श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ सप्तविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सेनासहितस्य रावणस्य इन्द्रलोकोपरि समाक्रमणम्, इन्द्रेण विष्णुं प्रति साहाय्यार्थं प्रार्थनं, रावणं भाविनि काले हनिष्यसीति प्रतिज्ञाय विष्णुना इन्द्रस्य निवर्तनं, देवैः सह रक्षसां युद्धं, वसुना सुमालिनो वधश्च -
सेनेसहित रावणाचे इंद्रलोकावर आक्रमण, इंद्राची भगवान्‌ विष्णुना सहायतेसाठी प्रार्थना, भविष्यात रावण-वधाची प्रतिज्ञा करून विष्णुंनी इंद्रास परत धाडणे, देवता आणि राक्षसांचे युद्ध तसेच वसुद्वारा सुमालीचा वध -
कैलासं लङ्‌घयित्वा तु ससैन्यबलवाहनः ।
आससाद महातेजा इन्द्रलोकं दशाननः ॥ १ ॥
कैलास पर्वताला पार करून महातेजस्वी दशमुख रावण सेना आणि वाहनांसह इंद्रलोकामध्ये जाऊन पोहोचला. ॥१॥
तस्य राक्षससैन्यस्य समन्तादुपयास्यतः ।
देवलोकं ययौ शब्दो मथ्यमानार्णवोपमः ॥ २ ॥
सर्व बाजूने येणार्‍या राक्षस-सेनेचा कोलाहल देवलोकात, जणु महासागराच्या मंथनाने प्रकट होणार्‍या शब्दाप्रमाणे भासत होता. ॥२॥
श्रुत्वा तु रावणं प्राप्तं इन्द्रश्चलित आसनात् ।
अब्रवीत् तत्र तान् देवान् सर्वानेव समागतान् ॥ ३ ॥
रावणाचे आगमन ऐकून इंद्र आपल्या आसनावरून उठले आणि आपल्या जवळ आलेल्या देवतांना म्हणाले - ॥३॥
आदित्यांश्च वसून् रुद्रान् साध्यांश्च स मरुद्‌गणान् ।
सज्जा भवत युद्धार्थं रावणस्य दुरात्मनः ॥ ४ ॥
त्यांनी आदित्य, वसु, रूद्र, साध्य आणि मरूद्‌गणांनाही म्हटले - तुम्ही सर्व लोक दुरात्मा रावणाशी युद्ध करण्यासाठी तयार व्हा. ॥४॥
एवमुक्तास्तु शक्रेण देवाः शक्रसमा युधि ।
सन्नह्य सुमहासत्त्वा युद्धश्रद्धासमन्विताः ॥ ५ ॥
इंद्रांनी असे म्हटल्यावर युद्धात त्यांच्या समान पराक्रम प्रकट करणार्‍या महाबली देवता कवच आदि धारण करून युद्धासाठी उत्सुक झाल्या. ॥५॥
स तु दीनः परित्रस्तो महेन्द्रो रावणं प्रति ।
विष्णोः समीपमागत्य वाक्यमेतदुवाच ह ॥ ६ ॥
देवराज इंद्राला रावणापासून भय वाटत होते. म्हणून ते दुःखी होऊन भगवान्‌ विष्णुंच्या जवळ आले आणि याप्रकारे बोलले - ॥६॥
विष्णो कथं करिष्यामि रावणं राक्षसं प्रति ।
अहोऽतिबलवद् रक्षो युद्धार्थमभिवर्तते ॥ ७ ॥
विष्णुदेव ! मी राक्षस रावणासाठी काय करूं ? अहो ! तो अत्यंत बलशाली निशाचर माझ्याशी युद्ध करण्यासाठी येत आहे. ॥७॥
वरप्रदानाद् बलवान् न खल्वन्येन हेतुना ।
तत्तु सत्यवचः कार्यं यदुक्तं पद्मयोनिना ॥ ८ ॥
तो केवळ ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे प्रबळ झाला आहे. दुसर्‍या कुठल्या हेतूने नाही. कमलयोनी ब्रह्मदेवांनी जो वर दिलेला आहे तो सत्य करणे आपले सर्वांचे काम आहे. ॥८॥
तद् यथा नमुचिर्वृत्रो बलिर्नरकशम्बरौ ।
त्वद्‌बलं समवष्टभ्य मया दग्धास्तथा कुरु ॥ ९ ॥
म्हणून पूर्वी जसे आपल्या बळाचा आश्रय घेऊन मी नमुचि, वृत्रासुर, बलि, नरक आणि शंबर आदि असुरांना दग्ध करून टाकले होते, त्याच प्रकारे या समयीही या असुराचा अंत होईल असा काही उपाय आपणच करावा. ॥९॥
नह्यन्यो देवदेवेश त्वामृते मधुसूदन ।
गतिः परायणं चापि त्रैलोक्ये सचराचरे ॥ १० ॥
मधूसूदन ! आपण देवांचेही देव एवं ईश्वर आहात. या चराचर त्रिभुवनात आपल्या शिवाय दुसरा असा कोणीही नाही आहे जो आम्हा देवतांना आश्रय देऊ शकेल. आपणच आमचे परम आश्रय आहात. ॥१०॥
त्वं हि नारायणः श्रीमान् पद्मनाभः सनातनः ।
त्वयेमे स्थापिता लोकाः शक्रश्चाहं सुरेश्वरः ॥ ११ ॥
आपण पद्मनाभ आहात. आपल्याच नाभिकमलांतून जगाची उत्पत्ति झाली आहे. आपणच सनातन देव श्रीमान नारायण आहात. आपणच या तीन्ही लोकांना स्थापित केले आहे आणि आपणच मला देवराज इंद्र बनविले आहे. ॥११॥
त्वया सृष्टमिदं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ।
त्वामेव भगवन् सर्वे प्रविशन्ति युगक्षये ॥ १२ ॥
भगवन्‌ ! आपणच स्थावर-जंगम प्राण्यांसहित या समस्त त्रैलोक्याची सृष्टि केली आहे आणि प्रलयकाळात संपूर्ण आपल्यातच प्रवेश करतात. ॥१२॥
तदाचक्ष्व यथा तत्त्वं देवदेव मम स्वयम् ।
असिचक्रसहायस्त्वं योत्स्यसे रावणं प्रति ॥ १३ ॥
म्हणून देवधिदेवा ! आपण मला काही ऐसा अमोघ उपाय सांगावा, ज्यायोगे माझा विजय होईल. काय आपण स्वतः चक्र आणि तलवार घेऊन रावणाशी युद्ध कराल ? ॥१३॥
एवमुक्तः स शक्रेण देवो नारायणः प्रभुः ।
अब्रवीन्न परित्रासः कर्तव्यः श्रूयतां च मे ॥ १४ ॥
इंद्रांनी असे म्हटल्यावर भगवान्‌ नारायणदेव म्हणाले - देवराज ! तुम्ही भय बाळगता कामा नये. माझे म्हणणे ऐका - ॥१४॥
न तावदेष दुष्टात्मा शक्यो जेतुं सुरासुरैः ।
हन्तुं चापि समासाद्य वरदानेन दुर्जयः ॥ १५ ॥
पहिली गोष्ट ही आहे की ह्या दुष्टात्मा रावणास संपूर्ण देवता आणि असुर मिळूनही मारू शकत नाहीत आणि परास्त करू शकत नाहीत, कारण वरदान मिळाल्याने हा या समयी दुर्जय झालेला आहे. ॥१५॥
सर्वथा तु महत्कर्म करिष्यति बलोत्कटः ।
राक्षसः पुत्रसहितो दृष्टमेतन्निसर्गतः ॥ १६ ॥
आपल्या पुत्रासह आलेला हा उत्कट बलशाली राक्षस सर्वप्रकारे महान्‌ पराक्रम प्रकट करील ही गोष्ट मला आपल्या स्वाभाविक ज्ञानदृष्टिने दिसून येत आहे. ॥१६॥
यत्तु मां त्वमभाषिष्ठा युध्यस्वेति सुरेश्वर ।
नाहं तं प्रतियोत्स्यामि रावणं राक्षसं युधि ॥ १७ ॥
सुरेश्वर ! दुसरी गोष्ट जी मला सांगायची आहे ती याप्रकारे आहे - तू जो मला सांगत आहेस की आपणच याच्या बरोबर युद्ध करावे याच्या उत्तरात मला म्हणायचे आहे की मी या समयी युद्धस्थळी राक्षस रावणाचा सामना करण्यासाठी जाणार नाही. ॥१७॥
नाहत्वा समरे शत्रुं विष्णुः प्रतिनिवर्तते ।
दुर्लभश्चैव कामोऽद्य वरगुप्ताद्धि रावणात् ॥ १८ ॥
माझा विष्णुचा हा स्वभाव आहे की मी संग्रामात शत्रुचा वध केल्याशिवाय मागे परत येत नाही. परंतु यासमयी रावण वरदानामुळे सुरक्षित आहे, म्हणून त्याच्या द्वारे माझ्या या विजयसंबंधी इच्छेची पूर्ती होणे कठीण आहे. ॥१८॥
प्रतिजाने च देवेन्द्र त्वत्समीपे शतक्रतो ।
भविताऽस्मि यथास्याहं रक्षसो मृत्युकारणम् ॥ १९ ॥
परंतु देवेंद्र ! शतक्रतो ! मी तुझ्या समीप या गोष्टीची प्रतिज्ञा करतो की वेळ येताच मीच या राक्षसाच्या मृत्युचे कारण बनेन. ॥१९॥
अहमेव निहन्तास्मि रावणं सपुरःसरम् ।
देवता नन्दयिष्यामि ज्ञात्वा कालमुपागतम् ॥ २० ॥
मीच रावणास त्याच्या अग्रगामी सैनिकांसहित मारीन आणि देवतांना आनंदित करीन, परंतु ज्यावेळी याच्या मृत्युचा समय येऊन ठेपला आहे हे मी जाणेन तेव्हाच हे होईल. ॥२०॥
एतत्ते कथितं तत्त्वं देवराज शचीपते ।
युद्ध्यस्व विगतत्रासः सर्वैः सार्धं महाबल ॥ २१ ॥
देवराज ! या सर्व गोष्टी मी तुला यथावत्‌ सांगितल्या आहेत. महाबलशाली शचीवल्लभा ! या समयी तर तुम्ही देवतांसहित जाऊन त्या राक्षसा बरोबर निर्भयपणे युद्ध करा. ॥२१॥
ततो रुद्राः सहादित्या वसवो मरुतोऽश्वनौ ।
सन्नद्धा निर्ययुस्तूर्णं राक्षसानभितः पुरात् ॥ २२ ॥
त्यानंतर रूद्र, आदित्य, वसु, मरूद्‌गण आणि अश्विनीकुमार आदि देवता युद्धासाठी तयार होऊन त्वरित अमरावतीपुरीतून बाहेर पडल्या आणि राक्षसांचा सामना करण्यासाठी पुढे निघाल्या. ॥२२॥
एतस्मिन्नन्तरे नादः शुश्रुवे रजनीक्षये ।
तस्य रावणसैन्यस्य प्रयुद्धस्य समन्ततः ॥ २३ ॥
इतक्यात रात्र संपता संपता सर्व बाजूनी युद्धासाठी उद्यत झालेल्या रावणाच्या सेनेचा महान्‌ कोलाहल ऐकू येऊ लागला. ॥२३॥
ते प्रयुद्धा महावीर्या अन्योन्यमभिवीक्ष्य वै ।
संग्राममेवाभिमुखा अभवर्तन्त हृष्टवत् ॥ २४ ॥
ते महापराक्रमी राक्षस सैनिक सकाळी उठल्यावर एक-दुसर्‍याकडे पहात मोठ्‍या हर्षाने आणि उत्साहाने युद्धासाठीच पुढे कूच करू लागले. ॥२४॥
ततो दैवतसैन्यानां संक्षोभः समजायत ।
तदक्षयं महासैन्यं दृष्ट्‍वा समरमूर्धनि ॥ २५ ॥
त्यानंतर युद्धाच्या तोंडावरच राक्षसांची ती अनंत तसेच विशाल सेना पाहून देवतांच्या सेनेमध्ये फार क्षोभ उत्पन्न झाला. ॥२५॥
ततो युद्धं समभवद् देवदानवरक्षसाम् ।
घोरं तुमुलनिर्ह्रादं नानाप्रहरणोद्यतम् ॥ २६ ॥
नंतर तर देवतांचे दानव आणि राक्षसांबरोबर फार भयंकर युद्ध जुंपले. भयंकर कोलाहल होऊ लागला आणि दोन्ही बाजूनी नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांचा वर्षाव होण्यास आरंभ झाला. ॥२६॥
एतस्मिन्नन्तरे शूरा राक्षसा घोरदर्शनाः ।
युद्धार्थं समवर्तन्त सचिवा रावणस्य ते ॥ २७ ॥
यासमयी रावणाचे मंत्री शूरवीर राक्षस, जे फार भयंकर दिसत होते, युद्धासाठी पुढे सरसावले. ॥२७॥
मारीचश्च प्रहस्तश्च महापार्श्वमहोदरौ ।
अकम्पनो निकुम्भश्च शुकः सारण एव च ॥ २८ ॥

संह्रादो धूमकेतुश्च महादंष्ट्रो घटोदरः ।
जम्बुमाली महाह्रादो विरूपाक्षश्च राक्षसः ॥ २९ ॥

सुप्तघ्नो यज्ञकोपश्च दुर्मुखो दूषणः खरः ।
त्रिशिराः करवीराक्षः सूर्यशत्रुश्च राक्षसः ॥ ३० ॥

महाकायोऽतिकायश्च देवान्तक नरान्तकौ ।
एतैः सर्वैः परिवृतो महावीर्यैः महाबलः ॥ ३१ ॥

रावणस्यार्यकः सैन्यं सुमाली प्रविवेश ह ।
मारीच, प्रहस्त, महापार्श्व, महोदर, अकंपन, निकुम्भ, शुक, सारण, संह्वाद, धूमकेतु, महादंष्ट्र, घटोदर, जंबुमाली, महाह्राद, विरूपाक्ष, सुप्तघ्न, यज्ञकोप, दुर्मुख, दूषण, खर, त्रिशिरा, करवीराक्ष, सूर्यशत्रु, महाकाय अतिकाय, देवान्तक तसेच नरान्तक - या सर्व महापराक्रमी राक्षसांनी घेरलेल्या महाबली सुमालीने, जो रावणाचा आजोबा होता, देवतांच्या सेनेमध्ये प्रवेश केला. ॥२८-३१ १/२॥
स दैवतगणान् सर्वान् नानाप्रहरणैः शितैः ॥ ३२ ॥

व्यध्वंसयत् समं क्रुद्धो वायुर्जलधरानिव ।
त्याने कुपित होऊन नाना प्रकारच्या तीक्ष्ण अस्त्रा-शस्त्रांच्या द्वारा समस्त देवतांना, वायु जसा मेघांना छिन्न-भिन्न करून टाकतो त्याप्रमाणे मारून पिटाळून लावले. ॥३२ १/२॥
तद् दैवतबलं राम हन्यमानं निशाचरैः ॥ ३३ ॥

प्रणुन्नं सर्वतो दिग्भ्यः सिंहनुन्ना मृगा इव ।
श्रीरामा ! निशाचरांचा मार खाऊन देवतांची सेना, सिंह द्वारा पिटाळल्या गेलेल्या मृगांप्रमाणे सर्व दिशांमध्ये पळून गेली. ॥३३ १/२॥
एतस्मिन्नन्तरे शूरो वसूनामष्टमो वसुः ॥ ३४ ॥

सावित्र इति विख्यातः प्रविवेश रणाजिरम् ।
याच समयी वसुंमधले आठवे वसु, ज्यांचे नाम सावित्र आहे, त्यांनी समरांगणात प्रवेश केला. ॥३४ १/२॥
सैन्यैः परिवृतो हृष्टैः नानाप्रहरणोद्यतैः ॥ ३५ ॥

त्रासयन् शत्रुसैन्यानि प्रविवेश रणाजिरम् ।
ते नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांनी सुसज्जित तसेच उत्साहित सैनिकांनी घेरलेले होते. त्यांनी शत्रुसेनांना संत्रस्त करीत रणभूमीमध्ये पदार्पण केले. ॥३५ १/२॥
तथाऽऽदित्यौ महावीर्यौ त्वष्टा पूषा च तौ समम् ॥ ३६ ॥

निंर्भयौ सह सैन्येन तदा प्राविशतां रणे ।
यांच्या शिवाय अदितीचे दोन महापराक्रमी पुत्र त्वष्टा आणि पूषा यांनाही आपल्या सेनेसह एकाच वेळी युद्धस्थळी प्रवेश केला. ते दोघे वीर निर्भय होते. ॥३६ १/२॥
ततो युद्धं समभवत् दुराणां सह राक्षसैः ॥ ३७ ॥

क्रुद्धानां रक्षसां कीर्तिं समरेष्वनिवर्तिनाम् ।
नंतर तर देवतांचे राक्षसांशी घोर युद्ध सुरू झाले. युद्धात मागे न सरणार्‍या राक्षसांची वाढती कीर्ति पाहून, ऐकून देवता त्यांच्यावर फारच कुपित झाल्या. ॥३७ १/२॥
ततस्ते राक्षसाः सर्वे विबुधान् समरे स्थितान् ॥ ३८ ॥

नानाप्रहरणैर्घोरैः जघ्नुः शतसहस्रशः ।
देवाश्च
त्यानंतर समस्त राक्षस रणभूमीमध्ये उभ्या असलेल्या लाखो देवतांना नाना प्रकारच्या घोर अस्त्र-शस्त्रांच्या द्वारा मारू लागले. ॥३८ १/२॥
राक्षसान् घोरान् महाबलपराक्रमान् ॥ ३९ ॥

समरे विमलैः शस्त्रैः उपनिन्युर्यमक्षयम् ।
याच प्रकारे देवताही महान बल-पराक्रमाने संपन्न घोर राक्षसांना समरांगणात चमकणार्‍या अस्त्र-शस्त्रांचा मारा मारून यमलोकास पाठवू लागल्या. ॥३९ १/२॥
एतस्मिन्नन्तरे राम सुमाली नाम राक्षसः ॥ ४० ॥

नानाप्रहरणैः क्रुद्धः तत्सैन्यं सोऽभ्यवर्तत ।
स दैवतबलं सर्वं नानाप्रहणैः शितैः ॥ ४१ ॥

व्यध्वंसयत सङ्‌क्रुद्धो वायुर्जलधरं यथा ।
रामा ! इतक्यात सुमाली नामक राक्षसाने कुपित होऊन नाना प्रकारच्या आयुधांच्या द्वारा देवसेनेवर आक्रमण केले. त्याने अत्यंत क्रोधाने भरून ढगांना छिन्न-भिन्न करून टाकणार्‍या वायुसमान समस्त देवसेनेला अस्ताव्यस्त करून टाकले. ॥४०-४१ १/२॥
ते महाबाणवर्षैश्च शूलप्रासैः सुदारुणैः ॥ ४२ ॥

हन्यमानाः सुराः सर्वे न व्यतिष्ठन्त संहताः ।
त्याचे महान्‌ बाण आणि भयंकर शूल आणि प्रास यांच्या वृष्टिने मारल्या जाणार्‍या सर्व देवता युद्धक्षेत्रात संघटित होऊन उभ्या राहू शकल्या नाहीत. ॥४२ १/२॥
ततो विद्राव्यमाणेषु दैवतेषु सुमालिना ॥ ४३ ॥

वसूनामष्टमः क्रुद्धः सावित्रो वै व्यवस्थितः ।
संवृतः स्वैरथानीकैः प्रहरन्तं निशाचरम् ॥ ४४ ॥
सुमाली द्वारा देवतांना पिटाळून लावले गेल्यावर आठवे वसु सावित्रांना फार क्रोध आला. ते आपल्या रथसेनेसहित येऊन त्या प्रहार करणार्‍या निशाचराच्या समोर उभे राहिले. ॥४३-४४॥
विक्रमेण महातेजा वारयामास संयुगे ।
ततस्तयोर्महद् युद्धं अभवद् रोमहर्षणम् ॥ ४५ ॥

सुमालिनो वसोश्चैव समरेष्वनिवर्तिनोः ।
महातेजस्वी सावित्रांनी युद्धस्थळी आपल्या पराक्रमद्वारा सुमालीला पुढे येण्यापासून रोखले. सुमाली आणि वसु दोघांपैकी कुणीही युद्धात मागे सरणारा नव्हता म्हणून त्या दोघांमध्ये महान्‌ एवं रोमांचकारी युद्ध जुंपले. ॥४५ १/२॥
ततस्तस्य महाबाणैः वसुना सुमहात्मना ॥ ४६ ॥

निहतः पन्नगरथः क्षणेन विनिपातितः ।
त्यानंतर महात्मा वसुने आपल्या विशाल बाणांद्वारा सुमालीच्या सर्प जुंपलेल्या रथाला क्षणभरात तोडून फोडून खाली पाडले. ॥४६ १/२॥
हत्वा तु संयुगे तस्य रथं बाणशतैश्चितम् ॥ ४७ ॥

गदां तस्य वधार्थाय वसुर्जग्राह पाणिना ।
ततः प्रगृह्य दीप्ताग्रां कालदण्डोपमां गदाम् ॥ ४८ ॥

तां मूर्ध्नि पातयामास सावित्रो वै सुमालिनः ।
युद्धस्थळी शेकडो बाणांनी छेदल्या गेलेल्या सुमालीच्या रथाला नष्ट करून वसुने त्या निशाचराच्या वधासाठी काळदण्डासमान भयंकर एक गदा हातात घेतली, जिचा अग्रभाग अग्निसमान प्रज्वलित होत होता. ती घेऊन सावित्राने सुमालीच्या मस्तकावर फेकून मारली. ॥४७-४८ १/२॥
सा तस्योपरि चोल्काभा पतन्ती विबभौ गदा ॥ ४९ ॥

इन्द्रप्रमुक्ता गर्जन्ती गिराविव महाशनिः ।
त्याच्यावर पडणारी ती गदा उल्केसमान चमकली, जणु इंद्रद्वारा सोडली गेलेली विशाल अशनि, मोठ्‍या गडगडाटासह एखाद्या पर्वताच्या शिखरावर कोसळली असावी. ॥४९ १/२॥
तस्य नैवास्थि न शिरो न मांसं ददृशे तदा ॥ ५० ॥

गदया भस्मतां नीतं निहतस्य रणाजिरे ।
तिचा प्रहार होताच समरांगणात सुमालीचा अंत झाला. त्याच्या हाडांचा, मस्तकाचाही कुठे पत्ता लागला नाही अथवा त्याचे मांसही कोठे दिसून आले नाही. ते सर्व काही गदेच्या आगीत भस्म झाले. ॥५० १/२॥
तं दृष्ट्‍वा निहतं सङ्‌ख्ये राक्षसास्ते समन्ततः ॥ ५१ ॥

व्यद्रवन् सहिताः सर्वे क्रोशमानाः परस्परम् ।
विद्राव्यमाणा वसुना राक्षसा नावतस्थिरे ॥ ५२ ॥
युद्धात सुमाली मारला गेलेला पाहून ते सर्व राक्षस एक दुसर्‍याला हांका मारीत एकदमच चारी बाजूस पळून गेले. वसुच्या द्वारा पिटाळले जाणारे ते राक्षस रणभूमिमध्ये उभे राहू शकले नाहीत. ॥५१-५२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्तविंशः सर्गः ॥ २७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा सत्ताविसावा सर्ग पूरा झाला. ॥२७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP