श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ नवाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
परं धाम गन्तुं निर्गतेन श्रीरामेण सह समेषां अयोध्यावासिनामपि प्रस्थानम् -
परमधाम जाण्यासाठी निघालेल्या श्रीरामांच्या बरोबर समस्त अयोध्यावासी लोकांचे प्रस्थान -
प्रभातायां तु शर्वर्यां पृथुवक्षा महायशाः ।
रामः कमलपत्राक्षः पुरोधसमथाब्रवीत् ॥ १ ॥
त्यानंतर रात्र निघून जाऊन जेव्हा प्रभात झाली तेव्हा विशाल वक्षःस्थळ असणारे महायशस्वी कमलनयन श्रीराम पुरोहितांना म्हणाले - ॥१॥
अग्निहोत्रं व्रजत्वग्रे दीप्यमानं सह द्विजैः ।
वाजपेयातपत्रं च शोभमानं महापथे ॥ २ ॥
माझ्या अग्निहोत्राचा प्रज्वलित अग्नि ब्राह्मणांसह पुढे पुढे चालू दे. महाप्रयाणाच्या मार्गावर या यात्रेच्या समयी माझ्या बाजपेय यज्ञाचे सुंदर छत्र ही आले पाहिजे. ॥२॥
ततो वसिष्ठस्तेजस्वी सर्वं निरवशेषतः ।
चकार विधिवद् धर्मं महाप्रास्थानिकं विधिम् ॥ ३ ॥
त्यांना याप्रकारे सांगितल्यावर तेजस्वी वसिष्ठ मुनिनी महाप्रस्थान काळासाठी उचित समस्त धार्मिक क्रियांचे विधिपूर्वक पूर्णतः अनुष्ठान केले. ॥३॥
ततः सूक्ष्माम्बरधरो ब्रह्मं आवर्तयन् परम् ।
कुशान् गृहीत्वा पाणिभ्यां सरयू प्रययावथ ॥ ४ ॥
नंतर भगवान्‌ श्रीराम सूक्ष्म वस्त्र धारण करून दोन्ही हातात कुश घेऊन परब्रह्माचे प्रतिपादक वेदमंत्रांचे उच्चारण करीत शरयूनदीच्या तटाकडे निघाले. ॥४॥
अव्याहरन् क्वचित् किंचित् निश्चेष्टो निःसुखः पथि ।
निर्जगाम गृहात् तस्माद् दीप्यमानो यथांशुमान् ॥ ५ ॥
त्यासमयी तेथे वेदपठनाशिवाय कोठेही कोणीही कुणाशीही दुसरे काहीही बोलत नव्हते. चालण्याशिवाय त्यांच्या ठिकाणी इतर दुसरी कोणतीही चेष्टा दिसून येत नव्हती. तसेच ते लौकिक सुखाचा परित्याग करून देदीप्यमान्‌ सूर्याप्रमाणे प्रकाशित होत घरातून बाहेर पडले होते आणि गंतव्य पथावर पुढे चालले होते. ॥५॥
रामस्य दक्षिणे पार्श्वे सपद्मा श्रीरुपाश्रिता ।
सव्येऽपि च मही देवी व्यवसायस्तथाग्रतः ॥ ६ ॥
भगवान्‌ श्रीरामांच्या उजव्या बाजूला कमल हातात घेऊन श्रीदेवी उपस्थित होती. वामभागी भूदेवी विराजमान होती आणि पुढे पुढे त्यांची व्यवसाय (संहार) शक्ति चालत होती. ॥६॥
शरा नानाविधाश्चापि धनुरायतमुत्तमम् ।
तथाऽऽयुधाश्च ते सर्वे ययुः पुरुषविग्रहाः ॥ ७ ॥
नाना प्रकारचे बाण, विशाल आणि उत्तम धनुष्य आणि दुसरी इतर अस्त्रे-शस्त्रे - सर्व पुरूष शरीर धारण करून भगवंता बरोबर चालत होती. ॥७॥
वेदा ब्राह्मणरूपेण गायत्री सर्वरक्षिणी ।
ओङ्‌कारोऽथ वषट्कारः सर्वे राममनुव्रताः ॥ ८ ॥
चारी वेद ब्राह्मणांचे रूप धारण करून चालत होते; सर्वांचे रक्षण करणारी गायत्री देवी, ओंकार आणि वषट्‍कार सर्व भक्तिभावाने त्यांचे अनुसरण करत होते. ॥८॥
ऋषयश्च महात्मानः सर्व एव महीसुराः ।
अन्वगच्छन् महात्मानं स्वर्गद्वारमपावृतम् ॥ ९ ॥
महात्मा ऋषि तसेच समस्त ब्राह्मण ही ब्रह्मलोकाच्या उघडलेल्या द्वारस्वरूप परमात्मा श्रीरामांच्या पाठोपाठ चालत होते. ॥९॥
तं यान्तमनुगच्छन्ति ह्यन्तःपुरचराः स्त्रियः ।
सवृद्धबालदासीकाः सवर्षवरकिङ्‌कराः ॥ १० ॥
अंतःपुरातील स्त्रियाही बालके, वृद्ध, दासी, दास आणि सेवकांसह निघून शरयूच्या तटाकडे जाणार्‍या श्रीरामांच्या मागे मागे जात राहिली होती. ॥१०॥
सान्तःपुरश्च भरतः शत्रुघ्नसहितो ययौ ।
रामं गतिमुपागम्य साग्निहोत्रमनुव्रताः ॥ ११ ॥
भरत आणि शत्रुघ्न अंतःपुरातील स्त्रियांसह आपल्या आश्रयरूप भगवान्‌ श्रीरामांच्या, जे अग्निहोत्रा बरोबर जात होते, त्यांच्या पाठोपाठ गेले. ॥११॥
ते च सर्वे महात्मानः साग्निहोत्राः समागताः ।
सपुत्रदाराः काकुत्स्थं अनुजग्मुर्महामतिम् ॥ १२ ॥
ते सर्व महामनस्वी श्रेष्ठ पुरूष तसेच ब्राह्मण, अग्निहोत्राचा अग्नि तसेच स्त्री-पुत्रांसहित या महायात्रेत सम्मिलित होऊन परम बुद्धिमान्‌ काकुत्स्थ रामांचे अनुगमन करत राहिले होते. ॥१२॥
मन्त्रिणो भृत्यवर्गाश्च सपुत्रपशुबान्धवाः ।
सर्वे सहानुगा रामं अन्वगच्छन् प्रहृष्टवत् ॥ १३ ॥
समस्त मंत्री आणि भृत्यवर्ग (सेवकवर्ग) ही आपल्या पुत्रांसह, पशुंसह, बंधु-बांधवांसह हर्षपूर्वक श्रीरामांच्या मागोमाग जात राहिले होते. ॥१३॥
ततः सर्वाः प्रकृतयो हृष्टपुष्टजनावृताः ।
गच्छन्तं अन्वगछन्ति राघवं गुणरञ्जिताः ॥ १४ ॥

ततः सस्त्रीपुमांसस्ते सपक्षिपशुबान्धवाः ।
राघवस्यानुगाः सर्वे हृष्टा विगतकल्मषाः ॥ १५ ॥
हृष्ट-पुष्ट मनुष्यांनी भरलेले समस्त प्रजाजन राघवांच्या गुणांवर मुग्ध होते, म्हणून ते स्त्री, पुरूष, पशु, पक्षी तसेच बंधु-बांधवांसहित त्या महायात्रेत श्रीरामांचे अनुगामी झाले. त्या सर्वांच्या हृदयात प्रसन्नता होती आणि ते सर्व पापरहित होते. ॥१४-१५॥
स्नाताः प्रमुदिताः सर्वे हृष्टाः पुष्टाश्च वानराः ।
दृढं किलकिलाशब्दैः सर्वं राममनुव्रतम् ॥ १६ ॥
संपूर्ण हृष्टपुष्ट वानरगणही स्नान करून अत्यंत प्रसन्नतेने किलकारी मारत भगवान्‌ श्रीरामांच्या बरोबर जात राहिले होते. तो सर्व समुदायच श्रीरामांचा भक्त होता. ॥१६॥
न तत्र कश्चिद् दीनो वा व्रीडितो वाऽपि दुःखितः ।
हृष्टं समुदितं सर्वं बभूव परमाद्‌भुतम् ॥ १७ ॥
त्यात कुणीही असे नव्हते की जे दीन दुःखी अथवा लज्जित होते. तेथे एकत्र जमलेल्या सर्व लोकांच्या हृदयात महान्‌ हर्ष भरून राहिला होता आणि याप्रकारे तो जनसमुदाय अत्यंत आश्चर्यजनक वाटत होता. ॥१७॥
द्रष्टुकामोऽथ निर्यान्तं रामं जानपदो जनः ।
यः प्राप्तः सोऽपि दृष्ट्‍वैव स्वर्गायानुगतो जनः ॥ १८ ॥
जनपदातील लोकांपैकी जे श्रीरामांची यात्रा पहाण्यासाठी आले होते, ते ही हा सर्व समारोह पहाताच भगवंताबरोबर परमधाम जाण्यास तयार झाले. ॥१८॥
ऋक्षवानररक्षांसि जनाश्च पुरवासिनः ।
आगच्छन् परया भक्त्या पृष्ठतः सुसमाहिताः ॥ १९ ॥
अस्वले, वानर, राक्षस आणि पुरवासी माणसे अत्यंत भक्तिने श्रीरामांच्या मागे मागे एकाग्रचित्त होऊन चालत येत होती. ॥१९॥
यानि भूतानि नगरेऽपि अन्तर्धानगतानि च ।
राघवं तान्यनुययुः स्वर्गाय समुपस्थितम् ॥ २० ॥
अयोध्या नगरीत जे अदृश्य प्राणी रहात होते, तेही साकेतधाम जाण्यासाठी उद्यत होऊन राघवांच्या पाठोपाठ चालू लागले. ॥२०॥
यानि पश्यन्ति काकुत्स्थं स्थावराणि चराणि च ।
सर्वाणि रामगमने अनुजग्मुर्हि तान्यपि ॥ २१ ॥
चराचर प्राण्यांपैकी जे जे रामांना जातांना पहात होते ते सर्व त्या यात्रेत त्यांच्या मागोमाग चालू लागत होते. ॥२१॥
नोच्छ्वसत् तदयोध्यायां सुसूक्ष्ममपि दृश्यते ।
तिर्यग्योनिगताश्चैव सर्वे राममनुव्रताः ॥ २२ ॥
त्या समयी त्या अयोध्येत श्वास घेणारा कुणी लहानात लहान प्राणी राहिला असेल असे दिसून येत नव्हते. तिर्यग्योनीचे समस्त जीव श्रीरामांमध्ये भक्तिभाव ठेवून त्यांच्या मागे मागे जात राहिले होते. ॥२२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे नवाधिकशततमः सर्गः ॥ १०९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा एकशेंनववा सर्ग पूरा झाला. ॥१०९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP