श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। अष्टादशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

समागतान् भूपालानृष्यशृङ्गं च विसर्ज्य सपत्‍नीकस्य राज्ञः स्वपूर्यामागमनं श्रीरामभरतलक्ष्मणशत्रुघ्नानां जन्मसंस्कारशीलगुणानां च वर्णनं, राज्ञः सभायां विश्वामित्रस्यागमनं सत्कारश्च - राजे लोक आणि ऋष्यशृङ्‍गांना निरोप देऊन राजा दशरथांचे राण्यांसहित पुरीमधे आगमन, श्रीराम, भरत, लक्ष्मण तथा शत्रुघ्नाचा जन्म, संस्कार, शील, स्वभाव आणि सद्‌गुण, राजाच्या दरबारात विश्वामित्राचे आगमन आणि त्यांचा सत्कार -
निर्वृत्ते तु क्रतौ तस्मिन् हयमेधे महात्मनः ।
प्रतिगृह्यामरा भागान् प्रतिजग्मुर्यथागतम् ॥ १ ॥
महामना राजा दशरथांचा यज्ञ समाप्त झाल्यावर देवता आपापला भाग घेऊन जशा आल्या होत्या त्याप्रकारे परत गेल्या. ॥ १ ॥
समाप्तदीक्षानियमः पत्‍नीगणसमन्वितः ।
प्रविवेश पुरीं राजा सभृत्यबलवाहनः ॥ २ ॥
दीक्षेचे नियम समाप्त झाल्यावर राजे आपल्या पत्‍नींच्यासहित सेवक, सैनिक आणि वाहनांसकट पुरीमध्ये प्रविष्ट झाले. ॥ २ ॥
यथार्हं पूजितास्तेन राज्ञा वै पृथिवीश्वराः ।
मुदिताः प्रययुर्देशान् प्रणम्य मुनिपुङ्‍गवम् ॥ ३ ॥
भिन्न भिन्न देशांचे राजेही (जे त्यांच्या यज्ञात संमिलित होण्यासाठी आलेले होते) महाराज दशरथांच्या द्वारे यथावत् सन्मानित होऊन मुनिवर वसिष्ठ आणि ऋष्यश्रुंग यांना प्रणाम करून प्रसन्नतापूर्वक आपापल्या देशास निघून गेले. ॥ ३ ॥
श्रीमतां गच्छतां तेषां स्वपुराणि पुरात् ततः ।
बलानि राज्ञां शुभ्राणि प्रहृष्टानि चकाशिरे ॥ ४ ॥
अयोध्यापुरीहून आपल्या घरी परत जाणारे त्या श्रीमान् नरेशांचे शुभ्र सैनिक अत्यंत हर्षमग्न झाल्यामुळे फार शोभून दिसत होते. ॥ ४ ॥
गतेषु पृथिवीशेषु राजा दशरथः पुनः ।
प्रविवेश पुरीं श्रीमान् पुरस्कृत्य द्विजोत्तमान् ॥ ५ ॥
सर्व राजांना निरोप दिल्यावर श्रीमान महाराज दशरथांनी श्रेष्ठ ब्राह्मणांना पुढे करून आपल्या पुरीमध्ये प्रवेश केला. ॥ ५ ॥
शान्तया प्रययौ सार्धमृष्यशृङ्‍गः सुपूजितः ।
अनुगम्यमानो राज्ञा च सानुयात्रेण धीमता ॥ ६ ॥
राजाद्वारा अत्यंत सन्मानित होऊन ऋष्यशृंग मुनीही शान्तेसह आपल्या स्थानी निघून गेले. त्यावेळी सेवकांसहित बुद्धिमान महाराज दशरथ काही दूर अंतरापर्यंत त्यांना पोहोंचविण्यासाठी गेले होते. ॥ ६ ॥
एवं विसृज्य तान् सर्वान् राजा सम्पूर्णमानसः ।
उवास सुखितस्तत्र पुत्रोत्पत्तिं विचिन्तयन् ॥ ७ ॥
या प्रकारे सर्व अतिथिंना निरोप देऊन सफल मनोरथ झालेले राजे दशरथ पुत्रोत्पत्तीची प्रतीक्षा करीत मोठ्या सुखाने राहू लागले. ॥ ७ ॥
ततो यज्ञे समाप्ते तु ऋतूनां षट् समत्ययुः ।
ततश्च द्वादशे मासे चैत्रे नावमिके तिथौ ॥ ८ ॥

नक्षत्रेऽदितिदैवत्ये स्वोच्चसंस्थेषु पञ्चसु ।
ग्रहेषु कर्कटे लग्ने वाक्पताविन्दुना सह ॥ ९ ॥

प्रोद्यमाने जगन्नाथं सर्वलोकनमस्कृतम् ।
कौसल्याजनयद् रामं दिव्यलक्षणसंयुतम् ॥ १० ॥

यज्ञ समाप्तिनंतर जेव्हां सहा ऋतु निघून गेले, तेव्हां बाराव्या महिन्यात चैत्राच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसु नक्षत्र आणि कर्क लग्न असता कौसल्यादेवीने दिव्य लक्षणांनी युक्त सर्वलोकवन्दित जगदीश्वर श्रीरामास जन्म दिला. त्यावेळी (सूर्य, मंगळ, शनि, गुरु आणि शुक्र हे) पाच ग्रह आपल्या आपल्या उच्च स्थानी विद्यमान होते, तथा लग्नात चंद्रम्याच्या बरोबर बृहस्पती विराजमान होते. ॥ ८-१० ॥
विष्णोरर्धं महाभागं पुत्रमैक्ष्वाकुनन्दनम् ।
लोहिताक्षं महाबाहुं रक्तोष्ठं दुन्दुभिस्वनम् ॥ ११ ॥
ते विष्णुस्वरूप हविष्य अथवा खीरीच्या अर्ध्या भागापासून प्रकट झाले होते. कौसल्येचे महाभाग्यवान पुत्र इक्ष्वाकु कुलाचा आनंद वाढविणारे होते. त्यांच्या नेत्रात किञ्चित्‌सा लालिमा होता. त्यांचे ओठ लाल, भुजा मोठमोठ्या आणि स्वर दुन्दुभीच्या शब्दासमान गंभीर होता. ॥ ११ ॥
कौसल्या शुशुभे तेन पुत्रेणामिततेजसा ।
यथा वरेण देवानामदितिर्वज्रपाणिना ॥ १२ ॥
त्या अमिततेजस्वी पुत्राच्या योगे महाराणी कौसल्या अत्यंत शोभून दिसत होती. जशी सुरश्रेष्ठ वज्रपाणि इंद्राच्या योगे देवमाता अदिति सुशोभित झाली होती त्याचप्रमाणे. ॥ १२ ॥
भरतो नाम कैकेय्यां जज्ञे सत्यपराक्रमः ।
साक्षाद् विष्णोश्चतुर्भागः सर्वैः समुदितो गुणैः ॥ १३ ॥
तदनंतर कैकेयीपासून सत्यपराक्रमी भरतांचा जन्म झाला, जे साक्षात् भगवान् विष्णुंच्या (स्वरूपभूत पायसाचा) चतुर्थांशाहूनही न्यून भागापासून प्रकट झाले होते. ते समस्त सद्‌गुणांनी संपन्न होते. ॥ १३ ॥
अथ लक्ष्मणशत्रुघ्नौ सुमित्राजनयत् सुतौ ।
वीरौ सर्वास्त्रकुशलौ विष्णोरर्धसमन्वितौ ॥ १४ ॥
त्यानंतर राणी सुमित्रेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न - या दोन पुत्रांना जन्म दिला. ते दोघे वीर साक्षात भगवान विष्णुच्या अर्धा भागाने संपन्न आणि सर्व प्रकारच्या अस्त्र विद्येत कुशल होते. ॥ १४ ॥
पुष्ये जातस्तु भरतो मीनलग्ने प्रसन्‍नधीः ।
सार्पे जातौ तु सौमित्री कुलीरेऽभ्युदिते रवौ ॥ १५ ॥
भरत सदा प्रसन्नचित राहात असत. त्यांचा जन्म पुष्य नक्षत्रावर तथा मीन लग्नावर झाला. सुमित्रेचे दोन्ही पुत्र अश्लेषा नक्षत्र आणि कर्क लग्नावर उत्पन्न झाले होते. त्यावेळी सूर्य आपल्या उच्चस्थानी विराजमान होता. ॥ १५ ॥
राज्ञः पुत्रा महात्मानश्चत्वारो जज्ञिरे पृथक् ।
गुणवन्तोऽनुरूपाश्च रुच्या प्रोष्ठपदोपमाः ॥ १६ ॥
राजा दशरथांचे हे चारी महामनस्वी पुत्र पृथक् पृथक् गुणांनी संपन्न आणि सुंदर होते. ते भाद्रपदा नामक तार्‍यांप्रमाणे कान्तिमान** होते.
[** प्रोष्ठपदा म्हणतात - भाद्रपद नक्षत्राचे दोन दोन भेद आहेत, पूर्व भाद्रपदा आणि उत्तर भारपदा. या दोन्हीमध्ये दोन दोन तारे आहेत. ही गोष्ट ज्योतिष शास्त्रात प्रसिद्ध आहे] ॥ १६ ॥
जगुः कलं च गन्धर्वा ननृतुश्चाप्सरोगणाः ।
देवदुन्दुभयो नेदुः पुष्पवृष्टिश्च खात् पतत् ॥ १७ ॥
त्यांच्या जन्माच्या वेळी गंधर्वांनी मधुर गीत गायिले. अप्सरांनी नृत्य केले. देवतांनी दुन्दुभि वाजविल्या आणि आकाशांतून पुष्पवृष्टी होऊ लागली. ॥ १७ ॥
उत्सवश्च महानासीदयोध्यायां जनाकुलः ।
रथ्याश्च जनसम्बाधा नटनर्तकसङ्‍कुलाः ॥ १८ ॥
अयोध्येत फार मोठा उत्सव झाला. मनुष्यांची खूपच दाटी झाली होती. गल्ल्या आणि रस्ते लोकांनी खचाखच भरले होते. अनेक नट आणि नर्तक आपल्या कलेचे प्रदर्शन करीत होते. ॥ १८ ॥
गायनैश्च विराविण्यो वादनैश्च तथापरैः ।
विरेजुर्विपलास्तत्र सर्वरत्‍‍नसमन्विताः ॥ १९ ॥
तेथे सर्वत्र गाण्या-बजावण्याचे आणि प्रेक्षकांचे शब्द गुंजत राहिले होते. दीन-दुःखी लोकांसाठी लुटली गेलेली सर्व प्रकारची रत्‍ने तेथे जिकडे तिकडे विखुरली गेली होती. ॥ १९ ॥
प्रदेयांश्च ददौ राजा सूतमागधवन्दिनाम् ।
ब्राह्मणेभ्यो ददौ वित्तं गोधनानि सहस्रशः ॥ २० ॥
राजा दशरथांनी सूत, मागध आणि बन्दीजनांना देण्यायोग्य पुरस्कार दिले आणि ब्राह्मणांना धन आणि हजारो गोधन प्रदान केले. ॥ २० ॥
अतीत्यैकादशाहं तु नामकर्म तथाकरोत् ।
ज्येष्ठं रामं महात्मानं भरतं कैकयीसुतम् ॥ २१ ॥

सौमित्रिं लक्ष्मणमिति शत्रुघ्नमपरं तथा ।
वसिष्ठः परमप्रीतो नामानि कुरुते तदा ॥ २२ ॥
अकरा दिवस उलटल्यावर महाराजांनी बालकांचे नामकरण संस्कार केले.++ त्या समयी महर्षि वसिष्ठांनी प्रसन्नतापूर्वक सर्वांची नावे ठेवली. त्यांनी ज्येष्ठ पुत्राचे नाम 'राम' ठेवले. श्रीराम परमात्मा होते. कैकेयीकुमाराचे नाम 'भरत' आणि सुमित्रेच्या एका पुत्राचे नाव 'लक्ष्मण' आणि दुसर्‍याचे नाम 'शत्रुघ्न' निश्चित केले गेले. ॥ २१-२२ ॥
[++ रामायण तिलक टीकाकारांनी मूळातील एकादशाह शब्दाला सुतकाच्या अंतिम दिनाचे उपलक्षण मानले आहे. त्यांचे म्हणणे आहे की जर असे मानले गेले नाही तर 'क्षत्रियस्य द्वादशाहं सूतकम्' - क्षत्रियाला बारा दिवसांचे सूतक लागते - या स्मृतिवाक्याशी विरोध होईल. म्हणून रामजन्मानंतर बारा दिवस गेल्यावर तेराव्या दिवशी राजाने नामकरण संस्कार केला, असे मानले पाहिजे] ॥ २१-२२ ॥
ब्राह्मणान् भोजयामास पौरजानपदानपि ।
अददद् ब्राह्मणानां च रत्‍नौघममलं बहु ॥ २३ ॥
राजाने ब्राह्मण, पुरवासी आणि जनपदवासी, सर्वांना भोजन करविले आणि ब्राह्मणांना खूपच उज्ज्वल रत्‍नसमूहाचे दान दिले. ॥ २३ ॥
तेषां जन्मक्रियादीनि सर्वकर्माण्यकारयत् ।
तेषां केतुरिव ज्येष्ठो रामो रतिकरः पितुः ॥ २४ ॥
महर्षि वसिष्ठांनी वेळोवेळी राजाकडून त्या बालकांचे जातकर्म इत्यादि सर्व संस्कार करविले होते. त्या सर्वांमध्ये श्रीरामचंद्र ज्येष्ठ असून आपल्या कुलाची कीर्तिध्वजा फडकविणार्‍या पताकेसारखे होते. ते आपल्या पित्याच्या प्रसन्नतेची वृद्धि करणारे होते. ॥ २४ ॥
बभूव भूयो भूतानां स्वयम्भूरिव सम्मतः ।
सर्वे वेदविदः शूराः सर्वे लोकहिते रताः ॥ २५ ॥
सर्व भूतमात्रांना ते स्वयंभू ब्रह्मदेवासमान विशेष प्रिय होते. राजाचे सर्व पुत्र वेदांचे विद्वान् आणि शूरवीर होते. सर्वच्या सर्व लोकहितकारी कार्यात संलग्न राहात असत. ॥ २५ ॥
सर्वे ज्ञानोपसम्पन्नाः सर्वे समुदिता गुणैः ।
तेषामपि महातेजा रामः सत्यपराक्रमः ॥ २६ ॥

इष्टः सर्वस्य लोकस्य शशाङ्‍क इव निर्मलः ।
गजस्कन्धेऽश्वपृष्ठे च रथचर्यासु सम्मतः ॥ २७ ॥

धनुर्वेदे च निरतः पितुः शुश्रूषणे रतः ।
सर्व ज्ञानवान आणि समस्त सद्‌गुणांनी संपन्न होते. त्यातही सत्यपराक्रमी श्रीरामचंद्र सर्वांहून अधिक तेजस्वी आणि सर्व लोकांना विशेष प्रिय होते. ते निष्कलंक चंद्रम्याप्रमाणे शोभून दिसत होते. त्यांनी हत्तीच्या खांद्यावर आणि घोड्याच्या पाठीवर बसण्यात आणि रथ हाकण्याच्या कलेतही सन्मानपूर्ण स्थान प्राप्त केले होते. ते सदा धनुर्वेदाचा अभ्यास करीत असत आणि पित्याची सेवा करण्यात तत्पर असत. ॥ २६-२७ १/२ ॥
बाल्यात् प्रभृति सुस्निग्धो लक्ष्मणो लक्ष्मिवर्धनः ॥ २८ ॥

रामस्य लोकरामस्य भ्रातुर्ज्येष्ठस्य नित्यशः ।
सर्वप्रियकरस्तस्य रामस्यापि शरीरतः ॥ २९ ॥
लक्ष्मीची वृद्धि करणारे लक्ष्मण बाल्यावस्थेपासूनच श्रीरामचंद्रांच्या प्रति अत्यंत अनुराग बाळगून होते. ते आपले मोठे बंधु लोकाभिराम श्रीरामांचे सदाच प्रिय करीत असत आणि शरीरानेही त्यांच्या सेवेत सदा गुंतलेले असत. ॥ २८-२९ ॥
लक्ष्मणो लक्ष्मिसम्पन्‍नो बहिःप्राण इवापरः ।
न च तेन विना निद्रां लभते पुरुषोत्तमः ॥ ३० ॥

मृष्टमन्‍नमुपानीतमश्नाति न हि तं विना ।
शोभासंपन्न लक्ष्मण श्रीरामचंद्रासाठी बाहेर विचरणार्‍या दुसर्‍या प्राणासमान होते. पुरुषोत्तम श्रीरामांना त्यांच्या शिवाय झोपही येत नसे. जर त्यांच्याजवळ उत्तम भोजन आणले गेले तर श्रीरामचंद्र त्यांतून लक्ष्मणास दिल्याखेरीज ते खात नसत. ॥ ३० १/२ ॥
यदा हि हयमारूढो मृगयां याति राघवः ॥ ३१ ॥

अथैनं पृष्ठतोऽभ्येति सधनुः परिपालयन् ।
भरतस्यापि शत्रुघ्नो लक्ष्मणावरजो हि सः ॥ ३२ ॥

प्राणैः प्रियतरो नित्यं तस्य चासीत् तथा प्रियः ।
ज्यावेळी श्रीरामचंद्र घोड्यावर बसून शिकार खेळण्यासाठी जात असत त्यावेळी लक्ष्मण धनुष्य घेऊन त्यांच्या शरीराचे रक्षण करीत त्यांच्या मागे मागे जात असत. याच प्रकारे लक्ष्मणाचे लहान बंधु शत्रुघ्न भरतांना प्राणापेक्षा प्रिय होते आणि तेही भरतांना सदा प्राणांपेक्षाही अधिक प्रिय मानत असत. ॥ ३१-३२ १/२ ॥
स चतुर्भिर्महाभागैः पुत्रैर्दशरथः प्रियैः ॥ ३३ ॥
या चार भाग्यशाली पुत्रांमुळे राजा दशरथांना, ज्याप्रमाणे चार देवतांमुळे (दिक्‌पालांमुळे) ब्रह्मदेवांना प्रसन्नता होत असे, तशी अत्यंत प्रसन्नता प्राप्त होत होती. ॥ ३३ ॥
बभूव परमप्रीतो देवैरिव पितामहः ।
ते यदा ज्ञानसम्पन्नाः सर्वे समुदिता गुणैः ॥ ३४ ॥

ह्रीमन्तः कीर्तिमन्तश्च सर्वज्ञा दीर्घदर्शिनः ।
तेषामेवंप्रभावाणां सर्वेषां दीप्ततेजसाम् ॥ ३५ ॥

पिता दशरथो हृष्टो ब्रह्मा लोकाधिपो यथा ।
ती सर्व बालके ज्यावेळी समजूतदार झाली, त्यावेळी समस्त गुणांनी संपन्न झाली. ती सर्व लज्जाशील, यशस्वी आणि दूरदर्शी होती. अशा प्रभावशाली आणि अत्यंत तेजस्वी पुत्रांची प्राप्ति झाल्यामुळे राजा दशरथ लोकेश्वर ब्रह्मदेवाप्रमाणे अत्यंत प्रसन्न होते. ॥ ३४-३५ १/२ ॥
ते चापि मनुजव्याघ्रा वैदिकाध्ययने रताः ॥ ३६ ॥
पितृशुश्रूषणरता धनुर्वेदे च निष्ठिताः ।
ते पुरुषसिंह राजकुमार प्रतिदिन वेदांचा स्वाध्याय, पित्याची सेवा आणि धनुर्वेदाचा अभ्यास यात दत्त-चित्त राहात असत. ॥ ३६ १/२ ॥
अथ राजा दशरथस्तेषां दारक्रियां प्रति ॥ ३७ ॥

चिन्तयामास धर्मात्मा सोपाध्यायः सबान्धवः ।
तस्य चिन्तयमानस्य मन्त्रिमध्ये महात्मनः ॥ ३८ ॥

अभ्यागच्छन्महातेजा विश्वामित्रो महामुनिः ।
एक दिवस धर्मात्मा राजा दशरथ , पुरोहित आणि बंधु बांधवांसहित बसून पुत्रांच्या विवाहासंबंधी विचार करीत होते. मंत्र्यांबरोबर विचार करणार्‍या त्या महामना नरेशाकडे महातेजस्वी महामुनि विश्वामित्र येऊन पोहोचले. ॥ ३७-३८ १/२ ॥
स राज्ञो दर्शनाकाङ्‍क्षी द्वाराध्यक्षानुवाच ह ॥ ३९ ॥

शीघ्रमाख्यात मां प्राप्तं कौशिकं गाधिनः सुतम् ।
ते राजाला भेटू इच्छित होते. त्यांनी द्वारपालांना सांगितले - 'तुम्ही लोक शीघ्र जाऊन महाराजांना सूचना द्या की कुशिकवंशी गाधिपुत्र विश्वामित्र आले आहेत.' ॥ ३९ १/२ ॥
तच्छ्रुत्वा वचनं तस्य राज्ञो वेश्म प्रदुद्रुवुः ॥ ४० ॥

सम्भ्रान्तमनसः सर्वे तेन वाक्येन चोदिताः ।
त्यांचे हे बोलणे ऐकून द्वारपाल धावत राजाच्या दरबारात गेले. ते सर्व विश्वामित्रांच्या त्या वाक्याने मनातल्या मनात घाबरलेले होते. ॥ ४० १/२ ॥
ते गत्वा राजभवनं विश्वामित्रमृषिं तदा ॥ ४१ ॥

प्राप्तमावेदयामासुर्नृपायेक्ष्वाकवे तदा ।
राजाच्या दरबारात पोहोचल्यावर त्यांनी इक्ष्वाकु कुलनंदन अवधनरेशांना म्हटले - 'महाराज ! महर्षि विश्वामित्र आलेले आहेत.' ॥ ४१ १/२ ॥
तेषां तद् वचनं शृत्वा सपुरोधाः समाहितः ॥ ४२ ॥

प्रत्युज्जगाम संहृष्टो ब्रह्माणमिव वासवः ।
त्यांचा निरोप ऐकून राजे सावधान झाले. त्यांनी पुरोहितांना बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने विश्वामित्रांचे स्वागत केले, जसे देवराज इंद्र ब्रह्मदेवांचे स्वागत करीत असावेत. ॥ ४२ १/२ ॥
स दृष्ट्‍वा ज्वलितं दीप्त्या तापसं संशितव्रतम् ॥ ४३ ॥

प्रहृष्टवदनो राजा ततोऽर्घ्यमुपहारयत् ।
विश्वामित्र कठोर व्रताचे पालन करणारे तपस्वी होते. ते आपल्या तेजाने प्रज्वलित होत होते. त्यांचे दर्शन करून राजाचे मुख प्रसन्नतेने प्रफुल्ल झाले आणि त्यांनी महर्षिंना अर्घ्य निवेदन केले. ॥ ४३ १/२ ॥
स राज्ञः प्रतिगृह्यार्घ्यं शास्त्रदृष्टेन कर्मणा ॥ ४४ ॥

कुशलं चाव्ययं चैव पर्यपृच्छन्नराधिपम् ।
राजाचे अर्घ्य शास्त्रीय विधिला अनुसरून स्वीकार करून महर्षिंनी त्यांना कुशल मंगल विचारले. ॥ ४४ १/२ ॥
पुरे कोशे जनपदे बान्धवेषु सुहृत्सु च ॥ ४५ ॥

कुशलं कौशिको राज्ञः पर्यपृच्छत् सुधार्मिकः ।
धर्मात्मा विश्वामित्रांनी क्रमशः राजाचे नगर, खजिना, राज्य, बंधु-बांधव आणि मित्रवर्य आदिंच्या विषयी कुशल प्रश्न केले ॥ ४५ १/२ ॥
अपि ते संनताः सर्वे सामन्तरिपवो जिताः ॥ ४६ ॥

दैवं च मानुषं चैव कर्म ते साध्वनुष्ठितम् ।
'राजन् ! आपल्या राज्याच्या सीमेवर निकट राहणारे शत्रु राजे आपल्या समक्ष नतमस्तक तर आहेत ना ? आपण त्यांच्यावर विजय प्राप्त केला आहे ना ? आपली यज्ञयाग आदि देवकर्मे आणि अतिथि सत्कार आदि मनुष्य कर्मे चांगल्या प्रकारे संपन्न होत आहेत ना ? ॥ ४६ १/२ ॥
वसिष्ठं च समागम्य कुशलं मुनिपुङ्‍गवः ॥ ४७ ॥

ऋषींश्च तान् यथान्यायं महाभाग उवाच ह ।
त्यानंतर महाभाग मुनिवर विश्वामित्रांनी वसिष्ठ आणि अन्यान्य ऋषिंना भेटून त्या सर्वांचा यथावत् कुशल समाचार विचारला. ॥ ४७ १/२ ॥
ते सर्वे हृष्टमनसस्तस्य राज्ञो निवेशनम् ॥ ४८ ॥

विविशुः पूजितास्तेन निषेदुश्च यथार्हतः ।
नंतर सर्व लोक प्रसन्नचित्त होऊन राजाच्या दरबारात गेले आणि त्यांच्या द्वारा पूजित होऊन यथायोग्य आसनावर बसले. ॥ ४८ १/२ ॥
अथ हृष्टमना राजा विश्वामित्रं महामुनिम् ॥ ४९ ॥

उवाच परमोदारो हृष्टस्तमभिपूजयन् ।
तदनंतर प्रसन्नचित्त परम उदार राजा दशरथांनी पुलकित होऊन महामुनि विश्वामित्रांची प्रशंसा करीत म्हटले. ॥ ४९ १/२ ॥
यथाऽमृतस्य सम्प्राप्तिर्यथा वर्षमनूदके ॥ ५० ॥

यथा सदृशदारेषु पुत्रजन्माप्रजस्य वै ।
प्रणष्टस्य यथा लाभो यथा हर्षो महोदयः ॥ ५१ ॥

तथैवागमनं मन्ये स्वागतं ते महामुने ।
कं च ते परमं कामं करोमि किमु हर्षितः ॥ ५२ ॥
'महामुने ! ज्याप्रमाणे एकाद्या मरणधर्मी मनुष्याला अमृताची प्राप्ति व्हावी, निर्मल प्रदेशात पाऊस पडावा, एखाद्या संतानहीनाला आपल्या अनुरूप पत्‍नीच्या गर्भापासून पुत्र प्राप्त व्हावा, हरवलेला निधि सापडावा, तसेच एखाद्या महान् उत्सवाने हर्षाचा उदय व्हावा, त्याप्रकारे आपले येथे हे शुभागमन झालेले आहे असे मी मानतो. आपले स्वागत असो. आपल्या मनातील कोणती उत्तम कामना आहे की जी मी आनंदाने पूर्ण करू ? ॥ ५०-५२ ॥
पात्रभूतोऽसि मे ब्रह्मन् दिष्ट्या प्राप्तोऽसि मानद ।
अद्य मे सफलं जन्म जीवितं च सुजीवितम् ॥ ५३ ॥
'ब्रह्मन् ! आपण माझ्याकडून सर्व प्रकारची सेवा घेण्यास उत्तम प्रकारे पात्र आहात. हे मानद ! माझे अहोभाग्य आहे की आपण येथपर्यंत येण्याचे कष्ट घेतले आहेत. आज माझा जन्म सफल आणि जीवन धन्य झाले आहे. ॥ ५३ ॥
यस्माद् विप्रेन्द्रमद्राक्षं सुप्रभाता निशा मम ।
पूर्वं राजर्षिशब्देन तपसा द्योतितप्रभः ॥ ५४ ॥

ब्रह्मर्षित्वमनुप्राप्तः पूज्योऽसि बहुधा मया ।
तदद्‍भुतमभूद् विप्र पवित्रं परमं मम ॥ ५५ ॥
'माझी गेलेली रात्र सुंदर प्रभात देऊन गेली की ज्या योगे मी आज आपले ब्राह्मण शिरोमणिंचे दर्शन केले आहे. पूर्वकाली आपण राजर्षि शब्दाने उपलक्षित होत होता, नंतर तपश्चर्येने आपल्या अद्‌भुत प्रभेला प्रकाशित करून आपण ब्रह्मर्षि पद मिळविले आहे म्हणून आपण राजर्षि आणि ब्रह्मर्षि दोन्ही रूपाने मला पूजनीय आहात. आपले जे येथे शुभागमन झाले आहे ते परम पवित्र आणि अद्‌भुत आहे. ॥ ५४-५५ ॥
शुभक्षेत्रगतश्चाहं तव संदर्शनात् प्रभो ।
ब्रूहि यत् प्रार्थितं तुभ्यं कार्यमागमनं प्रति ॥ ५६ ॥
'प्रभो ! आपल्या दर्शनाने आज माझे घर तीर्थ झाले आहे. मी मला स्वतःला पुण्यक्षेत्राची यात्रा करून आल्याप्रमाणेच मानत आहे. सांगा बरे ! आपली काय इच्छा आहे ? आपल्या शुभागमनाचे मुख्य उद्देश्य काय आहे ? ॥ ५६ ॥
इच्छाम्यनुगृहीतोऽहं त्वदर्थं परिवृद्धये ।
कार्यस्य न विमर्शं च गंतुमर्हसि सुव्रत ॥ ५७ ॥
उत्तम व्रताचे पालन करण्यार्‍या महर्षे ! मी आपल्या कृपेने अनुगृहीत होऊन आपले अभीष्ट मनोरथ जाणू इच्छितो आणि माझ्या अभ्युदयासाठी मी त्याची पूर्ति करीन. कार्य सिद्ध होईल की नाही अशा संशयाला आपण मनांत स्थान देऊ नये. ॥ ५७ ॥
कर्ता चाहमशेषेण दैवतं हि भवान् मम ।
मम चायमनुप्राप्तो महानभ्युदयो द्विज ।
तवागमनजः कृत्स्नो धर्मश्चानुत्तमो मम ॥ ५८ ॥
आपण जी काही आज्ञा द्याल, मी तिचे पूर्णत्वाने पालन करीन. कारण की सन्मानीय अतिथि होण्याच्या नात्याने आपण मज गृहस्थाला देवताच आहात. ब्रह्मन् ! आज आपल्या आगमनाने मला सर्व धर्मांचे उत्तम फळ प्राप्त झाले आहे. हा माझ्या महान् अभ्युदयाचा अवसर आला आहे." ॥ ५८ ॥
इति हृदयसुखं निशम्य वाक्यं
     श्रुतिसुखमात्मवता विनीतमुक्तम् ।
प्रथितगुणयशा गुणैर्विशिष्टः
     परमऋषिः परमं जगाम हर्षम् ॥ ५९ ॥
मनस्वी नरेशाचे हे विनययुक्त वचन हृदयाला आणि कानांना सुख देणारे होते, ऐकून विख्यात गुण आणि यश असणारे, शम-दम आदि सद्‌गुणांनी संपन्न महर्षि विश्वामित्र फार प्रसन्न झाले. ॥ ५९ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे अष्टादशः सर्गः ॥ १८ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा अठरावा सर्ग समाप्त झाला. ॥ १८ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP