श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षड्‌विंशत्यधिक शततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

हनुमता भरतं प्रति श्रीरामलक्ष्मणसीता कर्तृकवनवाससम्भधिनां समेषां वृत्तानां श्रावणम् -
हनुमानांनी भरतांना श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या वनवासासंबंधी सर्व वृत्तांत ऐकविणे -
बहूनि माम वर्षाणि गतस्य सुमहद् वनम् ।
शृणोम्यहं प्रीतिकरं मम नाथस्य कीर्तनम् ॥ १ ॥
माझे स्वामी श्रीराम यांना विशाल वनात जाऊन खूप वर्षे लोटली आहेत. इतक्या वर्षानंतर आज मला त्यांच्याविषयी आनंददायिनी चर्चा ऐकावयास मिळाली आहे. ॥१॥
कल्याणी बत गाथेयं लौकिकी प्रतिभाति माम् ।
एति जीवन्तं आनन्दोदो नरं वर्षशतादपि ॥ २ ॥
आज ही कल्याणमयी लौकिक गाथा मला यथार्थ जाणून येत आहे -मनुष्य जर जिवंत राहिला तर त्याला कधी ना कधी हर्ष आणि आनंदाची प्राप्ति होतेच मग भलेही ती शंभर वर्षानंतर का होईना. ॥२॥
राघवस्य हरीणां च कथमासीत् समागमः ।
कस्मिन् देशे किमाश्रित्य तत्त्व्माख्याहि पृच्छतः ॥ ३ ॥
सौम्य ! राघवांचा आणि वानरांचा हा समागम कसा झाला ? कोठल्या देशात आणि कुठल्या कारणामुळे झाला ? हे मी जाणू इच्छितो. तुम्ही मला ठीक ठीक सांगा. ॥३॥
स पृष्टो राजपुत्रेण बृस्यां समुपवेशितः ।
आचचक्षे ततः सर्वं रामस्य चरितं वने ॥ ४ ॥
राजपुत्र भरतांनी याप्रकारे विचारल्यावर, कुशासनावर बसविले गेलेल्या हनुमानांनी श्रीरामांचे वनवास विषयक सर्व चरित्र त्यांना ऐकविले - ॥४॥
यथा प्रव्रजितो रामो मातुर्दत्तौ वरौ तव ।
यथा च पुत्रशोकेन राजा दशरथो मृतः ॥ ५ ॥

यथा दूतैस्त्वमानीतः तूर्णं राजगृहात् प्रभो ।
त्वयायोध्यां प्रविष्टेन यथा राज्यं न चेप्सितम् ॥ ६ ॥

चित्रकूटगिरिं गत्वा राज्येनामित्रकर्शनः ।
निमंत्रितस्त्वया भ्राता धर्मं आचरता सताम् ॥ ७ ॥

स्थितेन राज्ञो वचने यथा राज्यं विसर्जितम् ।
आर्यस्य पादुके गृह्य यथासि पुनरागतः ॥ ८ ॥

सर्वं एतन् महाबाहो यथावद् विदितं तव ।
त्वयि प्रतिप्रयाते तु यद् वृत्तं तन्निबोध मे ॥ ९ ॥
प्रभो ! महाबाहो ! ज्याप्रकारे श्रीरामांना वनवास दिला गेला, ज्याप्रकारे आपल्या मातेला दोन वर प्रदान केले गेले, जसे पुत्रशोकाने राजा दशरथांना मृत्यु आला, जसे राजगृहातून दूतांच्या द्वारे आपल्याला शीघ्र बोलाविण्यात आले, ज्याप्रकारे अयोध्येत प्रवेश करूनही आपण राज्य स्वीकारण्याची इच्छा केली नाहीत आणि सत्पुरुषांच्या धर्माचे आचरण करत चित्रकूट पर्वतावर जाऊन आपल्या शत्रुसूदन भावाला आपले राज्य घेण्यासाठी निमंत्रित केलेत, नंतर त्यांनी ज्याप्रकारे राजा दशरथांच्या वचनाचे पालन करण्यात दृढतापूर्वक स्थित होऊन राज्याचा त्याग केला आणि ज्याप्रकारे आपल्या मोठ्‍या भावाच्या चरणपादुका घेऊन आपण परत फिरून येथे आलात - या सर्व गोष्टी आपल्याला यथावत्‌ रूपाने विदितच आहेत. आपण परत आल्यावर जो वृत्तांत घडला तो सांगतो. माझ्याकडून ऐकावा - ॥५-९॥
अपयाते त्वयि तदा समुद्‌भ्रान्तमृगद्विजम् ।
परिद्यूनमिवात्यर्थं तद् वनं समपद्यत ॥ १० ॥

तद्धस्तिमृदितं घोरं सिंहव्याघ्रमृगाकुलम् ।
प्रविवेशाथ विजनं स महद् दण्डकावनम् ॥ ११ ॥
आपण परत आल्यावर ते वन सर्व बाजूने अत्यंत क्षीण होऊ लागले. तेथील पशु-पक्षी भयाने घाबरून गेले तेव्हा ते वन सोडून श्रीरामांनी विशाल दण्डकारण्यात प्रवेश केला जे निर्जन होते. त्या घोर वनाला हत्तीनी तुडविलेले होते. त्यात सिंह, व्याघ्र आदि भरलेले होते. ॥१०-११॥
तेषां पुरस्ताद् बलवान् गच्छतां गहने वने ।
विनदन् सुमहानादं विराधः प्रत्यदृश्यत ॥ १२ ॥
त्या गहन वनात जाणार्‍या त्या तिघांना पुढे महान्‌ गर्जना करणारा बलवान्‌ राक्षस विराध दिसून आला. ॥१२॥
तमुत्क्षिप्य महानादं ऊर्ध्वबाहुमधोमुखम् ।
निखाते प्रक्षिपन्ति स्म नदन्तमिव कुञ्जरम् ॥ १३ ॥
वर हात आणि खाली मुख केलेल्या चीत्कार करणार्‍या हत्तीसमान जोरजोराने गर्जना करणार्‍या त्या राक्षसाला त्या तिघांनी मारून टाकून खड्‍ड्यामध्ये फेकून दिले. ॥१३॥
तत् कृत्वा दुष्करं कर्म भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
साहाह्ने शरभङ्‌गस्य रम्यं आश्रममीयतुः ॥ १४ ॥
ते दुष्कर कर्म करून दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण सायंकाळी शरभंग मुनिंच्या रमणीय आश्रमावर जाऊन पोहोचले. ॥१४॥
शरभङ्‌गे दिवं प्राप्ते रामः सत्यपराक्रमः ।
अभिवाद्य मुनीन् सर्वान् जनस्थानमुपागमत् ॥ १५ ॥
शरभंग मुनि श्रीरामांच्या समक्ष स्वर्गलोकास निघून गेले. तेव्हा सत्यपराक्रमी श्रीराम सर्व मुनिंना प्रणाम करून जनस्थानात आले. ॥१५॥
पश्चात् शूर्पणखा नाम रामपार्श्वमुपागता ।
ततो रामेण संदिष्टो लक्ष्मणः सहसोत्थितः ॥ १६ ॥

प्रगृह्य खड्गं चिच्छेद कर्णनासं महाबलः ।
जनस्थानात आल्यानंतर शूर्पणखा नावाची एक राक्षसी (मनात कामवासना घेऊन) श्रीरामांच्या जवळ आली. तेव्हा श्रीरामांनी लक्ष्मणांना तिला दण्ड देण्याचा आदेश दिला. महाबली लक्ष्मणांनी एकाएकी तलवार उचलली आणि त्या राक्षसीचे नाक-कान कापून टाकले. ॥१६ १/२॥
चतुर्दश सहस्राणि रक्षसां भीमकर्मणाम् ॥ १७ ॥

हतानि वसता तत्र राघवेण महात्मना ।
तेथे राहात असता महात्मा राघवांनी एकट्‍यानेच शूर्पणखेच्या प्रेरणेमुळे आलेल्या भयानक कर्म करणार्‍या चौदा हजार राक्षसांचा वध केला. ॥१७ १/२॥
एकेन सह संगम्य रामेण रणमूर्धनि ॥ १८ ॥

अह्नश्चतुर्थभागेन निःशेषा राक्षसाः कृताः ।
युद्धाच्या आरंभीच एकमात्र श्रीरामांशी भिडून ते समस्त राक्षस प्रहर भरातच नष्ट झाले. ॥१८ १/२॥
महाबला महावीर्याः तपसो विघ्नकारिणः ॥ १९ ॥

निहता राघवेणाजौ दण्डकारण्यवासिनः ।
तपस्येमध्ये विघ्न करणार्‍या त्या दण्डकारण्य निवासी महाबली आणि महापराक्रमी राक्षसांना राघवांनी युद्धात ठार मारून टाकले. ॥१९ १/२॥
राक्षसाश्च विनिष्पिष्टाः खरश्च निहतो रणे ॥ २० ॥

दूषणं चाग्रत् हत्वा त्रिशिराः तदनन्तरम् ।
त्या रणभूमीमध्ये ते चौदा हजार राक्षस भरडले गेले, खर मारला गेला, नंतर दूषणाचा नाश झाला. त्यानंतर त्रिशिराचा ही वध केला गेला. ॥२० १/२॥
ततस्तेनार्दिता बाला रावणं समुपागता ॥ २१ ॥

रावणानुचरो घोरो मारीचो नाम राक्षसः ।
लोभयामास वैदेहीं भूत्वा रत्‍नणमयो मृगः ॥ २२ ॥
या घटनेने पीडित होऊन ती मूर्ख राक्षसी लंकेत रावणाकडे निघून गेली. रावण्याच्या सांगण्यावरून त्याचा अनुचर असलेल्या मारीच नावाच्या भयंकर राक्षसाने रत्‍नमय मृगाचे रूप धारण करून वैदेही सीतेस लोभविले. ॥२१-२२॥
सा राममब्रवीद् दृष्ट्‍वा वैदेही गृह्यतामिति ।
अयं मनोहरः कान्त आश्रमो नो भविष्यति ॥ २३ ॥
त्या मृगाला पाहून वैदेहीने रामांना म्हटले- आर्यपुत्र ! या मृगाला आपण पकडावे. याच्या राहाण्याने माझा हा आश्रम कान्तिमान्‌ आणि मनोहर होऊन जाईल. ॥२३॥
ततो रामो धनुष्पाणिः मृगं तमनुधावति ।
स तं जघान धावन्तं शरेणानतपर्वणा ॥ २४ ॥
तेव्हा श्रीरामांनी हातात धनुष्य घेऊन त्या मृगाचा पाठलाग केला, आणि वाकलेल्या गांठीच्या एका बाणाने त्या पळणार्‍या मृगाला ठार मारले. ॥२४॥
अथ सौम्य दशग्रीवो मृगं याति तु राघवे ।
लक्ष्मणे चापि निष्क्रांन्ते प्रविवेशाश्रमं तदा ॥ २५ ॥
सौम्या ! जेव्हा राघव मृगाच्या पाठोपाठ जात होते आणि लक्ष्मणही त्यांचा समाचार कळावा म्हणून पर्णशाळेतून बाहेर निघून गेले, तेव्हा रावणाने त्या आश्रमात प्रवेश केला. ॥२५॥
जग्राह तरसा सीतां ग्रहः खे रोहिणीमिव ।
त्रातुकामं ततो युद्धे हत्वा गृध्रं जटायुषम् ॥ २६ ॥

प्रगृह्य सहसा सीतां जगामाशु स राक्षसः ।
त्याने बलपूर्वक सीतेला पकडले, जणु आकाशात मंगळाने रोहिणीवर आक्रमण केले असावे. त्या समयी तिच्या रक्षणासाठी आलेल्या गृध्रराज जटायुला युद्धात मारून तो राक्षस एकाएकी सीतेला बरोबर घेऊन तेथून घाईघाईने पळून गेला. ॥२६ १/२॥
ततस्तु अद्‌भुतसंकाशाः स्थिताः पर्वतमूर्धनि ॥ २७ ॥

सीतां गृहीत्वा गच्छन्तं वानराः पर्वतोपमाः ।
ददृशुर्विस्मिताकारा रावणं राक्षसाधिपम् ॥ २८ ॥
त्यानंतर एका पर्वतशिखरावर राहाणार्‍या पर्वतांप्रमाणेच अद्‍भुत आणि विशाल शरीरांच्या वानरांनी आश्चर्यचकित होऊन सीतेला घेऊन जाणार्‍या राक्षसराज रावणाला पाहिले. ॥२७-२८॥
ततः शीघ्रतरं गत्वा तद् विमानं मनोजवम् ।
आरुह्य सह वैदेह्या पुष्पकं स महाबलः ॥ २९ ॥

प्रविवेश तदा लङ्‌कां रावणो राक्षसेश्वरः ।
तो महाबली राक्षसराज रावण अत्यंत शीघ्रतेने मनाप्रमाणे वेगवान्‌ पुष्पक विमानाजवळ जाऊन पोहोचला आणि सीतेसह त्यावर आरूढ होऊन त्याने लंकेमध्ये प्रवेश केला. ॥२९ १/२॥
तां सुवर्णपरिष्कारे शुभे महति वेश्मनि ॥ ३० ॥

प्रवेश्य मैथिलीं वाक्यैः सान्त्वयामास रावणः ।
तेथे सुवर्णभूषित विशाल भवनात वैदेहीला ठेवून रावण गोड गोड बोलून तिला सान्त्वना देऊ लागला. ॥३० १/२॥
तृणवद् भाषितं तस्य तं च नैर्‌ऋतपुङ्‌गवम् ॥ ३१ ॥

अचिन्तयन्ती वैदेही ह्यशोकवनिकां गता ।
अशोकवाटिकेत राहाणार्‍या वैदेहीने रावणाच्या बोलण्याला आणि स्वतः त्या राक्षसराजालाही कस्पटासमान समजून (झिडकले) लाथडले आणि कधी त्याचे चिंतन केले नाही. ॥३१ १/२॥
न्यवर्तत तदा रामो मृगं हत्वा तदा वने ॥ ३२ ॥

निवर्तमानः काकुत्स्थो दृष्ट्‍वा गृध्रं स विव्यथे ।
गृध्रं हतं तदा दृष्ट्‍वा रामः प्रियतरं पितुः ॥ ३३ ॥
तिकडे वनात श्रीराम मृगाला मारून परतले. परत येत असता त्यांनी जेव्हा पित्याहून अधिक प्रिय गृध्रराजाला मारले गेलेले पाहिले तेव्हा त्यांच्या मनाला फार व्यथा झाली. ॥३२-३३॥
मार्गमाणस्तु वैदेहीं राघवः सहलक्ष्मणः ।
गोदावरीं अनुचरन् वनोद्देशांश्च पुष्पितान् ॥ ३४ ॥
लक्ष्मणासहित राघव वैदेही सीतेचा शोध करीत गोदावरीच्या तटावरील पुष्पित वनप्रान्तात विचरण करू लागले. ॥३४॥
आसेदतुर्महारण्ये कबन्धं नाम राक्षसम् ।
ततः कबन्धवचनाद् राम सत्यपराक्रमः ॥ ३५ ॥

ऋष्यमूकगिरिं गत्वा सुग्रीवेण समागतः ।
शोधत शोधत ते दोघे भाऊ त्या विशाल वनांत कबंध नामक राक्षसाजवळ जाऊन पोहोचले. त्यानंतर सत्यपराक्रमी रामांनी कबंधाचा उद्धार केला आणि त्याच्याच सांगण्यावरून ते ऋष्यमूक पर्वतावर येऊन सुग्रीवास भेटले. ॥३५ १/२॥
तयोः समागमः पूर्वं प्रीत्या हार्दो व्यजायत ॥ ३६ ॥

भ्राता निरस्त क्रुद्धेन सुग्रीवो वालिना पुरा ।
इतरेतर संवादात् प्रगाढः प्रणयस्तयोः ॥ ३७ ॥
त्या दोघांमध्ये एक दुसर्‍याला पाहून प्रथमच हार्दीक मित्रता झाली होती. पूर्वकाळात क्रुद्ध झालेल्या मोठा भाऊ वालीने सुग्रीवास घालवून दिले होते. श्रीराम आणि सुग्रीवांचा परस्परांत जेव्हा संवाद झाला तेव्हा त्यांच्यात अधिकच प्रगाढ प्रेम उत्पन्न झाले. ॥३६-३७॥
रामः स्वबाहुवीर्येण स्वराज्यं प्रत्यपादयत् ।
वालिनं समरे हत्वा महाकायं महाबलम् ॥ ३८ ॥
श्रीरामांनी आपल्या बाहुबलाने समराङ्‌गणात महाकाय, महाबली वालीचा वध करून सुग्रीवास त्याचे राज्य दिले. ॥३८॥
सुग्रीवः स्थापितो राज्ये सहितः सर्ववानरैः ।
रामाय प्रतिजानीते राजपुत्र्यास्तु मार्गणम् ॥ ३९ ॥
श्रीरामांनी समस्त वानरांसहित सुग्रीवाला आपल्या राज्यावर स्थापित केले आणि सुग्रीवाने श्रीरामांच्या समक्ष अशी प्रतिज्ञा केली की मी राजकुमारी सीतेचा शोध करीन. ॥३९॥
आदिष्टा वानरेन्द्रेण सुग्रीवेण महात्मना ।
दश कोट्यं प्लवङ्‌गानां सर्वाः प्रस्थापिता दिशः ॥ ४० ॥
तदनुसार महात्मा वानरराज सुग्रीवांनी दहा कोटी वानरांना सीतेचा शोध लावण्याची आज्ञा देऊन सर्व दिशांना धाडले. ॥४०॥
रेषां नो विप्रकृष्टानां विन्ध्ये पर्वतसत्तमे ।
भृशं शोकाभितप्तानां महान् कालोऽत्यवर्तत ॥ ४१ ॥
त्याच वानरांमध्ये आम्ही लोकही होतो. गिरिराज विंध्याच्या गुफेमध्ये प्रवेश केल्यामुळे आमचा परतण्याचा नियत समय निघून गेला. आम्ही फारच उशीर केला होता. आम्ही अत्यंत शोकात पडून दीर्घकाळ व्यतीत झाला होता. ॥४१॥
भ्राता तु गृध्रराजस्य सम्पातिर्नाम वीर्यवान् ।
समाख्याति स्म वसतीं सीतां रावणमन्दिरे ॥ ४२ ॥
त्यानंतर गृधृराज जटायुंचे एक पराक्रमी भाऊ भेटले ज्यांचे नाव संपाति होते. त्यांनी आम्हांला सांगितले की सीता लंकेमध्ये रावणाच्या भवनात निवास करत आहे. ॥४२॥
सोऽहं दुःखपरीतानां दुःखं तज्ज्ञातिनां नुदन् ।
आत्मवीर्यं समास्थाय योजनानां शतं प्लुतः ।
तत्राहमेकामद्राक्षं अशोकवनिकां गताम् ॥ ४३ ॥
तेव्हा दुःखामध्ये बुडालेल्या आपल्या बंधु-बांधवांच्या कष्टाचे निवारण करण्यासाठी मी आपल्या बल-पराक्रमाचा आधार घेऊन शत योजने समुद्र ओलांडला आणि लंकेमध्ये अशोकवाटिकेमध्ये एकटी बसलेल्या सीतेला भेटलो. ॥४३॥
कौशेयवस्त्रां मलिनां निरानन्दां दृढव्रताम् ।
तया समेत्य विधिवत् पृष्ट्‍वा सर्वं अनिन्दिताम् ॥ ४४ ॥

अभिज्ञानं मया दत्तं रामनामाङ्‌गुलीयकम् ।
अभिज्ञानं मणिं लब्ध्वा चरितार्थोऽहमागतः ॥ ४५ ॥
तिने एक रेशमी साडी नेसलेली होती. शरीराने मलिन आणि आनंदशून्य वाटत होती, तसेच पातिव्रत्य पालनात दृढतापूर्वक लागलेली होती. तिला भेटून मी त्या सती-साध्वी देवीला विधिपूर्वक सर्व समाचार विचारला आणि ओळखीसाठी श्रीरामनामाने अंकित अंगठी तिला दिली. त्याच बरोबर तिच्या वतीने ओळख पटण्यासाठी चूडामणि घेऊन मी कृतकृत्य होऊन परत आलो. ॥४४-४५॥
मया च पुनरागम्य रामस्याक्लिष्टकर्मणः ।
अभिज्ञानं मया दत्तं अर्चिष्मान् स महामणिः ॥ ४६ ॥
अनायासेच महान्‌ कर्म करणार्‍या श्रीरामांजवळ पुन्हा परत येऊन मी तो तेजस्वी महामणि ओळख पटविण्यासाठी त्यांच्या जवळ दिला. ॥४६॥
श्रुत्वा तां मैथिलीं रामस्तु आशशंसे च जीवितम् ।
जीवितान्तमनुप्राप्तः पीत्वामृतमिवातुरः ॥ ४७ ॥
जसे मृत्युच्या निकट पोहोचलेला रोगी अमृत पिऊन पुन्हा जिवंत होऊन उठतो, त्याच प्रकारे सीतेच्या वियोगात मरणासन्न झालेल्या श्रीरामांनी त्यांचा शुभ समाचार ऐकून जिवंत राहाण्याची आशा धरली. ॥४७॥
उद्योजयिष्यन् उद्योगं दध्रे लङ्‌कावधे मनः ।
जिघांसुरिव लोकान्ते सर्वान् लोकान् विभावसुः ॥ ४८ ॥
मग जसे प्रलयकाळी संवर्तनामक अग्नि संपूर्ण लोकांना भस्म करून टाकण्यास उद्यत होतो त्याप्रकारे सेनेला प्रोत्साहन देऊन श्रीरामांनी लंकापुरीला नष्ट करून टाकण्याचा विचार केला. ॥४८॥
ततः समुद्रमासाद्य नलं सेतुमकारयत् ।
अतरत् कपिवीराणां वाहिनी तेन सेतुना ॥ ४९ ॥
यानंतर समुद्रावर येऊन श्रीरामांनी नल नामक वानरकडून समुद्रावर पूल बांधविला आणि त्या पुलावरून वानरवीरांची सर्व सेना सागराच्या पार जाऊन पोहोचली. ॥४९॥
प्रहस्तमवधीत् नीलः कुम्भकर्णं तु राघवः ।
लक्ष्मणो रावणसुतं स्वयं रामस्तु रावणम् ॥ ५० ॥
तेथे युद्धात नीलाने प्रहस्ताला, लक्ष्मणांनी रावणपुत्र इंद्रजिताला तसेच साक्षात्‌ राघवांनी कुम्भकर्ण आणि रावणाला ठार मारले. ॥५०॥
स शक्रेण समागम्य यमेन वरुणेन च ।
महेश्वरस्वयंभूभ्यां तथा दशरथेन च ॥ ५१ ॥
त्यानंतर श्रीरघुनाथ क्रमशः इंद्र, यम, वरूण, महादेव, ब्रह्मदेव तसेच दशरथ महाराजांना भेटले. ॥५१॥
तैश्च दत्तवरं श्रीमान् ऋषिभिश्च समागतैः ।
सुरर्षिभिश्च काकुत्स्थो वरान् लेभे परंतपः ॥ ५२ ॥
तेथे आलेल्या ऋषिंनी आणि देवर्षिंनी शत्रुसंतापी श्रीमान्‌ काकुत्स्थ रघुवीरांना वरदान दिले. त्यांच्याकडून श्रीरामांनी वर प्राप्त केले. ॥५२॥
स तु दत्तवरं प्रीत्या वानरैश्च समागतैः ।
पुष्पकेण विमानेन किष्किन्धामभ्युपागमत् ॥ ५३ ॥
वर मिळून प्रसन्न झालेले श्रीरामचंद्र वानरांसह पुष्पक विमान द्वारा किष्किंधेला आले. ॥५३॥
तां गङ्‌गां पुनरासाद्य वसन्तं मुनिसंनिधौ ।
अविघ्नं पुष्ययोगेन श्वो रामं द्रष्टुमर्हसि ॥ ५४ ॥
तेथून परत गंगातटावर येऊन प्रयागात भरद्वाज मुनिंच्या जवळ थांबले आहेत. उद्या पुष्य नक्षत्राच्या योगावर आपण कुठल्याही विघ्नबाधेशिवाय श्रीरामांचे दर्शन कराल. ॥५४॥
ततः स वाक्यैर्मधुरैर्हनूमतो
निशम्य हृष्टो भरतः कृताञ्जलिः ।
उवाच वाणीं मनसः प्रहर्षिणीं
चिरस्य पूर्णः खलु मे मनोरथः ॥ ५५ ॥
याप्रकारे हनुमानांच्या मधुर वाक्यांद्वारे सर्व गोष्टी ऐकून भरत अत्यंत प्रसन्न झाले आणि हात जोडून मनाला हर्षित करणार्‍या वाणीमध्ये म्हणाले - आज चिरकालानंतर माझा मनोरथ पूर्ण झाला आहे. ॥५५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षड्‌विंशत्यधिकशततमः सर्गः ॥ १२६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशे सव्वीसावा सर्ग पूरा झाला. ॥१२६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP