श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ त्रिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणप्रहितानां गुप्तचराणां शार्दूलस्य च तं प्रति वानरसेनायाः समाचारस्य बोधनं तत्रत्यप्रमुखवीराणां परिचयदानं च - रावणाने धाडलेल्या गुप्तचरांनी आणि शार्दूलाने वानरसेनेचा समाचार सांगणे आणि मुख्य मुख्य वीरांचा परिचय देणे -
ततस्तमक्षोभ्यबलं लङ्‌काधिपतये चराः ।
सुवेले राघवं शैले निविष्टं प्रत्यवेदयन् ॥ १ ॥
गुप्तचरांनी लंकापति रावणाला हे सांगितले की राघवाची सेना सुवेल पर्वताजवळ येऊन थांबली आहे आणि ती सर्वथा अजेय आहे. ॥१॥
चाराणां रावणः श्रुत्वा प्राप्तं रामं महाबलम् ।
जातोद्वेगोऽभवत् किंचित् शार्दूलं वाक्यमब्रवीत् ॥ २ ॥
गुप्तचरांच्या मुखाने हे ऐकून की महाबली राम येऊन पोहोचले आहेत, रावणाला काहीसे भय वाटले. तो शार्दूलाला म्हणाला- ॥२॥
अयथावच्च ते वर्णो दीनश्चासि निशाचर ।
नासि कच्चिदमित्राणां क्रुद्धानां वशमागतः ॥ ३ ॥
निशाचरा ! तुझ्या शरीराची कांती पहिल्यासारखी राहिलेली नाही. तू दीन (दु:खी) दिसून येत आहेस. कुपित झालेल्या शत्रूंच्या ताब्यात तर सांपडला नव्हतास ना ? ॥३॥
इति तेनानुशिष्टस्तु वाचं मन्दमुदीरयत् ।
तदा राक्षसशार्दूलं शार्दूलो भयविक्लवः ॥ ४ ॥
त्याने या प्रकारे विचारल्यावर भयाने घाबरलेल्या शार्दूलाने राक्षसप्रवर रावणाला मंद स्वरात म्हटले- ॥४॥
न ते चारयितुं शक्या राजन् वानरपुंगवाः।
विक्रान्ता बलवन्तश्च राघवेण च रक्षिताः ॥ ५ ॥
राजन्‌ ! त्या श्रेष्ठ वानरांच्या गतिविधिचा पत्ता गुप्तचरांच्या द्वारे लावला जाऊ शकत नाही. ते फार पराक्रमी, बलवान्‌ तसेच राघवांच्या द्वारा सुरक्षित आहेत. ॥५॥
नापि संभाषितुं शक्याः संप्रश्नोऽत्र न लभ्यते।
सर्वतो रक्ष्यते पन्था वानरैः पर्वतोपमैः ॥ ६ ॥
त्याच्यांशी वार्तालाप करणेही असंभव आहे, म्हणून आपण कोण आहात ? आपला काय विचार आहे ? इत्यादि प्रश्नांसाठी तेथे अवकाशच मिळत नाही. पर्वतांसमान विशालकाय वानर सर्व बाजूने मार्गाचे रक्षण करत आहेत, म्हणून तेथे प्रवेश होणे ही कठीण आहे. ॥६॥
प्रविष्टमात्रे ज्ञातोऽहं बले तस्मिन् विचारिते ।
बलादू गृहीतो रक्षोभिर्बहुधास्मि विचारितः ॥ ७ ॥
त्या सेनेत प्रवेश करून जसा तिच्या गतिविधिचा विचार करण्यास आरंभ केला की तोच विभीषणाच्या साथी राक्षसांनी मला ओळखून बल-पूर्वक पकडून ठेवले आणि वारंवार इकडे तिकडे फिरविले. ॥७॥
जानुभिर्मुष्टिभिर्दन्तैः तलैश्चाभिहतो भृशम्।
परिणीतोऽस्मि हरिभिः बलमध्ये अमर्षणैः ॥ ८ ॥
त्या सेनेच्या मध्ये अमर्षाने भरलेल्या वानरांनी गुडघे, बुक्के, दात आणि थपडांनी मला खूप मारले आणि सर्व सेनेमध्ये माझ्या अपराधाची घोषणा करीत (दवंडी पिटत) सर्वत्र मला फिरविले. ॥८॥
परिणीय च सर्वत्र नीतोऽहं रामसंसदि ।
रुधिरस्राविदीनांगो विह्वलश्चलितेन्द्रियः ॥ ९ ॥
सर्वत्र फिरवून मला श्रीरामांच्या दरबारात नेण्यात आले. त्यासमयी माझ्या शरीरातून रक्त निघत होते आणि अंगा-अंगात दीनता भरून राहिली होती. मी व्याकुळ होऊन गेलो होतो. माझी इंद्रिये विचलित होत होती. ॥९॥
हरिभिर्वध्यमानश्च याचमानः कृताञ्जलिः ।
राघवेण परित्रातो मा मेति च यदृच्छया ॥ १० ॥
वानर मारत होते आणि मी हात जोडून रक्षणासाठी याचना करीत होतो. त्या दशेमध्ये राघवांनी अकस्मात्‌ मारू नका, मारू नका असे म्हणून माझे रक्षण केले. ॥१०॥
एष शैलशिलाभिस्तु पूरयित्वा महार्णवम् ।
द्वारमाश्रित्य लङ्‌काया रामस्तिष्ठति सायुधः ॥ ११ ॥
श्रीराम पर्वतीय शिलाखंडांच्या द्वारा समुद्राला भरून टाकून लंकेच्या द्वाराजवळ येऊन धडकले आहेत आणि हातात धनुष्य घेऊन उभे आहेत. ॥११॥
गरुडव्यूहमास्थाय सर्वतो हरिभिर्वृतः ।
मां विसृज्य महातेजा लङ्‌कामेवाभिवर्तते ॥ १२ ॥
ते महातेजस्वी राघव गरूडव्यूहाच्या आश्रय घेऊन वानरांमध्ये विराजमान आहेत आणि मला निरोप देऊन लंकेवर चढाई करून येत आहेत. ॥१२॥
पुरा प्राकारमायाति क्षिप्रमेकतरं कुरु ।
सीतां वापि प्रयच्छाशु युद्धं वापि प्रदीयताम् ॥ १३ ॥
जो पर्यंत ते लंकेच्या तटापर्यंत आलेले नाहीत त्यापूर्वीच आपण शीघ्रतापूर्वक दोहोपैकी एक काम अवश्य करावे - एक तर त्यांना सीता परत करावी अथवा युद्धस्थळावर उभे राहून त्याच्यांशी सामना करावा. ॥१३॥
मनसा तद् तदा प्रेक्ष्य तत् श्रुत्वा राक्षसाधिपः ।
शार्दूलं सुमहद्वाक्यं अथोवाच स रावणः ॥ १४ ॥
त्याचे बोलणे ऐकून मनातल्या मनात त्याच्यावर विचार केल्यानंतर राक्षसराज रावणाने शार्दूलाला ही महत्वपूर्ण गोष्ट सांगितली- ॥१४॥
यदि मां प्रतियुध्यन्ते देवगंधर्वदानवाः ।
नैव सीतां प्रदास्यामि सर्वलोकभयादपि ॥ १५ ॥
जरि देवता, गंधर्व आणि दानव माझ्याशी युद्ध करतील आणि संपूर्ण लोक मला भय देऊ लागतील तरीही मी सीतेला परत करणार नाही. ॥१५॥
एवमुक्त्वा महातेजा रावणः पुनरब्रवीत् ।
चारिता भवता सेना केऽत्र शूराः प्लवंगमाः ॥ १६ ॥
असे म्हणून महातेजस्वी रावण परत म्हणाला - तुम्ही तर वानरांच्या सेनेमध्ये विचरण करून चुकला आहात, त्या सेनेत कोणकोणते वानर अधिक शूरवीर आहेत ? ॥१६॥
किंप्रभा कीदृशाः सौम्य वानरा ये दुरासदाः ।
कस्य पुत्राश्च पौत्राश्च तत्त्वमाख्याहि राक्षस ॥ १७ ॥
सौम्य ! जे दुर्जय वानर आहेत ते कसे आहेत ? त्यांचा प्रभाव कसा आहे ? तसेच ते कुणाचे पुत्र आहेत आणि पौत्र आहेत ? राक्षसा ! या सर्व गोष्टी ठीक ठीक सांग. ॥१७॥
तथात्र प्रतिपत्स्यामि ज्ञात्वा तेषां बलाबलम् ।
अवश्यं खलु संख्यानं कर्तव्यं युद्धमिच्छता ॥ १८ ॥
त्या वानरांचे बलाबल जाणून तदनुसार कर्तव्याचा निश्चय करीन. युद्धाची इच्छा ठेवणार्‍या पुरूषाने आपल्या तसेच शत्रुपक्षाच्या सेनेची गणना - त्या विषयीची आवश्यक माहिती जरूर करून घेतली पाहिजे. ॥१८॥
अथैवमुक्तः शार्दूलो रावणेनोत्तमश्चरः ।
इदं वचनमारेभे वक्तुं रावणसन्निधौ ॥ १९ ॥
रावणाने याप्रकारे विचारल्यावर श्रेष्ठ गुप्तचर शार्दूलाने त्याच्या जवळ याप्रमाणे सांगण्यास आरंभ केला- ॥१९॥
अथर्क्षरजसः पुत्रो युधि राजन् सुदुर्जयः ।
गद्‌गदस्याथ पुत्रोऽत्र जाम्बवानिति विश्रुतः ॥ २० ॥
राजन्‌ ! त्या वानरसेनेमध्ये जांबवान्‌ नावाने प्रसिद्ध एक वीर आहे; ज्याला युद्धात परास्त करणे फारच कठीण आहे. ऋक्षरजा तसेच गद्‌गदाचा पुत्र आहे. ॥२०॥
गद्‌गदस्यैव पुत्रोऽन्यो गुरुपुत्रः शतक्रतोः ।
कदनं यस्य पुत्रेण कृतमेकेन रक्षसाम् ॥ २१ ॥
गद्‌गदाचा एक दुसराही पुत्र आहे ज्याचे नाव धूम्र आहे. इंद्रांचे गुरू बृहस्पतिचा पुत्र केसरी आहे ज्यांचा पुत्र हनुमान याने एकट्‍यानेच येथे येऊन पूर्वी राक्षसांचा संहार केला होता. ॥२१॥
सुषेणश्चात्र धर्मात्मा पुत्रो धर्मस्य वीर्यवान् ।
सौम्यः सोमात्मजश्चात्र राजन् दधिमुखः कपिः ॥ २२ ॥
धर्मात्मा आणि पराक्रमी सुषेण, धर्माचा पुत्र आहे. राजन्‌ ! दधिमुख नामक सौम्य वानर चंद्रम्याचा मुलगा आहे. ॥२२॥
सुमुखो दुर्मुखश्चात्र वेगदर्शी च वानरः ।
मृत्युर्वानररूपेण नूनं सृष्टः स्वयंभुवा ॥ २३ ॥
सुमुख, दुर्मुख आणि वेगदर्शी नामक वानर - हे मृत्युचे पुत्र आहेत. निश्चितच स्वयंभू ब्रह्मदेवाने मृत्युचीच या वानरांच्या रूपात सृष्टि केली आहे. ॥२३॥
पुत्रो हुतवहस्यात्र नीलः सेनापतिः स्वयम् ।
अनिलस्य च पुत्रोऽत्र हनुमानिति विश्रुतः ॥ २४ ॥
स्वयं सेनापति नील अग्निचा पुत्र आहे. सुविख्यात वीर हनुमान्‌ वायुचा पुत्र आहे. ॥२४॥
नप्ता शक्रस्य दुर्धर्षो बलवानङ्‌गदो युवा ।
मैन्दश्च द्विविदश्चोभौ बलिनावश्विसंभवौ ॥ २५ ॥
बलवान्‌ तसेच दुर्जय वीर अंगद इंद्राचा नातू आहे. तो अद्याप नवयुवक आहे. बलवान्‌ वानर मैंद आण द्विविद - हे दोघे अश्विनीकुमारांचे पुत्र आहेत. ॥२५॥
पुत्रा वैवस्वतस्याथ पञ्च कालान्तकोपमाः ।
गजो गवाक्षो गवयः शरभो गंधमादनः ॥ २६ ॥
राज, गवाक्ष, गवय, शरभ आणि गंधमादन - हे पाच यमराजाचे पुत्र आहेत आणि काळ आणि अंतक यांच्या समान पराक्रमी आहेत. ॥२६॥
दश वानरकोट्यश्च शूराणां युद्धकाङ्‌क्षिणाम् ।
श्रीमतां देवपुत्राणां शेषं नाख्यातुमुत्सहे ॥ २७ ॥
याप्रकारे देवतांपासून उत्पन्न झालेल्या तेजस्वी शूरवीर वानरांची संख्या दहा कोटी आहे. ते सर्वच्या सर्व युद्धाची इच्छा ठेवणारे आहेत. या अतिरिक्त जे शेष वानर आहेत, त्यांच्या विषयी मी काही सांगू शकत नाही, कारण त्यांची गणना करणे असंभव आहे. ॥२७॥
पुत्रो दशरथस्यैष सिंहसंहननो युवा ।
दूषणो निहतो येन खरश्च त्रिशिरास्तथा ॥ २८ ॥
दशरथनंदन श्रीरामांच्या श्रीविग्रह सिंहाप्रमाणे सुगठित आहे. यांची युवावस्था आहे. यांनी एकट्‍यानेच खर-दूषण आणि त्रिशिराचा संहार केला होता. ॥२८॥
नास्ति रामस्य सदृशे विक्रमे भुवि कश्चन ।
विराधो निहतो येन कबंधश्चान्तकोपमः ॥ २९ ॥

वक्तुं न शक्तो रामस्य नरः गुणान् कश्चिन्नरः क्षितौ ।
जनस्थानगता येन तावन्तो राक्षसा हताः ॥ ३० ॥
या भूतलावर कोणीही मनुष्य असा नाही आहे, जो श्रीरामांच्या गुणांचे पूर्णरूपाने वर्णन करू शकेल. श्रीरामांनीच जनस्थानात असलेल्या सर्व राक्षसांचा संहार केला होता. ॥२९-३०॥
लक्ष्मणश्चात्र धर्मात्मा मातङ्‌गानामिवर्षभः ।
यस्य बाणपथं प्राप्य न जीवेदपि वासवः ॥ ३१ ॥
धर्मात्मा लक्ष्मणही श्रेष्ठ गजराजा समान पराक्रमी आहेत. त्यांच्या बाणांचे लक्ष्य बनल्यावर देवराज इंद्रही जीवित राहू शकत नाहीत. ॥३१॥
श्वेतो ज्योतिर्मुखश्चात्र भास्करस्यात्मसंभवौ ।
वरुणस्याथ पुत्रोऽथ हेमकूटः प्लवंगमः ॥ ३२ ॥
याशिवाय या सेनेत श्वेत आणि ज्योतिर्मुख - हे दोन वानर भगवान्‌ सूर्याचे औरस पुत्र आहेत. हेमकूट नावाचा वानर वरुणाचा पुत्र म्हटला जात आहे. ॥३२॥
विश्वकर्मसुतो वीरो नलः प्लवगसत्तमः ।
विक्रान्तो वेगवानत्र वसुपुत्रः स दुर्धरः ॥ ३३ ॥
वानरशिरोमणी वीरवर नल विश्वकर्म्याचा पुत्र आहे. वेगवान्‌ आणि पराक्रमी दुर्धर वसु देवतेचा पुत्र आहे. ॥३३॥
राक्षसानां वरिष्ठश्च तव भ्राता विभीषणः ।
परिगृह्य पुरीं लङ्‌कां राघवस्य हिते रतः ॥ ३४ ॥
आपले भाऊ राक्षसशिरोमणि विभीषण ही लंकापुरीचे राज्य घेऊन राघवांच्याच हित साधनेमध्ये तत्पर राहात आहेत. ॥३४॥
इति सर्वं समाख्यातं तवेदं वानरं बलम् ।
सुवेलेऽधिष्ठितं शैले शेषकार्ये भवान् गतिः ॥ ३५ ॥
याप्रकारे मी सुवेल पर्वतावर तळ ठोकलेल्या वानर सेनेचे पूर्णपणे वर्णन केले आहे. आता जे शेष कार्य आहे ते आपल्याच हातात आहे. (**). ॥३५॥
(**- या सर्गात जे वानरांच्या जन्माचे वर्णन केले गेलेले आहे ते प्राय: बालकांडाच्या सतराव्या सर्गात केल्या गेलेल्या वर्णनाच्या विरूद्ध आहे. तेथे वरुणापासून सुषेण, पर्जन्यापासून शरभ आणि कुबेरापासून गंधमादनाची उत्पत्ति सांगितली गेली आहे. परंतु या सर्गात सुषेणाला धर्माचा तसेच शरभ आणि गंधमादनाला वैवस्वत यमाचे पुत्र म्हटले आहे. या विरोधाचा परिहार हाच आहे की येथे सांगितले गेलेले सुषेण आदि बालकांडवर्णित सुषेण आदिहून भिन्न आहेत.)
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे त्रिंशः सर्गः ॥ ३० ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा तीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥३०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP