श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। चतुर्विंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वारिणो भिद्यमानस्य किमयं तुमुलो ध्वनिरिति नौकागतस्य रामस्य प्रश्नं श्रुवा मुनिना तस्योत्तरदानं मलदकरूषताटकावनानां परिचयं दत्त्वा ताटकावधार्थं श्रीरामस्य प्रेरणं च - श्रीराम आणि लक्ष्मणचे गंगापार करते समयी विश्वामित्रांना जलात उठणार्‍या तुमुलध्वनि विषयी प्रश्न करणे, विश्वामित्रांनी त्यांना याचे कारण सांगणे तथा मलद, करूष आणि ताटकावनाचा परिचय देऊन त्यांना ताटकावधाची आज्ञा करणे -
ततः प्रभाते विमले कृत्वाह्निकमरिन्दमौ ।
विश्वामित्रं पुरस्कृत्य नद्यास्तीरमुपागतौ ॥ १ ॥
तदनंतर निर्मल प्रभातकाली नित्यकर्मातून निवृत्त झालेल्या विश्वामित्रांना पुढे करून शत्रुदमन वीर श्रीराम आणि लक्ष्मण गंगानदीच्या तटावर आले. ॥ १ ॥
ते च सर्वे महात्मानो मुनयः संशितव्रताः ।
उपस्थाप्य शुभां नावं विश्वामित्रमथाब्रुवन् ॥ २ ॥
त्यावेळी उत्तम व्रताचे पालन करणार्‍या त्या पुण्याश्रम निवासी महात्मा मुनींनी एक सुंदर नाव मागवून विश्वामित्रांना म्हटले - ॥ २ ॥
आरोहतु भवान् नावं राजपुत्रपुरस्कृतः ।
अरिष्टं गच्छ पन्थानं मा भूत् कालस्य पर्ययः ॥ ३ ॥
"महर्षि ! आपण या राजकुमारांना पुढे घालून या नावेत बसावे आणि निर्विघ्नपणे मार्ग पार करावा, म्हणजे विलंब होणार नाही." ॥ ३ ॥
विश्वामित्रस्तथेत्युक्त्वा तानृषीन् प्रतिपूज्य च ।
ततार सहितस्ताभ्यां सरितं सागरङ्‍गमाम् ॥ ४ ॥
विश्वामित्रांनी 'फार चांगले' असे म्हणून त्यांची प्रशंसा केली आणि ते श्रीराम आणि लक्ष्मणसह समुद्रगामिनी गंगा नदीला पार करू लागले. ॥ ४ ॥
ततः शुश्राव वै शब्दं तोयसंरम्भवर्धितम् ।
मध्यमागम्य तोयस्य तस्य शब्दस्य निश्चयम् ॥ ५ ॥

ज्ञातुकामो महातेजाः सह रामः कनीयसा ।
गंगेच्या प्रवाहात मध्यभागी आल्यावर आपल्या लहान भावासह तेजस्वी श्रीरामांना दोन जलप्रवाहांची टक्कर व्हावी तसा अत्यंत मोठा ध्वनि ऐकू येऊ लागला. 'हा कसला आवाज आहे ? का आणि कोठून येत आहे' ही गोष्ट निश्चितपणे जाणण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. ॥ ५ १/२ ॥
अथ रामः सरिन्मध्ये पप्रच्छ मुनिपुङ्‍गवम् ॥ ६ ॥

वारिणो भिद्यमानस्य किमयं तुमुलो ध्वनिः ।
तेव्हां श्रीरामांनी नदीच्या मध्यभागी असताना मुनिवर विश्वामित्रांना विचारले, "जलाच्या परस्परात मिसळण्याने येथे असा तुमुलध्वनि कां उत्पन्न होत आहे ?" ॥ ६ १/२ ॥
राघवस्य वचः श्रुत्वा कौतूहलसमन्वितम् ॥ ७ ॥

कथयामास धर्मात्मा तस्य शब्दस्य निश्चयम् ।
श्रीरामचंद्रांच्या वचनातून हे रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा भरलेली होती. ते पाहून धर्मात्मा विश्वामित्रांनी त्या महान शब्दाचे सुनिश्चित कारण सांगण्यास सुरुवात केली - ॥ ७ १/२ ॥
कैलासपर्वते राम मनसा निर्मितं परम् ॥ ८ ॥

ब्रह्मणा नरशार्दूल तेनेदं मानसं सरः ।
"नरश्रेष्ठ रामा ! कैलास पर्वतावर एक सुंदर सरोवर आहे. त्याला ब्रह्मदेवांनी आपल्या मानसिक संकल्पाने प्रकट केले होते. मनापासून प्रकट झाल्यामुळे ते उत्तम सरोवर 'मानस' सरोवर म्हणून ओळखले जाते. ॥ ८ १/२ ॥
तस्मात् सुस्राव सरसः साऽयोध्यामुपगूहते ॥ ९ ॥

सरःप्रवृत्ता सरयूः पुण्या ब्रह्मसरश्च्युता ।
त्या सरोवरातून एक नदी उगम पावली आहे, जी अयोध्यापुरीला लागून वहात आहे. ब्रह्मसरापासून निघाली म्हणून ती पवित्र नदी शरयू नामाने विख्यात आहे. ॥ ९ १/२ ॥
तस्यायमतुलः शब्दो जाह्नवीमभिवर्तते ॥ १० ॥

वारिसङ्‍क्षोभजो राम प्रणामं नियतः कुरु ।
तिचे जल गंगेत मिसळत आहे. दोन नद्यांच्या जलांच्या संघर्षानेच हा भारी आवाज होत आहे, ज्याची कशाशी तुलना करता येत नाही. राम ! तू आपल्या मनाला संयमित करून या संगमाच्या जलाला प्रणाम कर." ॥ १० १/२ ॥
ताभ्यां तु तावुभौ कृत्वा प्रणाममतिधार्मिकौ ॥ ११ ॥

तीरं दक्षिणमासाद्य जग्मतुर्लघुविक्रमौ ।
हे ऐकून त्या दोन्ही अत्यंत धार्मिक बंधुंनी त्या दोन्ही नद्यांना प्रणाम केला आणि गंगेच्या दक्षिण किनार्‍यावर उतरून दोघे बंधू भराभर पाय उचलून पुढे निघाले. ॥ ११ १/२ ॥
स वनं घोरसङ्‍काशं दृष्ट्‍वा नरवरात्मजः ॥ १२ ॥

अविप्रहतमैक्ष्वाकः पप्रच्छ मुनिपुङ्‍गवम् ।
त्यावेळी इक्ष्वाकु नंदन राजकुमार श्रीरामांनी आपल्या समोर एक भयंकर वन पाहिले, ज्यात मनुष्यांच्या येण्याजाण्याच्या काहीच खुणा दिसत नव्हत्या. ते पाहून त्यांनी मुनिवर विश्वामित्रांना विचारले - ॥ १२ १/२ ॥
अहो वनमिदं दुर्गं झिल्लिकागणसंयुतम् ॥ १३ ॥

भैरवैः श्वापदैः कीर्णं शकुन्तैर्दारुणारवैः ।
नानाप्रकारैः शकुनैर्वाश्यद्‌भिर्भैरवस्वनैः ॥ १४ ॥
"गुरुदेव ! हे वन तर फारच मोठे, अद्‌भुत आणि दुर्गम आहे. येथे चहुबाजूंनी रातकिड्यांची किरकिर ऐकू येत आहे. भयानक हिंसक जन्तूंनी हे परिपूर्ण वाटत आहे. अति कर्कश आवाज करणारे पक्षी सर्वत्र पसरलेले दिसत आहेत. नाना प्रकारचे विहंगम, भीषण स्वरात किलबिलाट होत आहे. ॥ १३-१४ ॥
सिंहव्याघ्रवराहैश्च वारणैश्चापि शोभितम् ।
धवाश्वकर्णककुभैर्बिल्वतिन्दुकपाटलैः ॥ १५ ॥

सङ्‍कीर्णं बदरीभिश्च किं न्विदं दारुणं वनम् ।
सिंह, व्याघ्र , डुक्कर आणि हत्ती या जंगलाची भयानकता वाढवीत आहेत. धव, अश्वकर्ण, ककुभ (अर्जुन), बेल, तेन्दु, पाटल आणि बोरीच्या वृक्षांनी भरलेले हे भयंकर वन काय आहे ? ह्याचे नाव काय आहे ?" ॥ १५ १/२ ॥
तमुवाच महातेजा विश्वामित्रो महामुनिः ॥ १६ ॥
श्रूयतां वत्स काकुत्स्थ यस्यैतद् दारुणं वनम् ।
तेव्हां महातेजस्वी महामुनि विश्वामित्रांनी त्यांना म्हटले, "वत्स ! काकुत्स्थनंदन ! हे भयंकर वन ज्यांच्या अधिकारात आहे त्यांचा परिचय ऐक. ॥ १६ १/२ ॥
एतौ जनपदौ स्फीतौ पूर्वमास्तां नरोत्तम ॥ १७ ॥

मलदाश्च करूषाश्च देवनिर्माणनिर्मितौ ।
'नरश्रेष्ठ ! पूर्वकाली येथे दोन समृद्धशाली जनपद होते - मलद आणि करुष. हे दोन्ही देश देवांच्या प्रयत्‍नाने निर्माण झाले होते. ॥ १७ १/२ ॥
पुरा वृत्रवधे राम मलेन समभिप्लुतम् ॥ १८ ॥

क्षुधा चैव सहस्राक्षं ब्रह्महत्या समाविशत् ।
'रामा ! फार पूर्वीची गोष्ट आहे. वृत्रासुराचा वध केल्यानंतर देवराज इंद्र मळाने लिप्त झाला होता. क्षुधेनेही त्याला व्याकुळ केले आणि त्यांच्या हातून ब्रह्महत्याही घडली होती. ॥ १८ १/२ ॥
तमिन्द्रं मलिनं देवा ऋषयश्च तपोधनाः ॥ १९ ॥

कलशैः स्नापयामासुर्मलं चास्य प्रमोचयन् ।
'तेव्हां देवतांनी आणि तपोधन ऋषिंनी मलीन इंद्राला येथेच जलांनी भरलेल्या कलशांनी न्हाऊ घातले आणि त्याचा मळ आणि कारुष (क्षुधा) यातून त्याची सुटका केली. ॥ १९ १/२ ॥
इह भूम्यां मलं दत्त्वा देवाः कारूषमेव च ॥ २० ॥

शरीरजं महेन्द्रस्य ततो हर्षं प्रपेदिरे ।
'या भूभागाला देवराज इंद्राच्या शरीरापासून उत्पन्न झालेला मळ आणि कारुष देऊन देवता प्रसन्न झाल्या. ॥ २० ॥
निर्मलो निष्करूषश्च शुद्ध इन्द्रो यथाऽभवत् ॥ २१ ॥

ततो देशस्य सुप्रीतो वरं प्रादादनुत्तमम् ।
इमौ जनपदौ स्फीतौ ख्यातिं लोके गमिष्यतः ॥ २२ ॥

मलदाश्च करूषाश्च ममाङ्‍गमलधारिणौ ।
'इंद्र पूर्ववत् निर्मल, निष्करुष (क्षुधाहीन) आणि शुद्ध झाला. तेव्हां त्यांनी प्रसन्न होऊन या देशाला उत्तम वर प्रदान केला. येथे मलद आणि कारुष नामाने दोन जनपद लोकात विख्यात होतील. माझ्या अंगजनित मळास धारण केल्याने हे दोन्ही देश अत्यंत समृद्धशाली होतील. ॥ २१-२२ १/२ ॥
साधु साध्विति तं देवाः पाकशासनमब्रुवन् ॥ २३ ॥
'बुद्धिमान् इंद्राच्या द्वारे केली गेलेली या देशाची पूजा पाहून देवतांनी पाकशासनास वारंवार साधुवाद दिले. ॥ २३ ॥
देशस्य पूजां तां दृष्ट्‍वा कृतां शक्रेण धीमता ।
एतौ जनपदौ स्फीतौ दीर्घकालमरिंदम ॥ २४ ॥
'शत्रुदमना ! मलद आणि करुष हे दोन्ही जनपद दीर्घकाळ पर्यंत समृद्धशाली, धन-धान्याने संपन्न आणि सुखी होते. ॥ २४ ॥
मलदाश्च करूषाश्च मुदिता धनधान्यतः ।
कस्यचित्त्वथ कालस्य यक्षीणी कामरूपिणी ॥ २५ ॥

बलं नागसहस्रस्य धारयन्ती तदा ह्यभूत् ।
'काही काळानंतर येथे इच्छेनुसार रूप धारण करणारी एक यक्षीण आली, जी आपल्या शरीरात एक हजार हत्तींचे बळ धारण करीत आहे. ॥ २५ १/२ ॥
ताटका नाम भद्रं ते भार्या सुन्दस्य धीमतः ॥ २६ ॥

मारीचो राक्षसः पुत्रो यस्याः शक्रपराक्रमः ।
वृत्तबाहुर्महाशीर्षो विपुलास्यतनुर्महान् ॥ २७ ॥
'तिचे नाव आहे ताटका. ती बुद्धिमान सुंद नामक दैत्याची पत्‍नी आहे. तुझे कल्याण असो. इंद्राप्रमाणे पराक्रमी मारीच नावाचा राक्षस या ताटकेचाच पुत्र आहे. त्याच्या भुजा गोल, मस्तक फार मोठे, तोंड पसरलेले आणि शरीर विशाल आहे. ॥ २६-२७ ॥
राक्षसो भैरवाकारो नित्यं त्रासयते प्रजाः ।
इमौ जनपदौ नित्यं विनाशयति राघव ॥ २८ ॥

मलदांश्च करूषांश्च ताटका दुष्टचारिणी ।
'तो भयानक आकाराचा राक्षस येथील प्रजेला सदा त्रास देत असतो. रघुनंदन ! ती दुराचारिणी ताटकाही सदा मलद आणि करुष या दोन्ही जनपदांचा विनाश करीत असते. ॥ २८ १/२ ॥
सेयं पन्थानमावृत्य वसत्यत्यर्धयोजने ॥ २९ ॥

अत एव च गन्तव्यं ताटकाया वनं यतः ।
स्वबाहुबलमाश्रित्य जहीमां दुष्टचारिणीम् ॥ ३० ॥
'ती यक्षीण दीड योजन (सहा कोस) पर्यंतच्या प्रदेशाला घेरून या वनात राहात आहे. म्हणून ज्या बाजूस ताटकावन आहे, तिकडेच आपल्याला गेले पाहिजे. तू आपल्या बाहूबलाच्या आश्रयाने त्या दुराचारिणीस मारून टाक. ॥ ३० ॥
मन्नियोगादिमं देशं कुरु निष्कण्टकं पुनः ।
न हि कश्चिदिमं देशं शक्तो ह्यागन्तुमीदृशम् ॥ ३१ ॥
'माझ्या आज्ञेने या देशाला पुन्हा निष्कंटक बनव. हा देश असा रमणीय आहे तरीही या समयी येथे कुणीही येऊ शकत नाही. ॥ ३१ ॥
यक्षिण्या घोरया राम उत्सादितमसह्यया ।
एतत्ते सर्वमाख्यातं यथैतद् दारुणं वनम् ।
यक्ष्या चोत्सादितं सर्वमद्यापि न निवर्तते ॥ ३२ ॥
राम ! त्या असह्य आणि भयानक यक्षिणीने या देशाला उजाड करून टाकले आहे. हे वन असे का आहे याचे रहस्य मी तुला सांगितले. त्या यक्षिणीनेच या देशास उजाड करून टाकले आहे आणि आजही ती आपल्या क्रूर कर्मापासून निवृत्त झालेली नाही. ॥ ३२ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे चतुर्विंशः सर्गः ॥ २४ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा चोविसावा सर्ग समाप्त झाला. ॥ २४ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP