श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। अष्टषष्टीतमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जनकस्य संदेशमाकर्ण्य मन्त्रिभिः सहितस्य राज्ञो दशरथस्य मिथिलां गन्तुमुद्यमः - राजा जनकाचा संदेश मिळून मंत्र्यांसहित महाराज दशरथांचे मिथिलेस जाण्यासाठी उद्यत होणे -
जनकेन समादिष्टा दूतास्ते क्लान्तवाहनाः ।
त्रिरात्रमुषिता मार्गे तेऽयोध्यां प्राविशन् पुरीम् ॥ १ ॥
राजा जनकाची आज्ञा मिळताच त्यांच्या दूतांनी अयोध्येसाठी प्रस्थान केले. रस्त्यात वाहने थकल्यामुळे तीन रात्री विश्राम करून चौथे दिवशी ते अयोध्यापुरीत पोहोंचले. ॥ १ ॥
ते राजवचनाद् गत्वा राजवेश्म प्रवेशिताः ।
ददृशुर्देवसङ्‍काशं वृद्धं दशरथं नृपम् ॥ २ ॥
राजाच्या आज्ञेने त्यांचा राजमहालात प्रवेश झाला. तेथे जाऊन त्यांनी देवतुल्य तेजस्वी वृद्ध दशरथ महाराजांचे दर्शन घेतले. ॥ २ ॥
बद्धाञ्जलिपुटाः सर्वे दूता विगतसाध्वसाः ।
राजानं प्रश्रितं वाक्यमब्रुवन् मधुराक्षरम् ॥ ३ ॥

मैथिलो जनको राजा साग्निहोत्रपुरस्कृतः ।
मुहुर्मुहुर्मधुरया स्नेहसंरक्तया गिरा ॥ ४ ॥

कुशलं चाव्ययं चैव सोपाध्यायपुरोहितम् ।
जनकस्त्वां महाराज पृच्छते सपुरःसरम् ॥ ५ ॥
त्या सर्व दूतांनी दोन्ही हात जोडून, निर्भय होऊन राजाला मधुर वाणीत ही विनययुक्त गोष्ट सांगितली - "महाराज ! मिथिलापति राजा जनकांनी अग्निहोत्राच्या अग्निला समोर ठेऊन स्नेहयुक्त मधुर वाणीने सेवकांसहित आपले आणि आपले उपाध्याय व पुरोहितांचे वारंवार कुशल मंगल विचारले आहे. ॥ ३-५ ॥
पृष्ट्‍वा कुशलमव्यग्रं वैदेहो मिथिलाधिपः ।
कौशिकानुमते वाक्यं भवन्तमिदमब्रवीत् ॥ ६ ॥
या प्रकारे व्यग्रतारहित कुशल विचारून मिथिलापति विदेहराजांनी महर्षि विश्वामित्रांच्या आज्ञेने आपल्याला हा संदेश दिला आहे. ॥ ६ ॥
पूर्वं प्रतिज्ञा विदिता वीर्यशुल्का ममात्मजा ।
राजानश्च कृतामर्षा निर्वीर्या विमुखीकृताः ॥ ७ ॥
राजन् ! आपल्याला माझ्या पूर्व प्रतिज्ञेची स्थिती माहीत असेलच. मी आपल्या कन्येच्या विवाहासाठी पराक्रमाचे शुल्क नियत केले होते. ते ऐकून कित्येक राजे अमर्षास वश होऊन आले, परंतु येथे पराक्रमहीन सिद्ध झाले आणि विमुख होऊन आपल्या स्थानी परत गेले. ॥ ७ ॥
सेयं मम सुता राजन् विश्वामित्रपुरस्कृतैः ।
यदृच्छयागतै राजन् निर्जिता तव पुत्रकैः ॥ ८ ॥
नरेश्वर ! माझ्या या कन्येला विश्वामित्रांच्या बरोबर अकस्मात् फिरत आलेला आपला पुत्र श्रीराम याने आपल्या पराक्रमाने जिंकले आहे. ॥ ८ ॥
तच्च रत्‍नं धनुर्दिव्यं मध्ये भग्नं महात्मना ।
रामेण हि महाबाहो महत्यां जनसंसदि ॥ ९ ॥
महाबाहो ! महात्मा श्रीरामाने महान् जनसमुदायासमोर येथे ठेवलेले रत्‍न स्वरूप दिव्य धनुष्य मध्यभागी भंग केले. ॥ ९ ॥
अस्मै देया मया सीता वीर्यशुल्का महात्मने ।
प्रतिज्ञां तर्तुमिच्छामि तदनुज्ञातुमर्हसि ॥ १० ॥
म्हणून मी या महात्मा श्रीरामचंद्रास आपली वीर्यशुल्का कन्या सीता प्रदान करीत आहे. असे करून मी आपल्या प्रतिज्ञेतून मुक्त होऊ इच्छितो. आपण यासाठी मला आज्ञा देण्याची कृपा करावी. ॥ १० ॥
सोपाध्यायो महाराज पुरोहितपुरस्कृतः ।
शीघ्रमागच्छ भद्रं ते द्रष्टुमर्हसि राघवौ ॥ ११ ॥
महाराज ! आपण आपल्या गुरु आणि पुरोहितांसह येथे शीघ्र यावे आणि आपल्या दोन्ही पुत्रांना (रामलक्ष्मणांना) पहावे. आपले कल्याण होवो. ॥ ११ ॥
प्रतिज्ञां च मम राजेन्द्र निर्वर्तयितुमर्हसि ।
पुत्रयोरुभयोरेव प्रीतिं त्वमुपलप्स्यसे ॥ १२ ॥
राजेंद्र ! येथे येऊन आपण मला माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा अवसर द्यावा. येथे येण्याने आपल्याला आपल्या दोन्ही पुत्रांच्या विवाहजनित आनन्दाची प्राप्ति होईल. ॥ १२ ॥
एवं विदेहाधिपतिर्मधुरं वाक्यमब्रवीत् ।
विश्वामित्राभ्यनुज्ञातः शतानन्दमते स्थितः ॥ १३ ॥
राजन् ! या प्रकारे विदेहराजाने आपल्या चरणी हा मधुर संदेश पाठवला होता. यासाठी त्यांना विश्वामित्रांची आज्ञा आणि शतानन्दांची सम्मतीही प्राप्त झाली होती. ॥ १३ ॥
दूतवाक्यं तु तच्छ्रुत्वा राजा परमहर्षितः ।
वसिष्ठं वामदेवं च मन्त्रिणश्चैवमब्रवीत् ॥ १४ ॥
संदेशवाहक मंत्र्यांचे हे वचन ऐकून राजा दशरथ फारच प्रसन्न झाले. त्यांनी महर्षि वसिष्ठ, वामदेव तथा अन्य मंत्र्यांना म्हटले - ॥ १४ ॥
गुप्तः कुशिकपुत्रेण कौसल्यानन्दवर्धनः ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा विदेहेषु वसत्यसौ ॥ १५ ॥
कुशिकनन्दन विश्वामित्रांकडून सुरक्षित होऊन कौसल्यानन्दन वर्धन श्रीराम आपला लहान भाऊ लक्ष्मण यांच्यासह विदेह देशात निवास करीत आहेत. ॥ १५ ॥
दृष्टवीर्यस्तु काकुत्स्थो जनकेन महात्मना ।
सम्प्रदानं सुतायास्तु राघवे कर्त्तुमिच्छति ॥ १६ ॥
तेथे महात्मा राजा जनकांनी काकुत्स्थ श्रीरामाचा पराक्रम प्रत्यक्ष पाहिला आहे. म्हणून ते आपली कन्या सीता हिचा विवाह रघुकुलरत्‍न रामाबरोबर करू इच्छितात. ॥ १६ ॥
यदि वो रोचते वृत्तं जनकस्य महात्मनः ।
पुरीं गच्छामहे शीघ्रं मा भूत् कालस्य पर्ययः ॥ १७ ॥
जर आपणा सर्वांची रुचि आणि सम्मति असेल तर आपण सर्व शीघ्रच महात्मा जनकांच्या मिथिला पुरीला चलावे. यात विलंब होऊ नये. ॥ १७ ॥
मन्त्रिणो बाढमित्याहुः सह सर्वैर्महर्षिभिः ।
सुप्रीतश्चाब्रवीद् राजा श्वो यात्रेति च मन्त्रिणः ॥ १८ ॥

मन्त्रिणस्तु नरेन्द्रस्य रात्रिं परमसत्कृताः ।
ऊचुः प्रमुदिताः सर्वे गुणैः सर्वैः समन्विताः ॥ १९ ॥
हे ऐकून समस्त महर्षिंसहित मंत्र्यांनी ’अति उत्तम’ असे म्हणून एका सुरात चलण्यासाठी सम्मति दिली. राजे फार प्रसन्न झाले आणि मंत्र्यांना म्हणाले - उद्या सकाळीच यात्रेला आरंभ केला पाहिजे. ॥ १८-१९ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे अष्टषष्टितमः सर्गः ॥ ६८ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा अडुसष्टावा सर्ग समाप्त झाला. ॥ ६८ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP