श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। सप्तषष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मार्कण्डेयप्रभृति मुनिभिर्मन्त्रिभिश्च राजानं विना देशस्य भाविनिदुरवस्थां वर्णयित्वा कमपि राजपदे प्रतिष्ठापयितुं वसिष्ठं प्रत्यनुरोधः -
मार्कण्डेय आदि मुनी आणि मन्त्रांनी राजाशिवाय होणार्‍या देशाच्या दुरवस्थेची वर्णन करून वसिष्ठांना कुणाला तरी राजा बनविण्यासाठी अनुरोध करणे -
आक्रन्दिता निरानन्दा सास्रकण्ठजनाविला ।
अयोध्यायामवतता सा व्यतीयाय शर्वरी ॥ १ ॥
अयोध्यातील लोकांची ती रात्र रडत विलाप करीतच गेली. तिच्यात आनंद नावालाही नव्हता. अश्रूंनी सर्व लोकांचे कंठ दाटून आले होते. दुःखामुळे ती रात्र सर्वांना अत्यंत लांबलचक (दीर्घ) वाटली. ॥ १ ॥
व्यतीतायां तु शर्वर्यामादित्यस्योदये ततः ।
समेत्य राजकर्तारः सभामीयुर्द्विजातयः ॥ २ ॥
रात्र सरून सूर्योदय झाल्यावर राज्य व्यवस्था संबंधित ब्राह्मणगण राजदरबारात उपस्थित झाले. ॥ २ ॥
मार्कण्डेयोऽथ मौद्‌गल्यो वामदेवश्च कश्यपः ।
कात्यायनो गौतमश्च जाबालिश्च महायशाः ॥ ३ ॥

एते द्विजाः सहामात्यैः पृथग्वाचमुदीरयन् ।
वसिष्ठमेवाभिमुखाः श्रेष्ठं राजपुरोहितम् ॥ ४ ॥
मार्कण्डेय, मौद्गल्य, वामदेव, कश्यप, कात्यायन, गौतम आणि महायशस्वी जाबाली- हे सर्व ब्राम्हणश्रेष्ठ राजपुरोहित वसिष्ठांच्या समोर बसून मन्त्र्यांसह आपले वेगवेगळे मत सांगू लागले. ॥ ३-४ ॥
अतीता शर्वरी दुःखं या नो वर्षशतोपमा ।
अस्मिन् पञ्चत्वमापन्ने पुत्रशोकेन पार्थिवे ॥ ५ ॥
ते म्हणाले - ’ पुत्रशोकाने हे महाराज स्वर्गवासी झाल्यामुळे ही रात्र मोठ्या दुःखाने गेली आहे. जी आम्हाला शंभर वर्षाप्रमाणे प्रतीत झाली होती. ॥ ५ ॥
स्वर्गतश्च महाराजो रामश्चारण्यमाश्रितः ।
लक्ष्मणश्चापि तेजस्वी रामेणैव गतः सह ॥ ६ ॥
’महाराज दशरथ स्वर्गास निघून गेले. श्रीराम वनात राहू लागले आहेत, आणि तेजस्वी लक्ष्मणही श्रीरामाबरोबच निघून गेले आहेत. ॥ ६ ॥
उभौ भरतशत्रुघ्नौ केकयेषु परंतपौ ।
पुरे राजगृहे रम्ये मातामहनिवेशने ॥ ७ ॥
’शत्रूंना संताप देणारे परंतप दोघे बंधु भरत आणि शत्रुघ्न केकय देशाच्या राजगृहात आजोबांच्या घरी (मातामह) निवास करीत आहेत. ॥ ७ ॥
इक्ष्वाकूणामिहाद्यैव कश्चिद् राजा विधीयताम् ।
अराजकं हि नो राष्ट्रं विनाशं समवाप्नुयात् ॥ ८ ॥
’इक्ष्वाकुवंशी राजकुमारांपैकी कुणाला तरी आजच येथील राजा बनविले जावे कारण राजाशिवाय आमच्या राज्याचा नाश होऊन जाईल. ॥ ८ ॥
नाराजके जनपदे विद्युन्माली महास्वनः ।
अभिवर्षति पर्जन्यो महीं दिव्येन वारिणा ॥ ९ ॥
’जेथे कोणी राजा नसतो अशा जनपदामध्ये विद्युन्मालांनी अलंकृत महान गर्जन करणारे मेघही पृथ्वीवर दिव्य जलाची वृष्टि करीत नाहीत. ॥ ९ ॥
नाराजके जनपदे बीजमुष्टिः प्रकीर्यते ।
नाराजके पितुः पुत्रो भार्या वा वर्तते वशे ॥ १० ॥
ज्या जनपदात कोणी राजा नसतो तेथल्या शेतात मुठी भरभरून बीज विखुरले जात नाही. राजा विरहित देशात पुत्र पित्याच्या आणि स्त्री पतिच्या वश (अधीन) राहात नाही. ॥ १० ॥
अराजके धनं नास्ति नास्ति भार्याप्यराजके ।
इदमत्याहितं चान्यत् कुतः सत्यमराजके ॥ ११ ॥
’राजहीन देशात धन आपले नसते. राजा विरहित राज्यात पत्‍नी ही आपली राहात नाही, राजारहित देशात हे महान भय रहात असते. (जर तेथे पति-पत्‍नी आदिचा सत्य संबंध राहू शकत नाही तर मग दुसरे कुठले सत्य कसे राहू शकते ?) ॥ ११ ॥
नाराजके जनपदे कारयन्ति सभां नराः ।
उद्यानानि च रम्याणि हृष्टाः पुण्यगृहाणि च ॥ १२ ॥
’विना राजाच्या राज्यात मनुष्य काही पंचायत भवन बनवत नाहीत. रमणीय उद्यानेही निर्माण करवीत नाहीत तसेच हर्ष आणि उत्साहाने पुण्यगृह (धर्मशाळा, मंदिर आदि) ही बनवीत नाहीत. ॥ १२ ॥
नाराजके जनपदे यज्ञशीला द्विजातयः ।
सत्रात्राण्यन्वासते दान्ता ब्राह्मणाः संशितव्रताः ॥ १३ ॥
’जेथे कोणी राजा नाही, त्या जनपदात स्वभावतः यज्ञ करणारे द्विज आणि कठोर व्रताचे पालन करणारे जितेन्द्रिय ब्राह्मण ज्यात सर्व ऋत्विज् आणि सर्व यजमान असतात अशा मोठ्मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान करीत नाहीत. ॥ १३ ॥
नाराजके जनपदे महायज्ञेषु यज्वनः ।
ब्राह्मणा वसुसम्पूर्णा विसृजन्त्याप्तदक्षिणाः ॥ १४ ॥
’राजारहित जनपदात कदाचित महायज्ञांचा आरम्भ झालाही तरी त्यांत धनसम्पन्न ब्राह्मण ही ‌ऋत्विजांना पर्याप्त दक्षिणा देत नाहीत. (त्यांना भय वाटत असते की लोक आम्हांला धनी समजून लुटणार तर नाहीत). ॥ १४ ॥
नाराजके जनपदे प्रहृष्टनटनर्तकाः ।
उत्सवाश्च समाजाश्च वर्धन्ते राष्ट्रवर्धनाः ॥ १५ ॥
’अराजक देशात राष्ट्राला उन्नतिशील बनविणारे उत्सव ज्यांत नट आणि नर्तक हर्षाने युक्त होऊन आपल्या कलेचे प्रदर्शन करतात, ते वाढू शकत नाहीत तसेच दुसरे इतर राष्ट्र हितकारी संघ ही टवटवीत होऊ शकत नाहीत. ॥ १५ ॥
नाराजके जनपदे सिद्धार्था व्यवहारिणः ।
कथाभिरभिरज्यन्ते कथाशीलाः कथाप्रियैः ॥ १६ ॥
’विना राजाच्या राज्यात वादी आणि प्रतिवादी विवादाचा संतोषजनक निकाल होऊ शकत नाही अथवा व्यापार्‍यांना लाभ होत नाही. कथा ऐकण्याची इच्छा करणारे लोक कथावाचक पुराणिकांच्या कथांनी प्रसन्न होत नाहीत. ॥ १६ ॥
नाराजके जनपदे तूद्यानानि समागताः ।
सायाह्ने क्रीडितुं यान्ति कुमार्यो हेमभूषिताः ॥ १७ ॥
’राजारहित जनपदात सोन्याच्या आभूषणांनी विभूषित झालेल्या कुमारिका एकत्र येउन संध्यासमयी उद्यानात क्रीडा करण्यासाठी जात नाहीत. ॥ १७ ॥
नाराजके जनपदे धनवन्तः सुरक्षिताः ।
शेरते विवृतद्वाराः कृषिगोरक्षजीविनः ॥ १८ ॥
’विना राजाच्या राज्यात धनी लोक सुरक्षित राहू शकत नाहीत, तसेच कृषि आणि गोरक्षणाने जीवननिर्वाह करणारे वैश्यही दरवाजा उघडा ठेऊन झोपू शकत नाहीत. ॥ १८ ॥
नाराजके जनपदे वाहनैः शीघ्रवाहिभिः ।
नरा निर्यान्त्यरण्यानि नारीभिः सह कामिनः ॥ १९ ॥
’राजारहित जनपदात कामी मनुष्य स्त्रियांसहित जलद जाणार्‍या वाहनांच्या द्वारे वनविहारासाठी बाहेर पडत नाहीत. ॥ १९ ॥
नाराजके जनपदे बद्धघण्टा विषाणिनः ।
अटन्ति राजमार्गेषु कुञ्जराः षष्टिहायनाः ॥ २० ॥
’जेथे कोणी राजा नसतो त्या जनपदात साठी वर्षाचे दन्तार हत्ती घंटा बांधून रस्त्यावर हिंडत नाहीत. ॥ २० ॥
नाराजके जनपदे शरान् संततमस्यताम् ।
श्रूयते तलनिर्घोष इष्वस्त्राणामुपासने ॥ २१ ॥
’राजारहित राज्यात धनुर्विद्येच्या अभ्यास कालात निरंतर लक्ष्यावर बाण चालविणार्‍या वीरांच्या प्रत्यञ्चेचा आणि करतलाचा आवाज ऐकू येत नाही. ॥ २१ ॥
नाराजके जनपदे वणिजो दूरगामिनः ।
गच्छन्ति क्षेममध्वानं बहुपण्यसमाचिताः ॥ २२ ॥
’राजाविरहित जनपदात दूर जाऊन व्यापार करणे वाणिक (व्यापारी) विकावयाच्या बर्‍याचशा वस्तु बरोबर घेऊन कुशलता पूर्वक मार्ग आक्रमू शकत नाहीत. ॥ २२ ॥
नाराजके जनपदे चरत्येकचरो वशी ।
भावयन्नात्मनाऽऽत्मानं यत्र सायं गृहो मुनिः ॥ २३ ॥
’जेथे कोणी राजा नसतो त्या जनपदात, जेथे संध्या होईल तेथेच मुक्काम करणारा, आपल्या अन्तःकरण द्वारा परमात्माचे ध्यान करणारा आणि एकटाच विचरण करणारा जितेन्द्रिय मुनी हिंडत फिरत नाही. (कारण त्याला भोजन देणारा कोणी नसतो). ॥ २३ ॥
नाराजके जनपदे योगक्षेमः प्रवर्तते ।
न चाप्यराजके सेना शत्रून् विषहते युधि ॥ २४ ॥
’अराजक देशात लोकांना अप्राप्त वस्तुची प्राप्ती आणि प्राप्त वस्तूचे रक्षण होऊ शकत नाही. राजा नसल्याने सेनाही युध्यात शत्रूंचा सामना करीत नाही. ॥ २४ ॥
नाराजके जनपदे हृष्टैः परमवाजिभिः ।
नराः संयान्ति सहसा रथैश्च परिमण्डिताः ॥ २५ ॥
’राजारहित राज्यांत लोक वस्त्राभूषणांनी विभूषित होऊन हृष्ट पुष्ट उत्तम घोड्यांच्या द्वारा तसेच रथांवर सहसा यात्रा करीत नाहीत. (कारण त्यांना लुटारूंचे भय वाटत असते). ॥ २५ ॥
नाराजके जनपदे नराः शास्त्रविशारदाः ।
संवदंतोपतिष्ठन्ते वनेषूपवनेषु वा ॥ २६ ॥
’राजारहित राज्यात शास्त्रांचे विशिष्ट विद्वान लोक वन आणि उपवनात शास्त्रांची व्याख्या करीत राहू शकत नाहीत. ॥ २६ ॥
नाराजके जनपदे माल्यमोदकदक्षिणाः ।
देवताभ्यर्चनार्थाय कल्प्यन्ते नियतैर्जनैः ॥ २७ ॥
’जेथे अराजकता माजलेली असते त्या जनपदात मनाला अधीन ठेवणारे लोक देवतांच्या पूजेसाठी फुले, मिठाई आणि दक्षिणेची व्यवस्था करीत नाहीत. ॥ २७ ॥
नाराजके जनपदे चंदनागरुरूषिताः ।
राजपुत्रा विराजन्ते वसन्ते इव शाखिनः ॥ २८ ॥
’ज्या जनपदात कोणी राजा नसतो तेथे चन्दन आणि अगुरूचा लेप लावलेले राजकुमार वसंत ऋतुतील फुललेल्या वृक्षाप्रमाणे शोभा प्राप्त करीत नाही. ॥ २८ ॥
यथा ह्यनुदका नद्यो यथा वाप्यतृणं वनम् ।
अगोपाला यथा गावस्तथा राष्ट्रमराजकम् ॥ २९ ॥
’ज्याप्रमाणे जलाशिवाय नद्र्या, गवताशिवाय वने आणि गवळ्याशिवाय गायीची शोभा दिसतानाही त्याप्रकारेच राजाशिवाय राज्यशोभत नाही. ॥ २९ ॥
ध्वजो रथस्य प्रज्ञानं धूमो ज्ञानं विभावसोः ।
तेषां यो नो ध्वजो राजा स देवत्वमितो गतः ॥ ३० ॥
’ज्याप्रकारे ध्वज रथाचे ज्ञान करवितो, धूम अग्निचा बोधक असतो, त्याप्रकारे राजकाज पहाणार्‍या आम्हा लोकांच्या अधिकाराला प्रकाशित करणारे जे महाराज होते ते येथून देवलोकाला निघून गेले. ॥ ३० ॥
नाराजके जनपदे स्वकं भवति कस्यचित् ।
मत्स्या इव जना नित्यं भक्षयन्ति परस्परम् ॥ ३१ ॥
’राजा राहिला नाही की राज्यात कुठलाही मनुष्याची कुठलीही वस्तु त्याची आपली राहात नाही. ज्याप्रमाणे मासा एक दुसर्‍याला खाऊन टाकतो त्याप्रमाणे अराजक देशातील लोक सदा एक-दुसर्‍याला खात, लूटत, हिसकावून घेत राहात असतात. ॥ ३१ ॥
ये हि सम्भिन्नमर्यादा नास्तिकाश्छिन्नसंशयाः ।
तेऽपि भावाय कल्पन्ते राजदण्डनिपीडिताः ॥ ३२ ॥
’जे वेद- शास्त्रांची, तसेच आपल्या आपल्या जातिसाठी नियत वर्णाश्रमाची मर्यादा भंग करणारे नास्तिक पूर्वी राजदण्डांनी पीडित होऊन दबून राहात होते, तेही आता राजा न राहिल्याने निःशंक होऊन आपले प्रभुत्व प्रकट करतील. ॥ ३२ ॥
यथा दृष्टिः शरीरस्य नित्यमेव प्रवर्तते ।
तथा नरेंद्रो राष्ट्रस्य प्रभवः सत्यधर्मयोः ॥ ३३ ॥
’ज्याप्रमाणे दृष्टि सदाच शरिराच्या हितामध्ये प्रवृत्त राहात असते त्याप्रमाणेच राजा राज्यात सत्य आणि धर्माचा प्रवर्तक असतो. ॥ ३३ ॥
राजा सत्यं च धर्मश्च राजा कुलवतां कुलम् ।
राजा माता पिता चैव राजा हितकरो नृणाम् ॥ ३४ ॥
’राजाच सत्य आणि धर्म आहे. राजा हेच कुलवानांचे कुल आहे, राजाच माता आणि पिता आहे तसेच राजाच मनुष्यांचे हित करणारा आहे. ॥ ३४ ॥
यमो वैश्रवणः शक्रो वरुणश्च महाबलः ।
विशिष्यन्ते नरेंद्रेण वृत्तेन महता ततः ॥ ३५ ॥
’राजा आपल्या महान चरित्राच्या द्वारे यम, कुबेर इन्द्र आणि महाबली वरुणाहून पुढे जात असतो (यमराज केवळ दण्ड देतात , कुबेर केवळ धन देतात, इन्द्र केवळ पालन करतात आणि वरूण सदाचारात नियन्त्रित करतात, परंतु एका श्रेष्ठ राजामध्ये चारी गुण विद्र्यमान असतात म्हणून तो यांच्याही पुढे जातो). ॥ ३५ ॥
अहो तम इवेदं स्यान्न प्रज्ञायेत किञ्चन ।
राजा चेन्न भवेल्लोके विभजन् साध्वसाधुनी ॥ ३६ ॥
’जर संसारात चांगल्या- वाईटाचा विभाग करणारा राजा नसेल तर हे सारे जगत अन्धःकाराने व्याप्त (आछन्न) झाल्यासारखे होऊन जाईल, काहीच सुचणार नाही. ॥ ३६ ॥
जीवत्यपि महाराजे तवैव वचनं वयम् ।
नातिक्रमामहे सर्वे वेलां प्राप्येव सागरः ॥ ३७ ॥
”मुनिवर वसिष्ठ ! ज्या प्रमाणे उचंबळलेला समुद्र आपल्या तटभूमि पर्यंत पोहोचून पुढे जात नाही, त्याप्रमाणे आम्ही सर्व लोक महाराजांच्या जीवनकालातही केवळ आपल्याच शब्दांचे उल्लंघन करीत नव्हतो. ॥ ३७ ॥
स नः समीक्ष्य द्विजवर्य वृत्तं
     नृपं विना राष्ट्रज्यमरण्यभूतम् ।
कुमारमिक्ष्वाकुसुतं तथान्यं
     त्वमेव राजानमिहाभिषेचय ॥ ३८ ॥
’म्हणून विप्रवर ! या समयी आमच्या व्यवहाराकडे पाहून आणि राजांच्या अभावी जंगल बनलेल्या या देशावर दृष्टिपात करून आपणच कुणा योग्य पुरूषाला राजाच्या पदावर अभिषिक्त करावे. ॥ ३८ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्तषष्टितमः सर्गः ॥ ६७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा सदुसष्टावा सर्ग पूरा झाला ॥ ६७ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP