॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय दुसरा ॥
पुलस्त्यांचे आख्यान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


भद्रासनीं दशरथकुमर । बैसलासे करूणाकर ।
दक्षिणे शेषावतार । वामे भरतशत्रुघ्न ॥१॥
कुळगुरू वसिष्ठ सन्मुख । परिवेष्टित प्रधान लोक ।
चर्चा करिती धर्मकर्मादिक । तर्कवितर्क बोलती ॥२॥
एक सांगती पुराण । एक करिता रामकीर्तन ।
एक करिती गायन । होऊन लीन स्वात्मपदीं ॥३॥
एक पढती चतुर्वेद । एक म्हणती प्रबंध ।
एक करिती विवाद । गद्यपद्य शास्त्रांचे ॥४॥
ऐसी सभा प्रसन्नवदन । देखोनि वंदिती बंदिजन ।
एक म्हणती हा रघुनंदन । ब्रह्मीं जीवन मूर्तिमंत ॥५॥
एक म्हणती हा रघुनंदन । अवतार धरावया एक कारण ।
एक म्हाणती धरा भारें पीडोन । श्रीरामा शरण गेली ते ॥६॥
तिचिया कैवारा राघव । सगुण होवोनि सावयव ।
मारोनियां दशग्रीव । बंदींचे देव सोडविले ॥७॥
श्रीराम भक्तजनवत्सल । नानावतारीं खेळे खेळ ।
ब्रह्मादिकां महिमा अकळ । मूर्ख केवळ नेणती ॥ ८॥
ऐसे नानापरींचे वाद । करिती परस्परें विवाद ।
नानामतप्रबंध । छंद भेद शास्त्राचें ॥९॥
युद्धकांड येतां अंतीं । राक्षसांची झाली समाप्ती ।
अवनिजेसी रघुपती । अयोध्यें क्रीडती स्वानंदें ॥१०॥
राज्य करितां श्रीरामचंद्र । कोण नाहीं दुःख दरिद्र ।
स्वप्नीं नाहीं द्वंद्वबाध । सुखस्वानंद सर्वांसी ॥११॥
रजनीचर निर्दाळिले । त्रैलोक्या आनंदें भरिलें ।
हें ऐकोनि ऋषि चालिले । भेटी आले श्रीरामा ॥१२॥

अनसूया व अत्री यांचा महिमा :

अत्रि आला निजशिष्येंसीं । जेणें दुष्काळीं वांचविले ऋषी ।
जयाची राणी अनसूया ऐसी । पतिव्रतांसी वंद्यत्वें ॥१३॥
जे अनसूयेच्या घरीं । ब्रह्मा विष्णु त्रिपुरारी ।
बाळपणें एक संवत्सरीं । स्तनपान करिती त्रिमूर्ति ॥१४॥
ज्या अगस्तीनें समुद्र शोषिला । वातापी इक्वल उदरीं पचिला ।
विंध्याचळाचा गर्व हरिला । तो कुंभज आला भेटीसी ॥१५॥
तप करोनि भूमंडळीं । प्रसन्न केला चंद्रमौळीं ।
गंगा मागोनि महीतळीं । ऋषिमंडळी निवविली ॥१६॥
उभयतट गोदावरी । पंचक्रोशीभीतरीं ।
जड जीव तरती तो परिवारीं । शिष्यांमाझारी गौतम आला ॥१७॥
कण्व भरद्वाज च्यवन । अंगिराजगुरू कौंडिन्य ।
घ्यवया श्रीरामदर्शन । कश्यप आपण स्वयें आला ॥१८॥
जेणें सृष्टी निर्माण केली । ख्याति त्रिभुवनीं मिरवली ।
ज्यांसी झाली गोत्रभुली । ते लाविले स्वगोत्रीं ॥१९॥
दत्तात्रेय महाऋषी । असित जमदग्नि परियेंसी ।
विश्वामित्र शिष्येंसीं । आणिक तापसी पैं आले ॥२०॥
गायत्रीमंत्रबळें जाण । दुजी सृष्टि केली निर्माण ।
ऐसे ऋषि तपोधन । देदीप्यमान तेजस्वी ॥२१॥

श्रीरामांनी ऋषींचा सत्कार करून त्यांना भोजनदानादि दिले :

श्रीराम येवोनि सामोरा । सन्मान केला द्विजवरां ।
अर्घ्य पाद्य षोडशोपचारां । करूनि हाकारा भोजनें केलीं ॥२२॥
समस्तां झालें भोजन । कर्पूरमिश्रित पूगीपानें ।
नानापरींचीं वस्त्रें भूषणें । रघुनंदने दिधलीं ॥२३॥
श्रीरामें सांष्टांग नमन घालून । दोनी कर जोडून ।
मृदु मंजुळ वचनेंकरून । करी प्रार्थन ऋषींचें ॥२४॥
श्रीराम म्हणे ऋषि तुम्ही । न भेटां करितां तप आश्रमीं ।
भाग्यें माझिये आश्रमीं । अनकळत तुम्ही आलेती ॥२५॥
कीं आजि दोषांचा र्‍हास झाला । भाग्योदय पूर्ण बिंबला ।
कीं अकस्मात मघ वोळला । वर्षाव झाला स्वानंदें ॥२६॥
ऐसें आजि झाले स्वामी । कृपा करोनि आलेति तुम्हीं ।
जे न भेटाल कृतश्रमीं । पावन मी आजि झालों ॥२७॥
कवणा कार्याची उत्कंठा असे । ते सिद्धि जाईल अनायासें ।
मी तुमचा अंकित शिष्यवेशें । आज्ञा संतोषें करावी ॥२८॥

अगस्तिकृत श्रीराममहिमावर्णन :

तंव अगस्ति म्हणे श्रीरामा । न वर्णवे तुझा महिमा ।
सृष्टीकरिता जो ब्रह्मा । त्यासिही महिमा न कळे तुझी ॥२९॥
तूं परात्पर निर्गुण परम । तूं साक्षात् पूर्ण ब्रह्म ।
तुज नाहीं रूप नाम । वेदां अगम्य स्वरूप तुझें ॥३०॥
तुज वर्णिता वेदश्रुती । थोंटावल्या मागें किती ।
साही दर्शनें वेदश्रुती । इतरांची युक्ती तेथें न चले ॥३१॥
ऐसा तू निर्गुण निरूपम । तुज ठेविती रूप नाम ।
तुझ्या अंगीं लाविती कर्म । तें ज्ञानाधम म्हणावे ॥३२॥
न कळे त्याचा मनोरथ । न कळे चतुराचें चित्त ।
न कळे कवितार्थ । रवि न देखे ते कवि देखे ॥३३॥
तूं अजन्मा जन्म धरिसी । तू अकर्मा कर्म करिसी ।
तूं अकर्ता सृष्टीसी । उत्पत्ति स्थिती संहार ॥३४॥
तुझाचि आधार तया । यालागीं ज्ञानें म्हणती वायां ।
ऐसें असोनि श्रीरघुराया । थोर आश्चर्या ऐकिलें ॥३५॥
सापत्नमतेच्या वचनीं । सांडिली अयोध्या राजधानी ।
वास केला दंडकारण्यी । राक्षस रणीं निर्दळिले ॥३६॥
शूर्पणखा विटंबून । मारिले त्रिशरा खर दूषण ।
इंद्रजित रावण कुंभकर्ण । सप्रधान मारिले ॥३७॥
अरिबंधु बिभीषण । त्यासी दिधलें लंकाभुवन ।
बंदी ग्रह सुरगण । त्याचें मोचन तुवां केलें ॥३८॥
भार्याबंधूंसहित । अयोध्ये आला रघुनाथ ।
रामराज्य त्रिभुवनात । ऐसें श्रुत आम्हां झालें ॥३९॥
म्हणोनि घ्यावया तुझी भेटी । येथें आलों गा जगजेठी ।
हेचि इच्छा ऋषीचे पोटीं । श्रीराम दृष्टीं पहावा ॥४०॥
अपूर्व एक रघुनाथा । लक्ष्मणे वधिलें इंद्रजिता ।
हें आश्चर्य वाटे चित्ता । या समस्तां ऋषीश्वरां ॥४१॥
राम म्हणे अगस्तिमुनी । रावण कुंभकर्ण दोनी ।
म्यां मारिले समरांगणीं । द्रुमपाणी प्रहस्तादि ॥४२॥
कुमार अक्ष जंबुमाळी । विरुपाक्ष अकंपन बळी ।
कुंभ निकुंभ वीरमंडळी । राक्षस समूळीं मारिले ॥४३॥
आणिक अस्ंख्य राक्षस । नावानिगे रणकर्कश ।
जे तृणवत मानिती काळास । तेही त्रास पावले ॥४४॥
इतुके निशाचर सबळ । त्यांहूनि शक्रजिताचे बळ ।
तुम्हीं वानितसां प्रबळ । मज केवळ कळेना ॥४५॥

श्रीरामांनी इंद्रजिताच्या थोरवीचे कारण ऋषींना विचारले :

शक्रजिताची महाथोरी । तुम्ही वानितसां भारी ।
मज वाटे नवलपरी । तें निर्धारीं सांगावें ॥४६॥
इंद्रजिताचा पराक्रम पूर्ण । त्यासी वर देता कोण ।
हे सांगावें कृपा करुन । मजलागून ते कथा ॥४७॥
कुंभोद्‌भव म्हणे श्रीरामा । ऐल त्याचा प्रतापमहिमा ।
तूं सकळाम्चा आत्मा । कां पुरूषोत्तमा नेणसी ॥४८॥
रावणाची उत्पत्तिस्थिति । तुज सांगेन अवनिजापती ।
वर देता तयाप्रती । तो यथानिगुतीं अवधारीं ॥४९॥

पुलस्त्याची पूर्वकथा :

पूर्वी कृतयुगामाजी जाण । प्रजापतिसुत पुलस्त्य पावन ।
पुण्यशीळ अगाधगुण । धर्मपरायण तिहीं लोकीं ॥५०॥
वेदसंपन्न शास्त्रीं निपुण । सर्वभूतीं भगवद्भजन ।
शांति दया सुशीळपण । तपें दारूण तपस्वी ॥५१॥
पितयाचे धर्मेंकरीं । अपेक्षा नाहीं तिळभरी ।
तंव कोणें एके अवसरीं । मेरूपाठारीं प्रवेशला ॥५२॥
तेथें तृणबिंदूचा आश्रम । अति रमणीय परम ।
भोवतीं उद्यानें गहन । सरोवरीं जीवन अक्षोभ्य ॥५३॥
नाना जातीचें वृक्ष सफळ । नानापुष्पीं सुवासित बहळ ।
मधुर शब्दें हंस कोकिळ । रुंजी अलिकुळ करिताती ॥५४॥
तेथें ऋषि तप करी । भस्म चर्चून शरीरीं ।
रूद्रक्षमाळा कंठीं शिरीं । श्रीराम अंतरीं जप करी ॥५५॥
नेमस्त आहार इंद्रियें निग्रहुनी । वेदाध्ययन अनुदिनीं ।
तंव कोणें एके समयीं त्या वनीं । आल्या मिळोनि राजकन्या ॥५६॥
देखोनि ऋषि आश्रमासी । कन्या क्रीडती आनंदेसीं ।
भोवत्या पाहती तंव ऋषी । तेजोराशी देखिला ॥५७॥
पुलस्त्य म्हणे राजकुमारी । येथोनि तुम्हीं जीवें झडकरी ।
माझी वेदध्वनि पडतां कर्णद्वारीं । तुम्ही गरोदरी ह्वाल सर्व ॥५८॥
ऐसें ऐकोनि राजबाळा । शीघ्र गेलिया त्या वेळा ।
तंव कोण एके काळीं स्वलीळा । तृणबिंदुबाळा पाहूं आली ॥५९॥

पुलस्तीचा वेदध्वनी कानी पडल्यामुळे तृणबिंदूची कन्या गर्भवती झाली :

सखिया न दिसती नयनीं । ऋषीची वेदध्वनि पडली कानीं ।
तेणें झाली श्वेतवर्णी । वपु तत्क्षणीं पालटली ॥६०॥
उदरीं गर्भ संभवला तियेसीं । मग आली जनकभुवनासी ।
तृणबिंदु म्हणे कुमारीसी । शुभ्रता वपूसी कां आली ॥६१॥
चिन्ह तुझें पालटलें । आत्मजे कोठें काय झालें ।
कोण्या स्थळा गमन केलें । ते शीघ्रकाळें सांग पां ॥६२॥
येरी म्हणे अहो जी ताता । मज सखिया शोधन करितां ।
वना गेलें जी शिघ्रता । तेथें ऋषि पढत होता वेदश्रुती ॥६३॥
मग कन्या धरोनि निजकरीं । तृणबिंदु आला त्या आश्रमामाझारी ।
कर जोडूनि विनंती करी । म्हणे अवधारीं मुनिराया ॥६४॥
माझी कन्या या आश्रमाप्रती । आली सखया शोधनार्थी ।
तिसी ऐसी झाली स्थिती । काय गती हे न कळे ॥ ६५ ॥
येरू म्हणे अगा हे ऋषी । हे आली गेली श्रुत नाहीं आम्हांसी ।
कवण जाणे या अर्थासी । हें आपणासी नेणवे ॥६६॥
मग तो ऋषि विचारी ज्ञानीं । म्हणे पूर्वी शाप वदला होता मुनी ।
कन्यामात्र माझ्या वेदध्वनी । ते गुर्विणी होईल ॥।६७॥

ती कन्या पुलस्तीला देण्याचा बापाचा मानस :

तंव तृणबिंदु विचारी चित्तीं । हे अर्पावी ऋषीप्रती ।
ऐसी विचारोनि युक्ती । ऋषीप्रती वदता झाला ॥६८॥
अहो जी पुलस्ती महामुनी । विनंती करितों सलगी करोनी ।
हे कन्या अंगीकारावी सेवेलागून । दास्य अनुदिनीं करील ॥६९॥
पुलस्ती म्हणे ऋषिवर्या । आम्हां तापसा कोण आर्या ।
काय सेवा आचरावया । इसी कायसा देतोसी ॥७०॥
तृणबिंदु म्हणे अकल्पित आलें । त्यासी अंगीकारिती साधु भले ।
कल्पिलें सहसा न फळे । इतें भावबळें अंगीकारिजे ॥७१॥

पुलस्तीचा होकार :

पुलस्ती म्हणे बरवें आतां । नुल्लंघी तुझिया वचनार्था ।
येरें चरणीं ठेविला माथा । कन्या तत्वतां देता झाला ॥७२॥
शुभ दिन पाहूनि लग्न । तृणबिंदुनें केलें कन्यादान ।
पुढें दोघें सुखसंपन्न । स्वाश्रमीं जाण विचरती ॥७३॥

पतिसेवेने त्या कन्येवर प्रसन्न होऊन ऋषींचा पुत्रप्राप्तीचा वर तिला मिळाला :

भ्रताराची सेवा करी । त्यासी मानी आत्मसाक्षात्कारी ।
भ्रतार सांडून तिळभरी । दुरी सुंदरीचे न वचे ॥७४॥
तिची देखोनि उत्कृष्ट सेवा । संतोष झाला ऋषीच्या जीवा ।
म्हणे तुज पुत्र होईल बरवा । सर्वभावा अनुकूल ॥७५॥
मजसमान होतील गुण । मजसमान तपोधन ।
मजसमान देदीप्यमान । तप अनुष्ठान करील ॥७६॥
पुलस्तीपासून जो निर्माण । तया नांव पौलस्ती जाण ।
ऐसें ऐकोनि प्रीतिवचन । आनंदें मन निवालें ॥७७॥
त्याउपरी त्या अबळेसी । प्रसूति झाली सकाळेंसीं ।
पुत्रमुख पाहे ऋषी । विधिकर्मांसी पें केलें ॥७८॥
पूर्ण जातक वर्तविले । पौलस्ती नांव ठेविलें ।
वेद श्रवणीं पडिलें । विश्रवा झाले दुजें नाम ॥७९॥
यालागीं पुलस्तीचा पौलस्ती । विश्रवा त्यासी म्हणती ।
वाल्मीकि रामायणाप्रती । कथा संतीं पहावी ॥८०॥
मूळीं वाल्मीकि कवि कर्ता । तयाचा आधार कवित्वा समस्तां ।
यालागीं रामकथा वदतां । संदेह सर्वथा न धरावा ॥८१॥
वाल्मीकीचें वाग्रत्न । ते हे कथा रामायण ।
सज्जनांचें अंतःकरण । भावी पूर्ण भावार्थ ॥८२॥
एका जनार्दना शरण । म्हणता गेले एकपण ।
अच्युत चित्तिं जनार्दन । तो जन वन व्यापूनि असे ॥८३॥
अच्युत नाम जयाचे वाक्पुटीं । तयासीं विषयासी पडे तुटी ।
संसाराचें धरणें उठी । परब्रह्मभेटी पैं होय ॥८४॥
अच्युत नाम जयाचे वाचे । तया भय नाहीं संसाराचें ।
यश लाहे तोचि साचे । कळिकाळ त्याचे तोडरीं ॥८५॥
एका जनार्दनीं भेटी । द्वंद्वदुःखा पडली तुटी ।
संसाराचे धरणें उठी । स्वानंदपुष्टी पूर्णत्वें ॥८६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडें एकाकारटीकायां
पुलस्त्याख्यानं पौलस्त्यजन्मकथनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥ ओंव्या ॥८६॥

GO TOP