श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ षोडशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
नन्दीश्वरस्य रावणं प्रति शापः, भगवता शंकरेण रावणस्य मानभंगH, taस्ततस्तस्य खड्गप्राप्तिश्च -
नंदीश्वरांचा रावणाला शाप, भगवान्‌ शंकर द्वारा रावणाचा मानभंग तसेच त्यांच्यापासून चंद्रहास नामक खडगाची प्राप्ति -
स जित्वा धनदं राम भ्रातरं राक्षसाधिपः ।
महासेनप्रसूतिं तद् ययौ शरवणं महत् ॥ १ ॥
(अगस्त्य म्हणतात -) रघुकुलनंदन रामा ! आपला भाऊ कुबेर यास जिंकून राक्षसराज दशग्रीव शरवण नामांनी प्रसिद्ध बोरूच्या विशाल वनात गेला जेथे महासेन कार्तिकेयांची उत्पत्ति झाली होती. ॥१॥
अथापश्यद् दशग्रीवो रौक्मं शरवणं महत् ।
गभस्तिजालसंवीतं द्वितीयमिव भास्करम् ॥ २ ॥
तेथे पोहोचल्यावर दशग्रीवाने सुवर्णमयी कांतिनी युक्त त्या विशाल शरवण (बोरूंचे जंगल) जंगलास पाहिले, जे किरणसमूहांनी व्याप्त झाल्यामुळे दुसर्‍या सूर्यदेवाप्रमाणे प्रकाशित होत होते. ॥२॥
स पर्वतं समारुह्य कञ्चिद् रम्यवनान्तरम् ।
प्रेक्षते पुष्पकं तत्र राम विष्टम्भितं तदा ॥ ३ ॥
त्याच्या जवळच कुठलासा पर्वत होता, तेथील वनस्थळी फार रमणीय होती. श्रीरामा ! जेव्हा तो त्याच्यावर चढू लागला तेव्हा त्याने पाहिले की पुष्पक विमानाची गति कुंठित झाली आहे. ॥३॥
विष्टब्धं किमिदं कस्माद् आगमत् कामगं कृतम् ।
अचिन्तयद् राद्राक्षसेन्द्रः सचिवैस्तैः समावृतः ॥ ४ ॥

किन् निमित्तं इच्छया मे नेदं गच्छति पुष्पकम् ।
पर्वतस्योपरिष्ठस्य कर्मेदं कस्यचिद्‌ भवेत् ॥ ५ ॥
तेव्हा तो राक्षसराज आपल्या मंत्र्यासह विचार करू लागला - काय कारण आहे की हे पुष्पक विमान थांबले आहे ? हे तर स्वामीच्या इच्छेनुसार चालणारे बनविले गेलेले आहे ! मग पुढे का जात नाही ? काय असे कारण घडले आहे की ज्यायोगे हे पुष्पक विमान माझ्या इच्छेनुसार चालत नाही ? संभव आहे की या पर्वतावर जो कोणी राहात असेल त्याचेच हे कार्य असणे शक्य आहे ? ॥४-५॥
ततोऽब्रवीत् तदा राम मारीचो बुद्धिकोविदः ।
नेदं निष्कारणं राजन् पुष्पकं यन्न गच्छति ॥ ६ ॥
श्रीरामा ! तेव्हा बुद्धिकुशल मारीचाने म्हटले -राजन्‌ ! हे पुष्पक विमान पुढे जात नाही यामध्ये काही ना काही कारण अवश्य असलेच पाहिजे. अकारणच ही गोष्ट घडली आहे, असे होत नाही. ॥६॥
अथवा पुष्पकमिदं धनदान् नान्यवाहनम् ।
अतो निष्पन्दमभवद् धनाध्यक्षविनाकृतम् ॥ ७ ॥
अथवा हे पुष्पक विमान कुबेराशिवाय दुसर्‍या कोणाचे वाहन होऊ शकत नसेल म्हणून त्यांच्या शिवाय हे निश्चेष्ट बनले आहे. ॥७॥
इति वाक्यान्तरे तस्य करालः कृष्णपिङ्‌गलः ।
वामनो विकटो मुण्डी नन्दी ह्रस्वभुजो बली ॥ ८ ॥

ततः पार्श्वमुपागम्य भवस्यानुचरोऽब्रवीत् ।
नन्दीश्वरो वचश्चेदं राक्षसेन्द्रं अशङ्‌कितः ॥ ९ ॥
त्यांचे हे बोलणे सुरू असतांनाच भगवान्‌ शंकारांचे पार्षद नंदीश्वर रावणाजवळ येऊन पोहोचले, जे दिसण्यात अत्यंत विकराळ होते. त्यांची अंगकांती काळ्या आणि पिंगट वर्णाची होती. ते ठेंगण्या शरीराचे आणि विकट रूपाचे होते. त्यांचे मस्तक मुंडित आणि भुजा लहान लहान होत्या, ते फार बलवान्‌ होते. नंदीने निशंक होऊन राक्षसराज दशग्रीवाला याप्रकारे म्हटले - ॥८-९॥
निवर्तस्व दशग्रीव शैले क्रीडति शंकरः ।
सुपर्णनागयक्षाणां देवगन्धर्वरक्षसाम् ॥ १० ॥

सर्वेषां एव भूतानां अगम्यः पर्वतः कृतः ।
दशग्रीव ! परत जा. या पर्वतावर भगवान्‌ शंकर क्रीडा करत आहेत. येथे सुपर्ण, नाग, यक्ष, देवता, गंधर्व आणि राक्षस सर्व प्राण्यांचे येणे-जाणे बंद करण्यात आले आहे. ॥१० १/२॥
इति नन्दिवचः श्रुत्वा क्रोधात् कम्पितकुण्डलः ॥ ११ ॥

रोषात् तु ताम्रनयनः पुष्पकाद् अवरुह्य सः ।
कोऽयं शंकर इत्युक्त्वा शैलमूलमुपागतः ॥ १२ ॥
नंदीचे हे वचन ऐकून दशग्रीव कुपित झाला. त्याच्या कानातील कुंडले हलू लागली. रोषाने डोळे लाल झाले आणि तो पुष्पकांतून उतरून म्हणाला - कोण आहे हा शंकर ? असे म्हणून तो पर्वताच्या मूळभागात गेला. ॥११-१२॥
सोऽपश्यन्नन्दिनं तत्र देवस्यादूरतः स्थितम् ।
दीप्तं शूलमवष्टभ्य द्वितीयमिव शंकरम् ॥ १३ ॥
तेथे पोहोचून त्याने पाहिले की भगवान्‌ शंकरांपासून थोड्‍याच अंतरावर चमकणारा शूल हातात घेऊन नंदी दुसरे शिवच असल्याप्रमाणे उभे होते. ॥१३॥
तं दृष्ट्‍वा वानरमुखं अवज्ञाय स राक्षसः ।
प्रहासं मुमुचे तत्र सतोय इव तोयदः ॥ १४ ॥
त्यांचे मुख वानराप्रमाणे होते. त्यांना पाहून तो निशाचर त्यांचा अपमान करीत सजल जलधारासमान गंभीर स्वरात खदखदून हसू लागला. ॥१४॥
तं क्रुद्धो भगवान् नन्दी शंकरस्यापरा तनुः ।
अब्रवीत् तत्र तद् रक्षो दशाननं उपस्थितम् ॥ १५ ॥
हे पाहून शिवाचे दुसरे स्वरूप असे भगवान्‌ नंदी कुपित होऊन तेथे जवळच उभा असलेल्या निशाचर दशमुखास याप्रकारे म्हणाले - ॥१५॥
यस्माद् वानररूपं मां अवज्ञाय दशानन ।
अशनीपातसङ्‌काशं अपहासं प्रमुक्तवान् ॥ १६ ॥

तस्माद् मद् वीर्यसंयुक्ता मद् रूपसमतेजसः ।
उत्पत्स्यन्ति वधार्थं हि कुलस्य तव वानराः ॥ १७ ॥
दशानन ! तू वानररूपात मला पाहून माझी अवहेलना केली आहेस आणि वज्रपातासमान भयानक अट्‍टहास केला आहेस, म्हणून तुझ्या कुळाचा विनाश करण्यासाठी माझ्या प्रमाणेच पराक्रम, रूप आणि तेजाने संपन्न वानर उत्पन्न होतील. ॥१६-१७॥
नखदंष्ट्रायुधाः क्रूरा मनःसम्पातरंहसः ।
युद्धोन्मत्ता बलोद्रिक्ताः शैला इव विसर्पिणः ॥ १८ ॥
क्रूर निशाचरा ! नखे आणि दात हीच त्या वानरांची आयुधे होतील तसेच मनाप्रमाणे तीव्र त्यांचा वेग होईल. ते युद्धासाठी उन्मत्त राहणारे आणि अतिशय बलशाली असतील तसेच चालत्या-फिरत्या पर्वतांप्रमाणे भासतील. ॥१८॥
ते तव प्रबलं दर्पं उत्सेधं च पृथग्विधम् ।
व्यपनेष्यन्ति सम्भूय सहामात्यसुतस्य च ॥ १९ ॥
ते एकत्र होऊन मंत्री आणि पुत्रांसहित तुझ्या प्रबल अभिमानाला आणि विशालकाय असण्याच्या गर्वाला नष्ट करून टाकतील. ॥१९॥
किं त्विदानीं मया शक्यं हन्तुं त्वां हे निशाचर ।
न हन्तव्यो हतस्त्वं हि पूर्वमेव स्वकर्मभिः ॥ २० ॥
अरे निशाचरा ! मी तुला आत्ता मारून टाकण्याची शक्ति बाळगतो, तथापि तुला मारावयाचे नाही आहे, कारण आपल्या कुत्सित कर्मांच्या द्वारा तू प्रथमच मारला गेला आहेस (म्हणून मेलेल्यालाच मारण्यात काय लाभ ?) ॥२०॥
इत्युदीरितवाक्ये तु देवे तस्मिन् महात्मनि ।
देवदुन्दुभयो नेदुः पुष्पवृष्टिश्च खाच्च्युता ॥ २१ ॥
महामना ! भगवान्‌ नंदीने इतके म्हणताच देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि आकाशांतून फुलांची वृष्टि होऊ लागली. ॥२१॥
अचिन्तयित्वा स तदा नन्दिवाक्यं महाबलः ।
पर्वतं तु समासाद्य वाक्यमाह दशाननः ॥ २२ ॥
परंतु महाबली दशाननाने त्या समयी नंदींच्या त्या वचनांची काहीही पर्वा केली नाही आणि त्या पर्वताच्या जवळ जाऊन म्हटले - ॥२२॥
पुष्पकस्य गतिश्छिन्ना यत्कृते मम गच्छतः ।
तमिमं शैलमुन्मूलं करोमि तव गोपते ॥ २३ ॥
पशुपते ! ज्या कारणामुळे यात्रा करीत असता माझ्या पुष्पक विमानाची गति कुंठित झाली त्या तुझ्या या पर्वताला, जो हा माझ्या समोर उभा आहे मी मूळापासून उखडून फेकून देतो. ॥२३॥
केन प्रभावेण भवो नित्यं क्रीडति राजवत् ।
विज्ञातव्यं न जानीते भयस्थानं उपस्थितम् ॥ २४ ॥
कुठल्या प्रभावाने शंकर प्रतिदिन येथे राजाप्रमाणे क्रीडा करत आहेत ? त्यांना या जाणून घेण्या योग्य गोष्टीचाही पत्ता नाही आहे की त्यांच्या समक्ष भयाचे स्थान उपस्थित झाले आहे. ॥२४॥
एवमुक्त्वा ततो राम भुजान् विक्षिप्य पर्वते ।
तोलयामास तं शीघ्रं स शैलं समकम्पत ॥ २५ ॥
श्रीरामा ! असे म्हणून दशग्रीवाने पर्वताच्या खालील भागाला आपल्या भुजा लावून त्याला शीघ्र उचलण्याचा प्रयत्‍न केला. तो पर्वत तेव्हा हलू लागला. ॥२५॥
चालनात्पर्वतस्यैव गणा देवस्य कम्पिताः ।
चचाल पार्वती चापि तदाश्लिष्टा महेश्वरम् ॥ २६ ॥
पर्वत हलू लागल्यामुळे भगवान्‌ शंकरांचे सर्व गण कापू लागले. पार्वती देवीही विचलित झाली आणि भगवान्‌ शंकरांना जाऊन तिने मिठी मारली. ॥२६॥
ततो राम महादेवो देवानां प्रवरो हरः ।
पादाङ्‌गुष्ठेन तं शैलं पीडयामास लीलया ॥ २७ ॥
श्रीरामा ! तेव्हा देवतांमध्ये श्रेष्ठ पापहारी महादेवांनी त्या पर्वताला आपल्या पायाच्या अंगठ्‍याने लीलेनेच दाबून टाकले. ॥२७॥
पीडितास्तु ततस्तस्य शैलद्तम्भोपमा भुजाः ।
विस्मिताश्चाभवंस्तत्र सचिवास्तस्य रक्षसः ॥ २८ ॥
मग तर दशग्रीवाच्या त्या पर्वताच्या खांबाप्रमाणे भासणार्‍या भुजा त्या शैलाखाली चेपल्या गेल्या. हे पाहून तेथे उभे असलेले त्या राक्षसाचे मंत्री अत्यंत विस्मित झाले. ॥२८॥
रक्षसा तेन रोषाच्च भुजानां पीडनात् तथा ।
मुक्तो विरावः सहसा त्रैलोक्यं येन कम्पितम् ॥ २९ ॥
त्या राक्षसाने रोष तसेच आपल्या बाहूंच्या पीडेमुळे एकाएकी मोठ्‍या जोराने विराव - रडणे अथवा आर्तनाद केला, ज्यामुळे त्रैलोक्यातील प्राण्यांचा थरकाप उडाला. ॥२९॥
मेनिरे वज्रनिष्पेषं तस्यामात्या युगक्षये ।
तदा वर्त्मसु चलिता देवा इन्द्रपुरोगमाः ॥ ३० ॥
त्याच्या मंत्र्यांना वाटले की आता प्रलयकाळच आला आहे आणि विनाशकारी वज्रपात होऊ लागला आहे. त्यासमयी इंद्र आदि देवताही मार्गात विचलित झाल्या. ॥३०॥
समुद्राश्चापि सङ्‌क्षुब्धाः चलिताश्चापि पर्वताः ।
यक्षा विद्याधराः सिद्धाः किमेतदिति चाब्रुवन् ॥ ३१ ॥
समुद्रांत भरती आली. पर्वत हलू लागले आणि यक्ष, विद्याधर तसेच सिद्ध एक दुसर्‍याला विचारू लागले - हे काय झाले आहे ? ॥३१॥
तोषयस्व महादेवं नीलकण्ठमुमापतिम् ।
तमृते शरणं नान्यं पश्यामोऽत्र दशानन ॥ ३२ ॥
त्यानंतर दशग्रीवाच्या मंत्र्यांनी त्यास सांगितले -महाराज दशानन ! आता आपण नीलकंठ उमावल्लभ संतुष्ट करावे. त्याशिवाय दुसरा कुणी आपल्याला शरण (आश्रय) देऊ शकेल असे आम्हांला दिसत नाही. ॥३२॥
स्तुतिभिः प्रणतो भूत्वा तमेव शरणं व्रज ।
कृपालुः शंकरस्तुष्टः प्रसादं ते विधास्यति ॥ ३३ ॥
आपण स्तुतिंच्या द्वारा त्यांना प्रणाम करून त्यांनाच शरण जावे. भगवान्‌ शंकर फार दयाळू आहेत. ते संतुष्ट होऊन आपल्यावर कृपा करतील. ॥३३॥
एवमुक्तस्तदामात्यैः तुष्टाव वृषभध्वजम् ।
सामभिर्विविधैः स्तोत्रैः प्रणम्य स दशाननः ।
संवत्सरसहस्रं तु रुदतो रक्षसो गतम् ॥ ३४ ॥
मंत्र्यांनी असे म्हटल्यावर दशमुख रावणाने भगवान्‌ वृषभध्वजाला प्रणाम करून नाना प्रकारची स्तोत्रे तसेच सामवेदोक्त मंत्रांच्या द्वारा त्यांचे स्तवन केले. याप्रकारे हातांच्या पीडेने रडत आणि स्तुति करत त्या राक्षसाची एक हजार वर्षे निघून गेली. ॥३४॥
ततः प्रीतो महादेवः शैलाग्रे विष्ठितः प्रभुः ।
मुक्त्वा चास्य भुजान् राम प्राह वाक्यं दशाननम् ॥ ३५ ॥
श्रीरामा ! तत्पश्चात्‌ त्या पर्वताच्या शिखरावर स्थित असलेले भगवान्‌ महादेव प्रसन्न झाले. त्यांनी दशग्रीवाच्या भुजांना त्या संकटांतून मुक्त करून त्याला म्हटले - ॥३५॥
प्रीतोऽस्मि तव वीर्यस्य शौटीर्याच्च दशानन ।
शैलाक्रान्तेन यो मुक्तः त्वया रावः सुदारुणः ॥ ३६ ॥

यस्माल्लोकत्रयं चैतद् रावितं भयमागतम् ।
तस्मात् त्वं रावणो नाम नाम्ना राजन् भविष्यसि ॥ ३७ ॥
दशानना ! तू वीर आहेस ! तुझा पराक्रमाने मी प्रसन्न आहे. तू पर्वताने चेपल्या गेल्याने जो अत्यंत भयानक राव (आर्तनाद) केला होतास, त्यामुळे भयभीत होऊन तीन्ही लोकांतील प्राणी रडू लागले म्हणून राक्षसराज ! आता तू रावण नामाने प्रसिद्ध होशील. ॥३६-३७॥
देवता मानुषा यक्षा ये चान्ये जगतीतले ।
एवं त्वामभिधास्यन्ति रावणं लोकरावणम् ॥ ३८ ॥
देवता, मनुष्य, यक्ष तसेच दुसरे जे लोक भूतलावर निवास करतात ते सर्व याप्रकारे समस्त लोकांना रडविणार्‍या तुला दशग्रीवाला रावण म्हणतील. ॥३८॥
गच्छ पौलस्त्य विस्रब्धं पथा येन त्वमिच्छसि ।
मया चैवाभ्यनुज्ञातो राक्षसाधिप गम्यताम् ॥ ३९ ॥
पुलस्त्यनंदन ! आता तू ज्या मार्गाने जाऊ इच्छित असशील त्या मार्गाने बेधडक जाऊ शकतोस. राक्षसाधिप ! मीही तुला माझ्या वतीने जाण्याची आज्ञा देत आहे, जा. ॥३९॥
एवमुक्तस्तु लङ्‌केशः शम्भुना स्वयमब्रवीत् ।
प्रीतो यदि महादेव वरं मे देहि याचतः ॥ ४० ॥
भगवान्‌ शंकरांनी असे म्हटल्यावर लंकेश्वर बोलला - महादेव ! जर आपण प्रसन्न आहात तर वर द्यावा. मी आपल्याकडे वराची याचना करत आहे. ॥४०॥
अवध्यत्वं मया प्राप्तं देवगन्धर्वदानवैः ।
राक्षसैर्गुह्यकैर्नागैः ये चान्ये बलवत्तराः ॥ ४१ ॥
मी देवता, गंधर्व, दानव, राक्षस, गुह्यक, नाग तसेच अन्य महाबलशाली प्राण्यांपासून अवध्य होण्याचा वर प्राप्त केला आहे. ॥४१॥
मानुषान्न गणे देव स्वल्पास्ते मम सम्मताः ।
दीर्घमायुश्च मे प्राप्तं ब्रह्मणस्त्रिपुरान्तक ॥ ४२ ॥

वाञ्छितं चायुषः शेषं शस्त्रं त्वं च प्रयच्छ मे ।
देवा ! मनुष्यांना तर मी काही गणतच नाही. माझ्या मान्यतेनुसार त्यांची शक्ति फारच थोडी आहे. त्रिपुरांतक ! मला ब्रह्मदेवद्वारा दीर्घ आयुष्यही प्राप्त झाले आहे. ब्रह्मदेवांनी दिलेल्या आयुष्याचा जितका अंश शिल्लक आहे तोही पूराच्या पूरा प्राप्त व्हावा (त्यात कुठल्याही कारणाने कमतरता राहू नये) अशी माझी इच्छा आहे ती आपण पूर्ण करावी. त्याच बरोबर आपल्या द्वारा मला एक शस्त्रही द्यावे. ॥४२ १/२॥
एवमुक्तस्ततस्तेन रावणेन स शंकरः ॥ ४३ ॥

ददौ खड्गं महादीप्तं चन्द्रहासमिति श्रुतम् ।
आयुषश्चावशेषं च स्थित्वा भूतपतिस्तदा ॥ ४४॥
रावणाने असे म्हटल्यावर भूतनाथ भगवान्‌ शंकरांनी त्याला एक अत्यंत दीप्तिमान्‌ चंद्रहास नामक खङ्‌ग दिले आणि त्याच्या आयुष्याचा जो अंश निघून गेला होता तो ही पूर्ववत करून टाकला. ॥४३-४४॥
दत्त्वोवाच ततः शम्भुः नावज्ञेयमिदं त्वया ।
अवज्ञातं यदि हि ते मामेवैष्यत्यसंशयः ॥ ४५ ॥
ते खङ्‌ग देऊन भगवान्‌ शिवांनी सांगितले - तू याचा कधी तिरस्कार करता कामा नये. जर तुझ्या द्वारा कधी याचा तिरस्कार केला गेला तर हे परत माझ्याच जवळ परत येईल यात संशय नाही. ॥४५॥
एवं महेश्वरेणैव कृतनामा स रावणः ।
अभिवाद्य महादेवं आरुरोहाथ पुष्पकम् ॥ ४६ ॥
याप्रकारे भगवान्‌ शंकरांकडून नूतन नाम प्राप्त करून रावणाने त्यांना प्रणाम केला. त्यानंतर तो पुष्पक विमानावर आरूढ झाला. ॥४६॥
ततो महीतले राम पर्यक्रामत रावणः ।
क्षत्रियान् सुमहावीर्यान् बाधमान इतस्ततः ॥ ४७ ॥
श्रीरामा ! यानंतर रावण संपूर्ण पृथ्वीवर दिग्विजयासाठी भ्रमण करू लागला. त्याने इकडे-तिकडे जाऊन बर्‍याचशा महापराक्रमी क्षत्रियांना पीडा पोहोचविली. ॥४७॥
केचित् तेजस्विनः शूराः क्षत्रिया युद्धदुर्मदाः ।
तच्छासनमकुर्वन्तो विनेशुः सपरिच्छदाः ॥ ४८ ॥
कित्येक तेजस्वी क्षत्रिय जे मोठेच शूरवीर आणि रणोन्मत्त होते, रावणाची आज्ञा न मानण्यामुळे सेना आणि परिवारासहित नष्ट झाले. ॥४८॥
अपरे दुर्जयं रक्षो जानन्तः प्राज्ञसम्मताः ।
जिताः स्म इत्यभाषन्त राक्षसं बलदर्पितम् ॥ ४९ ॥
दुसर्‍या क्षत्रियांनी, जे बुद्धिमान्‌ मानले जात होते आणि त्या राक्षसाला अजेय समजत होते, त्या बलाभिमानी निशाचरासमोर आपला पराजय स्वीकार केला. ॥४९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षोडशः सर्गः ॥ १६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा सोळावा सर्ग पूरा झाला. ॥१६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP