[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ अष्टचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
इन्द्रजिद्धनुमतोर्युद्धमिन्द्रजिद्दिव्यास्त्रबन्धनबद्धस्य हनुमतो रावणस्य राजसभायां गमनम् -
इन्द्रजीत आणि हनुमानाचे युद्ध, त्याच्या दिव्यास्त्राच्या बन्धनात बान्धला जाऊन हनुमन्ताचे रावणाच्या दरबारात उपस्थित होणे -
ततस्तु रक्षोधिपतिर्महात्मा
हनूमताक्षे निहते कुमारे ।
मनः समाधाय स देवकल्पं
समादिदेशेन्द्रजितं सरोषः ॥ १ ॥
त्यानन्तर हनुमन्ताकडून अक्षकुमाराचा वध झाल्याचे ऐकून महात्मा राक्षसाधिपती महाकाय रावणाने आपल्या मनाला कसे तरी स्थिर करून रागाचे भरात देवतुल्य पराक्रमी कुमार इन्द्रजिताला याप्रमाणे आज्ञा केली- ॥१॥
त्वमस्त्रविच्छस्त्रभृतां वरिष्ठः
सुरासुराणामपि शोकदाता ।
सुरेषु सेन्द्रेषु च दृष्टकर्मा
पितामहाराधनसञ्चितास्त्रः ॥ २ ॥
तो म्हणाला- मुला ! तू पितामह ब्रह्मदेवाची आराधना करून अनेक प्रकारच्या अस्त्रांचे ज्ञान प्राप्त केले आहेस. तू अस्त्रवेत्ता, शस्त्रधारी वीरांमध्ये श्रेष्ठ, देवता आणि असुरांनाही शोक देणारा आहेस. इन्द्रासहित संपूर्ण देवतांनी तुझा पराक्रम अनुभवला आहे. ॥२॥
तवास्त्रबलमासाद्य नासुरा न मरुद्‌गणाः ।
न शेकुः समरे स्थातुं सुरेश्वरसमाश्रिताः ॥ ३ ॥
तुझ्या अस्त्र सामर्थ्यामुळेच इन्द्राचा आश्रय करून राहिलेले मरूद्‍गणांसह सर्व देव संग्रामामध्ये तुझ्यापुढे टिकाव धरण्यास समर्थ झाले नाहीत. ॥३॥
न कश्चित् त्रिषु लोकेषु संयुगेन गतश्रमः ।
भुजवीर्याभिगुप्तश्च तपसा चाभिरक्षितः ।
देशकालप्रधानश्च त्वमेव मतिसत्तमः ॥ ४ ॥
त्रैलोक्यात तुझ्याशिवाय असा दुसरा कोणी वीर नाही कि जो संग्रामात थकत नाही. तू आपल्या बाहुबळाने आणि तपोबळानेही पूर्णतः सुरक्षित आहेस. देश-काळादिचे ज्ञान असणार्‍यात तू प्रधान आहेस आणि बुद्धिमान लोकांमध्येही तू सर्वश्रेष्ठ आहेस. ॥४॥
न तेऽस्त्यशक्यं समरेषु कर्मणां
न तेऽस्त्यकार्यं मतिपूर्वमन्त्रणे ।
न सोऽस्ति कश्चित् त्रिषु संग्रहेषु
न वेद यस्तेऽस्त्रबलं बलं च ते ॥ ५ ॥
युद्धप्रसंगी करावयाच्या कर्मात तुला अशक्य असे कोणतेही कार्य नाही. बुद्धिपूर्वक राजकार्याचा विचार करण्याचा प्रसंग आला तरी तुझ्या बुद्धिला अनाकलनीय अशी कोणतीही गोष्ट नाही. तुझे सामर्थ्य आणि अस्त्रबळ न जाणणारा असा त्रैलोक्यात कोणी नाही. ॥५॥
ममानुरूपं तपसो बलं च ते
पराक्रमश्चास्त्रबलं च संयुगे ।
न त्वां समासाद्य रणावमर्दे
मनः श्रमं गच्छति निश्चितार्थम् ॥ ६ ॥
संग्रामामध्ये तुझा पराक्रम, अस्त्रबळ आणि तपःसामर्थ्य ही सर्व माझ्यासारखीच आहेत. आणि म्हणून निकराचे युद्ध झाले तरी तुझा मला आधार असल्याने विजयाविषयी निःशंक असलेले माझे मन कधीही साशंक होत नाही. ॥६॥
निहताः किङ्‌कराः सर्वे जम्बुमाली च राक्षसः ।
अमात्यपुत्रा वीराश्च पञ्च सेनाग्रगामिनः ॥ ७ ॥
हे पहा की किंकर नावाचे सर्व राक्षस मारले गेले आहेत, तसेच जंबुमाळी नावाचा राक्षस, मन्त्र्यांचे सात वीर पुत्र आणि माझे पाच सेनापती, हे सर्व ही कालवश झाले आहेत. ॥७॥
बलानि सुसमृद्धानि साश्वनागरथानि च ।
सहोदरस्ते दयितः कुमारोऽक्षश्च सूदितः ।
न तु तेष्वेव मे सारो यस्त्वय्यरिनिषूदन ॥ ८ ॥
त्यांच्या बरोबरच अश्व, गज आणि रथ यासह माझ्या समृद्ध आणि सुसज्ज बल-वीर्य संपन्न सेनाही नष्ट झाल्या आहेत. तुझा प्रिय बन्धु कुमार अक्षही मारला गेला आहे. हे शत्रूसूदना ! माझ्या ठिकाणी तीन्ही लोकांवर विजय प्राप्त करण्याची जी शक्ती आहे, तीच तुझ्या ठिकाणीही आहे. प्रथम हे जे लोक मारले गेले आहेत, त्यांच्या ठिकाणी ती शक्ती नव्हती, म्हणून तुझा विजय निश्चित आहे. तुझ्या पराक्रमाची मला जशी खात्री वाटते तशी त्यांच्याविषयी मला खात्री वाटत नव्हती. ॥८॥
इदं च दृष्ट्‍वा निहतं महद् बलं
कपेः प्रभावं च पराक्रमं च ।
त्वमात्मनश्चापि समीक्ष्य सारं
कुरुष्व वेगं स्वबलानुरूपम् ॥ ९ ॥
म्हणून नाश पावलेल्या प्रचंड सैन्यासंबन्धी विचार करून, त्या कपिच्या प्रभाव आणि पराक्रम याकडे दृष्टी देऊन आणि आपल्या स्वतःच्या सामर्थ्याचाही विचार करून, आता तू आपल्या सामर्थ्याला आणि कीर्तीला साजेल अशारीतीने त्या वानरावर हल्ला कर. ॥९॥
बलावमर्दस्त्वयि संनिकृष्टे
यथा गते शाम्यति शान्तशत्रौ ।
तथा समीक्ष्यात्मबलं परं च
समारभस्वास्त्रभृतां वरिष्ठ ॥ १०॥
हे अस्त्र धारण करणारांमधील श्रेष्ठ वीरा ! तुझे सर्व शत्रू शान्त झालेले आहेत. तू आपल्या आणि शत्रूच्या बळाचा विचार करून असा प्रयत्‍न कर की ज्यायोगे तू युद्धभूमीच्या निकट पोहोचताच आपल्या सेनेचा विनाश थांबून जाईल. ॥१०॥
न वीर सेना गणशश्च्यवन्ति
न वज्रमादाय विशालसारम् ।
न मारुतस्यास्ति गतिप्रमाणं
न चाग्निकल्पः करणेन हन्तुम् ॥ ११॥
हे वीरा ! तू आपल्या बरोबर सेना नेऊ नकोस. कारण सेनांचा तेथे काही एक उपयोग नाही. सैन्याच्या झुंडीच्या झुंडी जरी हनुमन्ताकडे गेल्या तरी त्याच्याशी गाठ पडली की त्या पळून जात असतात अथवा मारल्या तरी जातात. त्याचप्रमाणे अत्यन्त तीक्ष्ण आणि कठोर असलेल्या प्रचंड सामर्थ्यसंपन्न वज्राचाही काही उपयोग होणार नाही, कारण त्याच्यावर त्याचाही काही प्रभाव पडत नाही हे सिद्ध झालेले आहे. वायुपुत्र हनुमानाचे सामर्थ्य किती आहे याचा अन्दाज करता येणे अशक्य आहे आणि तो अग्नितुल्य असल्यामुळे शस्त्रादि साधनांनीही त्याचा वध करता येणे शक्य नाही. ॥११॥
तमेवमर्थं प्रसमीक्ष्य सम्यक्
स्वकर्मसाम्याद्धि समाहितात्मा ।
स्मरंश्च दिव्यं धनुषोऽस्य वीर्यं
व्रजाक्षतं कर्म समारभस्व ॥ १२॥
यासाठी मी सांगितलेल्या सर्व गोष्टीचा नीट विचार करून आणि तुझ्या स्वतःच्या पराक्रमाशी त्या वानराच्या पराक्रमाचे साम्य असल्यामुळे तू आपले चित्त एकाग्र कर, आणि त्या दिव्य धनुष्याचे सामर्थ्य लक्षात घेऊन युद्धास जा. शत्रूचा एकही वार अंगावर न घेता त्याचा पराभव करण्याचे काम सुरू कर. ॥१२॥
न खल्वियं मतिश्रेष्ठ यत्त्वां संप्रेषयाम्यहम् ।
इयं च राजधर्माणां क्षत्रस्य च मतिर्मता ॥ १३॥
हे बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ वीरा ! आताच्या प्रसंगी मी तुला या संकटात धाडीत आहे, हा माझा विचार जरी स्नेहाच्या दृष्टीने योग्य नाही आहे, तरी राजधर्म आणि क्षात्रधर्म लक्षात घेऊनच मी हा उपाय निश्चित केला आहे. ॥१३॥
नानाशस्त्रेषु संग्रामे वैशारद्यमरिन्दम ।
अवश्यमेव बोद्धव्यं काम्यश्च विजयो रणे ॥ १४॥
हे शत्रुदमना ! वीर पुरुषाने नाना प्रकारच्या शस्त्रांमध्ये आणि संग्रामामध्ये नैपुण्य अवश्य संपादन केले पाहिजे. त्याच बरोबर युद्धात विजय प्राप्त करण्याची अभिलाषा त्याने धरली पाहिजे. ॥१४॥
ततः पितुस्तद्वचनं निशम्य
प्रदक्षिणं दक्षसुतप्रभावः ।
चकार भर्तारमतित्वरेण
रणाय वीरः प्रतिपन्नबुद्धिः ॥ १५॥
आपला पिता राक्षसराज रावण याचे हे भाषण ऐकून त्या देवतुल्य पराक्रमी वीर इन्द्रजीताने रणात जाण्याचा निश्चय केला आणि अत्यन्त त्वरेने आपला जो स्वामी राक्षसराज रावण, त्याची प्रदक्षिणा केली. ॥१५॥
ततस्तैः स्वगणैरिष्टैः इन्द्रजित् प्रतिपूजितः ।
युद्धोद्धतकृतोत्साहः सग्रामं सम्प्रपद्यत ॥ १६॥
त्यानन्तर सभेमध्ये बसलेल्या आपल्या दलाच्या प्रिय राक्षसांच्या द्वारे ज्याची खूपच प्रशंसा झाली आहे, असा तो इन्द्रजीत युद्धासाठी मनात उत्साह भरून संग्राम भूमीकडे जाण्यास सज्ज झाला. ॥१६॥
श्रीमान् पद्मविलाशाक्षो राक्षसाधिपतेः सुतः ।
निर्जगाम महातेजाः समुद्र इव पर्वणि ॥ १७॥
त्या समयी प्रफुल्ल कमलदलाप्रमाणे विशाल नेत्र असलेला राक्षसराज रावणाचा पुत्र महातेजस्वी श्रीमान इन्द्रजीत पर्वकाळी वृद्धिंगत होणार्‍या, भरती येणार्‍या समुद्राप्रमाणे विशेष हर्ष आणि उत्साहाने परिपूर्ण होऊन राजमहालाच्या बाहेर पडला. ॥१७॥
स पक्षिराजोपमतुल्यवेगै-
र्व्याघ्रैश्चतुर्भिः सिततीक्ष्णदंष्ट्रैः ।
रथं समायुक्तमसह्यवेगं
समारुरोहेन्द्रजिदिन्द्रकल्पः ॥ १८॥
ज्याचा वेग शत्रूंसाठी असह्य होता तो इन्द्रासारखा पराक्रमी मेघनाद पक्षिराज गरूडासारखी तीव्र गती असलेले आणि पांढर्‍या तीक्ष्ण दाढा असणारे चार सिंह ज्याला जोडलेले होते अशा उत्तम रथावर आरूढ झाला. ॥१८॥
स रथी धन्विनां श्रेष्ठः शस्त्रज्ञोऽस्त्रविदां वरः ।
रथेनाभिययौ क्षिप्रं हनूमान् यत्र सोऽभवत् ॥ १९॥
अस्त्र-शस्त्रांचा ज्ञाता, अस्त्रवेत्त्यांच्या मध्ये अग्रगण्य असलेला, धनुर्धरामध्ये श्रेष्ठ असा तो रथी वीर रथात बसून हनुमान होता त्या दिशेकडे जाण्यास तातडीने निघाला. ॥१९॥
स तस्य रथनिर्घोषं ज्यास्वनं कार्मुकस्य च ।
निशम्य हरिवीरोऽसौ सम्प्रहृष्टतरोऽभवत् ॥ २०॥
त्याच्या रथाचा घडघडाट आणि धनुष्याच्या प्रत्यंचेचा टणत्काराचा गंभीर आवाज ऐकून वानरवीर हनुमानास अत्यन्त हर्ष झाला आणि ते उल्हासाने भरून गेले. ॥२०॥
सुमहच्चापमादाय शितशल्यांश्च सायकान् ।
हनुमन्तमभिप्रेत्य जगाम रणपण्डितः ॥ २१॥
तो इन्द्रजीत युद्धकलेत प्रवीण होता. तो धनुष्य आणि तीक्ष्ण अग्रभाग असणारे बाण घेऊन हनुमन्तास लक्ष्य करून पुढे निघाला. ॥२१॥
तस्मिंस्ततः संयति जातहर्षे
रणाय निर्गच्छति बाणपाणौ ।
दिशश्च सर्वाः कलुषा बभूवु-
र्मृगाश्च रौद्रा बहुधा विनेदुः ॥ २२॥
हृदयात हर्ष, उत्साह आणि हातात बाण घेऊन जसा तो इन्द्रजीत युद्धासाठी निघाला, तशा सर्व दिशा धुन्द होऊन गेल्या आणि भयानक पशु नानाप्रकारे अशुभसूचक आर्तनाद करू लागले. ॥२२॥
समागतास्तत्र तु नागयक्षा
महर्षयश्चक्रचराश्च सिद्धाः ।
नभः समावृत्य च पक्षिसङ्‌घा
विनेदुरुच्चैः परमप्रहृष्टाः ॥ २३॥
त्यासमयी तेथे नाग, यक्ष, महर्षि आणि नक्षत्र मंडळात विचरण करणारे सिद्धगणही उपस्थित झाले. तसेच पक्ष्यांचे समुदायही आकाशाला आच्छादित करीत अत्यन्त हर्षाने परिपूर्ण होऊन उच्च स्वराने किलबिलाट करू लागले. ॥२३॥
आयान्तं स रथं दृष्ट्‍वा तूर्णमिन्द्रध्वजं कपिः ।
ननाद च महानादं व्यवर्धत च वेगवान् ॥ २४॥
रथाबरोबर येत असलेला विशाल इन्द्रध्वज पाहताच, त्या शीघ्रतापूर्वक येणार्‍या मेघनादास पाहून वेगवान वानरवीर हनुमानांनी मोठ्‍याने गर्जना केली आणि शरीरास वृद्धिंगत केले. ॥२४॥
इन्द्रजित् स रथं दिव्यमाश्रितश्चित्रकार्मुकः ।
धनुर्विस्फारयामास तडिदूर्जितनिःस्वनम् ॥ २५॥
हे पाहून त्या दिव्य रथात बसलेला आणि अद्‍भुत धनुष्य धारण केलेल्या त्या इन्द्रजीताने विद्युल्लतेप्रमाणे तेजस्वी आणि मोठा कडकडाट करणारे ते धनुष्य खेचण्यास आरंभ केला. ॥२५॥
ततः समेतावतितीक्ष्णवेगौ
महाबलौ तौ रणनिर्विशङ्‌कौ ।
कपिश्च रक्षोऽधिपतेस्तनूजः
सुरासुरेन्द्राविव बद्धवैरौ ॥ २६॥
नन्तर देवराज इन्द्र आणि दैत्याधिपती बलीप्रमाणे परस्परांशी वैर बान्धून राहिलेले आणि संग्रामासंबन्धी निःशंक असलेले ते महाबलाढ्‍य आणि अत्यन्त जोराचे आघात करणारे ते दोघे वीर, कपिवर हनुमान आणि राक्षसाधिपती रावणपुत्र मेघनाद, एकमेकाला जाऊन भिडले. ॥२६॥
स तस्य वीरस्य महारथस्य
धनुष्मतः संयति संमतस्य ।
शरप्रवेगं व्यहनत् प्रवृद्ध-
श्चचार मार्गे पितुरप्रमेयः ॥ २७॥
अप्रमेय शक्तिशाली हनुमान विशाल देह धारण करून आपला पिता वायु याच्या मार्गावर विचरण करीत युद्धात निपुण अशा त्या धनुर्धारी महारथी वीर इन्द्रजीताने सोडलेल्या बाणांना आपल्या वेगाने निष्फळ करू लागले. ॥२७॥
ततः शरानायततीक्ष्णशल्यान्
सुपत्रिणः काञ्चनचित्रपुङ्‌खान् ।
मुमोच वीरः परवीरहन्ता
सुसन्ततान् वज्रसमानवेगान् ॥ २८॥
इतक्यात शत्रूवीरांचा संहार करणार्‍या इन्द्रजीताने दीर्घ आणि तीक्ष्ण टोक असलेले, उत्कृष्ट पंख आणि सुवर्णाचे चित्रविचित्र पंख असलेले आणि वेगामध्ये वज्राची बरोबरी करणारे असे एकसारखे अनेक बाण एका पाठोपाठ एक हनुमन्तावर सोडण्यास आरंभ केला. ॥२८॥
ततः स तत्स्यन्दननिःस्वनं च
मृदङ्‌गभेरीपटहस्वनं च ।
विकृष्यमाणस्य च कार्मुकस्य
निशम्य घोषं पुनरुत्पपात ॥ २९॥
परन्तु त्याच्या रथाचा घडघडाट, मृदुंग, भेरी आणि पडघम आदि वाद्यांचा घोष आणि खेंचले जाणार्‍या धनुष्याचा टणत्कार ऐकून त्या वानरानी पुनरपि आकाशात उड्डाण केले. ॥२९॥
शराणामन्तरेष्वाशु व्यावर्तत महाकपिः ।
हरिस्तस्याभिलक्ष्यस्य मोक्षयँल्लक्ष्यसंग्रहम् ॥ ३०॥
नन्तर नेम धरण्यात निष्णान्त असलेल्या त्या इन्द्रजीताचा नेम चुकविण्यासाठी तो महाकपि हनुमान इन्द्रजीताने सोडलेल्या बाणांच्या अन्तराळामध्ये मोठ्‍या चलाखीने हिंडू लागला. ॥३०॥
शराणामग्रतस्तस्य पुनः समभिवर्तत ।
प्रसार्य हस्तौ हनुमानुत्पपातानिलात्मजः ॥ ३१॥
वायुपुत्र हनुमान वारंवार त्याच्या बाणांच्या पुढे येऊन उभे राहात आणि नन्तर दोन्ही हात पसरून बघता बघता उड्‍डाण करून निघून जात. ॥३१॥
तावुभौ वेगसम्पन्नौ रणकर्मविशारदौ ।
सर्वभूतमनोग्राहि चक्रतुर्युद्धमुत्तमम् ॥ ३२॥
युद्धशास्त्रात निपुण असलेल्या त्या दोघा वेगवान वीरांनी, मारूती आणि इन्द्रजीतांनी सर्व प्राणीमात्रांना आकर्षित करणारे उत्तम युद्ध करण्यास सुरूवात केली. ॥३२॥
हनूमतो वेद न राक्षसोऽन्तरं
न मारुतिस्तस्य महात्मनोऽन्तरम् ।
परस्परं निर्विषहौ बभूवतुः
समेत्य तौ देवसमानविक्रमौ ॥ ३३॥
तो राक्षस हनुमन्तावर प्रहार करण्याची सन्धि साधू शकत नव्हता आणि पवनपुत्र हनुमानासही त्या वीरास पकडून जेर करण्याची सन्धि प्राप्त होत नव्हती. दोघांनाही एकमेकांच्या बळाचा, सामर्थ्याचा अन्दाज लागत नव्हता, ते परस्परांच्या मनान्तील विचार ही जाणू शकत नव्हते. ते उभयतांही देवतुल्य पराक्रमी वीर परस्परांशी भिडून परस्परांवर असह्य आघात करून लढू लागले. ॥३३॥
ततस्तु लक्ष्ये स विहन्यमाने
शरेष्वमोघेषु च सम्पतत्सु ।
जगाम चिन्तां महतीं महात्मा
समाधिसंयोगसमाहितात्मा ॥ ३४॥
नन्तर इन्द्रजीताचे लक्ष्याच्या स्थानी असलेले हनुमान सारखे इकडेतिकडे संचार करू लागल्याने त्यांच्यावर धरलेला नेम व्यर्थ जाऊन इन्द्रजिताचे अमोघ बाण व्यर्थ ठरून कोठे तरी पडू लागले, तेव्हा सदा एकाग्रचित्त राहणार्‍या त्या महामनस्वी वीराला मोठी चिन्ता उत्पन्न झाली. ॥३४॥
ततो मतिं राक्षसराजसूनु-
श्चकार तस्मिन् हरिवीरमुख्ये ।
अवध्यतां तस्य कपेः समीक्ष्य
कथं निगच्छेदिति निग्रहार्थम् ॥ ३५॥
त्या कपिश्रेष्ठाला अवध्य समजून राक्षसराजकुमार मेघनाद वानरवीरांमध्ये प्रमुख हनुमन्तांच्या विषयी असा विचार करू लागला की याला कुठल्याही प्रकारे कैद केला पाहिजे परन्तु हा माझ्या पकडीत कशा प्रकारे बरे येऊ शकेल ? ॥३५॥
ततः पैतामहं वीरः सोऽस्त्रमस्त्रविदां वरः ।
सन्दधे सुमहातेजाः तं हरिप्रवरं प्रति ॥ ३६॥
नन्तर अस्त्रवेत्त्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या त्या महातेजस्वी वीराने हनुमन्तास लक्ष्य करून आपल्या धनुष्यावर पितामह ब्रह्मदेवांनी दिलेल्या अस्त्राचा प्रयोग केला. ॥३६॥
अवध्योऽयमिति ज्ञात्वा तमस्त्रेणास्त्रतत्त्ववित् ।
निजग्राह महाबाहुं मारुतात्मजमिन्द्रजित् ॥ ३७॥
अस्त्रतत्त्वांचा ज्ञाता असलेल्या इन्द्रजिताने मारूतसुताला अवध्य जाणून त्याला त्या अस्त्राने बान्धून टाकले. ॥३७॥
तेन बद्धस्ततोऽस्त्रेण राक्षसेन स वानरः ।
अभवन्निर्विचेष्टश्च पपात च महीतले ॥ ३८॥
राक्षसाच्या द्वारे त्या अस्त्राने बांधला गेल्यावर वानरवीर हनुमान निश्चेष्ट होऊन खाली पृथ्वीवर पडले. ॥३८॥
ततोऽथ बुद्ध्वा स तदस्त्रबन्धं
प्रभोः प्रभावाद् विगताल्पवेगः ।
पितामहानुग्रहमात्मनश्च
विचिन्तयामास हरिप्रवीरः ॥ ३९॥
आपल्याला ब्रह्मास्त्राने बद्ध केले गेले आहे हे जाणूनही त्या पितामह ब्रह्मदेवाच्या अनुग्रहामुळे भगवान ब्रह्मदेवाच्या प्रभावाने हनुमन्ताना थोडीशी सुद्धा पीडा झाली नाही. ते प्रमुख वानरवीर आपल्यावरील ब्रह्मदेवाच्या महान अनुग्रहाचा विचार करू लागले. ॥३९॥
ततः स्वायम्भुवैर्मन्त्रैर्ब्रह्मास्त्रं चाभिमन्त्रितम् ।
हनूमांश्चिन्तयामास वरदानं पितामहात् ॥ ४०॥
ज्या मन्त्राची देवता साक्षात स्वयंभू ब्रह्मा आहे, त्या मन्त्राने अभिमन्त्रित झालेले ते ब्रह्मास्त्र पाहताच हनुमानास पितामह ब्रह्मदेवाने आपल्याला दिलेल्या वरदानाचे स्मरण झाले (ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला होता की माझे अस्त्र तुला एकाच मुहूर्तात आपल्या बन्धनातून मुक्त करील) ॥४०॥
न मेऽस्य बन्धस्य च शक्तिरस्ति
विमोक्षणे लोकगुरोः प्रभावात् ।
इत्येवमेवं विहितोऽस्त्रबन्धो
मयाऽऽत्मयोनेरनुवर्तितव्यः ॥ ४१॥
नन्तर ते विचार करू लागले की लोकगुरु ब्रह्माच्या प्रभावाने ब्रह्मास्त्राच्या बन्धनातून मुक्त होण्याचे सामर्थ्य मला नाही असे समजूनच इन्द्रजिताने मला या प्रकारे बान्धले आहे, तथापि भगवान ब्रह्मदेवाच्या सन्मानार्थ मला या अस्त्रबन्धनाचे अनुसरण केले पाहिजे. ॥४१॥
स वीर्यमस्त्रस्य कपिर्विचार्य
पितामहानुग्रहमात्मनश्च ।
विमोक्षशक्तिं परिचिन्तयित्वा
पितामहाज्ञामनुवर्तते स्म ॥ ४२॥
याप्रमाणे अस्त्राचे सामर्थ्य, त्याबद्दल ब्रह्मदेवाचा आपल्यावर झालेला अनुग्रह आणि त्या अस्त्राच्या बन्धनातून सुटण्याचे आपले सामर्थ्य या सर्व गोष्टींचा विचार करून शेवटी ब्रह्मदेवाच्या आज्ञेचेच अनुसरण केले. ॥४२॥
अस्त्रेणापि हि बद्धस्य भयं मम न जायते ।
पितामहमहेन्द्राभ्यां रक्षितस्यानिलेन च ॥ ४३॥
ते मनात म्हणाले की ब्रह्मा, इन्द्र आणि वायु यांनी माझे रक्षण केले असल्यामुळे या अस्त्राने जरी मी बद्ध झालो आहे तरी मला काहीही भीती नाही. ॥४३॥
ग्रहणे चापि रक्षोभिर्महन्मे गुणदर्शनम् ।
राक्षसेन्द्रेण संवादस्तस्माद् गृह्णन्तु मां परे ॥ ४४॥
परन्तु राक्षसांनी मला बान्धून नेले तर राक्षसराज रावणाशी मला बोलतां येईल हा एक मोठाच लाभ होईल यासाठी शत्रु मला खुशाल अस्त्राने बान्धून नेऊ देत. ॥४४॥
स निश्चितार्थः परिवीरहन्ता
समीक्ष्यकारी विनिवृत्तचेष्टः ।
परैः प्रसह्याभिगतैर्निगृह्य
ननाद तैस्तैः परिभर्त्स्यमानः ॥ ४५॥
याप्रमाणे कोणतेही कार्य विचारपूर्वक करणारे ते शत्रूवीरांचे संहारक हनुमान वरील प्रमाणे मनाचा निश्चय करून तसेच निश्चेष्ट पडून राहिले. तेव्हा तर शत्रूनी जवळ येऊन त्यांच्यावर सर्वबाजूनी हल्ला करून त्यांना धरले आणि ते त्यांची निर्भत्सना करू लागले, त्यावेळी जणु फार कष्ट होत आहेत याप्रकारे हनुमान ओरडू लागले. ॥४५॥
ततस्ते राक्षसा दृष्ट्‍वा विनिश्चेष्टमरिन्दमम् ।
बबन्धुः शणवल्कैश्च द्रुमचीरैश्च संहतैः ॥ ४६॥
त्या राक्षसांनी जेव्हा पाहिले की हा निश्चेष्ट पडला असून हातपाय हलवीत नाही आहे, तेव्हा त्यांनी त्याला झाडाच्या एकत्र केलेल्या सालींनी आणि तागाच्या दोर्‍यांनी बान्धले. ॥४६॥
स रोचयामास परैश्च बन्धं
प्रसह्य वीरैरभिगर्हणं च ।
कौतूहलान्मां यदि राक्षसेन्द्रो
द्रष्टुं व्यवस्येदिति निश्चितार्थः ॥ ४७॥
शत्रुपक्षीय वीर राक्षसांनी बलात्काराने केलेले बन्धन आणि निर्भत्सना हे त्यावेळी सर्व हनुमन्तास आपल्या कार्यासाठी उचित वाटले म्हणून त्यांनी ते सहन केले. त्यांच्या मनात विचार आल की माझा पराक्रम ऐकून आणि माझ्याविषयीच्या कुतूहलामुळे स्वाभाविकच राक्षसराज रावण एकदा तरी मला पहाण्याची इच्छा करेल. ॥४७॥
स बद्धस्तेन वल्केन विमुक्तोऽस्त्रेण वीर्यवान् ।
अस्त्रबन्धः स चान्यं हि न बन्धमनुवर्तते ॥ ४८॥
तो पराक्रमी हनुमान वल्कलाच्या दोरीने वगैरे बांधला गेल्यामुळे आपोआपच त्या ब्रह्मास्त्राच्या बन्धनातून मुक्त झाला होता कारण दुसरा बंध प्राप्त झाला असता ब्रह्मास्त्राचा बंध टिकू शकत नाही, असा नियम आहे. ॥४८॥
अथेन्द्रजित् तं द्रुमचीरबद्धं
विचार्य वीरः कपिसत्तमं तम् ।
विमुक्तमस्त्रेण जगाम चिन्ता-
मन्येन बद्धोऽप्यनुवर्ततेऽस्त्रम् ॥ ४९॥

अहो महत् कर्म कृतं निरर्थं
न राक्षसैर्मन्त्रगतिर्विमृष्टा ।
पुनश्च नास्त्रे विहतेऽस्त्रमन्यत्
प्रवर्तते संशयिताः स्म सर्वे ॥ ५०॥
वीर इन्द्रजिताने जेव्हा पाहिले की हा वानरशिरोमणी तर केवळ वृक्षांच्या सालीनी बांधला गेला आहे, दिव्यास्त्राच्या बंधनातून तो मुक्त झाला आहे तेव्हा त्याला मोठी चिन्ता उत्पन्न झाली. तो विचार करू लागला की दुसर्‍या वस्तूनी बांधला जाऊनही हा अस्त्रबंधनाने बांधला गेल्याप्रमाणे दाखवीत आहे. ओह ! या राक्षसांनी मी केलेले फार मोठे कार्य व्यर्थ करून टाकले आहे. यांनी मन्त्राच्या सामर्थ्यासंबंधी त्याचा प्रयोग केला जाऊ शकत नाही. आता तर विजयी होऊनही आम्ही सर्व संशयात पडलो आहोत. ॥४९-५०॥
अस्त्रेण हनुमान् मुक्तो नात्मानमवबुध्यते ।
कृष्यमाणस्तु रक्षोभिस्तैश्च बन्धैर्निपीडितः ॥ ५१॥

हन्यमानस्ततः क्रूरै राक्षसैः कालमुष्टिभिः ।
समीपं राक्षसेन्द्रस्य प्रकृष्यत स वानरः ॥ ५२॥
हनुमान जरी अस्त्राच्या बन्धनातून मुक्त झालेला होता तरी त्याने असे वर्तन केले की जणु काही तो ही गोष्ट जाणतच नाही. क्रूर राक्षस त्याला बंधनांनी पीडा देत आणि काळाप्रमाणे ज्यांच्या मुठी भयंकर आहेत त्यांनी मारीत मारीत खेचत घेऊन निघाले. याप्रकारे त्या वानरवीराला राक्षसराज रावणाच्या समीप आणण्यात आले. ॥५१-५२॥
अथेन्द्रजित् तं प्रसमीक्ष्य मुक्त-
मस्त्रेण बद्धं द्रुमचीरसूत्रैः ।
व्यदर्शयत् तत्र महाबलं तं
हरिप्रवीरं सगणाय राज्ञे ॥ ५३॥
तेव्हा इन्द्रजिताने त्या महाबलाढ्‍य वानरवीरास ब्रह्मास्त्रापासून मुक्त आणि वृक्षांच्या वल्कलांच्या दोर्‍यांनी बान्धलेला पाहून त्यास तेथे सभासदगणांसह बसलेल्या राजा रावणासमोर उपस्थित केले) ॥५३॥
तं मत्तमिव मातङ्‌गं बद्धं कपिवरोत्तमम् ।
राक्षसा राक्षसेन्द्राय रावणाय न्यवेदयन् ॥ ५४॥
मत्त हत्तीप्रमाणे बद्ध झालेला तो वानरश्रेष्ठ हनुमान, राक्षसांनी राक्षसाधिपती रावणाच्या सेवेत समर्पित केला. ॥५४॥
कोऽयं कस्य कुतो वापि किं कार्यं कोऽभ्युपाश्रयः ।
इति राक्षसवीराणां तत्र सञ्जज्ञिरे कथाः ॥ ५५॥
त्यास पाहून राक्षसवीर आपापसात म्हणू लागले - हा कोण आहे ? कुणाचा पुत्र अथवा सेवक आहे ? कोठून आला आहे ? येथे याचे काय काम आहे ? तसेच याला आश्रय देणारा कोण आहे ? ॥५५॥
हन्यतां दह्यतां वापि भक्ष्यतामिति चापरे ।
राक्षसास्तत्र संक्रुद्धाः परस्परमथाब्रुवन् ॥ ५६॥
दुसरे काही राक्षस जे अत्यन्त क्रोधाविष्ट झालेले होते ते परस्परात या प्रमाणे बोलू लागले - या वानराला मारून टाका, जाळून टाका अथवा खाऊन टाका. ॥५६॥
अतीत्य मार्गं सहसा महात्मा
स तत्र रक्षोधिपपादमूले ।
ददर्श राज्ञः परिचारवृद्धान्
गृहं महारत्‍नाविभूषितं च ॥ ५७॥
मधल्या मार्गाचे आक्रमण करून महात्मा हनुमान ज्यावेळी एकाएकी राक्षसराज रावणाच्या जवळ पोहोचला, त्यावेळी त्याने त्याच्या पायापाशी बसलेले त्या राजाचे वृद्ध सेवक आणि बहूमूल्य रत्‍नांनी भूषित केलेले रावणाचे सभागृह पाहिले. ॥५७॥
स ददर्श महातेजा रावणः कपिसत्तमम् ।
रक्षोभिर्विकृताकारैः कृष्यमाणमितस्ततः ॥ ५८॥
आणि आक्राळ विक्राळ रूपे असलेले राक्षस ज्याला इकडून तिकडे ओढीत आहेत अशा त्या वानरश्रेष्ठाला हनुमानाला त्या महातेजस्वी रावणाने पाहिले. ॥५८॥
राक्षसाधिपतिं चापि ददर्श कपिसत्तमः ।
तेजोबलसमायुक्तं तपन्तमिव भास्करम् ॥ ५९॥
त्या कपिश्रेष्ठ हनुमानांनीही सूर्याप्रमाणे प्रकाशित झालेल्या त्या तेजस्वी आणि बलाढ्‍य राक्षसाधिपती रावणाला पाहिले. ॥५९॥
स रोषसंवर्तितताम्रदृष्टि-
र्दशाननस्तं कपिमन्ववेक्ष्य ।
अथोपविष्टान् कुलशीलवृद्धान्
समादिशत् तं प्रति मन्त्रिमुख्यान् ॥ ६०॥
त्या कपि हनुमन्ताला पहाताच क्रोधाने दशमुख रावणाचे डोळे चंचल आणि लाल होऊन गेले. त्याने तेथे बसलेल्या कुलीन सुशील अशा श्रेष्ठ मुख्य मन्त्र्यांना त्याचा परिचय विचारण्याची आज्ञा केली. ॥६०॥
यथाक्रमं तैः स कपिश्च पृष्टः
कार्यार्थमर्थस्य च मूलमादौ ।
निवेदयामास हरीश्वरस्य
दूतः सकाशादहमागतोऽस्मि ॥ ६१॥
त्या सर्वांनी प्रथम क्रमशः कपिवर हनुमन्तास त्याचे कार्य प्रयोजन तसेच त्याचे मूळ कारण यासंबन्धी प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी असे सांगितले की " मी वानरराजा सुग्रीवाकडून त्यांचा दूत म्हणून येथे आलो आहे" ॥६१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे अष्टचत्वारिंशः सर्गः ॥ ४८॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा अठ्‍ठेचाळिसावा सर्ग पूर्ण झाला. ॥४८॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP