[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ पञ्चत्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सागरानुपशोभामवलोकयतो रावणस्य पुनर्मारीचस्य पार्श्वे गमनम् - रावणाचे समुद्रतटवर्ती प्रांताची शोभा पहात पुनः मारीचा जवळ जाणे -
ततः शूर्पणखावाक्यं तच्छ्रुत्वा रोमहर्षणम् ।
सचिवानभ्यनुज्ञाय कार्यं बुध्वा जगाम ह ॥ १ ॥
शूर्पणखेनी सांगितलेल्या या रोमांचकारी गोष्टी एकून रावणाने मंन्त्र्यांच्या सल्ल्याने आपल्या कर्तव्याचा निश्चय करून तो तेथून निघून गेला. ॥१॥
तत् कार्यमनुगम्यान्तर्यथावदुपलभ्य च ।
दोषाणां च गुणानां च सम्प्रधार्य बलाबलम् ॥ २ ॥

इति कर्तव्यमित्येव कृत्वा निश्चयमात्मनः ।
स्थिरबुद्धिस्ततो रम्यां यानशालां जगाम ह ॥ ३ ॥
त्याने प्रथम सीताहरणरूपी कार्यावर मनातल्या मनात विचार केला. नंतर त्याच्या दोष आणि गुणांचे यथावत ज्ञान प्राप्त करून बळाबळाचा निश्चय केला. शेवटी हे पक्के ठरले की हे काम केलेच पाहिजे. ज्यावेळी या गोष्टीवर त्याची बुद्धि स्थिर झाली त्यावेळी तो रमणीय रथशाळेमध्ये गेला. ॥२-३॥
यानशालां ततो गत्वा प्रच्छन्नं राक्षसाधिपः ।
सूतं सञ्चोदयामास रथः संयुज्यतामिति ॥ ४ ॥
गुप्तरूपाने रथशाळेमध्ये जाऊन राक्षसराज रावणाने आपल्या सारथ्याला आज्ञा दिली की माझा रथ जोडून तयार कर. ॥४॥
एवमुक्तः क्षणेनैव सारथिर्लघुविक्रमः ।
रथं संयोजयामास तस्याभिमतमुत्तमम् ॥ ५ ॥
सारथी शीघ्रतापूर्वक कार्य करण्यात कुशल होता. रावणाची उपर्युक्त आज्ञा मिळताच त्याने एकाच क्षणात त्याच्या मनाच्या अनुकूल उत्तम रथ जोडून तयार केला. ॥५॥
कामगं रथमास्थाय काञ्चनं रत्‍नभूषितम् ।
पिशाचवदनैर्युक्तं खरैः कनकभूषणैः ॥ ६ ॥
तो रथ इच्छानुसार चालणारा तसेच सुवर्णमय होता. त्याला रत्‍नांनी विभूषित केले गेले होते. त्यातही सोन्याच्या साजा-बाजांनी सजविलेली गाढवे जुंपलेली होती ज्यांची मुखे पिशाच्चासारखी होती. रावण त्यावर आरूढ होऊन निघाला. ॥६॥
मेघप्रतिमनादेन स तेन धनदानुजः ।
राक्षसाधिपतिः श्रीमान् ययौ नदनदीपतिम् ॥ ७ ॥
तो रथ मेघ-गर्जने समान गंभीर घर-घर ध्वनि करीत चालत होता. त्याच्या द्वारा तो कुबेराचा लहान भाऊ श्रीमान राक्षसराज रावण समुद्राच्या तटावर गेला. ॥७॥
स श्वेतवालव्यजनः श्वेतच्छत्रो दशाननः ।
स्निग्धवैदूर्यसंकाशस्तप्तकाञ्चनभूषणः ॥ ८ ॥

दशग्रीवो विंशतिभुजो दर्शनीयपरिच्छदः ।
त्रिदशारिर्मुनीन्द्रघ्नो दशशीर्ष इवाद्रिराट् ॥ ९ ॥
त्यावेळी त्याच्यासाठी पांढर्‍या चवर्‍याने वारा घातला जात होता. मस्तकावर श्वेत छत्र ताणलेले होते. त्याची अंगकांति स्निग्ध वैडूर्यमण्याप्रमाणे निळी अथवा काळी होती तो चोख आभूषणांनी विभूषित होता. त्याला दहा मुखे, दहा कंठ आणि वीस भुजा होत्या. त्याची वस्त्रे, आभूषणे आदि उपकरणेही प्रेक्षणीय होती. देवतांचा शत्रु आणि मुनीश्वरांचा हत्यारा तो निशाचर दहा शिखरांच्या पर्वतराजाप्रमाणे प्रतीत होत होता. ॥८-९॥
कामगं रथमास्थाय शुशुभे राक्षसाधिपः ।
विद्युन्मण्डलवान् मेघः सबलाक इवाम्बरे ॥ १० ॥
इच्छानुसार जाणार्‍या त्या रथावर आरूढ होऊन राक्षसराज रावण आकाशात विद्युतमंडळाने घेरलेल्या तसेच बगळ्यांच्या पंक्तिंनी सुशोभित मेघाप्रमाणे शोभून दिसत होता. ॥१०॥
सशैलसागरानूपं वीर्यवानवलोकयन् ।
नानापुष्पफलैर्वृक्षैरनुकीर्णं सहस्रशः ॥ ११ ॥

शीतमङ्‌गलतोयाभिः पद्मिनीभिः समन्ततः ।
विशालैराश्रमपदैर्वेदिमद्‌भिरलंकृतम् ॥ १२ ॥
पराक्रमी रावण पर्वतयुक्त समुद्राच्या तटावर पोहोचून त्याची शोभा पाहू लागला. सागराचा तो किनारा नाना प्रकारच्या फळे-फुले असलेल्या हजारो वृक्षांनी व्याप्त होता. चोहो बाजूस मंगलकारी शीतलजलांनी भरलेल्या पुष्करिणी आणि वेदिकांनी मण्डीत विशाल आश्रम त्या सिंधुतटाची शोभा वाढवीत होते. ॥११-१२॥
कदल्यटविसंशोभं नारिकेलोपशोभितम् ।
सालैस्तालैस्तमालैश्च तरुभिश्च सुपुष्पितैः ॥ १३ ॥
कोठे कर्दळीचे वने तर कोठे नारळीच्या बागा शोभून दिसत होत्या. साल, ताल, तमाळ तसेच सुंदर फुलांनी बहरलेले दुसरे इतर वृक्ष त्या तटप्रान्ताला अलंकृत करीत होते. ॥१३॥
अत्यन्तनियताहारैः शोभितं परमर्षिभिः ।
नागैः सुपर्णैर्गन्धर्वैः किन्नरैश्च सहस्रशः ॥ १४ ॥
अत्यंत नियमित आहार करणारे मोठ मोठे महर्षि, नाग, सुपर्ण (गरूड), गंधर्व तसेच हजारो किन्नरांनी ही त्या स्थानाची फारच शोभा होत होती. ॥१४॥
जितकामैश्च सिद्धैश्च चारणैश्चोपशोभितम् ।
अजैर्वैखानसैर्माषैर्वालखिल्यैर्मरीचिपैः ॥ १५ ॥
कामविजयी सिद्ध, चारण, ब्रह्मदेवांचे पुत्र, वानप्रस्थ, माष गोत्रांत उत्पन्न झालेले मुनि, वालाखिल्य महात्मे तसेच केवळ सूर्य-किरणांचे पान करणार्‍या तपस्वी जनांनी तो सागराचा तटप्रांत सुशोभित होत होता. ॥१५॥
दिव्याभरणमाल्याभिर्दिव्यरूपाभिरावृतम् ।
क्रीडारतविधिज्ञाभिरप्सरोभिः सहस्रशः ॥ १६ ॥

सेवितं देवपत्‍नीभिः श्रीमतीभिरुपासितम् ।
देवदानवसङ्‌घैश्च चरितं त्वमृताशिभिः ॥ १७ ॥
दिव्य आभूषणे आणि पुष्पमाला धारण करणार्‍या तसेच क्रीडा-विहाराचा विधि जाणणार्‍या हजारो दिव्यरूप अप्सरा तेथे सर्वत्र विचरत होत्या. कित्येक शोभाशाली देवांगना त्या सिंधुतटाचे सेवन करीत आसपास बसलेल्या होत्या. देवता आणि दानवांचे समूह तसेच अमृतभोगी देवगण तेथे विचरत होते. ॥१६-१७॥
हंसक्रौञ्चप्लवाकीर्णं सारसैः संप्रसादितम् ।
वैदूर्यप्रस्तरं स्निग्धं सान्द्रं सागरतेजसा ॥ १८ ॥
सिंधुचा तो तट समुद्राच्या तेजाने त्याच्या तरंगमालांच्या स्पर्शाने स्निग्ध आणि शीतल होता. हंस, क्रौंच तसेच बेडूक तेथे सर्वत्र पसरलेले होते आणि सारस त्याची शोभा वाढवीत होते. त्या तटावर वैडूर्यमण्यासदृश्य श्याम रंगाचे प्रस्तर द्रुष्टीस पडत होते. ॥१८॥
पाण्डुराणि विशालानि दिव्यमाल्ययुतानि च ।
तूर्यगीताभिजुष्टानि विमानानि समन्ततः ॥ १९ ॥

तपसा जितलोकानां कामगान्यभिसम्पतन् ।
गन्धर्वाप्सरसश्चैव ददर्श धनदानुजः ॥ २० ॥
आकाशमार्गाने यात्रा करीत कुबेराचा लहान भाऊ रावण याने रस्त्यात सर्वत्र बरीचशी श्वेतवर्णाची विमाने, गंधर्व तसेच अप्सरांना पाहिले. ती इच्छेनुसार चालणारी विशाल विमाने त्या पुण्यात्म्यांची होती, ज्यांनी तपस्येने पुण्यलोकांवर विजय प्राप्त केला होता. त्या विमानांना दिव्य पुष्पांनी सजविले गेले होते आणि त्यांच्यांतून गीत-वाद्यांचा ध्वनी प्रकट होत होता. ॥१९-२०॥
निर्यासरसमूलानां चन्दनानां सहस्रशः ।
वनानि पश्यन् सौम्यानि घ्राणतृप्तिकराणि च ॥ २१ ॥
पुढे गेल्यावर ज्यांच्या मूळातून (गोंद) चीक बाहेर पडत होता अशी चंदनाची हजारो वने त्याने पाहिली, जी फारच सुंदर आणि आपल्या सुगंधाने नासिकेला तृप्त करणारी होती. ॥२१॥
अगरूणां च मुख्यानां वनान्युपवनानि च ।
तक्कोलानां च जात्यानां फलिनां च सुगन्धिनाम् ॥ २२ ॥

पुष्पाणि च तमालस्य गुल्मानि मरिचस्य च ।
मुक्तानां च समूहानि शुष्यमाणानि तीरतः ॥ २३ ॥

शैलानि प्रवरांश्चैव प्रवालनिचयांस्तथा ।
काञ्चनानि च शृङ्‌गाणि राजतानि तथैव च ॥ २४ ॥

प्रस्रवाणि मनोज्ञानि प्रसन्नान्यद्‌भुतानि च ।
धनधान्योपपन्नानि स्त्रीरत्‍नैरावृतानि च ॥ २५ ॥

हस्त्यश्वरथगाढानि नगराणि विलोकयन् ।
काही श्रेष्ठ अगुरूची वने होती, काही उत्तम जातीची सुगंधित फळे असणार्‍या तक्कोलो (वृक्षविशेष) ची उपवने होती. कोठे तमालाची फुले फुललेली होती. काही ठिकाणी गोल मिरीची झाडे शोभून दिसत होती आणि काही ठिकाणी समुद्राच्या तटावर मोत्यांचे ढीगच्या ढीग वाळत होते. कुठे श्रेष्ठ पर्वतमाला, कुठे प्रवाळाच्या राशी, कुठे सोन्या-चांदीची शिखरे तसेच कोठे सुंदर, अदभुत आणि स्वच्छ पाण्याचे निर्झर दिसून येत होते. काही ठिकाणी धन-धान्यांनी संपन्न, स्त्री रत्‍नांनी भरलेले तसेच हत्ती, घोडे आणि रथांनी व्याप्त नगर दृष्टिगोचर होत होते. हे सर्व पहात पहात रावण पुढे गेला. ॥२२-२५ १/२॥
तं समं सर्वतः स्निग्धं मृदुसंस्पर्शमारुतम् ॥ २६ ॥

अनूपे सिन्धुराजस्य ददर्श त्रिदिवोपमम् ।
नंतर त्याने सिंधुराजाच्या तटावर असे एक स्थान पाहिले जे स्वर्गाप्रमाणे मनोहर, सर्व बाजूनी समतल आणि स्निग्ध होते. तेथे मंद मंद वारा वहात होता ज्याचा स्पर्श फारच कोमळ भासत होता. ॥२६ १/२॥
तत्रापश्यत् स मेघाभं न्यग्रोधं मुनिभिर्वृतम् ॥ २७ ॥

समन्ताद् यस्य ताः शाखाः शतयोजनमायताः ।
तेथे सागरतटावर एक वटवृक्ष दिसून आला, जो आपल्या घनदाट छायेमुळे मेघांच्या समूहासमान प्रतीत होत होता. त्याच्या खाली चोहोबाजूस मुनि निवास करीत होते. त्या वृक्षाच्या सुप्रसिद्ध शाखा चारी बाजूस शंभर योजनांपर्यंत पसरलेल्या होत्या. ॥२७ १/२ ॥
यस्य हस्तिनमादाय महाकायं च कच्छपम् ॥ २८ ॥

भक्षार्थं गरुडः शाखामाजगाम महाबलः ।
हा तोच वृक्ष होता ज्याच्या शाखेवर कुण्या एका समयी महाबली गरूड एक विशालकाय हत्ती आणि कासवास घेऊन त्यांना खाण्यासाठी येऊन बसले होते. ॥२८ १/२॥
तस्य तां सहसा शाखां भारेण पतगोत्तमः ॥ २९ ॥

सुपर्णः पर्णबहुलां बभञ्जाथ महाबलः ।
पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ महबली गरूडांनी बहुसंख्य पानांनी भरलेल्या त्या शाखेला एकाएकी आपल्या भाराने मोडून टाकले होते. ॥२९ १/२॥
तत्र वैखानसा माषा वालखिल्या मरीचिपाः ॥ ३० ॥

अजा बभूवुर्धूम्राश्च संगताः परमर्षयः ।
त्या शाखेच्या खाली बरेचसे वैखानस, माष, वालाखिल्य, मरीचिप (सूर्य किरणांचे पान करणारे) ब्रह्मपुत्र आणि धूम्रप संज्ञा असणारे महर्षि एकत्र राहात होते. ॥३० १/२॥
तेषां दयार्थं गरुडस्तां शाखां शतयोजनाम् ॥ ३१ ॥

भग्नामादाय वेगेन तौ चौभौ गजकच्छपौ ।
एकपादेन धर्मात्मा भक्षयित्वा तदामिषम् ॥ ३२ ॥

निषादविषयं हत्वा शाखया पतगोत्तमः ।
प्रहर्षमतुलं लेभे मोक्षयित्वा महामुनीन् ॥ ३३ ॥
त्यांच्यावर दया करून त्यांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ धर्मात्मा गरूडांनी ती तुटलेली शंभर योजन लांबीची शाखा आणि ते दोन्ही हत्ती आणि कासव यांना वेगपूर्वक एकाच पंजात पकडले तसेच आकाशातच त्या दोन्ही जंतूंचे मांस खाऊन फेकून दिलेल्या त्या फांदीच्या द्वारे निषाद देशाचा संहार करून टाकला. त्या समयी पूर्वोक्त महामुनिंना मृत्युच्या संकटातून वाचविल्याने गरूडाला अनुपम हर्ष झाला. ॥३१-३३॥
स तु तेन प्रहर्षेण द्विगुणीकृतविक्रमः ।
अमृतानयनार्थं वै चकार मतिमान् मतिम् ॥ ३४ ॥
त्या महान हर्षानी गरूडाचा पराक्रम दुप्पट झाला आणि त्यांनी अमृत घेऊन येण्याचा पक्का निश्चय केला. ॥३४॥
अयोजालानि निर्मथ्य भित्त्वा रत्‍नगृहं वरम् ।
महेन्द्रभवनाद् गुप्तमाजहारामृतं ततः ॥ ३५ ॥
तत्पश्चात इंद्रलोकात जाऊन त्यांनी इंद्रभवनाच्या लोखंडाच्या बनविलेल्या जाळ्या तोडून टाकल्या. नंतर रत्‍ननिर्मित श्रेष्ठ भवनास नष्ट भ्रष्ट करून तेथे लपवून ठेवलेल्या अमृतास ते हरण करून महेन्द्रभवनांतून घेऊन आले. ॥३५॥
तं महर्षिगणैर्जुष्टं सुपर्णकृतलक्षणम् ।
नाम्ना सुभद्रं न्यग्रोधं ददर्श धनदानुजः ॥ ३६ ॥
गरूडाच्या द्वारा तोडल्या गेलेल्या फांदीचे ते चिन्ह वटवृक्षावर त्या समयीही विद्यमान होते. त्या वृक्षाचे नाव होते सुभद्रवट. बरेचसे महर्षि त्या वृक्षाच्या छायेत निवास करीत होते. कुबेराचा लहान भाऊ रावण याने त्या वटवृक्षास पाहिले. ॥३६॥
तं तु गत्वा परं पारं समुद्रस्य नदीपतेः ।
ददर्शाश्रममेकान्ते रम्ये पुण्ये वनान्तरे ॥ ३७ ॥
नद्यांचे स्वामी समुद्र यांच्या दुसर्‍या तटावर जाऊन त्याने एका रमणीय वनामध्ये पवित्र तसेच एकांत स्थानी एका आश्रमाचे दर्शन केले. ॥३७॥
तत्र कृष्णाजिनधरं जटामण्डलधारिणम् ।
ददर्श नियताहारं मारीचं नाम राक्षसम् ॥ ३८ ॥
तेथे शरीरावर काळे मृगचर्म आणि मस्तकावर जटासमूह धारण करून नियमित आहार करीत मारीच नामक राक्षस निवास करीत होता, रावण तेथे जाऊन त्यास भेटला. ॥३८॥
स रावणः समागम्य विधिवत् तेन रक्षसा ।
मारीचेनार्चितो राजा सर्वकामैरमानुषैः ॥ ३९ ॥
भेटल्यावर त्या राक्षस मारीचाने सर्व प्रकारचे अलौकिक कमनीय पदार्थ अर्पण करून राजा रावणाचा विधिपूर्वक सत्कार केला. ॥३९॥
तं स्वयं पूजयित्वा तु भोजनेनोदकेन च ।
अर्थोपहितया वाचा मारीचो वाक्यमब्रवीत् ॥ ४० ॥
अन्न आणि जलाने स्वतः त्याचा पूर्ण सत्कार करून मारीचाने प्रयोजनाची गोष्ट विचारण्यासाठी त्याला या प्रमाणे म्हटले- ॥४०॥
कच्चित्ते कुशलं राजँल्लङ्‌कायां राक्षसेश्वर ।
केनार्थेन पुनस्त्वं वै तूर्णमेव इहागतः ॥ ४१ ॥
राजन ! तुमच्या लंकेत कुशल तर आहे ना ? राक्षसराज ! तुम्ही कुठल्या कामासाठी पुनः इतक्या लवकर येथे आला आहांत ? ॥४१॥
एवमुक्तो महातेजा मारीचेन स रावणः ।
तं तु पश्चादिदं वाक्यमब्रवीद् वाक्यकोविदः ॥ ४२ ॥
मारीचाने असे विचारल्यावर वाक्यकोविद महातेजस्वी रावणाने त्यास याप्रकारे सांगितले - ॥४२॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे पञ्चत्रिंशः सर्गः ॥ ३५ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा पस्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP