श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षट्षष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

कुम्भकर्णभयात् पलायमानानां वानराणां अंगदेन प्रोत्साहनं आवाहनं च, कुम्भकर्णेन कपीनां संहारः, पुनर्वानरसैनिकानां पलायनं, अंगदेन प्रबोध्य तेषां पुनः प्रत्यावर्तनं च -
कुंभकर्णाच्या भयाने पळणार्‍या वानरांना अंगद द्वारा प्रोत्साहन आणि आवाहन, कुंभकर्ण द्वारा वानरांचा संहार, पुन्हा वानरसेनेचे पलायन आणि अंगदाने त्यांना समजावून परत आणणे -
स लङ्‌घयित्वा प्राकारं गिरिकूटोपमो महान् ।
निर्ययौ नगरात् तूर्णं कुंभकर्णो महाबलः ॥ १ ॥
कुंभकर्ण पर्वत शिखरासमान उंच आणि विशालकाय होता. तो तटबंदी ओलांडून अत्यंत वेगाने नगराच्या बाहेर पडला. ॥१॥
स ननाद महानादं समुद्रमभिनादयन् ।
जनयन्निव निर्घातान् विधमन्निव पर्वतान् ॥ २ ॥
बाहेर येऊन पर्वतांना कंपित करत आणि समुद्राला निनादित करत तो उच्चस्वराने गंभीर नाद करू लागला. त्याची ती गर्जना वीजेच्या कडकडाटावरही मात करत होती. ॥२॥
तमवध्यं मधवता यमेन वरुणेन वा ।
प्रेक्ष्य भीमाक्षमायान्तं वानरा विप्रदुद्रुवुः ॥ ३ ॥
इंद्र, यम अथवा वरूण यांच्याही द्वारा त्याचा वध होणे असंभव होते. त्या भयानक डोळे असलेल्या निशाचराला येतांना पाहून सर्व वानर पळून जाऊन लांब उभे राहिले. ॥३॥
तांस्तु विप्रद्रुतान् दृष्ट्‍वा वालिपुत्रोऽङ्‌गदोऽब्रवीत् ।
नलं नीलं गवाक्षं च कुमुदं च महाबलम् ॥ ४ ॥
त्या सर्वांना पळतांना पाहून राजपुत्र अंगदाने नल, नील, गवाक्ष आणि महाबली कुमुदाला संबोधित करून म्हटले - ॥४॥
आत्मानस्तानि विस्मृत्य वीर्याण्यभिजनानि च ।
क्व गच्छत भयत्रस्ताः प्राकृता हरयो यथा ॥ ५ ॥
वानर वीरांनो ! आपले उत्तम कुळ आणि त्या अलौकिक पराक्रमांना विसरून साधारण वानरांप्रमाणे भयभीत होऊन तुम्ही कोठे पळून चालला आहात ? ॥५॥
साधु सौम्या निवर्तध्वं किं प्राणान् परिरक्षथ ।
नालं युद्धाय वै रक्षो महतीयं विभीषिका ॥ ६ ॥
सौम्य स्वभावाच्या बहादुरांनो (वीरांनो) ! तुम्ही परत जाल तरच बरे होईल. प्राण वाचविण्याच्या फेर्‍यात (भानगडीत) कशाला पडत आहात ? हा राक्षस आपल्या बरोबर युद्ध करण्याची शक्ति बाळगत नाही आहे. हीच तर त्याची फार मोठी विभीषिका आहे - याने मायेने विशाल रूप धारण करून तुम्हांला भीती दाखविण्यासाठी व्यर्थ हा खटाटोप पसरून ठेवला आहे. ॥६॥
महतीमुत्थितामेनां राक्षसानां विभीषिकाम् ।
विक्रमाद् विधमिष्यामो निवर्तध्वं प्लवंगमाः ॥ ७ ॥
आपल्या समोर उभी ठाकलेली राक्षसांची ही फार मोठी विभीषिका आपण आपल्या पराक्रमाने नष्ट करून टाकू. म्हणून वानर वीरांनो ! परत या. ॥७॥
कृच्छ्रेण तु समाश्वस्य संगम्य च ततस्ततः ।
वृक्षान् गृहित्वा हरयः संप्रतस्थू रणाजिरम् ॥ ८ ॥
तेव्हा वानरांनी मोठ्‍या कष्टाने धैर्य धारण केले आणि जिकडून तिकडून एकत्र येऊन हातात वृक्ष घेऊन ते रणभूमीकडे निघाले. ॥८॥
ते निवर्त्य तु संरब्धाः कुंभकर्णं वनौकसः ।
निजघ्नुः परमक्रुद्धाः समदा इव कुञ्जराः ॥ ९ ॥

प्रांशुभिर्गिरिशृङ्‌गैश्च शिलाभिश्च महाबलः ।
पादपैः पुष्पिताग्रैश्च हन्यमानो न कम्पते ॥ १० ॥
परत आल्यावर ते महाबलाढ्‍य वानर मत्त हत्तींप्रमाणे अत्यंत क्रोधाने आणि रोषाने भरून गेले आणि कुंभकर्णावर उंच उंच पर्वतशिखरे, शिला आणि फुललेल्या वृक्षांनी प्रहार करू लागले. त्यांचा मार खाऊन कुंभकर्ण विचलित होत नव्हता. ॥९-१०॥
तस्य गात्रेषु पतिता भिद्यन्ते बहवः शिलाः ।
पादपाः पुष्पिताग्राश्च भग्नाः पेतुर्महीतले ॥ ११ ॥
त्याच्या अंगांवर पडलेल्या बहुतेक शिळांचा चुराडा होत होता आणि ते फुललेले वृक्ष ही त्याच्या शरीरावर धडकताच तुकडे तुकडे होऊन पृथ्वीवर पडत होते. ॥११॥
सोऽपि सैन्यानि संक्रुद्धो वानराणां महौजसाम् ।
ममन्थ परमायत्तो वनान्यग्निरिवोत्थितः ॥ १२ ॥
तिकडे क्रोधाविष्ट झालेला कुंभकर्ण अत्यंत सावधान होऊन महाबली वानरांच्या सेनांना, भडकलेला दावानल प्रमाणे चिरडून टाकू लागला. ॥१२॥
लोहितार्द्रास्तु बहवः शेरते वानरर्षभाः ।
निरस्ताः पतिता भूमौ ताम्रपुष्पा इव द्रुमाः ॥ १३ ॥
बरेचसे श्रेष्ठ वानर रक्तांनी न्हाऊन जमिनीवर झोपले; ज्यांना त्याने उचलून वर फेकून दिले, ते लाल फुलांनी लगडलेल्या वृक्षांप्रमाणे पृथ्वीवर पडले. ॥१३॥
लङ्‌घयन्तः प्रधावन्तो वानरा नावलोकयन् ।
केचित् समुद्रे पतिताः केचिद् गगनमास्थिताः ॥ १४ ॥
वानर उंचसखल भूमीला ओलांडून जोरजोराने पळून जाऊ लागले. ते मागे पुढे आणि आजूबाजूला कोठेही दृष्टी टाकत नव्हते. कोणी समुद्रात पडले तर कोणी आकाशातच उडत राहिले. ॥१४॥
वध्यमानास्तु ते वीरा राक्षसेन बलीयसा ।
सागरं येन ते तीर्णाः पथा तेनैव दुद्रुवुः ॥ १५ ॥
त्या राक्षसाने लीलया (सहज हसत खेळत) ज्यांना मारले, ते वीर वानर ज्या मार्गाने ते समुद्र पार करून लंकेत आले होते त्याच मार्गाने पळून जाऊ लागले. ॥१५॥
ते स्थलानि तथा निम्नं विषण्णवदना भयात् ।
ऋक्षा वृक्षान् समारूढाः केचित् पर्वतमाश्रिताः ॥ १६ ॥
भयामुळे वानरांच्या मुखाची कांती फिकी पडली. ते सखल जागा पाहून पाहून पळू लागले आणि लपून बसू लागले. कित्येक अस्वले तर झाडावर चढून बसली आणि कित्येकांनी पर्वतांचा आश्रय घेतला. ॥१६॥
ममज्जुरर्णवे केचिद् गुहाः केचित् समाश्रिताः ।
निपेतुः केचित् अपरे केचिन्नैवावतस्थिरे ।
केचिद् भूमौ निपतिताः केचित् सुप्ता मृता इव ॥ १७ ॥
कित्येक वानर आणि अस्वले समुद्रात बुडाले. कित्येकांनी पर्वतांच्या गुहांचा आश्रय घेतला. कोणी पडले, कोणी एका स्थानावर उभे राहू शकले नाही म्हणून पळून गेले. काही धराशायी झाले आणि कोणी कोणी प्रेताप्रमाणे श्वास रोखून पडून राहिले. ॥१७॥
तान् समीक्ष्याङ्‌गदो भग्नान् वानरानिदमब्रवीत् ।
अवतिष्ठत युध्यामो निवर्तध्वं प्लवंगमाः ॥ १८ ॥
त्या वानरांना पळतांना पाहून अंगदाने याप्रकारे म्हटले - वानर वीरांनो ! थांबा, परत या ! आपण सर्व मिळून युद्ध करू या. ॥१८॥
भग्नानां वो न पश्यामि परिगम्य महीमिमाम् ।
स्थानं सर्वे निवर्तध्वं किं प्राणान् परिरक्षथ ॥ १९ ॥
जर तुम्ही पळून गेलात तर सार्‍या पृथ्वीची परिक्रमा करूनही कोठे तुम्हांला थांबण्यासाठी स्थान मिळेल असे मला दिसून येत नाही. (सुग्रीवाच्या आज्ञेशिवाय कोठे गेलात तर तुम्ही जिवंत वाचू शकणार नाही.) म्हणून सर्व जण परत या, का आपलेच प्राण वाचविण्याच्या चिंतेत पडला आहात ? ॥१९॥
निरायुधानां क्रमतां असंगगतिपौरुषाः ।
दारा ह्यपहसिष्यन्ति स वै घातः सुजीवताम् ॥ २० ॥
तुमचा वेग आणि पराक्रम यांना रोखून धरणारा कोणीही नाही. जर तुम्ही हत्यार टाकून पळून जाल तर तुमच्या स्त्रिया सुद्धा तुम्हां लोकांचा उपहास करतील आणि तो उपहास जिवंत राहूनही तुमच्यासाठी मृत्युसमान दुःखदायी होईल. ॥२०॥
कुलेषु जाताः सर्वेऽस्मिन् विस्तीर्णेषु महत्सु च ।
क्व गच्छत भयत्रस्ताः प्राकृता हरयो यथा ।
अनार्याः खलु यद्‌भीताः त्यक्त्वा वीर्यं प्रधावत ॥ २१ ॥
तुम्ही सर्व लोक महान्‌ आणि फार दूरवर पसरलेल्या श्रेष्ठ कुळात उत्पन्न झालेले आहात. मग साधारण वानरांप्रमाणे भयभीत होऊन कोठे पळून जात आहात ? जर तुम्ही पराक्रम सोडून भयामुळे पळून जात असाल तर निश्चितच अनार्य समजले जाल. ॥२१॥
विकत्थनानि वो यानि तभवद्‌भिर्जनसंसदि ।
तानि वः क्व नु यातानि सोदग्राणि हितानि च ॥ २२ ॥
तुम्ही जनसमुदायात बसून ज्या बढाया मारीत होता की आम्ही फार प्रचंड वीर आहोत आणि स्वामीचे हितैषी आहोत; तुमच्या त्या सर्व वल्गना आज कोठे निघून गेल्या आहेत ? ॥२२॥
भीरोः प्रवादाः श्रूयन्ते यस्तु जीवति धिक्कृतः ।
मार्गः सत्पुरुषैर्जुष्टः सेव्यतां त्यज्यतां भयम् ॥ २३ ॥
जो सत्पुरूषांच्या द्वारा धिक्कृत होऊनही जीवन धारण करतो त्याच्या त्या जीवनाचा धिक्कार आहे, याप्रकारची निंदात्मक वचने कायरांना, भित्र्यांना सदा ऐकावी लागतात. म्हणून तुम्ही लोक भय सोडा आणि सत्पुरूषांच्या द्वारा सेवित मार्गाचा आश्रय घ्या. ॥२३॥
शयामहे वा निहताः पृथिव्यामल्पजीविताः ।
प्राप्नुयामो ब्रह्मलोकं दुष्प्रापं च कुयोधिभिः ॥ २४ ॥
जर आम्ही अल्पजीवी असलो आणि शत्रूच्या द्वारा मारले जाऊन रणभूमीवर झोपी गेलो तर आपल्याला जी युद्धपर पराङ्‌‍मुखांना परम दुर्लभ आहे, त्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. ॥२४॥
संप्राप्नुयामः कीर्तिं वा निहत्वा शत्रुमाहवे ।
निहता वीरलोकस्य भोक्ष्यामो वसु वानराः ॥ २५ ॥
वानरांनो ! जर आपण युद्धात शत्रुंना मारून टाकले तर आपल्याला उत्तम कीर्ति मिळेल आणि जर आपण स्वतः मारले गेलो तर आपण वीरलोकांच्या वैभवाचा उपभोग घेऊ. ॥२५॥
न कुंभकर्णः काकुत्स्थं दृष्ट्‍वा जीवन् गमिष्यति ।
दीप्यमानमिवासाद्य पतङ्‌गो ज्वलनं यथा ॥ २६ ॥
काकुत्स्थाच्या समोर गेल्यावर कुंभकर्ण जिवंत परत येऊ शकणार नाही; ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्निच्या जवळ जाऊन पतंग भस्म झाल्याशिवाय राहू शकत नाही अगदी त्याच प्रमाणे. ॥२६॥
पलायनेन चोद्दिष्टाः प्राणान् रक्षामहे वयम् ।
एकेन बहवो भग्ना यशो नाशं गमिष्यति ॥ २७ ॥
जर आपण प्रख्यात वीर होऊनही पळून जाऊन आपले प्राण वाचविले आणि संख्येने अधिक असूनही एका योद्ध्याचा सामना करू शकलो नाही तर आपले यश मातीत मिसळून जाईल. ॥२७॥
एवं ब्रुवाणं तं शूरं अंगदं कनकाङ्‌गदम् ।
द्रवमाणास्ततो वाक्यं ऊचुः शूरविगर्हितम् ॥ २८ ॥
सोन्याचे अंगद (बाजूबंद) धारण करणार्‍या शूरवीर अंगदांनी जेव्हा असे म्हटले तेव्हा त्या पळून जाणार्‍या वानरांनी त्यांना असे उत्तर दिले ज्याची शौर्य-संपन्न योद्धे सदा निंदा करतात. ॥२८॥
कृतं नः कदनं घोरं कुंभकर्णेन रक्षसा ।
न स्थानकालो गच्छामो दयितं जीवितं हि नः ॥ २९ ॥
ते म्हणाले - राक्षस कुंभकर्णाने आमचा घोर संहार आरंभिला आहे म्हणून हा (येथे) थांबण्याचा समय नाही आहे. आम्ही जात आहोत कारण आम्हांला आमचे जीवित प्रिय आहे. ॥२९॥
एतावदुक्त्वा वचनं सर्वे ते भेजिरे दिशः ।
भीमं मीमाक्षमायान्तं दृष्ट्‍वा वानरयूथपाः ॥ ३० ॥
एवढे बोलून भयानक नेत्रांच्या भीषण कुंभकर्णाला येताना पाहून त्या सर्व वानर-यूथपतिंनी विभिन्न दिशांचा आश्रय घेतला. ॥३०॥
द्रवमाणास्तु ते वीरा अङ्‌गदेन बलीमुखाः ।
सान्त्वनैश्चानुमानैश्च ततः सर्वे निवर्तिताः ॥ ३१ ॥
तेव्हा त्या पळून जाणार्‍या सर्व वीर-वानरांना अंगदांनी सांत्वना आणि आदर-सन्मान द्वारा परतविले. ॥३१॥
प्रहर्षमुपनीताश्च वालिपुत्रेण धीमता ।
आज्ञाप्रतीक्षास्तस्थुश्च सर्वे वानरयूथपाः ॥ ३२ ॥
बुद्धिमान्‌ वालिपुत्राने त्या सर्वांना प्रसन्न करुन घेतले. ते सर्व वानर यूथपति सुग्रीवाच्या आज्ञेची प्रतीक्षा करीत उभे राहिले. ॥३२॥
ऋषभशरभमैन्दधूम्रनीलाः
कुमुदसुषेणगवाक्षरम्भताराः ।
द्विविदपनसवायुपुत्रमुख्याः
त्वरिततराभिमुखं रणं प्रयाताः ॥ ३३ ॥
त्यानंतर ऋषभ, शरभ, मैंद, धूम्र, नील, कुमुद, सुषेण, गवाक्ष, रंभ, तार, द्विविद, पनस आणि वायुपुत्र हनुमान्‌ आदि श्रेष्ठ वानर वीर तात्काळच कुंभकर्णाचा सामना करण्यासाठी रणक्षेत्राकडे जाऊ लागले. ॥३३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे षट्षष्टितमः सर्गः ॥ ६६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा सहासष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP