श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ अष्टाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामेण रावणस्य वधः -
श्रीरामांच्या द्वारा रावणाचा वध -
अथ संस्मारयामास मातली राघवं तदा ।
अजानन्निव किं वीर त्वमेनमनुवर्तसे ।। १ ।।
मातलिने राघवांना काहीशी आठवण करून देत म्हटले - वीरवर ! आपण काही जाणत नसल्याप्रमाणे या राक्षसाचे अनुसरण का बरे करत आहात ? (हा जे अस्त्र चालवत आहे त्याचे निवारण करणार्‍या अस्त्राचाच प्रयोग केवळ करून आपण थांबता आहात.) ॥१॥
विसृजास्मै वधाय त्वं अस्त्रं पैतामहं प्रभो ।
विनाशकालः कथितो यः सुरैः सोऽद्य वर्तत ।। २ ।।
प्रभो ! आपण याच्या वधासाठी ब्रह्मदेवांच्या अस्त्राच्या प्रयोग करावा. देवतांनी याच्या विनाशाचा जो समय सांगितला आहे तो आता येऊन ठेपला आहे. ॥२॥
ततः संस्मारितो रामः तेन वाक्येन मातलेः ।
जग्राह सशरं दीप्तं निःश्वसन्तमिवोरगम् ।। ३ ।।
मातलिच्या या वाक्याने श्रीरामांना त्या अस्त्राचे स्मरण झाले. नंतर तर त्यांनी फुस्कारणार्‍या सर्पासमान एक तेजस्वी बाण हातात घेतला. ॥३॥
यमस्मै प्रथमं प्रादाद् अगस्त्यो भगवान् ऋषिः ।
ब्रह्मदत्तं महाबाणं अमोघं युधि वीर्यवान् ।। ४ ।।
हा तोच बाण होता, जो पूर्वी शक्तिशाली भगवान्‌ अगत्स्य ऋषिंनी रघुनाथास दिला होता. तो विशाल बाण ब्रह्मदेवांनी दिलेला होता आणि युद्धात अमोघ होता. ॥४॥
ब्रह्मणा निर्मितं पूर्वं इन्द्रार्थममितौजसा ।
दत्तं सुरपतेः पूर्वं त्रिलोकजयकाङ्‌क्षिणः ।। ५ ।।
अमित तेजस्वी ब्रह्मदेवांनी पूर्वी इंद्रासाठी तो बाण निर्माण केला होता. आणि तीन्ही लोकांवर विजय मिळविण्याची इच्छा ठेवणार्‍या देवेंद्रालाच पूर्वकाळी तो अर्पित केला होता. ॥५॥
यस्य वाजेषु पवनः फले पावकभास्करौ ।
शरीरमाकाशमयं गौरवे मेरुमन्दरौ ।। ६ ।।
त्या बाणाच्या वेगात वायु, धारेत अग्नि आणि सूर्य, शरीरात आकाशाची तसेच जडपणात मेरू आणि मंदराचलाची प्रतिष्ठा केलेली होती. ॥६॥
जाज्वल्यमानं वपुषा सुपुङ्‌खं हेमभूषितम् ।
तेजसा सर्वभूतानां कृतं भास्करवर्चसम् ।। ७ ।।

सधूममिव कालाग्निं दीप्तमाशीविषोपमम् ।
परनागाश्ववृन्दानां भेदनं क्षिप्रकारिणम् ।। ८ ।।
तो संपूर्ण भूतांच्या तेजापासून बनविला गेला होता. त्यापासून सूर्यासमान ज्योति निघत होत्या. तो सुवर्णाने विभूषित, सुंदर पंखांनी युक्त, स्वरूपाने जाज्वल्यमान, प्रलयकालच्या धूमयुक्त अग्निसमान भयंकर, दीप्तिमान्‌, विषधर सर्पाप्रमाणे विषारी, मनुष्य, हत्ती आणि घोड्‍यांना विदीर्ण करून टाकणारा तसेच शीघ्रतापूर्वक लक्ष्याचा भेद करणारा होता. ॥७-८॥
द्वाराणां परिघाणां च गिरीणां चापि भेदनम् ।
नानारुधिरदिग्धाङ्‌गं मेदोदिग्धं सुदारुणम् ।। ९ ।।

वज्रसारं महानादं नानासमितिदारणम् ।
सर्ववित्रासनं भीमं श्वसन्तमिव पन्नगम् ।। १० ।।

कङ्‌कगृध्रबकानां च गोमायुगणरक्षसाम् ।
नित्यं भक्ष्यप्रदं युद्धे यमरूपं भयावहम् ।। ११ ।।
मोठ मोठे दरवाजे, परिघ आणि पर्वतांनाही तोडून फोडून टाकण्याची शक्ति त्याच्यात होती. त्याचे सारे शरीर नाना प्रकारच्या रक्तात न्हायलेले आणि चरबीने परिपुष्ट झालेले होते. दिसण्यात ही तो फार भयंकर होता. वज्रासमान कठोर महान्‌ शब्दांनी युक्त, अनेकानेक युद्धात शत्रूसेनेला विदीर्ण करणारा, सर्वांना त्रास देणारा तसेच फुसकाणार्‍या सर्पासमान भयंकर होता. युद्धात तो यमराजाचे भयावह रूप धारण करत असे. समरभूमीमध्ये कावळे, गिधाडे, बगळे, कोल्हे आणि पिशाच्चांना तो सदा भक्ष्य प्रदान करत असे. ॥९-११॥
नन्दनं वानरेन्द्राणां रक्षसामवसादनम् ।
वाजितं विविधैर्वाजैः चारुचित्रैर्गरुत्मतः ।। १२ ।।
तो सायक वानर-यूथपतिंना आनंद देणारा तसेच राक्षसांना दुःखात पाडणारा होता. गरूडाचे सुंदर विचित्र आणि नाना प्रकारचे पंख लागून त्याला पंखयुक्त बनविलेले होते. ॥१२॥
तमुत्तमेषुं लोकानां इक्ष्वाकुभयनाशनम् ।
द्विषतां कीर्तिहरणं प्रहर्षकरमात्मनः ।। १३ ।।

अभिमन्त्र्य ततो रामः तं महेषुं महाबलः ।
वेदप्रोक्तेन विधिना सन्दधे कार्मुके बली ।। १४ ।।
तो उत्तम बाण समस्त लोकांसाठी आणि इक्ष्वाकु-कुलवंशियासाठी भयनाशक होता. शत्रूच्या कीर्तिचे अपहरण तसेच आपल्या हर्षाची वृद्धि करणारा होता. तो महान्‌ सायक वेदोक्त विधिने अभिमंत्रित करून महाबली श्रीरामांनी आपल्या धनुष्यावर ठेवला. ॥१३-१४॥
तस्मिन् सन्धीयमाने तु राघवेण शरोत्तमे ।
सर्वभूतानि वित्रेसुः चचाल च वसुन्धरा ।। १५ ।।
श्रीराघव जेव्हा त्या उत्तम बाणाचे संधान करू लागले तेव्हा संपूर्ण प्राण्यांचा थरकाप उडाला आणि वसुंधरा डोलू लागली. ॥१५॥
स रावणाय सङ्‌क्रुद्धो भृशमायम्य कार्मुकम् ।
चिक्षेप परमायत्तः शरं मर्मविदारणम् ।। १६ ।।
श्रीरामांनी अत्यंत कुपित होऊन मोठ्‍या यत्‍नाने धनुष्याला पूर्णरूपाने खेचले आणि तो मर्मभेदी बाण रावणावर सोडला. ॥१६॥
स वज्र इव दुर्धर्षो वज्रिबाहुविसर्जितः ।
कृतान्त इव चावार्यो न्यपतद् रावणोरसि ।। १७ ।।
वज्रधारी इंद्रांच्या हातून सुटलेल्या वज्रासमान दुर्धर्ष आणि काळाप्रमाणे अनिवार्य तो बाण रावणाच्या छातीवर जाऊन लागला. ॥१७॥
स विसृष्टो महावेगः शरीरान्तकरः शरः ।
बिभेद हृदयं तस्य रावणस्य दुरात्मनः ।। १८ ।।
शरीराचा अंत करणार्‍या त्या महान्‌ वेगशाली श्रेष्ठ बाणाने सुटतांच दुरात्मा रावणाचे हृदय विदीर्ण करून टाकले. ॥१८॥
रुधिराक्तः स वेगेन शरीरान्तकरः परः ।
रावणस्य हरन् प्राणान् विवेश धरणीतलम् ।। १९ ।।
शरीराचा अंत करून रावणाचे प्राण हरण करणारा तो बाण रक्ताने रंगून वेगपूर्वक पृथ्वीमध्ये समाविष्ट झाला. ॥१९॥
स शरो रावणं हत्वा रुधिरार्द्रकृतच्छविः ।
कृतकर्मा निभृतवत् स्वतूणीं पुनराविशत् ।। २० ।।
याप्रकारे रावणाचा वध करून रक्ताने रंगलेला तो शोभाशाली बाण आपले काम पूर्ण करून नंतर पुन्हा विनीत सेवकांप्रमाणे श्रीरामांच्या भात्यात परत आला. ॥२०॥
तस्य हस्ताद् हतस्याशु कार्मुकं तत् ससायकम् ।
निपपात सह प्राणैः भ्रश्यमानस्य जीवितात् ।। २१ ।।
श्रीरामांच्या बाणांच्या आघाताने रावण जीवितास मुकला. त्याचे प्राण निघून जाण्याबरोबरच सायकासहित त्याचे धनुष्यही त्याच्या हातातून सुटून खाली जमिनीवर) जाऊन पडले. ॥२१॥
गतासुर्भीमवेगस्तु नैर्ऋतेन्द्रो महाद्युतिः ।
पपात स्यन्दनाद् भूमौ वृत्रो वज्रहतो यथा ।। २२ ।।
तो भयानक वेगशाली महातेजस्वी राक्षसराज प्राणहीन होऊन वज्रांनी मारल्या गेलेल्या वृत्रासुराप्रमाणे रथांतून पृथ्वीवर पडला. ॥२२॥
तं दृष्ट्‍वा पतितं भूमौ हतशेषा निशाचराः ।
हतनाथा भयत्रस्ताः सर्वतः सम्प्रदुद्रुवुः ।। २३ ।।
रावण पृथ्वीवर पडला हे पाहून मरणापासून वाचलेले संपूर्ण निशाचर, स्वामी मारला गेल्याने भयभीत होऊन सर्व दिशांना पळून गेले. ॥२३॥
नर्दन्तश्चाभिपेतुस्तान् वानरा द्रुमयोधिनः ।
दशग्रीववधं दृष्ट्‍वा वानरा जितकशिनः ।। २४ ।।
दशमुख रावणाचा वध झालेला पाहून विजयाने सुशोभित होणारे वानर, जे वृक्षांच्या द्वारे युद्ध करणारे होते, गर्जना करीत त्या राक्षसांवर तुटून पडले. ॥२४॥
अर्दिता वानरैर्हृष्टैः लङ्‌कामभ्यपतन् भयात् ।
गताश्रयत्वात् करुणैः बाष्पप्रस्रवणैर्मुखैः ।। २५ ।।
त्या हर्षोल्लासित वानरांच्या द्वारा पीडित केले गेल्यावर ते राक्षस भयामुळे लंकेकडे पळून गेले कारण त्यांचा आश्रय नष्ट झाला होता. त्यांच्या मुखावरून करूणायुक्त अश्रुंच्या धारा वहात होत्या. ॥२५॥
ततो विनेदुः संहृष्टा वानरा जितकाशिनः ।
वदन्तो राघवजयं रावणस्य च तद्वधम् ।। २६ ।।
त्या समयी वानर विजय-लक्ष्मीने सुशोभित होऊन अत्यंत हर्ष आणि उत्साहाने भरून गेले. तसेच राघवांचा जय आणि रावणाचा वध यांची घोषणा करीत मोठ मोठ्‍याने गर्जना करू लागले. ॥२६॥
अथान्तरिक्षे व्यनदत् सौम्यस्त्रिदशदुन्दुभिः ।
दिव्यगन्धवहस्तत्र मारुतः ससुखो ववौ ।। २७ ।।
त्यासमयी आकाशात मधुर स्वरांनी देवतांच्या दुन्दुभी वाजू लागल्या. वायु दिव्य सुगंध पसरवीत मंद मंद गतिने प्रवाहित होऊ लागला. ॥२७॥
निपपातान्तरिक्षाच्च पुष्पवृष्टिस्तदा भुवि ।
किरन्ती राघवरथं दुरवापा मनोरमा ।। २८ ।।
अंतरिक्षातून भूतलावर राघवांच्या रथावर फुलांची वृष्टि होऊ लागली, जी दुर्लभ तसेच मनोहर होती. ॥२८॥
राघवस्तवसंयुक्ता गगने च विशुश्रुवे ।
साधुसाध्विति वागग्र्या दैवतानां महात्मनाम् ।। २९ ।।
आकाशात महामना देवतांच्या मुखाने निघालेली राघवांचे स्तवनांनी युक्त साधुवादाची श्रेष्ठ वाणी ऐकू येऊ लागली. ॥२९॥
आविवेश महान् हर्षो देवानां चारणैः सह ।
रावणे निहते रौद्रे सर्वलोकभयङ्‌करे ।। ३० ।।
संपूर्ण लोकांना भयभीत करणारा रौद्र राक्षस रावण मारला गेल्याने देवता आणि चारणांना महान्‌ हर्ष झाला. ॥३०॥
ततः सकामं सुग्रीवं अङ्‌गदं च विभीषणम् ।
चकार राघवः प्रीतो हत्वा राक्षसपुङ्‌गवम् ।। ३१ ।।
राघवांनी राक्षसराजाला मारून सुग्रीव, अंगद तसेच विभीषणास सफल मनोरथ केले आणि त्यांना स्वतःलाही फार प्रसन्नता वाटली. ॥३१॥
ततः प्रजग्मुः प्रशमं मरुद्गरणा
दिशः प्रसेदुर्विमलं नभोऽभवत् ।
मही चकम्पे न च मारुतो ववौ
स्थिरप्रभश्चाप्यभवद् दिवाकरः ।। ३२ ।।
त्यानंतर देवतांना फार शांति मिळाली, संपूर्ण दिशा प्रसन्न झाल्या, त्यांच्यात प्रकाश पसरला, आकाश निर्मल झाले, पृथ्वीचे कापणे बंद झाले, वायु स्वाभाविक गतिने वाहू लागला तसेच सूर्याची प्रभाही स्थिर झाली. ॥३२॥
ततस्तु सुग्रीवविभीषणाङ्‌गदाः
सुहृद्विधिष्टाः सहलक्ष्मणास्तदा ।
समेत्य हृष्टा विजयेन राघवं
रणेऽभिरामं विधिनाभ्यपूजयन् ।। ३३ ।।
सुग्रीव, विभीषण, अंगद तसेच लक्ष्मण आपल्या सुहृदांसह युद्धात राघवांच्या विजयाने फार प्रसन्न झाले. यानंतर त्या सर्वांनी मिळून नयनाभिराम श्रीरामांची विधिवत्‌ पूजा केली. ॥३३॥
स तु निहतरिपुः स्थिरप्रतिज्ञः
स्वजनबलाभिवृतो रणे बभूव ।
रघुकुलनृपनन्दनो महौजाः
त्रिदशगणैरभिसंवृतो महेन्द्रः ।। ३४ ।।
शत्रूला मारून आपली प्रतिज्ञा पूर्ण केल्यानंतर स्वजनांसहित सेनेने घेरलेले महातेजस्वी रघुकुळ राजकुमार श्रीराम रणभूमीमध्ये देवतांनी घेरलेल्या इंद्रांप्रमाणे शोभा प्राप्त करू लागले. ॥३४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकादशाधिकशततमः सर्गः ।। १०८ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशे आठावा सर्ग पूरा झाला. ॥१०८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP