[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ तृतीयः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
लङ्‌काmaवलोक्य हनुमतो विस्मयsतत्र प्रविशततस्य लंकयावरोधस्तत्प्रहारेण पीडितया तया तस्मै पुर्य्यां प्रवेष्टुmaनुमतिदानम् -
लङ्‌कापुरीचे अवलोकन करून हनुमन्तांचे विस्मित होणे, लंकेत प्रवेश करीत असता निशाचरी लंकेने त्यास अडविणे, आणि त्यांच्या माराने विह्वळ होऊन त्यास पुरीमध्ये प्रवेश करण्यास अनुमति देणे -
स लम्बशिखरे लम्बे लम्बतोयदसंनिभे ।
सत्त्वमास्थाय मेधावी हनुमान् मारुतात्मजः ॥ १ ॥

निशि लङ्‌कां महासत्त्वो विवेश कपिकुञ्जरः ।
रम्यकाननतोयाढ्यां पुरीं रावणपालिताम् ॥ २ ॥
उंच उंच शिखरांनी युक्त, जे मेघांची बरोबरी करीत होते अशा लंब पर्वतावर, महाबलशाली, बुद्धिमान, कपिश्रेष्ठ, वायुपुत्र हनुमान सत्वगुणांचा आश्रय घेऊन राहिले होते. त्यांनी रात्रीच्या वेळी रावणपालित लंकेमध्ये प्रवेश केला. ती नगरी सुरम्य वने आणि जलाशयांनी सुशोभित होती. ॥१-२॥
शारदाम्बुधरप्रख्यैर्भवनैरुपशोभिताम् ।
सागरोपमनिर्घोषां सागरानिलसेविताम् ॥ ३ ॥
शरद ऋतूमधील मेघांप्रमाणे श्वेत कान्ति असलेल्या सुन्दर गृहांमुळे तिला शोभा आली होती. समुद्राच्या गर्जनेप्रमाणे त्या नगरीमध्ये सारखा घोष (गंभीर नाद) होत होता. सागराच्या लहरींना स्पर्श करून वाहणारा वायु जणु त्या पुरीची सेवा करीत होता. ॥३॥

सुपुष्टबलसंपुष्टां यथैव विटपावतीम् ।
चारुतोरणनिर्यूहां पाण्डुरद्वारतोरणाम् ॥ ४ ॥
अलकापुरी प्रमाणे शक्तीशाली सैन्याच्या द्वारे तिचे रक्षण केले जात होते. तिच्या मुख्य मुख्य द्वारान्त सुन्दर मत्त हत्ती ठेवलेले झुलत होते. शुभ्रवर्णाच्या द्वारांनी आणि तोरणांनी ती आन्तून बाहेरून सुशोभित झाली होती. ॥४॥

भुजगाचरितां गुप्तां शुभां भोगवतीमिव ।
तां सविद्युद्घनाकीर्णां ज्योतिर्गणनिषेविताम् ॥ ५ ॥

चण्डमारुतनिर्ह्रादां यथा चाप्यमरावतीम् ।
त्या नगरीच्या रक्षणासाठी मोठमोठ्‍या सर्पांची ये - जा चालू होती, त्यामुळे ती नगरी नागांनी संरक्षित, सुन्दर भोगवती नगरी प्रमाणे भासत होती. अमरावती नगरी प्रमाणे तेथे आवश्यकतेनुसार विद्युल्लतेसह मेघ पसरलेले होते. ग्रह आणि नक्षत्रांसारख्या विद्युत दीपांच्या प्रकाशाने ती प्रकाशित झाली होती आणि प्रचंड वायुचा ध्वनी तेथे सतत सुरू होता. ॥५ १/२॥
शातकुम्भेन महता प्राकारेणाभिसंवृताम् ॥ ६ ॥

किंकिणीजालघोषाभिः पताकाभिरलंकृताम् ।
सुवर्णमय प्रचंड प्राकारांनी अमरावतीप्रमाणे ती परिवेष्टित होती. लहान लहान घंटांचा घोष ज्यामध्ये होत आहे अशा पताकांनी ती भूषित झालेली होती. ॥६ १/२॥
आसाद्य सहसा हृष्टः प्राकारमभिपेदिवान् ॥ ७ ॥

विस्मयाविष्टहृदयः पुरीमालोक्य सर्वतः ।
त्या पुरीच्या समीप पोहोचतांच हर्ष आणि उत्साह यांनी युक्त झालेले हनुमान एकदम उडी मारून तिच्या प्राकारावर (तिच्या भोवती असलेल्या तटावर) जाऊन बसले. तेथे सर्व बाजूने लङ्‌कापुरीचे अवलोकन केल्यावर ते अन्तःकरणात आश्चर्यचकित झाले. ॥७ १/२॥
जाम्बूनदमयैर्द्वारैर्वैदूर्यकृतवेदिकैः ॥ ८ ॥

वज्रस्फाटिकमुक्ताभिर्मणिकुट्टिमभूषितैः ।
तप्तहाटकनिर्यूहै राजतामलपाण्डुरैः ॥ ९ ॥

वैदूर्यकृतसोपानैः स्फाटिकान्तरपांसुभिः ।
चारुसञ्जवनोपेतैः खमिवोत्पतितैः शुभैः ॥ १० ॥
सुवर्णाच्या बनविलेल्या द्वारांनी त्या नगरीला अपूर्व शोभा प्राप्त झाली होती. त्याचा द्वारान्त वैडूर्य रत्‍नांच्या देवड्‍या बान्धलेल्या होत्या. हिरे, स्फटिक आणि मोती यांनी ती द्वारे मढविलेली होती. मणिमय फरशी यांनी ती नगरी भूषित झाली होती. उत्कृष्ट सुवर्णाचे गज (हत्ती) त्यान्तून बसविलेले होते. त्या द्वारांचे वरचे भाग चान्दीचे बनविलेले होते, त्यामुळे ते स्वच्छ आणि शुभ्र दिसत होते. वैडूर्यरत्‍नांच्या जिन्यांनी ती युक्त होती आणि त्यान्तील मध्यभाग धूळरहित स्फटिकांनी तयार केलेला होता. ती सर्व द्वारे रमणीय सभा-भवनांनी युक्त आणि सुन्दर होती. तसेच ती इतकी उंच होती की जणुं आकाशास भिडल्यासारखी वाटत होती. ॥८-१०॥
क्रौञ्चबर्हिणसंघुष्टै राजहंसनिषेवितैः ।
तूर्याभरणनिर्घोषैः सर्वतः प्रतिनादिताम् ॥ ११ ॥
त्या ठिकाणी क्रौंच आणि मयूरांचा कलरव गुञ्जत होता आणि त्याचा द्वारांवर राजहंस नामक पक्षीही निवास करीत होते. तेथे निरनिराळ्या वाद्यांचा आणि आभूषणांचा मधुर ध्वनि होत असल्याने लङ्‌कानगरी सर्वबाजूनी प्रतिध्वनित होत होती. ॥११॥
वस्वोकसाराप्रतिमां समीक्ष्य नगरीं ततः ।
खमिवोत्पतितां लङ्‌कां जहर्ष हनुमान् कपिः ॥ १२ ॥
त्रिकूटाच्या शिखरावर प्रतिष्ठित असल्यानें कुबेराच्या अलका (नगरी) प्रमाणे शोभून दिसणारी ती लङ्‌कानगरी जणु आकाशान्तच उड्‍डाण करून राहिली आहे की काय असे वाटत होते. अशी ती नगरी पाहून कपि हनुमानास अत्यन्त हर्ष झाला. ॥१२॥
तां समीक्ष्य पुरीं लङ्‌कां राक्षसाधिपतेः शुभाम् ।
अनुत्तमामृद्धिमतीं चिन्तयामास वीर्यवान् ॥ १३ ॥
धनधान्यांनी समृद्ध आणि अनुपम अशी ती राक्षसाधिपती रावणाची शुभ लङ्‌कानगरी पाहून पराक्रमी हनुमान आपल्याशी विचार करू लागले- ॥१३॥
नेयमन्येन नगरी शक्या धर्षयितुं बलात् ।
रक्षिता रावणबलैः उद्यतायुधपाणिभिः ॥ १४ ॥
सुसज्ज आयुधे हातामध्ये सदैव तयार ठेवणारे रावणाचे सैनिक या पुरीचे रक्षण करीत आहेत. म्हणून दुसरा कुणीही तिला बळपूर्वक आपल्या कबज्यात घेऊ शकणार नाही. ॥१४॥
कुमुदाङ्‌गदयोर्वापि सुषेणस्य महाकपेः ।
प्रसिद्धेयं भवेद् भूमिर्मैन्दद्विविदयोरपि ॥ १५ ॥

विवस्वतस्तनूजस्य हरेश्च कुशपर्वणः ।
ऋक्षस्य कपिमुख्यस्य मम चैव गतिर्भवेत् ॥ १६ ॥
केवळ कुमुद, अंगद, महाकपि सुषेण, मैन्द, द्विविद यांचा तर मोठ्‍या कष्टाने या नगरीत प्रवेश होईल. पण दर्भाच्या पर्‍याप्रमाणे ज्याचे रोम आहेत असा सूर्यपुत्र कपिश्रेष्ठ वानर सुग्रीव त्याची, ऋक्षराज जाम्बवान याची तसेच माझी मात्र या पुरीत गति होऊ शकते. (कुशपर्वणः चा अर्थ वानर कुशपर्व असा ही होऊ शकतो.) ॥१५-१६॥
समीक्ष्य च महाबाहू राघवस्य पराक्रमम् ।
लक्ष्मणस्य च विक्रान्तमभवत् प्रीतिमान् कपिः ॥ १७ ॥
या प्रमाणे विचार केल्यानन्तर आणि महाबाहु श्रीराम आणि लक्ष्मणांच्या पराक्रमाचा विचार केल्यावर कपिश्रेष्ठ हनुमान अत्यन्त प्रसन्न झाले. ॥१७॥
तां रत्‍नवसनोपेतां गोष्ठागारावतंसिकाम् ।
यन्त्रागारस्तनीमृद्धां प्रमदामिव भूषिताम् ॥ १८ ॥

तां नष्टतिमिरां दीपैर्भास्वरैश्च महागृहैः ।
नगरीं राक्षसेन्द्रस्य स ददर्श महाकपिः ॥ १९ ॥
रत्‍नखचित प्राकाररूपी वस्त्रांनी युक्त, गोठे आणि गृहे या कर्ण भूषणांनी संपन्न आणि तोफा ठेवण्याचे बुरूजरूपी स्तनांनी युक्त असलेली जणु तरूण स्त्रीच की काय, अशी ती राक्षसराज रावणाची उज्ज्वळ नगरी, महाग्रहांनी आणि दीपांनी अन्धःकार रहित झालेली महाकपि हनुमानांनी पाहिली. ॥१८-१९॥
अथ सा हरिशार्दूलं प्रविशन्तं महाकपिम् ।
नगरी स्वेन रूपेण ददर्श पवनात्मजम् ॥ २० ॥
त्यानन्तर वानरश्रेष्ठ वायुपुत्र हनुमान त्या नगरीत प्रवेश करू लागले असतां त्या नगरीची अधिष्ठात्री देवता, जी लङ्‌का, ती आपल्या स्वाभाविक रूपात प्रकट होऊन तिने त्यांची भेट घेतली. ॥२०॥
सा तं हरिवरं दृष्ट्‍वा लङ्‌का रावणपालिता ।
स्वयमेवोत्थिता तत्र विकृताननदर्शना ॥ २१ ॥
वानरश्रेष्ठ हनुमन्तास पाहून ती रावणपालित लङ्‌का स्वतः उठून उभी राहिली. तिचे मुख अत्यन्त आक्राळ विक्राळ होते. ॥२१॥
पुरस्तात् तस्य वीरस्य वायुसूनोरतिष्ठत ।
मुञ्चमाना महानादमब्रवीत् पवनात्मजम् ॥ २२ ॥
ती त्या वीर वायुपुत्रापुढे उभी राहिली आणि मोठ्‍याने गर्जना करीत त्यांना म्हणाली- ॥२२॥
कस्त्वं केन च कार्येण इह प्राप्तो वनालय ।
कथयस्वेह यत् तत्त्वं यावत् प्राणा धरन्ति ते ॥ २३ ॥
हे वनचरा ! तू कोण आहेस आणि कोणत्या कार्यासाठी येथे आला आहेस ? हे मला, तू जिवन्त आहेस तो पर्यन्तच खरे खरे काय ते नीट (यथार्थ) सांग. ॥२३॥
न शक्यं खल्वियं लङ्‌का प्रवेष्टुं वानर त्वया ।
रक्षिता रावणबलैरभिगुप्ता समन्ततः ॥ २४ ॥
हे वानरा ! सर्व बाजूने रावणाची सेना या पुरीचे रक्षण करीत आहे म्हणून अशा लंकेमध्ये तुझा प्रवेश होणे खरोखरच शक्य नाही. ॥२४॥
अथ तामब्रवीद् वीरो हनूमानग्रतः स्थिताम् ।
कथयिष्यामि तत् तत्त्वं यन्मां त्वं परिपृच्छसे ॥ २५ ॥

का त्वं विरूपनयना पुरद्वारेऽवतिष्ठसे ।
किमर्थं चापि मां क्रोधान्निर्भर्त्सयसि दारुणे ॥ २६ ॥
यानन्तर समोर उभ्या राहिलेल्या त्या लंकेला ते वीर हनुमान म्हणाले- तू मला जे जे विचारत आहेस ते मी काय ते खरे खरे सांगेन. परन्तु हे क्रूर विरूपनयने ! तू या नगरीच्या द्वाराशी उभी राहिलेली आहेस तर तूं कोण आहेस ? आणि या प्रकारे रागावून तू मला कां दटावीत आहेस, हे मला आधी कळू दे. ॥२५-२६॥
हनुमद्वचनं श्रुत्वा लङ्‌का सा कामरूपिणी ।
उवाच वचनं क्रुद्धा परुषं पवनात्मजम् ॥ २७ ॥
हनुमन्ताचे हे बोलणे ऐकून इच्छेनुसार रूप धारण करणारी लङ्‌का रागावून त्या पवनकुमारास कठोर वाणीने म्हणाली - ॥२७॥
अहं राक्षसराजस्य रावणस्य महात्मनः ।
आज्ञा प्रतीक्षा दुर्धर्षा रक्षामि नगरीमिमाम् ॥ २८ ॥
मी महात्मा राक्षसराज रावणाच्या राजाज्ञेची प्रतिक्षा करणारी त्याची सेविका आहे. माझ्यावर आक्रमण करणे हे कुणालाही अत्यन्त कठीण आहे. मी या नगरीचे रक्षण करीत असते. ॥२८॥
न शक्यं मामवज्ञाय प्रवेष्टुं नगरीमिमाम् ।
अद्य प्राणैः परित्यक्तः स्वप्स्यसे निहतो मया ॥ २९ ॥
माझी अवहेलना करून या पुरीत प्रवेश करणे, हे कुणालाही संभवनीय नाही. आज माझ्या हातून मारला जाऊन प्राणहीन होऊन तू या पृथ्वीवर शयन करशील. ॥२९॥
अहं हि नगरी लङ्‌का स्वयमेव प्लवङ्‌गम ।
सर्वतः परिरक्षामि अतस्ते कथितं मया ॥ ३० ॥
हे वानरा ! मी स्वतः लङ्‌का नगरीच आहे आणि म्हणून मी सर्व बाजूने हिचे रक्षण करीत असते. या कारणे स्वतःच मी तुझ्याशी अत्यन्त कठोर वाणी बोलले. ॥३०॥
लङ्‌काया वचनं श्रुत्वा हनुमान् मारुतात्मजः ।
यत्‍नवान् स हरिश्रेष्ठः स्थितः शैल इवापरः ॥ ३१ ॥
लंकेचे हे बोलणे ऐकून, पवनकुमार कपिश्रेष्ठ हनुमान तिला जिंकण्यासाठी प्रयत्‍नशील होऊन, दुसर्‍या पर्वतासमान तेथे उभे ठाकले. ॥३१॥
स तां स्त्रीरूपविकृतां दृष्ट्‍वा वानरपुङ्‌गवः ।
आबभाषेऽथ मेधावी सत्त्ववान् प्लवगर्षभः ॥ ३२ ॥
विक्राळ राक्षसी रूपातील लंकेला पाहून बुद्धिमान्‌ वानरश्रेष्ठ शक्तिशाली हनुमानांने तिला म्हणाले- ॥३२॥
द्रक्ष्यामि नगरीं लङ्‌कां साट्टप्राकारतोरणाम् ।
इत्यर्थमिह सम्प्राप्तः परं कौतूहलं हि मे ॥ ३३ ॥
बुरूज, तट आणि तोरण यांच्यासह लङ्‌कानगरी पाहण्यासाठी मी येथे आलो आहे, आणि ती पहाण्याची मला फार उत्कंठा आहे. ॥३३॥
वनान्युपवनानीह लङ्‌कायाः काननानि च ।
सर्वतो गृहमुख्यानि द्रष्टुमागमनं हि मे ॥ ३४ ॥
थोडक्यात या लंकेमध्ये जी वने, उपवने, अरण्ये आणि मोठ मोठी भुवने (घरे) आहेत, ती पाहण्यासाठीच मी येथे आलो आहे. (त्यासाठीच माझे आगमन झाले आहे) ॥३४॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा लङ्‌का सा कामरूपिणी ।
भूय एव पुर्नवाक्यं बभाषे परुषाक्षरम् ॥ ३५ ॥
हनुमन्ताचे हे भाषण ऐकल्यावर इच्छेनुसार रूप धारण करणारी लङ्‌का पुन्हा कठोर वाणीने त्यांना म्हणाली - ॥३५॥
मामनिर्जित्य दुर्बुद्धे राक्षसेश्वरपालिताम् ।
न शक्यं ह्यद्य ते द्रष्टुं पुरीयं वानराधम ॥ ३६ ॥
हे दुर्बुद्धे ! हे वानराधमा ! राक्षसेश्वर रावणाच्या द्वारा माझे रक्षण होत आहे. म्हणून मला परास्त केल्याखेरिज आज तू ही लङ्‌का नगरी पाहू शकणार नाहीस. ॥३६॥
ततः स हरिशार्दूलः तामुवाच निशाचरीम् ।
दृष्ट्‍वा पुरीमिमां भद्रे पुनर्यास्ये यथागतम् ॥ ३७ ॥
तेव्हा तो कपिकेसरी त्या निशाचरीस म्हणाला - हे भद्रे ! ही नगरी पाहून, मी जसा आलो आहे तसाच निमूटपणे परत जाईन. ॥३७॥
ततः कृत्वा महानादं सा वै लङ्‌का भयंकरम् ।
तलेन वानरश्रेष्ठं ताडयामास वेगिता ॥ ३८ ॥
हे ऐकून लंकेने अत्यन्त भयंकर गर्जना करून वानरश्रेष्ठ हनुमानास खूप जोराने एक थप्पड मारली. ॥३८॥
ततः स हरिशार्दूलो लङ्‌कया ताडितो भृशम् ।
ननाद सुमहानादं वीर्यवान् मारुतात्मजः ॥ ३९ ॥
लंकेद्वारा या प्रकारे अतिशय जोराने थप्पड खाल्यावर वानरश्रेष्ठ वायुपुत्र हनुमानाने मोठ्‍या जोराने सिंहनाद केला (फारच मोठी गर्जना केली) ॥३९॥
ततः संवर्तयामास वामहस्तस्य सोऽङ्‌गुलीः ।
मुष्टिनाभिजघानैनां हनूमान् क्रोधमूर्च्छितः ॥ ४० ॥
नन्तर त्यांनी अत्यन्त क्रोधयुक्त होऊन डाव्या हाताची मूठ वळून त्या मुठीने त्या लंकेला जोराने एक ठोसा मारला. ॥४०॥
स्त्री चेति मन्यमानेन नातिक्रोधः स्वयं कृतः ।
सा तु तेन प्रहारेण विह्वलाङ्‌गी निशाचरी ।
पपात सहसा भूमौ विकृताननदर्शना ॥ ४१ ॥
ही स्त्री आहे असे समजून हनुमानांनी स्वतःस विशेष क्रोध न आणता एक तडाखा दिला होता, तरी त्या लघु प्रहाराने ती आक्राळ विक्राळ मुद्रेची राक्षसी व्याकुळ झाली आणि एकदम भूमीवर पडली. ॥४१॥
ततस्तु हनुमान् वीरस्तां दृष्ट्‍वा विनिपातिताम् ।
कृपां चकार तेजस्वी मन्यमानः स्त्रियं च ताम् ॥ ४२ ॥
तेव्हा आपल्या मुष्टी प्रहाराने भूमीवर पडलेल्या त्या लंकेकडे पाहून आणि ती स्त्री आहे हे जाणून तेजस्वी वीर हनुमन्ताच्या अन्तःकरणामध्ये दया उत्पन्न झाली आणि त्याने तिच्यावर मोठीच कृपा केली (दया दाखवली). ॥४२॥
ततो वै भृशमुद्विग्ना लङ्‌का सा गद्‌गदाक्षरम् ।
उवाचागर्वितं वाक्यं हनुमन्तं प्लवङ्‌गमम् ॥ ४३ ॥
इकडे अत्यन्त उद्विग्न झालेली ती लङ्‌का गर्व सोडून देऊन गद्‍गद्‍ वाणीने (स्फुन्दत स्फुन्दत) त्या वानरवीर हनुमन्तास म्हणाली - ॥४३॥
प्रसीद सुमहाबाहो त्रायस्व हरिसत्तम ।
समये सौम्य तिष्ठन्ति सत्त्ववन्तो महाबलाः ॥ ४४ ॥
हे अत्यन्त पराक्रमी कपिश्रेष्ठा ! माझ्यावर प्रसन्न हो आणि माझे रक्षण कर. हे सौम्या ! सत्त्वगुण संपन्न महाबलाढ्‍य पुरूष शास्त्राच्या मर्यादेस अनुसरून वागतात. (शास्त्रात स्त्रीला अवध्य म्हटले गेले आहे, म्हणून तू माझे प्राण घेऊ नकोस) ॥४४॥
अहं तु नगरी लङ्‌का स्वयमेव प्लवङ्‌गम ।
निर्जिताऽहं त्वया वीर विक्रमेण महाबल ॥ ४५ ॥
हे महाबली वानर वीरा ! मी स्वतः (साक्षात) लङ्‌कापुरी आहे आणि तू आपल्या पराक्रमाने माझा पराजय केला आहेस. ॥४५॥
इदं च तथ्यं शृणु मे ब्रुवन्त्या वै हरीश्वर ।
स्वयं स्वयम्भुवा दत्तं वरदानं यथा मम ॥ ४६ ॥
हे वानराधिपते ! हे सत्य मी तुला सांगत आहे, ते तू ऐकून घे. साक्षात स्वयंभू ब्रह्मदेवाने मला जसे वरदान दिले होते, तेच मी तुला सांगते आहे. ॥४६॥
यदा त्वां वानरः कश्चिद् विक्रमाद् वशमानयेत् ।
तदा त्वया हि विज्ञेयं रक्षसां भयमागतम् ॥ ४७ ॥
त्यांनी सांगितले होते की ज्यावेळी कुणी वानर तुला स्वपराक्रमाने वश करून घेईल तेव्हा राक्षसांना भय प्राप्त झाले आहे, असे तू समज. ॥४७॥
स हि मे समयः सौम्य प्राप्तोऽद्य तव दर्शनात् ।
स्वयम्भूविहितः सत्यो न तस्यास्ति व्यतिक्रमः ॥ ४८ ॥
हे सौम्या ! तो ब्रह्मदेवाने ठरविलेला सत्य समय आज आपल्या भेटीमुळे प्राप्त झाला आहे. त्याचे उल्लंघन होणे (कदापि) शक्य नाही. ॥४८॥
सीतानिमित्तं राज्ञस्तु रावणस्य दुरात्मनः ।
राक्षसां चैव सर्वेषां विनाशः समुपागतः ॥ ४९ ॥
आता सीतेच्या निमित्ताने दुरात्मा राजा रावण तथा राक्षसांच्या विनाशाचा काळ (समीप) आला आहे. ॥४९॥
तत् प्रविश्य हरिश्रेष्ठ पुरीं रावणपालिताम् ।
विधत्स्व सर्वकार्याणि यानि यानीह वाञ्छसि ॥ ५० ॥
म्हणून कपिश्रेष्ठा ! आपण या रावणरक्षित नगरीमध्ये प्रवेश करा आणि येथे जे जे कार्य करण्याची आपली इच्छा आहे ते ते आपण पूर्ण करा. ॥५०॥
प्रविश्य शापोपहतां हरीश्वरः
पुरीं शुभां राक्षसमुख्यपालिताम् ।
यदृच्छया त्वं जनकात्मजां सतीं
विमार्ग सर्वत्र गतो यथासुखम् ॥ ५१ ॥
हे हरीश्वर ! राक्षसराज रावण द्वारा पालित ही सुन्दर पुरी अभिशापाच्या योगे नष्टप्राय झालेली आहे. म्हणून तिच्यामध्ये प्रवेश करून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खुशाल सुखपूर्वक सर्वत्र सती-साध्वी जनकात्मजा सीतेचा शोध घ्या. ॥५१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा तिसरा सर्ग पूरा झाला. ॥३॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP