श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ द्विचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अशोकवाटिकायां श्रीसीतारामयोर्विहारो, गर्भवत्याः सीतायाः तपोवनं द्रष्टुमिच्छाया उदयः श्रीरामेण तदर्थं स्वीकृतिप्रदानम् -
अशोकवनिकेत श्रीराम आणि सीतेचा विहार, गर्भिणी सीतेने तपोवन पाहण्याची इच्छा प्रकट करणे आणि श्रीरामांनी यासाठी स्वीकृति देणे -
स विसृज्य ततो रामः पुष्पकं हेमभूषितम् ।
प्रविवेश महाबाहुः अशोकवनिकां तदा ॥ १ ॥
सुवर्णभूषित पुष्पक विमानाला निरोप देऊन महाबाहु श्रीरामांनी अशोक वनिकेत (अंतःपुरातील विहारयोग्य उपवनात) प्रवेश केला. ॥१॥
चन्दनागुरुचूतैश्च तुङ्‌गकालेयकैरपि ।
देवदारुवनैश्चापि समन्तादुपशोभिताम् ॥ २ ॥
चंदन, अगुरु, आम्र, तुङ्‌ग (नारळ), कालेयक (रक्तचंदन) तसेच देवदार वने सर्व बाजुनी त्याची शोभा वाढवत होते. ॥२॥
चम्पकाशोकपुन्नाग मधूकपनसासनैः ।
शोभितां पारिजातैश्च विधूमज्वलनप्रभैः ॥ ३ ॥
चंपा, अशोक, पुन्नाग, मोहाचे वृक्ष, फणस, असन तसेच धूमरहित अग्निसमान प्रकाशित होणारा पारिजात इत्यादिनी ती वाटिका सुशोभित होती. ॥३॥
लोध्रनीपार्जुनैर्नागैः सप्तपर्णातिमुक्तकैः ।
मन्दारकदलीगुल्म लताजाल समावृताम् ॥ ४ ॥
लोध, कदंब, अर्जुन, नागकेसर, सप्तपर्ण, अतिमुक्तक, मंदार, कदली तसेच गुल्म आणि लतांचे समूह तिच्यात सर्वत्र व्याप्त होते. ॥४॥
प्रियङ्‌गुभिः कदम्बैश्च तथा च वकुलैरपि ।
जम्बूभिर्दाडिमैश्चैव कोविदारैश्च शोभिताम् ॥ ५ ॥
प्रियङ्‌गु, धूलिकदंब, बकुळ, जांभूळ, डाळिंब आणि कोविदार आदि वृक्ष त्या उपवनाला सुशोभित करत होते. ॥५॥
सर्वदा कुसुमै रम्यैः फलवद्‌भिर्मनोरमैः ।
दिव्यगन्धरसोपेतैः तरुणाङ्‌कुरपल्लवैः ॥ ६ ॥
सदा फुले आणि फळ देणारे रमणीय, मनोरम, दिव्य रस आणि गंधाने युक्त तसेच नूतन अंकुर-पल्लवांनी अलंकृत वृक्षही त्या अशोकवनिकेची शोभा वाढवित राहिले होते. ॥६॥
तथैव तरुभिर्दिव्यैः शिल्पिभिः परिकल्पितैः ।
चारुपल्लवपुष्पाढ्यैः मत्तभ्रमरसङ्‌कुलैः ॥ ७ ॥
वृक्ष लावण्याच्या कलेत कुशल माळ्यांच्या द्वारा तयार केले गेलेले दिव्य वृक्ष, ज्यांच्यामध्ये मनोहर पल्लव तसेच फुले शोभत होती आणि ज्यांच्यावर मत्त भ्रमर व्याप्त होते, त्या उपवनाची श्री-वृद्धि करीत होते. ॥७॥
कोकिलैर्भृङ्‌गराजैश्च नानावर्णैश्च पक्षिभिः ।
शोभितां शतशश्चित्रां चूतवृक्षावतंसकैः ॥ ८ ॥
कोकिळ, भृङ्‌गराज आणि रंगीबेरंगी शेकडो पक्षी त्या वाटिकेची शोभा वाढवीत होते, जे आम्रवृक्षांच्या डहाळ्यांच्या अग्रभागी बसून तेथे विचित्र सुषमेची सृष्टि करीत होते. ॥८॥
शातकुम्भनिभाः केचित् केचिदग्निशिखोपमाः ।
नीलाञ्जननिभाश्चान्ये भान्ति तत्र स्म पादपाः ॥ ९ ॥
काही वृक्ष सुवर्णासमान पिवळे, काही अग्निशिखेसमान उज्ज्वळ आणि काही निळ्या अंजना समान श्याम होते, जे स्वतः सुशोभित होऊन त्या उपवनाची शोभा वाढवीत होते. ॥९॥
सुरभीणि च पुष्पाणि माल्यानि विविधानि च ।
दीर्घिका विविधाकाराः पूर्णाः परमवारिणा ॥ १० ॥
तेथे अनेक प्रकारची सुगंधित पुष्पे आणि गुच्छ दृष्टिगोचर होत होती. उत्तम जलाने भरलेल्या विविध प्रकारच्या विहिरी दिसून येत होत्या. ॥१०॥
माणिक्यकृतसोपानाः स्फाटिकान्तरकुट्टिमाः ।
फुल्लपद्मोत्पलवनाः चक्रवाकोपशोभिताः ॥ ११ ॥
ज्यांच्यामध्ये माणकांच्या पायर्‍या बनविलेल्या होत्या आणि पायर्‍यांच्या नंतरही काही अंतरापर्यंतची जलाच्या आतील भूमि स्फटिक मण्यांनी बांधलेली होती. त्या विहिरींच्या मध्ये फुललेली कमळे आणि कुमुदांचे समूह शोभून दिसत होते; चक्रवाक त्यांची शोभा वाढवीत होते. ॥११॥
दात्यूहशुकसङ्‌घुष्टा हंससारसनादिताः ।
तरुभिः पुष्पशबलैः तीरजैरुपशोभिताः ॥ १२ ॥
चातक आणि पोपट तेथे मधुर बोली बोलत होते. हंस आणि सारसांचा कलरव गुंजत होता. फुलांनी चितकबरे दिसून येणारे तटवर्ती वृक्ष त्यांना शोभासंपन्न बनवीत होते. ॥१२॥
प्राकारैर्विविधाकारैः शोभिताश्च शिलातलैः ।
तत्रैव च वनोद्देशे वैदूर्यमणिसन्निभैः ॥ १३ ॥

शाद्‌वलैः परमोपेतां पुष्पितद्रुमकाननाम् ।
ती विविधप्रकारच्या तटबंदीनी आणि शिलांनीही सुशोभित झालेली होती. तेथील वनप्रांतात नीलमण्यासमान रंगाची ताजी हिरवी कुरणे त्या वाटिकेचा शृंगार करीत होती. तेथील वृक्षांचे समुदाय फुलांच्या भारांनी लगडलेले होते. ॥१३ १/२॥
तत्र सङ्‌घर्षजातानां वृक्षाणां पुष्पशालिनाम् ॥ १४ ॥

प्रस्तराः पुष्पशबला नभस्तारागणैरिव ।
तेथे जणु परस्परात स्पर्धा लावून फुललेल्या पुष्पशाली वृक्षांपासून गळून पडलेल्या फुलांनी काळे-काळे प्रस्तर अशा तर्‍हेने चितकबरे दिसून येत होते की जणु तारकांच्या समुदायांने अलंकृत आकाशच शोभावे. ॥१४ १/२॥
नन्दनं हि यथेन्द्रस्य ब्राह्मं चैत्ररथं यथा ॥ १५ ॥

तथाभूतं हि रामस्य काननं सन्निवेशनम् ।
जसे इन्द्रांचे नंदन आणि ब्रह्मदेवांनी निर्मिलेले कुबेराचे चैत्ररथ वन सुशोभित होत असते त्याच प्रकारे सुंदर भवनांनी विभूषित श्रीरामांचे ते क्रीडा-कानन शोभा प्राप्त करत होते. ॥१५ १/२॥
बह्वासनगृहोपेतां लतागृहसमावृताम् ॥ १६ ॥

अशोकवनिकां स्फीतां प्रविश्य रघुनन्दनः ।
आसने च शुभाकारे पुष्पप्रकरभूषिते ॥ १७ ॥

कुशास्तरणसंस्तीर्णे रामः सन्निषसाद ह ।
तेथे अशी अनेक भवने होती की ज्यांच्यामध्ये बसण्यासाठी बरीचशी आसने सजवून ठेवलेली होती. ती वाटिका अनेक लतामंडपांनी संपन्न दिसून येत होती. त्या समृद्धशालिनी अशोकवनिकेमध्ये प्रवेश करून रघुनंदन राम पुष्पराशीने विभूषित एका सुंदर आसनावर बसले, जिच्यावर गालिचा पसरलेला होता. ॥१६-१७ १/२॥
सीतामादायं हस्तेन मधुमैरेयकं शुचि ॥ १८ ॥

पाययामास काकुत्स्थः शचीमिव पुरंदरः ।
जसे देवराज इन्द्र शचीला सुधापान करवितात, त्याच प्रकारे काकुत्स्थ श्रीरामांनी आपल्या हाताने पवित्र पेय मधु घेऊन सीतेला पाजले. ॥१८ १/२॥
मांसानि च समृष्टानि फलानि विविधानि च ॥ १९ ॥

रामस्याभ्यवहारार्थं किङ्‌करास्तूर्णमाहरन् ।
सेवकगण श्रीरामांच्या भोजनासाठी तेथे त्वरितच राजोचित भोग्य पदार्थ (विविध प्रकारचे खाद्यपदार्थ) तसेच नाना प्रकारची फळे घेऊन आले. ॥१९ १/२॥
उपानृत्यंश्च राजानं नृत्यगीतविशारदाः ॥ २० ॥

अप्सरोरगसंघाश्च किंनरीपरिवारिताः ।
त्या समयी राजा रामाच्या समीप नृत्य आणि गीताच्या कलेत निपुण अप्सरा आणि नागकन्या किन्नरींसह मिळून नृत्य करू लागल्या. ॥२० १/२॥
दक्षिणा रूपवत्यश्च स्त्रियः पानवशं गताः ॥ २१ ॥

उपनृत्यन्त काकुत्स्थं नृत्यगीतविशारदाः ।
नाचण्या-गाण्यात कुशल आणि चतुर बर्‍याचशा रूपवती स्त्रिया मधुपानजनित मदाच्या वशीभूत होऊन काकुत्स्थ श्रीरामांच्या निकट आपल्या नृत्य-कलेचे प्रदर्शन करू लागल्या. ॥२१ १/२॥
मनोभिरामा रामास्ता रामो रमयतां वरः ॥ २२ ॥

रमयामास धर्मात्मा नित्यं परमभूषिताः ।
दुसर्‍यांच्या मनाला रमविणार्‍या पुरूषांमध्ये श्रेष्ठ धर्मात्मा राम सदा उत्तम वस्त्राभूषणांनी भूषित झालेल्या त्या मनोऽभिराम रमणींना उपहार आदि देऊन संतुष्ट राखत होते. ॥२२ १/२॥
स तया सीतया सार्धं आसीनो विरराज ह ॥ २३ ॥

अरुन्धत्या सहासीनो वसिष्ठ इव तेजसा ।
त्यासमयी भगवान्‌ श्रीराम सीतादेवीसह सिंहासनावर विराजमान होऊन आपल्या तेजाने अरूंधतीसह बसलेल्या वसिष्ठाप्रमाणे शोभत होते. ॥२३ १/२॥
एवं रामो मुदा युक्तः सीतां सुरसुतोपमाम् ॥ २४ ॥

रमयामास वैदेहीं अहन्यहनि देववत् ।
याप्रमाणे श्रीराम प्रतिदिन देवतांप्रमाणे आनंदित राहून देवकन्येसमान सुंदर विदेहनंदिनी सीतेसह रमण करत होते. ॥२४ १/२॥
तथा तयोर्विहरतोः सीताराघवयोश्चिरम् ॥ २५ ॥

अत्यक्रामच्छुभः कालः शैशिरो भोगदः सदा ।
प्राप्तयोर्विविधान्भोगान् अतीतः शिशिरागमः ॥ २६ ॥
याप्रकारे सीता आणि राघव चिरकालपर्यंत विहार करीत राहिले. इतक्यात सदा भोग प्रदान करणार्‍या शिशिर ऋतुचा सुंदर समय व्यतीत झाला. विविध प्रकारच्या भोगांचा उपभोग करीत त्या राजदांपत्याचा तो शिशिरकाळ निघून गेला. ॥२५-२६॥
पूर्वाह्णे धर्मकार्याणि कृत्वा धर्मेण धर्मवित् ।
शेषं दिवसभागार्धं अन्तःपुरगतोऽभवत् ॥ २७ ॥
धर्मज्ञ श्रीराम दिवसाच्या पूर्वभागात धर्मानुसार धार्मिक कृत्ये करीत होते आणि शेष अर्धा दिवस अंतःपुरात राहात होते. ॥२७॥
सीतापि देवकार्याणि कृत्वा पौर्वाह्णिकानि वै ।
श्वश्रूणामकरोत् पूजां सर्वासामविशेषतः ॥ २८ ॥
सीता सुद्धा पूर्वाह्न कालात देवपूजन आदि करून सर्व सासूंची समान रूपाने सेवा-पूजा करत होती. ॥२८॥
अभ्यगच्छत् ततो रामं विचित्राभरणाम्बरा ।
त्रिविष्टपे सहस्राक्षमुपविष्टं यथा शची ॥ २९ ॥
त्यानंतर विचित्र वस्त्राभूषणांनी विभूषित होऊन, स्वर्गात शची ज्याप्रमाणे सहस्त्राक्ष इन्द्रांच्या सेवेत उपस्थित होते अगदी त्याचप्रमाणे ती श्रीरामांच्या जवळ निघून जात असे. ॥२९॥
दृष्ट्‍वा तु राघवः पत्‍नींच कल्याणेन समन्विताम् ।
प्रहर्षमतुलं लेभे साधु साध्विति चाब्रवीत् ॥ ३० ॥
याच दिवसात राघवांना आपल्या पत्‍नीला गर्भाच्या मंगलमय चिह्नांने युक्त पाहून अनुपम हर्ष झाला आणि म्हटले - फार चांगले, फार चांगले. ॥३०॥
अब्रवीच्च वरारोहां सीतां सुरसुतोपमाम् ।
अपत्यलाभो वैदेहि त्वयि मे समुपस्थितः ॥ ३१ ॥

किमिच्छसि वरारोहे कामः किं क्रियतां तव ।
नंतर ते देवकन्ये समान सुंदर सीतेला म्हणाले -वैदेही ! तुझ्या गर्भापासून पुत्र प्राप्त होण्याचा हा समय उपस्थित झाला आहे. वरारोहे ! सांग, तुझी काय इच्छा आहे ? मी तुझा कोणता मनोरथ पूर्ण करूं ? ॥३१ १/२॥
स्मितं कृत्वा तु वैदेही रामं वाक्यमथाब्रवीत् ॥ ३२ ॥

तपोवनानि पुण्यानि द्रष्टुमिच्छामि राघव ।
गङ्‌गातीरोपविष्टानां ऋषीणां उग्रतेजसाम् ॥ ३३ ॥

फलमूलाशिनां देव पादमूलेषु वर्तितुम् ।
एष मे परमः कामो यन्मूलफलभोजिनाम् ॥ ३४ ॥

अप्येकरात्रं काकुत्स्थ निवसेयं तपोवने ।
यावर हसून सीतेने श्रीरामचंद्रांना म्हटले - रघुनंदना ! माझी इच्छा एक वेळ त्या पवित्र तपोवनाला पहावे अशी होत आहे. गंगातटी राहून फळ-मूळ खाणारे जे उग्र तेजस्वी महर्षि आहेत, त्यांच्या समीप (काही दिवस) राहाण्याची इच्छा आहे. काकुत्स्थ ! फल मूलांचा आहार करणार्‍या महात्म्यांच्या तपोवनात एक रात्र निवास करावा हीच माझी यासमयी सर्वांत मोठी अभिलाषा आहे. ॥३२-३४ १/२॥
तथेति च प्रतिज्ञातं रामेणाक्लिष्टकर्मणा ।
विस्रब्धा भव वैदेहि श्वो गमिष्यस्यसंशयम् ॥ ३५ ॥
अनायासेच महान्‌ कर्म करणार्‍या श्रीरामांनी सीतेची ही इच्छा पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली आणि म्हणाले - वैदेही ! निश्चिंत रहा, उद्यांच तेथे जाशील, यात संशय नाही. ॥३५॥
एवमुक्त्वा तु काकुत्स्थो मैथिलीं जनकात्मजाम् ।
मध्यकक्षान्तरं रामो निर्जगाम सुहृद्‌वृतः ॥ ३६ ॥
मैथिली जानकीला असे सांगून काकुत्स्थ श्रीराम आपल्या मित्रांबरोबर मध्य कक्षात निघून गेले. ॥३६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे द्विचत्वारिंशः सर्गः ॥ ४२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा बेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP