श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ विंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
ताराया विलापः - तारेचा विलाप -
रामचापविसृषटेन शरेणांतकरेण तम् ।
दृष्ट्‍वा विनिहतं भूमौ तारा ताराधिपानना ॥ १ ॥

सा समासाद्य भर्तारं पर्यष्वजत भामिनी ।
इषुणा ऽभिहतं दृष्ट्‍वा वालिनं कुञ्जरोपमम् ॥ २ ॥

वानरेंद्रं महेंद्राभं शोकसंतप्तमानसा ।
तारा तरुमिवोन्मूलं पर्यदेवयदातुरा ॥ ३ ॥
चंद्र्मुखी तारेने पाहिले, माझे स्वामी वानरराज वाली रामांच्या धनुष्यातून सुटलेल्या प्राणांतकारी बाणाने घायाळ होऊन धरतीवर पडले आहेत, त्या अवस्थेत त्यांच्या जवळ पोहोचून ती भामिनी त्याच्या शरीराशी चिकटली. जे आपल्या शरीराने गजराज आणि गिरिराजावरही मात करीत होते, त्याच वानर राजांना बाणांनी जखमी होऊन, मुळापासून उपटून काढलेल्या वृक्षाप्रमाणे धराशायी झालेले पाहून तारेचे हृदय शोकाने संतप्त झाले आणि ती आतुर होऊन विलाप करू लागली. ॥१-३॥
रणे दारुणविक्रंत प्रवीर प्लवतां वर ।
किं दीनामपुरोभागामद्य त्वं नाभिभाषसे ॥ ४ ॥
’रणात भयानक पराक्रम प्रकट करणारे महान् वीर वानरराज ! आज या समयी मला आपल्या समोर पाहूनही आपण बोलत का नाही ? ॥४॥
उत्तिष्ठ हरिशार्दूल भजस्व शयनोत्तमम् ।
नैवंविधाः शेरते हि भूमौ नृपतिसत्तमाः ॥ ५ ॥
’कपिश्रेष्ठ ! उठावे आणि उत्तम शय्येचा आश्रय करावा. आपल्या सारखे श्रेष्ठ भूपाल पृथ्वीवर झोपत नाहीत. ॥५॥
अतीव खलु ते कांता वसुधा वसुधाधिप ।
गतासुरपि यां गात्रैर्मां विहाय निषेवसे ॥ ६ ॥
’पृथ्वीनाथ ! निश्चितच ही पृथ्वी आपल्याला अत्यंत प्रिय आहे म्हणून तर निष्प्राण होऊनही आपण आज मला सोडून आपल्या अंगांनी या वसुधेचे आलिंगन करून झोपून राहिला आहात. ॥६॥
व्यक्तमन्या त्वया वीर धर्मतः संप्रवर्तिता ।
किष्किंधेव पुरी रम्या स्वर्गमार्गे विनिर्मिता ॥ ७ ॥
’वीरवर ! आपण धर्मयुक्त युद्ध करून स्वर्गाच्या मार्गातही निश्चितच किष्किंधेप्रमाणे एखादी रमणीय पुरी बनविली आहे ही गोष्ट आज स्पष्ट झाली आहे. (अन्यथा आपण किष्किंधेला सोडून येथे का झोपला असतां ?) ॥७॥
यान्यस्माभिस्त्वया सार्धं वनेषु मधुगंधिषु ।
विहृतानि त्वया काले तेषामुपरमः कृतः ॥ ८ ॥
’आपल्या बरोबर मधुर सुगंधयुक्त वनांतून आम्ही जे जे विहार केले आहेत; त्या सर्वांना या समयी आपण कायमचे समाप्त केले आहे. ॥८॥
निरानंदा निराशा ऽहं निमग्ना शोकसागरे ।
त्वयि पञ्चत्वमापन्ने महायूथपयूथपे ॥ ९ ॥
’नाथ ! आपण मोठ मोठ्या यूथपतिंचे स्वामी होतात ! आज आपण मारले गेल्याने माझा सारा आनंद लुटला गेला आहे. मी सर्व प्रकारे निराश होऊन शोकाच्या समुद्रात बुडून गेले आहे. ॥९॥
हृदयं सुस्थिरं मह्यं दृष्ट्‍वा विनिहतं पतिम् ।
यन्न शोकाभिसंतप्तं स्फुटतेऽद्य सहस्रधा ॥ १० ॥
’निश्चितच माझे हृदय अत्यंत कठोर आहे, जे आज आपल्याला पृथ्वीवर पडलेले पाहूनही शोकाने संतप्त होऊन फुटून जात नाही- याचे हजारो तुकडे होत नाहीत. ॥१०॥
सुग्रीवस्य त्वया भार्या हृता स च विवासितः ।
यत्तु तस्य त्वया व्युष्टिः प्राप्येयं प्लवगाधिप ॥ ११ ॥
’वानरराज ! आपण जे सुग्रीवाची स्त्री बळकावलीत आणि त्यांना घराच्या बाहेर हाकलून दिलेत, त्याचेच हे फळ आपल्याला प्राप्त झाले आहे. ॥११॥
निःश्रेयसपरा मोहात्त्वया चाहं विगर्हिता ।
यैषा ऽब्रवं हितं वाक्यं वानरेंद्र हितैषिणी ॥ १२ ॥
’वानरेन्द्र ! मी आपले हित इच्छित होते आणि आपल्या कल्याणाच्या साधनांतच तत्पर रहात होते. तरीही मी आपल्याला जी हितकर गोष्ट सांगितली, ती आपण मोहवश होऊन मानली नाहीत आणि उलट माझीच निंदा केलीत. ॥१२॥
रूपयौवनदृप्तानां दक्षिणानां च मानद ।
नूनमप्सरसामार्य चित्तानि प्रमथिष्यसि ॥ १३ ॥
’दुसर्‍यांना मान देणार्‍या आर्यपुत्रा ! निश्चितच आपण स्वर्गात जाऊन रूप आणि यौवनाच्या अभिमानाने मत्त राहाणार्‍या केलि कलेत निपुण अप्सरांच्या मनास आपल्या दिव्य सौंदर्याने क्षुब्ध कराल. ॥१३॥
कालो निःसंशयो नूनं जीवितांतकरस्तव ।
बलाद् येनावपन्नोऽसि सुग्रीवस्यावशो वशम् ॥ १४ ॥
’निश्चितच आज आपल्या जीवनाचा अंत करणारा संशयरहित काळ येथे येऊन पोहोंचला होता; ज्याने कुणालाही वश न होणार्‍या आपल्याला बलपूर्वक सुग्रीवाच्या वश करून टाकले. ॥१४॥
अस्थाने वालिनं हत्वा युध्यमानं परेण च ।
न संतप्यति काकुत्स्थः कृत्वा कर्म सुगर्हितम् ॥ १५ ॥
(आता श्रीरामांना ऐकविण्यासाठी बोलली.) - ’काकुत्स्थ श्रीरामांनी दुसर्‍या बरोबर युद्ध करीत असणार्‍या वालीला मारून अत्यंत निंद्य कर्म केले आहे. या कुत्सित कर्माला करूनही जे संतप्त होत नाहीत, हे सर्वथा अनुचित आहे.’ ॥१५॥
वैधव्यं शोकसंतापं कृपणं कृपणा सती ।
अदुःखोपचिता पूर्वं वर्तयिष्याम्यनाथवत् ॥ १६ ॥
(नंतर वालीला म्हणाली -) मी कधी दीनतापूर्ण जीवन घालविलेले नाही; अशा महान् दुःखाचा सामना केला नव्हता, परंतु आज आपल्याशिवाय मी दीन होऊन गेले आहे, आता मला अनाथाप्रमाणे शोक-संतापाने पूर्ण वैधव्यांत जीवन व्यतीत करावे लागेल. ॥१६॥
लालितश्चाङ्‌ग दो वीरः सुकुमारः सुखोचितः ।
वत्स्यते कामवस्थां मे पितृव्ये क्रोधमूर्च्छिते ॥ १७ ॥
’नाथ ! आपण आपले वीरपुत्र अंगदास, जो सुख भोगण्यास योग्य आणि सुकुमार आहे, त्याचे खूप लाड केले होतेत. आता क्रोधाने वेडे झालेल्या चुलत्याच्या अधीन होऊन माझ्या मुलाची काय दशा होईल ?’ ॥१७॥
कुरुष्व पितरं पुत्र सुदृष्टं धर्मवत्सलम् ।
दुर्लभं दर्शनं वत्स तव तस्य भविष्यति ॥ १८ ॥
’मुला अंगदा ! आपल्या धर्मप्रेमी पित्याला चांगल्या प्रकारे पाहून घे. आता तुझ्यासाठी त्यांचे दर्शन दुर्लभ होऊन जाईल. ॥१८॥
समाश्वासय पुत्रं त्वं संदेशं संदिशस्व च ।
मूर्ध्नि चैनं समाघ्राय प्रवासं प्रस्थितो ह्यसि ॥ १९ ॥
’प्राणनाथ ! आपण दुसर्‍या देशात जात आहात. आपल्या पुत्राचे मस्तक हुंगून त्याला धीर द्यावा आणि माझ्यासाठीही काही संदेश द्यावा. ॥१९॥
रामेण हि महत्कर्मकृतं त्वामभिनिघ्नता ।
आनृण्यं च गतं तस्य सुग्रवस्य प्रतिश्रवे ॥ २० ॥
’रामांनी आपल्याला मारुन फारच मोठे कर्म केले आहे. त्यांनी सुग्रीवापाशी जी प्रतिज्ञा केली होती, तिचे ऋण उतरवून टाकले आहे. ॥२०॥
सकामो भव सुग्रीव रुमां त्वं प्रतिपत्स्यसे ।
भुङ्‌क्ष्व राज्यमनुद्विग्नः शस्तो भ्राता रिपुस्तव ॥ २१ ॥
(आता सुग्रीवास ऐकवून म्हणू लागली-) ’सुग्रीवा ! तुमचा मनोरथ सफल होवो. तुमचा भाऊ, ज्यांना तुम्ही स्वतःचा शत्रु समजत होतात, मारले गेले आहेत. आता निष्कंटक राज्य भोगा. रूमाला ही प्राप्त करून घ्या.’ ॥२१॥
किं मामेवं विलपतीं प्रेम्णा त्वं नाभिभाषसे ।
इमाः पश्य वरा बह्वीर्भार्यास्ते वानरेश्वर ॥ २२ ॥
(परत वालीला म्हणाली- ) ’वानरेश्वर ! मी आपली प्रिय पत्‍नी आहे आणि याप्रकारे रडत विव्हळत आहे, तरीही आपण माझ्याशी बोलत का बरे नाही ? पहावे, आपल्या या बर्‍याचशा सुंदर भार्या येथे उपस्थित आहेत. ॥२२॥
तस्या विपलितं श्रुत्वा वानर्यः सर्वतश्च ताः ।
परिगृह्याङ्‌गपदं दीनं दुःखार्ताः परिचुक्रुशुः ॥ २३ ॥
’तारेचा विलाप ऐकून अन्य वानर-पत्‍नीही सर्व बाजूनी अंगदास पकडून दीन आणि दुःखाने व्याकुळ होऊन जोरजोराने क्रंदन करू लागल्या. ॥२३॥
किमङ्‌गादं साङ्‌ग्दवीरबाहो
विहाय यास्यद्य चिरप्रवासम् ।
न युक्तमेवं गुणसंनिकृष्टं
विहाय पुत्रं प्रियचारुवेषम् ॥ २४ ॥
(त्यानंतर तारेने परत म्हटले- ) बाजूबंदाने विभूषित असणार्‍या वीर भुजा असणार्‍या वानरराजा ! आपण अंगदास सोडून दीर्घकाळासाठी दुसर्‍या देशात का जात आहात ? जो गुणांनी आपल्या सर्वथा निकट आहे, जो आपल्या प्रमाणेच गुणवान् आहे तसेच ज्याचा वेष प्रिय आणि मनोहर आहे, अशा प्रिय पुत्राचा त्याग करून या प्रकारे निघून जाणे आपल्यासाठी कदापि उचित नाही. ॥२४॥
यद्यप्रियं किञ्चिदसंप्रधार्य
कृतं मया स्यात्तव दीर्घबाहो ।
क्षमस्व मे तद्धरिवंशनाथ
व्रजामि मूर्ध्ना तव वीर पादौ ॥ २५ ॥
’महाबाहो ! जर गैरसमजुतीने मी आपला काही अपराध केला असेल तर आपण तो क्षमा करावा. वानरवंशाचे स्वामी वीर आर्यपुत्र ! मी आपल्या चरणी मस्तक ठेवून ही प्रार्थना करीत आहे. ॥२५॥
तथा तु तारा करुणं रुदंती
भर्तुः समीपे सह वानरीभिः ।
व्यवस्यत प्रायमनिंद्यवर्णा
उपोपवेष्टुं भुवि यत्र वाली ॥ २६ ॥
याप्रकारे अन्य वानर-पत्‍नींच्या सह पतिच्या समीप करूण विलाप करणार्‍या अनिंद्य सुंदरी तारेने जेथे वाली पृथ्वीवर पडला होता, तेथेच त्याच्या समीप बसून आमरण अनशन करण्याचा निश्चय केला. ॥२६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे विंशः सर्गः ॥ २० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा विसावा सर्ग पूरा झाला. ॥२०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP