श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ त्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
शरद् वर्णनं, श्रीरामेण लक्ष्मणाय सुग्रीवपार्श्वं गन्तुं आदेशदानम् - शरद ऋतुचे वर्णन तसेच श्रीरामांनी लक्ष्मणाला सुग्रीवाजवळ जाण्याचा आदेश देणे -
गुहं प्रविष्टे सुग्रीवे विमुक्ते गगने घनैः ।
वर्षरात्रे स्थितो रामः कामशोकाभिपीडितः ॥ १ ॥
पूर्वोक्त आदेश देऊन सुग्रीव तर आपल्या महालात निघून गेले आणि तिकडे श्रीराम, जे वर्षाऋतुतील रात्री प्रस्त्रवणगिरीवर निवास करीत होते, आकाश मेघांपासून मुक्त आणि निर्मल झालेले पाहून सीतेला भेटण्याची उत्कंठा वाढल्याने तिच्या विरहजन्य शोकाने अत्यंत पीडेचा अनुभव करू लागले. ॥१॥
पाण्डरं गगनं दृष्ट्‍वा विमलं चंद्रमण्डलम् ।
शारदीं रजनीं चैव दृष्ट्‍वा ज्योत्स्नानुलेपनाम् ॥ २ ॥
त्यांनी पाहिले की आकाश श्वेत वर्णाचे होत आहे, चंद्रमण्डल स्वच्छ दिसून येत आहे. तसेच शरद-ऋतुच्या रजनीच्या अंगावर चांदण्यांचा अंगराग लागलेला आहे. हे सर्व पाहून ते सीतेला भेटण्यासाठी व्याकुळ झाले. ॥२॥
कामवृत्तं च सुग्रीवं नष्टां च जनकात्मजाम् ।
दृष्ट्‍वा कालमतीतं च मुमोह परमातुरः ॥ ३ ॥
’त्यांनी विचार केला की सुग्रीव कामात आसक्त होत आहे, जनककुमारी सीतेचा आतापर्यंत काहीही पत्ता लागलेला नाही आणि रावणावर चढाई करण्याचा समयही निघून चालला आहे, हे सर्व पाहून अत्यंत आतुर होऊन श्रीरामांचे हृदय व्याकुळ झाले. ॥३॥
स तु संज्ञामुपागम्य मुहूर्तान् मतिमान् नृपः ।
मनः स्थामपि वैदेहीं चिंतयामास राघवः ॥ ४ ॥
’एका मुहूर्तानंतर जेव्हा त्यांचे मन काहीसे स्वस्थ झाले तेव्हा ते बुद्धिमान् नरेश श्रीराम आपल्या मनात वस्ती केलेल्या वैदेही सीतेचे चिंतन करू लागले. ॥४॥
दृष्ट्‍वा च विमलं व्योम गतविद्युद्बवलाहकम् ।
सारसारावसंघुष्टं विललापार्तया गिरा ॥ ५ ॥
त्यांनी पाहिले की आकाश निर्मल आहे. कुठेही वीजेचा गडगडाट नाही अथवा मेघांचा समूहही नाही. तेथे सर्वत्र सारसांची बोली ऐकू येत आहे. हे सर्व पाहून ते आर्तवाणीने विलाप करू लागले. ॥५॥
आसीनः पर्वतस्याग्रे हेमधातुविभूषिते ।
शारदं गगनं दृष्ट्‍वा जगाम मनसा प्रियाम् ॥ ६ ॥
’सोनेरी रंगाच्या धातुने विभूषित पर्वतशिखरावर बसलेले श्रीराम शरत्कालच्या स्वच्छ आकाशाकडे दृष्टिपात करून मनातल्या मनात आपली प्रिय पत्‍नी सीता हिचे ध्यान करू लागले. ॥६॥
सारसारवसन्नादैः सारसारावनादिनी ।
याऽऽश्रमे रमते बाला साद्य मे रमते कथम् ॥ ७ ॥
ते म्हणाले- ’जिचे बोलणे सारसांच्या आवाजाप्रमाणे मधुर होते, आणि जी माझ्या आश्रमात सारसांच्या द्वारे परस्पर एक दुसर्‍यास बोलावण्यासाठी केल्या गेलेल्या मधुर शब्दांनी आपल्या मनाची करमणूक करून घेत होती, ती माझी भोळी भाबडी स्त्री सीता आज कुठल्या तर्हेने आपले मनोरंजन करीत असेल ? ॥७॥
पुष्पितांश्चासनान् दृष्ट्‍वा काञ्चनानिव निर्मलान् ।
कथं सा रमते बाला पश्यंती मामपश्यती ॥ ८ ॥
’सुवर्णमय वृक्षांप्रमाणे निर्मल आणि फुललेल्या असन नामक वृक्षांना पाहून वारंवार त्यांना न्याहाळत असणारी भोळी-भाबडी सीता जेव्हा मला आपल्या स्वतःजवळ पाहात नसेल तेव्हा तिचे मन त्यात कसे लागत असेल ? ॥८॥
या पुरा कलहंसानां कलेन कलभाषिणी ।
बुध्यते चारुसर्वाङ्‌गीा साद्य मे रमते कथम् ॥ ९ ॥
’जिचे सर्व अंग मनोहर आहे आणि जी स्वभावतःच मधुर भाषण करणारी आहे ती सीता पूर्वी कलहंसांना मधुर शब्दाने जागे करीत असे, परंतु आज ती माझी प्रिया तेथे कशी प्रसन्न राहात असेल ? ॥९॥
निःस्वनं चक्रवाकानां निशम्य सहचारिणाम् ।
पुण्डरीकविशालाक्षी कथमेषा भविष्यति ॥ १० ॥
’जिचे विशाल नेत्र प्रफुल्ल कमलदलासमान शोभून दिसतात, ती माझी प्रिया जेव्हा बरोबर विचरणार्‍या चक्रवाकांची बोली ऐकत असेल, तेव्हा तिची कशी दशा होऊन जात असेल ? ॥१०॥
सरांसि सरितो वापीः काननानि वनानि च ।
तां विना मृगशावाक्षीं चरन्नाद्य सुखं लभे ॥ ११ ॥
’हाय ! मी नदी, तलाव, विहिरी, कानन आणि वन सर्व जागी हिंडतो आहे, पण कोठेही त्या मृगशावकनयनी सीतेशिवाय आता मला सुख मिळत नाही. ॥११॥
अपि तां मद्वियोगाच्च सौकुमार्याच्च भामिनीम् ।
सुदूरं पीडयेत् कामः शरद्गुरणनिरंतरः ॥ १२ ॥
’काही असे तर होत नसेल ना की शरद-ऋतुच्या गुणांमुळे निरंतर वृद्धि प्राप्त करणार्‍या काम, भामिनी सीतेला अत्यंत पीडित करील, कारण या प्रकारच्या संभावनेस दोन कारणे आहेत - एक तर तिला माझ्या वियोगाचे कष्ट आहेत, दुसरे ती अत्यंत सुकुमार असल्याने हे कष्ट सहन करू शकत नसेल ? ॥१२॥
एवमादि नरश्रेष्ठो विललाप नृपात्मजः ।
विहङ्‌गी इव सारङ्‌गःम सलिलं त्रिदशेश्वरात् ॥ १३ ॥
इंद्राकडून पाण्याची याचना करणार्‍या तहानलेल्या चातकाप्रमाणे नरश्रेष्ठ नरेन्द्रकुमार श्रीरामांनी या प्रकारच्या बर्‍याच गोष्टी बोलून विलाप केला. ॥१३॥
ततश्चञ्चूर्य रम्येषु फलार्थी गिरिसानुषु ।
ददर्श पर्युपावृत्तो लक्ष्मीवाँल्लक्ष्मणोऽग्रजम् ॥ १४ ॥
त्या समयी शोभाशाली लक्ष्मण फळे आणण्यासाठी गेलेले होते. ते पर्वताच्या रमणीय शिखरांवर हिंडून-फिरून जेव्हा परतले तेव्हा त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या अवस्थेवर दृष्टिपात केला. ॥१४॥
स चिंतया दुस्सहया परीतं
विसंज्ञमेकं विजने मनस्वी ।
भ्रातुर्विषादात् त्वरितोऽतिदीनः
समीक्ष्य सौमित्रिरुवाच दीनम् ॥ १५ ॥
ते दुस्सह चिंतेमध्ये मग्न होऊन जणु अचेतसे झाले होते आणि एकांतात एकटेच दुःखी होऊन बसले होते. त्या समयी मनस्वी सौमित्र लक्ष्मणांनी जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा ते तात्काळच भावाच्या विषादाने अत्यंत दुःखी झाले आणि त्यांना याप्रकारे बोलले- ॥१५॥
किमार्य कामस्य वशंगतेन
किमात्मपौरुष्यपराभवेन ।
अयं ह्रिया संह्रियते समाधिः
किमत्र योगेन निवर्तते न ॥ १६ ॥
’आर्य ! या प्रकारे कामाच्या अधीन होऊन आपल्या पौरुषाचा तिरस्कार केल्याने- पराक्रम विसरून जाण्याने काय लाभ होणार आहे ? या लज्जाजनक शोकामुळे आपल्या चित्ताची एकाग्रता नष्ट होत आहे, काय या समयी योगाचा आधार घेण्याने- मन एकाग्र करण्याने ही सर्व चिंता दूर होऊ शकते का ? ॥१६॥
क्रियाभियोगं मनसः प्रसादं
समाधियोगानुगतं च कालम् ।
सहायसामर्थ्यमदीनसत्त्वः
स्वकर्महेतुं च कुरुष्व तात ॥ १७ ॥
’तात ! आपण आवश्यक कर्मांच्या अनुष्ठानात पूर्णपणे समरस व्हावे, मनास प्रसन्न करावे आणि प्रत्येक क्षणी चित्ताची एकाग्रता संभाळावी. त्याच बरोबर अंतःकरणात दीनतेला स्थान न देता आपल्या पराक्रमाच्या वृद्धिसाठी, सहायता मिळविण्यासाठी प्रयत्‍न करावे. ॥१७॥
न जानकी मानववंशनाथ
त्वया सनाथा सुलभा परेण ।
न चाग्निचूडां ज्वलितामुपेत्य
न दह्यते वीरवरार्ह कच्चित् ॥ १८ ॥
’मानववंशाचे नाथ ! तसेच श्रेष्ठ पुरुषांनाही पूजनीय वीर रघुनदंन ! जिचे स्वामी आपण आहात ती जनकनंदिनी सीता कुणाही दुसर्‍या पुरुषासाठी सुलभ नाही आहे, कारण की जळत असलेल्या आगीच्या ज्वाळेच्या समीप जाऊन कोणीही दग्ध झाल्याशिवाय राहू शकत नाही.’ ॥१८॥
सलक्षणं लक्ष्मणमप्रधृष्यं
स्वभावजं वाक्यमुवाच रामः ।
हितं च पथ्यं च नयप्रसक्तं
ससामधर्मार्थसमाहितं च ॥ १९ ॥

निःसंशयं कार्यमवेक्षितव्यं
क्रियाविशेषोऽप्यनुवर्तितव्यः ।
न तु प्रवृद्धस्य दुरासदस्य
कुमार वीर्यस्य फलं न चिंत्यम् ॥ २० ॥
लक्ष्मण उत्तम लक्षणांनी संपन्न होते. त्यांना कुणीही परास्त करु शकत नव्हते. भगवान् श्रीरामांनी त्यांना ही स्वाभाविक गोष्ट सांगितली - ’कुमार ! तुम्ही जी गोष्ट सांगितलीत ती वर्तमानकाळीही हितकर, भविष्यातही सुख पोहोचविणारी, राजनीतिला सर्वथा अनुकूल आणि सामा बरोबरच धर्म आणि अर्थानेही युक्त आहे. निश्चितच सीतेच्या अनुसंधान कार्याकडे ध्यान द्यावयास पाहिजे; तसेच त्यासाठी विशेष कार्य अथवा उपायाचे अनुसरण केले पाहिजे, परंतु प्रयत्‍न सोडून पूर्णरूपाने वाढलेल्या या दुर्लभ आणि बलवान् कर्माच्या फळावरही दृष्टि ठेवणे उचित नाही. ॥१९-२०॥
अथ पद्मपलाशाक्षीं मैथीलीमनुचिंतयन् ।
उवाच लक्ष्मणं रामो मुखेन परिशुष्यता ॥ २१ ॥
त्यानंतर प्रफुल्ल कमलदलाप्रमाणे नेत्र असणार्‍या मैथिली सीतेचे वारंवार चिंतन करीत श्रीराम लक्ष्मणास संबोधित करून कोरड पडलेल्या मुखाने बोलले- ॥२१॥
तर्पयित्वा सहस्राक्षः सलिलेन वसुंधराम् ।
निर्वर्तयित्वा सस्यानि कृतकर्मा व्यवस्थितः ॥ २२ ॥
’सुमित्रानंदन ! सहस्त्रनेत्रधारी इंद्रदेव या पृथ्वीला जलाने तृप्त करून येथील धान्ये पिकवून आता कृतकृत्य झाले आहेत. ॥२२॥
स्निग्धगंभीरनिर्घोषाः शैलद्रुमपुरोगमाः ।
विसृज्य सलिलं मेघाः परिशांता नृपात्मज ॥ २३ ॥
’राजकुमार ! पहा जे अत्यंत गंभीर स्वरात गर्जना करीत होते आणि पर्वत, नगरे आणि वृक्षांच्या वरून पुढे जात होते ते मेघ आपले सर्वजल वर्षुन शांत झाले आहेत. ॥२३॥
नीलोत्पलदलश्यामाः श्यामी कृत्वा दिशो दश ।
विमदा इव मातङ्‌गाः शांतवेगाः पयोधराः ॥ २४ ॥
’नीलकमलदलाप्रमाणे श्यामवर्णाचे मेघ दाही दिशांना श्याम बनवीत मदरहित गजराजांच्याप्रमाणे वेगरहित झाले आहेत- त्यांचा वेग शांत झाला आहे. ॥२४॥
जलगर्भा महावेगाः कुटजार्जुनगंधिनः ।
चरित्वा विरताः सौम्य वृष्टिवाताः समुद्यताः ॥ २५ ॥
’सौम्या ! ज्यांच्यामध्ये जल विद्यमान् होते आणि ज्यांच्यात कुटज आणि अर्जुनाच्या फुलांचा सुगंध भरलेला होता, ते अत्यंत वेगवान् झंझावाती वारे गडगडाट करीत संपूर्ण दिशांमध्ये विचरण करून आता शांत झाले आहेत. ॥२५॥
घनानां वारणानां च मयूराणां च लक्ष्मण ।
नादः प्रस्रवणानां च प्रशांतः सहसानघ ॥ २६ ॥
’निष्पाप लक्ष्मणा ! ढग, हत्ती, भोर आणि निर्झर यांचा आवाज (शब्द) यासमयी एकाएकी शांत झाला आहे. ॥२६॥
अभिवृष्टा महामेघैः निर्मलाश्चित्रसानवः ।
अनुलिप्ता इवाभांति गिरयश्चंद्ररश्मिभिः ॥ २७ ॥
’महान् मेघांच्या द्वारे वर्षा केले गेलेल्या जलामुळे धुतले गेल्याने हे विचित्र शिखरांचे पर्वत अत्यंत निर्मल झाले आहेत. यांना पाहून असे वाटत आहे की जणु चंद्रकिरणांच्या द्वारे यांच्यावर सफेदीच दिली गेली आहे. ॥२७॥
शाखासु सप्तच्छदपादपानां
प्रभासु तारार्कनिशाकराणाम् ।
लीलासु चैवोत्तमवारणानां
श्रियं विभज्याद्य शरत् प्रवृत्ता ॥ २८ ॥
’आज शरद्ऋतु सप्तच्छदाच्या फाद्यांमध्ये, सूर्य, चंद्रमा आणि तारांच्या प्रभेत तसेच श्रेष्ठ गजराजांच्या लीलामध्ये आपली शोभा वाटून आला आहे. ॥२८॥
संप्रत्यनेकाश्रयचित्रशोभा
लक्ष्मीः शरत्कालगुणोपपन्ना ।
सूर्याग्रहस्तप्रतिबोधितेषु
पद्माकरेष्वभ्यधिकं विभाति ॥ २९ ॥
’यासमयी शरत्कालाच्या गुणांनी संपन्न झालेली लक्ष्मी यद्यपि अनेक आश्रयात विभक्त होऊन विचित्र शोभा धारण करीत असली तरी सूर्याच्या प्रथम किरणांनी विकसित झालेल्या कमल-वनात ती सर्वात अधिक सुशोभित होत आहे. ॥२९॥
सप्तच्छदानां कुसुमोपगंधी
षट्पादवृंदैरनुगीयमानः ।
मत्तद्विपानां पवनानुसारी
दर्पं वनेष्यन्नधिकं विभाति ॥ ३० ॥
’सप्तच्छदांच्या फुलांच्या सुगंधाना धारण करणारा शरत्काल स्वभावतः वायुचे अनुसरण करीत आहे. भ्रमरांचे समूह त्याचे गुणगान करीत आहेत. हा मार्गातील जलाचे शोषण करीत आणि मदमत्त हत्तींच्या दर्पाला वाढवीत अधिक शोभा प्राप्त करीत आहे. ॥३०॥
अभ्यागतैश्चारुविशालपक्षैः
स्मरप्रियैः पद्मरजोऽवकीर्णैः ।
महानदीनां पुलिनोपयातैः
क्रीडंति हंसाः सह चक्रवाकैः ॥ ३१ ॥
’ज्यांचे पंख विशाल आणि सुंदर आहेत, ज्यांना कामक्रीडा अधिक प्रिय आहे, ज्यांच्यावर कमलांचे पराग विखुरलेले आहेत, जे मोठ मोठ्या नद्यांच्या तटावर उतरलेले आहेत आणि मानसरोवराहून बरोबरच आले आहेत त्या चक्रवाकांच्या बरोबर हंस क्रीडा करीत आहेत. ॥३१॥
मदप्रगर्भेषु च वारणेषु
गवां समूहेषु च दर्पितेषु ।
प्रसन्नतोयासु च निम्नगासु
विभाति लक्ष्मीर्बहुधा विभक्ता ॥ ३२ ॥
’मदमत्त गजराजांमध्ये, दर्पयुक्त वृषभांच्या समूहामध्ये तसेच स्वच्छ जल असलेल्या सरितांमध्ये नाना रूपांत विभक्त झालेली लक्ष्मी विशेष शोभा प्राप्त करीत आहे. ॥३२॥
नभः समीक्ष्यांबुधरैर्विमुक्तं
विमुक्तबर्हाभरणा वनेषु ।
प्रियास्वरक्ता विनिवृत्तशोभा
गतोत्सवा ध्यानपरा मयूराः ॥ ३३ ॥
’आकाशाला शून्य झालेले पाहून वनात पंखरूपी आभूषणांचा परित्याग करणारे मोर आपल्या प्रियतमांपासून विरक्त झाले आहेत. त्यांची शोभा नष्ट झालेली आहे आणि ते आनंदशून्य होऊन ध्यानमग्न होऊन बसले आहेत. ॥३३॥
मनोज्ञगंधैः प्रियकैरनल्पैः
पुष्पातिभारावनताग्रशाखैः ।
सुवर्णगौरैर्नयनाभिरामैः
उद्योतितानीव वनांतराणि ॥ ३४ ॥
’वनामध्ये बरेचसे असन नामक वृक्ष उभे आहेत, ज्यांच्या शाखांचे अग्रभाग फुलांच्या अधिक भाराने वाकलेले आहेत, त्यांच्यावर मनोहर सुगंध पसरला आहे. ते सर्व वृक्ष सुवर्णासमान गौर आणि नेत्राला आनंद प्रदान करणारे आहेत. त्यांच्या द्वारा वनप्रांत प्रकाशितसा झाला आहे. ॥३४॥
प्रियान्वितानां नलिनीप्रियाणां
वने प्रियाणां कुसुमोद् गतानाम् ।
मदोत्कटानां मदलालसानां
गजोत्तमानां गतयोऽद्य मंदाः ॥ ३५ ॥
’जे आपल्या प्रियतमांसह विचरत आहेत, ज्यांना कमलाचे पुष्प तसेच वन अधिक प्रिय आहे, जे सप्तच्छांची फुले हुंगून उन्मत्त झाले आहेत, ज्यांच्यात अधिक मद आहे तसेच ज्यांना मदजनित कामभोगाची लालसा झाली आहे, त्या गजराजांची गति आज मंद झाली आहे. ॥३५॥
व्यक्तं नभः शस्त्रविधौतवर्णं
कृशप्रवाहानि नदीजलानि ।
कह्लारशीताः पवनाः प्रवांति
तमोविमुक्ताश्च दिशः प्रकाशाः ॥ ३६ ॥
’या समयी आकाशाचा रंग सहाणेंवर चढविलेल्या शस्त्राच्या धारेप्रमाणे स्वच्छ दिसून येत आहे, नद्यांचे जल मंद गतीने प्रवाहित होत आहे, श्वेत कमलाचा सुगंध घेऊन शीतल मंद वायु वहात आहे. दिशांतील अंधःकार दूर झालेला आहे आणि आता त्यांच्यात पूर्ण प्रकाश पसरलेला आहे. ॥३६॥
सूर्यातपक्रामणनष्टपङ्‌काा
भूमिश्चिरोद्घानटितसांद्ररेणुः ।
अन्योन्यवैरेण समायुतानां
उद्योगकालोऽद्य नराधिपानाम् ॥ ३७ ॥
’ऊन पडल्यामुळे जमिनीवरचा चिखल सुकून गेला आहे. आता तिच्यावर खूप दिवसानंतर खूप धूळ प्रकट झाली आहे. परस्पर वैर राखणार्‍या राजांसाठी युद्धानिमित्त उद्योग करण्याचा समय आला आहे. ॥३७॥
शरद्गुकणाप्यायितरूपशोभाः
प्रहर्षिताः पांसुसमुक्षिताङ्‌गाःि ।
मदोत्कटाः संप्रति युद्धलुब्धा
वृषा गवां मध्यगता नदंति ॥ ३८ ॥
’शरद ऋतुच्या गुणांनी ज्यांचे रूप आणि शोभा वाढविली आहे, ज्यांच्या सार्‍या अंगांवर धूळ पसरलेली आहे, ज्यांच्या मदाची अधिक वृद्धि झालेली आहे तसेच जे युद्धासाठी आसुसलेले आहेत, ते वळू या समयी गायींच्या मध्ये उभे राहून अत्यंत हर्षपूर्वक हंबरत आहेत. ॥३८॥
समन्मथा तीव्रतरानुरागा
कुलान्विता मंदगतिं करेणुः ।
मदान्वितं संपरिवार्य यांतं
वनेषु भर्तारमनुप्रयाति ॥ ३९ ॥
’ज्यांच्यात कामभावनेचा उदय झाला आहे, म्हणून ज्या अत्यंत तीव्र अनुरागाने युक्त झाल्या आहेत आणि चांगल्या कुळात उत्पन्न झालेल्या आहेत त्या मंद गतीने चालणार्‍या हत्तीणी वनात जाणार्‍या आपल्या मदमत्त स्वामीला घेरून त्याचे अनुगमन करीत आहेत. ॥३९॥
त्यक्त्वा वराण्यात्मविभूषितानि
बर्हाणि तीरोपगता नदीनाम् ।
निर्भर्त्स्यमाना इव सारसौघैः
प्रयांति दीना विमना मयूराः ॥ ४० ॥
’आपल्या आभूषणरूप श्रेष्ठ पंखांचा त्याग करून नद्यांच्या तटावर आलेले मोर जणु सारस-समूहांचा धिक्कार ऐकून दुःखी आणि खिन्नचित्त होऊन परत जात आहेत. ॥४०॥
वित्रास्य कारण्डवचक्रवाकान्
महारवैर्भिन्नकटा गजेंद्राः ।
सरस्सु बद्धांबुजभूषणेषु
विक्षोभ्य विक्षोभ्य जलं पिबंति ॥ ४१ ॥
’ज्यांच्या गंडस्थळातून मदाची धार वहात आहे ते गजराज आपल्या मोठ्या गर्जनेने कारण्डव तसेच चक्रवाकांना भयभीत करून विकसित कमळांनी विभूषित सरोवरांतील जल (सोंडेने) हलवून पित आहेत. ॥४१॥
व्यपेतपङ्‌का्सु सवालुकासु
प्रसन्नतोयासु सगोकुलासु ।
ससारसारावविनादितासु
नदीषु हंसा निपनंति हृष्टाः ॥ ४२ ॥
’ज्यांच्यातील चिखल दूर झाला आहे, ज्या वाळुकांनी सुशोभित आहेत, ज्यांचे जळ खूपच स्वच्छ आहे तसेच गायींचे समुदाय ज्यांच्या जलाचे सेवन करीत आहेत, सारसांच्या कलरवाने निनादणार्‍या त्या सरितामध्ये हंस मोठ्या आनंदाने उतरत आहेत. ॥४२॥
नदीघनप्रस्रवणोदकानां
अतिप्रवृद्धानिलबर्हिणानाम् ।
प्लवंगमानां च गतोत्सवानां
द्रुतं रवाः संप्रति संप्रनष्टाः ॥ ४३ ॥
’नदी, मेघ, निर्झरांचे जल, प्रचण्ड वायु, मोर आणि हर्षरहित बेडकांचे शब्द निश्चितच या समयी शान्त झालेले आहेत. ॥४३॥
अनेकवर्णाः सुविनष्टकाया
नवोदितेष्वंबुधरेषु नष्टाः ।
क्षुधार्दिता घोरविषा बिलेभ्यः
चिरोषिता विप्रसरंति सर्पाः ॥ ४४ ॥
’नूतन मेघ उदित झाल्यावर जे चिरकाळपर्यत बिळात लपलेले होते, ज्यांची शरीरयात्रा नष्टप्राय झालेली होती आणि याप्रकारे जे मृतवत होऊन राहिले होते, ते भयंकर विषारी बहुरंगी सर्प भुकेने पीडित होऊन आता बिळांमधून बाहेर निघत आहेत. ॥४४॥
चञ्चच्चंद्रकरस्पर्शहर्षोन्मीलिततारका ।
अहो रागवती संध्या जहाति स्वयमंबरम् ॥ ४५ ॥
’शोभाशाली चंद्रकिरणांच्या स्पर्शाने होणार्‍या हर्षामुळे जिचे तारे किंचित प्रकाशित होत आहेत, अथवा प्रियतमाच्या करस्पर्शजनित हर्षाने जिच्या नेत्राची पुतळी किंचित विकसित झाली आहे ती रागयुक्त संध्या, अथवा अनुरागमयी नायिका स्वतःच अंबराचा अथवा वस्त्राचा त्याग करीत आहे, ही कशी आश्चर्याची गोष्ट आहे. ॥४५॥
रात्रिः शशाङ्‌कोोदितसौम्यवक्त्रा
तारागणोन्मीलितचारुनेत्रा ।
ज्योत्स्नांशुकप्रावरणा विभाति
नारीव शुक्लांशुकसंवृताङ्‌गीव ॥ ४६ ॥
’चांदण्याची चादर पांघरून ही शरत्कालाची रात्र श्वेत वस्त्राने अंगे झाकलेल्या एखाद्या सुंदर नारीप्रमाणे शोभा प्राप्त करीत आहे. उदित झालेला चंद्रमाच तिचे सौम्य मुख आहे आणि तारे तिचे प्रफुल्लित मनोहर नेत्र आहेत. ॥४६॥
विपक्वशालिप्रसवानि भुक्त्वा
प्रहर्षिता सारसचारुपङ्‌क्ति ।
नभः समाक्रामति शीघ्रवेगा
वातावधूता ग्रथितेव माला ॥ ४७ ॥
’पिकलेल्या धान्याचे तुरे खाऊन हर्षित झालेली आणि तीव्र वेगाने जाणारी सारसांची ती सुंदर रांग वार्‍याने हलणार्‍या पुष्पांच्या गुंफलेल्या माळेप्रमाणे आकाशांतून उडत जात आहे. ॥४७॥
सुप्तैकहंसं कुसुमैरुपेतं
महाह्रदस्थं सलिलं विभाति ।
घनैर्विमुक्तं निशि पूर्णचंद्रं
तारा गणाकीर्णमिवांतरिक्षम् ॥ ४८ ॥
’कुमुदाच्या फुलांनी भरलेल्या त्या महान तलावाचे जल, ज्यात एक हंस झोपलेला आहे, असा भासत आहे की जणु रात्रीच्या वेळी ढगाच्या आवरणासहित असलेले आकाश सर्व बाजूस विखुरलेल्या तार्‍यांनी व्याप्त होऊन पूर्ण चंद्रम्या सहित शोभून दिसत आहे. ॥४८॥
प्रकीर्णहंसाकुलमेखलानां
प्रबुद्धपद्मोत्पलमालिनीनाम् ।
वाप्युत्तमानामधिकाद्य लक्ष्मीः
वराङ्‌गतनानामिव भूषितानाम् ॥ ४९ ॥
’सर्वत्र विखुरलेले हंस हीच जिची मेखला (कमरपट्टा) आहे, जी विकसित कमळे आणि उत्पलांच्या माळा धारण करीत आहे, त्या उत्तम विहिरींची शोभा आज वस्त्राभूषणांनी विभूषित झालेल्या सुंदर वनितांप्रमाणे दिसत आहे. ॥४९॥
वेणुस्वनव्यञ्जिततूर्यमिश्रः
प्रत्यूषकालानिलसंप्रवृत्तः ।
सम्मूर्च्छितो गर्गरगोवृषाणां
अन्योन्यमापूरयतीव शब्दः ॥ ५० ॥
’वेणुस्वरांच्या रूपात व्यक्त झालेल्या वाद्यघोष मिश्रित आणि प्रातःकालच्या वायुमुळे वृद्धिला प्राप्त होऊन सर्वत्र पसरलेला दधिमंथनाच्या मोठ मोठ्या भांड्यांचा आणि वळूंचा शब्द, हे जणु एक दुसर्‍याला पूरक होत आहेत. ॥५०॥
नवैर्नदीनां कुसुमप्रभासैः
व्याधूयमानैर्मृदुमारुतेन ।
धौतामलक्षौमपटप्रकाशैः
कूलानि काशैरुपशोभितानि ॥ ५१ ॥
’नद्यांचे तट मंद मंद वायुने कंपित होणार्‍या पुष्परुपी हास्याने सुशोभित आणि धुतलेल्या निर्मल रेशमी वस्त्रांप्रमाणे प्रकाशित होणार्‍या नूतन गवतामुळे फारच शोभा प्राप्त करीत आहेत. ॥५१॥
वनप्रचण्डा मधुपानशौण्डाः
प्रियान्विताः षट्चरणाः प्रहृष्टाः ।
वनेषु मत्ताः पवनानुयात्रां
कुर्वंति पद्मासनरेणुगौराः ॥ ५२ ॥
’वनात धीटाईने फिरणारे तसेच कमल आणि असन यांच्या परागांनी गौरवर्णाला प्राप्त झालेले मत्त भ्रमर, जे पुष्पांच्या मकरंदाचे पान करण्यांत फार चतुर आहेत, आपल्या प्रियांसह हर्षित होऊन वनांत गंधाच्या लोभाने वायुच्या मागोमाग जात आहेत. ॥५२॥
जलं प्रसन्नं कुमुदं प्रभासं
क्रौञ्चस्वनः शालिवनं विपक्वम् ।
मदुश्च वायुर्विमलश्च चंद्रः
शंसंति वर्षव्यपनीतकालम् ॥ ५३ ॥
’जल स्वच्छ झाले आहे, धान्याची शेती पिकून तयार झाली आहे, वायु मंदगतीने वाहू लागला आहे आणि चंद्रमा अत्यंत निर्मल दिसून येत आहे- ही सर्व लक्षणे त्या शरत्कालाचे आगमनाची सूचना देत आहेत; ज्यामध्ये वर्षाऋतुची समाप्ती होते. क्रौंच पक्षी बोलू लागतात आणि फुले त्या ऋतुच्या हास्याप्रमाणे विकसित होतात. ॥५३॥
मीनोपसंदर्शितमेखलानां
नदीवधूनां गतयोऽद्य मंदाः ।
कांतोपभुक्तालसगामिनीनां
प्रभातकालेष्विव कामिनीनाम् ॥ ५४ ॥
’रात्री प्रियतमाच्या उपभोगात येऊन प्रातःकाळी आळसटलेल्या गतीने चालणार्‍या कामिनींप्रमाणे त्या नदीस्वरूपा वधूंची गतिही आज मंद झाली आहे, ज्यांनी मीनांची मेखलाच जणु धारण केली आहे. ॥५४॥
सचक्रवाकानि सशैवलानि
काशैर्दुकूलैरिव संवृतानि ।
सपत्रलेखाणि सरोचनानि
वधूमुखानीव नदीमुखानि ॥ ५५ ॥
’नद्यांची मुखे नववधूंच्या मुखांप्रमाणे शोभा प्राप्त करीत आहेत. त्यांच्यात जे चक्रवाक आहेत, ते गोरोचनद्वारा निर्मित तिलकासमान प्रतीत होत आहेत, जे शेवाळे आहे, ते वधुच्या मुखावरावरील पत्ररेखे प्रमाणे भासत आहे; तसेच आकाश आहे तो जणु श्वेत दुकूल बनून नदीरूपिणी वधूच्या मुखाला झाकून टाकीत आहे. ॥५५॥
प्रफुल्लबाणासनचित्रितेषु
प्रहृष्टषट्पादनिकूजितेषु ।
गृहीतचापोद्यतदण्डचण्डः
प्रचण्डचापोऽद्य वनेषु कामः ॥ ५६ ॥
’फुललेल्या बोरू आणि असनाच्या वृक्षांनी ज्यांची विचित्र शोभा दिसत आहे तसेच ज्यांच्यामध्ये हर्षित भ्रमरांचा आवाज गुंजत राहात आहे त्या वनांत आज प्रचंड धनुर्धर कामदेव प्रकट झाला आहे, जो हातात धनुष्य घेऊन विरही जनांना वेदना देण्यासाठी उद्यत होऊन अत्यंत कोपाचा परिचय करून देत आहे. ॥५६॥
लोकं सुवृष्ट्या परितोषयित्वा
नदीस्तटाकानि च पूरयित्वा ।
निष्पन्नसस्यां वसुधां च कृत्वा
त्यक्त्वा नभस्तोयधराः प्रणष्टाः ॥ ५७ ॥
’चांगल्या वृष्टिमुळे लोकांना संतुष्ट करून नद्या आणि तलावांनी पाण्याने भरून तसेच भूतलाला परिपक्व धान्याच्या शेतीने संपन्न करून मेघ आकाश सोडून अदृश्य झाले आहेत. ॥५७॥
दर्शयंति शरन्नद्यः पुलिनानि शनैः शनैः ।
नवसंगमसव्रीडा जघनानीव योषितः ॥ ५८ ॥
’शरद ऋतुतील नद्या हळूहळू जल कमी होऊ लागल्याने आपल्या नग्न तटांना दाखवू लागल्या आहेत, अगदी बरोबर त्याचप्रमाणे की प्रथम समागमाच्या वेळी लाजाळू युवती हळूहळू आपले जघन स्थळ दाखविण्यास विवश होत असतात. ॥५८॥
प्रसन्नसलिलाः सौम्य कुररीभिविनादिताः ।
चक्रवाकगणाकीर्णा विभांति सलिलाशयाः ॥ ५९ ॥
’सौम्य ! सर्व जलाशयांचे जल स्वच्छ झाले आहे. येथे कुरर पक्ष्यांचा कलनाद गुंजत राहिला आहे आणि चक्रवाकांचे समुदाय चारी बाजूस पसरलेले आहेत या प्रकारे त्या जलाशयांची फारच शोभा दिसून येत आहे. ॥५९॥
अन्योन्यबद्धवैराणां जिगीषूणां नृपात्मज ।
उद्योगसमयः सौम्य पार्थिवानामुपस्थितः ॥ ६० ॥
’सौम्य ! राजकुमार ! ज्यांनी परस्परात वैर धरले आहे आणि जे एक दुसर्‍याला जिंकण्याची इच्छा ठेवतात, त्या भूमिपालांसाठी हा युद्धानिमित्त उद्योग करण्याचा समय उपस्थित झाला आहे. ॥६०॥
इयं सा प्रथमा यात्रा पार्थिवानां नृपात्मज ।
न च पश्यामि सुग्रीवं उद्योगं वा तथाविधम् ॥ ६१ ॥
’नरेशनंदन ! राजांच्या विजय-यात्रेचा हा प्रथम अवसर आहे, परंतु मी येथे सुग्रीवाला उपस्थित तर पहातच नाही आणि त्याचा तसा काही उद्योगही दृष्टिगोचर होत नाही आहे. ॥६१॥
असनाः सप्तपर्णाश्च कोविदाराश्च पुष्पिताः ।
दृश्यंते बंधुजीवाश्च श्यामाश्च गिरिसानुषु ॥ ६२ ॥
’पर्वताच्या शिखरांवर असन, सप्तपर्ण, कोविदार, बंधुजीव तसेच श्याम तमाल फुललेले दिसून येत आहेत. ॥६२॥
हंससारसचक्राह्वैः कुररैश्च समंततः ।
पुलिनान्यवकीर्णानि नदीनां पश्य लक्ष्मण ॥ ६३ ॥
’लक्ष्मणा ! पहा तर खरे, नद्यांच्या तटावर सर्व बाजूस हंस, सारस, चक्रवाक आणि कुरर नामक पक्षी पसरलेले आहेत. ॥६३॥
चत्वारो वार्षिका मासा गता वर्षशतोपमाः ।
मम शोकाभितप्तस्य सौम्य सीतामपश्यतः ॥ ६४ ॥
’मी सीता न दिसल्याने शोकाने संतप्त होत आहे म्हणून हे वर्षाऋतूचे चार महिने माझ्यासाठी शंभर वर्षासारखे गेले आहेत. ॥६४॥
चक्रवाकीव भर्तारं पृष्ठतोऽनुगता वनम् ।
विषमं दण्डकारण्यं उद्यानमिव चांगना ॥ ६५ ॥
’ज्याप्रमाणे चक्रवाकी आपल्या स्वामीचे अनुसरण करते त्याप्रमाणे कल्याणी सीता या भयंकर आणि दुर्गम दंडकारण्यात जणु उद्यानाप्रमाणे समजून माझ्या पाठोपाठ येथपर्यंत निघून आली होती. ॥६५॥
प्रियाविहीने दुःखार्ते हृतराज्ये विवासिते ।
कृपां न कुरुते राजा सुग्रीवो मयि लक्ष्मण ॥ ६६ ॥
’लक्ष्मणा ! मी आपल्या प्रियतमेपासून दुरावलो आहे. माझे राज्य हिरावून घेण्यात आले आहे आणि मला देशातून घालवून देण्यात आले आहे. या अवस्थेमध्ये राजा सुग्रीवही माझ्यावर कृपा करीत नाही आहे. ॥६६॥
अनाथो हृतराज्योऽहं रावणेन च धर्षितः ।
दीनो दूरगृहः कामी मां चैव शरणं गतः ॥ ६७ ॥

इत्येतैः कारणैः सौम्य सुग्रीवस्य दुरात्मनः ।
अहं वानरराजस्य परिभूतः परंतपः ॥ ६८ ॥
’सौम्य लक्ष्मणा ! मी अनाथ आहे, राज्यापासून भ्रष्ट झालेला आहे. रावणाने माझा अपमान केला आहे. मी दीन आहे. माझे घर येथून फारच दूर आहे. मी कामना घेऊन येथे आलो आहे, तसेच सुग्रीव असेही समजत आहे की राम मला शरण आले आहेत. या सर्व कारणांमुळे वानरांचा राजा दुरात्मा सुग्रीव माझा तिरस्कार (अपमान) करीत आहे. परंतु त्याला पत्ता नाही आहे की मी सदा शत्रूंना संताप देण्यास समर्थ आहे. ॥६७-६८॥
स कालं परिसंख्याय सीतायाः परिमार्गणे ।
कृतार्थः समयं कृत्वा दुर्मतिर्नावबुध्यते ॥ ६९ ॥
’त्याने सीतेच्या शोधासाठी समय निश्चित केला होता, परंतु त्याचे तर आता काम झाले आहे म्हणून तो दुर्बुद्धि वानर प्रतिज्ञा करूनही त्याची काही दखलच घेत नाही आहे. ॥६९॥
स किष्किंधां प्रविश्य त्वं ब्रूहि वानरपुंगवम् ।
मूर्खं ग्राम्यसुखे सक्तं सुग्रीवं वचनान्मम ॥ ७० ॥
’म्हणून लक्ष्मणा ! तू माझ्या आज्ञेने किष्किंधापुरीत जा आणि विषयभोगात फसलेल्या मूर्ख वानरराज सुग्रीवास या प्रकारे सांग- ॥७०॥
अर्थिनामुपपन्नानां पूर्वं चाप्युपकारिणाम् ।
आशां संश्रुत्य यो हंति स लोके पुरुषाधमः ॥ ७१ ॥
’जो बल-पराक्रमानी संपन्न तसेच प्रथमच उपकार करणारा कार्यार्थी पुरुषांना प्रतिज्ञापूर्वक आशा देऊन नंतर ती तोडतो, तो संसारांतील सर्व पुरुषांमध्ये नीच आहे. ॥७१॥
शुभं वा यदि वा पापं यो हि वाक्यमुदीरितम् ।
सत्येन परिगृह्णाति स वीरः पुरुषोत्तमः ॥ ७२ ॥
’जो आपल्या मुखाने प्रतिज्ञेच्या रूपात निघालेली चांगली अथवा वाईट सर्व तर्हेच्या वचनांना अवश्य पालनीय समजून सत्याचे रक्षणाच्या उद्देश्याने त्यांचे पालन करतो, तो वीर समस्त पुरुषांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. ॥७२॥
कृतार्था ह्यकृतार्थानां मित्राणां न भवंति ये ।
तान् मृतानपि क्रव्यादाः कृतघ्नान् नोपभुञ्जते ॥ ७३ ॥
’जो आपला स्वार्थ सिद्ध झाल्यावर, ज्यांचे कार्य पूर्ण झालेले नाही त्या मित्रांचे सहायक होत नाहीत - त्यांच्या कार्यात सिद्ध करण्याचा प्रयत्‍न करीत नाहीत, त्या कृतघ्न पुरुषांच्या मृत्युनंतर मांसाहारी जंतुही त्यांचे मांस खात नाहीत. ॥७३॥
नूनं काञ्चनपृष्ठस्य विकृष्टस्य मया रणे ।
द्रष्टुमिच्छति चापस्य रूपं विद्युद्गोणोपमम् ॥ ७४ ॥
’सुग्रीवा ! निश्चितच तू युद्धात माझ्या द्वारे खेचले गेलेल्या सोन्याचा पृष्ठभाग असलेल्या धनुष्याचे तळपणार्‍या (विद्युत) वीजेप्रमाणे दिसणारे रूप पाहू इच्छित आहेस. ॥७४॥
घोरं ज्यातलनिर्घोषं क्रुद्धस्य मम संयुगे ।
निर्घोषमिव वज्रस्य पुनः संश्रोतुमिच्छति ॥ ७५ ॥
’संग्रामात कुपित होऊन माझ्या द्वारा खेचली गेलेली प्रत्यञ्चेचा भयंकर टणत्कार, जो वज्राचा गडगडाटावर ही मात करणारा आहे, तो परत ऐकण्याची इच्छा तुला होत आहे. ॥७५॥
काममेवं गतेऽप्यस्य परिज्ञाते पराक्रमे ।
त्वत्सहायस्य मे वीर न चिंता स्यान्नृपात्मज ॥ ७६ ॥
’वीर राजकुमारा ! सुग्रीवाला, तुझ्या सारख्या सहायकाबरोबर राहणार्‍या माझ्या पराक्रमाचे ज्ञान होऊन चुकले आहे अशा स्थितिमध्ये जर त्याला ही चिंता नसेल की हे वालीप्रमाणे मलाही मारू शकतात तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. ॥७६॥
यदर्थमयमारंभः कृतः परपुरञ्जय ।
समयं नाभिजानाति कृतार्थः प्लवगेश्वरः ॥ ७७ ॥
’शत्रू-नगरीवर विजय प्राप्त करणार्‍या लक्ष्मणा ! जिच्यासाठी हे मित्रता आदिचे सर्व आयोजन केले गेले, सीतेच्या शोधाविषयीची ती प्रतिज्ञा या समयी वानरराज सुग्रीव विसरला आहे - त्याला आठवण नाही आहे, कारण की त्याचे स्वतःचे कार्य सिद्ध झाले आहे. ॥७७॥
वर्षासमयकालं तु प्रतिज्ञाय हरीश्वरः ।
व्यतीतांश्चतुरो मासान् विहरन् नावबुध्यते ॥ ७८ ॥
 ’सुग्रीवाने ही प्रतिज्ञा केली होती की वर्षाऋतूचा अंत होताच सीतेचा शोध घेण्यास आरंभ केला जाईल; परंतु तो क्रीडा विहार यामध्ये इतका तन्मय झाला आहे की या निघून गेलेल्या चार महिन्याचा त्याला काही पत्ताच नाही आहे. ॥७८॥
सामात्यपरिषत् क्रीडन् पानमेवोपसेवते ।
शोकदीनेषु नास्मासु सुग्रीवः कुरुते दयाम् ॥ ७९ ॥
’सुग्रीव मंत्री तसेच परिजनांसहित क्रीडाजनित आमोद- प्रमोदात फसून विविध प्रिय पदार्थांचे सेवन करीत आहे. आम्ही शोकाने व्याकुळ होत आहोत. तरीही तो आमच्यावर दया करीत नाही. ॥७९॥
उच्यतां गच्छ सुग्रीवः त्वया वीर महाबल ।
मम रोषस्य यद्रूीपं ब्रूयाश्चैनमिदं वचः ॥ ८० ॥
’महाबली वीर लक्ष्मणा ! तू जा. सुग्रीवाशी बोल. माझ्या रोषाचे जे स्वरूप आहे ते त्याला सांग आणि माझा हा संदेश त्यास ऐकव. ॥८०॥
न च संकुचितः पंथा येन वाली हतो गतः ।
समये तिष्ठ सुग्रीव मा वालिपथमन्वगाः ॥ ८१ ॥
’सुग्रीवा ! वाली मारला जाऊन ज्या मार्गाने गेला आहे तो मार्ग आजही बंद झालेला नाही. म्हणून तू आपल्या प्रतिज्ञेवर अटळ रहा. वालीच्या मार्गाचे अनुसरण करू नको. ॥८१॥
एक एव रणे वाली शरेण निहतो मया ।
त्वां तु सत्यादतिक्रांतं हनिष्यामि सबांधवम् ॥ ८२ ॥
’वाली तर रणांगंणात एकटाच माझ्या बाणाने मारला गेला होता. परंतु जर तू सत्यापासून विचलित झालास तर मी तुला बंधुबांधवासहित काळाच्या मुखात लोटीन. ॥८२॥
यदेवं विहिते कार्ये यद्धितं पुरुषर्षभ ।
तद् तद् ब्रूहि नरश्रेष्ठ त्वर कालव्यतिक्रमः ॥ ८३ ॥
’पुरुषप्रवर ! नरश्रेष्ठ लक्ष्मण ! जेव्हा या प्रकारे कार्य बिघडू लागते तेव्हा अशा अवसरी जी जी गोष्ट सांगणे उचित आहे - ज्या सांगण्यामुळे आपले हित होत असेल, त्या सर्व गोष्टी सांगा. त्वरा करा, कारण कार्य आरंभ करण्याचा समय निघून जात आहे. ॥८३॥
कुरुष्व सत्यं मम वानरेश्वर
प्रतिश्रुतं धर्ममवेक्ष्य शाश्वतम् ।
मा वालिनं प्रेतगतो यमक्षये
त्वमद्य पश्येर्मम चोदितैः शरैः ॥ ८४ ॥
’सुग्रीवास सांगा- ’वानरराज ! तुम्ही सनातन धर्मावर दृष्टि ठेवून आपण केलेली प्रतिज्ञा सत्य करून दाखवा, अन्यथा असे न होवो की तुम्हांला आजच माझ्या बाणांनी प्रेरित होऊन प्रेतभाव प्राप्त होऊन यमलोकात वालीचे दर्शन घ्यावे लागेल.’ ॥८४॥
स पूर्वजं तीव्रविवृद्धकोपं
लालप्यमानं प्रसमीक्ष्य दीनम् ।
चकार तीव्रं मतिमुग्रतेजा
हरीश्वरे मानववंशवर्धनः ॥ ८५ ॥
मानव-वंशाची वृद्धि करणार्‍या उग्र तेजस्वी लक्ष्मणांनी जेव्हा आपल्या मोठ्या भावाला दुःखी, वाढलेल्या तीव्र रोषाने युक्त तसेच अधिक बोलतांना पाहिले तेव्हा वानरराज सुग्रीवाच्या प्रति कठोरभाव धारण केला. ॥८५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे त्रिंशः सर्गः ॥ ३० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील किष्किंधाकाण्डाचा तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP