[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ त्रिषष्टितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
दधिमुखान् मधुवनविध्वंस वार्तां आकर्ण्य सुग्रीवस्य हनुमदादीनां साफल्यविषयेऽनुमानम् -
दधिमुखाकडून मधुवनाच्या विध्वंसाचा समाचार ऐकून सुग्रीवाचे हनुमान आदि वानरांच्या सफलते विषयीचे अनुमान -
ततो मूर्ध्ना निपतितं वानरं वानरर्षभः ।
दृष्ट्‍वैवोद्विग्नहृदयो वाक्यमेतदुवाच ह ॥ १ ॥
वानर दधिमुखाने पायांवर मस्तक ठेवून प्रणाम केलेला पाहून वानरशिरोमणि सुग्रीवाचे हृदय उद्विग्न झाले. तो त्यास याप्रकारे म्हणाला—॥१॥
उत्तिष्ठोत्तिष्ठ कस्मात् त्वं पादयोः पतितो मम ।
अभयं ते प्रदास्यामि सत्यमेवाभिधीयताम् ॥ २ ॥
'उठा, उठा ! तुम्ही माझ्या पाया का पडत आहात ? मी तुम्हांला अभयदान देत आहे. खरे काय घडले ते सर्व तुम्ही सांगा.॥२॥
किं संभ्रमाद्धितं कृत्स्नं ब्रूहि यद् वक्तुमर्हसि।
कच्चिन्मधुवने स्वस्ति श्रोतुमिच्छाम् वानर ॥ ३ ॥
'सांगा बरे, कुणाच्या भयाने येथे आला आहात. जी गोष्ट पूर्ण हितावह असेल ती सांगा कारण तुम्ही सर्वकाही सांगण्यास योग्य आहात. मधुवनात सर्व कुशल तर आहे ना ? वानर ! मी तुत्तच्या मुखाने सर्व काही ऐकू इच्छितो.॥३॥
स समाश्वासितस्तेन सुग्रीवेण महात्मना ।
उत्थाय सुमहाप्राज्ञो वाक्यं दधिमुखोऽब्रवीत् ॥ ४ ॥
महात्मा सुग्रीवाने याप्रमाणे आश्वासन दिल्यावर महाबुद्धिमान दधिमुख उभे राहून म्हणाले—॥४॥
नैवर्क्षरजसा राजन् न त्वया न च वालिना ।
वनं निसृष्टपूर्वं ते नाशितं तत्तु वानरैः ॥ ५ ॥
'राजन ! आपला पिता ऋक्षराजाने, वालीने आणि आपणही पूर्वी कधीही ज्या वनाच्या यथेच्छ उपभोगाकरिता कुणालाही आज्ञा दिली नव्हती, त्या वनाचा आज हनुमान आदि वानरांनी नाश करून टाकला आहे.॥५॥
न्यवारयमहं सर्वान् सहैभिर्वनचारिभिः ।
अचिन्तयित्वा मां हृष्टा भक्षयन्ति पिबन्ति च ॥ ६ ॥
'मी या वनरक्षक वानरांसह त्या सर्वांना अडविण्याचा खूप प्रयत्‍न केला पण ते मला जराही न जुमानता अत्यन्त हर्षाने तेथील फळे खात आहेत आणि मधु पित आहेत.॥६॥
एभिः प्रधर्षणायां च वारितं वनपालकैः ।
मामप्यचिन्तयन् देव भक्षयन्ति वनौकसः ॥ ७ ॥
'देवा, याप्रमाणे हनुमान आदि वीरांनी ज्यावेळी मधुवनात लूटालूट करण्यास आरंभ केला तेव्हा आपल्या या रक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्‍न केला, परन्तु ते वानर यांना किंवा मलाही जराही न जुमानता तेथील फळे आदि भक्षण करीत आहेत.॥७॥
शिष्टमत्रापविध्यन्ति भक्षयन्ति तथापरे ।
निवार्यमाणास्ते सर्वे भ्रूवौ वै दर्शयन्ति हि ॥ ८ ॥
'दुसरे असे की त्या वानरांनी खाण्यापिण्याचा तर सपाटा चालविलाच आहे, परन्तु खाऊन अवशिष्ट राहिलेले ते सरळ उचलून फेकून देत आहेत. आणि जेव्हा आम्ही त्यांना अडवू लागतो तेव्हां ते क्रोधाने आपल्या भुवया चढवून आम्हाला भीति दाखवीत आहेत. ॥८॥
इमे हि संरब्धतरास्तदा तैः सम्प्रधर्षिताः ।
निवार्यन्ते वनात् तस्मात् क्रुद्धैर्वानरपुङ्‌गवैः ॥ ९ ॥
'जेव्हां हे रक्षक त्यांच्यावर फारच रागावले तेव्हा त्यांनी यांच्यावर आक्रमण केले. एवढेच नव्हे तर क्रोधाने सन्तप्त झालेल्या त्या वानरपुंगवांनी या रक्षकांना त्या वनान्तून बाहेर हाकलून दिले.॥९॥
ततस्तैर्बहुभिर्वीरैवानरैर्वानरर्षभाः ।
संरक्तनयनैः क्रोधाद्धरयः सम्प्रधर्षिताः ॥ १० ॥
'बाहेर हाकलून त्या बहुसंख्य वीर वानरांनी क्रोधाने डोळे लाल करून वनाचे रक्षण करणार्‍या या श्रेष्ठ वानरांना पकडून ठेवले.॥१०॥
पाणिभिर्निहताः केचित् केचिज्जानुभिराहताः ।
प्रकृष्टाश्च तदा कामं देवमार्गं च दर्शिताः ॥ ११ ॥
'काहींना थपडा मारल्या, काहींना गुडघ्याने रगडले, बहुतेकांना वाटेल तसे फरफटत नेले, आणि कित्येकांना पाठीवर उताणे पाडून आकाशात फेकले. ॥११॥
एवमेते हताः शूरास्त्वयि तिष्ठति भर्तरि ।
कृत्स्नं मधुवनं चैव प्रकामं तैश्च भक्ष्यते ॥ १२ ॥
'प्रभो ! आपल्या सारखे स्वामी विद्यमान असतांना हे शूरवीर वनरक्षक त्यांच्या द्वारा याप्रकारे बदडले गेले आहेत आणि ते अपराधी वानर आपल्या इच्छेप्रमाणे सार्‍या मधुवनाचा उपभोग घेत आहेत.॥१२॥
एवं विज्ञाप्यमानं तं सुग्रीवं वानरर्षभम् ।
अपृच्छत् तं महाप्राज्ञो लक्ष्मणः परवीरहा ॥ १३ ॥
वानरश्रेष्ठ सुग्रीवास ज्यावेळी याप्रमाणे मधुवन लुटले गेल्याचा वृत्तांत सांगितला जात होता त्यावेळी शत्रूवीरांचा संहार करणारा परम बुद्धिमान लक्ष्मणाने सुग्रीवास विचारले—॥१३॥
किमयं वानरो राजन् वनपः प्रत्युपस्थितः ।
कं चार्थमभिनिर्दिश्य दुःखितो वाक्यमब्रवीत् ॥ १४ ॥
'राजन ! वनाचे रक्षण करणारा हा वानर येथे कशासाठी उपस्थित झाला आहे ? आणि कुठल्या विषयाकडे संकेत करून याने दु:खी होऊन भाषण केले आहे ? ॥१४॥
एवमुक्तस्तु सुग्रीवो लक्ष्मणेन महात्मना ।
लक्ष्मणं प्रत्युवाचेदं वाक्यं वाक्यविशारदः ॥ १५ ॥
महात्मा लक्ष्मणाने याप्रकारे विचारल्यावर वाक्यविशारद (संभाषण-चतुर) सुग्रीवाने त्याला असे उत्तर दिले—॥१५॥
आर्य लक्ष्मण सम्प्राह वीरो दधिमुखः कपिः ।
अङ्‌गदप्रमुखैर्वीरैर्भक्षितं मधु वानरैः ॥ १६ ॥
'आर्य लक्ष्मणा ! वीर वानर दधिमुखाने मला असे सांगितले आहे की अंगद आदि वानरांनी मधुवनातील सारा मध खाऊन-पिऊन टाकला आहे.॥१६॥
नैषामकृतकार्याणामीदृशः स्याद् व्यतिक्रमः ।
वनं यदाभिपन्नास्ते साधितं कर्म तद् ध्रुवम् ॥ १७ ॥
याची ही गोष्ट ऐकून मला असे अनुमान होत आहे की ते ज्या कार्यासाठी गेले होते ते त्यांनी अवश्यच पूरे केले आहे. तेव्हां तर त्यांनी मधुवनावर आक्रमण केले आहे. जर ते आपले कार्य सिद्ध न करता आले असते तर त्यांच्याकडून असा अपराध कधीच घडता नसता ते माझ्या मधुवनास लुटण्याचे साहस कधीच करू शकले नसते.॥१७॥
वारयन्तो भृशं प्राप्ताः पाला जानुभिराहताः ।
तथा न गणितश्चायं कपिर्दधिमुखो बली ॥ १८ ॥

पतिर्मम वनस्यायमस्माभिः स्थापितः स्वयम् ।
दृष्टा देवी न सन्देहो न चान्येन हनूमता ॥ १९ ॥
'ज्यावेळी रक्षक त्यांना वारंवार अडविण्यासाठी आले तेव्हा त्यांनी या सर्वांना जमिनीवर आपटून रगडले आहे तसेच या बलवान वानर दधिमुखाचीही त्यांनी पर्वा केली नाही. हे दधिमुखच माझ्या त्या वनाचे मालक-अथवा प्रधान रक्षक आहेत. मी स्वत:च त्यांना या कार्यासाठी नियुक्त केलेले आहे. (आणि तरीही त्या वानरांनी यांचे ऐकले नाही.) यावरून असे जाणून येत आहे की त्यांनी सीता देवीचे दर्शन अवश्य केले आहे. यात जराही संदेह नाही हे काम आणखी कुणाचे नाही, हनुमानाचेच आहे. (त्यांनीच सीतेचे दर्शन केले आहे).॥१८-१९॥
न ह्यन्यः साधने हेतुः कर्मणोऽस्य हनूमतः ।
कार्यसिद्धिर्हनुमति मतिश्च हरिपुंगवैः ॥ २० ॥

व्यवसायश्च वीर्यं च श्रुतं चापि प्रतिष्ठितम् ।
'हे कार्य सिद्धिस जाण्यास हनुमानाशिवाय अन्य कोणी कारण बनले असेल असा संभव नाही आहे. वानरशिरोमणि हनुमानाच्या ठिकाणीच कार्यसिद्धिची शक्ति आणि बुद्धि आहे. त्यांच्याच ठिकाणी उद्योग, पराक्रम आणि शास्त्रज्ञान ही प्रतिष्ठित आहे.॥२० १/२॥
जाम्बवान् यत्र नेता स्याद् अङ्‌गदश्च महाबलः ॥ २१ ॥

हनूमांश्चाप्यधिष्ठाता न तस्य गतिरन्यथा ।
'ज्या दलाचे नेते जांबवान आणि महाबली अंगद आहेत आणि अधिष्ठाता हनुमान आहे त्या दलाला असफलता मिळेल हे संभव नाही.॥२१ १/२॥
अङ्‌गदप्रमुखैर्वीरैर्हतं मधुवनं किल ॥ २२ ॥

विचित्य दक्षिणामाशामागतैःर्हरिपुंगवैः ।
आगतैश्चाप्रधृष्यं तद्धतं मधुवनं हि तैः ॥ २३ ॥

धर्षितं च वनं कृत्स्नमुपयुक्तं तु वानरैः ।
पातिता वनपालास्ते तदा जानुभिराहताः ॥ २४ ॥

एतदर्थमयं प्राप्तो वक्तुं मधुरवागिह ।
नाम्ना दधिमुखो नाम हरिः प्रख्यातविक्रमः ॥ २५ ॥
'दक्षिण दिशेकडून सीता देवीचा पत्ता लावून परत आलेल्या अंगद आदि वीर पुंगवांनी त्या मधुवनावर प्रहार केला आहे, की ज्याला पददलित करणे कुणालाही संभवनीय नव्हते. त्यांनी मधुवनाला नष्ट केले आहे. उजाडून टाकले आहे आणि सर्व वानरांनी मिळून संपूर्ण वनाचा यथेष्ट मन मानेल तसा उपभोग घेतला आहे. इतकेच नाही तर त्यांनी वनरक्षकांनाही मार दिला आहे आणि आपल्या गुडघ्यांनी घायाळ केले आहे. ही गोष्ट सांगण्यासाठी हा विख्यात पराक्रमी वानर दधिमुख, जो अत्यन्त मधुरभाषी आहे, तो येथे आला आहे. ॥२२—२५॥
दृष्टा सीता महाबाहो सौमित्रे पश्य तत्त्वतः ।
अभिगम्य तथा सर्वे पिबन्ति मधु वानराः ॥ २६ ॥
'महाबाहु सुमित्रानन्दना ! आपण ही गोष्ट नीट जाणून घ्या की आता सीतेचा पत्ता लागला आहे. कारण की ते सर्व वानर त्या वनात जाऊन मधुपान करीत आहेत.॥२६॥
न चाप्यदृष्ट्‍वा वैदेहीं विश्रुताः पुरुषर्षभ ।
वनं दत्तवरं दिव्यं धर्षयेयुर्वनौकसः ॥ २७ ॥
'पुरुषप्रवर ! वैदेहीचे दर्शन न करतां त्या दिव्य वनाचा, जे देवतांकडून माझ्या पूर्वजांना वरदानाच्या रूपाने प्राप्त झालेले आहे. त्याचा ते विख्यात वानर कधीच विध्वंस करू शकले नसते.॥२७॥
ततः प्रहृष्टो धर्मात्मा लक्ष्मणः सहराघवः ।
श्रुत्वा कर्णसुखां वाणीं सुग्रीववदनाच्च्युताम् ॥ २८ ॥

प्राहृष्यत भृशं रामो लक्ष्मणश्च महाबलः ।
सुग्रीवाच्या मुखातून निघालेली ती कानांना सुख देणारी गोष्ट ऐकून धर्मात्मा लक्ष्मण श्रीरामचन्द्रांसहित अत्यन्त प्रसन्न झाले. श्रीरामांच्या हर्षाला सीमा राहिली नाही आणि महायशस्वी लक्ष्मणही हर्षाने प्रफुल्लित झाले. ॥२८ १/२॥
श्रुत्वा दधिमुखस्यैवं सुग्रीवस्तु प्रहृष्य च ॥ २९ ॥

वनपालं पुनर्वाक्यं सुग्रीवः प्रत्यभाषत ।
दधिमुखांनी सांगितलेली उपर्युक्त गोष्ट ऐकून सुग्रीवास अत्यंत हर्ष झाला. त्याने आपल्या वनरक्षकास नंतर याप्रमाणे उत्तर दिले.॥२९ १/२॥
प्रीतोऽस्मि सोऽहं यद्‌भुक्तं वनं तैः कृतकर्मभिः ॥ ३० ॥

धर्षितं मर्षणीयं च चेष्टितं कृतकर्मणाम् ।
गच्छ शीघ्रं मधुवनं संरक्षस्व तमेव हे ।
शीघ्रं प्रेषय सर्वांस्तान् हनुमत्प्रमुखान् कपीन् ॥ ३१ ॥
'मामा ! आपले कार्य सिद्ध करून परत आलेल्या त्या वानरांनी जो माझ्या मधुवनाचा उपभोग घेतला आहे त्यामुळे मी फार प्रसन्न झालो आहे . म्हणून तुम्ही सुद्धा कृतकृत्य होऊन आलेल्या त्या कपींची धिटाई आणि उद्दण्डतापूर्ण चेष्टा यांची त्यांना क्षमा केली पाहिजे. आता लवकर जा आणि तुम्हीच त्या मधुवनाचे रक्षण करा. तसेच त्याचवरोबर हनुमान आदि सर्व वानरांना ताबडतोब इकडे धाडा.॥३०-३१॥
इच्छामि शीघ्रं हनुमत्प्रधाना-
ञ्शाखामृगांस्तान् मृगराजदर्पान् ।
द्रष्टुं कृतार्थान् सह राघवाभ्यां
श्रोतुं च सीताधिगमे प्रयत्‍नम् ॥ ३२ ॥
मी सिंहासमान दर्पयुक्त त्या हनुमान आदि वानरांना शीघ्र भेटू इच्छितो आणि या दोन्ही रघुवंशीय बन्धुंसह मी कृतार्थ होऊन परत आलेल्या वीरांना हे विचारू आणि ऐकू इच्छितो की सीतेच्या प्राप्तीसाठी काय प्रयत्‍न करावा ?' ॥३२॥
प्रीतिस्फीताक्षौ सम्प्रहृष्टौ कुमारौ
दृष्ट्‍वा सिद्धार्थौ वानराणां च राजा ।
अङ्‌गैः प्रहृष्टैः कार्यसिद्धिं विदित्वा
बाह्वोरासन्नामतिमात्रं ननन्द ॥ ३३ ॥
ते दोन्ही राजकुमार पूर्वोक्त समाचारामुळे आपल्याला सफल मनोरथ मानून हर्षाने पुलकित झाले होते. त्यांचे नेत्र प्रसन्नतेने प्रफुल्ल झाले होते. त्यांना याप्रकारे प्रसन्न पाहून आणि आपल्या हर्षोफुल्ल अंगांवरून कार्यसिद्धि हातात आल्याचे जाणून वानरराज सुग्रीव अत्यन्त आनन्दात निमग्न झाले.॥३३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे त्रिषष्टितमः सर्गः ॥ ६३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा त्रेस्ष्टाावा सर्ग पूरा झाला.॥६३॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP