श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ द्विनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणस्य शोकः सुपार्श्वकर्तृकाश्वासनेन च तस्य सीतावधान्निवृत्तिः -
रावणाचा शोक तसेच सुपार्श्वाच्या समजाविण्याने त्याचे सीता वधापासून निवृत्त होणे -
ततः पौलस्त्यसचिवाः श्रुत्वा चेन्द्रजितं वधम् ।
आचचक्षुरभिज्ञाय दशग्रीवाय सत्वराः ॥ १ ॥
रावणाच्या सचिवांनी जेव्हा इंद्रजिताच्या वधाचा समाचार ऐकला, तेव्हा त्यांनी स्वतःही प्रत्यक्ष पाहून त्याबद्दल खात्री करून घेतल्यावर तात्काळ जाऊन दशमुख रावणास सर्व हकिगत ऐकविली. ॥१॥
युद्धे हतो महाराज लक्ष्मणेन तवात्मजः ।
विभीषणसहायेन मिषतां नो महाद्युतिः ॥ २ ॥
ते म्हणाले - महाराज ! युद्धात विभीषणाची सहायता मिळून लक्ष्मणांनी आपल्या महातेजस्वी पुत्राला आपल्या सैनिकांच्या डोळ्या देखत ठार मारले. ॥२॥
शूरः शूरेण सङ्‌गम्य संयुगेष्वपरजितः ।
लक्ष्मणेन हतः शूरः पुत्रस्तु विबुधेन्द्रजित् ॥ ३ ॥

गतः स परमान् लोकान् शरैः सन्तर्प्य लक्ष्मणम् ।
ज्याने देवतांचा राजा इंद्र यासही परास्त केले होते आणि पूर्वी युद्धात ज्याचा कधीही पराजय झाला नव्हता, तोच आपला शूरवीर पुत्र इंद्रजित शौर्य संपन्न लक्ष्मणांशी भिडून त्यांच्या द्वारा मारला गेला. तो आपल्या बाणांच्या द्वारा लक्ष्मणांना पूर्णतः तृप्त करून उत्तम लोकांमध्ये गेला आहे. ॥३ १/२॥
स तं प्रतिभयं श्रुत्वा वधं पुत्रस्य दारुणम् ॥ ४ ॥

घोरमिन्द्रजितः सङ्‌ख्ये कश्मलं प्राविशन्महत् ।
युद्धात आपला पुत्र इंद्रजित याच्या वधाचा घोर आणि दारूण समाचार ऐकून रावणाला फार जबरदस्त मूर्च्छेने घेरले. ॥४ १/२॥
उपलभ्य चिरात् संज्ञां राजा राक्षसपुङ्‌गवः ॥ ५ ॥

पुत्रशोकाकुलो दीनो विललापाकुलेन्द्रियः ।
नंतर दीर्घकाळानंतर शुद्धिवर येऊन राक्षसप्रवर राजा रावण पुत्रशोकाने व्याकुळ झाला. त्याची सारी इंद्रिये व्याकुळ झाली आणि तो दीनतापूर्वक विलाप करू लागला - ॥५ १/२॥
हा राक्षसचमूमुख्य मम वत्स महाबल ॥ ६ ॥

जित्वेन्द्रं कथमद्य त्वं लक्ष्मणस्य वशं गतः ।
हा पुत्रा ! हा राक्षस सेनेच्या महाबली कर्णधारा ! तू तर पहिल्याने इंद्रांवरही विजय मिळवून चुकला होतास मग आज लक्ष्मणाच्या वश कसा झालास ? ॥६ १/२॥
ननु त्वमिषुभिः क्रुद्धो भिन्द्याः कालान्तकावपि ॥ ७ ॥

मन्दरस्यापि शृङ्‌गाणि किं पुनर्लक्ष्मणं युधि ।
मुला ! तू तर कुपित झाल्यावर आपल्या बाणांनी काळ आणि अंतकाळाही विदीर्ण करू शकत होतास, मग युद्धात लक्ष्मणाला मारून टाकणे तुझ्यासाठी काय मोठीशी गोष्ट होती ? ॥७ १/२॥
अद्य वैवस्वतो राजा भूयो बहुमतो मम ॥ ८ ॥

येनाद्य त्वं महाबाहो संयुक्तः कालधर्मणा ।
महाबाहो ! आज सूर्याचा पुत्र प्रेतराज यमाचे महत्व मला अधिक वाटू लागले आहे, ज्याने तुलाही काळधर्माने संयुक्त केले आहे. ॥८ १/२॥
एष पन्थाः सुयोधानां सर्वामरगणेष्वपि ।
यः कृते हन्यते भर्तुः स पुमान् स्वर्गमृच्छति ॥ ९ ॥
समस्त देवतांमध्येही चांगल्या योद्ध्यांचा हाच मार्ग आहे. जो आपल्या स्वामीसाठी युद्धात मारला जातो, तो पुरूष स्वर्गलोकात जातो. ॥९॥
अद्य देवगणाः सर्वे लोकपाला महर्षयः ।
हतमिन्द्रजितं श्रुत्वा सुखं स्वप्स्यन्ति निर्भयाः ॥ १० ॥
आज समस्त देवता, लोकपाल तसेच महर्षि इंद्रजित मारला गेल्याचे ऐकून निर्भय होऊन सुखाने झोपू शकतील. ॥१०॥
अद्य लोकास्त्रयः कृत्स्ना पृथिवी च सकानना ।
एकेनेन्द्रजिता हीना शून्येव प्रतिभाति मे ॥ ११ ॥
आज तीन्ही लोक आणि काननांसहित ही सारी पृथ्वीही एकटा इंद्रजित नसल्याने मला शून्य असल्या सारखी भासत आहे. ॥११॥
अद्य नैर्ऋतकन्यानां श्रोष्याम्यन्तःपुरे रवम् ।
करेणुसङ्‌घस्य यथा निनादं गिरिगह्वरे ॥ १२ ॥
ज्याप्रमाणे गजराज मारला गेल्यावर पर्वताच्या कंदरांमधून हत्तीणींचा आर्तनाद ऐकू येऊ लागतो, त्याप्रमाणे आज अंतःपुरात मला राक्षसकन्यांचे करूण-क्रंदन ऐकावे लागेल. ॥१२॥
यौवराज्यं च लङ्‌कां च रक्षांसि च परन्तप ।
मातरं मां च भार्याश्च क्व गतोऽसि विहाय नः ॥ १३ ॥
शत्रूंना संताप देणार्‍या पुत्रा ! आज आपल्या युवराजपदाला, लंकापुरीला, समस्त राक्षसांना, आपल्या मातेला, मला आणि आपल्या पत्‍न्यांना - आम्हा सर्वांना सोडून तू कोठे निघून गेला आहेस ? ॥१३॥
मम नाम त्वया वीर गतस्य यमसादनम् ।
प्रेतकार्याणि कार्याणि विपरीते हि वर्तसे ॥ १४ ॥
वीरा ! व्हायला तर असे हवे होते की मी प्रथम यमलोकांत गेलो असतो आणि तू येथे राहून माझे प्रेतकार्य केले असतेस. परंतु तू विपरीत अवस्थेमध्ये स्थित झाला आहेस. ॥१४॥
स त्वं जीवति सुग्रीवे लक्ष्मणे च सराघवे ।
मम शल्यमनुद्धृत्य क्व गतोऽसि विहाय नः ॥ १५ ॥
हाय ! राघवासहित लक्ष्मण आणि सुग्रीव अद्याप जिवंत आहेत, अशा अवस्थेत माझ्या हृदयांतील शल्य न काढताच तू आम्हांला सोडून कोठे निघून गेला आहेस ? ॥१५॥
एवमादिविलापार्तं रावणं राक्षसाधिपम् ।
आविवेश महान् कोपः पुत्रव्यसनसम्भवः ॥ १६ ॥
याप्रकारे आर्तभावाने विलाप करीत असता राक्षसराज रावणाच्या हृदयात आपल्या पुत्राच्या वधाचे स्मरण होऊन महान्‌ क्रोधावेश उत्पन्न झाला. ॥१६॥
प्रकृत्या कोपनं ह्येनं पुत्रस्य पुनराधयः ।
दीप्तं सन्दीपयामासुः घर्मेऽर्कमिव रश्मयः ॥ १७ ॥
एक तर तो स्वभावानेच क्रोधी होता. दुसरे पुत्राच्या चिंतेने त्याला उत्तेजित केले - जळत असलेल्याला अधिकच जाळले; ज्याप्रमाणे सूर्याचे किरण ग्रीष्म ऋतुमध्ये त्याला अधिकच प्रचण्ड बनवितात. ॥१७॥
ललाटे भ्रुकुटीभिश्च सङ्‌गताभिर्व्यरोचत ।
युगान्ते सह नक्रैस्तु महोर्मिभिरिवोदधिः ॥ १८ ॥
ललाटांत वक्र भुवयांमुळे तो, प्रलयकालात मगरी आणि मोठ मोठ्‍या लाटांच्यामुळे महासागर सुशोभित होतो, त्याप्रमाणे शोभत होता. ॥१८॥
कोपाद् विजृम्भमाणस्य वक्त्राद् व्यक्तमिव ज्वलन् ।
उत्पपात सधूमाग्नि वृत्रस्य वदनादिव ॥ १९ ॥
जसा वृत्रासुराच्या मुखांतून धूरासहित अग्नि प्रकट झाला होता, त्याप्रमाणे रोषाने जांभई देत असतां रावणाच्या मुखांतून प्रकटरूपाने धूमयुक्त प्रज्वलित अग्नि निघू लागला. ॥१९॥
स पुत्रवधसन्तप्तः शूरः क्रोधवशं गतः ।
समीक्ष्य रावणो बुद्ध्या वैदेह्या रोचयद् वधम् ॥ २० ॥
आपल्या पुत्राच्या वधाने संतप्त झालेला शूरवीर रावण एकाएकी क्रोधाने वशीभूत झाला. त्याने बुद्धिने विचार करून सीतेला मारून टाकणेच चांगले असे ठरवले. ॥२०॥
तस्य प्रकृत्या रक्ते च रक्ते क्रोधाग्निनाऽपि च ।
रावणस्य महाघोरे दीप्ते नेत्रे बभूवतुः ॥ २१ ॥
रावणाचे डोळे एक तर स्वाभाविकच लाल होते, दुसरे क्रोधाग्निने त्यांना अधिकच रक्तवर्णाचे बनविले. म्हणून त्याचे ते दीप्तिमान्‌ नेत्र महान्‌ घोर प्रतीत होत होते. ॥२१॥
घोरं प्रकृत्या रूपं तत्तस्य क्रोधाग्निमूर्च्छितम् ।
बभूव रूपं क्रुद्धस्य रुद्रस्येव दुरासदम् ॥ २२ ॥
रावणाचे रूप स्वभावतःच भयंकर होते. त्यात क्रोधाग्निचा प्रभाव पडल्याने ते अधिकच भयानक होऊ लागले आणि कुपित झालेल्या रूद्रासमान दुर्जय प्रतीत होऊ लागले. ॥२२॥
तस्य क्रुद्धस्य नेत्राभ्यां प्रापतन्नश्रुबिन्दवः ।
दीपाभ्यामिव दीप्ताभ्यां सार्चिषः स्नेहबिन्दवः ॥ २३ ॥
क्रोधाने भरलेल्या त्या निशाचराच्या नेत्रातून अश्रुबिंदू वाहू लागले जणु जळत असलेल्या दीपकांतून जळत असलेल्या ज्योतीबरोबर तेलाचेही थेंब ठिपकत असावे. ॥२३॥
दन्तान् विदशतस्तस्य श्रूयते दशनस्वनः ।
यन्त्रस्यावेष्ट्यमाणस्य महतो दानवैरिव ॥ २४ ॥
तो दात खाऊ लागला. त्यासमयी त्याच्या दातांच्या कटकटण्याने जो शब्द ऐकू येत होता तो समुद्र-मंथनाच्या समयी दावनांच्या द्वारा खेचले जात असलेल्या मंथन यंत्रस्वरूप मंदराचलाच्या ध्वनीप्रमाणे वाटत होता. ॥२४॥
कालाग्निरिव सङ्‌क्रुद्धो यां यां दिशमवैक्षत ।
तस्यां तस्यां भयत्रस्ता राक्षसाः संविलिल्यिरे ॥ २५ ॥
कालाग्निप्रमाणे अत्यंत कुपित होऊन तो ज्या दिशेकडे दृष्टि टाकत होता, त्या त्या दिशेला उभे असलेले राक्षस भयभीत होऊन खांब आदिच्या आड लपत होते. ॥२५॥
तमन्तकमिव क्रुद्धं चराचरचिखादिषुम् ।
वीक्षमाणं दिशः सर्वा राक्षसा नोपचक्रमुः ॥ २६ ॥
चराचर प्राण्यांना ग्रासण्याची इच्छा करणार्‍या कुपित काळाप्रमाणे संपूर्ण दिशांकडे पहाणार्‍या रावणाच्या जवळ राक्षस जात नव्हते - त्याच्या जवळ जाण्याचे साहस करत नव्हते. ॥२६॥
ततः परमसङ्‌क्रुद्धो रावणो राक्षसाधिपः ।
अब्रवीद् रक्षसां मध्ये संस्तम्भयिषुराहवे ॥ २७ ॥
तेव्हा अत्यंत कुपित झालेला राक्षसराज रावण युद्धात राक्षसांना स्थापित करण्याच्या इच्छेने त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला - ॥२७॥
मया वर्षसहस्राणि चरित्वा परमं तपः ।
तेषु तेष्ववकाशेषु स्वयम्भूः परितोषितः ॥ २८ ॥
निशाचरांनो ! मी हजारो वर्षेपर्यंत कठोर तपस्या करून विभिन्न तपस्यांच्या समाप्तिनंतर स्वयंभू ब्रह्मदेवांना संतुष्ट केले आहे. ॥२८॥
तस्यैव तपसो व्युष्ट्या प्रसादाच्च स्वयम्भुवः ।
नासुरेभ्यो न देवेभ्यो भयं मम कदाचन ॥ २९ ॥
त्याच तपस्येच्या फळाने आणि ब्रह्मदेवांच्या कृपेने मला देवता आणि असुर यांच्याकडून कधी भय नाही. ॥२९॥
कवचं ब्रह्मदत्तं मे यदादित्यसमप्रभम् ।
देवासुरविमर्देषु न भिन्नं वज्रमुष्टिभिः ॥ ३० ॥
माझ्या जवळ ब्रह्मदेवांनी दिलेले कवच आहे जे सूर्यासमान प्रकाशित होत असते. देवता आणि असुरांबरोबर झालेल्या माझ्या संग्रामाच्या वेळी ते वज्राच्या प्रहारानेही तुटू शकले नाही. ॥३०॥
तेन मामद्य संयुक्तं रथस्थमिह संयुगे ।
प्रतीयात् कोऽद्य मामाजौ साक्षादपि पुरन्दरः ॥ ३१ ॥
म्हणून जर आज मी युद्धासाठी तयार होऊन रथात बसून रणभूमीमध्ये उभा राहिलो तर कोण माझा सामना करू शकणार आहे ? साक्षात्‌ इंद्र का असेना तोही माझ्याशी युद्ध करण्याचे साहस करू शकत नाही. ॥३१॥
यत् तदाभिप्रसन्नेन सशरं कार्मुकं महत् ।
देवासुरविमर्देषु मम दत्तं स्वयम्भुवा ॥ ३२ ॥

अद्य तूर्यशतैर्भीमं धनुरुत्थाप्यतां मम ।
रामलक्ष्मणयोरेव वधाय परमाहवे ॥ ३३ ॥
त्या दिवसात देवासुर-संग्रामांमध्ये प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी मला बाणासहित जे विशाल धनुष्य प्रदान केले होते, आज माझ्या त्याच भयानक धनुष्याला शेकडो मंगल वाद्यांच्या ध्वनिबरोबर महासमरात रामलक्ष्मणांचा वध करण्यासाठीच उचलले जाईल. ॥३२-३३॥
स पुत्रवधसन्तप्तः शूरः क्रोधवशं गतः ।
समीक्ष्य रावणो बुद्ध्या सीतां हन्तुं व्यवस्यत ॥ ३४ ॥
पुत्राच्या वधाने संतप्त होऊन क्रोधाच्या वशीभूत झालेल्या क्रूर रावणाने आपल्या बुद्धिने विचार करून सीतेला मारून टाकण्याचाच निश्चय केला. ॥३४॥
प्रत्यवेक्ष्य तु ताम्राक्षः सुघोरो घोरदर्शनः ।
दीनो दीनस्वरान् सर्वान् तानुवाच निशाचरान् ॥ ३५ ॥
त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले आणि आकृति अत्यंत भयानक दिसून येऊ लागली. तो सर्वत्र दृष्टि टाकून पुत्रासाठी दुःखी होऊन दीनतापूर्वक स्वर असलेल्या संपूर्ण निशाचरांना म्हणाला - ॥३५॥
मायया मम वत्सेन वञ्चनार्थं वनौकसाम् ।
किञ्चिदेव हतं तत्र सीतेयमिति दर्शितम् ॥ ३६ ॥
माझ्या मुलाने केवळ मायेने वानरांना फसविण्यासाठी एका आकृतिला ही सीता आहे असे म्हणून दाखविले आणि खोटाच तिचा वध केला. ॥३६॥
तदिदं तथ्यमेवाहं करिष्ये प्रियमात्मनः ।
वैदेहीं नाशयिष्यामि क्षत्रबन्धुं अनुव्रताम् ॥ ३७ ॥
म्हणून आज त्या खोट्‍याला मी सत्यच करून दाखवीन आणि असे करून आपले प्रिय करीन. त्या क्षत्रियाधम रामाच्या ठिकाणी अनुराग ठेवणार्‍या सीतेचा नाश करून टाकीन. ॥३७॥
इत्येवमुक्त्वा सचिवान् खड्गमाशु परामृशत् ।
उद्धृत्य गुणसम्पन्नं विमलाम्बरवर्चसम् ॥ ३८ ॥

निष्पपात स वेगेन सभार्यः सचिवैर्वृतः ।
रावणः पुत्रशोकेन भृशमाकुलचेतनः ॥ ३९ ॥
मंत्र्यांना असे सांगून त्याने शीघ्रच जी खड्गोचित गुणांनी युक्त आणि आकाशांसमान निर्मलकान्तिची होती ती तलवार हातात घेतली. ती म्यानातून काढून पत्‍नी आणि मंत्र्यांनी घेरलेला रावण अत्यंत वेगाने पुढे निघाला. पुत्राच्या शोकाने त्याची चेतना अत्यंत आकुळ होत होती. ॥३८-३९॥
सङ्‌क्रुद्धः खड्गमादाय सहसा यत्र मैथिली ।
व्रजन्तं राक्षसं प्रेक्ष्य सिंहनादं विचुक्रुशुः ॥ ४० ॥
तो अत्यंत कुपित होऊन तलवार घेऊन एकाएकी जेथे मैथिली सीता विद्यमान होती त्या स्थानावर जाऊन पोहोचला. तेथे जाताच त्या राक्षसास पाहून त्याचे मंत्री सिंहनाद करू लागले. ॥४०॥
ऊचुश्चान्योन्यमालिङ्‌ग्य सङ्‌क्रुद्धं प्रेक्ष्य राक्षसाः ।
अद्यैनं तावुभौ दृष्ट्‍वा भ्रातरौ प्रव्यथिष्यतः ॥ ४१ ॥
ते रावणाला रोषाने भरलेला पाहून एक दुसर्‍याला आलिंगन देऊन म्हणाले - आज याला पाहून ते दोघे भाऊ रामलक्ष्मण व्यथित होतील. ॥४१॥
लोकपाला हि चत्वारः क्रुद्धेनानेन निर्जिताः ।
बहवः शत्रवश्चान्ये संयुगेषु अभिपातिताः ॥ ४२ ॥
कारण कुपित झाल्यावर या राक्षसराजाने इंद्र आदि चारी लोकपालांनाही जिंकले होते आणि दुसर्‍या बर्‍याचशा शत्रुंनाही युद्धात मारून टाकले होते. ॥४२॥
त्रिषु लोकेषु रत्‍नानि भुङ्‌क्ते आहृत्य रावणः ।
विक्रमे च बले चैव नास्त्यस्य सदृशो भुवि ॥ ४३ ॥
तीन्ही लोकांत जे रत्‍नभूत आहेत त्या सर्वांना आणून रावण भोगत आहे. भूमण्डलात याच्या समान पराक्रमी आणि बलवान्‌ दुसरा कोणी नाही. ॥४३॥
तेषां संजल्पमानानां अशोकवनिकां गताम् ।
अभिदुद्राव वैदेहीं रावणः क्रोधमूर्च्छितः ॥ ४४ ॥
ते याप्रकारे बोलतच होते की क्रोधाने जणु अचेतसा झालेला रावण अशोक वाटिके मध्ये बसलेल्या वैदेही सीतेचा वध करण्यासाठी धावला. ॥४४॥
वार्यमाणः सुसङ्‌क्रुद्धः सुहृद्‌भि र्हितबुद्धिभिः ।
अभ्यधावत सङ्‌क्रुद्धः खे ग्रहो रोहिणीमिव ॥ ४५ ॥
त्याच्या हिताचा विचार करणारे सुहृद त्या रोषाने भरलेल्या रावणाला अडविण्याचा प्रयत्‍न करत होते तरीही तो अत्यंत कुपित होऊन ज्याप्रमाणे आकाशात एखादा क्रूर ग्रह रोहिणी नामक नक्षत्रावर आक्रमण करत असावा त्याप्रकारे सीतेकडे धावला. ॥४५॥
मैथिली रक्ष्यमाणा तु राक्षसीभिरनिन्दिता ।
ददर्श राक्षसं क्रुद्धं निस्त्रिंशवरधारिणम् ॥ ४६ ॥

तं निशाम्य सनिस्त्रिंशं व्यथिता जनकात्मजा ।
निवार्यमाणं बहुशः सुहृद्‌भितरनुवर्तिनम् ॥ ४७ ॥
त्या समयी सती साध्वी सीता राक्षसींच्या संरक्षणात होती. तिने पाहिले, क्रोधाने भरलेला राक्षस एक फार मोठी तलवार घेऊन तिला मारण्यासाठी येत आहे. जरी त्याचे सुहृद वारंवार त्याला अडवत आहेत तरीही तो परत जात नाही. याप्रकारे तलवार घेऊन रावणाला येताना पाहून जनकनंदिनीच्या मनात फार व्यथा झाली. ॥४६-४७॥
सीता दुःखसमाविष्टा विलपन्तीदमब्रवीत् ।
यथाऽयं मामभिक्रुद्धः समभिद्रवति स्वयम ॥ ४८ ॥

वधिष्यति सनाथां मां अनाथामिव दुर्मतिः ।
सीता दुःखात बुडून गेली आणि विलाप करीत याप्रमाणे बोलली - ’हा दुर्बुद्धि राक्षस ज्याप्रकारे कुपित होऊन स्वतः माझ्याकडे धावत येत आहे यावरून कळून येत आहे की मी सनाथ असूनही मला अनाथाप्रमाणे मारून टाकील.’ ॥४८ १/२॥
बहुशश्चोदयामास भर्तारं मामनुव्रताम् ॥ ४९ ॥

भार्या मम भवस्वेति प्रत्याख्यातो ध्रुवं मया ।
मी आपल्या पतिच्या ठिकाणी अनुराग ठेवत आहे तरीही याने अनेक वेळा प्रेरित केले की तू माझी भार्या हो. त्यासमयी निश्चितच मी याला उडवून लावले होते. ॥४९ १/२॥
सोऽयं मामनुपस्थाने व्यक्तं नैराश्यमागतः ॥ ५० ॥

क्रोधमोहसमाविष्टो व्यक्तं मां हन्तुमुद्यतः ।
मी याप्रकारे उडवून लावल्यावर निश्चितच हा निराश होऊन क्रोध आणि मोहाच्या वशीभूत झालेला आहे आणि अवश्यच मला मारून टाकण्यासाठी उद्यत झाला आहे. ॥५० १/२॥
अथवा तौ नरव्याघ्रौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ ५१ ॥
अथवा या नीचाने आज समरांगणात माझ्यामुळेच दोघे भाऊ पुरूषसिंह रामलक्ष्मणांना मारून टाकले आहे. ॥५१॥
मन्निमित्तमनार्येण समरेऽद्य निपातितौ ।
भैरवो हि महान् नादो राक्षसानां श्रुतो मया ॥ ५२ ॥

बहूनामिह हृष्टानां तथा विक्रोशतां प्रियम् ।
कारण की यासमयी मी राक्षसांचा फार सिंहनाद ऐकला आहे. आनंदित झालेले बरेचसे निशाचर आपल्या प्रियजनांना हाका मारीत आहेत. ॥५२ १/२॥
अहो धिङ्‌मन्निमित्तोऽयं विनाशो राजपुत्रयोः ॥ ५३ ॥

अथवा पुत्रशोकेन अहत्वा रामलक्ष्मणौ ।
विधमिष्यति मां रौद्रो राक्षसः पापनिश्चयः ॥ ५४ ॥
अहो ! जर माझ्यामुळेच त्या राजकुमारांचा विनाश झाला तर माझ्या जीवनाचा धिक्कार आहे अथवा हेही संभव आहे की पापपूर्ण विचार ठेवणारा हा भयंकर राक्षस पुत्रशोकाने संतप्त होऊन रामलक्ष्मणांना मारू न शकल्याने माझाच वध करून टाकील. ॥५३-५४॥
हनूमतस्तुतद् वाक्यं न कृतं क्षुद्रया मया ।
यद्यहं तस्य पृष्ठेन तदायासमनिर्जिता ॥ ५५ ॥

नाद्यैवमनुशोचेयं भर्तुरङ्‌कगता सती ।
मी मूर्ख स्त्रीने हनुमानांनी सांगितलेली गोष्ट ऐकली नाही, जरी श्रीरामांच्या द्वारा जिंकली न गेल्यावरही त्या समयी हनुमानाच्या पाठीवर बसून निघून गेले असते तर पतीच्या अंकावर स्थान मिळून आज याप्रमाणे वारंवार शोक केला नसता. ॥५५ १/२॥
मन्ये तु हृदयं तस्याः कौसल्यायाः फलिष्यति ॥ ५६ ॥

एकपुत्रा यदा पुत्रं विनष्टं श्रोष्यते युधि ।
माझी सासु कौसल्या एकाच पुत्राची आई आहे. जर ती युद्धात आपल्या पुत्राच्या विनाशाचा समाचार ऐकेल तर मला वाटते तिचे हृदय अवश्य फाटून जाईल. ॥५६ १/२॥
सा हि जन्म च बाल्यं च यौवनं च महात्मनः ॥ ५७ ॥

धर्मकार्याणि रूपं च रुदती संस्मरिष्यति ।
ती रडत आपल्या महात्मा पुत्राचा जन्म, बाल्यावस्था, युवावस्था, धर्म-कर्म तसेच रूपाचे स्मरण करीत राहील. ॥५७ १/२॥
निराशा निहते पुत्रे दत्त्वा श्राद्धमचेतना ॥ ५८ ॥

अग्निमारोक्ष्यते नूनं अपो वापि प्रवेक्ष्यति ।
आपला पुत्र मारला गेल्यावर पुत्रदर्शना संबंधी निराश आणि अचेतसी होऊन ती त्यांचे श्राद्ध करून निश्चितच जळत्या आगीत सामावून जाईल अथवा शरयुच्या जलधारेत अत्मविसर्जन करेल. ॥५८ १/२॥
धिगस्तु कुब्जामसतीं मन्थरां पापनिश्चयाम् ॥ ५९ ॥

यन्निमित्तमिमं शोकं कौसल्या प्रतिपत्स्यते ।
पापपूर्ण विचार असणार्‍या त्या दुष्ट कुबडी मंथरेचा धिक्कार आहे, जिच्यामुळे माझी सासु कौसल्येला हा पुत्रशोक करावा लागणार आहे. ॥५९ १/२॥
इत्येवं मैथिलीं दृष्ट्‍वा विलपन्तीं तपस्विनीम् ॥ ६० ॥

रोहिणीमिव चन्द्रेण विना ग्रहवशं गताम् ।
एतस्मिन्नन्तरे तस्य अमात्यः शीलवान् शुचिः ॥ ६१ ॥

सुपार्श्वो नाम मेधावी रावणं रक्षसां वरम् ।
निवार्यमाणः सचिवैः इदं वचनमब्रवीत् ॥ ६२॥
चंद्रम्याचा वियोग होऊन कुठल्यातरी क्रूर ग्रहाच्या वश झालेल्या रोहिणी प्रमाणे तपस्विनी सीतेला याप्रकारे विलाप करतांना पाहून रावणाचा सुशील तसेच शुद्ध आचार-विचार असणार्‍या सुपार्श्व नामक बुद्धिमान्‌ मंत्र्याने दुसर्‍या सचिवांनी विरोध केलेले असताही त्यासमयी राक्षसराज रावणाला ही गोष्ट सांगितली - ॥६०-६२॥
कथं नाम दशग्रीव साक्षाद्वैश्रवणानुज ।
हन्तुमिच्छसि वैदेहीं क्रोधाद् धर्ममपास्य हि ॥ ६३ ॥
महाराज दशग्रीव ! तुम्ही तर साक्षात्‌ कुबेराचे भाऊ आहात, मग क्रोधामुळे धर्माला तिलांजली देऊन वैदेहीच्या वधाची इच्छा कशी करत आहात ? ॥६३॥
वेदविद्याव्रतस्नातः स्वकर्मनिरतः सथा ।
स्त्रियः कस्माद् वधं वीर मन्यसे राक्षसेश्वर ॥ ६४ ॥
वीर राक्षसराज ! तुम्ही विधिपूर्वक ब्रह्मचर्याचे पालन करून वेदविद्येचे अध्ययन पूर्ण करून गुरूकुलातून स्नातक होऊन बाहेर पडला होता आणि तेव्हापासून सदा आपल्या कर्तव्याचे पालनात लागलेले होता. तरीही आज आपल्या हाताने एका स्त्रीचा वध करणे तुम्ही कसे ठीक समजत आहा ? ॥६४॥
मैथिलीं रूपसम्पन्नां प्रत्यवेक्षस्व पार्थिव ।
त्वमेव तु सहास्माभिः आ राघवे क्रोधमुत्सृज ॥ ६५ ॥
पृथ्वीनाथ ! या मैथिलीच्या दिव्य रूपाकडे पहा (पाहून तिच्यावर दया करा) आणि युद्धात आम्हा लोकांच्या बरोबर येऊन रामांच्यावर आपला क्रोध काढा. ॥६५॥
अभ्युत्थानं त्वमद्यैव कृष्णपक्षचतुर्दशी ।
कृत्वा निर्याह्यमावास्यां विजयाय बलैर्वृतः ॥ ६६ ॥
आज कृष्णपक्षाची चतुर्दशी आहे. म्हणून आजच युद्धाची तयारी करून उद्या अमावस्येच्या दिवशी सेनेसह विजयासाठी प्रस्थान करा. ॥६६॥
शूरो धीमान् रथी खड्गी रथप्रवरमास्थितः ।
हत्वा दाशरथिं रामं भवान् प्राप्स्यति मैथिलीम् ॥ ६७ ॥
तुम्ही शूरवीर, बुद्धिमान्‌ आणि रथी वीर आहात. एका श्रेष्ठ रथावर आरूढ होऊन खड्ग हातात घेऊन युद्ध करा. दशरथनंदन रामाचा वध करून तुम्ही मैथिली सीतेला प्राप्त करून घ्याल. ॥६७॥
स तद्दुरात्मा सुहृदा निवेदितं
वचः सुधर्म्यं प्रतिगृह्य रावणः ।
गृहं जगामाथ ततश्च वीर्यवान्
पुनः सभां च प्रययौ सुहृद्वृ॥तः ॥ ६८ ॥
मित्राने सांगितलेल्या त्या उत्तम धर्मानुकूल वचनाचा स्वीकार करून बलवान्‌ दुरात्मा रावण महालात परत गेला आणि तेथून नंतर आपल्या सुहृदांसह त्याने राजसभेत प्रवेश केला. ॥६८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे द्विनवतितमः सर्गः ॥ ९२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा ब्याणवावा सर्ग पूरा झाला. ॥९२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP