श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ पञ्चाशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
इन्द्रे तदीये वज्रादौ च वैष्णवतेजसः प्रवेश इन्द्रवज्रेण वृत्रस्य वधो ब्रह्महत्ययाऽऽक्रान्तस्य इन्द्रस्य तमोमयप्रदेशे गमनम् -
भगवान्‌ विष्णुंच्या तेजाचा इंद्र आणि वज्रात प्रवेश, इंद्राच्या वज्राने वृत्रासुराचा वध तसेच ब्रह्महत्याग्रस्त इंद्राचे अंधःकारमय प्रदेशात जाणे -
लक्ष्मणस्य तु तद् वाक्यं श्रुत्वा शत्रुनिबर्हणः ।
वृत्रघातमशेषेण कथयेत्याह सुव्रत ॥ १ ॥
लक्ष्मणाचे हे कथन ऐकून शत्रुंचा संहार करणार्‍या श्रीरामांनी म्हटले - सुव्रत सौमित्रा ! वृत्रासुराच्या वधाची संपूर्ण कथा तू ऐकव. ॥१॥
राघवेणैवमुक्तस्तु सुमित्रानन्दवर्धनः ।
भूय एव कथां दिव्यां कथयामास सुव्रतः ॥ २ ॥
राघवांनी या प्रकारे आदेश दिल्यावर सुव्रत सुमित्रानंदवर्धन लक्ष्मणांनी पुन्हा ती दिव्य कथा ऐकविण्यास आरंभ केला. ॥२॥
सहस्राक्षवचः श्रुत्वा सर्वेषां च दिवौकसाम् ।
विष्णुर्देवानुवाचेदं सर्वान् इन्द्रपुरोगमान् ॥ ३ ॥
प्रभो ! सहस्त्र नेत्रधारी इंद्र तसेच संपूर्ण देवतांची ती प्रार्थना ऐकल्यावर भगवान्‌ विष्णुनी इंद्र आदि सर्व देवतांना याप्रकारे म्हटले - ॥३॥
पूर्वं सौहृदबद्धोऽस्मि वृत्रस्य ह महात्मनः ।
तेन युष्मत्प्रियार्थं हि नाहं हन्मि महासुरम् ॥ ४ ॥
देवतांनो ! तुमच्या या प्रार्थनेपूर्वीच मी महामना वृत्रासुराच्या स्नेह बंधनात बांधला गेलो आहे, म्हणून तुमचे प्रिय करण्यासाठी मी त्या महान्‌ असुराचा वध करणार नाही. ॥४॥
अवश्यं करणीयं च भवतां सुखमुत्तमम् ।
तस्माद् उपायमाख्यास्ये सहस्राक्षो वधिष्यति ॥ ५ ॥
परंतु तुम्हा सर्वांच्या उत्तम सुखाची व्यवस्था करणे माझे आवश्यक कर्तव्य आहे, म्हणून मी असा उपाय सांगेन की ज्यायोगे इंद्र त्याचा वध करू शकतील. ॥५॥
त्रिधाभूतं करिष्यामि ह्यात्मानं सुरसत्तमाः ।
तेन वृत्रं सहस्राक्षो वधिष्यति न संशयः ॥ ६ ॥
सुरश्रेष्ठगण ! मी आपल्या स्वयंभू तेजास तीन भागात विभक्त करीन; ज्यायोगे इंद्र निःसंदेह वृत्रासुराचा वध करून टाकतील. ॥६॥
एकांशो वासवं यातु द्वितीयो वज्रमेव तु ।
तृतीयो भूतलं यातु तदा वृत्रं हनिष्यति ॥ ७ ॥
माझ्या तेजाचा एक अंश इंद्रांमध्ये प्रवेश करेल, दुसरा वज्रात व्याप्त होऊन जाईल आणि तिसरा भूतळात निघून जाईल (**). तेव्हा इंद्र वृत्रासुराचा वध करू शकतील. ॥७॥
(**- वृत्र-वधाच्या पश्चात्‌ इंद्राला लागलेल्या ब्रह्महत्येच्या निवृत्तिच्या समयापर्यंत या भूतलाचे रक्षण करण्यासाठी तसेच वृत्र धराशायी झाल्यावर त्याच्या भारी (जड) शरीराला धारण करण्याची शक्ति देण्यासाठी भगवतांच्या तेजाचा तिसरा अंश भूतलावर येणे आवश्यक होते, म्हणून असे झाले)
तथा ब्रुवति देवेशे देवा वाक्यमथाब्रुवन् ।
एवमेतन्न सन्देहो यथा वदसि दैत्यहन् ॥ ८ ॥

भद्रं तेऽस्तु गमिष्यामो वृत्रासुरवधैषिणः ।
भजस्व परमोदार वासवं स्वेन तेजसा ॥ ९ ॥
देवेश्वर भगवान्‌ विष्णुनी असे म्हटल्यावर देवता म्हणाल्या - दैत्यविनाशन ! आपण जसे सांगत आहात ठीक त्याप्रमाणेच घडेल यात संदेह नाही. आम्ही लोक वृत्रासुराच्या वधाची इच्छा धरून येथून परत जाऊ. परम उदार प्रभो ! आपण आपल्या तेजाच्या द्वारे देवराज इंद्रांना अनुगृहित करावे. ॥८-९॥
ततः सर्वे महात्मानः सहस्राक्षपुरोगमाः ।
तदरण्यं उपाक्रामन् यत्र वृत्रो महासुरः ॥ १० ॥
त्यानंतर इंद्र आदि सर्व महामनस्वी देवता त्या वनांत गेल्या जेथे महान्‌ असुर वृत्र तपस्या करीत होता. ॥१०॥
ते पश्यंस्तेजसा भूतं तप्यन्तं असुरोत्तमम् ।
पिबन्तमिव लोकांस्त्रीन् निर्दहन्तमिवाम्बरम् ॥ ११ ॥
त्यांनी पाहिले, असुरश्रेष्ठ वृत्रासुर आपल्या तेजाने सर्वत्र व्याप्त होऊन राहिला आहे आणि अशी तपस्या करत राहिला आहे, जणु तिच्या द्वारा तीन्ही लोकांना पिऊन टाकील आणि आकाशालाही दग्ध करून टाकील. ॥११॥
दृष्ट्‍वैव चासुरश्रेष्ठं देवास्त्रासमुपागमन् ।
कथमेनं वधिष्यामः कथं न स्यात् पराजयः ॥ १२ ॥
त्या असुरश्रेष्ठ वृत्राला पाहून देवता घाबरून गेल्या आणि विचार करू लागल्या - आम्ही कसा याचा वध करूं ? आणि कुठल्या उपायाने आमचा पराजय होऊ शकणार नाही ? ॥१२॥
तेषां चिन्तयतां तत्र सहस्राक्षः पुरंदरः ।
वज्रं प्रगृह्य पाणिभ्यां प्राहिणोद् वृत्रमूर्धनि ॥ १३ ॥
ते लोक तेथे याप्रकारे विचार करीत होते की सहस्त्रनेत्रधारी इंद्रांनी दोन्ही हातांनी वज्र उचलून त्या वृत्रासुराच्या मस्तकावर फेकून मारले. ॥१३॥
कालाग्निनेव घोरेण तप्तेनैव महार्चिषा ।
पतता वृत्रशिरसा जगत् त्रासमुपागमत् ॥ १४ ॥
इंद्रांचे ते वज्र प्रलयकाळच्या अग्निसमान भयंकर आणि दीप्तिमान्‌ होते. त्यांतून फार मोठ्‍या ज्वाळा निघत होत्या. त्याच्या आघाताने कापले जाऊन जेव्हा वृत्रासुराचे मस्तक खाली पडले तेव्हा सर्व संसार भयभीत झाला. ॥१४॥
असम्भाव्यं वधं तस्य वृत्रस्य विबुधाधिपः ।
चिन्तयानो जगामाशु लोकस्यान्तं महायशाः ॥ १५ ॥
निरपराध वृत्रसुराचा वध करणे उचित नव्हते म्हणून त्या कारणाने महायशस्वी देवराज इंद्र फार चिंतित झाले आणि तात्काळच सर्व लोकांच्या अंती लोकालोक पर्वताच्या परवर्ती अंधकारमय प्रदेशात निघून गेले. ॥१५॥
तमिन्द्रं ब्रह्महत्याऽऽशु गच्छन्तमनुगच्छति ।
अपतच्चास्य गात्रेषु तमिन्द्रं दुःखमाविशत् ॥ १६ ॥
जाण्याच्या समयी ब्रह्महत्या तात्काळ त्यांच्या पाठीस लागली आणि त्यांच्या अंगांवर तुटून पडली. यामुळे इंद्रांच्या मनात फार दुःख झाले. ॥१६॥
हतारयः प्रनष्टेन्द्रा देवाः साग्निपुरोगमाः ।
विष्णुं त्रिभुवनेशानं मुहुर्मुहुरपूजयन् ॥ १७ ॥
देवतांचा शत्रु मारला गेला. यामुळे अग्नि आदि सर्व देवता त्रिभुवनाचे स्वामी भगवान्‌ विष्णुंची वारंवार स्तुति-पूजा करू लागले. परंतु त्यांचे इंद्र अदृश्य झाले होते. (त्यामुळे त्यांना फार दुःख वाटत होते.) ॥१७॥
त्वं गतिः परमेशान पूर्वजो जगतः पिता ।
रक्षार्थं सर्वभूतानां विष्णुत्वं उपजग्मिवान् ॥ १८ ॥
(देवता म्हणाल्या -) परमेश्वरा ! आपणच जगताचे आश्रय आणि आदि पिता आहात. आपण सर्व प्राण्यांच्या रक्षणासाठी विष्णुरूप धारण केले आहे. ॥१८॥
हतश्चायं त्वया वृत्रो ब्रह्महत्या च वासवम् ।
बाधते सुरशार्दूल मोक्षं तस्या विनिर्दिश ॥ १९ ॥
आपणच या वृत्रासुराचा वध केला आहे. परंतु ब्रह्महत्त्या इंद्रांना कष्ट देत आहे म्हणून सुरश्रेष्ठ ! आपण त्यांच्या उद्धाराचा काही उपाय सांगावा. ॥१९॥
तेषां तद् वचनं श्रुत्वा देवानां विष्णुरब्रवीत् ।
मामेव यजतां शक्रः पावयिष्यामि वज्रिणम् ॥ २० ॥
देवतांचे हे वचन ऐकून भगवान्‌ विष्णु म्हणाले - इंद्राने माझेच यजन करावे. मी त्या वज्रधारी देवराज इंद्राला पवित्र करीन. ॥२०॥
पुण्येन हयमेधेन मामिष्ट्‍वा पाकशासनः ।
पुनरेष्यति देवानां इन्द्रत्वमकुतोभयम् ॥ २१ ॥
पवित्र अश्वमेघ यज्ञाच्या द्वारा माझी यज्ञ-पुरुषाची आराधना करून पाकशासन इंद्र पुन्हा देवेंद्र पदाला परत प्राप्त करतील आणि नंतर त्यांना कुणापासूनही भय राहाणार नाही. ॥२१॥
एवं सन्दिश्य तां वाणीं देवानां चामृतोपमाम् ।
जगाम विष्णुर्देवेशः स्तूयमानस्त्रिविष्टपम् ॥ २२ ॥
देवतांच्या समक्ष अमृतमयी वाणी द्वारा उक्त संदेश देऊन देवेश्वर भगवान्‌ विष्णु आपली स्तुति ऐकत परमधामास निघून गेले. ॥२२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पञ्चाशीतितमः सर्गः ॥ ८५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा पंच्याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP