[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। अष्टसप्ततितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
शत्रुघ्नस्य रोषस्तेन कुब्जाया भूमौ विकर्षणं भरतस्यादेशेन तस्या मोचनं च -
शत्रुघ्नाचा रोष, त्याचे कुब्जेला फरफटविणे आणि भरताच्या सांगण्यावरुन तिला मूर्छित अवस्थेत सोडून देणे -
अथ यात्रां समीहन्तं शत्रुध्नो लक्ष्मणानुजः ।
भरतं शोकसंतप्तमिदं वचनमब्रवीत् ॥ १ ॥
तेराव्या दिवसाचे कार्य पूर्ण करुन श्रीरामचंद्रांकडे जाण्याचा विचार करीत असलेल्या शोकसंतप्त भरतास लक्ष्मणांचे धाकटे भाऊ शत्रुघ्न याप्रकारे बोलले - ॥ १॥
गतिर्यः सर्वभूतानां दुःखे किं पुनरात्मनः ।
स रामः सत्त्वसम्पन्नः स्त्रिया प्रव्राजितो वनम् ॥ २ ॥
’हे बंधो ! जे दुःखाच्या समयी आपल्याला तसेच आत्मीय जनांची तर गोष्ट राहू दे, समस्त प्राण्यांना आधार देणारे आहेत त्या सत्वगुणसंपन्न श्रीरामांना एका स्त्रीमुळे वनांत धाडले गेले (ही किती खेदाची गोष्ट आहे.) ॥ २॥
बलवान् वीर्यसम्पन्नो लक्ष्मणो नाम योऽप्यसौ ।
किं न मोचयते रामं कृत्वापि पितृनिग्रहम् ॥ ३ ॥
तसेच जे बल आणि परक्रमाने संपन्न लक्ष्मण नामधारी शूरवीर आहेत, त्यांनीही काही केले नाही. मी विचारतो त्यांनी पित्याला कैद करून श्रीरामांना या संकटांतून का सोडविले नाही ? ॥ ३॥
पूर्वमेव तु विग्राह्यः समवेक्ष्य नयानयौ ।
उत्पथं यः समारूढो नार्या राजा वशं गतः ॥ ४ ॥
ज्यावेळी महाराज एका स्त्रीला वश होऊन वाईट मार्गावर आरूढ झाले होते तेव्हा न्याय आणि अन्यायाचा विचार करून त्यांना प्रथमच कैद करावयास पाहिजे होते’. ॥ ४ ॥
इति संभाषमाणे तु शत्रुघ्ने लक्ष्मणानुजे ।
प्राग्द्वारेऽभूत् तदा कुब्जा सर्वाभरणभूषिता ॥ ५ ॥
लक्ष्मणांचे लहान भाऊ शत्रुघ्न ज्यावेळी रोषाने चिडून याप्रमाणे बोलत होते त्याच वेळी कुब्जा सर्व आभूषणांनी विभूषित होऊन राजभवनाच्या पूर्व द्वारावर येऊन उभी राहिली. ॥ ५ ॥
लिप्ता चन्दनसारेण राजवस्त्राणि बिभ्रती ।
विविधं विविधैस्तैस्तैर्भूषणैश्च विभूषिता ॥ ६ ॥
तिच्या अंगाला उत्तमोत्तम चंदनाची उटी लावलेली होती. तसेच राजाच्या राण्यांनी परिधान करण्यायोग्य विविध वस्त्रे धारण करून निरनिराळ्या प्रकारच्या दागदागिन्यांनी नटून सजून ती तेथे आली होती. ॥ ६ ॥
मेखलादामभिश्चित्रैरन्यैश्च वरभूषणैः ।
बभासे बहुभिर्बद्धा रज्जुभिरिव वानरी ॥ ७ ॥
कमरपट्याच्या विविध लड्या आणि अन्य बहुसंख्याक अलंकारांनी अलंकृत झालेली ती अनेक दोर्‍यांनी बांधलेल्या वानरीप्रमाणे भासत होती. ॥ ७ ॥
तां समीक्ष्य तदा द्वाःस्थो भृशं पापस्य कारिणीम् ।
गृहीत्वाऽकरुणं कुब्जां शत्रुघ्नाय न्यवेदयत् ॥ ८ ॥
तीच सर्व (संकटाचे) पापाचे मूळ होती. तीच श्रीरामाच्या वनवासरूपी पापाचे मूळ कारण होती. तिच्यावर दृष्टी पडताच द्वारपालाने तिला पकडले आणि अत्यंत निर्दयतेने फरफटत आणून शत्रुघ्नच्या हाती देऊन म्हटले - ॥ ८ ॥
यस्याः कृते वने रामो न्यस्तदेहश्च वः पिता ।
सेयं पापा नृशंसा च तस्याः कुरु यथामति ॥ ९ ॥
’राजकुमार ! जिच्यामुळे श्रीरामांना वनात निवास करावा लागत आहे आणि आपणा सर्वांच्या पित्याने शरीराचा परित्याग केला आहे, ती क्रूर कर्म करणारी पापीण हीच आहे. आपण हिच्याशी जसे वर्तन करणे योग्य समजाल तसे करावे. ॥ ९ ॥
शत्रुघ्नश्च तदाज्ञाय वचनं भृशदुःखितः ।
अन्तःपुरचरान् सर्वानित्युवाच धृतव्रतः ॥ १० ॥
द्वारपालाच्या म्हणण्यावर विचार करून शत्रुघ्नांचे दुःख अधिकच वाढले. त्यांनी आपल्या कर्तव्याचा निश्चय केला आणि अंतःपुरात राहाणार्‍या सर्व लोकांनी ऐकावे अशा प्रकारे ते म्हणाले- ॥ १०॥
तीव्रमुत्पादितं दुःखं भ्रातॄणां मे तथा पितुः ।
यया सेयं नृशंसस्य कर्मणः फलमश्नुताम् ॥ ११ ॥
’या पापिणीने माझे भाऊ आणि पिता यांना जे दुःसह दुःख पोहोंचविले आहे, त्या आपल्या क्रूर कर्माचे तसेच फळ तीही भोगेल. ॥ ११ ॥
एवमुक्ता च तेनाशु सखीजनसमावृता ।
गृहीता बलवत् कुब्जा सा तद् गृहमनादयत् ॥ १२ ॥
असे म्हणून शत्रुघ्नांनी मैत्रिणीनी घेरलेल्या त्या कुब्जेला तात्काळ बलपूर्वक पकडले. ती भयाने अशी आरडा-ओरडा करू लागली की तो सारा महाल निनादित झाला. ॥ १२ ॥
ततः सुभृशसंतप्तस्तस्याः सर्वः सखीजनः ।
क्रुद्धमाज्ञाय शत्रुघ्नं व्यपलायत सर्वशः ॥ १३ ॥
मग तर तिच्या सगळ्या सख्या संतप्त झाल्या आणि शत्रुघ्न कुपित झाला आहे हे जाणून सगळीकडे पळून गेल्या. ॥ १३॥
आमन्त्रयत कृत्स्नश्च तस्याः सर्वः सखीजनः ।
यथायं समुपक्रान्तो निःशेषं न करिष्यति ॥ १४ ॥
तिच्या सर्व सख्यांनी एका जागी एकत्र जमून आपापसात सल्लामसलत केली की ज्या प्रकारे शत्रुघ्न बलपूर्वक कुब्जेला पकडले आहे त्यावरून कळून येत आहे की आपल्यापैकी कुणालाही तो जिवंत सोडणार नाही. ॥ १४ ॥
सानुक्रोशां वदान्यां च धर्मज्ञां च यशस्विनीम् ।
कौसल्यां शरणं यामः सा हि नोऽस्ति ध्रुवा गतिः ॥ १५ ॥
म्हणून आता आपण सर्व दयाळू , परम उदार, धर्मज्ञ आणि यशस्विनी महाराणी कौसल्येला शरण जाऊ या. या वेळी तीच आपली ध्रुव (निश्चल) गति आहे. ॥ १५ ॥
स च रोषेण संवीतः क्षत्रुघ्नः शत्रुशासनः ।
विचकर्ष तदा कुब्जां क्रोशन्तीं पृथिवीतले ॥ १६ ॥
शत्रूंचे दमन करणारे शत्रुघ्न रोषाने बेफान होऊन कुब्जेला जमिनीवर फरफटू लागले. त्यावेळी ती जोरजोराने चीत्कार करीत होती. ॥ १६ ॥
तस्यां ह्याकृष्यमाणायां मन्थरायां ततस्ततः ।
चित्रं बहुविधं भाण्डं पृथिव्यां तद्व्यशीर्यत ॥ १७ ॥
ज्यावेळी मंथरेला फरफटविण्यात येत होते तेव्हा तिची नाना प्रकारची विचित्र आभूषणे तुटून पृथ्वीवर इकडे-तिकडे विखरून पडली. ॥ १७ ॥
तेन भाण्डेन विस्तीर्णं श्रीमद् राजनिवेशनम् ।
अशोभत तदा भूयः शारदं गगनं यथा ॥ १८ ॥
आभूषणांच्या त्या तुकड्यांनी ते शोभाशाली विशाल राजभवन जणु नक्षत्रमालांनी अलंकृत शरद ऋतुतील आकाशाप्रमाणे अधिक सुशोभित दिसत होते. ॥ १८ ॥
स बली बलवत् क्रोधाद् गृहीत्वा पुरुषर्षभः ।
कैकेयीमभिनिर्भर्त्स्य बभाषे परुषं वचः ॥ १९ ॥
बलवान नरश्रेष्ठ शत्रुघ्न ज्यावेळी रोषपूर्वक मंथरेला पकडून जोराने फरफटत नेत होते तेव्हा तिला सोडविण्यासाठी कैकेयी त्यांच्या जवळ आली. तेव्हा तिचा धिक्कार करीत त्यांनी तिला उद्देशून फार कठोर वचन बोलून तिला रोषपूर्वक फटकारले. ॥ १९ ॥
तैर्वाक्यैः परुषैर्दुःखैः कैकेयी भृशदुःखिता ।
शत्रुघ्नभयसंत्रस्ता पुत्रं शरणमागता ॥ २० ॥
’शत्रुघ्नांची ती कठोर वचने अत्यंत दुःखदायक होती. ती ऐकून कैकेयीला फार दुःख झाले. ती शत्रुघ्नाच्या भयाने कापू लागली आणि आपल्या पुत्राला शरण आली. ॥ २० ॥
तं प्रेक्ष्य भरतः क्रुद्धं शत्रुघ्नमिदमब्रवीत् ।
अवध्याः सर्वभूतानां प्रमदाः क्षम्यतामिति ॥ २१ ॥
शत्रुघ्नांना क्रोधाने भडकलेले पाहून भरत त्यांना म्हणाले - ’सुमित्राकुमार ! क्षमा करा. स्त्रिया सर्व प्राण्यांसाठी अवध्य असतात. ॥ २१ ॥
हन्यामहमिमां पापां कैकेयीं दुष्टचारिणीम् ।
यदि मां धार्मिको रामो नासूयेन्मातृघातकम् ॥ २२ ॥
’जर मला हे भय वाटले नसते कि धर्मात्मा श्रीराम मातृघातकी समजून माझा तिरस्कार करू लागतील तर मी ही या दुष्ट आचरण करण्यार्‍या पापीण कैकेयीला मारून टाकले असते. ॥ २२ ॥
इमामपि हतां कुब्जां यदि जानाति राघवः ।
त्वां च मां चैव धर्मात्मा नाभिभाषिष्यते ध्रुवम् ॥ २३ ॥
’धर्मात्मा राघवांना जर या कुब्जेला मारली गेल्याचा समाचार कळला तर निश्चितच ते तुझ्याशी आणि माझ्याशी ही बोलणेच सोडून देतील. ॥ २३ ॥
भरतस्य वचः श्रुत्वा शत्रुघ्नो लक्ष्मणानुजः ।
न्यवर्तत ततो दोषात् तां मुमोच च मूर्च्छिताम् ॥ २४ ॥
भरतांचे हे बोलणे ऐकुन लक्ष्मणांचे धाकटे भाऊ मंथरेच्या वधाच्या दोषापासून निवृत्त झाले. त्यांनी तिला मूर्छित अवस्थेतच सोडून दिले. ॥ २४ ॥
सा पादमूले कैकेय्या मन्थरा निपपात ह ।
निश्वसन्ती सुदुःखार्ता कृपणं विललाप च ॥ २५ ॥
मंथरा कैकेयीच्या चरणांवर जाऊन पडली आणि दीर्घ श्वास घेत अत्यंत दुःखाने आर्त होऊन विलाप करू लागली. ॥ २५ ॥
शत्रुघ्नविक्षेपविमूढसंज्ञां
     समीक्ष्य कुब्जां भरतस्य माता ।
शनैः समाश्वासयदार्तरूपां
     क्रौञ्चीं विलग्नामिव वीक्षमाणाम् ॥ २६ ॥
शत्रुघ्नाने आपटल्यामुळे आणि फरफटल्यामुळे आर्त आणि अचेत झालेल्या कुब्जेला भरताची माता कैकेयी तिला हळूहळू आश्वासन देण्यास, तिला शुद्धीवर आणण्याच्या प्रयत्‍नास लागली. त्यावेळी ती पिंजर्‍यात अडकलेल्या कौंञ्चीप्रमाणे कातर दृष्टीने कैकेयीकडे पाहू लागली. ॥ २६ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे अष्टसप्ततितमः सर्गः ॥ ७८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा अठ्ठ्याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥ ७८ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP