प्रहारांनी तुझे शरीर विदीर्ण होऊन, तू यमसदनास जाशील, त्या वेळी श्रीराम हे अमानव कसे आहेत, हे तुला कळेल. अरे अधम राक्षसा, समुद्राला कोरडा करून अथवा समुद्रावर बाणांनी सेतू बांधून, लक्ष्मणासह श्रीराम तुला युद्धात ठार करण्यास येतील, हे तू लौकरच पाहाशील, यात शंका नाही. (३२-३५)

त्वां सपुत्रं सहबलं हत्वा नेष्यति मां पुरम् ॥
श्रुत्वा रक्ष पतिः क्रुद्धो जानक्याः परुषाक्षरम् ॥ ३६ ॥
वाक्यं क्रोधसमाविष्टः खड्गमुद्यम्य सत्वरः ।
हन्तुं जनकराजस्य तनयां ताम्रलोचनः ॥ ३७ ॥
तुझे पुत्र आणि सैन्य यांच्यासह तुला ठार करून श्रीराम मला अयोध्या नगरीला घेऊन जातील." जानकीचे कठोर शब्द असणारे हे वाक्य ऐकून राक्षसांचा राजा रावण कुद्ध झाला आणि त्याचे डोळे लाल झाले. तो सत्वर तलवार उपसून जनक राजाच्या कन्येला ठार करण्यास सिद्ध झाला. (३६-३७)

मन्दोदरी निवार्याह पतिं पतिहिते रता ।
त्यजैनां मानुषीं दीनां दुःखितां कृपणां कृशाम् ॥ ३८ ॥
तितक्यात पतीचे हित करण्यात तत्पर असलेल्या महाराणी मंदोदरीने आपल्या पतीला अडविले आणि ती म्हणाली, "या दीन, दुःखी, भयभीत, कृश अशा मानवी स्त्रीला सोडून द्या. (३८)

देवगन्धर्वनागानां बह्व्यः सन्ती वराङ्‌गनाः ।
त्वामेव वरयन्त्युच्चैः मदमत्तविलोचनाः ॥ ३९ ॥
देव, गंधर्व आणि नाग यांच्या अनेक सुंदर स्त्रिया आहेत आणि तारुण्यमदाने ज्यांचे डोळे धुंद झाले आहेत अशा त्या स्त्रिया तुम्हांलाच वरण्यास फार उत्सुक आहेत." (३९)

ततोऽब्रवीत् दशग्रीवो राक्षसीर्विकृताननाः ।
यथा मे वशगो सीता भविष्यति सकामना ।
तथा यतध्वं त्वरितं तर्जनादरणादिभिः ॥ ४० ॥
तेव्हा विकराल तोंडे असणाऱ्या राक्षसींना रावण म्हणाला, "भीती किंवा आदर इत्यादी कोणत्याही उपायाने ही सीता माझी अभिलाषा धरून त्वरित मला वश होईल असे काही तरी प्रयत्न करा. (४०)

द्विमासाभ्यन्तरे सीता यदि मे वशगा भवेत् ।
तदा सर्वसुखोपेता राज्यं भोक्ष्यति सा मया ॥ ४१ ॥
दोन महिन्यांच्या आत जर सीता मला वश झाली तर सर्व सुखे प्राप्त करून घेऊन ती माझ्यासह राज्याचा उपभोग घेईल. (४१)

यदि मास द्वयाद् ऊर्ध्वं मच्छय्यां नाभिनन्दति ।
तदा मे प्रातराशाय हत्वा कुरुत मानुषीम् ॥ ४२ ॥
आणि जर दोन महिन्यानंतर तिने माझ्या शय्येवर येण्याचे मान्य केले नाही, तर या मानव स्त्रीला ठार करून माझ्या सकाळच्या न्याहारीची व्यवस्था करा." (४२)

इत्युक्‍त्वा प्रययौ स्त्रीभी रावणोऽन्तःपुरालयम् ।
राक्षस्यो जानकीमेत्य भीषयन्त्यः स्वतर्जनैः ॥ ४३ ॥
असे बो लून आपल्या स्त्रियांसह रावण अंतःपुरातील निवासाकडे निघून गेला. इकडे जानकीजवळ येऊन राक्षसी आपापल्या विविध उपायांनी तिला भिववू लागल्या. (४३)

तत्रैका जानकीमाह यौवनं ते वृथा गतम् ।
रावणेन समासाद्य सफलं तु भविष्यति ॥ ४४ ॥
तेव्हा त्यातील एक राक्षसी जानकीला म्हणाली, "तुझे तारुण्य फुकट जात आहे. रावणाचा स्वीकार केल्याने ते तारुण्य सफल होईल." (४४)

अपरा चाह कोपेन किं विलम्बेन जानकि ।
इदानीं छेद्यतामङ्‌गं विभज्य च पृथक् पृथक् ॥ ४५ ॥
अन्या तु खड्गमुद्यम्य जानकीं हन्तुमुद्यता ।
अन्या करालवदना विदार्यास्यं अभीषयत् ॥ ४६ ॥
दुसरी राक्षसी क्रोधाने म्हणाली, "अग जानकी, रावणाचे म्हणणे मान्य करण्यास कशाला फुकट विलंब करतेस ?" तिसरी राक्षसी तरवार उगारून जानकीला ठार करण्यास तयार होऊन म्हणाली, "आता हिचे शरीर तोडून त्याचे वेगवेगळे तुकडे करू या." तर आणखी एक भयंकर तोंड असणारी राक्षसी आपले तोंड उघडून जानकीला भिववू लागली. (४५-४६)

एवं तां भीषयन्तीस्ता राक्षसीर्विकृताननाः ।
निवार्य त्रिजटा वृद्धा राक्षसी वाक्यमब्रवीत् ॥ ४७ ॥
अशा प्रकारे सीतेला भिवविणाऱ्या त्या विकृत तोंडाच्या राक्षसींचे निवारण करून त्रिजटा नावाची एक म्हातारी राक्षसी म्हणाली. (४७)

शृणुध्वं दुष्टराक्षस्यो मद्वाक्यं वो हितं भवेत् ॥ ४८ ॥
हे दुष्ट राक्षसींनो, माझे वचन ऐका. त्यामुळे तुमचे हित होईल. (४८)

न भीषयध्वं रुदतीं नमस्कुरुत जानकीम् ।
इदानीमेव मे स्वप्ने रामः कमललोचनः ॥ ४९ ॥
आरुह्य ऐरावतं शुभ्रं लक्ष्मणेन समागतः ।
दग्ध्वा लङ्‌कापुरीं सर्वां हत्वा रावणमाहवे ॥ ५० ॥
आरोप्य जानकीं स्वाङ्‌के स्थितो दृष्टोऽगमूर्धनि ।
रावणो गोमयह्रदे तैलाभ्यक्तो दिगम्बरः ॥ ५१ ॥
अगाहत्पुत्रपौत्रैश्च कृत्वा वदनमालिकाम् ।
विभीषणस्तु रामस्य सन्निधौ हृष्टमानसः ॥ ५२ ॥
सेवां करोति रामस्य पादयोर्भक्तिसंयुतः ।
सर्वथा रावणं रामो हत्वा सकुलमञ्जसा ॥ ५३ ॥
विभीषणाय अधिपत्यं दत्त्वा सीतां शुभाननाम् ।
अङ्‌के निधाय स्वपुरीं गमिष्यति न संशयः ॥ ५४ ॥
या रडणाऱ्या जानकीला तुम्ही भिववू नका. तुम्ही तिला नमस्कार करा. लक्ष्मणासह पांढऱ्या शुभ्र ऐरावतावर आरोहण करून, कमलनयन श्रीराम आत्ताच माझ्या स्वप्नात आले होते. संपूर्ण लंकापुरी जाळून टाकून, युद्धामध्ये रावणाचा वध करून आणि जानकीला आपल्या मांडीवर बसवून, पर्वताच्या शिखरावर बसलेले श्रीराम मला स्वप्नात दिसले. याउलट तेलाने माखलेला, वस्त्ररहित रावण गळ्यात रुंडमाळा घालून, आपल्या पुत्रपौत्रांसह शेणाच्या खड्यात बुडाला आहे व संतुष्ट मनाचा बिभीषण श्रीरामांजवळ बसून भक्तिपूर्वक रामांच्या पायांची सेवा करीत आहे, असे मी पाहिले. तेव्हा कुळासकट रावणाचा संपूर्ण नाश विनासायास करून बिभीषणाला लंकेचे आधिपत्य देऊन, आणि शुभवदना सीतेला मांडीवर बसवून श्रीराम स्वतःच्या नगरीला जातील, यात संशय नाही." (४९-५४)

त्रिजटाया वचः श्रुत्वा भीतास्ता राक्षसस्त्रियः ।
तूष्णीं आसन् तत्र तत्र निद्रावशमुपागताः ॥ ५५ ॥
त्रिजटेचे वचन ऐकल्यावर, भ्यालेल्या त्या राक्षस स्त्रिया गप्प बसल्या आणि हळू हळू झोपी गेल्या. (५५)

तर्जिता राक्षसीभिः सा सीता भीतातिविह्वला ।
त्रातारं नाधिगच्छन्ती दुःखेन परिमूर्च्छिता ॥ ५६ ॥
राक्षसींच्या भिवविण्यामुळे भ्यालेली सीता अतिशय विव्हल झाली. आपले रक्षण करणारा येथे कोणी नाही असे वाटून अतिशय दुःखाने ती मूर्च्छित पडली. (५६)

अश्रुभिः पूर्णनयना चिन्तयन्तीदमब्रवीत् ।
प्रभाते भक्षयिष्यन्ति राक्षस्यो मां न संशयः ।
इदानीमेव मरणं केनोपायेन मे भवेत् ॥ ५७ ॥
मग शुद्धीवर आल्यावर अश्रूंनी डोळे भरलेली आणि चिंता करणारी ती असे म्हणाली, "सकाळी या राक्षसी मला खाऊन टाकतील, यात संशय नाही. तेव्हा कोणत्या उपायाने मला आत्ताच मरण येईल बरे ?" (५७)

एवं सुदुःखेन परिप्लुता सा
    विमुक्तकण्ठ रुदती चिराय ।
आलम्ब्य शाखां कृतनिश्चया मृतौ
    न जानाती कश्चिदुपायनङ्‌गना ॥ ५८ ॥
अशा प्रकारे तिने जरी मरणाचा निश्चय केला होता, तरी त्यासाठी कोणताही उपाय न सापडल्याने ती सुंदरी वृक्षाची फांदी पकडून अतिशय दुःखाने बराच काळ मुक्त कंठाने रडत राहिली.. (५८)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
सुन्दरकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे सुंदरकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥


[ येथे २३ व्या श्लोकापासून २८ व्या श्लोकापर्यंत रावणाने अध्याहृतपणाने निंदेच्या मिषाने भगवान रामांची स्तुती केली आहे. तिचे तात्पर्य असे आहे - राम आपल्या भावासह वनवासी तपस्वी लोकांमध्ये राहात आहे. त्यांतील काही तपस्व्यांना तो कधी ध्यान धारणा इत्यादींच्या द्वारा दिसून येतो, तर कधी तो ध्यान धारणा करूनही दिसून येत नाही (२३). त्याचा साक्षात्कार करून घेण्यास मी अनेकदा माझी इंद्रिये त्याच्या ठिकाणी लावली होती; परंतु खूप प्रयत्न करूनसुद्धा मला साक्षात्कार कधीच झाला नाही. (२४)
(तू साक्षात् योगमाया आहेस; परब्रह्म रामाबरोबर तुझा सदा सहवास आहे, आणि त्याच्याशी तुझे तादात्म्य सुद्धा आहे. परंतु) तो मात्र सदा निःस्पृह आणि असंग असतो; उदासीन असतो. (२५). निःस्पृह आणि असंग असल्याने, त्या परब्रह्मरूप रामाला मायारूपी तुझ्याकडून कधीही बंधन येत नाही आणि तुझ्या - मायेच्या - गुणांत अथवा भोगांत तो अडकत नाही. (२६)
सांख्यमताचे लोक त्याला उपचाराने भोक्ता असेही म्हणतात. तथापि त्यांच्या मतानुसार 'जहात्येनां मुक्तभोगामजोऽन्यः' या श्रुतीला अनुसरून तो 'मी भोक्ता आहे' असा अभिमान धारण करीत नाही. अशा प्रकारे तो कृतघ्न (केलेल्या कर्माचा नाश करणारा), निर्गुण (सत्त्व, रज, व तम या तीन गुणांनी रहित) आणि अधम (जो धमत नाही म्हणजे शब्दांचा विषय होत नाही म्हणजे अशब्द असासुद्धा आहे. (२७)
त्याची मायेवर प्रीती नाही; म्हणून तो आत्तापर्यंत आला नाही. याचेद्वारा रावण स्वतः म्हणतो की अजूनसुद्धा राम माझ्या हृदयात येत नाही; कारण मी भक्तिहीन असल्याने माझे हृदय त्याच्यापर्यंत कसे बरे पोचेल ? तो निर्गुण, ममतारहित, अमानी, मूढ (म् = शिव + उ = ब्रह्मदेव, ताभ्यां ऊढः ध्यानविषयाप्रत नेलेला म्हणजे शिव आणि ब्रह्मदेव यांना ध्येय म्हणून असणारा आणि विद्वानांकडून सन्मानित असा आहे. (२८)
आणखी असे की नराधम (नराः अधमाः यस्मात् स नराधमः) म्हणजे ज्याच्यापेक्षा माणसे अधम आहेत म्हणजे पुरुषोत्तम. विमुख याचा अर्थ मायेला पराङ्‌मुख. ]

GO TOP