[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ षष्ठः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
हनुमता रावणस्यान्येषां च रक्षसां गृहेषु सीताया अनुसन्धानम् -
हनुमन्ताचे रावण तथा अन्यान्य राक्षसांच्या घरान्तून सीतेचा शोध घेणे -
स निकामं विमानेषु विषण्णः कामरूपधृक् ।
विचचार कपिर्लङ्‌कां लाघवेन समन्वितः ॥ १ ॥
नन्तर मनाप्रमाणे रूप धारण करणारे ते कपिश्रेष्ठ हनुमान अत्यन्त शीघ्रतेने लंकेच्या सात मजली हवेल्यान्तून यथेच्छ विचरण करू लागले. ॥१॥
आससादाथ लक्ष्मीवान् राक्षसेन्द्रनिवेशनम् ।
प्राकारेणार्कवर्णेन भास्वरेणाभिसंवृतम् ॥ २ ॥
हिंडता हिंडता ते बळ-वैभवाने संपन्न हनुमान, चारीबाजूने सूर्याप्रमाणे चमचमणार्‍या सुवर्णाच्या कोट्‍यांनी परिवेष्टित राक्षसाधिपती रावणाच्या महालात येऊन पोहोचले. ॥२॥
रक्षितं राक्षसैर्भीमैः सिंहैरिव महद् वनम् ।
समीक्षमाणो भवनं चकाशे कपिकुञ्जरः ॥ ३ ॥
सिंहानी रक्षण केलेल्या महावनाप्रमाणे अनेक भयानक राक्षस रावणाच्या त्या महालाचे रक्षण करीत होते. त्या भवनाचे निरीक्षण करतांना कपिकुञ्जर हनुमान मनान्तल्या मनात आनन्दाचा अनुभव करू लागले. ॥३॥
रूप्यकोपहितैश्चित्रैर्तोरणैर्हेमभूषणैः ।
विचित्राभिश्च कक्ष्याभिर्द्वारैश्च रुचिरैर्वृतम् ॥ ४ ॥
तो महाल चान्दीनी मढविलेल्या चित्रांनी, सोन्यानी मढविलेल्या दरवाजांनी आणि अत्यन्त अद्‍भुत तोरणांनी, पायर्‍यांनी आणि सुन्दर द्वारांनी युक्त होता. ॥४॥
गजास्थितैर्महामात्रैः शूरैश्च विगतश्रमैः ।
उपस्थितमसंहार्यैर्हयैः स्यन्दनयायिभिः ॥ ५ ॥
गजारूढ झालेले माहुत आणि कधीही थकवा न येणारे शूर आणि अप्रतिहत गति असलेले रथवाहक अश्वही तेथे उपस्थित होते. ॥५॥
सिंहव्याघ्रतनुत्राणैर्दान्तकाञ्चनराजतीः ।
घोषवद्‌भिर्विचित्रैश्च सदा विचरितं रथैः ॥ ६ ॥
सिंह आणि व्याघ्र यांच्या चर्मांनी आच्छादित घंटांच्या योगाने मधुर ध्वनी होत असलेले, आणि हस्तिदन्ताची, सोन्याची आणि रूप्याची चित्रे धारण करणारे नाना प्रकारचे रथ त्या रावणाच्या भवनात सदा ये-जा करीत होते.॥ ६॥
बहुरत्‍नासमाकीर्णं परार्ध्यासनभूषितम् ।
महारथसमावापं महारथमहासनम् ॥ ७ ॥
असंख्य रत्‍नांनी ते गृह व्याप्त झाले होते. बहुमूल्य आसनांनी ते भूषित झाले होते. त्याच्या सर्व बाजूस मोठ मोठ्‍या रथशाळा बान्धलेल्या होत्या आणि अनेक महारथींच्या आवाजाने ते दुमदुमत होते. (महारथी तेथे वास्तव्य करीत होते) ॥७॥
दृश्यैश्च परमोदारैः तैस्तैश्च मृगपक्षिभिः ।
विविधैर्बहुसाहस्रैः परिपूर्णं समन्ततः ॥ ८ ॥
दर्शनीय आणि परम सुन्दर नाना प्रकारच्या हजारो पशुपक्ष्यांनी ते सर्व बाजूनी गजबजलेले होते. ॥८॥
विनीतैरन्तपालैश्च रक्षोभिश्च सुरक्षितम् ।
मुख्याभिश्च वरस्त्रीभिः परिपूर्णं समन्ततः ॥ ९ ॥
सीमांचे रक्षण करणारे विनयशील राक्षस त्या भुवनाचे रक्षण करीत होते. ते भवन सर्व बाजूनी मुख्य मुख्य सुन्दर स्त्रियांनी व्याप्त झाले होते. ॥९॥
मुदितप्रमदारत्‍नं राक्षसेन्द्रनिवेशनम् ।
वराभरणसंह्रादैः समुद्रस्वननिःस्वनम् ॥ १० ॥
तेथील स्त्री रत्‍नरूपी रमणीय युवती सदा प्रसन्न रहात होत्या. सुन्दर आभूषणांच्या झंकारानी राक्षसराजाचा तो महाल समुद्राच्या कलकल नादाप्रमाणे मुखरित झाला होता. ॥१०॥
तद् राजगुणसम्पन्नं मुख्यैश्च वरचन्दनैः ।
महाजनसमाकीर्णं सिंहैरिव महद् वनम् ॥ ११ ॥
ते भुवन राजोचित सामग्रीने परिपूर्ण होते. श्रेष्ठ अगुरू चन्दनानी चर्चित होते आणि सिंहानी भरलेल्या विशाल वनाप्रमाणे महाजनांनी (श्रेष्ठ पुरूषांनी) परिपूर्ण होते. ॥११॥
भेरीमृदङ्‌गाभिरुतं शङ्‌खघोषविनादितम् ।
नित्यार्चितं पर्वसुतं पूजितं राक्षसैः सदा ॥ १२ ॥
तेथे भेरीमृदुंगाचा ध्वनी सर्वत्र भरून राहिला होता. तसेच शंखाचा ध्वनीही गुञ्जत होता. त्याची नित्य पूजा आणि सजावट केली जात होती आणि पर्वकाळी तेथे होम केला जात होता. राक्षसलोक सदाच त्या राजभवनाची पूजा करीत असत. ॥१२॥
समुद्रमिव गम्भीरं समुद्रसमनिःस्वनम् ।
महात्मनो महद् वेश्म महारत्‍नपरिच्छदम् ॥ १३ ॥
ते समुद्राप्रमाणेच गंभीर आणि समुद्राप्रमाणेच कोलाहलपूर्ण होते. महात्मा रावणाचे ते विशाल भुवन महान रत्‍नजडित आभूषणांनी अलंकृत होते. ॥१३॥
महारत्‍नोसमाकीर्णं ददर्श स महाकपिः ।
विराजमानं वपुषा गजाश्वरथसंकुलम् ॥ १४ ॥
ते हत्ती, घोडे आणि रथ यांनी व्याप्त होते तथा महान रत्‍नांनी जडलेले असल्याने आपल्या स्वरूपाने प्रकाशित होत होते. असे ते भुवन महाकपि हनुमानांनी पाहिले. ॥१४॥
लङ्‌काभरणमित्येव सोऽमन्यत महाकपिः ।
चचार हनुमांस्तत्र रावणस्य समीपतः ॥ १५ ॥
ते पाहिल्यावर कपिश्रेष्ठ हनुमानास ते भुवन जणु लंकेचा अलङ्‌कार असेच भासले. नन्तर हनुमान रावणाच्या भवनाच्या आसपासच संचार करू लागले. ॥१५॥
गृहाद् गृहं राक्षसानामुद्यानानि च सर्वशः ।
वीक्षमाणोऽप्यसन्त्रस्तः प्रासादांश्च चचार सः ॥ १६ ॥
या प्रकारे ते एका घरावरून दुसर्‍या घरान्त जाऊन राक्षसांच्या उद्यानादि सर्व स्थानांना बघत बघत निर्भयपणे अट्‍टालिकांवर संचार करू लागले. ॥१६॥
अवप्लुत्य महावेगः प्रहस्तस्य निवेशनम् ।
ततोऽन्यत् पुप्लुवे वेश्म महापार्श्वस्य वीर्यवान् ॥ १७ ॥
महान वेगवान्‌ आणि पराक्रमी वीर हनुमान तेथून उडी मारून प्रथम प्रहस्तांचे घरान्त उतरले आणि तेथून उडी मारून महापार्श्वाच्या महालात जाऊन पोहोचले. ॥१७॥
अथ मेघप्रतीकाशं कुम्भकर्णनिवेशनम् ।
विभीषणस्य च तथा पुप्लुवे स महाकपिः ॥ १८ ॥
त्यानन्तर महाकपि हनुमान मेघाप्रमाणे प्रतीत होणार्‍या कुंभकर्णाच्या भुवनात आणि तेथून त्यावेळीच त्यांनी विभीषणाच्या घरावर उड्‍डाण केले. ॥१८॥
महोदरस्य च तथा विरूपाक्षस्य चैव हि ।
विद्युज्जिह्वस्य भवनं विद्युन्मालेस्तथैव च ॥ १९ ॥
त्यानन्तर हनुमान क्रमशः महोदर, विरूपाक्ष, विद्युज्जिह्व तसेच विद्युन्माळी यांच्या घरान्त गेले. ॥१९॥
वज्रदंष्ट्रस्य च तथा पुप्लुवे स महाकपिः ।
शुकस्य च महावेगः सारणस्य च धीमतः ॥ २० ॥
आणि त्या वेगवान्‌ महाकपिनी परत उडी मारली आणि यूथपति असे बुद्धिमान्‌ कपि वज्रदंष्ट्र, शुक, सारण यांच्या घरान्त गेले. ॥२०॥
तथा चेन्द्रजितो वेश्म जगाम हरियूथपः ।
जम्बुमालेः सुमालेश्च जगाम हरिसत्तमः ॥ २१ ॥
आणि तेथून ते वानर यूथपति कपिश्रेष्ठ इन्द्रजिताच्या घरात गेले आणि जमुमाळी तसेच सुमाळीच्या घरान्तही गेले. ॥२१॥
रश्मिकेतोश्च भवनं सूर्यशत्रोस्तथैव च ।
वज्रकायस्य च तथा पुप्लुवे स महाकपिः ॥ २२ ॥
व नन्तर रश्मीकेतु, सूर्यशत्रू यांच्या घरात जाऊन पोहोंचले. नन्तर वज्रकाय याच्या घरात प्रवेश केला. ॥२२॥
धूम्राक्षस्याथ च सम्पातेर्भवनं मारुतात्मजः ।
विद्युद्‌रूपस्य भीमस्य घनस्य विघनस्य च ॥ २३ ॥

शुकनासस्य चक्रस्य शठस्य विकटस्य च ।
ह्रस्वकर्णस्य दंष्ट्रस्य लोमशस्य च रक्षसः ॥ २४ ॥

युद्धोन्मत्तस्य मत्तस्य ध्वजग्रीवस्य सादिनः ।
विद्युज्जिह्वद्‌विजिह्वानां तथा हस्तिमुखस्य च ॥ २५ ॥

करालस्य पिशाचस्य शोणिताक्षस्य चैव हि ।
प्लवमानः क्रमेणैव हनुमान् मारुतात्मजः ॥ २६ ॥

तेषु तेषु महार्हेषु भवनेषु महायशाः ।
तेषां ऋद्धिमतामृद्धिं ददर्श स महाकपिः ॥ २७ ॥
आणि क्रमशः धूमाक्ष, संपाति, विद्युतरूप, भीम, घन, विघन, शुकनाभ, चक्र, शठ, कपट, ह्रस्वकर्ण, दंष्ट्र, लोमश इत्यादि राक्षसांच्या घरान्त प्रवेश केला. नन्तर ते युद्धोन्मत्त, मत्त, ध्वजग्रीव, विद्युज्जिह्व, द्विजिह्व, हस्तिमुख, कराळ, पिशाच आणि शोणिताक्ष इत्यादिंच्या महालात गेले. या प्रकारे ते महायशस्वी पवनपुत्र हनुमान उड्‍या मारीत क्रमशः त्या त्या बहुमूल्य भवनात गेले. तेथे त्या महाकपिंनी त्या समृद्धशाली राक्षसांची समृद्धि पाहिली. ॥२३-२७॥
सर्वेषां समतिक्रम्य भवनानि समन्ततः ।
आससादाथ लक्ष्मीवान् राक्षसेन्द्रनिवेशनम् ॥ २८ ॥
त्यानन्तर बळ-वैभवाने संपन्न हनुमान त्या सर्व भुवनांना ओलांडून पुन्हा राक्षसाधिपति रावणाच्या महालात येऊन पोहोचले. ॥२८॥
रावणस्योपशायिन्यो ददर्श हरिसत्तमः ।
विचरन् हरिशार्दूलो राक्षसीर्विकृतेक्षणाः ॥ २९ ॥
तेथे विचरण करीत असता वानरराज आणि कपिश्रेष्ठ हनुमानानी विकृत मुद्रांनी युक्त आणि ज्यांचे डोळे अत्यन्त विकराळ होते अशा राक्षसस्त्रिया रावणाच्या शयनस्थानाचे रक्षण करीत असलेल्या अवलोकन केल्या. ॥२९॥
शूलमुद्‌गरहस्तांश्च शक्तितोमरधारिणः ।
ददर्श विविधान्गुल्मान् तस्य रक्षःपतेर्गृहे ॥ ३० ॥
त्याच प्रमाणे त्यांनी त्या राक्षसराजाच्या भुवनात शूळ, मुद्‍गर, शक्ति आणि तोमर ही आयुधे धारण करणारे नाना प्रकारचे दुसरेही राक्षसींचे समुदाय पाहिले. ॥३०॥
राक्षसांश्च महाकायान् नानाप्रहरणोद्यतान् ।
रक्ताञ्श्वेतान् सितांश्चापि हरींश्चापि महाजवान् ॥ ३१ ॥
याखेरीज तेथे नाना प्रकारच्या आयुधांनी सुसज्ज असे अनेक विशाल देहधारी राक्षसही त्यांस दिसून आले. इतकेच नव्हे तर तेथे आरक्तवर्ण, श्वेतवर्ण आणि पांढर्‍या रंगाचे अनेक अत्यन्त वेगवान्‌ घोडेही होते. ॥३१॥
कुलीनान् रूपसंपन्नान् गजान् परगजारुजान् ।
शिक्षितान् गजशिक्षायामैरावतसमान् युधि ॥ ३२ ॥

निहन्तॄन् परसैन्यानां गृहे तस्मिन् ददर्श सः ।
क्षरतश्च यथा मेघान् स्रवतश्च यथा गिरीन् ॥ ३३ ॥

मेघस्तनितनिर्घोषान् दुर्धर्षान् समरे परैः ।
तसेच शत्रुसेनेतील हत्तींना मारून पिटाळून लावणारे, कुलीन आणि रूपसंपन्न हत्तीही तेथे होते. ते सर्वच्या सर्व गजशिक्षेमध्ये शिकविलेले, युद्धात ऐरावतासमान पराक्रमी आणि शत्रू सैन्याचा संहार करण्यास समर्थ असे तेथे त्यांनी पाहिले. (त्यांचा गंडस्थळातून मदस्त्राव चालला असे) ते वृष्टि करणार्‍या मेघांप्रमाणे अथवा जलधारांनी (स्त्रोतांनी) युक्त पर्वताप्रमाणे दिसत होते. त्यांची गर्जना मेघ गर्जनेप्रमाणे वाटत होती, ते समरांगणात शत्रुंना दुर्जय होते. ॥३२-३३ १/२॥
सहस्रं वाहिनीस्तत्र जाम्बूनदपरिष्कृताः ॥ ३४ ॥

हेमजालौरविच्छिन्नास्तरुणादित्यसंनिभाः ।
ददर्श राक्षसेन्द्रस्य रावणस्य निवेशने ॥ ३५ ॥
राक्षसराज रावणाच्या त्या महालात त्याने जाम्बूनद सुवर्णच्या अलङ्‌कारांनी विभूषित अशी हजारो सेना पाहिली. त्यांने पाहिले की त्यांचे सर्वांग सोन्याच्या अलङ्‌कारांनी झाकले गेले होते आणि ते प्रातःकालीन सूर्याप्रमाणे उज्ज्वल दिसत होते. ॥३४-३५॥
शिबिका विविधाकाराः स कपिर्मारुतात्मजः ।
लतागृहाणि चित्राणि चित्रशालागृहाणि च ॥ ३६ ॥

क्रीडागृहाणि चान्यानि दारुपर्वतकानि च ।
कामस्य गृहकं रम्यं दिवागृहकमेव च ॥ ३७ ॥

ददर्श राक्षसेन्द्रस्य रावणस्य निवेशने ।
राक्षसराज रावणाच्या त्या भुवनात विविध आकाराच्या शिबिका तसेच विचित्र लतागृहे, चित्रशाळा, क्रीडा-भुवने, काष्ठमय क्रीडापर्वत, रमणीय विलासगृहे आणि दिवसा उपयोगी पडणारी विलास भुवनेही पवनपुत्र हनुमानांनी पाहिली. ॥३६-३७ १/२॥
स मन्दरसमप्रख्यं मयूरस्थानसंकुलम् ॥ ३८ ॥

ध्वजयष्टिभिराकीर्णं ददर्श भवनोत्तमम् ।
अनन्तरत्‍ननिचयं निधिजालं समन्तत ।
धीरनिष्ठितकर्माङ्‌गं गृहं भूतपतेरिव ॥ ३९ ॥
त्यांनी तो महाल मन्दराचलाप्रमाणे उंच, क्रीडा-मयूरांच्या निवासस्थानी युक्त, ध्वजांनी व्याप्त, अनन्त रत्‍नांचे भांडारच, आणि सर्वबाजूनी निधिनी भरलेला आहे असे पाहिले. त्यात धीर पुण्यवान पुरूषांनी निधिरक्षणासाठी उपयुक्त कर्मांगाचे अनुष्ठान केलेले होते आणि तो साक्षात भूतनाथा (महेश्वर अथवा कुबेरा)चेच भुवन असल्याप्रमाणे भासत होता. ॥३८-३९॥
अर्चिर्भिश्चापि रत्‍नानां तेजसा रावणस्य च ।
विरराज च तद् वेश्म रश्मिमानिव रश्मिभिः ॥ ४० ॥
रत्‍नांची किरणे आणि रावणाचे तेज यामुळे किरणांनी युक्त अशा सूर्याप्रमाणे ते घर झगमगत होते. ॥४०॥
जाम्बूनदमयान्येव शयनान्यासनानि च ।
भाजनानि च मुख्यानि ददर्श हरियूथपः ॥ ४१ ॥
तेथील पलंग शय्या, आसने आणि स्वच्छ पात्रेही अत्यन्त उज्ज्वल आणि जाम्बूनाद सुवर्णाची बनविलेली आहेत असे त्या वानरयूथपती हनुमानांनी पाहिले. ॥४१॥
मध्वासवकृतक्लेदं मणिभाजनसङ्‌कुलम् ।
मनोरममसम्बाधं कुबेरभवनं यथा ॥ ४२ ॥

नूपुराणां च घोषेण काञ्चीनां निःस्वनेन च ।
मृदङ्‌गतलनिर्घोषैर्घोषवद्‌भिर्विनादितम् ॥ ४३ ॥
त्यात मधु आणि आसवे सांडल्यामुळे तेथील भूमी आद्र झाली होती. मणिमय पात्रांनी भरलेला तो विस्तृत महाल कुबेराच्या भुवनाप्रमाणे मनोरम वाटत होता. नुपूरांचा झंकार, हातान्तील कंकणाचा खणखणाट यांनी तो निनादत होता. तसेच मृदुंग, टाळ्यांचा मधुरध्वनी तसेच गंभीर घोष करणार्‍या अन्य वाद्यांनी तो महाल मुखरित झाला होता. त्यात शेकडो अट्‍टालिका होत्या. शेकडो रमणी (स्त्री) रत्‍नांनी तो व्याप्त होता. ॥४२-४३॥
प्रासादसंघातयुतं स्त्रीरत्‍नशतसंकुलम् ।
सुव्यूढकक्ष्यं हनुमान् प्रविवेश महागृहम् ॥ ४४ ॥
त्याच्या गच्च्या खूप मोठमोठ्‍या लांब-रून्द होत्या अशा त्या विशाल भुवनात हनुमन्तांनी प्रवेश केला. ॥४४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा सहावा सर्ग पूरा झाला. ॥६॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP