[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ पञ्चमः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
लक्ष्मणसीतासहितस्य श्रीरामस्य शरभङ्‌गमुनेराश्रमे गमनं, तत्र देवान् दृष्ट्‍वा तस्य मुनिना सम्मानं शरभङ्‌गस्य ब्रह्मलोके गमनं च -
श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेचे शरभङ्‌ग मुनींच्या आश्रमावर जाणे, देवतांचे दर्शन करणे आणि मुनिंच्याकडून सन्मानित होणे तसेच शरभङ्‌ग मुनिंचे ब्रह्मलोक गमन -
हत्वा तु तं भीमबलं विराधं राक्षसं वने ।
ततः सीतां परिष्वज्य समाश्वास्य च वीर्यवान् ॥ १ ॥

अब्रवीद् भ्रातरं रामो लक्ष्मणं दीप्ततेजसम् ।
कष्टं वनमिदं दुर्गं न च स्मो वनगोचराः ॥ २ ॥

अभिगच्छामहे शीघ्रं शरभङ्‌गं तपोधनम् ।
आश्रमं शरभङ्‌गस्य राघवोऽभिजगाम ह ॥ ३ ॥
वनात त्या भयंकर बलशाली राक्षस विराधाचा वध करून पराक्रमी श्रीरामांनी सीतेला हृदयाशी धरून तिचे सांत्वन केले आणि उद्दीप्त तेज असणार्‍या बंधु लक्ष्मणास याप्रकारे म्हटले - ’सुमित्रानंदन ! हे दुर्गम वन फारच कष्टप्रद आहे. आपण या पूर्वी कधीही अशा वनात राहिलेलो नाही. (म्हणून येथील कष्टांचा अनुभवही नाही आणि अभ्यासही नाही) ठीक ! आता आपण लवकरच तपोधन शरभङ्‌गांच्या जवळ जाऊ या’ - असे म्हणून श्रीरामचंद्र शरभङ्‌ग मुनिंच्या आश्रमावर गेले. ॥१-३॥
तस्य देवप्रभावस्य तपसा भावितात्मनः ।
समीपे शरभङ्‌गस्य ददर्श महदद्‌भुतम् ॥ ४ ॥
देवतांच्या प्रमाणे प्रभावशाली तसेच तपस्येने शुद्ध अंतःकरण झालेल्या (अथवा तपाच्या द्वारा परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार झालेल्या) शरभङ्‌ग मुनिंच्या समीप गेल्यावर श्रीरामांनी एक फार अद्‍भुत दृश्य पाहिले. ॥४॥
विभ्राजमानं वपुषा सूर्यवैश्वनरप्रभम् ।
रथप्रवरमारूढमाकाशे विबुधानुगम् ॥ ५ ॥

असंस्पृशन्तं वसुधां ददर्श विबुधेश्वरम् ।
सम्प्रभाभरणं देवं विरजोऽम्बरधारिणम् ॥ ६ ॥
तेथे त्यांना आकाशात एक श्रेष्ठ रथावर बसलेल्या देवतांचे स्वामी इंद्रदेवांचे दर्शन झाले; जे पृथ्वीला स्पर्श करीत नव्हते. त्यांची अङ्‌गकांती सूर्य आणि अग्नि यांच्या समान प्रकाशित होत होती. ते आपल्या तेजस्वी शरीराने देदीप्यमान होत होते. त्यांच्या मागे आणखीही बर्‍याच देवता होत्या. त्यांची दीप्तिमान आभूषणे चमकत होती आणि त्यांनी निर्मल वस्त्रे धारण केलेली होती. ॥५-६॥
तद्विधैरेव बहुभिः पूज्यमानं महात्मभिः ।
हरितैर्वाजिभिर्युक्तमन्तरिक्षगतं रथम् ॥ ७ ॥

ददर्शादूरतस्तस्य तरुणादित्यसंनिभम् ।
त्यांच्या सारखीच वेषभूषा असणारे दुसरे बरेचसे महात्मे इंद्रदेवांची पूजा (स्तुती - प्रशंसा) करीत होते. त्यांचा रथ आकाशात उभा होता आणि त्याला हिरव्या रंगाचे घोडे जुंपलेले होते. श्रीरामांनी जवळून तो रथ पाहिला. तो नवोदित सूर्याप्रमाणे प्रकाशित होत होता. ॥७ १/२॥
पाण्डुराभ्रघनप्रख्यं चन्द्रमण्डलसंनिभम् ॥ ८ ॥

अपश्यद् विमलं छत्रं चित्रमाल्योपशोभितम् ।
त्यांनी असे ही पाहिले इंद्राच्या मस्तकावर श्वेत ढगांप्रमाणे उज्ज्वल तसेच चंद्रमण्डलासमान कांतिमान निर्मल छत्र (ताणले गेलेले) उघडून धरले गेलेले होते; जे विचित्र फुलांच्या माळांनी सुशोभित झाले होते. ॥८ १/२॥
चामरव्यजने चाग्य्रे रुक्मदण्डे महाधने ॥ ९ ॥

गृहीते वरनारीभ्यां धूयमाने च मूर्धनि ।
श्रीरामांनी सोन्याच्या दांड्या असलेल्या दोन श्रेष्ठ आणि बहुमूल्य चवर्‍या आणि व्यजन (पंखे) ही पाहिले; दोन सुंदर स्त्रिया त्या चवर्‍या घेऊन देवराज इंद्राच्या मस्तकावर ढाळीत होत्या, त्यांनी वारा घालीत होत्या. ॥९ १/२॥
गन्धर्वामरसिद्धाश्च बहवः परमर्षयः ॥ १० ॥

अन्तरिक्षगतं देवं वाग्भिरग्य्राभिरैडयन् ।
सह संभाषमाणे तु शरभङ्‌गेन वासवे ॥ ११ ॥

दृष्ट्‍वा शतक्रतुं तत्र रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
रामोऽथ रथमुद्दिश्य भ्रातुर्दर्शयताद्‌भुतम् ॥ १२ ॥
त्यासमयी बरेचसे गंधर्व, देवता, सिद्ध आणि महर्षिगण उत्तम वचनांच्या द्वारे अंतरिक्षामध्ये विराजमान देवेंद्राची स्तुती करीत होते आणि देवराज इंद्र शरभङ्‌ग मुनिंशी वार्तालाप करीत होते. तेथे या प्रकारे शतक्रतु इंद्राचे दर्शन करून श्रीरामांनी त्यांच्या अद्‍भुत रथाकडे अंगुली निर्देश करून भावाला तो दाखवला आणि लक्ष्मणास या प्रमाणे म्हटले. ॥१०-१२॥
अर्चिष्मन्तं श्रिया जुष्टमद्‌भुतं पश्य लक्ष्मण ।
प्रतपन्तमिवादित्यमन्तरिक्षगतं रथम् ॥ १३ ॥
’लक्ष्मणा ! आकाशात तो अद्‍भुत रथ तर पहा. त्यांतून तेजाच्या ज्वाला निघत आहेत. तो सूर्याप्रमाणे तप्त होत आहे. शोभा मूर्तिमंत होऊन जणु त्याची सेवा करीत आहे. ॥१३॥
ये हयाः पुरुहूतस्य पुरा शक्रस्य नः श्रुताः ।
अन्तरिक्षगता दिव्याः ते इमे हरयो ध्रुवम् ॥ १४ ॥
’आपण पूर्वी देवराज इंद्राच्या ज्या दिव्य घोड्यांच्या विषयी जसे ऐकलेले आहे, निश्चितच हे आकाशात तसेच दिव्य अश्व विराजमान आहेत. ॥१४॥
इमे च पुरुषव्याघ्र ये तिष्ठन्त्यभितो दिशम् ।
शतं शतं कुण्डलिनो युवानः खड्गपाणयः ॥ १५ ॥

विस्तीर्णविपुलोरस्काः परिघायतबाहवः ।
शोणांशुवसनाः सर्वे व्याघ्रा इव दुरासदाः ॥ १६ ॥
’पुरुषसिंह ! या रथाच्या दोन्ही बाजूस जे हे हातात खड्‌ग घेतलेले कुण्डलधारी शंभर- शंभर युवक आहेत, त्यांचे वक्षःस्थळ विशाल आणि विस्तृत आहे; भुजा परिघाप्रमाणे सुदृढ आणि मोठ मोठ्या आहेत. या सर्वांनी लाल वस्त्रे धारण केली आहेत आणि व्याघ्रांप्रमाणे दुर्जय प्रतीत होत आहेत. ॥१५-१६॥
उरोदेशेषु सर्वेषां हारा ज्वलनसंनिभाः ।
रूपं बिभ्रति सौमित्रे पञ्चविंशतिवार्षिकम् ॥ १७ ॥
’सौमित्र ! या सर्वांच्या हृदयदेशांवर अग्निसमान तेजाने झगमगणारे हार शोभून दिसत आहेत. हे नवयुवक पंचवीस वर्षाच्या अवस्थेचे रूप धारण करीत आहेत. ॥१७॥
एतद्धि किल देवानां वयो भवति नित्यदा ।
यथेमे पुरुषव्याघ्रा दृश्यन्ते प्रियदर्शनाः ॥ १८ ॥
’असे म्हणतात की देवतांची सदा अशीच अवस्था राहात असते; जसे हे पुरुषप्रवर दिसून येत आहेत. यांचे दर्शन किती प्रिय वाटत आहे. ॥१८॥
इहैव सह वैदेह्या मुहूर्तं तिष्ठ लक्ष्मण ।
यावज्जानाम्यहं व्यक्तं क एव द्युतिमान् रथे ॥ १९ ॥
’लक्ष्मणा ! जो पर्यत मी स्पष्ट रूपाने हा पत्ता लावणार नाही की रथावर बसलेले हे तेजस्वी पुरुष कोण आहेत ? तो पर्यत तुम्ही वैदेहीसह एक मुहूर्तपर्यत येथेच थांबा.’ ॥१९॥
तमेवमुक्त्वा सौमित्रिमिहैव स्थीयतामिति ।
अभिचक्राम काकुत्स्थः शरभङ्‌गाश्रमं प्रति ॥ २० ॥
सौमित्राला या प्रकारे तेथे थांबण्याचा आदेश देऊन काकुत्स्थ राम हिंडत फिरत शरभङ्‌ग मुनिंच्या आश्रमात गेले. ॥२०॥
ततः समभिगच्छन्तं प्रेक्ष्य रामं शचीपतिः ।
शरभङ्‌गमनुज्ञाप्य विबुधानिदमब्रवीत् ॥ २१ ॥
श्रीरामांना येतांना पाहून शचीपति इंद्रांनी शरभङ्‌ग मुनिंचा निरोप घेऊन देवतांना याप्रकारे म्हटले - ॥२१॥
इहोपयात्यसौ रामो यावन्मां नाभिभाषते ।
निष्ठां नयत तावत् तु ततो मा द्रष्टुमर्हति ॥ २२ ॥
’श्रीरामचंद्र इकडे येत आहेत. ते जोपर्यंत माझ्याशी काही बोलू लागलेले नाहीत त्याच्या पूर्वीच तुम्ही मला येथून दुसर्‍या स्थानी घेऊन चला. या समयी श्रीरामांशी माझी मुलाखात होता उपयोगी नाही. ॥२२॥
जितवन्तं कृतार्थं हि तदाहमचिरादिमम् ।
कर्म ह्यनेन कर्तव्यं महदन्यैः सुदुष्करम् ॥ २३ ॥
’ज्याचे संपादन करणे इतरांना अत्यंत कठीण आहे ते महान कर्म यांना करावयाचे आहे. जेव्हा हे रावणावर विजय मिळवून आपले कर्तव्य पूर्ण करून कृतार्थ होऊन जातील तेव्हा मी शीघ्रच येऊन यांचे दर्शन करीन.’ ॥२३॥
अथ वज्री तमामन्त्र्य मानयित्वा च तापसम् ।
रथेन हययुक्तेन ययौ दिवमरिंदमः ॥ २४ ॥
असे म्हणून वज्रधारी शत्रुदमन इंद्रांनी तपस्वी शरभङ्‌गांचा सत्कार केला आणि त्यांना विचारून त्यांची अनुमति घेऊन ते घोडे जुंपलेल्या रथाच्या द्वारे स्वर्गलोकास निघून गेले. ॥२४॥
प्रयाते तु सहस्राक्षे राघवः सपरिच्छदः ।
अग्निहोत्रमुपासीनं शरभङ्‌गमुपागमत् ॥ २५ ॥
सहस्त्रनेत्रधारी इंद्र निघून गेल्यावर श्रीराम आपली पत्‍नी आणि भाऊ यांच्या सह शरभङ्‌ग मुनिंच्या जवळ गेले. त्या समयी ते अग्नीच्या समीप बसून अग्निहोत्र करीत होते. ॥२५॥
तस्य पादौ च संगृह्य रामः सीता च लक्ष्मणः ।
निषेदुस्तदनुज्ञाता लब्धवासा निमन्त्रिताः ॥ २६ ॥
श्रीराम, सीता आणि लक्ष्मणांनी मुनिंच्या चरणी प्रणाम केला आणि आज्ञेने तेथे बसले. शरभङ्‌गांनी त्यांना आतिथ्यासाठी निमंत्रण देऊन त्यांना राहाण्यासाठी स्थान दिले. ॥२६॥
ततः शक्रोपयानं तु पर्यपृच्छत राघवः ।
शरभङ्‌गश्च तत् सर्वं राघवाय न्यवेदयत् ॥ २७ ॥
त्यानंतर राघवांनी त्यांना इंद्राच्या येण्याचे कारण विचारले तेव्हां शरभङ्‌ग मुनिनी राघवाला सर्व गोष्टी निवेदन करताना म्हटले - ॥२७॥
मामेष वरदो राम ब्रह्म लोकं निनीषति ।
जितमुग्रेण तपसा दुष्प्रापमकृतात्मभिः ॥ २८ ॥
’श्रीरामा ! हे वर देणारे इंद्र मला ब्रह्मलोकामध्ये नेऊ इच्छितात. मी आपल्या उग्र तपस्येने त्या लोकावर विजय प्राप्त केला आहे. ज्यांची इंद्रिये वश नाहीत त्या पुरुषांसाठी तो लोक अत्यंत दुर्लभ आहे. ॥२८॥
अहं ज्ञात्वा नरव्याघ्र वर्तमानमदूरतः ।
ब्रह्मलोकं न गच्छामि त्वामदृष्ट्‍वा प्रियातिथिम् ॥ २९ ॥
’पुरुषसिंह ! परंतु जेव्हा मला माहीत झाले की आपण या आश्रमाच्या निकट येत आहात, तेव्हा मी निश्चय केला की आपल्या सारख्या प्रिय अतिथिचे दर्शन घेतल्याशिवाय मी ब्रह्मलोकाला जाणार नाही. ॥२९॥
त्वयाहं पुरुषव्याघ्र धार्मिकेण महात्मना ।
समागम्य गमिष्यामि त्रिदिवं चावरं परम् ॥ ३० ॥
’नरश्रेष्ठ ! आपल्या सारख्या धर्मपरायण महात्मा पुरुषास भेटूनच मी स्वर्गलोक आणि त्याच्याही वरील ब्रह्मलोकास जाईन. ॥३०॥
अक्षया नरशार्दूल जिता लोका मया शुभाः ।
ब्राह्म्याश्च नाकपृष्ठ्याश्च प्रतिगृह्णीष्व मामकान् ॥ ३१ ॥
’नरशार्दूल ! मी ब्रह्मलोक आणि स्वर्गलोक आदि ज्या अक्षय शुभ लोकांवर विजय मिळविला आहे, माझ्या त्या सर्व लोकांना आपण ग्रहण करा. ॥३१॥
एवमुक्तो नरव्याघ्रः सर्वशास्त्रविशारदः ।
ऋषिणा शरभङ्‌गेन राघवो वाक्यमब्रवीत् ॥ ३२ ॥
शरभङ्‌ग मुनिनी असे म्हटल्यावर संपूर्ण शास्त्रांचे ज्ञाते नरश्रेष्ठ राघव यांनी ही गोष्ट सांगितली - ॥३२॥
अहमेवाहरिष्यामि सर्वांलोकान् महामुने ।
आवासं त्वहमिच्छामि प्रदिष्टमिह कानने ॥ ३३ ॥
’महामुने ! मीच आपल्याला या सर्व लोकांची प्राप्ति करवीन. या समयी तर मी या वनात आपण सांगाल त्या स्थानी निवासमात्र करू इच्छितो.’ ॥३३॥
राघवेणैवमुक्तस्तु शक्रतुल्यबलेन वै ।
शरभङ्‌गो महाप्राज्ञः पुनरेवाब्रवीद् वचः ॥ ३४ ॥
इंद्राप्रमाणे बलशाली श्रीरामांनी असे म्हटल्यावर महाज्ञानी शरभङ्‌ग मुनि परत म्हणाले - ॥३४॥
इह राम महातेजाः सुतीक्ष्णो नाम धार्मिकः ।
वसत्यरण्ये धर्मात्मा स ते श्रेयो विधास्यति ॥ ३५ ॥
’श्रीरामा ! या वनात थोड्याच अंतरावर महातेजस्वी धर्मात्मा सुतीक्ष्ण मुनि नियमपूर्वक निवास करतात. तेच आपले कल्याण (आपल्यासाठी स्थान आदिंचा प्रबंध) करतील. ॥३५॥
सुतीक्ष्णमभिगच्छ त्वं शुचौ देशे तपस्विनम् ।
रमणीये वनोद्देशे स ते वासं विधास्यति ॥ ३६ ॥
’आपण या रमणीय वनप्रांताच्या त्या पवित्र स्थानी तपस्वी सुतीक्ष्ण मुनींच्या जवळ निघून जावे. ते आपल्या निवास स्थानाची व्यवस्था करतील. ॥३६॥
इमां मन्दाकिनीं राम प्रतिस्रोतामनुव्रज ।
नदीं पुष्पोडुपवहां तत्र तत्र गमिष्यसि ॥ ३७ ॥
’श्रीरामा ! आपण फुलासमान लहान लहान नावेतून पार होण्या योग्य अथवा पुष्पमयी नौकेला वाहून नेणार्‍या या मंदाकिनी नदीच्या स्त्रोताच्या विपरीत दिशेला हिच्याच किनार्‍या किनार्‍याने चालत जा. यायोगे तेथे आपण पोहोचाल. ॥३७॥
एष पन्था नरव्याघ्र मुहूर्तं पश्य तात माम् ।
यावज्जहामि गात्राणि जीर्णां त्वचमिवोरगः ॥ ३८ ॥
नरश्रेष्ठ ! हाच तो मार्ग आहे. परंतु तात ! आपण दोन घटिका येथेच थांबावे आणि जोपर्यंत जुनी कात टाकून देणार्‍या सर्पाप्रमाणे मी आपल्या जराजीर्ण गात्रांचा त्याग करणार नाही तोपर्यत माझ्याकडेच पहात राहावे. ॥३८॥
ततोऽग्निं स समाधाय हुत्वा चाज्येन मन्त्रवत् ।
शरभङ्‌गो महातेजाः प्रविवेश हुताशनम् ॥ ३९ ॥
असे म्हणून महातेजस्वी शरभङ्‌ग मुनिनी विधिवत अग्निची स्थापना केली, त्याला प्रज्वलित केले आणि मंत्रोञ्चारणपूर्वक तुपाची आहुति देऊन ते स्वतःही त्या अग्नित प्रविष्ट झाले. ॥३९॥
तस्य रोमाणि केशांश्च तदा वह्निर्महात्मनः ।
जीर्णां त्वचं तदस्थीनि यच्च मांसं च शोणितम् ॥ ४० ॥
त्या समयी अग्नीने त्या महात्म्याचे रोम, केस, जीर्ण त्वचा, मांस आणि रक्त सर्वांना जाळून भस्म करून टाकले. ॥४०॥
स च पावकसङ्‌काशः कुमारः समपद्यत ।
उत्थायाग्निचयात् तस्मात् शरभङ्‌गो व्यरोचत ॥ ४१ ॥
ते शरभङ्‌ग मुनि अग्नितुल्य तेजस्वी कुमाराच्या रूपात प्रकट झाले आणि त्या अग्निराशीतून वर निघून फारच शोभून दिसू लागले. ॥४१॥
स लोकानाहिताग्नीनामृषीणां च महात्मनाम् ।
देवानां च व्यतिक्रम्य ब्रह्मलोकं व्यरोहत ॥ ४२ ॥
ते अग्निहोत्री पुरुषांच्या, महात्मा मुनिंच्या, आणि देवतांच्याही लोकांना ओलांडून ब्रह्मलोकात जाऊन पोहोचले. ॥४२॥
स पुण्यकर्मा भवने द्विजर्षभः
पितामहं सानुचरं ददर्श ह ।
पितामहश्चापि समीक्ष्य तं द्विजं
ननन्द सुस्वागतमित्युवाच ह ॥ ४३ ॥
पुण्यकर्म करणार्‍या द्विजश्रेष्ठ शरभङ्‌गांनी ब्रह्मलोकात पार्षदांसहित पितामह ब्रह्मदेवांचे दर्शन केले. ब्रह्मदेवही त्यां महर्षिंना पाहून खूप प्रसन्न झाले आणि म्हणाले - ’महामुने ! तुमचे शुभ स्वागत आहे.’ ॥४३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा पाचवा सर्ग पूरा झाला. ॥५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP